डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालमधील नंदीग्राम या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराबाबत आपण व्यथित मनाने विचार करीत आहात, हे आम्ही जाणतो. आपल्यासमोर आलेल्या वृत्ताचा विचार करता आपली ही प्रतिक्रिया स्वाभाविकच आहे, परंतु बहुसंख्य वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमागील सत्य सांगण्यासाठी आम्ही आपणास मुद्दाम हे पत्र लिहीत आहोत. त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा असे आवाहन आपणास करीत आहे.

गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालमधील नंदीग्राम या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराबाबत आपण व्यथित मनाने विचार करीत आहात, हे आम्ही जाणतो. आपल्यासमोर आलेल्या वृत्ताचा विचार करता आपली ही प्रतिक्रिया स्वाभाविकच आहे, परंतु बहुसंख्य वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमागील सत्य सांगण्यासाठी आम्ही आपणास मुद्दाम हे पत्र लिहीत आहोत. त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा असे आवाहन आपणास करीत आहे.

1. नंदिग्राम येथे कोणत्याही विशेष आर्थिक क्षेत्राची अथवा कोणत्याही औद्योगिक प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम सुरू नाही. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल औद्योगिक महामंडळ आणि इंडोनेशियाच्या सलीम ग्रुप यांच्यातील संयुक्त सहकार्याचा करार, त्यानुसार करण्यात आलेला एक प्रस्ताव आणि त्याबाबतचा सर्व व्यवहार, अधिकृत सूचना काढून आठ महिन्यांपूर्वीच कायमसाठी मागे घेण्यात आलेला आहे. त्याची पूर्ण माहिती तेथील जनतेला सतत देण्यात आलेली आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेण्याचा कोणताही प्रयत्नदेखील तेथील सरकारने अथवा कोणत्याही संस्थेने आजपर्यंत कधीच केलेला नाही. तसे करण्याचा कधीही प्रश्नच नव्हता. कारण त्यासाठीची किमान कायदेशीर प्रक्रियादेखील तेथे कधीच सुरू करण्यात आलेली नव्हती. तेथे सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा, जमीन ताब्यात घेण्याचा काहीही संबंध नव्हता आणि नाही. 

2. जमीन संपादनासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू नाही आणि जनतेच्या विरोधामध्ये ती कधीही सुरूदेखील करण्यात येणार नाही, हे स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेले असतानादेखील जानेवारी 2007 पासून विशेष आर्थिक क्षेत्राबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून ममता बॅनर्जी आणि माओवादी सशस्त्र गटांनी तेथे हिंसाचार करण्यास आणि निखालस खोट्या बातम्या देण्यास सुरुवात केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक असणाऱ्या किंवा ममता बॅनर्जीप्रणित गुंडगिरीला पाठिंबा न देणाऱ्या सुमारे 2000 पेक्षा जास्त लोकांना प्रथम त्यांच्या गावांमधून दहशतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना त्यांच्या घराबाहेर निर्वासितांच्या आश्रयछावण्यांमध्ये रहावे लागत होते. 

तेथेदेखील त्यांच्यावर संघटितपणे हल्ली करण्यात आले. मार्च 2007 पर्यंत अशा निर्वासित छावणीतील 6 लोकांना या बाहेरून आणण्यात आलेल्या गुंडशक्तींनी ठार मारले. कित्येक गावांच्या भोवती खंदक खणून गावांमध्ये समांतर सरकार स्थापन करण्यात आले होते. सरकारी यंत्रणेचा गावांशी संपर्क तोडण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेरून आणण्यात आलेल्या संघटित गुंड शक्तींनी मारण्यास सुरुवात केली होती. ही परिस्थिती तेथे गेले 11 महिने टिकून आहे.

3. त्याबाबत ममता बॅनर्जीसहित सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन राजकीय सामंजस्य करण्यासाठी 21 बैठका घेण्यात आल्या, त्यापैकी बहुतेक वेळा त्यांनी असहकार्याची भूमिका घेतली. सरकारच्या प्रत्येक प्रयत्नाला ममता बॅनर्जीनी फक्त हिंसाचाराने आणि कांगावखोरपणानेच उत्तर दिले. त्याच्या परिणामी मार्चनंतर निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्यांची निरपराध नागरिकांची संख्या फक्त वाढत गेली. ती नोव्हेंबर 2007 पर्यंत 6000 वर पोचली. गेल्या 11 महिन्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 27 कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक ममता बॅनर्जी यांच्या गुंडांकडून आणि माओवाद्यांकडून मारण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात या परिस्थितीला कंटाळून आपापल्या घरी परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य नागरिकांच्यावर तुफान हल्ले करण्यात आले आहेत, तोच सध्या हिंसाचार आहे.

4. त्यामुळे येथे झालेल्या हिंसाचाराचे बळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आहेत. मात्र हल्लेखोर हे ममता बॅनर्जी यांनी आयात केलेले गुंड आणि माओवादी आहेत.

5. या पार्श्वभूमीवर आपापल्या घरांपासून कित्येक महिने विस्थापित झालेल्या लोकांना आपल्या गावातील घरांमध्ये जाता यावे, राज्य पोलिसांवर खोटे आरोप करण्याची संधी ममता बॅनर्जी तसेच अन्य संधिसाधू शक्तींना मिळू नये, म्हणून डाव्या आघाडीच्या सरकारने स्वत: केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण केले. त्याला विरोध केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी जाहीररीत्या केला. राखीव दलाला मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, आणि राखीव दलाला कोणत्याही मार्क्सवादी कार्यकर्त्याने अडविलेले नाही.

6. मेधा पाटकर यांच्यासमवेत करण्यात आलेल्या झटापटीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेधच केलेला आहे. त्याच्याशी पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नाही. 

7. मात्र गेले आठ-दहा महिने आपल्या घरांपासून विस्थापित करण्यात आलेल्या, भूसुरुंगापासून सर्व प्रकारच्या हिंसक हल्ल्यांना बळी पडलेल्या, मार्क्सवादी समर्थक नागरिकांबद्दल मेधा पाटकरांसहित कोणत्याही अन्य नेत्याने एक शब्ददेखील उच्चारलेला नाही, याचा विषाद वाटतो. तेथे कोणताही जमीन संपादनाचा प्रश्न उपस्थितच झालेला नव्हता, आणि आजदेखील नाही. ही वस्तुस्थिती त्यांनी कोणत्या कारणासाठी लोकांपासून लपवून ठेवली आहे, याचे कारण त्याच सांगू शकतील. 

माओवाद्यांच्या त्या विभागातील सशस्त्र कारवायांबाबत केंद्रीय पोलिसांची निवेदने, तिथे सापडलेली माओवाद्यांची शस्त्रे व साहित्य, त्याचप्रमाणे स्वत: माओवाद्यांच्या वतीने देण्यात आलेली निवेदने यांची दखल त्यांना का घ्यावीशी वाटलेली नाही? ते कोणत्या अहिंसक राजकारणात बसते, हे त्या स्वत:च सांगू शकतील.

8. बंगालमध्ये अशा प्रकारे क्रूर हिंसेच्या मार्गाने आणि सर्व लोकशाही प्रक्रियेला पायदळी तुडवून तेथील डाव्या आघाडीच्या सरकारला आव्हान देण्याचा प्रकार, माओवाद्यांना हाताशी धरून, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी अनेकदा केलेला आहे. त्याची सुरुवात त्यांनी केशपूर येथे काही वर्षांपूर्वी केली. त्यामुळे त्याला 'केशपूर पॅटर्न' असे नावदेखील पडले आहे. देशाच्या सर्व संरक्षण व्यवस्थेला भेदून सात वर्षांपूर्वी बंगालमधील पुरूलिया या जिल्ह्यात काही परदेशी विमानांनी पोत्यात भरून अत्यंत आधुनिक श्त्रा्ते टाकली. त्याची तक्रार त्याच रात्री राज्य सरकारने केंद्राकडे केली. त्याचा तपास केंद्रानेच करणे आवश्यक होते. 

त्यावेळी भाजपा आघाडीचे सरकार होते आणि लालकृष्ण अडवाणी गृहंमत्री होते. त्या गुन्ह्यांमध्ये पकडण्यात आलेले विमान आणि वैमानिक यांना कोणताही खटला न चालविता, ब्रिटनच्या विनंतीवरून याच भाजपा आघाडीच्या सरकारने सोडून दिले, त्यावेळी त्या शस्त्रांचा उद्देश डाव्या आघाडीच्या सरकारला सशस्त्र मार्गानी उद्ध्वस्त करणे हेच होते. त्यावेळी कोणत्याही संघटनांनी त्याचा साधा निषेधदेखील केलेला नव्हता. मुळात याच प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुमारे 1100 कार्यकर्त्यांना 1971 ते 1977 या काळात या माओवाद्यांनी त्यावेळच्या सिद्धार्थशंकर राय यांच्या सरकारच्या मदतीने ठार मारले होते. 1971च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रिगिंग केलेले होते. त्यावेळच्या या दैदिप्यमान लढ्याच्या परिणामीच बंगालच्या जनतेने डाव्या आघाडीला 1977 मध्ये प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेले होते. 

आज ज्या प्रकारची एकजूट सर्व माओवादी, हिंदु-मुस्लिम जमातवादी आणि तथाकथित लोकशाही समाजवादाची भाषा करणे वृत्तपत्रीय नेते, डाव्या आघाडीच्या सरकारच्या विरोधात एकत्र आलेले आहेत, त्याचप्रकारे ते 1957 मध्ये कॉ.नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या डाव्या सरकारच्या विरोधात एका ख्रिश्चन जातीयवादी संघटनेच्या आधारानेच रस्त्यावर आलेले होते. आणि त्याच्याच परिणामी केरळ सरकार केंद्र सरकारने 356 च्या कलमाचा वापर करून बरखास्त केलेले होते. ममता बॅनर्जी यांचे राजकारणातील स्थान आणि विश्वासार्हता गेल्या कित्येक वर्षांत शून्याच्यादेखील खाली गेलेली आहे. 

त्यांनी कायमच अत्यंत कांगावखोर आणि हिंसक राजकारणाचा पुरस्कार केलेला आहे. माओवाद्यांच्या मुडदेफरास राजकारणाला जनतेने केव्हाच फेटाळले आहे. झारखंडपासून देशात कित्येक ठिकाणी आपण त्यांच्या हिंसक राजकारणाची चव घेतलेली आहे. गेल्या सहा निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डाव्या आघाडीने जे काही यश मिळविले, शेतकऱ्यांसाठी जे काही काम करून दाखविले आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी, माओवाद्यासारख्या राजकीय शक्ती नैराश्याने ग्रासल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही थराला जाऊन, कितीही हिंसाचार करून तेथील सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा प्रकार त्या करीत आहेत.

9. भांडवलशाही चौकटीच्या मर्यादेतील डाव्या आघाडी सरकारची आणि डाव्या पक्षांची बंगालमधील नेत्रदीपक प्रामाणिक कामगिरी आपण जाणताच. भ्रष्टाचारापासून मुक्त असणारे विश्वासार्ह राजकीय नेतृत्व याच डाव्या पक्षांनी दिलेले आहे. लोकशाही समाजवादी विचारांचा वारसा सांगणाऱ्या सर्व पक्षांची गेल्या 25 वर्षांत शकले झाली. ते जवळपास काळाच्या ओघात लुप्त जाले. 

गेल्या 15 वर्षांत जगातील अनेक समाजवादी, साम्यवादी पक्षांची पडझड झाली. आक्रमक उजव्या राजकारणाने, आर्थिक धोरणाने आपले स्थान पक्के केले. मात्र भारतात डाव्या पक्षांनी देशातील किमान लोकशाही व्यवस्था आणि डाव्या कार्यक्रमाला वाचविण्याचे काम केलेले आहे. देशातील श्रमिक बर्गाच्या राजकीय ताकदीचा एकमेव प्रतिनिधी, हे डाव्यांचे देशातील स्थान आहे. आजवर जमातवादविरोधातील लढा, साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या धोरणांच्या विरोधात लढा, असे कित्येक सर्वसामान्य जनतेचे लढे त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेले आहेत. 

10. त्यामुळेच सामान्यांनी त्याचप्रमाणे मध्यम वर्गाने, बुद्धिवंतांनीदेखील भांडवलदारी माध्यमांमधून रंगविल्या जाणाऱ्या विपर्यस्त आणि मतलबी प्रचारी बातम्यांवर विश्वास ठेवू नये, त्या मागील वस्तुस्थिती समजावून घेऊन डाव्या शक्तींना बदनाम आणि कमकुवत करण्यातून कोणाचे हित साधले जाणार आहे, याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत आहे.

Tags: आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बुद्धिवंतांनी सिद्धार्थशंकर राय हिंसाचार लालकृष्ण अडवाणी भाजपा आघाडी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके