Diwali_4 साथीचे रोग, कोरोना आणि विषमतेचे थैमान
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

साथीचे रोग, कोरोना आणि विषमतेचे थैमान

एकूणच, कोरोनावरची लस किंवा अन्य उपाय निघेपर्यंत हे संकट तसंच राहणार आहे, हे मात्र नक्की. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे आणि इतर कामं बंद झाल्यानं अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. यामुळे जगात एक प्रचंड महामंदी येणार आहे, असं सगळेच तज्ज्ञ वर्तवताहेत. आज शाळा, कॉलेजेस आणि इतर शिक्षणसंस्थाही बंद आहेत. नोकरदारांचं काय होणार, विद्यार्थ्यांचं कसं होणार आणि उद्योग परत उभे करताना गेलेले मजूर कसे परतणार- हे सगळे प्रश्न आहेतच. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या कोरोनानं गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गांतलं अगोदरच प्रचंड असलेलं अंतर आणखीनच वाढवलंय. ते कमी कसं होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

कुठल्याही साथीचा रोग किंवा नैसर्गिक आपत्ती जात, धर्म, वर्ण, वर्ग, रंग आणि आर्थिक स्तर बघत नाही, असं आपल्याला सांगितलं जातं. रोग जडताना तो विषाणू या गोष्टी बघत नसला, तरी अशा साथींचा फटका तळागाळातल्या जनतेला जास्त बसतो आणि या साथीनंतर विषमता उलट आणखीनच वाढते, असं आतापर्यंत सिद्घ झालंय. उदाहरणार्थ- 1315 ते 1317 या कालावधीत इंग्लंडमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. इंग्लंडमधली 15 टक्के लोकसंख्या यात मृत्युमुखी पडली होती. त्या वेळी 70 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली होते आणि ते या दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात सोसत होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशा उपासमारीनं मृत्यू पावलेल्यांच्या लंडनच्या दफनभूमीमधील हजारो मानवी सांगाड्यांवरून त्यांच्या स्थितीचा तज्ज्ञांनी अभ्यास केला होता. त्यांचं कुपोषण किती झालंय, हे त्यांचे दात सांगत होते. त्यांच्यावरचा ताणही अभ्यासावरून लक्षात येत होता.

सन 1349 च्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच लंडन शहरात ब्लॅक डेथ (काळा मृत्यू) या एका महाभयंकर साथीनं शिरकाव केला होता. त्याआधी वर्षभरापूर्वीच फ्लॉरेन्स शहरातले 60 टक्के लोक प्लेगच्या साथीमुळे मृत्युमुखी पडले होते. ही साथ आपले हात-पाय पसरत इंग्रजी बंदरापर्यंत येऊन पोहोचली होती. तिनं राजधानीभोवती हळूहळू विळखा घालायला सुरुवात केली. प्लेग या साथीची लक्षणं खूपच वेदनादायी आणि भीषण होती. रुग्णाला ताप यायचा, उलट्या व्हायच्या, खोकल्यातून रक्त पडायचं आणि त्वचेवर काळ्या रंगाच्या पुटकुळ्या यायच्या. रुग्णाला खूप त्रास व्हायचा आणि तीन दिवसांच्या आत रुग्णाचा मृत्यू हमखास ठरलेला असायचा. त्या वेळी लंडन शहरामध्ये प्रशासनानं ईस्ट स्मिथफील्ड या दफनभूमीमध्ये खूप मोठी पूर्वतयारी केली होती. लंडन शहरातले अर्धे नागरिक 1347 ते 1351 या कालावधीत या ब्लॅक डेथ साथीला बळी पडले होते! कुठलीच व्यक्ती त्या काळी स्वतःला सुरक्षित समजत नव्हती. फ्रान्समध्येही हेच घडलं होतं. पण याही वेळी गरिबांचे हाल कोणी विचारत नव्हते. त्यानंतर 1770 मध्ये जगभर देवीच्या साथीनं धुमाकूळ घातला. त्या वेळी जवळजवळ 30 टक्के लोकांना देवीच्या साथीनं आपल्या विळख्यात घेतलं होतं. त्या वेळीही त्याची झळ गरिबांनाच जास्त पोहोचली होती आणि त्यानंतर विषमता वाढली होती. थोडक्यात, साथीचे रोग येतात, त्यांचा गरिबांमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, ते जातात आणि मागे प्रचंड प्रमाणात विषमता वाढवून जातात. टीबीच्या विकारानं 1918 मध्ये कृष्णवर्णीय लोकांचाच जास्त बळी गेला. याचं कारण त्यांचा निकृष्ट आहार आणि त्यांच्यामधल्या प्रतिकारशक्तीचा अभाव हेच होतं. एकूण तज्ज्ञांनी केलेला गेल्या 700 वर्षांचा अभ्यास बघता, आर्थिक विषमता या साथींबरोबर जास्त बळावत जाताना दिसते आणि गरीब लोकांना या साथींमुळे प्रचंड त्रास होतो, असं त्यांना आढळून आलं.

कोरोनाच्या अगोदरच्या जगात प्रचंड विषमता होती. उदाहरणार्थ- जगातल्या 26 लोकांकडे जगातल्या तळागाळातल्या 50 टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतात तर फक्त 9 जणांकडे तळातल्या 50 टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतातल्या 1 टक्का लोकांकडे 58.4 टक्के संपत्ती आहे. जगभर कोरोनानंतर हे चित्र आणखीनच विदारक होईल.

आज वॉशिंग्टन डीसीमध्ये कोविड-19 च्या केसेसमध्ये जे लोक मरण पावताहेत, त्यातले बहुतांशी कृष्णवर्णीय आहेत. जॉर्जियामध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जवळजवळ 80 टक्के कृष्णवर्णीय रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. जवळपास हेच प्रमाण युनायटेड किंगडममध्ये आढळलं. याचं कारण ते सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाहीत. त्यांचं काम श्रमाचं असल्यामुळे आणि त्या-त्या जागी जाऊन करायचं असल्यामुळे ते घरी बसून ‘वर्क फ्रॉम होम’ असंही करू शकत नाहीत. किंवा ‘चला, सुट्या साजऱ्या करू’ म्हणून आनंदही साजरा करू शकत नाहीत. कारण ते करण्यासाठी हातावर पोट असणाऱ्या या वर्गाच्या खिशात पैसेही नाहीत. तसंच त्यांच्यात प्रतिकारशक्तीचा अभाव आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे सकस व समतोल आहारापेक्षा बर्गर अन्‌ पिझ्झा (भारतात वडा-पाव वगैरे) यांच्यासारखं फास्ट फूड खाण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो, पण त्यांच्यात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार यांचं प्रमाण जास्त आढळून येतं आणि हीच मंडळी आज कोरोनाला बळी पडताहेत, असं डॉ.अँथनी फाउची हे अमेरिकेतले तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतातली परिस्थिती तर प्रचंडच विदारक होत चालली आहे. कोट्यवधी स्थलांतरित लोक भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, पण कोरोनामुळे यातले अनेक जण आपापल्या गावी परतताहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांचं काम ठप्प झालं आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती दारिद्य्ररेषेच्या किती तरी खाली गेली आहे. कारण हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत ही माणसं सध्या दिवस कंठताहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर आलेली ही सगळ्यात मोठी मंदी आहे. जगाचा विचार करता, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये 200 कोटी लोक काम करतात, पण कोरोनामुळे अनेकांची कामं धोक्यात आली आहेत. भारताप्रमाणेच नायजेरिया, ब्राझील अशा अनेक देशांमध्येही इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीचे परिणाम विकसनशील देशांमध्ये अधिक प्रमाणात झाले आहेत. चीनमधल्या वुहान शहरात हा व्हायरस आल्यानंतर तो विषाणू विकसित देशांमध्ये आधी गेला. त्यानंतर व्यवसायानिमित प्रवास करणाऱ्यांनी गोरगरिबांना त्याचा प्रसाद दिला. जगाच्या पातळीवर गरीब देशांमध्ये आजारापासून बचाव करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी आणि लोकांमध्ये प्रतिकारशक्ती असण्यासाठी संसाधनांचा खूप मोठा अभाव असतो. ब्राझील देशाचं उदाहरण बघितलं, तर साथ सुरू झाल्यावर मध्यमवर्गीय लोकांनी अन्नाचा भरपूर साठा करून ठेवला; त्याच वेळी गरिबांना मात्र हातात पैसा नसल्यामुळे चक्क रस्त्यावर यावं लागलं. इथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची तर कामं ठप्प होऊन चालणार नाहीत आणि त्यांच्यासाठी कुठल्या सुविधाही नाहीत, अशी अवस्था होती. अशा वेळी त्यांच्यापासून इतरांना संसर्ग वाढण्याचा धोका किती तरी अधिक पटीनं वाढतो. घरी असणाऱ्या इतरांचीही परिस्थिती बिकटच आहे. घरी काहीही न करता राहायचं म्हणजे पैसे न मिळणं. पाण्याची कमतरता असल्यानं आणि पाणी आणायचं कुठून व अतिरिक्त स्वच्छता राखायची कशी, हे प्रश्न आहेतच. त्यांना खरं तर स्वच्छ आणि सुंदर जगात प्रवेशच नाही. तसंच हात धुणं ही अनेकांसाठी चैन आहे. भारतात एकूण 40 टक्के लोकांना लोकांकडे नळाचं पाणी येत नसल्यामुळे हात स्वच्छ करणाऱ्यासाठी मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नाहीत. कारण पाण्याच्या प्रत्येक कळशीसाठी दूरवर जावं लागतं किंवा नळापाशी बराच काळ रांगेत उभं राहावं लागतं. गरिबांना आणि श्रीमंतांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेत खूप तफावत असते. या दोन्ही वर्गांची आर्थिक क्षमताही भिन्न असते. गरीब शारीरिक अंतर राखू शकत नाहीत, तर कुठलाही धनिक हे अंतर सहजपणे पाळू शकतो. ज्या घरांमध्ये किंवा एका खोलीमध्ये 10-10 लोक दाटीवाटीनं राहतात, तिथं शारीरिक अंतर पाळणार कसं? त्या घरातल्या वृद्धांनी जायचं कुठे, हा प्रश्न भेडसावणारा आहे.

आरोग्याच्या बाबतीत जगातल्या 122 देशांमध्ये परिस्थिती खूपच विदारक आहे. जगाच्या निम्म्या लोकसंख्येला अत्यावश्यक आरोग्यसेवेमध्ये प्रवेशच मिळत नाही. या देशांमधल्या आरोग्यसेवेची पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की, अमेरिकेत दर 10 हजार लोकांमागे 25 डॉक्टर्स आहेत, तर भारतात केवळ 8 आणि मोझांबिकमध्ये तर 0.7 एवढं प्रमाण आहे. हेच प्रमाण चीनमध्ये 15 तर इतर प्रगत राष्ट्रांमध्ये 25 ते 35 आहे. भारतात दर 10 हजार लोकसंख्येमागे 5 हॉस्पिटल बेड्‌ज आहेत, तर चीनमध्ये आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये 40 आहेत. त्यातून भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.3 टक्के खर्च करतं. इतर बहुतांश ब्रिक्समधली आणि प्रगत राष्ट्रं 5-6 टक्के खर्च करतात. त्यातच स्वच्छतेचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असं जर चित्र असलं, तर स्थिती आणखीनच वाईट बनते. कारण यातून संसर्ग झाला, तर मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि अशी परिस्थिती जगातल्या तळातल्या जवळजवळ निम्म्या लोकांची आहे.

शिक्षणाच्या आणि कामाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. श्रीमंत घरातून आलेल्या मुलांचं शिक्षण चांगल्या तऱ्हेनं होतं आणि त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या स्रोतांमुळे ते ऑनलाईन किंवा इतर प्रकारची कामं सहजी करू शकतात. गरिबांजवळ मात्र मुळातच संसाधनं नसल्यामुळे ते या कामातून तसेही फेकले जातात आणि शिक्षणापासूनही वंचित होतात. ते ऑनलाईन कामही करू शकत नाहीत, कारण ते आयटी किंवा बँकिंग यांसारख्या क्षेत्रात काम करत नाहीत. यंत्रावरचं काम अजून तरी घरून करता येत नाही. शिवाय त्यांना त्याची सवयही नसते. विलगीकरण हीसुद्धा गरिबांसाठी चैन आहे. कारण उच्च आणि मध्यमवर्गीय मंडळी विलगीकरण झाल्यावर स्वतः घरी एसी किंवा पंख्यांमध्ये राहून गॅजेट्‌स, ॲप्स व इंटरनेट कनेक्शन अशा वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन करू शकतात, शिक्षण घेऊ शकतात आणि कामही करून पैसे मिळवू शकतात. पण हे इतरांना शक्य नाही. थोडक्यात, कोरोनानंतरच्या ऑनलाईन जगात विषमता आणखीच वाढेल.

कोरोनाच्या साथीमुळे सगळ्यात भयंकर हानी झाली आहे ती भारतासारख्या विशाल देशात काम करणाऱ्या मजुरांची. वेगवेगळ्या राज्यांमधून मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये असंख्य मजूर कामासाठी आलेले होते. त्यासाठीही ते जबाबदार नव्हते. गेल्या 30 वर्षांत भारतीय शेती उद्‌ध्वस्त झाली. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीत पैसे मिळत नाहीत म्हणून दररोज 20-25 लोक शेती सोडून शहराकडे येतात. आपल्या अर्थव्यवस्थेत प्रचंड असमतोल असल्यामुळे उद्योग विखुरले न जाता ते शहरांमध्येच केंद्रित झाले. उदाहरणार्थ- महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि थोडेफार नाशिक, औरंगाबाद इथे. त्यामुळे लोकांचे हे लोंढे खेड्यातून शहरात येऊन धडकले. शहरांचं बकालीकरण वाढलं. आता लॉकडाउनमुळे त्यांचं काम तर ठप्प झालंच, पण त्यांचे खाण्यापिण्याचे अतोनात हालही सुरू झाले. अशा वेळी आपापल्या गावी जायचं तर प्रवासासाठी पैसा आणि कागदपत्रं, वैद्यकीय तपासणी व प्रतीक्षेचा कालावधी यांच्यापेक्षा या लोकांनी सरळ पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. 1600-1600 किमी इतकं अंतर पार करण्यासाठी या स्थलांतरितांची रस्त्यावर एकच झुंबड उडाली. यात आतापर्यंत जवळजवळ 600 जणांचे अपघाती मृत्यू झाले, तर अनेकांची अतिशय दयनीय अवस्था झाली. तसंच आपापल्या राज्यात, आपापल्या गावी जाऊ न तिथेही त्यांना घरात लगेच प्रवेश नाहीच. त्यांना आधी नियोजित ठिकाणी 15 दिवस विलगीकरणात राहावं लागत आहे. त्याच वेळी त्यांची परत एकदा वैद्यकीय तपासणीदेखील अनिवार्य ठरते आहे. तसंच अनेक अफवांमुळे आणि गैरसमजुतींमुळे गावातले लोक या आपल्याच परतलेल्या नातेवाइकांना घरात घ्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रातल्या हादगाव या गावी मुंबईहून परतलेल्या एका कुटुंबामुळे गावात राहणाऱ्या कर्त्या पुरुषानं आता इतक्या तोंडांना खाऊ कसं घालायचं, या ताणानं चक्क आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातून निघालेल्या 16 मजुरांनी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रेल्वेच्या रुळांचा आधार घेत प्रवास करायला सुरुवात केली. 36 किमीचं अंतर पार केल्यानंतर ते प्रचंड थकले आणि थकव्यानं त्यांनी रुळाच्या पटरीवरच काही क्षण पाठ टेकली. मात्र त्या थकव्यानं ग्लानी आलेल्या मजुरांवर मृत्यूनं अचानकपणे हल्ला केला. दुरून येत असलेली मालगाडी या मजुरांना दिसलीच नाही, तसंच तिचा आवाजही त्यांच्या कानांवर पडला नाही आणि त्यातच त्यांचा करुण मृत्यू झाला. अशा एक ना अनेक-मृत्यूच्या हृदयद्रावक कहाण्या रोजच कानांवर येऊन आदळताहेत. तसंच ज्येष्ठ व्यक्ती, पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, मेडिकल स्टोअर्समधले कर्मचारी कोरोनाबाधित होऊन मृत्युमुखी पडताहेत आणि यातली बहुतांश सर्वसामान्य मंडळी आहेत. श्रीमंतवर्गातली फारशी कोणी मृत्युमुखी पडल्याची किंवा खूप हाल-अपेष्टा सोसत असल्याची बातमी नाही. म्हणजे, इथेही विषमता आहेच.

एकूणच, कोरोनावरची लस किंवा अन्य उपाय निघेपर्यंत हे संकट तसंच राहणार आहे, हे मात्र नक्की. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे आणि इतर कामं बंद झाल्यानं अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. यामुळे जगात एक प्रचंड महामंदी येणार आहे, असं सगळेच तज्ज्ञ वर्तवताहेत. आज शाळा, कॉलेजेस आणि इतर शिक्षणसंस्थाही बंद आहेत. नोकरदारांचं काय होणार, विद्यार्थ्यांचं कसं होणार आणि उद्योग परत उभे करताना गेलेले मजूर कसे परतणार- हे सगळे प्रश्न आहेतच. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या कोरोनानं गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गांतलं अगोदरच प्रचंड असलेलं अंतर आणखीनच वाढवलंय. ते कमी कसं होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारनं मजुरांची प्रवासाची सोय करणं, त्यांना खायला-प्यायला देणं, रोख पैसे देणं- ही तातडीची गरज आहे. दूर पल्ल्याचा विचार करता; आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, स्वस्त घरं आणि सार्वजनिक वाहतूक यावर प्रचंड खर्च करून पुढच्या दशकात आपलं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केलं पाहिजे. उद्योगांचं विकेंद्रीकरण जाणीवपूर्वक केलं, तर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होईल. आज केरळ यातून बाहेर येऊ शकल्याचं एकमेव कारण म्हणजे तिथली भक्कम आरोग्यव्यवस्था आणि तिथलं शिक्षण. त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे.

Tags: विषमता कोव्हीड 19 कोरोना दीपा देशमुख अच्युत गोडबोले inequalities pandemics covid 19 corona deepa deshmukh achyut godbole weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
achyutgodbole@gmail.com | ​​​​​​​adipaa@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात