लोकांचे प्रश्न, त्यांची सुख-दु:खे, त्यांची दुखणी-खुपणी कधी माझी झाली; कळले नाही. पण आता इथून मागे फिरणेही शक्य नाही. माझे अनेक मित्र-मैत्रिणी विविध राज्यांत सामाजिक समस्यांवर काम करत आहेत. त्या सर्वांनीच खासगी आयुष्यातील असंख्य मोहांना, ऐषारामांना, स्वकेंद्रित आयुष्याला केव्हाच तिलांजली दिलेली आहे. मग ती बिहारमध्ये काम करणारी डॉ.स्मिता असो, आसाममधे काम करणारा डॉ.नीलेश असो, गनियारीच्या जनस्वास्थ सहयोगमधील डॉ.पांडुरंग, डॉ.नेहा, डॉ.अमित असो; उत्तरखंडला पहाडी भागात काम करणारा डॉ.हिमांशु असो किंवा व्यसनमुक्तीवर काम करणारा डॉ.धरव शहा व त्याची स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली, स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी डॉ.तरु जिंदाल असो. असे असंख्य तरुण-तरुणी आहेत, जे या सामाजिक भानातून वेगळा रस्ता निवडत आहेत.
आमच्या जिल्हा रुग्णालयात येत्या काही दिवसांत डायलिसिसची नवी सुविधा सुरू होते आहे. बिजापूरसारख्या ठिकाणी, जिथे दोन वर्षांपूर्वी काहीही सुविधा नव्हत्या, तिथे ‘डायलिसिस’ सुरू होणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे आयोजिले आहे. डायलिसिस इतकीच एक महत्त्वाची सुविधा आमच्याकडे आहे, जिने आत्तापर्यंत अगणित लोकांचे जीव वाचवले आहेत, ती म्हणजे ब्लड बँक. मूळच्या उत्तर प्रदेशच्या, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, डॉ.वर्षनेय या पॅथालॉजिस्ट म्हणून ही जबाबदारी सांभाळतात.
विशाखापट्टणमच्या डॉ.मंजरी या मायक्रोबायोलोजिस्ट म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. माझ्या ओपीडीमध्ये एक अठरा वर्षांची मुलगी येते ‘सरस्वती’. पाळीच्या वेळेस खूप जास्त रक्त जात आहे, अशी तक्रार सांगते. मला तिचा चेहरा आठवतो. सात महिन्यांपूर्वी ती रुग्णालयात आली होती. एक महिन्यापासून तिची पाळी चालू होती, जास्त रक्तस्राव होत होता आणि तिला चक्कर येणे, थकवा असा त्रास सुरू झाल्याने तिच्या घरचे तिला रुग्णालयात घेऊन आले होते. तिच्या वडिलांनी आणि काकाने तिला एका म्हाताऱ्या आजीसोबत भरती केले आणि ते नातेवाइकाकडे राहायला निघून गेले. इथे पाळीत जास्त रक्तस्राव होणाऱ्या मुली, स्त्रिया खूप उशिरा उपचार घेण्यासाठी येतात. कारण या भागात समज आहे की, कोणी तरी काळी जादू केली की असे होते. त्यामुळे पाळीच्या समस्यांसाठी मांत्रिकाकडे इलाज करणे, जडी-बुटी खाणे असे प्रकार करण्यात वेळ जातो.
अनेक दिवस अंगावर काढल्याने, सततच्या रक्तस्रावाने हिमोग्लोबिन कमी होत जाते. त्यात जर सिकल सेल आजार असेल, तर समस्या आणखी वाढते. मी तिला तपासले, तेव्हा तिचे रक्त खूप कमी असल्याचे मला लक्षात आले. लगेच तिचे रक्त तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट आला तेव्हा कळले की, तिचे हिमोग्लोबिन फक्त दीड ग्रॅम आहे. तिचे नाडीचे ठोकेही जलद गतीने पडत होते. इतक्या कमी रक्तामुळे तिच्या हृदयावर ताण येऊन तिचे हृदय बंद होण्याचा धोका होता. आमच्या रुग्णालयात तेव्हा तिच्या रक्तगटाचे रक्त नसल्याने आणि तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याने, मला तिला जगदलपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिच्यासोबत केवळ एक म्हातारी आजी होती, जिला माझे बोलणे काहीही समजत नव्हते.
त्यामुळे मला सर्व गंभीर स्थिती आणि जिवाला असणारा धोका त्या अठरा वर्षांच्या मुलीलाच समजावून सांगावा लागला. मला स्वतःला कसे तरीच वाटत होते की, एका अठरा वर्षांच्या मुलीला- तिला रक्त नाही मिळाले तर ती मरू शकते- हे सांगावे लागतेय. ती मात्र न घाबरता, न रडता, धीराने सारे ऐकत होती. नंतर पुढे तिचे काय झाले, ती जगली की नाही; मला काहीच माहिती नव्हते. आज सात महिन्यांनी तीच मुलगी माझ्या पुढ्यात होती. तेव्हापेक्षा थोडी बरी पण अजूनही तोच रक्तस्रावाचा त्रास, अंगातील कमी रक्त आणि जलद गतीने पडणारे ठोके. रक्त तपासले, तर हिमोग्लोबिन फक्त दोन ग्रॅम. ‘जगदलपूरला त्या वेळी किती रक्त दिले?’ असे विचारले तर फक्त एकच बाटली रक्त तिथे चढवले गेले होते, जे की तिला तीन ते चार बाटल्या रक्ताची गरज होती.
जगदलपूरला आजूबाजूच्या सर्व भागातून अतिगंभीर रुग्ण येत असल्याने तेथील आरोग्यव्यवस्थेवर खूप जास्त ताण येतो, त्यातून तिथेही डॉक्टर्सची कमतरता. तिला मी तत्काळ भरती करून घेतले आणि ठरवले की, हिला आता रक्त देऊन पूर्ण बरी केल्याशिवाय कुठेही पाठवायचे नाही. हिला कमीत कमी तीन बाटल्या रक्ताची गरज आहे, तिच्या पुरुष नातेवाइकांना बोलावून रक्ताची सोय करायला सांगितले.
आणखी एक गर्भवती महिला ‘सोमली’- जिला सिकल सेल हा आजार आहे आणि कावीळ होऊन, दोन बाटल्या रक्त देऊनही, तिचे हिमोग्लोबिन केवळ पाच ग्रॅम आहे- तिला अजून किमान दोन बाटल्या तरी रक्त द्यायला हवे. याच सोमलीची गर्भवती बहीण- जिचेही नाव सोमलीच आहे आणि- तिलासुद्धा सिकलचा आजार आहे, तिलाही एक बाटली रक्ताची गरज आहे. अजून एक रुग्ण- सात महिन्यांची गर्भवतीपि हल्यांदाच रुग्णालयात आली. सोनोग्राफीकरून लक्षात आले की, तिच्या पोटात जुळे आहे. रक्त फक्त सहा ग्रॅम. माझी सहकारी डॉ.आकृतीकडेही रक्ताची गरज असलेली एक रुग्ण भरती आहे. अशा रोज किती तरी गंभीर रक्तक्षय असलेल्या रुग्ण येत राहतात.
जिल्हा रुग्णालयाची ब्लड बँक या भागातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. निरोगी लोकांचे रक्त घेऊन, त्यावर सर्व तपासण्या करून ते देण्यायोग्य करणे, ते सुयोग्य स्थितीत तीन महिन्यांसाठी साठवणे, गरज असताना तत्काळ पुरवठा करणे- या सर्व गोष्टी केवळ ब्लड बँकेमुळे इथे शक्य होतात आणि त्यामुळे दर महिन्याला शे-दोनशे रुग्णांचे जीव वाचतात. रक्तक्षय असलेली गर्भवती असो, किंवा जोखमीच्या प्रसूतीमुळे रक्तस्राव होऊन गंभीर स्थितीत असलेली माता असो किंवा अतिशय कमी रक्ताचे बाळ असो किंवा अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असो; मलेरिया, डेंगू यामुळे कमी झालेले रक्त असो किंवा आणखी विविध आजारांनी भरती असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज असो- सर्वांना आमची ब्लड बँक जीवदान देते.
तसेच विविध शस्त्रक्रियेसाठीही रक्ताची गरज असते. या सोईमुळे आम्ही इथे सर्व प्रकारच्या, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही बिनदिक्कत करू शकतो. अजूनही रक्त प्रयोगशाळेत बनवता येत नाहीये. कोणी तरी रक्त द्यावे लागते, तेव्हा ते कोणाला तरी मिळू शकते. नेहमी आम्ही रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त द्यायला लावतो; जी पद्धत सर्वत्र, शहरातही आहे. आम्हाला इथे समस्या येते की, बऱ्याचदा आमच्या गर्भवती स्त्रीसोबत म्हाताऱ्या महिला असतात किंवा सोळा-सतरा वर्षांची मुलगी असते, ज्या रक्त देण्यायोग्य नसतात. कधी तिचा नवराही स्वतः कुपोषित असतो. अशा वेळेस रक्ताची समस्या खूप भेडसावते. अनेक वेळा नातेवाईक बिलकुल तयार होत नाहीत रक्त द्यायला. ‘मुझे कमजोरी आ जायेगी’ असे म्हणून सरळ नकार देतात. मग त्यांना भीती दाखवावी लागते, रागवावे लागते की- ‘तुम्हारी पेशंट मर जायेगी’, जे खरेच असते.
रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान किंवा नंतरच्या दोन-एक दिवसांत जीव गमावलेल्या स्त्रियांची अनेक उदाहरणे इथे सापडतात. किंवा मग ‘जगदलपूर ले के जाना पडेगा’ असे म्हटले की, ते कसे तरी रक्त देण्यासाठी कोणाला तरी घेऊन येतात. थोडेफार सुस्थितीत असलेले लोक तर सरळ म्हणतात, ‘पैसे ले लो, लेकिन हम खून नही देंगे. आप ही व्यवस्था करो खून की.’ मग मी त्यांना सरळ सुनावते, ‘आप खुद के रिश्तेदार के लिए खून नही देना चाहते, फिर बाहर के लोग आपके लिए खून क्यों दे?’ त्यांना पुन:पुन्हा समजवावे लागते की, रक्त कोणालाही तयार करता येत नाही, ते आपल्यालाच द्यावे लागते; तरच ते रुग्णाला मिळू शकेल. जेव्हा कधी माझ्याकडे गंभीर रुग्ण भरती असतात आणि रक्ताची तातडीची गरज असते, तेव्हा दिसेल त्या व्यक्तीला मी रक्त मागत फिरते; मग तो आमचा स्टाफ असेल, वाहनचालक असेल, डॉक्टर असेल किंवा एखाद्या खात्यापित्या घरच्या रुग्णाचा नवरा असेल. काही सुशिक्षित लोक, जवान रुग्णालयाने मोफत सेवा दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून रक्तदान करतात. आमचे सर्व डॉक्टर्स नियमितपणे रक्तदान करतात. स्टाफपैकी सर्वांचे रक्तगट आम्हाला माहिती आहेत. गरज पडली की फोन करून बोलावून घेतो रक्तदानासाठी. आमच्या नर्सेसने जे दुर्मिळ रक्तगट आहेत, अशा व्यक्तींचे फोन नंबर घेऊन ठेवले आहेत. तातडीची गरज असेल, गंभीर परिस्थिती असेल; तेव्हा सगळीकडे निरोप पसरतो, मग पटापट फोन करून रक्तदात्यांना बोलावले जाते. एकदा माझ्या अशा एका गंभीर रुग्णासाठी दोन तासांत चार बाटल्या रक्त गोळा झाले.
बिजापूरमधे CRPF च्या एकूण पाच बटालियन्स आहेत. तेथील जवान गरज असेल तेव्हा रक्तदान करतात. त्यांची रक्तदान शिबिरेही नियमितपणे होतात. बिजापूरमध्ये एक व्यावसायिक शिक्षण महाविद्यालय आहे, तिथून बरेचसे विद्यार्थी रक्तदान करायला येतात. काही व्यक्ती येऊन त्यांचे मोबाईल नंबर देऊन जातात की, कधीही कोणत्याही रक्तगटाचे रक्त हवे असेल तर सांगा, आम्ही मदत करू. अशीच एक गांधी नावाची व्यक्ती आहे. कधीही फोन केला की, ते हवे असलेल्या रक्तगटाची व्यक्ती शोधून घेऊन येतात. माझा मुंबईचा मित्र मकरंद दीक्षित बिजापूरला काही दिवस आला होता. आल्या-आल्या मी त्याला रक्त मागितले आणि त्याने लगेच रक्तदान केले. वरती विचारतोय, ‘एका वेळेस किती बाटल्या रक्त देऊ शकतो मी? मी चार-पाच बाटल्या देईन.’ त्याला समजावले, असे करता येत नाही. मग त्याचा पुढचा प्रश्न, ‘मुंबईवरून मी रक्त इथे पाठवू शकतो का?’ मग त्याला तेही समजावले की, ते शक्य नाही. त्याची या बिजापूरमधील रुग्णांप्रतीची तळमळ मनाला स्पर्श करून गेली. कुठे मुंबई, काय संबंध त्याचा या लोकांशी; तरी कसा येतो इतका कळवळा? आणि इथे काही लोक असे भेटतात की, स्वतःचा रुग्ण मरायला टेकला, तरी मख्ख चेहऱ्याने रक्तदानाला नकार देतात.
आजच माझ्या रुग्णांसाठी चार विद्यार्थी रक्तदान करायला आले, परंतु चारही जणांचे हिमोग्लोबिन कमी निघाल्याने, वजन कमी भरल्याने ते रक्त देऊ शकले नाहीत. चोवीस तास डोक्यात सतत फिरत राहते आहे, रक्ताची सोय कशी होणार. दुसऱ्या एक पेशंटचा नवरा स्वेच्छेने रक्तदान करायला तयार झाला. शेवटी एकदाची माझ्या हिमोग्लोबिनवाल्या दोन मुलीसाठी पहिल्या बाटलीची सोय झाली!
पंतप्रधान मोदी 14 एप्रिलला बिजापूर जिल्ह्यात येणार असल्याने, दिल्ली आणि रायपूरहून बऱ्याच टीम रुग्णालयाची पाहणी करायला रोज येत आहेत. आज राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या कार्यकारी निर्देशक डॉ.रजनी ‘उमंग’ला भेट द्यायला आल्या. मी आणि माझे दोन सहकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अरुण आणि डॉ.आकृती आम्हा तिघांकडून माहिती घेऊ लागल्या. इथे कुठल्या शस्त्रक्रिया होतात, कशा प्रकारच्या तपासण्या आणि उपचार होतात, कशा प्रकारचे रुग्ण येतात- याची सर्व माहिती ऐकून त्या आश्चर्याने थक्क होत होत्या. त्यांनी चांगल्या कामाबद्दल आमचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या कौतुकाने आज पुन्हा नव्याने जाणवले, हे बिजापूर आणि येथील आदिवासी लोक मला किती चांगल्या प्रकारची डॉक्टर आणि माणूसही बनवत आहेत. दुपारी माझा मित्र आणि सर्जन डॉ.नागुलन बोलवायला आला, रायपूरहून कोणी टीव्ही रिपोर्टर आमचे अनुभव रेकॉर्ड करायला आला आहे.
रिपोर्टर पंकज शर्मा नागुलानला प्रश्न विचारत होता, ‘‘सिटी लाईफ छोड के यहाँ कैसे आ गये? यहां काम करने मे क्या चॅलेन्जेस लगते है?’ वगैरे. डॉ.नागुलन चेन्नईचा. चेन्नईतील भरपूर पगाराची खासगी दवाखान्यातील ऑफर सोडून तो इथे आला आहे. मला माझा अनुभव आठवतो. डॉ.अय्याजसरांवर विश्वास ठेवून, घर आणि बार्शीतील खासगी क्लिनिक सोडून बिजापूरला येण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 10 दिवसांत काही समस्यांमुळे इथून निघून जायचा विचार डोक्यात आला, तेव्हा अय्याजसरांनी सांगितले होते, ‘‘अशी पळून जाऊ नकोस. तुला कसे काम हवे ते सांग, आपण तसे नियोजन करू या.’’ सरांनी विश्वासाने वेळोवेळी केलेली मदत, ज्यामुळे मी इथे समस्यांवर मात करत टिकून राहू शकले.
नागुलननंतर पंकजचे मलाही साधारणपणे तेच प्रश्न. तो वारंवार विचारत होता, ‘‘इथे काम करत असताना एकटेपणा, टेन्शन जाणवत नाही का?’’ आम्ही त्याला सांगत होतो, एक डॉक्टर म्हणून जिथे खरी गरज आहे, अशा ठिकाणी काम करणे हे आम्हाला कर्तव्य वाटते. आदिवासींसाठी काम करायला आवडते. शहराचे आकर्षण मुळीच नाहीये. निसर्ग आवडतो. इथे यायचा निर्णय आम्ही स्वतःहून घेतला आहे, त्यामुळे त्रास झाला तरी त्याचे काही वाटत नाही. जिल्हाधिकारी अय्याजसरांच्या सहकार्यामुळे, पुरवलेल्या सुविधांमुळे फार समस्या जाणवत नाहीत. तरीही पंकज हट्टाने पुन्हा विचारतोच, ‘‘फिरभी... कभी तो टेन्शन आता होगा...’’
तो भरपूर फिरलाय, कामानिमित्त माणसे-जग पाहिलेय; त्याला समजू शकते, आम्ही डॉक्टर्स असलो तरी माणूसही असतो. ‘डॉक्टर’ या लेबलपलीकडचा माणूस त्याला पाहता येतो. मी मग प्रामाणिकपणे सांगते, ‘‘हो. येतो एकटेपणा, घरची आठवण येते. पुण्याची, मित्र- मैत्रिणींची आठवण येते. कधी काही टेन्शनमुळे रडू आले तर, सोबत कोणी नसते. मित्र-मैत्रिणींना फोन करायला नेटवर्क नसते. पण मग आम्ही त्यावर उपायही शोधतो. मी खोलीत वारली पेंटिंग करते, पुस्तके जमवून लायब्ररी बनवते. इथे होस्टेलमध्ये आमची चाळ तयार झालीये, एकत्र राहून. सगळे एकत्र असतात. कधी कोणी चांगले काम केले की, डिनर पार्टीने ते यश साजरे केले जाते. बिजापूर शिकवते आहे आम्हाला एक चांगला माणूस बनायला. शहर, मोबाईल, मॉल, फेसबुक याच्या पलीकडेही काही जग असते, आनंदाचे मार्ग वेगळे वेगळे असतात, हे बिजापूर शिकवते आहे. आदिवासींसाठी काम करणे ही दुतर्फा देवाण-घेवाण आहे. जशी आम्ही त्यांना सेवा देतो आहे, तसेच त्या बदल्यात तेही आम्हाला चांगला माणूस बनवत आहेत.’’
पंकजला हवे असलेले उत्तर काय होते, माहीत नाही; पण त्याच्याशी बोलताना मीही हरवले. कधी कधी होतो मोह, हे सामाजिक भान सोडून देऊन जगावे जरासे बेफिकीर होऊन. स्वतःचे सुरक्षित वर्तुळ आखून त्यातच राहावे बंदिस्त. या वयात डेटिंग करावेसे वाटते. रोमांटिक गप्पा, जोडीदार, लग्न, मूल या गोष्टी हव्याशा वाटतात. पण काही क्षणच. लगेच भान येते, ते माझ्याच्याने नाही व्हायचे. जोडीदार हवाच वाटला, तर तो मला अशीच स्वीकारणारा हवा. खासगी आयुष्य राहिलेच नाही कदाचित. लोकांचे प्रश्न, त्यांची सुखदु: खे, त्यांची दुखणी-खुपणी कधी माझी झाली; कळले नाही. पण आता इथून मागे फिरणेही शक्य नाही.
माझे अनेक मित्र-मैत्रिणी विविध राज्यांत सामाजिक समस्यांवर काम करत आहेत. त्या सर्वांनीच खासगी आयुष्यातील असंख्य मोहांना, ऐषारामांना, स्वकेंद्रित आयुष्याला केव्हाच तिलांजली दिलेली आहे. मग ती बिहारमध्ये काम करणारी डॉ.स्मिता असो, आसाममधे काम करणारा डॉ.नीलेश असो, गनियारीच्या जनस्वास्थ सहयोगमधील डॉ.पांडुरंग, डॉ.नेहा, डॉ.अमित असो; उत्तरखंडला पहाडी भागात काम करणारा डॉ.हिमांशु असो किंवा व्यसनमुक्तीवर काम करणारा डॉ.धरव शहा व त्याची स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली, स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी डॉ.तरु जिंदाल असो. असे असंख्य तरुण-तरुणी आहेत, जे या सामाजिक भानातून वेगळा रस्ता निवडत आहेत.
गडचिरोलीला ‘सर्च’मध्ये असताना माझा मित्र अमृत बंगशी एकदा चर्चा करत होते. स्वतःच्या तत्त्वानुसार वाट निवडली की, त्यावर निर्धाराने चालायचे असते. त्यात मी एकटी पडेन कदाचित, पण ‘सर्च’मधे डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांच्याकडून मिळवलेली शिदोरी कधी गमवायची नाही. आयुष्यभर एकटीने मार्गक्रमण करावे लागले, तरी करेन; पण निवडलेली वाट सोडणार नाही. ‘सर्च’च्या निर्माण शिबिरातील मित्र, निखिलच्या आवाजातील माझे आवडते गाणे आठवत राहते नेहमीच.
इसलिये राह संघर्ष की हम चुने
जिंदगी असुओं में नहाई न हो
शाम सहमी न हो, रात हो न डरी
भोर की आँख फिर डबडबाई न हो...
- मेधा पाटकर .
Tags: ऐश्वर्या रेवडकर बिजापूर डायरी bijapur diary aishwarya revnkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या