डिजिटल अर्काईव्ह

सलवा जुडूममधे आदिवासींना दोनपैकी एक बाजू निवडायची संधी दिली गेली. जे सरकारच्या बाजूने गेले, त्यांना गाव सोडून सरकारी छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला, तो कायमसाठीच. ज्यांना बाजू घ्यायची नव्हती, परंतु शेती-घर सोडून परांगदाही व्हायचे नव्हते, ते गावातच राहिले. परंतु जंगलातील गावे नक्षली लोकांच्या कब्जात गेली आणि तेथील लोकांवरही आपसूकच नक्षली असल्याचा शिक्का बसला. नक्षली लोकांनी अनेक गावांवर ताबा मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय लोकांचे बाहेर पडणे बंद केले. दहशतीने अनेक गावेच्या गावे रिकामी झाली. नंतर काही गावांच्या पुनर्वसनाचे प्रयत्नही प्रशासनातर्फे केले गेले. पूर्वी बासागुडा हे सुखवस्तू गाव होते. बससेवा होती, लाईट होती, रस्त्यांवर दिवे होते. जुडूममध्ये गावे उद्‌ध्वस्त झाली. सध्या हिरापूर नावाने पुन्हा ते गाव वसवले गेले आहे.

विविध प्रदेशांत काम करताना, तेथील लोकांशी संवाद साधताना, निरनिराळ्या उल्लेखांतून त्या-त्या भागातील ऐतिहासिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये उलगडली जातात. दोन वर्षांपूर्वी मी मराठवाड्यातील सास्तूर या गावातील ‘स्पर्श’ ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ पदावर काम करत होते. 1993 मध्ये किल्लारी, सास्तूर व आसपासच्या गावांत झालेल्या शक्तिशाली भूकंपात मोठ्या प्रमाणावर हानी झाली, गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली, बेसुमार जीवितहानी झाली. ही गावे पुन्हा नव्याने उभी करण्यात आली. घरांच्या रचनेवरून लक्षात येते की, सरकारी यंत्रणेने गावांची पुनर्बांधणी केली आहे. सास्तूरमधील ‘स्पर्श’ हे ग्रामीण रुग्णालय, ‘प्राईड इंडिया’ या सामाजिक संस्थेने भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून चालवायला घेतले. तिथे काम करताना मी महिला रुग्णांना जेव्हा वय, कौटुंबिक माहिती विचारायचे; तेव्हा नेहमीच मला भूकंपाचा संदर्भ ऐकायला मिळायचा. बऱ्याचदा नेमके वर्ष आठवत नसले की- ‘भूकंप झाला होता ना, तेव्हा नुकतेच माझे लग्न झाले होते,’ किंवा ‘भूकंपात सगळं घरदार पडलं, पण मी आणि माझी लेक तेवढे वाचलो,’ ‘भूकंपानंतर चार वर्षांतच माझे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले,’ अशी उत्तरे मिळायची.

आता इथे बिजापूरमध्ये असताना हे सर्व आठवायचे कारण की, या भागात हा असाच संदर्भ ‘सलवा जुडूम’च्या घटनेचा दिला जातो. येथील गावांवर, लोकजीवनावर सलवा जुडूमची छाया पसरली आहे. सलवा जुडूम या गोंडी शब्दप्रयोगाचा अर्थ आहे, ‘शांती अभियान’. सन 2005 मध्ये कुटरू, करकेली या गावांतून आदिवासींनी नक्षल चळवळीला व त्यांच्या गावातील अत्याचाराला केलेल्या विरोधाला, पुढे जाऊन एका मोठ्या लढ्याचे स्वरूप मिळाले आणि ते लोण सर्वच बिजापूर जिल्ह्यात पसरले. के.मधुकर राव या कुटरूच्या शिक्षकाने त्याच्या सहकाऱ्यांसोबत गावोगावी पदयात्रा काढून लोकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. दंतेवाड्याचे तत्कालीन आमदार महेंद्र कर्मा यांनीही पाठिंबा देत या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. परंतु नंतर मात्र अनेक घटनांनी या लढ्याला रक्तपाताचे अमानुष वळण मिळाले.

सरकारने पूर्वनियोजन न करता घाईगडबडीत घेतलेले निर्णय, आग फोफावत पसरावी तशा गावागावांतून होणाऱ्या अमानुष कत्तली,  आदिवासींनी एकमेकांच्या सूडापोटी वाहिलेले रक्ताचे पाट, पोलिसांची कमी पडलेली कुमक आणि त्यामुळे आदिवासींना संरक्षण देण्यात असमर्थ ठरलेले प्रशासन, मानवाधिकारवाल्यांची बाजू ऐकून घेऊन कोर्टाने सलवा जुडूमच्या विरोधात दिलेला निर्णय त्यानंतर उघडे पडलेल्या सलवा जुडूममध्ये भाग घेतलेल्या आदिवासींची नक्षल लोकांनी वेचून-वेचून केलेल्या निर्घृण हत्या... या साऱ्यात जे जिवंत राहिले, वाचले, ते अजूनही जीव मुठीत धरून जगत आहेत. पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी लिहिलेल्या ‘नक्षलवादाचे आव्हान’ या अभ्यासपूर्ण पुस्तकात सलवा जुडूमशी निगडीत सर्व राजकीय संदर्भ, सत्य परिस्थिती वाचायला मिळते. सत्य परिस्थिती हा शब्दप्रयोग वापरण्याचे कारण की, अनेक लोक क्रांतीच्या आंधळ्या प्रेमापायी ऐकीव माहितीच्या आधारावर सलवा जुडूम काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्नही न करता बेफिकीरपणे एकांगी, टोकाची विधाने करतात.

इथे मी नव्याने कामाला सुरुवात केली, तेव्हा सलवा जुडूम काय प्रकार आहे हे मला माहितीही नव्हते. लोकांच्या बोलण्यातून, पत्रकारांच्या उल्लेखांतून ही कहाणी हळूहळू उलगडत गेली. सलवा जुडूमचे जन्मस्थान असलेल्या कुटरु परिसरात तर अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अशीच एक कथा म्हणजे- एकदा पोलिसांनी संशयावरून सात-आठ आदिवासी तरुणांना पकडून तुरुंगात डांबले. ते पाहून चिडलेल्या गावकऱ्यांनी एकत्र जमून खऱ्या नक्षली लोकांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या सुमारास गावागावांतून नक्षली अत्याचार वाढले होते. कधी मालाची गाडी लुटली जायची, तर कधी संशयावरून मारहाण केली जायची, खंडणी गोळा केली जायची, तर कधी जीवे मारले जायचे. प्रत्येक कुटुंबातून तरुण मुलांना नक्षली चळवळीत जबरदस्तीने सामील करून घेतले जायचे. (अजूनही कुटुंबातून एक मूल मागितले जाते.) या घटनेने लोकांच्या संतापाला तोंड फुटले आणि जुडूमची सुरुवात झाली, असे मानले जाते.

जुडूमचे पहिले नेते मधुकर राव यांना भेटण्याची इच्छा होती, त्यांच्याबद्दल वेगळ्याच कल्पना डोक्यात होत्या. कुटरूमध्ये चौकशी केली. तेव्हा कळले की, ते पंचशील आश्रमात भेटतील. पंचशील आश्रम हा मधुकर रावांनी जुडूममध्ये मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुला-मुलींसाठी सुरू केला आहे. घरातील कर्त्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर ही मुले- मुली उघड्यावर पडली, ते पाहून, आपल्या सहकाऱ्यांप्रति कर्तव्याच्या भावनेतून त्यांनी आश्रम चालवण्याचा निर्णय घेतला. आश्रमाबाहेर त्यांचे बंदुकधारी अंगरक्षक दिसले, तेव्हा म्हटले- आज भेटीचा योग आला!

आत गेल्यावर दाढी वाढवलेला, अविवाहित, अकाली वृद्धत्व आलेला साधा माणूस पाहिला; तेव्हा सारे पूर्वग्रह गळून पडले. मग भरपूर मनमोकळ्या गप्पा झाल्या. मी सर्व शंका, बोचरे प्रश्न विचारले आणि त्यांनीही व्यवस्थित उत्तरे दिली. ‘‘असेही नक्षलवादी लोक क्रांतीच्या नावाखाली अज्ञानी आदिवासी तरुणांच्या हाती बंदुका सोपवत आहेत, हत्या करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देत आहेत; तर जुडूमच्या वेळी आम्ही याच आदिवासींना पोलिसांच्या बाजूने वळवून हातात बंदूक दिली, तर काय चूक झाले?’’ असा त्यांचा प्रांजळ सवाल होता. (जुडूममध्ये सरकारने आदिवासींच्या हाती बंदूक दिली, या जुडूमच्या विरोधात जाऊन कोर्टाने याबद्दल सरकारची चांगलीच हजेरी घेतली होती.) ‘‘जुडूम सुरू करणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि आम्ही लोक त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो आहोत. परिणामांची जबाबदारी आम्ही कधीच नाकारत नाही.’’ त्यांचे निर्भीड उत्तर.

हे ते कोणाला उद्देशून बोलत आहेत, हे त्या वेळी मला समजले नव्हते; परंतु आता मात्र त्या बोलण्याचे संदर्भ उलगडले आहेत. ‘‘भीती वाटत नाही का?’’ माझा भोळसट प्रश्न. ‘‘एक दिवस तर मरणारच आहे मी त्यांच्या हातून. हो, पण एक आहे- मी तडफडत मरणार नाही, छातीवर गोळ्या घेऊन एका झटक्यात मरेन.’’ मधुकर रावांचे मुख्य साथीदार आणि जुडूमचे राजकीय नेते महेंद्र कर्मा, यांच्यावर अनेकवेळा हल्ले झाले असे म्हणतात, शेवटच्या हल्ल्याच्या वेळी ते स्वतःच गाडीतून उतरून, नक्षलींना सामोरे गेले. महेंद्र कर्मा मारले गेले. मधुकर राव वाचले. पण त्यांचे राहते घर, दुकान उद्‌ध्वस्त केले गेले. अजूनही रविवारी कुटरूच्या बाजाराच्या दिवशी ते घरातून बाहेर पडत नाहीत. गर्दीच्या ठिकाणी जात नाहीत.‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था असल्याने, सोबत सतत बंदूकधारी अंगरक्षक असतात. मी जेव्हा जेव्हा पंचशील आश्रमात जाते, तेव्हा नेहमीच अगत्यपूर्ण स्वागत होते. कधी गावरान चिकन, तर कधी इंद्रावतीतील ताजे मासेही खायला मिळतात. तेथील साधा दाल-भात खातानाही घरची आठवण येते.

सलवा जुडूममधे आदिवासींना दोनपैकी एक बाजू निवडायची संधी दिली गेली. जे सरकारच्या बाजूने गेले, त्यांना गाव सोडून सरकारी छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला, तो कायमसाठीच. ज्यांना बाजू घ्यायची नव्हती, परंतु शेती-घर सोडून परांगदाही व्हायचे नव्हते, ते गावातच राहिले. परंतु जंगलातील गावे नक्षली लोकांच्या कब्जात गेली आणि तेथील लोकांवरही आपसूकच नक्षली असल्याचा शिक्का बसला. नक्षली लोकांनी अनेक गावांवर ताबा मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय लोकांचे बाहेर पडणे बंद केले. दहशतीने अनेक गावेच्या गावे रिकामी झाली. नंतर काही गावांच्या पुनर्वसनाचे प्रयत्नही प्रशासनातर्फे केले गेले. पूर्वी बासागुडा हे सुखवस्तू गाव होते. बससेवा होती, लाईट होती, रस्त्यांवर दिवे होते. जुडूममध्ये गावे उद्‌ध्वस्त झाली. सध्या हिरापूर नावाने पुन्हा ते गाव वसवले गेले आहे. गंगालूर हे असेच आणखी एक प्रचंड प्रमाणात हानी झालेले गाव.

जुडूममध्ये हातात बंदुका आल्यावर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक सूडबुद्धीतून हत्या केल्या गेल्या. तर दुसरीकडे जुडूममध्ये भाग घेतला, म्हणून धनुष्यबाण, कुऱ्हाडीने घाव घालत संपूर्ण गावावर हल्ला करणारे नक्षली लोक. आमच्या रुग्णालयाच्या स्टाफपैकी अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी या घटना पाहिलेल्या आहेत. नदीत पडलेली प्रेते, तलवारीने तोडलेली शरीरे, सपासप बाण चालवत केलेले खून, मुलींवरचे बलात्कार... हे सर्व पाहत कुटुंबासोबत परागंदा झालेली एक नर्स माझ्यासोबत काम करत होती. गंगालूरला तिच्या घरी गेले, तेव्हा अजूनही ते कुटुंब जुन्या गावाच्या आठवणी, तेथील त्यांची शेतजमीन, जाळलेले घर याच्या कहाण्या सांगत होते.

गंगालूरलाही नवी वस्ती होऊन, गाव नव्याने वसले आहे. परंतु लोक मात्र उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतजमिनी, घर गेल्याच्या दुःखात अजूनही हळहळत आहेत. बिजापूर जिल्हा रुग्णालयाच्या मागे शांतीनगर नावाची लोकवस्ती आहे. तिथे जुडूममध्ये गाव सोडून आलेले लोक राहत आहेत. त्यांना अजूनही भीती आहे की, ते गावी परतले, तर त्यांना जीवे मारले जाईल. कोणाचे आई-वडील, कोणाचा भाऊ अजूनही गावाकडे राहतात. पण जे पोलिसांत भरती झाले आहेत, ते मात्र नातेवाइकांना भेटायलासुद्धा जाऊ शकत नाहीत. कारण चुकून पोलिसात   भरती झालेला तरुण नक्षली लोकांच्या हाती लागला, तर त्याची निर्दयीपणे हत्या करून नदीकिनारी प्रेत फेकून देण्याच्या घटना येथे नित्याच्या आहेत. अशाने लोकांत दहशत निर्माण करून आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी जरब बसवणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो.

कुटरूच्या पुढे फरसेगडपासून त्यांची सत्ता सुरू होते. त्या भागातील कुठल्याशा गावातील एक तरुणी नोकरी मागायला भेटायला आली. ‘‘काही तरी नोकरी द्या, मला गावाकडे परत जायचे नाही’’ हा तिचा एकच धोशा. चौकशी केल्यावर कळले, आई विधवा. गावातील सर्वच तरुण नक्षली चळवळीशी जोडले जातात. हिच्या लहान भावालाही त्यांच्यात सामील करून घेण्याची त्यांची मागणी. शिक्षण घेतलेली ही तरुणी मात्र नक्षली चळवळीच्या विरोधात होती. त्यामुळे सरळ गाव सोडून बिजापूरला राहून नोकरी करण्याचा तिने निर्णय घेतला. अशी किती तरी उदाहरणे इथे पाहायला मिळतात. त्यामुळे नक्षली चळवळीला क्रांतीचे रोमँटिक रूप देणारे शहरातील बुद्धिजीवी, सुखवस्तू लोक मला तद्दन दांभिक वाटतात.

गंगालूरच्या रस्त्यामध्ये लागणाऱ्या चेरपाल येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात आम्ही एकदा पाहणीसाठी गेलो. CRPF च्या कॅम्पला लागूनच असणाऱ्या या स्वास्थ्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टर सोडून कोणीही स्टाफ, नर्स राहत नाही. कारण गोळीबारात आपणही चुकून बळी पडू अशी भीती. तेथील डॉ.पटेल मात्र पत्नी आणि लहान बाळासोबत निर्भयपणे राहतात. तिथे ऐकायला मिळाले की, ‘यहाँके बहोत सारे गाव बंद है.’ मी असे काही प्रथमच ऐकत होते. बंद म्हणजे काय, हे विचारल्यावर कळले की- अशा दुर्गम, अतिसंवेदनशील गावात नक्षलींच्या परवानगीशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही किंवा गावातून बाहेर पडूही शकत नाही. अगदी तातडीच्या कामासाठीच त्यांची परवानगी घेऊन बाहेर पडता येते. अनेकदा प्रसूतिसाठीही गर्भवतीला गावाबाहेर जाता येत नाही. कधी कधी जिल्हा रुग्णालयात आम्ही गंभीर रुग्णाला, आजारी लहान मुलांना भरतीचा सल्ला देतो, तेव्हा आमचे बिलकुल न ऐकता, ते परत गावी जातात. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा गावात वेळेत परत गेले नाही, तर नक्षली लोक शंका घेऊन मारहाण करण्याची भीती असते. गावाकडचा आदिवासी हा नक्षली आणि पोलीस दोन्हीमध्ये भरडला जातो.

गंगालूरचे CHC स्वास्थ्य केंद्र गावाच्या थोडे बाहेर आहे. तिकडे जाताना मधे पोलीस स्टेशन लागते. डॉ.विजय सांगत होते, ‘‘पोलिसांच्या भीतीमुळे तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे. चौकशीसाठी पोलीस पकडतील, या भीतीने आदिवासी दवाखान्यात यायचेच टाळतात. फिल्डवर काम करताना दोन्ही बाजूचे लोक भेटतात. असेच एकदा सोबतची सर्वच टीम सलवा जुडूमच्या विरोधात बोलत होती. त्यांच्या मते, जुडूमच्या लोकांनीच साऱ्या हत्या केल्या आणि ‘अंदरवाले लोग अच्छे है.’ असे पुन:पुन्हा ठासून मला ते सांगत होते. त्यातील एक मितानीन उत्साहाने सांगत होती, ‘मेरे गॉव में तो पुलीसने बहोत लोगोंको पकडा, मारा, पिटा. अंदरवाले है, ऐसे बोलके सबको ही बहोत मारा. मै ऊस टाईम पे सोला साल की ही थी’. वगैरे. तिचे गाव रस्त्यात लागताच, ती उतरून गेली. तेव्हा बाकीचे सर्व मला सांगू लागले, ‘मॅडम, वो संतोषपूर की है. उसका गाव पुरा नक्षली है.’ ते ऐकून मी डोक्याला हात लावला.

एके दिवशी मधुकर राव मला औषधे विचारत होते. आश्रमातील मुलींना सतत होणारी खरुज, उवा यावरची औषधे. कांचन नावाच्या एका उत्साही शिक्षिकेने पटकन वही आणि पेन आणून दिले. मी त्यात नावे लिहून दिली, तर मधुकर राव डोळ्यांपासून वही दूर धरून निरखू लागले. तेव्हा मला कळले की, त्यांना डोळ्यांनी नीट दिसत नाही. मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे होते, तर रक्तातील साखर वाढल्याने ते होऊ शकले नाही. डायबेटिस असूनही ते काही उपचार घेत नव्हते, रक्ततपासणी करत नव्हते. मग मी हक्काने रागावले की, बिजापूरला तीन-चार दिवस मुक्कामाला येऊन सर्व तपासणी करून घ्या, उपचार घ्या. क्षणभर त्यांची काळजी वाटली, त्यांच्यासोबत पंचशील आश्रमाचीही.

सलवा जुडूम अर्थातच शांती अभियान. पण विरोधाभास हा की, यात रक्ताचे पाट वाहिले. एक चांगल्या हेतूने सुरू झालेल्या आदिवासी लढ्याला चुकीचे वळण लागून कायमचा कलंक माथी आला. यामध्ये आदिवासी गावांची वाताहत झाली हे जसे एक सत्य आहे, तसेच हा लढा आदिवासींनी स्वयंप्रेरणेने सुरू केला होता, हेही एक सत्यच आहे.

Tags: नक्षलवाद छत्तीसगढ सलवा जुडूम बिजापूर डायरी chattisgadh salawa judum bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी