खरे पाहता, ‘तंत्रज्ञान हे चांगले अथवा वाईट असत नाही.’ ते ज्या कारणासाठी वापरले जाते त्यावर ठरते. म्हणूनच याला ‘दुधारी तलवार’ असे म्हटले जाते. ऑनलाइन शिक्षण, त्याचा वापर व परिणाम यांवर जरूर आक्षेप आहेत. मतमतांतरे आहेत पण म्हणून हे टाळता येणार नाही. उलट ह्याच्या वापरामुळे निर्माण झालेले प्रश्न व यावर कशी मात करता येईल याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे ओळखूनच उपक्रमशील शिक्षकांनी ‘अति सर्वत्र वर्जते’ या सुवचनाचे भान ठेवत व याचा विवेकाने वापर करत गुणवत्तेला तंत्रज्ञानाची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे.
साधनाचा 15 जानेवारीचा अंक हाती आला. नेहमीच्या उत्सुकतेने हातात घेतला आणि संपादकीय पाहिले ते होते ‘विद्यार्थ्यांना सोडा, शिक्षकांना धरा!’. ‘संपादकीय’चे शीर्षकच असे होते की, हा अंक खाली ठेवणे शक्यच नव्हते. हे वाचल्यानंतर माझे मन भूतकाळात गेले. महाराष्ट्रात 23 मार्च 2020 पासून शाळा बंद झाल्या. सुरुवातीस हे संकट लवकरच हटेल आणि पुन्हा आपण पूर्वीसारखे आपले जीवन सुरू करू हा आत्मविश्वास होता. पण जसजसा काळ पुढे पुढे सरकू लागला तसतसे हे संकट अधिकच गहिरे होत गेले. पहिली लाट आली-गेली, दुसरी रुद्रावतार घेऊन आली ती गेली नाही तोच तिसरीची चाहूल लागली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. शालेय विद्यार्थ्यांचे म्हणाल तर गेल्या दोन वर्षांपासून ना नवे दफ्तर, ना नवीन वह्या, ना नवे मित्र. सगळीकडे फक्त अनिश्चितता. असे असले तरी कुठे तरी आशा होती की, एक-दोन महिन्यांत परिस्थिती बदलेल व पुन्हा शाळा सुरू होतील. पण प्रत्येक वेळी ही आशासुद्धा फोल ठरली.
ही परिस्थिती एकीकडे असताना मागील दोन वर्षांपासून मुलांचे शिकणे सुरू राहावे याचे छोटेमोठे प्रयत्न शिक्षकांकडून, शाळाकडून सुरू होते. ऑनलाइन शिक्षणास उत्तम प्रतिसाद हवा असेल तर ऑनलाइन शिक्षणात पालकांचा सहभाग कसा वाढेल यावर भर दिला पाहिजे हे गेल्या दोन वर्षांत प्रकर्षाने जाणवल्याने महाराष्ट्रातील शिक्षकांनी यावर भर दिला. कारण ऑफलाइन असलेला वर्ग ऑनलाइन करण्यासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित होते. प्रसार माध्यमांत ऑनलाइन शिक्षणाबाबत बरीच साधक-बाधक चर्चा सातत्याने होत राहिल्याने या पर्यायाकडे शिक्षकांबरोबरच पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात झाली. शासनस्तरावरूनही याचा जोरदार पाठपुरावा सुरू होता. शाळेकडून, शिक्षकांकडून सातत्याने याचा आढावा घेणे, सूचना देणे हे या काळात सुरू होते.
ऑनलाइन शिक्षण सुरू करत असताना शिक्षकांना अगदी प्रारंभिक स्तरापासून सुरुवात करावी लागली. मुलांना तंत्र समजावून सांगणे, पालकांना माहिती देणे, व्हर्चुअल शिक्षणासाठी आवश्यक असणारे ॲप पालकांच्या मोबाइलमध्ये स्थापित करणे, यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करून त्यास ऑनलाइन शिक्षणास तयार करणे, ही सर्व प्रक्रिया ग्रामीण भागातील शिक्षकांना पार पाडावी लागली. याचा परिणाम असा झाला की, ऑनलाइन वर्गाची संख्या व सक्रियता वाढू लागली. दैनंदिन अभ्यासाची देवाणघेवाण सुरू झाली. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ यापासून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाचे नवनवे मार्ग हाताळायला सुरुवात केली. ‘डिजिटल शाळा’ हा प्रवास शिक्षकांनी समाजातून मिळवलेली मदत- त्यास जिल्हा परिषदा, विद्यमान आमदार, खासदार व सामाजिक संस्था यांनी त्यांच्या निधीतून केलेली भरीव मदत, यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
गुणवत्तेला तंत्रज्ञानाची जोड देत असताना महाराष्ट्रातील शिक्षकांनी सोशल मीडियाचा केलेला वैशिष्ट्यपूर्ण वापर ही महत्त्वपूर्ण बाब या दोन वर्षांत नजरेत भरणारी आहे. ‘व्हॉट्सॲप’ म्हणजे वेळेचा अपव्यय, बिनकामाचा व्याप, डोक्याला ताप असा सर्वसाधारण समज समाजात रूढ झाला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या श्री एन.डी. पाटील या शिक्षकाने यास छेद देत ‘गणित मंडळ तासगाव’ या व्हाट्सॲप ग्रुप माध्यमातून गणिताच्या अभ्यासात हे कसे वापरता येईल हे दाखवून दिले आहे. कसे म्हणाल तर, समजा एखाद्याला गणिताबद्दल काही शंका असेल, ते सुटत नसेल तर ते या ग्रुपवर शेअर केले जाते. या ग्रुपमधील शिक्षक अगदी स्पष्टीकरणासह सोडवून या समूहावर देतात. ज्याला ती समस्या होती त्याला त्याचे उत्तर मिळते. विशेषतः पाचवी, आठवी व नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा गणितात असाही उपयोग होऊ शकतो हे या कल्पक शिक्षकाने दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर श्री पाटील यांनी यापुढे जाऊन यूट्यूबच्या माध्यमातून गणितातील मूलभूत संकल्पना, नियम व सूत्रे यांच्या अभ्यासासाठी यूट्युब चॅनेल सुरू करून गणित विषयाचे स्वनिर्मित व्हिडिओ त्यावर अपलोड केले आहेत. याचा वापर तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यतील अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षकांना होत आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यात कार्यरत असणारा असाच एक कल्पक शिक्षक तारीश आत्तार. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी झटणारा, त्यासाठी स्वत:च्या घरातच स्टुडिओ उभा करणारा, मुलांकडे मोबाइल नाहीत म्हणून हताश न होता ‘गल्ली मित्र’ ही अभिनव कल्पना राबवून मुलांच्या शिक्षणाची सोय करणारा उपक्रमशील शिक्षक. नवनवीन संकल्पना घेऊन सहज-सुंदर भाषेत मुलांना समजतील असे छोटे छोटे व्हिडिओ तयार करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ज्योती बेलवले व नाशिक जिल्ह्यातील वैशाली भामरे, मुलांच्या कलागुणाला वाव देणारा बीडचा सोमनाथ वाळके, बोलक्या बाहुल्यांच्या मदतीने मुलांच्या भावविश्वात शिरणारी अमरावतीची दिपाली बाभुळकर, शिक्षणातील तंत्रज्ञान वापरास चालना देणारा सोलापूरचा राजकिरण चव्हाण, स्वत:च्या हिमतीवर भारतातील नवोपक्रम विषयावर काम करणाऱ्या 'SIR Foundation' च्या विशाल नेटवर्कचे मुख्य आधारस्तंभ श्री बाळासाहेब वाघ, सिद्धराम माशाळे व हेमा शिंदे, तर संपूर्ण जगाला आपल्या कामगिरीने दखल घ्यायला लावणारा ‘ग्लोबल टीचर्स’चा मानकरी रणजित डिसले असो. अशी कितीतरी शिक्षकांची यादी देता येईल. या आणि इतर अनेक शिक्षकांनी ‘संकट हीच संधी’ मानून केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे.
थोडक्यात काय, तर समस्येवर तंत्रज्ञानाची जोड देऊन शोधलेला उपाय खरेच वाखाणण्याजोगा आहे. राज्यभर डिजिटल शाळांच्या वाढत्या संख्येमुळे व तंत्रस्नेही चळवळीमुळे शाळाशाळांत टेक्नोसॅव्ही शिक्षकांचे प्रमाण वाढले आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात होताना दिसून येत आहे. सर्वसामान्य पालकांच्या मुलांना डिजिटल शाळांमुळे संगणकीय शिक्षण घेण्यात मदत झाली आहे. या मुलांना संगणक हाताळायला व पाहायला मिळतो तो शाळेतच. कारण घरी असेलच असे नाही. अशा वेळी डिजिटल शाळांचे महत्त्व आणखीनच वाढते हे ओळखूनच डिजिटल शाळांच्या प्रसाराला शिक्षकांनी पालक, अधिकारी व पदाधिकारी यांच्या मार्फत हेतुपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्याला आता चांगले यश दिसते आहे.
खरे पाहता, ‘तंत्रज्ञान हे चांगले अथवा वाईट असत नाही.’ ते ज्या कारणासाठी वापरले जाते त्यावर ठरते. म्हणूनच याला ‘दुधारी तलवार’ असे म्हटले जाते. ऑनलाइन शिक्षण, त्याचा वापर व परिणाम यांवर जरूर आक्षेप आहेत. मतमतांतरे आहेत पण म्हणून हे टाळता येणार नाही. उलट ह्याच्या वापरामुळे निर्माण झालेले प्रश्न व यावर कशी मात करता येईल याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे ओळखूनच उपक्रमशील शिक्षकांनी ‘अति सर्वत्र वर्जते’ या सुवचनाचे भान ठेवत व याचा विवेकाने वापर करत गुणवत्तेला तंत्रज्ञानाची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे.
राज्य सरकारने दिलेला ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा मंत्र ध्यानी ठेवून शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून मुलांचे ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षण सुरू राहावे यासाठी झटणारा, मेहनत घेणारा, आलेल्या समस्येचा बाऊ न करता त्यावर मार्ग शोधणारा ‘माझे शिक्षण माझी जबाबदारी’ समर्थपणे पेलणारा ‘शिक्षक’ समाजाला नेहमीच वंदनीय आहे व राहील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या