डिजिटल अर्काईव्ह

इतक्या साऱ्या भिन्नभिन्न डॉक्टरांना केवळ जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसरांचा दिलखुलास स्वभावच बांधून ठेवू शकला. गेल्या दोन वर्षांत पूर्ण छत्तीसगडमध्ये आणि देशभरातही बिजापूर जिल्हा रुग्णालयाचे मॉडेल प्रसिद्ध झाले आहे. अनेक पत्रकार, डॉक्टर्स टीम इथे भेट द्यायला येतात. सर्वांना असे वाटते की, केवळ पगार जास्त मिळतो म्हणून इथे डॉक्टर्स टिकून आहेत. परंतु पैशाच्याही पलीकडे अनेक गोष्टी असतात, ज्या डॉक्टर्सना काम करायला प्रेरणा देत असतात. मग ते अय्याजसरांनी रुग्णालयासाठी घेतलेली अत्याधुनिक उपकरणे असो, किंवा राहण्यासाठी पुरवलेल्या उत्तम सुविधा असो वा वेळोवेळी कामासाठी दिलेले उत्तेजन असो. येथील डॉक्टर्सचे टीमवर्क हे सर्वांना पडलेले कोडे आहे. अनेकदा शेजारील दंतेवाडा जिल्ह्यात जास्त पगार देऊन डॉक्टर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु येथील एकही डॉक्टर अजून बिजापूर सोडून तिथे गेला नाही.

कुणाचा वाढदिवस असो किंवा कोणी एखादी अवघड शस्त्रक्रिया केलेली असो, फुटबॉलच्या  सामन्यातील हार-जीत असो,  होस्टेलमधे प्रत्येकाकडून जेवणाची पार्टी वसूल केली जाते. बिजापूर जिल्हा रुग्णालयात विविध राज्यांतून आलेले तरुण डॉक्टर्स मिळून एक छान टीम तयार झालेली आहे. हॉस्पिटलच्या आवारातच असलेल्या होस्टेलवजा इमारतीत राहण्याची सोय असल्याने, इथे ‘चाळी’सारखे वातावरण तयार झाले आहे. मूळचे चेन्नईचे असलेले सर्जन डॉ.नागुलन आणि युनानी पदवीधर असलेली त्यांची बायको, डॉ.राबिया दोघेही दोन वर्षांपासून इथे आनंदाने काम करीत आहेत.

उत्तम गायक आणि चित्रकार असलेले डॉ.नागुलन, वयाने लहान असलेले तरी अनेक प्रकारच्या दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी इथे केलेल्या आहेत.

अस्वलाने जबडा फाडलेल्या रुग्णाची दोन टप्प्यांमध्ये केलेली प्लास्टिक सर्जरी असो किंवा 30 दिवसांच्या बाळावरची आतड्याची शस्त्रक्रिया असो, त्यांचा हात लागला की, रुग्ण वाचतो, असे मनापासून वाटते. बिजापूरपासून 40 किमीवर असलेल्या मद्देड या खेड्यातील 60 वर्षांच्या चिनक्का या वृद्धेला बऱ्याच वर्षांपासून गळ्यामध्ये थायरॉईडची गाठ होती. तिला त्याची इतकी सवय झाली होती की, तो काही आजार आहे, हेही तिच्या कधी लक्षात आले नव्हते. ती गाठ नारळाएवढी मोठी झाली,  त्याने तिच्या आवाजावर परिणाम झाला, तेव्हा लोकांच्या सल्ल्याने ती रायपूरपर्यंत उपचारासाठी गेली. परंतु तिचे वय, गाठीची साईझ यामुळे शस्त्रक्रियेमध्ये असलेला तिच्या जिवाला धोका या कारणांमुळे तिची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

डॉ.नागुलन आणि त्याच्या टीमने हे आव्हान स्वीकारले. आमच्या मेडिकलच्या पुस्तकात दुर्मिळ रोगाच्या प्रकारात असणारे ते चित्र मीही प्रत्यक्ष आयुष्यात प्रथमच पाहिले होते. चार-पाच तास चाललेली ती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन चिनक्का नॉर्मल आवाजात बोलू लागली, तेव्हा सर्वच टीम आनंदित झाली.

बरे होऊन घरी गेलेल्या चिन्नकाने तिच्या आजूबाजूच्या थायरॉईडच्या रुग्णांना बिजापूर जिल्हा रुग्णालयात पाठवले. CRPFचे बॉम्बस्फोटात जखमी झालेले जवान असो, किंवा रोड अपघातातील जखमी रुग्ण असो, डॉ.नागुलनची सर्जरी टीम नेहमीच कार्यतत्पर असते.

बॉम्बस्फोटात जास्त गंभीर झालेल्या CRPF जवानावर प्राथमिक उपचार करून नंतर हेलिकॉप्टरने रायपूरला नेले जाते. डॉ.नागुलन उत्तम शल्यविशारद असल्याने आम्हा बाकी सर्वच डॉक्टराना त्यांच्याकडून शस्त्रक्रियेसंबंधी, शरीरशास्त्राविषयी बरेच शिकायला मिळते.

मला स्त्रीरोगविषयी शस्त्रक्रियेत समस्या आली तरी कधीही डॉ.नागुलन मदतीला येतात. डॉ.नागुलनसोबत सर्जरी विभागात डॉ.श्रीरामकृष्णा हे विशाखापट्टणमचे एमबीबीएस डॉक्टर काम करतात. हसतमुख स्वभाव आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती यामुळे डॉ.श्रीराम सर्वांचेच चांगले मित्र आहेत.

श्रीरामसरांची बायको डॉ.मंजरी ही विशाखापट्टणमचीच असून मायक्रोबायोलोजिस्ट आहे. कामात अगदी चोख राहण्याची वृत्ती, प्रसंगी समोरच्याच्या चुका सांगण्याचा दिलखुलास स्वभाव यामुळे डॉ.मंजरीसोबत काम करताना आपल्या कामातही सुधारणा होते. प्रसूतिकक्षातील अस्वच्छतेमुळे होणारा जंतुसंसर्ग डॉ.मंजरीने वेळोवेळी माझ्या नजरेस आणून दिल्याने आम्ही वेळोवेळी उपाय करून समस्या दूर करू शकलो.

गडचिरोलीचे दोन विशेषतज्ज्ञ डॉ.मित्तल गेडाम आणि डॉ.श्रीकांत गेडाम हेही सुरुवातीपासून इथे कार्यरत आहेत. डॉ.मित्तल हे एक कुशल भूलतज्ज्ञ असून लहान बाळापासून गंभीर वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ते विविध प्रकारच्या भूल सहजरीत्या देतात, त्यामुळे बिजापूरच्या जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात. नाही तर बऱ्याच वेळा केवळ भूलतज्ज्ञाने नकार दिल्याने सर्जन शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. डॉ.मित्तलसोबत डॉ.गुप्ता हे CRPFचे भूलतज्ञही जिल्हा रुग्णालयात 24 तास सेवा देतात. डॉ.गुप्तांची पत्नी, डॉ.निम्मी पथॉलॉजिस्ट असून त्या रक्तपेढीचे काम जबाबदारीने सांभाळतात.

डॉ.श्रीकांत हे नेत्रतज्ञ, कुशल नेत्रशल्यविशारद असून, त्यांच्यामुळे बिजापूर जिल्हा रुग्णालयाचा नेत्रविभाग विकसित झाला आहे. आत्तापर्यंत त्यांनी मोतीबिंदूंच्या 504 शस्त्रक्रिया केल्या असून, बाकीही डोळ्यांच्या विवध शस्त्रक्रिया ते करतात. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी छत्तीसगड राज्य सरकारतर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ.श्रीकांतची पत्नी, हर्षदा नागपूरची असून व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बिजापूरमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात ती मुला- मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याचे काम करते. संगणक शिकवण्याआधी बऱ्याचदा तिला मुलांना इंग्लिशचे पाठ द्यावे लागतात, कारण येथील मुला-मुलींचा शाळेत इंग्लिश व गणिताचा पाया कच्चा राहतो. नागपूरमधील आरामशीर जीवनशैली सोडून डॉ.श्रीकांतच्या खांद्याला खांदा लावून ती बिजापूरमध्ये आनंदाने काम करत आहे.

जिल्हा रुग्णालयाचा मातृशिशु संस्थान, म्हणजेच ‘उमंग’ हा विभाग सुरू झाला तेव्हापासून डॉ.कुशल आणि डॉ.अरुण हे दोघे तरुण स्त्रीरोगतज्ञ येथे सेवा देत आहेत. उत्तर प्रदेशचे असलेले डॉ.अरुण यांची पत्नी प्रतिभा, व्यवसायाने शिक्षिका असून बिजापूरमधील शाळेत ती रुजू झाली. रायपूरची डॉ.आकृती शुक्ला ही नव्याने स्त्रीरोगतज्ञ म्हणून रूजू झाली आहे.

बालरोगतज्ञ म्हणून पंजाबचे डॉ.नहीम आणि बेंगलोरचे डॉ.लोकेश दोन वर्षांपासून काम पाहत आहेत. जिल्हाधिकारी अय्याजसरांची पत्नी डॉ.नसरीनमॅडम कान-नाक-घसा तज्ज्ञ असून त्यांच्या लहान मुलाला सांभाळत कामाची जबाबदारी पेलत आहेत. मेडिसिन आणि डायलिसीसचा विभाग मूळचे छत्तीसगडचेच असलेले डॉ.ब्रिजलाल व महाराष्ट्राची डॉ.ज्योती सांभाळत आहे.

अस्थिरोगतज्ञ म्हणून नागपूरचे असलेले डॉ.रोहित तामस्कर काम पाहत आहेत. त्यांच्या डॉक्टर पत्नी, जुळ्या मुलांना सांभाळण्यात व्यस्त होऊन जातात. याशिवाय अनेक एमबीबीएस डॉक्टर्स येथे कार्यरत आहेत. ओरिसाची  डॉ.बिजयालक्ष्मी आंध्र प्रदेशाची डॉ.भारती अशा धाडसी तरुण मुली धडाडीने काम करतात. ते आई.सी.यु. असो किंवा पोस्टमॉर्टेम असो. महाराष्ट्राचे असलेले डॉ.पवन ज्यांनी पूर्वी भामरागडसारख्या आदिवासी दुर्गम भागात काम केलेले आहे, तेही एक वर्षापासून इथे कार्यरत आहेत. त्यांची पत्नी कल्याणी ही व्यवसायाने इंजिनिअर असली तरी कुमारवयातील मुलींसाठी आरोग्यजागृतीचे, व्यक्तिमत्व विकास व करिअर नियोजनाचे काम गेल्या चार-पाच वर्षांपासून करत आहे.

 इतके सारे तरुण-तरुणी येथे बिजापूर जिल्हा रुग्णालयात गुण्या-गोविंदाने नांदतात. जुने लोक काही कारणाने सोडून गेले, तरी नवीन लोक येत राहतात. कधी भांडणेही झाली तरी जिल्हाधिकारी अय्याजसर मित्रत्वाच्या हक्काने गैरसमज मिटवतात. येथील सिव्हिल सर्जन, अस्थिरोगतज्ञ डॉ.कुंवर छत्तीसगडचेच असून सर्वच डॉक्टरांना कुटुंबप्रमुखाप्रमाणे कधी प्रेमाने तर कधी कडक शिस्तीने सांभाळून घेतात.

कुंवरसरांचे व्यक्तिमत्वच इतके भारदस्त आहे की, त्यांचा सहजच समोरच्यावर प्रभाव पडतो. डॉ.कुंवरसर कोंडागाव या गावातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले. पाच भावंडांत सर्वांत लहान. फरसगाव या गावात उत्तम शिक्षण मिळाल्याने घराण्यातील पहिले डॉक्टर. कदाचित स्वतः हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले असल्याने त्यांना सामान्य लोकांबद्दल नेहमीच कळवळा वाटतो.

फिल्डचे प्रमुख डॉ.पुजारीसर हे CMO म्हणजेच चीफ मेडिकल ऑफिसर, हे मूळचे याच भागातील आहेत. पुजारीसरांसोबत कुठेही फिल्डवर, दुर्गम गावात गेले की, जुने रुग्ण येऊन सरांच्या पाया पडतात. कारण पूर्वी इथे इतके डॉक्टर्स नव्हते तेव्हा पुजारीसरच सर्वेसर्वा होते. सरांसोबत फिल्डचे काम सांभाळण्यासाठी जिल्हा प्रोजेक्ट मनेजर डॉ.पुष्पेंद्र आहे, जो याच भागातीलच आहे. त्याचा आदिवासी जीवनाशी अगदी जवळून परिचय असल्याने तो आत्मीयतेने सर्व काम पाहतो. त्याची बायको एमबीबीएस असून तीही जिल्हा रुग्णालयात रूजू झाली आहे.

इतक्या साऱ्या भिन्नभिन्न डॉक्टरांना केवळ जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसरांचा दिलखुलास स्वभावच बांधून ठेवू शकला. गेल्या दोन वर्षांत पूर्ण छत्तीसगडमध्ये आणि देशभरातही बिजापूर जिल्हा रुग्णालयाचे मॉडेल प्रसिद्ध झाले आहे. अनेक पत्रकार, डॉक्टर्स टीम इथे भेट द्यायला येतात. सर्वांना असे वाटते की, केवळ पगार जास्त मिळतो म्हणून इथे डॉक्टर्स टिकून आहेत. परंतु पैशाच्याही पलीकडे अनेक गोष्टी असतात, ज्या डॉक्टर्सना काम करायला प्रेरणा देत असतात. मग ते अय्याजसरांनी रुग्णालयासाठी घेतलेली अत्याधुनिक उपकरणे असो, किंवा राहण्यासाठी पुरवलेल्या उत्तम सुविधा असो वा वेळोवेळी कामासाठी दिलेले उत्तेजन असो. येथील डॉक्टर्सचे टीमवर्क हे सर्वांना पडलेले कोडे आहे. अनेकदा शेजारील दंतेवाडा जिल्ह्यात जास्त पगार देऊन डॉक्टर्सना    आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु येथील एकही डॉक्टर अजून बिजापूर सोडून तिथे गेला नाही.

कधी जेवणाची पार्टी, कधी चौकातील गाड्यावर जिल्हाधिकारी अय्याजसरांनी सर्वांसोबत खाल्लेली पाणीपुरी, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अंताक्षरी तर कधी शेजारील चित्रकूट, तीर्थगड या पर्यटनस्थळांना भेटी द्यायला काढलेल्या सहली, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात मैदानावर रंगलेला क्रिकेटचा सामना असो, अय्याजसर असले की वातावरणाचा नूरच वेगळा असतो.

येथे प्रसिद्ध असलेल्या कुटुंबसर गुहांच्या जंगलामध्ये अय्याजसरांमुळे सर्वांसाठी विशेष जिप्सी राईड आयोजित केल्या गेल्या, जंगलाच्या मधोमध मंडप टाकून उत्तम जेवणाची सोय केली गेली. तर 31 डिसेंबर अविस्मरणीय करायला अय्याजसरांनी घरी सर्वांसाठी जेवणाची पार्टी ठेवली, त्यात स्वतःच्या हाताने बनवलेली मटणाची डिश सर्वांना आग्रहाने खाऊ घातली, नंतर रंगला संगीत खुर्चीचा खेळ, मध्यरात्री आतषबाजी, समोरच्याला समजून घेणे, मदत करणे, आजूबाजूच्यांना आनंद वाटणे, हे गुण असलेले अय्याजसर जिल्हाधिकारी असण्याचा गर्व न बाळगता उत्साहाने सर्वांमध्ये मिसळतात.

एके दिवशी अचानक अय्याजसरांच्या बदलीची बातमी येऊन थडकली आणि आम्ही सारेच उदास झालो. बिजापूरपासून 180 किमी असणाऱ्या जगदलपूरला म्हणजेच बस्तर जिल्ह्यात सरांची बदली झाली. बिजापूर जिल्ह्यात कुंजाम म्हणून नवीन जिल्हाधिकारी आले. काही दिवसांपूर्वी अय्याजसरांनी हॉस्पिटलमध्ये आपापल्या विभागात कायाकल्प करण्याची स्पर्धा ठेवली होती. प्रत्येक विभागाला पंधरा हजार दिले गेले आणि त्यातून कल्पकता दाखवत नवीन काही तरी करून दाखवण्याची स्पर्धा आयोजिली गेली. शेवटचे दोन दिवस राहिले आणि सारेच विभाग जोरात कामाला लागले. रात्री जागून सजावट केली. रुग्णांसाठी सूचना बोर्ड बनवण्यासाठी एकुलत्या एक असलेल्या प्रिंटींगच्या दुकानात सगळ्याच डॉक्टरांची लाईन लागली.

आम्ही प्रसूतिकक्षात रंग देऊन घेतला. आमच्या नर्सेस पहिला नंबर मिळवायच्या जिद्दीने कामाला लागल्या. कोणी कागदाची फुले बनवली, कोणी थर्माकोलचा सूचनाफलक बनवला. माझा मित्र मकरंदने मला सजावटीमध्ये भरपूर मदत केली. अय्याजसर दिवसभर हॉस्पिटलमध्ये फिरत होते. होस्टेलवर कल्याणीच्या हातचे महाराष्ट्रीयन पद्धतीचे मटण खायला आले. त्यामुळे दिवसभर सरांची बदली झाली आहे असे जाणवलेच नाही. त्याच रात्री हॉस्पिटलतर्फे अय्याजसरांसाठी निरोप समारंभ ठेवला गेला होता. पारितोषिक वितरण झाले. अनेकांनी गाणी गायली. सरांच्या जागी आलेल्या नवीन जिल्हाधिकारी कुंजाम यांचे स्वागत सत्कार झाले, त्यांनी भाषणात जिल्हा रुग्णालयालातील सर्व लोकांना सहकार्य देण्याचा मनोदय बोलून दाखवला. कायाकल्प स्पर्धेतील विजेत्या विभागांना पारितोषिक वितरण चालू होते, माझे डोळे मात्र सरांना निरोप देण्याच्या कल्पनेने सतत भरून येत होते.

शेवटी अय्याजसर बोलायला उभे राहिले, सर्वांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत बोलू लागले, परंतु भावनाशील होऊन त्यांचे डोळे भरून आले. त्यांचे शब्द भावनांमुळे अडकले. ‘जब भी आओगे, साथ पाओगे’ म्हणत त्यांनी बोलणे थांबवले. मग तो सर्वच निरोपसमारंभ दुःखाने उदास झाला. फक्त डॉक्टर्सच नाहीत तर इतर विविध विभागातील सरांच्या ऑफिसमधील कर्मचारी, सारेच उदास होते.

किशोरकुमारच्या ‘चलते चलते, कभी अलविदा ना कहना’ हे गाणे सर्वजण मिळून गात कार्यक्रम संपवून अय्याजसर गाडीतून निघून गेले, तेव्हा जाणवले अरेच्चा, आता यापुढे अय्याजसर बिजापूरमध्ये नसणार. मी स्वतः बिजापूरमध्ये आले ते अय्याजसरांमुळे. सरांची बिजापूरमध्ये पहिल्यांदा झालेली भेट, त्यांचे काम पाहून भारावून गेलेली मी. वेळोवेळी त्यांनी केलेली मदत, दिलेली शाबासकीची थाप, वेगवेगळ्या विषयांवर अविरत मारलेल्या गप्पा, काम करताना आलेल्या समस्येमुळे, टेन्शनने सरांसमोर रडणारी मी आणि एकट्या मुलीला भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन संवेदनशीलतेने सरांनी दिलेले सहकार्य, कधी हक्काने सरांकडे केलेल्या तक्रारी. सारे आठवून डोळे भरून येत राहिले. प्रामाणिक आणि कर्तबगार जिल्हाधिकारी असण्यासोबतच एक मोठ्या मनाचा, संवेदनशील मित्र अय्याजसरांच्या रूपात सर्वच डॉक्टरांना कायमसाठी मिळाला आहे.

Tags: बिजापूर डायरी डॉ. अय्याज तांबोळी बिजापूर जिल्हा रूग्णालय chattisgadh bijapur diary Aayyaj Bijapur Dr. Aishawarya Revadakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी