इथे कमी वजनाची, कमी दिवसांची बाळे खूप जास्त प्रमाणात दगावतात. मग प्रत्येक महिलेला, तिच्या नवऱ्याला बाळाला कसे गुंडाळायचे ते शिकवावे लागते. त्याच्यासाठी कपडे आणा, टोपी-मोजे घाला, हे सारे सांगावे लागते. अशीच एके दिवशी सकाळी कमी वजनाच्या, उघड्या ठेवलेल्या तीन-चार बाळांना कापडात गुंडाळून दिले, कपडे आणायला सांगितले. स्त्रिया व नवरे घरी जायच्या तयारीत. दुपारी नर्सने पळत येऊन सांगितले की, दोन किलो वजनाचे एक बाळ दगावले. मी सुन्न, शांत. आज दुकानातून बाळाच्या कपड्यांची खरेदी करतेय. मधे सरकारी निधीतून अनेक कपडे यायचे, आम्ही ते बाळांना द्यायचो. काही दिवसांपूर्वी आलेले सर्व कपडे कामगार लोकांनी पळवले, आपापल्या पोरांसाठी. नर्सेस वयाने लहान, नेणाऱ्या लोकांना त्या अडवू शकल्या नाहीत. इथे सगळ्यांचीच झोळी फाटकी, कोण कोणाला रागावणार?
गेल्या दोन आठवड्यांपासून इथे चांगलाच पाऊस कोसळतोय. नदी-नाले भरभरून वाहत आहेत आणि त्यामुळे आमचे रुग्ण गावात अडकून पडत आहेत. सर्वच स्पेशालिटीचे डॉक्टर्स कामात मग्न झाले आहेत. मागील वर्षीचा जुलै महिना मला आठवला. त्या वेळीचा माझा सहकारी डॉ.कुशल आणि मी, दोघांनीही गुंतागुंतीच्या अनेक प्रसूतींना तोंड दिले होते. कारण येथील आतील खेड्यांमध्ये अजूनही घरीच प्रसूती केल्या जातात. त्यामुळे गर्भवतीला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या तरी तत्परतेने दवाखान्यात आणले जात नाही. आधी एक ते दोन दिवस घरीच दाईच्या मदतीने प्रयत्न केले जातात. दोन दिवसांत प्रसूती झाली नाही, तर मग दवाखान्यात आणले जाते. त्यात धोका, गुंतागुंत वाढलेली असते. त्यात पावसामुळे अनेक रस्ते बंद होऊन जातात. पाणी ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते आणि मग दवाखान्यात पोहोचेपर्यंत खूपच जास्त उशीर होतो.
अशाच एका रात्री 12 वाजता उमंगच्या नर्सने फोन केला, नवी रुग्ण आली आहे ते कळवायला. भैरमगड ब्लॉकमधील एका खेड्यातील गर्भवतीला दोन दिवसांपासून प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. आज दुपारी नातेवाईक तिला भैरमगडच्या रुग्णालयात घेऊन आले. तिची स्थिती गंभीर झाल्याने तेथील डॉक्टरांनी तिला बिजापूरला पाठवले. नर्स चिंतेने फोनवर सांगत होती, ‘‘मॅडम, बाळाचे ठोके मिळत नाहीयेत, बहुतेक बाळ पोटातच गेले आहे.’’ उमंगमधे पोहोचून, प्रसूती कक्षाच्या दरवाज्यातून मी आत डोकावताच ती वेदनांनी किंचाळणारी राणी नावाची गर्भवती, पल्स ओक्सिमीटरवर दिसणारे वाढलेले नाडीचे ठोके आणि पोटातील मृत बाळ- या सर्वांवरून माझ्या लक्षात आले की, तिचे गर्भाशय पोटातच फुटले आहे. Rapture uterus ही धोकादायक परिस्थिती वेळेत हाताळली गेली नाही, तर गर्भवतीसाठी जीवघेणी ठरते. भारतात होणाऱ्या मातामृत्यूंच्या अनेक कारणांपैकी ही एक गंभीर स्थिती आहे.
राणी गोंडी भाषेमध्ये वेदनांनी काही तरी बोलत होती. मी गोंडी येणाऱ्या वॉर्ड आयाला विचारले की, ही काय म्हणते आहे? तिने हसत सांगितले की, मै मर जाऊँगी, असे म्हणते आहे. वॉर्ड आयाला त्या परिस्थितीचे गांभीर्य समजत नव्हते, त्यामुळे तिला हसू आले. परंतु आम्हा डॉक्टरलोकांना मात्र अशा वेळेस घाम फुटतो, कारण जीव वाचवण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आमच्या खांद्यावर असते. आम्ही तत्काळ तिला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले. दोन बाटल्या रक्त मागवले आणि तिची गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली गेली. तिची गर्भपिशवी इतक्या वाईटरीत्या फाटली होती की, ते पाहून आम्हाला ती वाचेल की नाही, याची खात्री नव्हती. पण ती वाचली. तिचे मृत बाळ मी हातात घेतले, पावणेचार किलो वजन असलेले ते बाळ इतके गुटगुटीत दिसत होते- वाटावे की, ते आत्ता डोळे उघडेल. तिची माहिती घेताना कळले की, बाळाचे डोके खाली येऊन अडकले. ते बाहेर पडावे, म्हणून घरामध्ये नातेवाईक स्त्रियांनी मिळून वरून पोट दाबले. पण वजनाने जास्त असलेले ते बाळ खालून न येता, गर्भपिशवी फुटून पोटात आले.
अनेक वेळा पोट दाबून प्रसूती करणे, हा प्रकार अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ व कुशल नर्सेसही करतात आणि तो यशस्वीही होतो. परंतु ते नक्की केव्हा करावे, कोणामध्ये करावे आणि करू नये, या माहितीच्या अभावी असे प्रकार रुग्णांचे जीव घेऊ शकतात. राणीच्या या आधीच्या तीनही प्रसूती घरीच झाल्या असल्याने तिच्या कुटुंबीयांना वाटले असावे, हेही बाळंतपण होईल घरीच सुखरूप. पण दुर्दैवाने या वेळी तिच्या बाळाचे डोके तिरके असल्याने व वजन जास्त असल्याने ते योनिमार्गातून येऊ शकले नाही. मग त्या आठवड्यात बाळ प्रसूतिमार्गात अडकून मृत झालेल्या आणखीही रुग्ण येत राहिल्या. अशांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया करताना वाईट वाटायचे की, ही स्त्री दवाखान्यात थोडी लवकर पोहोचू शकली असती, तर जिवंत बाळ हाती लागले असते.
त्यानंतर काही दिवसांनी आणखीही वाईट अवस्थेतील रुग्ण आली. घरीच प्रसूती झालेली आणि मृत बाळ जन्माला आलेले. तिला आमच्या प्रसूती कक्षात तपासणीसाठी आणले, पाहिले तर तिच्या जननांगाचा पूर्ण चेंदामेंदा झालेला. पू भरून वाहतोय, नासलेली चमडी लोंबतेय, लघवी तशीच होतेय... त्या स्त्रीला लघवी व संडासचे काहीच जाणवत नव्हते. आम्ही आमचे सर्जन डॉ.नागुलनला बोलावणे पाठवले. अशी स्थिती भयंकर वेदनादायी असते. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये तपासणीसाठी तिला भूल देण्यात आली. पूर्ण पू साफ करण्यात आला. तेव्हा कळले की, तिची योनी पूर्ण फाटली आहे. योनीच्या पुढे लागून असलेली लघवीची पिशवी फाटली आहे. मागे असलेली संडासची जागा अगदी पातळ पडदा राहून वाचली आहे, परंतु काही काळाने तीही फाटायची शक्यता आहे. चेंदामेंदा झालेला सर्व भाग डॉ.नागुलनने कापून काढला. ते सर्व पाहून मला मळमळ होत होती, चक्कर येत होती. ही बाई जिवंतच कशी राहिली, याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते.
ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडून मी खाली ग्राउंड फ्लोअरला आले. रुग्णांची तुफान गर्दी उडाली होती. मेडिसिन ओपीडीमध्ये तर तुंबळ युद्धपरिस्थिती माजली होती. मी डॉ.ब्रिजलाल व डॉ.ज्योतींना भेटायला गेले, तर तिथे रुग्णांची प्रचंड गर्दी- दीड-दोनशे रुग्णांची फक्त यांच्याच ओपीडीमध्ये. पावसाळ्यात येथे मलेरिया, जुलाब, हगवण, न्यूमोनिया याचे रुग्ण खूप वाढतात आणि केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू पावतात. सध्या रुग्णालयात व्हेंटिलेटरही आहे, त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी प्रयत्न करता येतात. डॉ.ज्योती एका शिक्षित पण उपचार न घेणाऱ्या रुग्णामुळे हताश झाली होती. चार महिन्यांपूर्वी एका शिक्षित रुग्णाला किडनीच्या आजाराचे निदान झाले होते. हैदराबादला त्याला डॉक्टरांनी डायलिसिसचा सल्ला दिला. बिजापूरमध्ये तोच सल्ला दिला, पण त्याने ऐकले नाही. आज तो बेशुद्धावस्थेत रुग्णालयात पोहोचला. डॉ.ज्योतीच्या अथक प्रयत्नांनंतरही त्याचा जीव गेला. हा माणूस वेळेत आला असता तर? प्रत्येक डॉक्टरला सतावणारा हा प्रश्न!
कुटरूला तपासलेली, पण बेदरेची असलेली मंजू सोनोग्राफीसाठी आली. आधी मला ती ओळखूच आली नाही. मग तिने कुटरूचा पेपर दाखवताच मला ओळख पटली. आठव्या महिन्याची तिची सोनोग्राफी करत असताना, ती मग बेदरेच्या बाकीच्या गर्भवतींची माहिती पुरवते. ‘‘मासे को फिरसे लडकी हुई.’’ मग मला मासे आठवते, आधीच्या सहा मुलीच असलेली आणि आता मुलासाठी सातव्यांदा गरोदर राहिलेली मासे. ‘‘इसके बाद कुछ भी हो जाये, नसबंदी करवाऊँगी’’, असे म्हणणारी मासे. अजून कुणाची कुणाची प्रसूती झाली, हे मंजू सांगत राहते. ‘‘तुम कहा कराओगी डिलिव्हरी?’’ ‘‘बेदरेमे सरकारी स्वास्थ केंद्र है, उधर सिस्टर रहती है. वो करती है डिलिव्हरी. अब कुछ दिनोंमें नदी भर जायेगी, फिर बेदरेसे कुटरू नहीं आ पायेंगे.’’ मी मनोमन तिचे चांगले व्हावे, असे चिंतले. बेदरेकडे जाणारा रस्ता, मधले नाले, त्यावरचे छोटेसे पूल आठवले. पावसात अडकून पडणाऱ्या माझ्या गर्भवती स्त्रिया...
इथे बाळाला कापडात कसे गुंडाळावे याची लोकांना बिलकुल माहिती नाही. राउंडच्या वेळी मी पाहते, तेव्हा बाळ अगदीच उघडे ठेवलेले असते. कमी वजनाच्या बाळाला तर असे उघडे ठेवण्यात खूप धोका असतो, बाळाच्या डोक्यातून, तळपायातून उष्णतेचा ऱ्हास होऊन, तापमान कमी होऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. इथे कमी वजनाची, कमी दिवसांची बाळे खूप जास्त प्रमाणात दगावतात. मग प्रत्येक महिलेला, तिच्या नवऱ्याला बाळाला कसे गुंडाळायचे ते शिकवावे लागते. त्याच्यासाठी कपडे आणा, टोपी-मोजे घाला, हे सारे सांगावे लागते. अशीच एके दिवशी सकाळी कमी वजनाच्या, उघड्या ठेवलेल्या तीन-चार बाळांना कापडात गुंडाळून दिले, कपडे आणायला सांगितले. स्त्रिया व नवरे घरी जायच्या तयारीत. दुपारी नर्सने पळत येऊन सांगितले की, दोन किलो वजनाचे एक बाळ दगावले. मी सुन्न, शांत. आज दुकानातून बाळाच्या कपड्यांची खरेदी करतेय. मधे सरकारी निधीतून अनेक कपडे यायचे, आम्ही ते बाळांना द्यायचो. काही दिवसांपूर्वी आलेले सर्व कपडे कामगार लोकांनी पळवले, आपापल्या पोरांसाठी. नर्सेस वयाने लहान, नेणाऱ्या लोकांना त्या अडवू शकल्या नाहीत. इथे सगळ्यांचीच झोळी फाटकी, कोण कोणाला रागावणार?
‘कांगारू मदर केअर’ नावाचा एक सुरेख प्रकार आहे. कमी वजनाच्या बाळांना उबेसाठी आईच्या किंवा कुणा नातेवाइकाच्या छातीला गुंडाळायचे. आमच्या नर्सेस ते रुग्णांना शिकवतात. या भागात मुलगाच पाहिजे, असा हट्ट नसतो. फक्त दोन्ही लिंगी बालके घरात असावीत, असा हेतू असतो. त्यामुळे तीन-चार मुलेच असलेली महिलाही मुलगी व्हावी म्हणून पुन्हा गर्भारपण सोसते.
पावसात गरम-गरम चिकन खायचा मोह होतो, तेव्हा आम्ही काही जण मिळून CRPF च्या कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये जातो. तेथील ओळखीच्या व्यक्तीला आधी सांगून ठेवावे लागते. डॉ.गुप्ता हे भूलतज्ज्ञ CRPF चे असून, जिल्हा रुग्णालयात काम करतात. त्यांची आम्हाला इथे प्रवेशासाठी मदत होते. जरुरीच्या वस्तू खरेदी करून, कॅन्टीनमध्ये मस्त गरम-गरम चिकन, गुलाबजाम, चहा, कॉफी घेण्यात मजा येते. एका बेकरीमध्ये गरम मूगभजी मिळतात. पावसात भिजताना मला मागच्या वर्षीचा माझा प्रवास आठवतो. गेल्या वर्षी मी जुलैमध्ये पहिल्यांदाच घरी निघाले होते. हैदराबादवरून रात्री साडेदहाच्या ट्रेनचे बुकिंग केले. तेव्हा मला पावसाचा, रस्त्याचा काहीसुद्धा अंदाज नव्हता. सकाळी नऊला सिव्हिल सर्जनकडे मला भोपालपट्टणम या गावापर्यंत सोडायची व्यवस्था करायला सांगायला गेले तर कळले की, पावसामुळे गाडी जाऊ शकणार नाही. रस्ता चालू आहे की नाही, तेही माहीत नाही. मी रडकुंडीला आलेली पाहून, डॉ.नागुलन मला जिल्हाधिकारी अय्याजसरांकडे घेऊन गेले. मग अय्याजसरांनी फोन लावून रस्त्यांची चौकशी केली. सरांच्या ड्रायव्हरने- संदीपभैय्याने स्कार्पिओतून बिजापूर ते भोपालपट्टणम सोडले.
रस्त्यावर जागोजाग मोठे नाले भरभरून वाहत होते, लोक त्यातून सफाईने वाहने काढत होते. काही ठिकाणी जाळे लावून मासेमारी चालू होती. या रस्त्यावर दोन ठिकाणी पुलाचे काम अजून बाकी आहे. तिथून गाडी काढणे खूप अवघड होते, पण जमले. पावसामुळे निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. भोपालपट्टणमपासून पुढे पाच किलोमीटरवर तिमेड आहे. तिमेडला इंद्रावती नदी ओलांडावी लागते. पलीकडे महाराष्ट्र. या नदीचे पात्र अतिशय मोठे आहे. इथे पूल बनवण्याचे काम अजूनही चालू आहे. पाऊस सुरू झाल्यापासून डिसेंबरपर्यंत डोंग्याने (म्हणजेच बोटीने) नदी ओलांडावी लागते. डिसेंबरमध्ये पाणी ओसरले की वाळू भरून, बांधलेला रस्ता सुरू होतो. मग चारचाकी वाहने यावरून ये-जा करू शकतात. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा भोपालपट्टणमची दोन माणसे, दोन मोटारसायकली बोटीत चढवून, माझ्यासोबत पलीकडे आली.
संदीपभैय्या तिमेडाहून मला निरोप देऊन बिजापूरला परतले. बोटीने नदी ओलांडायला आम्हाला चांगलेच दोन तास लागले होते. कारण आधी गुडघाभर पाण्यातून चालत डोंग्यापर्यंत जाणे, मोटारसायकली चढवणे, बांधणे, मग सर्व माणसे बसणे, उरलेल्या माणसांना थांबायला सांगणे, मग बोटीचे मशीन चालू होणे, नदी ओलांडणे, पुन्हा पलीकडे पोहोचल्यावर आपण उतरणे, गुडघाभर पाण्यातून काठाकडे जाणे, मोटारसायकली काढणे. त्यात माझ्या सोबतीचा माणूस आणि त्याची मोटारसायकल मागे राहिली होती. तो डोंग्याच्या पुढच्या फेरीतून आला. या सर्व प्रकारात मला समजत होते की, खूप उशीर होतो आहे आणि कदाचित माझी ट्रेन चुकेल. पण निसर्गापुढे माझे काही चालणेही शक्य नव्हते, किंवा मी त्या संथ चालणाऱ्या बोटीला पळवू शकणार नव्हते. तशीही डोंग्यातून इंद्रावती ओलांडण्याची माझी पहिली वेळ मी इतकी आनंदाने अनुभवत होते की, मला उशीर होण्याचेही वाईट वाटणे बंद झाले.
पलीकडे पाथागुडम हे महाराष्ट्राच्या सीमेवरचे शेवटचे गाव लागते. तिथून 60 किलोमीटरवर सिरोंचा व 70 किलोमीटरवर कालेश्वरम ही गावे लागतात. हा मोठमोठे खड्डे असणारा रस्ता जंगलातून जाणारा असून, अजून काम चालू असल्याने पावसात आणखी खराब होऊन जातो. मग मी एका मोटारसायकलवर बसले आणि दुसऱ्यावर माझी बॅग दिली. पुढे जंगलातील दोन तासांचा अविस्मरणीय प्रवास पार पडला. प्रत्येक खड्ड्यासरशी मला वाटायचे, आता पडणार आपण चिखलात... गाडी रुतून बसणार गाळात. पण गाडी चालवणारे कुशल असल्याने तसे काही घडले नाही. या पूर्ण रस्त्यात फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसत होते. विविध रंगांची, आकारांची सुंदर सुंदर फुलपाखरे. मधेच एका ठिकाणी तीन-चार मुले मिळून एका सापाला मारायच्या प्रयत्नात होती.
कालेश्वरमला पोहोचायला मला साडेपाच वाजले. तिथून पुढे चार-पाच तास वारंगळ आणि पुढे तीन तास हैदराबाद. म्हणजे माझी ट्रेन चुकल्यातच जमा होती. त्या रात्री मग वारंगळमध्येच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या ट्रेनने सोलापूरला आले. त्या प्रवासाने मला खूप काही दिले- अविस्मरणीय अनुभव, मनमुराद निखळ आनंद आणि शिस्त. त्यानंतर कधीही ट्रेनने जायचे असले की, बिजापूरहून मी सकाळी लवकर निघते. सिरोंचाला बसस्थानकासमोर एक घरगुती खानावळ आहे. तिथे चविष्ट, ताजे मासे मिळतात. एके दिवशी मासे खाण्यात गुंग असताना बस चुकायची वेळ आली होती. सोबत असणाऱ्या डॉ.मित्तलने बस थांबवली आणि माझी त्या दिवशी ट्रेन चुकताना वाचली.
हैदराबादहून बिजापूरला तारलागोडा या मार्गेही येता येते. सिरोंचापेक्षा हा जवळचा आहे, पण येथून बससेवा अजून सुरू झाली नाही. तारलागोडा हा मार्ग नक्षल प्रभावासाठी, हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध होता. येथून जाताना काही वर्षांपूर्वी नक्षली लोकांनी इथे लोकांना खाली उतरवून 26-27 वाहने जाळली, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. तेव्हापासून हा मार्ग बंद होता. अडीच वर्षांपूर्वी डॉ.अय्याजसर जिल्हाधिकारी म्हणून बिजापूरला आले, तेव्हा येथे पोलीस चौक्या उभारून त्यांनी या रस्त्याचे काम सुरू केले आणि त्यासोबतच या भागातील नक्षलप्रभाव खूप कमी झाला. एक वर्षापूर्वी मी या रस्त्याने आले, तेव्हा खूप सुंदर दृश्ये पाहायला मिळाली. डोंगरावर, जंगलाच्या आत राहणारे अनेक आदिवासी बाहेर पडून, रस्त्याच्या बाजूला नवनवीन गावे वसवत होते. लाकडाची पाले ठोकून नव्या गावाची वेस निश्चित करणे, घरांचे लाकडाचे सांगाडे, झऱ्यावर अंघोळी करणारी माणसे, मातीच्या घड्यात पाणी वाहून आणणाऱ्या बाया... ते सारे दृश्य पाहून मी हरवून गेले. हे कुठले शतक चालू आहे, हे कोणते जग आहे, असा प्रश्न पडावा.
नव्याने बनणारा तो रस्ता, नव्या वस्त्या, माणसाचे डोंगरावरून खाली येऊन गावे वसवणे- सारेच अद्भुत. महाराष्ट्रातून हैदराबादमार्गे छत्तीसगडमध्ये येताना अजूनही मी निसर्गसौंदर्य पाहून कृतज्ञतेने भारावून जाते. प्रवासात त्रास पुष्कळ होतो, पण ते सारे कष्ट मिळालेल्या अनुभवांमुळे सार्थ ठरतात. आज एका वर्षाने त्या रस्त्याने येते, तेव्हा बरीच घरे पूर्ण झालेली दिसतात. रस्ता पक्का झाल्याने, खूप कमी वेळात वारंगळहून बिजापूरला पोहोचता येते. येत्या ऑगस्टमध्ये या मार्गावर बस सुरू होईल आणि अनेक लोकांची जाण्या-येण्याची सोय होईल. या रस्त्यावरून येताना कडेकडेने इंद्रावती लागते. हा प्रवास खूप विलोभनीय असतो.
Tags: सदर छत्तीसगढ बिजापूर डायरी मराठी पुस्तक marathi pustak sadar chattisgadh bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या