डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात नुकताच पार पडला. एरवी दहा दिवस चालणारा महोत्सव आठ दिवसांवर आणला असला आणि त्यामागचं कारण कोणीच सांगत नसलं, तरी सिनेमाप्रेमींची हजेरी नेहमीसारखीच होती. महोत्सवाची सुरुवात झाली नुकतेच निधन पावलेले पोलिश दिग्दर्शक आन्द्रे वायदा यांच्या शेवटच्या सिनेमाने.

दि.9 ऑक्टोबर 2016 या दिवशी आन्द्रे वायदा यांचं निधन झालं. त्या वेळी ते 90 वर्षांचे होते आणि मृत्यूपूर्वी त्यांनी ‘आफ्टरइमेज’ हा सिनेमा पूर्ण केला होता. पोलंडने 2017 च्या ऑस्करसाठी परदेशी भाषेतल्या चित्रपटाच्या विभागाकरता वायदा यांचा हा सिनेमा निवडला आहे. दि. 20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यामध्ये पार पडलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात या सिनेमाने करून आणि त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह दाखवून आपणही जगातल्या सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या या महान कलावंताला आदरांजली वाहिली आहे. 

ही गोष्ट आहे व्लॅदिस्लाव स्ट्रेमिन्स्की या पोलिश चित्रकाराच्या आयुष्यातल्या शेवटच्या चार वर्षांची. सन 1952 मध्ये स्ट्रेमिन्स्कीचा मृत्यू झाला. स्ट्रेमिन्स्कीची ओळख एक बंडखोर चित्रकार म्हणून आहे. पोलंडमधल्या मॉडर्न आर्टचा प्रणेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. ‘द थिअरी ऑफ व्हिजन’ हे त्यांचं पुस्तक क्रांतिकारी मानलं जातं. 

सिनेमा सुरू होतो 1948 मध्ये, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर- पोलंडमध्ये सत्तांतर झाल्यानंतर. आणि सिनेमाच्या सुरुवातीलाच व्लॅदिस्लाव स्ट्रेमिन्स्की आपल्या विद्यार्थ्यांना आफ्टरइमेज म्हणजे काय, याचा धडा देताना आपल्याला दिसतो. 

आफ्टरइमेज... आपण एखाद्या वस्तूकडे पाहतो तेव्हा त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये पडते- त्या वस्तूची झलक. कारण माणूस खरं म्हणजे आपल्याला ज्याची जाणीव आहे तेवढंच पाहतो. प्रत्येकजण वेगळं पाहतो. प्रत्येक निवड चांगली असते. कारण ती आपली असते. ती वस्तू नजरेसमोरून गेल्यानंतरही तिची जी ठळक प्रतिमा आपल्या नजरेत राहते, त्याला आफ्टरइमेज म्हणतात... 

स्ट्रेमिन्स्की. डावा हात आणि उजवा पाय नसलेला, कुबड्या घेऊन चालणारा, अत्यंत प्रसन्न आणि चित्रकलेचा ध्यास घेतलेला. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय. पण काळ बदललाय. कम्युनिस्ट राजवटीला कलेसाठी कला मान्य नाही. किंबहुना, प्रचारासाठी कला हेच त्यांचं तत्त्व आहे आणि ते न मानणाऱ्यांचं जिणं मुश्कील करून टाकणं, हे धोरण. चारही बाजूने या कलावंताची मग कोंडी होते- नव्हे, जाणीवपूर्वक केली जाते. जे कॉलेज स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता, तिथूनच काढून टाकण्यात येतं. त्याची निओप्लॅस्टिक रूम उद्‌ध्वस्त केली जाते. आयुष्यभर ज्या दुकानातून रंग विकत घेतले, तिथून ओळखपत्र नाही म्हणून रिकाम्या हाताने परतावं लागतं. खाण्याची वानवा, काम नसल्यामुळे पैशांची तंगी... अशा वेळी स्ट्रेमिन्स्कीसार ख्या चित्रकाराची घुसमट होणं स्वाभाविकच म्हणायला हवं. 

वायदांना ही घुसमट दाखवायची आहे. त्याचा ऱ्हास दाखवायचाय. स्ट्रेमिन्स्कीची शोकांतिका समोर आणायची आहे. कम्युनिस्ट सत्ता आल्यानंतरचे बदलणारे संदर्भ दाखवायचे आहेत. कधी एखाद्या छोट्याशा प्रसंगामधून, तर कधी थेट संघर्षामधून. सिनेमाच्या सुरुवातीलाच एक प्रसंग आहे. स्ट्रेमिन्स्की आपल्या घरात चित्र रंगवत बसलाय आणि त्याच्या इमारतीच्या बाहेर स्टालिनचा फोटो असलेला कापडाचा एक भला मोठा लाल बावटा गच्चीवरून खाली सोडण्यात येतोय. स्ट्रेमिन्स्कीच्या खिडकीवरून हा लाल बावटा खाली जातो आणि संपूर्ण खोलीबरोबरच त्याच्या समोरचा पांढरा कॅनव्हास लाल होऊन जातो. अत्यंत परिणामकारतेने दिवस बदलल्याचं हे दृश्य आपल्याला सांगतं. 

आणखी एका प्रसंगात स्ट्रेमिन्स्कीला एक कम्युनिस्ट अधिकारी विचारतो, ‘‘तू कोणाच्या बाजूचा आहेस?’’ आणि स्ट्रेमिन्स्की उत्तरतो, ‘‘माझ्या.’’ 

मात्र, दिग्दर्शक म्हणून वायदांना आपल्या नायकाचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर आणण्यात रस नाही. हा सिनेमा म्हणजे बायोपिक असला तरी स्ट्रेमिन्स्कीच्या आयुष्यातल्या शेवटच्या चार-पाच वर्षांवरच त्याचा फोकस आहे. राजसत्ता जेव्हा कलेमध्ये नाक खुपसू लागते, कलेचा उपयोग आपल्या तत्त्वांच्या प्रसारासाठी व्हायला हवा असं म्हणू लागते आणि तसं न करणाऱ्यांना जिणं नकोसं करून टाकते; तेव्हा काय घडतं, याची ही गोष्ट आहे. त्यामुळे कित्येक गोष्टींचे संदर्भ दिलेले नाहीत. स्ट्रेमिन्स्कीच्या आयुष्यात त्या आधी घडलेल्या घटनांचा उल्लेख येत असला तरी त्यामागची कारणं सांगणं दिग्दर्शकाला आवश्यक वाटत नाही. म्हणजे, त्याचा एक हात आणि एक पाय कसा गेला, याची गोष्ट आपल्याला कळत नाही. पहिल्या महायुद्धात हा अपघात घडल्याचा एक ओझरता उल्लेख तेवढा आहे. 

स्ट्रेमिन्स्की आणि त्याची शिल्पकार बायको- कातरियाना कोब्रो एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्याचं कारण आपल्याला कधीच सांगितलं जात नाही. त्यांची मुलगी निका आई गेल्याचं वडिलांना सांगतही नाही. चार-पाच दिवसांनी वडिलांना भेटायला गेल्यावर ही बातमी त्यांना देते आणि आपल्याला का कळवलं नाही, असं त्यांनी विचारल्यावर, ‘तू तिच्या अंत्ययात्रेला येऊ नयेस, अशी आईची इच्छा होती,’ असं उत्तर निका देते. पण आईला असं का वाटत होतं, हे आपल्याला कळत नाही. 

अकाली प्रौढत्व आलेल्या आपल्या टिनएजर मुलीला हा बाप अनाथाश्रमात का ठेवतो, हेही स्पष्ट होत नाही. तिच्यासमोर खडतर आयुष्य आहे याची त्याला कल्पना असते, तसं तो आपल्या मित्राला बोलूनही दाखवतो. पण मग तरीही असा का वागतो? दिग्दर्शक स्पष्टीकरण देऊ मागत नाही. जाणीवपूर्वक घेतलेली ही भूमिका आहे, हे तर स्वाभाविकच आहे. पण... 

‘आफ्टरइमेज’ पाहत असताना आपण आन्द्रे वायदांचा शेवटचा सिनेमा पाहत आहोत, ही जाणीव सतत मनाशी होती. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी अगदी कोरडेपणाने किंवा वस्तुनिष्ठ राहून हा सिनेमा पाहणं शक्य नव्हतं. आपल्याला तो आवडणार आहे, हे मनाने जणू आधीच गृहीत धरलं होतं आणि तसा तो आवडलाही. पण या काही गोष्टी खटकल्याच. 

वायदांच्या या शेवटच्या सिनेमाच्या अधिकृत ट्रेलरची ही यु-ट्यूबवरची लिंक- https:// www.youtube.com/watch?v=6rfzPErD1C0 

मात्र, त्याही पलीकडे जाऊन एक विचार मनात आला. सन 1954 मध्ये वायदांनी आपला पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा बनवला, म्हणजे गेली 62 वर्षं ते सिनेमे करत होते. आणि दुसरं महायुद्ध, त्याचे पोलंडवर झालेले परिणाम, आधी हिटलरचे अत्याचार आणि नंतर कम्युनिस्टांची दमनशाही यात पोळून निघालेलं पोलंड याविषयी त्यांना जे सांगायचं होतं, ते शेवटपर्यंत संपलं नव्हतं. 

वायदांच्या सिनेमांची सुरुवातच मुळी दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जे अनुभवलं, ते सांगण्यापासून झाली. ‘जनरेशन’ (1954), ‘कनाल’ (1956) आणि ‘ॲशेस अँड डायमंड्‌स’ (1958) ही त्यांची त्रिसूत्री म्हणजे मास्टरपीस मानली जाते. पहिल्या सिनेमात नाझींच्या वर्चस्वाखाली असलेल्या वॉर्सामधल्या दोन तरुणांची कहाणी सांगितली आहे. दुसऱ्यामध्ये 1944 च्या वॉर्सातल्या बंडखोरीवर, नाझींच्या कत्तलीपासून गटारातून पळून जाऊन स्वत:चा शिताफीने बचाव करणाऱ्या सैनिकांची गोष्ट सांगितली होती. तर, तिसऱ्या सिनेमात जर्मनीने अधिकृत शरणागती पत्करली त्या दिवशीची पोलंडमधल्या कम्युनिस्टविरोधी होम आर्मीतल्या दोन सैनिकांची गोष्ट आहे. 

आधी नाझींचे अत्याचार आणि नंतर कम्युनिस्टांची दडपशाही यात पिचलेल्या पोलिश तरुणांचं जग त्यांनी आपल्या सिनेमांमधून मांडलं. ते स्वत: बंडखोर होते, त्यामुळे मनात खदखदणारा असंतोष त्यांच्या सिनेमांमधून बाहेर पडत होता. मुख्य म्हणजे, हा विषय आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांच्या मनातून संपला नाही. नव्वदाव्या वर्षीही त्यांना त्यावर सिनेमा करावासा वाटला, यातून हेच स्पष्ट होतं. 

वायदांनी सेक्स कॉमेडी केली, ‘यंग लेडीज ऑफ विल्को’सारख्या पिरिअड फिल्म्स केल्या. पण त्यांचे सिनेमे म्हटलं की आठवतात ते ‘लँडस्केप आफ्टर बॅटल’, ‘मॅन ऑफ मार्बल’, ‘मॅन ऑफ आयर्न’ यासारखे सिनेमेच आठवतात. वायदांनी आपल्या देशातल्या सिस्टीमचा सामना केला. सरकारी रोष पत्करून आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. सन 1977 ची ‘मॅन ऑफ मार्बल’ तब्बल चार वर्षं अडकून पडलेली होती. कम्युनिस्ट राजवट गेल्यानंतरही वायदांच्या सिनेमातलं दुसरं महायुद्ध संपलं नाही. 

सन 2007 मध्ये आलेला त्यांचा ‘कटीन’ हा सिनेमा 1940 मध्ये झालेल्या कटीन हत्याकांडावर होता. वायदांचे वडील या हत्याकांडात बळी पडले होते. रशियन अधिकाऱ्यांनी सुमारे बावीस हजार पोलिश नागरिकांची आणि अधिकाऱ्यांची कटीनच्या जंगलात व खारकीव्हच्या तुरुंगात हत्या केली होती. पोलंडवर आक्रमण केल्यानंतर जर्मनीने रशियाच्या विरोधात या हत्याकांडाचा उपयोग केला, तर रशियाने पोलंड जिंकून तिथे कम्युनिस्ट राजवट आणल्यानंतर ‘आपण हे केलंच नाही’ असं म्हणून हात झटकत जर्मन सैन्यावर त्याचं बालंट टाकलं. पोलंडमध्ये 1989 मध्ये लोकशाही आली, कम्युनिस्ट राजवट उलथून पडली आणि नव्या सरकारने ताबडतोब हे हत्याकांड सोव्हिएतने केल्याचं मान्य केलं. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा या हत्याकांडाची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली. कटीन चित्रपटामध्ये ही गोष्ट उलगडते ती बळी पडलेल्या पुरुषांच्या बायका, आया, मुली यांच्या नजरेतून. 

सन 2013 च्या इफ्फीमध्ये वायदांचा ‘वालेसा : अ मॅन ऑफ होप’ हा सिनेमा होता. वालेसा हे वायदांचे हीरो. 1990 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कम्युनिस्ट राजवट उलथून टाकत वालेसांच्या नेतृत्वाखाली पोलंडने लोकशाहीला आपलंसं केलं, तेव्हा वायदा म्हणाले होते, ‘‘स्वातंत्र्याचा हा दिवस बघायला मी जिवंत आहे याचं मलाच आश्चर्य वाटतंय. नाही तर ही समाजव्यवस्था मला गिळून टाकणार, असं मला वाटत होतं.’’ सुदैवाने तसं घडलं नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा दिग्दर्शक सिनेमे बनवत राहिला. नव्वद वर्षांचं समृद्ध आयुष्य जगला आणि आपल्याबरोबरच जगभरच्या सिनेमाप्रेमींना समृद्ध केलं. 

‘आफ्टरइमेज’ पाहताना आन्द्रे वायदा नावाच्या महान दिग्दर्शकाची महान कारकीर्द नजरेसमोर होती. पस्तीसहून जास्त सिनेमे, टीव्ही मालिका, डॉक्युमेंटरीज असा साठहून अधिक वर्षांचा त्यांचा प्रवास. त्या प्रवासाचा पूर्णविराम इफ्फीमध्ये अनुभवता आला, यापेक्षा या महोत्सवाचं दुसरं यश काय असू शकतं? 

Tags: international film festival man of iron man of marble landscape after battle afterimage meena karnik IFFI 2016 लँडस्केप आफ्टर बॅटल’ यंग लेडीज ऑफ विल्को weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके