डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पंडित जसराज : शेवटचा तारा निखळला, एका युगाचा अंत झाला

पंडितजी मला प्रेमानं खूप गोष्टी सांगायचे. न्यूयॉर्कमध्ये तिथल्या एका हॉलला आपलं कसं नाव दिलंय, एका उपग्रहाला आपलं नाव कसं दिलंय (हा मान यापूर्वी फक्त केसरबाई केरकर यांना चॅलेंजर या यानामध्ये जतन करून ठेवलेल्या त्यांच्या ‘जात कहाँ हो’ या भैरवीच्या रूपानं मिळाला होता.) याचा पंडितजींना खूप अभिमान वाटायचा. आज मला अतिशय मोठी पोकळी जाणवतेय. खरोखरच एका युगाचा अंत झालाय, असं मला वाटतंय. भीमसेनजी, कुमारजी, किशोरीजी आणि जसराजजी यांनी माझ्या सोलापूरच्या दिवसांपासून ते अगदी काल-परवापर्यंत जी अनेक दशकं गाजवली, ती सगळी दशकं अक्षरशः एका क्षणार्धात माझ्या डोळ्यांसमोरून गेली. डोळे पाणावले. मला राहवलं नाही, म्हणून हे सगळं मी सांगतोय. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

पंडित जसराज गेल्याची बातमी आली आणि मला खरोखरच प्रचंड धक्का बसला. ज्यांना गाण्यातल्या क्षेत्रातले चार अतिरथी-महारथी म्हणता येईल असे कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी आणि जसराज यांनी अनेक दशकं गाजवली. या सगळ्यांनी गाण्यामध्ये खरोखर आपल्याला रमवलं आणि प्रचंड आनंद दिला. आज त्यांच्यातला शेवटचा तारा- म्हणजे पं. जसराज- निखळलेला आहे. एक मोठं युग संपलंय, असं मला वाटतंय. संगीतातल्या या चारही ताऱ्यांशी माझा जवळचा संबंध आला होता. या सगळ्यांबरोबरच्या आठवणी खूप दाट आहेत.

मी शाळेत असताना जसराजजी, कुमारजी, भीमसेनजी अशा मोठमोठ्या लोकांना श्रीराम पुजारीसर सोलापूरला आमच्याकडे घेऊन यायचे. पुजारीसरांना साहित्य, कला आणि संगीत यांच्याविषयी प्रचंड प्रेम होतं. माझी बहीण सुलभाताई गाणं शिकायची. पुजारीसर, सुलभाताई व पुष्पा आगरकर यांनीच मला संगीत आणि साहित्य यांची आवड लावली. पं. जसराज आमच्याकडे यायचे, तेव्हा आल्यावर ते सुलभाताईला विचारायचे, ‘‘बेटा, काय शिकते आहेस तू?’’ मग बहीण काही तरी गाऊन दाखवायची. मला आठवतंय की, पंडितजी त्या वेळी बहिणीला शिकवत असत. बहुधा तो नटभैरव असावा- ‘चढीए मुलुख सुलतान’ ही बंदिश होती. नंतर प्रत्यक्षात आणि रेकॉडर्‌समध्ये असंख्य वेळा त्यांचा नटभैरव मी ऐकलेला आहे. पं. रविशंकर आणि अली अकबर यांनी नटभैरव लोकप्रिय केला. वसंतरावसुद्धा नटभैरव सुंदर गात. शाळेत असताना पं. जसराज, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, बिरजूमहाराज अशा अनेकांच्या मैफिली मला सोलापूरला ऐकता आल्या आणि त्यांच्याबरोबर गप्पाही मारता आल्या.

त्यानंतर आयआयटीला गेल्यावर तिथे ‘स्वरांजली’ नावाचा आमचा गाण्याचा एक ग्रुप जमला. त्याच्यामध्ये पु.लं.च्या नारायणसारखी आम्ही सगळी कामं करत असू. कुठलाही प्रोगॉम ठरवताना त्याच्या जाहिराती मिळव, त्या गायकांच्या घरी जा, त्यांचा कार्यक्रम ठरव- हे सगळं करत असताना फार मजा यायची. त्यातूनच पं. जसराज यांच्याशी आणखीनच ओळख झाली. जसराजजी त्या वेळी शिवाजी पार्कला तिसऱ्या की चौथ्या मजल्यावर राहत असत. त्यांच्या घरी एक निमुळता जिना चढून जावं लागायचं. त्या वेळी सारंग आणि दुर्गा ही त्यांची मुलं खूप लहान होती. त्यांच्या घरी आमच्या खूप गप्पा चालायच्या. कित्येक वेळा ते गझला ऐकायचे. आम्हाला वाटायचं- एवढा मोठा क्लासिकलचा सिंगर आणि चक्क गझला ऐकतोय? गुलाम अली, बेगम अख्तर अशा अनेकांच्या गझला ते ऐकत असत आणि ते त्या आम्हाला गुणगुणून दाखवायचेसुद्धा.

त्या माणसाकडे रागांचा केवढा मोठा संग्रह होता! त्यांच्याच तोंडून आम्हाला अनेक कहाण्या ऐकायला मिळायच्या. त्यांचे मोठे बंधू मणिराम हे त्यांचे खरे गुरू. मणिरामांचा आवाज खरखरीत होता. पण गाण्यातले ते पक्के. पं. जसराजांचा आवाज मात्र अतिशय मुलायम. मणिराम आणि त्यांची ‘जोग’ रागातली जुगलबंदी खूपच सुंदर आहे.

जसराजजी पहिल्यांदा तबलजी होते. एकदा कुमार गंधर्वांचा लाहोरमध्ये कार्यक्रम होता. ते पंडित मणिरामांकडे आले. त्या वेळी मणिरामांकडे 13 वर्षांचे जसराज तबला वाजवत होते. कुमारांनी मणिरामांना विचारलं, ‘‘जसराजला साथीला घेऊन जाऊ का?’’ तर मणिरामांनी परवानगी दिली. त्या मैफिलीत कुमारांनी भीमपलास राग गायला. तेव्हा भीमपलासाच्या आरोहात न येणाऱ्या धैवत स्वरावर ते समेवर आले. असं शक्यतो कुणी करत नही; पण कुमारांनी ते केलं. दुसऱ्या दिवशी मणिरामांकडे अमरनाथ चावला नावाचे गायक आले आणि आदल्या दिवशीच्या कुमारांच्या भीमपलासवर टीका करायला लागले. त्यावर जसराज म्हणाले, ‘‘कुमारांनी काल भीमपलासात जरी धैवतावर सम घेतली असली, तरी त्यामुळे रागाचं सौंदर्य वाढलंच होतं.’’ जसराजनं असं बोललेलं अमरनाथांना आवडलं नाही. ते म्हणाले, ‘‘मेलेल्या प्राण्याची कातडी बडवणाऱ्यांना (तबल्याची साथ देणाऱ्यांना) गाणं कळत नाही. त्यांनी यावर बोलू नये!’’ या बोलण्यामुळे लहानग्या जसराजला खूप वाईट वाटलं. गायकाला मान मिळतो आणि तबलावादकाला फारसा मान नाही, हे पाहून जसराजनं गाणं शिकायचं ठरवलं.

थोड्याच दिवसांत आणखी एक कार्यक्रम होता. त्याची पूर्वतयारी पाहण्यासाठी गेले असताना गायकासाठी व्यवस्थित आसनव्यवस्था केली होती, पण पेटी आणि तबलावादकांना खाली बसावं लागेल असं दिसत होतं. या कार्यक्रमात जसराज तबला वाजवणार होते. पण तेथील व्यवस्था बघून ते व्यथित झाले. अशा अपमानामुळे ते रात्रभर रडले आणि मग आपणच गायक व्हायचं, हा पुन्हा निश्चय केला. मणिरामांनी त्यांना गाणं शिकवायचं ठरवलं, तेव्हा जसराजचं वय 14 वर्षांचं होतं.

आणि जिद्द ती केवढी असावी? ‘गायक झाल्याशिवाय मी केस कापणार नाही’ असं ठरवूनच त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली आणि पुढच्या चार वर्षांत कसून तयारी केली. चार वर्षांनंतर झालेल्या मैफिलीमध्ये ते सगळ्यांसमोर गायले आणि मगच त्यांनी आपले केस कापले!

ते नुसतंच गाणं शिकले नाहीत, तर त्यातल्या सर्वोच्च गायकांपैकी एक झाले. या सगळ्या कहाण्या आम्ही त्यांच्या घरी बसून स्वत: ऐकलेल्या आहेत. एकदा ‘स्वरांजली’मधले आम्ही 20-30 जण आयआयटीच्या लेक्चर हॉलच्या बाहेर लॉनवर जमलो होतो. तेव्हा एक अनौपचारिक पण अफलातून मैफिल रंगली होती. अरविंद पारेख यांनी सतार वाजवली होती आणि त्यांच्या पत्नीनं ‘पुरिया धनश्री’ राग गायला होता, तर पंडित जसराजांनी त्या वेळी चक्क तबला वाजवला होता! त्यांच्या गाण्याच्या प्रोग्रामला जाताना ते कसे तयार व्हायचे ते बघायचं, त्यांच्या गाडीत बसून किंवा त्यांच्या मागोमाग जायचं, ती पूर्ण मैफल ऐकायची, ती ऐकल्यावर धुंद होऊन परत यायचं- असं सगळं मी त्या काळात अनुभवलं आहे. कारण पुणे-मुंबईच्या सगळ्या मैफिली मी ऐकायचो, मग त्या मुंबईच्या रंगभवनच्या असोत किंवा पुण्याच्या सवाई गंधर्वच्या असोत!

पंडितजी वागायला खूप दिलखुलास आणि प्रसन्न होते. त्यांच्याबरोबर खाणं-पिणं व्हायचं, गप्पाही व्हायच्या. खूप मजा यायची. पूर्वी पंडितजी तबला वाजवत असल्यामुळे त्यांच्याकडे तबलजीही यायचे. एकदा झाकीर हुसेनही आलेला मला आठवतंय. पंडितजींच्या घरासमोर त्या वेळी शिवाजी पार्कसमोर इराण्याचं एक दुकान होतं. त्या दुकानात मी नेहमी चहा प्यायचो. एकदा मी झाकीर हुसेनबरोबर तिथेच चहा पिऊन नंतर समुद्रावर फिरायलाही गेलो होतो, असं मला अंधुकसं आठवतंय.

हा काळ इतका मंतरलेला होता की, सगळ्या विषयात डोकावून बघण्याचं आमच्या ग्रुपमध्ये वेडच होतं. ‘मी कसा झालो’मध्ये ‘मांजर जसं प्रत्येक दालनात डोकावून बघतं’ असं अत्रे म्हणाले होते, तसं आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, चित्रकला याबरोबरच संगीत- अशा प्रत्येक दालनात डोकावून बघायचो. म्हणजे सगळं काही पूर्णपणे कळणं शक्य नाही, पण निदान या सगळ्यांची मूलभूत तत्त्वं तरी कळली पाहिजेत, असा आमचा अट्टहास असायचा. आम्ही त्यातले तज्ज्ञ वगैरे काही झालेलो नव्हतो. मी तर मुळीच नाही. शास्त्रीय संगीतामध्ये काही तरी वेगळं आहे, असंच मला वाटायचं. त्या वेळी वेस्टर्न क्लासिकलपासून कर्नाटक संगीत, भारतीय संगीत, वाद्यसंगीत, कंठसंगीत या सगळ्यांमध्ये आम्ही डोकावत होतो आणि बुडून जात होतो. पण शास्त्रीय संगीतातले राग समजण्यासाठी अनेक कलाकारांचे अनेक राग असंख्य वेळा ऐकले. त्यातच पंडितजींचे किती तरी राग ऐकले होते. त्यांचे नटभैरव, तोडी, चारूकेशी, अहिर भैरव, असावरी, मियाँ मल्हार, मधुवंती, मारुबिहाग, पुरिया, दरबारी, केदार, नट, गोरख कल्याण, रागेश्री, शंकरा असे अनेक राग तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांचा ‘दिन की पुरिया’, ‘आसामांड’, आपल्या माहितीतल्या ‘पुरिया धनाश्री’पेक्षा वेगळा ‘धनाश्री’ असे रागही ते अप्रतिम गायचे. अनेक वेगवेगळे अनवट रागही त्यांच्याकडे असायचे.

त्यांचा एकच राग मला फारसा ऐकायला मिळाला नाही, तो म्हणजे ‘यमन’. मुळात ते यमनही खूप चांगला गात असत. त्यांनी गायलेली ‘जा जा रे पागल’ ही यमनमधली बंदिश छानच आहे. पण एकदा त्यांनी किशोरी आमोणकरांचा यमन ऐकला आणि त्यानं ते इतके भारावून गेले की, आता आपण यमन गाण्यात काहीही अर्थ नाही- असं किशोरीतार्इंना चक्क सांगून मोकळे झाले, असंही मी ऐकलं होतं!

तुळजापूरच्या देवळामध्ये जसराजजी दर वर्षी ‘माता कालिका’ हे अडाणा रागातलं भजन गायचे. जवळपास दरबारीचेच सूर घेऊन येणाऱ्या अडाणाचं वातावरण मात्र दरबारीपेक्षा खूपच वेगळं आहे. दरबारी मंद्र आणि मध्य सप्तकात रमणारा; तर अडाणा सुरांचा खणखणाट करत, तार षडज गाठण्यासाठी वेगवान, आक्रमक होणारा आणि वीररसप्रधान. एकदा पंडितजी तुळजापूरला चालले होते. तुळजापूरसाठी गाडी सोलापूरहूनच जाते. मला आठवतंय- आयआयटीत असताना मी एकदा सुट्टी म्हणून सोलापूरला गेलो होतो. जसराजजी मला म्हणाले, ‘‘चलो बच्चमजी’’- नाही तरी मला काही उद्योग नव्हताच. मग मी ट्रेनमध्ये त्यांच्याबरोबरच बसलो. सगळा प्रवास आम्ही जसराजींबरोबर केला. तुळजापूरच्या त्या देवळात मी, जसराजजी, काही पुजारी आणि काही लोक एवढेच हजर होतो. त्या वेळी तिथे त्यांचं गाणं ऐकणं हा इतका विलक्षण अनुभव होता! अडाणा खूप कमी लोक गातात आणि त्यांनी तर तो खूपच सुंदर गायला होता. त्याची रेकॉर्डही आहे. पण तो त्यांच्या तोंडून त्या वेळी तिथे ऐकण्याचा अनुभव अवर्णनीयच होता. एका मोठ्या गवयाबरोबर जाणं आणि त्यांचं गाणं तिथे प्रत्यक्ष ऐकणं हेच मुळी मंतरल्यासारखं होतं.

पं. जसराजजींनी माझ्यावर प्रचंड किमया केली आहे. अनेक वर्षे मी त्यांच्या अनेक मैफिली ऐकत गेलो. कालांतराने मी माझ्या ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’च्या कॉर्पोरेट विश्वात गेलो, पण माझ्या त्यांच्याबरोबर गाठीभेटी होत राहिल्या. अधून-मधून फोनही होत राहिले. मी त्यांच्या तिन्ही घरांमध्ये गेलेलो आहे. शिवाजी पार्कच्या घरात तर अनेकदा गेलो. परळला व्ही.शांतारामांचा ‘राजकमल’ स्टुडिओ होता. एकदा त्यांची पत्नी मधुरा यांना बरं नव्हतं, त्या वेळी त्यांना मी तिथे भेटायला गेलो होतो. तिथेही आमच्या खूप गप्पा झाल्या. मी आणि महाराष्ट्र टाइम्सचा अशोक जैन एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी तर त्यांनी आमच्याशी दोन-तीन तास गप्पा मारल्या होत्या. अंधेरी पश्चिमला त्यांचं तिसरं घर होतं, तिथेही मी गेलेलो आहे.

एकदा पार्ल्याला मॅजेस्टिक गप्पांमध्ये त्यांची मुलाखत घ्यायची होती. ती कोणी घ्यायची, अशी चर्चा चालली होती. अशोक कोठावळेनं मला ‘अच्युत, तू घेशील का?’ असं विचारल्यावर मी आनंदानं तयार झालो. आणि मॅजेस्टिक गप्पांमध्ये मी पंडितजींची मुलाखत घेतली होती. ती खूपच रंगली होती. मी त्यांना प्रश्न विचारायला लागलो की, ‘बच्चमजी, थांब जरा तू... लहानपणापासून मी तुला ओळखतो.’ असं म्हणून माझा प्रश्न थांबवून स्वत:च उत्तर द्यायला सुरुवात करायचे. खूप मजा आली.

मला स्वत:ला त्यांच्या गाण्यांमध्ये अतिशय गोडवा वाटतो. पं. जसराजजींमध्ये वेगळ्या तऱ्हेचं चैतन्य होतं. त्यांचा आवाज, त्यामधली ताकद, रागाची बढत करायची पद्धत, मधल्या श्रुतींना घेऊन जाणारी मिंड, दाणेदार गमकेच्या ताना हे सगळं काही औरच होतं. जेव्हा एखाद्या गवयानं गायलेला राग अनेक आठवडे किंवा अनेक महिने मनात ठाण मांडून बसतो, तेव्हाच तो कलाकार मला खूप भावतो आणि श्रेष्ठ वाटतो. जसराजजींचे अनेक राग माझ्या मनात असेच रेंगाळत राहिले आहेत. त्यांचा बिलासखानी तोडी घ्या, त्यांचा नट घ्या... किंवा बिहाग घ्या- आणि असे अनेक.

फार कुणी गाणार नाही असे अनवट राग पंडितजी अप्रतिम तऱ्हेनं गायचे. गुंजी कानडा, धुलिया मल्हार, गौडगिरी मल्हार, चरजूका मल्हार, भैरव बहार, अबिरी तोडी, जयजयवंती तोडी, पटदीपिकी, खमाज बहार, नागध्वनी, नट नारायणी... असे किती राग सांगावेत? धुलिया मल्हारमध्ये सारंग आणि मल्हार यांचे सूर सापडतात. पहिल्या पावसाची चाहूल असताना हवेत धुळीची वावटळ असते, तेव्हाचं वातावरण या रागात आहे. काफी थाटातल्या चरजूका मल्हारमध्ये सिंदुरा आणि देसी यांची छाया दिसते. अर्थात त्यांची भजनं, लाईट म्युझिक हे सगळं होतंच. ‘निरंजनी नारायणी’ या भैरवीसाठी तर ते प्रसिद्धच आहेत. त्यांच्या दरबारीतली ‘अजब तेरी दुनिया’ आणि भैरवमधली ‘मेरो अल्लाह मेहेरबान’ या सूफी रचना मला प्रचंडच आवडायच्या.

त्यांनी जसरंगी नावाचा जुगलबंदीचा नवाच प्रकार निर्माण केला. त्यात एक गायक व एक गायिका दोन वेगवेगळे राग एकाच वेळी गातात आणि तरीही ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्याचा विलक्षण अनुभव देतात. ही फारच अफलातून कल्पना जसराजजींची आहे. संजीव अभ्यंकर आणि अश्विनी भिडे-देशपांडे हा प्रकार सुंदरच गातात. त्यांच्या हरिप्रसाद चौरसिया आणि बालमुरलीकृष्ण यांच्याबरोबरच्या जुगलबंदी रचना सुंदर आहेतच, पण त्यांनी भीमसेनजींबरोबर गायलेली 1972 च्या ‘बिरबल माय ब्रदर’ या सिनेमामधली मालकंस रागातली  ‘रंगरलिया करत सौतनसे’ ही जुगलबंदी तर अप्रतिमच आहे!

आज पंडितजींच्या आठवणी मला एकदम दाटून आल्या. एकदा तर मुंबईचे तेव्हाचे म्युनिसिपल कमिशनर शरद काळे यांच्याकडे पंडितजींचा कार्यक्रम होता. त्या वेळी मी आणि माझी बायको शोभा त्यांना माझ्याच गाडीतून घेऊन जात होतो. जाताना माहिमच्या जंक्शनपाशी आमच्या गाडीला एका टॅक्सीनं थोडासा धक्का मारला आणि मी गाडी थांबवली. त्या वेळी मी ‘जाऊ दे, कुठे वाद घालणार’ असा विचार केला; पण आश्चर्य म्हणजे, पंडितजी गाडीतून खाली उतरले आणि माझ्या वतीनं त्या टॅक्सीवाल्याशी भांडायला लागले! आम्हालाच इतकं ओशाळल्यासारखं झालं होतं. नंतर मैफिलीत गाताना थोड्या वेळापूर्वी झालेल्या भांडणाचा आणि मनस्तापाचा त्यांच्या चेहऱ्यावर मागमूसही नव्हता! तेही गाणं अर्थातच अप्रतिम झालं. तेव्हा त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची मला फार कमाल वाटली. माझ्यावर त्यांचं खूपच प्रेम होतं. त्या माणसानं मला, सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या जगाला प्रचंड आनंद दिला.

पंडितजी मला प्रेमानं खूप गोष्टी सांगायचे. न्यूयॉर्कमध्ये तिथल्या एका हॉलला आपलं कसं नाव दिलंय, एका उपग्रहाला आपलं नाव कसं दिलंय (हा मान यापूर्वी फक्त केसरबाई केरकर यांना चॅलेंजर या यानामध्ये जतन करून ठेवलेल्या त्यांच्या ‘जात कहाँ हो’ या भैरवीच्या रूपानं मिळाला होता.) याचा पंडितजींना खूप अभिमान वाटायचा.

त्यांच्या मैफिलींना प्रत्यक्ष जायला ज्यांना शक्य व्हायचं नाही, अशा आपल्या चाहत्यांकडे ते स्वत: गेल्याचं मी ऐकलं होतं. एक लहान मुलगा त्यांचा खूप मोठा चाहता होता. पण दुर्दैवानं तो मुका आणि अपंग होता. त्याला बसताही यायचं नाही. पण जसराजांचं गाणं तो मोठ्या भक्तीनं ऐकायचा. हे सांगणारं एक पत्र एकदा जसराजांकडे आलं. त्यानंतर काहीच दिवसांनी त्या मुलाच्या दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर साक्षात पंडित जसराज उभे! त्या मुलाची विचारपूस करून त्यांनी त्याला चक्क दोन राग आणि त्याच्या आवडीचं ‘माता कालिका’ हे भजन ऐकवलं! अर्थातच तो मुलगा प्रचंडच भारावून गेला होता. त्याला बोलता येत नव्हतं. त्यामुळे त्यानं काही बोलायचा प्रश्नच नव्हता; पण त्याच्या डोळ्यांतले आनंदाश्रू थांबत नव्हते. अशा सच्च्या श्रोत्यांना गाणं ऐकवण्यात गायकाला खूप समाधान मिळतं, असं जसराजांना कायम वाटायचं. हा प्रसंगही त्यांनी स्वत:च मला सांगितला होता. त्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आणि ते क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

आज मला अतिशय मोठी पोकळी जाणवतेय. खरोखरच एका युगाचा अंत झालाय, असं मला वाटतंय. भीमसेनजी, कुमारजी, किशोरीजी आणि जसराजजी यांनी माझ्या सोलापूरच्या दिवसांपासून ते अगदी काल-परवापर्यंत जी अनेक दशकं गाजवली, ती सगळी दशकं अक्षरशः एका क्षणार्धात माझ्या डोळ्यांसमोरून गेली. डोळे पाणावले. मला राहवलं नाही, म्हणून हे सगळं मी सांगतोय. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले
achyut.godbole@gmail.com

तंत्रज्ञ, मराठीतील लेखक आणि वक्ते 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात