डिजिटल अर्काईव्ह

हिरवाईने नटलेला तो परिसर पावसामुळे आणखी जास्त खुलला होता. पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमधून आत गेलो, तर सारे पोलीस दारातच उभे होतो. आम्ही सारे पोहोचताच ओळख करून घेणे झाले. दुसऱ्या शाळांतील मुले-मुलीही अजून येत होती. समोर दूरवर हिरवी वृक्षराजी पांघरलेल्या, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा दिसत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुलांनी उंच पकडलेला तिरंगा खूपच सुंदर दिसत होता. मुलांना खाऊ वाटला गेला. खाऊ वाटणारे ते पोलीस पाहून मला गंमत वाटत होती. मी मधुकररावांना विचारले, ‘‘दर वर्षी येथे येता का?’’ तेव्हा त्यांनी सांगितले की- आदिवासी लोक व पोलीस यामधील दरी कमी व्हावी, लोकांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती निघून जावी, म्हणून हा प्रयत्न. तरुणांनी नक्षली चळवळीचा रस्ता धरण्याऐवजी शिक्षण, विकासाचा मार्ग धरावा यासाठी त्यांनी जे विविध शांततापूर्ण अभियान राबवले, त्याचाच हा एक भाग होता.

14 ऑगस्टला दुपारीच कुटरूला जायचे, मुलींसोबत दुसऱ्या दिवशीच्या सजावटीची तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण झाले की, खाऊ खाऊन परत निघायचे- असा मी आणि मकरंदने बेत ठरवला होता. मकरंद दीक्षित मूळचा मुंबईचा, सॉफ्टवेअर इंजिनिअर. काही वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये नोकरीसाठी स्थित झालेला. परंतु स्वदेशासाठी काही तरी करायचे या कर्तव्यभावनेतून भारतात परतला. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-पुण्यात नोकरी करता-करता सतत काही तरी समाजोपयोगी काम करण्याची धडपड. त्यातून नाशिकच्या ‘प्रगती अभियान’ या संस्थेसोबत रोजगार हमी योजनेचा, जलसंधारण कामाचा त्याने अभ्यास केला, काही काळ मंत्रालयात काम केले. त्यासोबतच स्वतःचा रस्ता शोधण्याची तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

खासगी देणग्यांव्दारे रोजगार हमी योजना राबवायची आणि त्यातून नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी खेड्यांमध्ये जलसंधारणाची कामे राबवायची असा सलग दोन वर्षे यशस्वी प्रयोग त्याने राबवला. त्यातूनच त्याच्या ‘स्पार्क’ या सामाजिक संस्थेचा जन्म झाला. गेल्या वर्षी इंजिनिअरिंगची नोकरी कायमसाठी सोडून पूर्णवेळ सामाजिक काम करण्याचा त्याने निर्णय घेतला. एक महिन्यापूर्वी तो बिजापूर जिल्ह्यात काम करण्यासाठी रुजू झाला आहे. बिजापूर जिल्ह्यातील काही गावे निवडून तेथील जमिनीचे भूस्तर आरेखन करायचे आणि प्रायोगिक तत्त्वावर जलसंधारणाची कामे करायची, अशी जबाबदारी आधी मकरंदवर सोपवली होती. पण त्याचबरोबर येथील विविध गावांतील रहिवासी शाळांत (पोर्टाकेबिन्स) जाऊन तेथील मुला-मुलींना ओरिगामी, हस्तकला शिकवणे, स्वच्छता, आरोग्य व विविध विषयांवर प्रबोधन करणे, असे वेगळे काम जिल्हाधिकारी अय्याजसरांनी त्याला सुचवले आणि त्यात मकरंद चांगलाच रुळला. कुटरूला पंचशील आश्रमामध्ये माझ्यापेक्षाही त्याच्या चकरा होऊ लागल्या आणि मुलींचा व मधुकररावांचा तो हक्काचा दादा बनला.

14 तारखेला रुग्णालयात माझी एक रुग्ण गंभीर झाली आणि तिच्यावर उपचार करून दुसरे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुणकडे तिची जबाबदारी सोपवून निघता-निघता आम्हाला दुपारचे चार वाजून गेले. त्यात गेल्या सात दिवसांपासून सतत कोसळणारा पाऊस. कुटरूला पोहोचल्यावर रस्त्यात प्राथमिक स्वास्थ्य केंद्र लागते, तिथे डॉ. मोरलाना भेटायला थांबलो, तर सर्व स्टाफ मिळून आवारात दुसऱ्या दिवशीसाठी सजावट करत होता. आश्रमात गेलो तेव्हा साऱ्या मुली स्वागताला पळत आल्या. जवळजवळ चार-पाच महिन्यांनी मी आश्रमात आले होते आणि मधल्या या काळात मुली उंचीने मोठ्या झाल्यासारख्या मला भासू लागल्या. मग प्रत्येकीला जवळ घेऊन चौकशी करणे झाले. काही मुलींनी उन्हाळ्यात केसांचे टक्कल केले होते. त्या वाढू लागलेले छोटे केस हसत दाखवत होत्या.

मधुकररावांनी चहा पीत सांगितले की, दुपारपासून मुली तुम्हा दोघांची वाट पाहत आहेत. आदल्या दिवशी येथील शिक्षक-शिक्षिका व काही विद्यार्थी सर्वांसाठी नवे गणवेश, पीटीचे कपडे, योगा बूट, बेल्ट, लेगिन्ग्ज, मोजे, रुमाल असे सर्व सामान आणायला जगदलपूरला गेले होते. ते नुकतेच येऊन पोहोचले होते व वाटप करण्यासाठी सामानाची विभागणी करत होते. शेजारच्या आश्रमातून मुलेही येथे येऊन जमली. आधी मकरंदने सर्व मुला-मुलींना प्रोजेक्टरवर स्वातंत्र्यदिन, ध्वजारोहणाबद्दल माहिती देणारे व्हिडिओ दाखवले. त्यासोबतच तिरंग्याची माहिती, तिरंग्याचा सन्मान कसा राखायचा, याची माहिती समजावून सांगितली.

मग आम्ही सर्वांनी मिळून वस्तूंचे वाटप सुरू केले. त्यात गणवेश लहान-मोठे झाले. मुली खोलीत जाऊन, गणवेश घालून पाहून, येऊन आम्हाला बदलून मागू लागल्या. त्यात चांगला तासभर गेला. कपड्यांचे वाटप संपल्यावर बुटांचे वाटप सुरू झाले, त्यात पुन्हा मापे तपासून पाहणे. अंधार पडल्यावर मुले त्यांच्या आश्रमात परतली. मुली नवे सामान तपासून पाहण्यात हरखून गेल्या होत्या. बिजापूरच्या उएज राहुल सरांनी आमची राहण्याची सोय कुटरूच्या फॉरेस्ट ऑफिसच्या विश्रामगृहात केली होती. जेवण करून आम्ही रात्री नऊला बाहेर पडलो, पाऊस अजूनही चालूच होता आणि लाईट गेलेली होती.

गाव पूर्ण काळोखात गुडुप झाले होते. छत्र्या घेऊन आम्ही निघालो. कुठेही थोडासुध्दा प्रकाश दिसत नव्हता. मी मनातून थोडी घाबरले होते, पण दहाच मिनिटांच्या अंतरावर विश्रामगृह असल्याने फार भीतीचे कारण नव्हते. रस्त्यात जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. थोडा वेळ विश्रामगृहाच्या आवारात बसलो. सर्वत्र मिट्ट काळोख. ढगांमुळे चांदण्याही दिसत नव्हत्या. मागच्या बाजूला झाडे, जंगल. लाईट येताच आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो. मी खूप थकल्याने पाच मिनिटांतच झोपी गेले. रात्री दोन वाजता जाग आली. खोलीतील दिवा चालूच होता. मी उठून दरवाजा पाहिला, तर आतून बंद करायला कडीच नव्हती. काचेच्या खिडक्या आणि पडदे नव्हते. म्हणजे मी एकटीच आत आहे हे बाहेरून कोणालाही सहजपणे दिसू शकत होते.

मी लाईट बंद केले, पण भीतीने माझा ताबा घेतला आणि पुढे तीन तास मी झोपूच शकले नाही. पहाटे पाचला थकून पुन्हा डोळे मिटले. सकाळी सात वाजताच देशभक्तिपर गीतांच्या आवाजाने मी जागी झाले. दरवाजा उघडून बाहेर डोकावले, तर फॉरेस्ट विभागाच्या पाच-सहा लोकांचे संचलन आणि ध्वजारोहण चालू होते. मी उठायला फारच उशीर केला होता. तेवढ्यात आश्रमातून एक मुलगी बोलवायला आली. लवकर आवरून आश्रमाकडे निघाले. पाऊस अजूनही चालूच होता. रस्त्यात छत्र्या घेऊन, गणवेश घालून आपापल्या शाळेत निघालेली चिमुरडी मुले-मुली दिसत होती. कुणाच्या हातात इवले- इवले झेंडे होते. आश्रमात पोहोचले, तेव्हा सर्व मुली गणवेश घालून तयारच होत्या. नेहमी साधे कपडे घालणारे मधुकरराव आज फॉर्मल पँट आणि पांढऱ्या शुभ्र शर्टामध्ये रुबाबदार दिसत होते.

पूर्वीचे मोठे केस आणि दाढी केल्याने त्यांचे वयही कमी दिसत होते. मुली उंचीनुसार रांगेत उभ्या राहिल्या. दोन उंच मुली लीडर म्हणून समोर आल्या आणि एकीने तिरंगा पकडला. सावधान-विश्राम सुरू झाले आणि मकरंदच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मकरंदकडे पाहताना या संवेदनशील स्वभावाच्या मित्राविषयीच्या अभिमानाने माझे मन भरून आले. तिथून मग आम्ही पंचशीलच्या शाळेकडे निघालो. छत्र्या सांभाळत, डबक्यातून वाट काढत तिथे पोहोचलो. शिक्षकांनी तिथे जय्यत तयारी केली होती. मधुकररावांनी मला ध्वजारोहण करण्यासाठी पुढे बोलावले आणि मी कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेले. ध्वजाच्या पायथ्याला तिलक लावून फुले वाहिली. आयुष्यात प्रथमच मी ध्वजारोहण करत होते आणि तेही माझ्या लाडक्या कुटरूमध्ये. तिथून पुढे आम्ही सारे कुटरूच्या पोलीस ठाण्याकडे निघालो.

हिरवाईने नटलेला तो परिसर पावसामुळे आणखी जास्त खुलला होता. पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमधून आत गेलो, तर सारे पोलीस दारातच उभे होतो. आम्ही सारे पोहोचताच ओळख करून घेणे झाले. दुसऱ्या शाळांतील मुले-मुलीही अजून येत होती. समोर दूरवर हिरवी वृक्षराजी पांघरलेल्या, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा दिसत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुलांनी उंच पकडलेला तिरंगा खूपच सुंदर दिसत होता. मुलांना खाऊ वाटला गेला. खाऊ वाटणारे ते पोलीस पाहून मला गंमत वाटत होती. मी मधुकररावांना विचारले, ‘‘दर वर्षी येथे येता का?’’ तेव्हा त्यांनी सांगितले की- आदिवासी लोक व पोलीस यामधील दरी कमी व्हावी, लोकांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती निघून जावी, म्हणून हा प्रयत्न.

तरुणांनी नक्षली चळवळीचा रस्ता धरण्याऐवजी शिक्षण, विकासाचा मार्ग धरावा यासाठी त्यांनी जे विविध शांततापूर्ण अभियान राबवले, त्याचाच हा एक भाग होता. सर्व मुलांसोबत आम्ही आतल्या हॉलमधे स्थानापन्न झालो. पाच-पाच मिनिटांची मुलांसाठी भाषणे झाली. मकरंदने सर्व मुलांना उभे राहून पोलिसांना सॅल्यूट ठोकायला लावला. मला ही पध्दत आवडली. कारण मला स्वतःलाही पोलिसांबद्दल सुप्त भीती वाटते. पोलीस ठाण्याला भेट देणे, ठाणे प्रभारीला भेटणे, खाऊवाटप हा नवाच अनुभव होता. तिथून बाहेर पडताना दोन पोलीस दोन वेगवेगळ्या रंगांचे चॉकलेटचे डबे घेऊन उभे होते. दर वर्षी कुटरूच्या या मोठ्या मैदानामध्ये सर्व आश्रमशाळांतील मुले-मुली जमून कवायत, योग, समूहगीत, नृत्य असे कार्यक्रम होतात. बिजापूरमधील मुख्य मैदानावरही अनेक कार्यक्रम होतात. परंतु कालच बातमी आली होती की, छत्तीसगडचे राज्यपाल बलरामदास टंडन यांचे वयोमानापरत्वे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

मुलींनी दोन नृत्ये बसवली होती आणि त्यांना बिजापूरला जाऊन परेडनंतरच्या मुख्य कार्यक्रमात ती करायची होती. परंतु सर्व रद्द झाल्याने मुली आणि नृत्याची तयारी करवून घेणाऱ्या त्यांच्या उत्साही शिक्षिकाही नाराज झाल्या होत्या. पोलीस ठाण्याहून आम्ही आश्रमात परतलो. फरसाण आणि बुंदी वाटप झाले. मीही नाश्ता करून निघायच्या बेतात होते. मकरंदने तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी शेजारील करकेली गावाच्या पोर्टाकेबिनला भेट द्यायचे ठरवले होते. तेवढ्यात निरोप आला की, बिजापूरहून नवे जिल्हाधिकारी कुंजाम, एस.पी. डीएफओ आणि छत्तीसगडचे वनमंत्री महेश गागडाजी येत आहेत.

मधुकररावांनी ते येईपर्यंत थांबून जेवण करून जाण्याची गळ मला घातली. थोड्याच वेळात लवाजम्यासोबत जिल्हाधिकारी आणि मंत्री गागडाजी आले. मधुकररावांच्या बोलण्यातून मला कळाले होते की, गागडाजी याच भागातील आहेत आणि सलवा जुडूममधून त्यांचे नेतृत्व पुढे आले आहे. त्यामुळे ते नेहमीच कुटरूला आणि खासकरून पंचशील आश्रमाला भेट देत असतात. गागडाजी मुला-मुलींशी अगदी जिव्हाळ्याने, खेळकरपणे संवाद साधत होते. मकरंदची ओळख करून घेऊन त्याचेही कौतुक केले. मुंबईहून कोणी येऊन या मुलींना ओरिगामी शिकवतो, याचे त्यांना खरेच कौतुक वाटले. मुलींनी मग पाहुण्यांना कागदाची बनवलेली फुले, शो-पीस भेट म्हणून दिले.

एसपींनी खेळाचे विविध साहित्य आणले होते, ते वाटप केले. गागडाजींनी आठवण सांगितली की- हा पंचशील आश्रम सुरू झाला, तेव्हा पैशांअभावी बंद होण्याच्या स्थितीत आला होता. ते मधुकररावांना म्हणाले होते की, या मुला-मुलींना सरकारी वसतिगृहात पाठवून द्या. परंतु मधुकररावांनी जिद्दीने आश्रम चालवून त्याची गुणवत्ताही वाढवली. गागडाजी आणि सर्व ताफा मग जेवणासाठी विश्रामगृहाकडे रवाना झाला. मुले-मुली खूप थकून गेली होती. छोट्या मुलांची मारामारी, खोटी रडारड चालू होती. मुलांना गाणे म्हणायला पुढे बोलावले, तर अगदी लाजतलाजत मुले गात होती; परंतु मुली मात्र आत्मविेशासपूर्वक समोर येऊन देशभक्तिपर गाणी गात होत्या. जेवण करून मी परत निघायच्या तयारीला लागले. खूप दिवसांनी भरपेट जेवण केले होते.

अचानक मला घराची आठवण येऊ लागली. मकरंद आणि मी शाळेतील आठवणी एकमेकांना सांगत होतो. शाळेत झेंडावंदन झाले की, सगळे लक्ष खाऊवर असायचे. मधुकररावांना मकरंद रागावत होता की- ‘तुम्ही बिजापूरला येऊन रक्त आणि डोळे तपासून घ्या, उपचार सुरू करा, त्याशिवाय मी पुन्हा कुटरूला येणार नाही.’ मला तो दिवस खूप सुंदर भासत होता. पुढच्या वर्षी मी कुठे असेन, माहिती नाही; पण आज मी कुटरूमध्ये आहे हे माझे नशीब... अशा विचारांनी मनात गर्दी केली होती. मुली जेवायला बसल्या होत्या. त्यांचा निरोप न घेताच मी निघाले, नाही तर त्यांना पाहून माझा पाय तिथून निघाला नसता. मकरंद त्यांना ‘गांधी’ आणि ‘इंग्लिश-विंग्लिश’ हे दोन सिनेमे प्रोजेक्टरवर दाखवणार होता. मलाही त्यांच्यासोबत ते पाहायचा मोह होत होता, पण रुग्णालयात परत जाणेही महत्त्वाचे होते. परतीच्या मार्गावरही पाऊस चालूच होता.

ओढे-नाले भरभरून वाहत होते. मला गेल्या वर्षीचा बिजापूरमधील स्वातंत्र्यदिन सोहळा आठवत होता. जिल्हा रुग्णालयातील ध्वजारोहण झाल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून मैदानावरील मुख्य सोहळा पाहायला गेलो होतो. मंत्रीलोकांसोबत खझड अधिकारी आणि सोबत काळ्या कपड्यांतील, पांढरी टोपी घातलेले अय्याजसर होते. अय्याजसरांसाठीच आम्ही सर्व डॉक्टर्स गेलो होतो. सरांना मी तेव्हा म्हणाले होते, ‘‘तुम्ही चश्म्यामुळे सुभाषचंद्र बोसांसारखे दिसत आहात.’’ अय्याजसरांच्या आठवणीने अजूनही रडू येते. गेल्या वर्षातील ताणतणाव, रुग्णालयातील समस्या, माझा अतिकाळजी करणारा स्वभाव, समस्येला तोंड न देता पळून जाण्याची वृत्ती या साऱ्या गोष्टी दूर करण्यासाठी त्यांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला होता, वेळोवेळी रागावून समजावले होते, शिस्त लावली होती. बिजापूर माझ्यासाठी घरासारखे झाले होते, आता मात्र मला एकटे पडल्यासारखे वाटत होते.

गेल्या काही दिवसांत कामाचा ताण वाढला होता. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी गैरसमजुतीतून भांडण केले होते. मी थकून गेले आहे. काही दिवस सुट्टी घेऊन घरी जावे वाटते आहे. मी हे सारे निभावू शकेन का, अशा शंकांनी मन घेरून टाकले आहे. बिजापूरमध्ये पोहोचले, रस्ते पावसाने स्वच्छ धुऊन निघाले होते. इडछङ चे नेटवर्क गेले आहे, जे नेहमीच 15 ऑगस्टच्या आधी आणि नंतर दोन-दोन दिवस जाते. पावसाने इंद्रावती दुथडी भरून वाहते आहे.

Tags: बिजापूर जलसंधारण रोजगार हमी प्रगती अभियान ध्वजारोहण कुटरू 15 ऑगस्ट yeshwarya rewdakar bijapur jalsandharan rojagar hami pragati abhiyan dhwajarohan kuturu 15 august weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी