डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

बऱ्याच स्त्रिया तोंड शिवल्यासारखे बंद करून, खाली नजर लावून गप्प बसतात. त्यांच्याशी बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मोकळेपणाने हसत नाहीत, बोलत नाहीत. मग मितानीच सर्व माहिती सांगते, त्यांना प्रश्न विचारून उत्तरे मला हिंदीमध्ये सांगते. त्यामुळे इथे ओपीडीमधे गर्भवती स्त्री आली की, तिला प्रश्न विचारणे हा मोठा कार्यक्रम होतो. प्रत्येक स्त्रीने एक झोळी लटकवलेली असते, त्यात तिचे एखादे मूल अडकवलेले असते, कधी कधी हाताला धरून अजून एखादे लोंबकळत असते. माझ्या समोर येऊन ती नुसती उभी राहते. तिला हिंदी येत नाही आणि मला गोंडी. मग हातवारे करून तसेच बोलत राहायचे. मग हिंदी येणाऱ्या तिच्या शेजारणीला, गाववालीला, नातेवाईक स्त्रीला ती बोलावून आणते. त्यामधील स्त्रीला प्रश्न विचारते, ती त्यातले अर्धे गाळून रुग्णाला विचारते. दोघी एकमेकींत पाच-दहा मिनिटे चर्चा करतात, मी शांतपणे त्यांची तोंडे पाहत राहते. मग ती मधली स्त्री त्यातील अर्धेच मला सांगते. मग पुन्हा मी उरलेली अर्धी माहिती विचारते. अशा प्रकारे आमचा सुसंवाद चालू राहतो.

बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड प्रभागातील कुटरू गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर आयोजित केले होते. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तामस्कर, सर्जन डॉ. नागुलन, चीफ मेडिकल ऑफिसर डॉ.पुजारी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मी, अशी आमची छोटीशी टीम निघाली. नागुलनला गाडी चालवायला आवडते, त्याने ड्रायव्हरला मागे बसवून स्टिअरिंगचा ताबा घेतला. मी स्वतःही फिल्डवर जाते, तेव्हा बऱ्याच वेळा स्वतःच स्कॉर्पिओ जीप चालवते. दुतर्फा जंगल, पहाडी असलेल्या या भागात मजा येते गाडी चालवायला. सध्या पानगळ चालू आहे, महुवाचा सीझन आहे. सर्वत्र मोहाची फुले गळून पडत आहेत आणि आदिवासी महिला ती गोळा करताना रस्त्याच्या कडेला दिसत आहेत, त्यांच्या मागे त्यांची पोरे-पोरीही शाळेत जाण्याऐवजी ती फुले गोळा करत हुंदडत आहेत. मोहाची दारू इथल्या प्रत्येक बाजाराचे मुख्य आकर्षण.

बिजापूरपासून दंतेवाडाला जाणाऱ्या रस्त्यावर 10 किमीवर नेमेड लागते. नेमेडचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे नेहमी 4 जी नेट असते. नेमेडच्या चौकातून डावीकडे आत वळले की, पुढे 25 किमीवर कुटरू येते. कुटरूला जायला नवा कोरा गुळगुळीत डांबरी रस्ता आहे. त्यामुळे आपण फार आतल्या भागात चाललोय, असे जाणवत नाही. कुटरू हे गाव सलमा जुडूमसाठी प्रसिद्ध. गावकऱ्यांनी नक्षल्यांविरुद्ध शस्त्रे उचलली ती सर्वप्रथम या गावात, मधुकर राव या आदिवासी नेत्याच्या नेतृत्वाखाली. त्यानंतरही नक्षल्यांच्या विविध हिंसाचाराच्या कथा इथे ऐकायला मिळतात. अजूनही रविवारी बाजाराच्या दिवशी कुटरूमध्ये जाते तेव्हा वातावरणात विचित्र तणाव, भीती जाणवत राहते. गावात मुख्य चौकातच CRPF चा तळ आहे. त्यांचा पहारा सतत चालू असतो. बाजारातही भाजीपाला, धान्य, किराणा घ्यायला आलेले बंदूकधारी जवान दिसतात.

अशा बाजारातही आमचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसर एकदा आम्हा डॉक्टरांसोबत फिरायला आलेले. सोबत अंगरक्षक असल्याने लोकांना साहजिकच लक्षात येते की, कोणी महत्त्वाची व्यक्ती आहे. अय्याजसरांपेक्षा आम्हालाच त्यांच्या सुरक्षेची जास्त काळजी लागून राहिलेली. या कुटरूमधेच शिकलेला, एका शिक्षकाचा मुलगा, डॉ.देवेंद्र मोरला आज रायपूरच्या मेडिकल कॉलेजमधून MBBS होऊन डॉक्टर म्हणून येथे रुजू झाला आहे. स्वतःचेच गाव असल्याने प्रामाणिकपणे झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि त्यात अय्याजसरांचा पाठिंबा, याचे चीज होऊन आज इथे सर्व सुविधापूर्ण आणि प्रशस्त प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. आजूबाजूच्या अतिदुर्गम गावातील गर्भवती रुग्ण इथे उपचारासाठी येत असल्याने, घरीच होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. इथे महिन्यातून वीस ते तीस प्रसूती होतात. गुंतागुंतीच्या रुग्णांना इथून रुग्णवाहिकेतून तातडीने बिजापूरला पाठवले जाते.

आज इथे विविध प्रकारच्या शारीरिक विकलांगत्वाचे रुग्ण शस्त्रक्रिया शिबिरात इलाज करून घेण्यासाठी आले होते. जन्मतः असणाऱ्या शारीरिक व्यंगाचे बरेच रुग्ण होते, ज्यासाठी वयाच्या पहिल्या दोन-तीन वर्षांतच शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, अशा व्याधींसोबत मोठे झालेली मुले-मुली, भाजल्याच्या जखमांमुळे निर्माण झालेले दोष- अशा रुग्णांना आम्ही पुढील तपासणीसाठी बिजापूरला बोलावत होतो. त्यांच्या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये होऊ शकणार होत्या. अनेक प्रकारचे अशीही मुले-मुली होते की, ज्यांच्यावर काहीच इलाज होऊ शकणार नव्हता, त्यांना समजावून माघारी पाठवत होतो.

नुकतीच एक प्रसूती झाली. जास्त रक्तस्राव होऊ लागल्याने नर्सने मला बोलावले. मी त्या स्त्रीला तपासले. योनीमध्ये थोडे फाटले होते, तिथे टाके घातले. काही इंजेक्शन दिले. रक्तस्राव थांबला. टाक्यांना औषध लावून मी स्टूलवरून उठताच, ती स्त्रीही लगोलग उठली. तिचे सांडलेले रक्त ती स्वतःच तिच्या कपड्याने पुसू लागली. ‘‘रुको. इधर अस्पताल की सफाईवाली मौसी आयेगी, वो साफ कर देगी.’’ माझे बोलणे होईपर्यंत तिचे पुसूनही झाले. तिची साडी रक्ताने भरलेली. ‘‘तुम्हारे साथ वालेको बुलाते है, तुम अच्छे से हात पैर धोके, कपडे बदल लो.’’ ती म्हणाली, ‘‘मेरे साथ कोई नही है. सब चले गये.’’ मी आश्चर्याने सर्द. बाळंतीण बाईला एकटे सोडून कसे काय सारे कुटुंबीय निघून जाऊ शकतात? तेथील नर्सने माहिती पुरवली, ‘मॅडम, यहाँ ऐसेही करते है बहोत बार.’ मला मात्र प्रसूतीनंतर तत्काळ उभी राहणारी, स्वतःच सफाई करणारी, एकटीने बाळासोबत राहणारी ती स्त्री कोड्यात टाकत होती. मग ती हॉस्पिटलच्या मागे असलेल्या शेडखाली कपडे धुण्यासाठी गेली. तिथे नळाजवळ आणखी काही महिला कपडे धूत होत्या, एखादी अंघोळ करत होती. ‘‘अपने अस्पताल का बाथरूम है ना?’’ ‘‘मॅडम, इनको खुले मे नहाने कि आदत है. इसलिये ये यहाँ ही कपडे धोते है, नहाते है.’’ मीही मग विचारात पडले. त्यांच्या सवयी मोडून त्यांच्यावर आपल्या सोईनुसार जबरदस्ती करणे किती योग्य आहे? म्हटले, ‘‘शेड को परदा लगा लो.’’

दुपारी उशीर झाला, तेव्हा तिथेच जेवण बनवायचे ठरवले. भात, वरण, गावठी कोंबडी. कुठल्याही गावात गेले की, जेवणाचा हा ठरलेला मेनू असतो. बिजापूरमध्ये येण्यापूर्वी मी स्वतः शुद्ध शाकाहारी होते. पण इथे भाज्या इतक्या कमी आणि वेगळ्या प्रकारच्या मिळतात की, त्यांना कंटाळून मी मांसाहार करायला सुरुवात केली. डॉ.मोरला सांगत होता, ‘‘माझ्या लहानपणी रोजच्या रोजच मांसाहार असायचा. कोंबडी, बकरी, मासे, काही ना काही रोज असायचेच. आता शहरीकरण होऊ लागलेय, तसे प्रमाण खूप कमी झालेय. पूर्वीसारखे राहिले नाही.’’ तांदूळ मोरलाच्या घरच्या शेतातला आणि त्यात तो मातीच्या मडक्यात शिजवलेला, त्यामुळे चविष्ट लागायचा.

कुटरूपासून पुढे सरळ फरसेगड लागते. तिथपर्यंत बस जाते आणि रस्ता आहे. त्याच्यापुढे मात्र कच्चा रस्ता आणि पुढे सर्व गावांवर व जंगलावर नक्षली लोकांची सत्ता चालते. त्यांच्या परवानगीशिवाय कोणी तिथे प्रवेश करू शकत नाही. चौकातून उजवीकडे पुढे गेले की 15-20 किमीवर बेदरे लागते. तिथे इंद्रावती आहे. इंद्रावती डोंग्यातून पार करता येते आणि पलीकडे महाराष्ट्रातील भामरागड लागते. येथील बरेच रुग्ण इंद्रावती पार करून हेमलकसाला डॉ.आमटेंकडे उपचारासाठी जातात. इथे बरेच मराठी भाषक लोकही आहेत. रविवारी मी कुटरूला गर्भवती रुग्ण तपासायला येते. तेव्हा इथे मितानी अतिदुर्गम अशा गावातील आदिवासी स्त्रिया तपासणीसाठी येतात. रविवारी येथे बाजारही असतो. त्यामुळे बाजाराला आलेले पुरुष-बायाही येतात. त्यांचा पेहराव, दागिने, चेहऱ्यावरचे गोंदण- सारे मी पाहत राहते. बाई असो वा पुरुष, अंगावर फक्त दोन कपडे गुंडाळलेले- छातीला एक आणि कमरेला एक. गोंडी किंवा हलबी भाषा बोलणारे.

बऱ्याच स्त्रिया तोंड शिवल्यासारखे बंद करून, खाली नजर लावून गप्प बसतात. त्यांच्याशी बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मोकळेपणाने हसत नाहीत, बोलत नाहीत. मग मितानीच सर्व माहिती सांगते, त्यांना प्रश्न विचारून उत्तरे मला हिंदीमध्ये सांगते. त्यामुळे इथे ओपीडीमधे गर्भवती स्त्री  आली की, तिला प्रश्न विचारणे हा मोठा कार्यक्रम होतो. प्रत्येक स्त्रीने एक झोळी लटकवलेली असते, त्यात तिचे एखादे मूल अडकवलेले असते, कधी कधी हाताला धरून अजून एखादे लोंबकळत असते. माझ्या समोर येऊन ती नुसती उभी राहते. तिला हिंदी येत नाही आणि मला गोंडी. मग हातवारे करून तसेच बोलत राहायचे. मग हिंदी येणाऱ्या तिच्या शेजारणीला, गाववालीला, नातेवाईक स्त्रीला ती बोलावून आणते. त्यामधील स्त्रीला प्रश्न विचारते, ती त्यातले अर्धे गाळून रुग्णाला विचारते. दोघी एकमेकींत पाच-दहा मिनिटे चर्चा करतात, मी शांतपणे त्यांची तोंडे पाहत राहते. मग ती मधली स्त्री त्यातील अर्धेच मला सांगते. मग पुन्हा मी उरलेली अर्धी माहिती विचारते. अशा प्रकारे आमचा सुसंवाद चालू राहतो.

आज कुटरूहून आम्ही दुपारी चारला परत नेमेडला आलो आणि तिथून ‘जांगला’ या नेमेडपासून पुढे दंतेवाड्याच्या दिशेने 15 किमी अंतरावर रोडलगत असलेल्या गावी गेलो. जांगलामधे युद्धपातळीवर तयारी चाललेली. पंतप्रधान मोदी नवी योजना सुरू करत आहेत, ‘आयुष्यमान भारत’. या योजनेचे टेलिमेडिसिन अशा आणखी काही योजनांचे उद्‌घाटन मोदींच्या हस्ते 14-15 एप्रिलला ‘जांगला’ येथील उपस्वास्थ्य केंद्रात होणार, अशी चर्चा चालू आहे. स्वतः पंतप्रधान इथे येण्याची शक्यता असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलीस ऑफिसर, फिल्ड ऑफिसर्स, सर्व स्टाफ अविश्रांतपणे राबत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, मितानी स्त्रिया, फिल्ड नर्सेस (ANM) यांना दिल्लीहून आलेल्या आरोग्य विभागाच्या लोकांकडून विशेष प्रशिक्षण देणे चालू आहे. 

भैरमगड प्रभागाचे प्रमुख डॉ.अभयही तिथे भेटले. डॉ.अभय स्वभावाने दिलदार. कधीही भैरमगडला गेले की, त्यांच्या घरी चांगले चविष्ट पोहे, जेवण हमखास मिळते. माती टाकून खड्डे बुजवणे, जमिनीची आखणी करणे चालू होते. इथे गावकऱ्यांसाठी 300 पक्की घरे बांधायचे नियोजन चालू आहे. हेलिपॅड तयार होत होते. मेन रोडपासून आतमध्ये येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण होत आली होती. उच्च माध्यमिक शाळेच्या भिंतीवर चित्रे काढणे, सुविचार रंगवणे चालू होते. आम्ही गागडाजींच्या बुलेटप्रूफ गाडीजवळ जाऊन काचांना हात लावून पाहिले. दगडासारख्या मजबूत काचा. मग तेथील क्लार्कने आले घातलेला, मिच्च गोड काळा चहा प्यायला दिला. हवेत मोहाचा गोडसर सुगंध भरून राहिलेला. ‘‘मुझे तो ये महुवा इसके महकसेही चढ जायेगा!’’ इति नागुलन. त्यात पावसाची चिन्हे. आम्हाला राहून-राहून आश्चर्य वाटत होते की, पंतपप्रधानांच्या योजना राबवायला देशभरातून बिजापूर जिल्ह्यातील ‘जांगला’ची निवड व्हावी! आम्हाला आमचेही नशीब वाटले की, या वेळी आपण इथे आहोत.

तेथील उपस्वास्थ्य केंद्राची नर्स भेटली- जिच्या हस्ते या योजना सुरू होणार होत्या- तिचे अभिनंदन केले. तिथून परतताना आम्ही संभावित संकटांची चर्चा करत होतो. गेल्या दोन महिन्यांत हिंसाचार वाढला होता. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या जखमी CRPF च्या जवानांमुळे, जखमी आदिवासींमुळे किंवा मेलेल्या, मारल्या गेलेल्या लोकांना शवविच्छेदनाला आणल्यामुळे आम्हाला अशा घटना लगेच समजतात. डॉ.नागुलन सांगत होता की, कालच्याच दिवशी बिजापूरपासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या CRPF च्या कॅम्पलगत झालेल्या बॉम्बस्फोटामधील जवानाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून त्याला कापावे लागले. वेळेत पाय कापले नाहीत, तर जंतुसंसर्ग शरीरभर पसरून जवानाचा जीव जाऊ शकतो.

मागच्या आठवड्यात बिजापूर-दंतेवाडा मुख्य रोडवर कंत्राटदाराचे अपहरण करून गोळी घालून खून झाला. गंगालूर रस्त्यावर रस्ता बनवण्याची चार मोठी मशिन, वाहने जाळली. अशा सर्व कानांवर येणाऱ्या घटना. त्यात या अशा भागात पंतप्रधान येणार. कामाचे डोंगर उपसण्याची सर्वांची घाई. जिल्हाधिकाऱ्यांचे ऑफिस सुट्टीच्या दिवशीही चालू. रात्रीपर्यंत चालणाऱ्या मीटिंग्ज. मी काही कामानिमित्त संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले, तर अय्याजसर प्रचंड थकलेले. जिल्हा रुग्णालयातही कामांची एकच लगबग उडाली आहे. आम्ही सारे डॉक्टर्स, नर्सेस हिंसाचारापासून तटस्थ असतो. ना कशाच्या अध्यात, वा मध्यात. समोर येणारा रुग्ण आमच्यासाठी फक्त रुग्णच असतो. तो आदिवासी आहे की नक्षली आहे, हा विचार करण्याच्या फंदातही आम्ही कोणी पडत नाही. प्रत्येकाच्या कारमध्ये पुढे स्टेथोस्कोप लावलेला. गाडी चुकून अडवली तर कळावे की, डॉक्टर आहे म्हणून- एवढीच काय ती काळजी.

Tags: आरोग्य सेवा छत्तीसगढ बिजापूर health chhattisgadh bijapur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात