डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरे तर आज ढसाळांच्या मृत्यूनंतर त्यांची कविता जसजशी अभ्यासली जाईल  तसतसे हे लक्षात येईल की, तिला आंबेडकरवादी प्रवाहात किंवा साम्यवादी  प्रवाहात मारून-मुटकून बसविण्याची गरज नाही. विशिष्ट प्रवृत्ति-प्रवाहाचा  शिक्का कपाळावर मारून घेण्याची तिला गरज नाही. ती माणसाचे सूक्त गाणारी  निरंकुश, निर्भय कविता आहे. तिला विशिष्ट वाङ्‌मयीन संप्रदायात मिरविण्याची  हौस नाही. गरज असलीच तर ती अशा अनेक संप्रदायांच्या भाष्यकारांना आहे. सगळ्या सीमारेषा ओलांडून अवघ्या मराठी काव्यालाच नव्या वाटेवर आणून  सोडणारी ही कविता आहे.

नामदेव ढसाळ ह्यांच्या निधनाबरोबरच मराठी काव्याचे एक पर्व समाप्त झाले. गेली 40- 45 वर्षे सतत घोंगावणारे, काव्याच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करणारे, अनेक शक्यतांना जन्म देणारे वादळी व्यक्तिमत्त्व शांत झाले. एक व्यक्ती म्हणून त्यांनी जगलेल्या  बेफाम आयुष्याचा आणि कवी म्हणून केलेल्या अद्वितीय कामगिरीचा वेध घेणे इतके सोपे नाही. विशेषतः त्यांच्या राजकीय-सामाजिक व्यक्तिमत्त्वाचे, त्यांनी केलेल्या चळवळींचे, उग्र  आंदोलनांचे आणि अवाक्‌ करणाऱ्या तडजोडींचे, त्यांच्या ध्येयवादित्वाचे आणि  त्यांच्याविषयी सतत कुतूहल वाटणाऱ्या सर्वसामान्य पांढरपेशांसहित ज्या दलित शोषितांसाठी  त्यांनी लढा उभारला, त्यांनादेखील त्यांच्याबद्दल अविश्वास वाटत राहावा अशा घेतलेल्या राजकीय कोलांटउड्यांचे विश्लेषण करून त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व कसे होते, ते अगदी  ठामपणे सांगता येणे केवळ दुष्कर कार्य आहे. म्हणूनच ते टाळून इथे केवळ त्यांच्या  कवितेचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी काव्यात 1960 नंतर एकामागोमाग एक सामाजिक जाणिवांचे प्रवाह अवतीर्ण  झाले. अनियतकालिकांतील प्रक्षोभक कवितांबरोबरच दलित कविता, साम्यवादी कविता ह्या  प्रवाहांतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा प्रक्षोभ मोठ्या प्रमाणावर अभिव्यक्त झाला. नामदेव  ढसाळांनी काव्यलेखनाला सुरुवात केली, तेव्हा प्रस्थापित वर्णव्यवस्था आणि वर्गव्यवस्था  ह्यांच्याविरुद्ध मोठा उद्रेक झाल्याचे भासत होते. 1956 च्या धर्मांतराने जातिव्यवस्थेविरुद्ध  चाललेल्या लढ्याला आकार मिळाला होता, पण त्याच वेळी धर्मद्वेषाची नवी बीजेही पेरली गेली होती. देशातल्या साम्यवादी चळवळीने क्रांतीची नवी क्षितिजे शोषित वर्गाला दिसू  लागली होती. नवे लढे, नव्या चळवळी, नवी स्वप्ने, नव्या आकांक्षा ह्यांनी दुमदुमलेल्या काळात कृतिशील असणाऱ्या, जात-वर्ण-वर्ग ह्या सर्वच पातळ्यांवर नागवल्या गेलेल्या परंतु  चिखलासारख्या तळागाळातून उसळी मारून वर आलेल्या, बंडखोरी आणि विद्रोह नसनसांत  भरलेल्या ढसाळांनी पहिल्या पदार्पणातच काव्याचा अवघा आसमंत आपल्या कवितेने अगदी  भारूनच टाकला.

गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्रातील वर्ग आणि वर्णलढ्यांचा इतिहास पाहिला, तर एकीकडे  समूहचेतनेने भारलेला सामान्य कष्टकरी समाज आणि त्यातील सतीचे वाण घेतलेले नेते, त्यांनी चालविलेली आंदोलने व स्वीकारलेले हौतात्म्य असे चित्र- तर पुढे त्यातच शिरलेल्या  अपप्रवृत्तींनी अंतिमतः आलेली पराभूतता असे चित्र दिसते.  सर्वच चळवळींमध्ये सामान्य बुद्धीचे, स्वार्थपरायण, जात्यंताच्या गोष्टी करीत-करीत जात्यंधतेला आणि  नाण्यांच्या खणखणाटाला बळी पडलेले नेते व्यापक अपेक्षेच्या पायावर उभ्या असणाऱ्या चळवळींना शेवटी  जातिसाक्षेप सामान्य रूप देताना दिसतात. भांडवलशाहीवर  अधिष्ठित असणारा धनमत्त वर्ग आणि जातिविषयक  उतरंडीच्या आधारावर स्वतःचे स्थान टिकवणारा वर्ग ह्यांचे  व्यवहारवादी तत्त्वज्ञान आणि आपल्या वर्ग-वर्गाचे अस्तित्व  टिकविण्यासाठी चाललेले प्रयत्न क्षम्य नसले तरी समजून घेता येतात, पण त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या लोकसमूहाच्या  नेत्यांनी आपल्या स्वार्थापायी आपल्याच चळवळींना  लावलेला सुरुंग आकलनापलीकडचा आहे.

चळवळी  उद्‌ध्वस्त झाल्या आणि वर्णविषमता व वर्गविषमता अधिक  मजबूत झाली. पुरोगामी-प्रतिगामी, शोषित-शोषक ह्यांच्या  छावण्या आणि तंबू केवळ कल्पनेतच राहिले. प्रतिगाम्यांनी  आणि धनमत्तांनी अवघ्या अभाग्यांचे अश्रू आमच्याही  डोळ्यांत आहेत म्हणून किती कंठ दाटून आणले आणि  तथाकथित पुरोगामी क्रांतिवीरांनी आपले हात किती व कसे  ओले करून घेतले ह्यांचा ताळेबंद काढता येणे अशक्य झाले. या सगळ्या 40-50 वर्षांतल्या क्रांतिसूर्यांच्या  उदयापासून अस्तापर्यंतच्या सर्वच सामाजिक आणि राजकीय  स्थितीचे प्रतिनिधित्व नामदेव ढसाळांची कविता करते म्हणून  तिला एकूणच मराठी काव्यात अनन्यसाधारण स्थान प्राप्त  झाले. वर्णविषमतेबरोबरच वर्गविषमतेच्या तीव्र जाणिवेने नामदेव  ढसाळांचा विचारव्यूह व्यापला आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त  शाप घेऊन जन्मास आल्यामुळे त्या शापापोटी भोगाव्या लागणाऱ्या अनंत यातनांचे तर ते वाटेकरी आहेतच, पण त्या  यातना न भोगता त्याविरुद्ध आपल्या दलित बांधवांच्या  खांद्याला खांदा भिडवून त्यांनी कडवा लढा दिला आहे.

झुंजार व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर  आपल्या अस्तित्वाची चुणूक त्यांनी दाखविलेली असली, तरी मूलतः भावनिक पातळीवर सर्वहारा दलित वर्गाच्या मुक्तिलढ्याशी एका विशिष्ट कालखंडात अतिशय एकरूप झालेले ते व्यक्तित्व आहे. मनामध्ये सतत असणाऱ्या वर्गजाणिवेने काव्याप्रतीही  त्यांनी एक विशिष्ट पवित्रा घेतला आहे. या दृष्टीने ‘मूर्ख  म्हाताऱ्याने डोंगर हलविले’ या संग्रहात त्यांनी स्पष्ट केलेली  भूमिका लक्षणीय म्हणावी लागेल. प्रत्येक कलावंताला एक  वर्गचरित्र असते व आपण सर्वहारा दलित वर्गाचे कवी  असल्यामुळे आपल्याला ते आहे. आपली कविता या  वर्गाच्या सुख-दुःखाची गाणी गाणारी आहे, व्यक्तिनिष्ठेला  नाकारून समूहनिष्ठेचा अंगीकार केल्यामुळे या वर्गाच्या  जीवननिष्ठांशी ती समग्रपणे प्रामाणिक आणि एकरूप आहे; असे ढसाळांना वाटते.

आजवर शोषकवर्गाने बटीक  बनविलेल्या काव्यकलेपेक्षा आपली काव्यकला सर्वथा पृथक्‌  असून ती वर्गीय हिताच्या दृष्टीने निर्माण झाली आहे व  म्हणूनच आपण कविता लिहितो म्हणजे राजकीय कृतीच  करीत असतो, असे त्यांनी आवर्जून प्रतिपादले आहे. आपली  कविता वर्गीय हत्यार असल्यामुळे ज्या लोकांच्या कष्टातून  भारताची निर्मिती झाली आहे, ते लोकच आपले अटळ  श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या दुःख-दैन्याच्या मुळाचा आपली  प्रतिभा वेध घेते व त्यावर घाव घालते. त्यातून आपल्या  कवितेला पीळदार घाट येतो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या कवितेने सर्वहारा वर्ग त्वेषाने जागृत होईल, अशी  आकांक्षा बाळगून ‘पद्यपंक्तीच्या तरफेने जग उलथण्याची’ भाषाही त्यांनी बोलून दाखविली आहे.

या भूमिकेबरहुकूमच त्यांची संपूर्ण कविता निर्माण झाली  आहे असे नाही. तीव्र समूहनिष्ठा मनात बाळगणाऱ्या या  कवीची समग्र कविता व्यक्तीचे आणि समूहाचे चित्रण कमालीच्या व्यक्तिनिष्ठ पद्धतीने करते. त्यामुळेच समग्र मराठी  कवितेत सर्व बंधनांना पार करणारी स्वतंत्र ओळख तिला प्राप्त  झाली आहे. ‘गोलपिठा’ या पहिल्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता  विलक्षण त्वेषातून निर्माण झाली. मराठी काव्यनिर्मितीचे  सगळे संकेत या संग्रहातच ढसाळांनी धुडकावून लावले. त्यांच्या वाट्याला आलेले हे गोलपिठ्याचे जगही विलक्षणच  होते. विजय तेंडुलकर गोलपिठ्याच्या प्रस्तावनेत या जगाचे  वर्णन करतात, ‘‘पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा  हिशेबांनी नो मॅन्स लॅण्ड- निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो  तेथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.

हे जग आहे रात्रीच्या दिवसांचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या  खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून  उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि थडग्यांचे, दर्ग्यांचे आणि क्रूसांचे... हिजड्यांचे, हातभट्‌ट्यांचे. आध्यात्मिक कवाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने  वाहणाऱ्या ऊन चिकट रक्ताचे... स्मगलिंगचे, नागव्या  चाकूंचे, अफूचे...’’ अशा या जगाचे दर्शन ढसाळांनी तेथील बारकाव्यांसहित  घडविले आहे. ढसाळांचे हे आकलन मध्यमवर्गीय  संज्ञाकेंद्रातून जन्मास आले नाही. ती त्यांची सहानूभूती नाही; आत्मानुभूतीच आहे. क्षुद्र, क्षणभंगूर सामान्य जीवनाच्या  वाट्याला येणाऱ्या क्रूर गोष्टींचे आकलन अलिप्त पातळीवर  वावरत नाही. ते त्यांच्या अंतर्मनात घुसते. झपाटलेल्या, भांबावलेल्या मानसिक अवस्थेत अदम्य संतापासहित  विचारांचे चक्र वेगाने फिरू लागते. व्यवस्थेविषयीचा क्रोध  आणि तिरस्कार मनात उफाळून येतो. तीच त्यांची रसायनसदृश भावानुभूती होय.

आपल्या सगळ्या  विखारासहित ती काव्यात प्रगटते. ‘गोलपिठ्या’त ही प्रक्रिया  इतर संग्रहांपेक्षा अधिक तीव्रतेने घडून आली आहे. म्हणूनच ‘स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे?’ असा रोकडा  सवाल ते करतात. सतरा पिढ्यांची मूग गिळून पोसलेली  विटंबना म्हणजे लोकशाही हे सांगताना, ‘‘हाण सख्या तुझीच बारी । लोकशाही मेली तर डेंगण्यामारी,’’ असा आपला  अभिप्राय व्यक्त करतात. तथापि, सर्व संस्कृतीवर हैड्रोजन बाँब टाकून ती नष्ट करावी असे म्हणणारा हा कवी आपली  मानवतावादी जाणीव, ‘‘आभाळाला आजोबा अन्‌ जमिनीला  आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे। एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माण्सावर सूक्त रचावे। माण्साचेच गाणे गावे माण्साने,’’ अशा विलक्षण ऋजु पण  आवाहक शब्दांत व्यक्त करतो. तथापि, ढसाळांचा मूळ स्वर  क्रुद्ध आणि प्रक्षुब्धच आहे. वर्षानुवर्षे चाललेली ही  अंधारातील घुसमट, तिचे अनंत आकार प्रगट करताना  आपल्या आवाहक शक्तीचा लोळ तो सर्वदूर पसरवून देणाराच आहे.

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

मरेपर्यंत राह्यचे का असेच युद्धकैदी?

ती पाहा रे ती पाहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीय

माझ्याही आक्याने झिंदाबादची गर्जना केलीय

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,

आता या शहर-शहराला आगी लावीत चला

हा लोळ मुळात ज्या लोहपुरुषाने निर्माण केला, त्याचे  कृतज्ञतेने स्मरण करताना ते म्हणतात, ‘‘सूर्यफुले हाती  ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला। आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे’’ किंवा ‘‘हजारो वर्षे मी होतो खंगत। या गुहागुहांतल्या प्रचंड अंधारात। कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ। मी शिलागावीत जाणार आहे या पुढचा काळ.’’

‘गोलपिठा’ या संग्रहातील भाषा अशी रसरशीत आहे. ती  इतर दलित कवींच्या भाषेपेक्षा संपूर्ण वेगळी आहे. तिचे नाते  लघु-अनियतकालिकांतील कवींशी काहीसे जुळणारे आहे. महानगरी संवेदनेचा दंश या कवींसारखा ढसाळांनाही झाला  आहे. ढसाळांच्या अंगात त्या दंशाचे विष अधिकच भिनले  आहे. अपरिचित क्लिष्ट प्रतिमासृष्टीमुळे ‘फॅमिली रूम्स’, ‘ऑक्टोपसच्या संघटित जनानखान्याकडे’, ‘तिच्यासाठी  वास्तविकाची वाळवी’ इत्यादी कविता दुर्बोध झाल्या आहेत. डोबडी, धेडधायपोटळे, पांचट गवशी, मगरमच्छ पलिता, डिंग डांग धतिंग, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली गुडसे, डिलबोळ  इत्यादी शब्दांनी युक्त असणारी भाषा सामान्य रसिकांच्या  आकलनकक्षेपलीकडे जाते. त्यांच्या काही कवितांतील  संज्ञाप्रवाहाचा वेगही आकलनात विक्षेप निर्माण करणारा  आहे. या कवितांतील अश्लीलता विशिष्ट वास्तव  जीवनदर्शनासाठी अगदी अपरिहार्य असली तरी पुष्कळदा  तिचा अतिरेक होताना दिसतो.

परिवर्तनाच्या आवाहक  जाणिवा व्यक्त करताना मूलभूत अंगाने व परिपक्वतेच्या  सामर्थ्याने कवी पुढे सरकत नसून एका प्रतिक्रियात्मक  आवेगाचा पुनःपुन्हा आधार घेताना दिसतो. त्यामुळे अशा विचारदर्शनातील परिणामकारकता पुढे-पुढे ओहटू  लागल्याचे जाणवते. विद्रोहाचे विद्वेषी रंग सगळीकडे फासल्यामुळे सर्वंकष क्रांतिराचा रसिविचाकमनावर प्रभाव  पडण्यापेक्षा भावनिक उत्सर्गाचाच प्रभाव अधिक पडतो. ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’ या संग्रहात ही उद्दाम  भावविश्वता कमी झाली आहे. ‘गोलपिठ्यां’च्या विश्वापलीकडील वेदनेने तळमळणाऱ्या अधिक व्यापक विश्वाचा परिचय त्याला घडला असावा. या दरम्यान कवीच्या जाणिवेच्या कक्षाही अधिक व्यापक झाल्या. त्यामुळे  कवितांचे स्वरूप बदलले. इथे भावनिक अनुभूतीपेक्षा  वक्तृत्वावर आणि विधानांवर जोर अधिक आहे.

प्रस्थापित  सत्तेशी चाललेल्या संघर्षाचाही प्रभाव या कवितेवर आहे. त्यांच्या ‘कस्टडीतल्या कविता’मध्ये तुरुंगातला अनुभव  त्यांनी ग्रथित केला आहे. त्यांच्या मनातील साम्यवादी  जाणीवही याच कालखंडात वाढीस लागलेली दिसते. साम्यवादी तत्त्वे सहज शोधता यावीत एवढा त्यांचा सुनिश्चित  आकार या संग्रहात प्रगटला आहे; पण त्यातले काव्य मात्र  हरवले आहे. गद्य निबंधातून जोरकसपणे विचार मांडावेत तसे  या कवितांतून ते मांडले गेले आहेत. ‘आपण आपल्या मार्गाने  जात रहावे लोक काहीही बोलोत’, ‘हत्यारबंद’, ‘दोन रस्ते’, ‘कामगारबंधो’, ‘माझ्या काळ्या सावळ्या लाडक्या मादीस’, ‘पाब्लोच्या मरणाने आपण काय शिकलो?’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’ इत्यादी अनेक कवितांतून  विषमता, शोषण आणि भ्रष्टाचार यांचा आकार शोधताना, स्वतःशी किंवा कामगारांशी संवाद साधीत वर्गलढ्याचे  तत्त्वज्ञान कवी सांगताना दिसतो; पण या सगळ्यांशी त्याची  भावनिक एकरूपता झाल्याचा प्रत्यय मात्र येत नाही.

या सगळ्या कवितांना विस्कळित बौद्धिक प्रवचनाची कळा आली आहे. आपल्या काव्यातील व्यंजकता या दरम्यान कवीने पूर्णपणे गमावली आहे याचा विषादपूर्ण प्रत्यय या कवितांत येतो. ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी’ ही इंदिरा गांधींवरील दीर्घ कविता. बँकांचे  राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे सामान्यीकरण अशा एकामागोमाग एक घेतलेल्या निर्णयाने समाजवादाकडे  वाटचाल करणाऱ्या, पूर्व पाकिस्तानातल्या अन्यायाला  विश्वभर वाचा फोडत लीलया युद्ध जिंकणाऱ्या रणचंडिकेच्या व्यक्तिमत्त्वाशी झालेली एकतानता या दीर्घ काव्यात प्रगट  झाली आहे. ‘व्यक्तीवर कविता लिहायला मला आवडत  नाही’, असे म्हणत असताना या एकतानतेमुळे अपरिहार्यतेने  हे काव्य आकारास आलेले आहे. तिच्या राजकीय निर्णयातून  मूलतत्त्ववाद्यांविरुद्ध चाललेला तिचा लढा कवीला प्रतीत झाल्यामुळे,

तुझ्या युद्धाचा होम पवित्र आहे

सारी जनता ते रणकुंड धगधगत ठेवील

प्रियदर्शिनी तू होऊन बसली आहेस

आमच्या इतिहासातले एक अपरिहार्य पात्र
अशी तिच्याबद्दलची प्रामाणिक धारणा त्याने व्यक्त केली आहे. ह्या कवितेच्या निर्मितीनंतर पुढे आठ वर्षांनी आपल्या तत्त्वाखातर, देशाखातर पत्करलेले इंदिराजींचे हौतात्म्य आठवले तर

प्रियदर्शिनी-

तू जागृत रहा

रात्र वैऱ्यांची आहे

ह्या ढसाळांच्या ओळींचे द्रष्टे सामर्थ्य अधिकच तीव्रपणे  प्रतीत होते. ‘तुही यत्ता कंची’ या संग्रहात त्यांच्या चिंतनाच्या सीमारेषा  फारशा बदललेल्या नसल्या तरी अनुभूतीचे विचित्राकार प्रगट  झाले आहेत. ‘मूर्ख म्हाताऱ्याने...’मधील अति-बौद्धिक  झालेली कविता परत भावानुभूतीच्या प्रगटीकरणाकडे  वळलेली दिसते.

हे शब्दांनो, या ना इथे विश्रांतीला

पायांना चक्रे बांधून चिकार वणवण केलीत

जरा याही धडधडणाऱ्या हृदयाला पाहून घ्याना जरा याही धमणीचा रिदम ऐकून घ्याना

कदाचित तुमच्या वांझ गर्भाशयाला पालवी फुटेल

शब्दांनी असा हाकारणारा हा कवी पूर्वीच्या  संतापदग्धतेतून बाहेर पडून वात्सल्याची अनुभूती प्रगट  करताना दिसतो. अशा वेळी दारिद्र्यही अर्भकासारखे  छबुकले होते. ‘अल्पायुषी चंद्रप्रकाश’, ‘सैतानाबद्दल’, ‘लंगर’, ‘ल्हानुल्याची प्रार्थना’ इत्यादी कवितांतून कवीच्या  मनाचा तरल पातळीवर झालेला वावर प्रगट झाला आहे. ‘कामाठीपुरा’, ‘पिला हाऊसचा मृत्यु’, ‘संत फॉकलंड रोड’, ‘मौलाना’, ‘भेंडीबाजार’  इत्यादी कवितांच्या शीर्षकांवरूनच  ज्या अधोलोकाचा अनुभव ‘गोलपिठ्या’त त्यांनी शब्दबद्ध  केला होता, तोच अनुभव येथेही ते प्रकट करणार याची  जाणीव होते; पण आताच्या या अनुभवात तटस्थता वाढीस  लागली आहे. बाह्य विचारनुभूतीच्या असणाऱ्या दडपणामुळे ‘गोलपिठ्या’त शुद्ध वास्तवानुभूती साकार करण्यात त्यांना  जसे यश प्राप्त झाले तसे या कवितांत प्राप्त झाले नाही.

डॉ. आंबेडकरांवरील कविता हा या संग्रहाचा आगळा  विशेष आहे. आंबेडकर हे ढसाळांचे इतर दलित कवींप्रमाणेच ध्यासस्थान आहे. स्वप्नांचे  पडदे टरकावून आंबेडकरांच्या  सिंहनादात सामील होण्यासाठी सदैव उत्सुकलेल्या ढसाळांच्या आर्द्र आणि रौद्र मनांचे यथार्थ दर्शन या कवितांतून  घडते. ‘गांडू बगीचा’ आणि ‘खेळ’ या संग्रहांत तर त्यांच्या  प्रतिभेने फारच वेगवेगळी रूपे धारण केल्याचे दिसते. ‘गांडू  बगीचा’तील शैली लघु-अनियतकालिकांतील कवींच्या  शैलीशी पूर्णपणे जुळणारी आहे. 1975 मध्ये आपल्या  कवितेने सर्वहारा वर्ग त्वेषाने जागृत होऊन उठेल, अशी  आशा बाळगणाऱ्या कवीची ‘गांडू बगीचा’तील भाषा पांढरपेशांच्या नागरी संवेदनेला अशा रीतीने बळी पडली आहे की, पांढरपेशा विदग्ध रसिकांनाही आपली रसिकतेची पातळी  उंचावल्याशिवाय तिचा आस्वाद घेता येऊ नये.

मार्क्सला  प्रमाण मानणाऱ्या आणि ईश्वराला नाकारणाऱ्या ढसाळांच्या  भाषेत चैतन्यवादी संस्कृतीने रूढ केलेले इतके पारिभाषिक शब्द येतात की, त्यांच्या अंतर्मनात या संस्कृतीबद्दल  असणाऱ्या तीव्र द्वेषाबरोबर एक प्रकारचे छुपे आकर्षणही आहे की काय, असा संशय येतो. एकीकडे आध्यात्मिक  परिभाषिक शब्दांना बळी पडणारी त्यांची शैली दुसरीकडे  स्थितप्रज्ञ काळोख, मातीचे गर्भाशय, काळाची नागमोडी  घुमणारी नागीण, अस्तित्वाचे वासरू, कालचक्राची दीर्घ  नजर, वैश्विकतेचे शेत, जख्मी शांतता, निरागस कारंजे, नागडे  अनंत, यातनेचे लाक्षागृह, विजेचा आंधळा घोडा, सुरांचे  पोलाद, वस्तुजाताचा आंधळा समुद्र अशी नवकवींनाच  शोभणारी प्रतिमानिर्मिती करून आपल्या वर्गीय संवेदनेचे  मर्मच नष्ट करते. कदाचित ढसाळांच्या वर्गपरिवर्तनाने ही  त्यांना दिलेली देणगी असावी. अशी प्रतिमानिर्मिती ज्या  आशयामुळे निर्माण होते, तोही नवकवींच्या लक्ष्यहीन  भावावस्थेप्रमाणे संज्ञाप्रवाहाच्या नादात तरंगणारा असणार, हे उघडच आहे.

‘खेळ’ हा संग्रह अगदी जाणीवपूर्वक समस्त स्त्रीपुरुषांच्या कामविलासांना कवीने अर्पण केला आहे. ढसाळांचे सुरताचे भान मूलतःच अतिशय जागृत आहे. लिंगवाचक शब्द आणि प्रतिमा यांतून आपली एकूण अनुभूती  व्यक्त करणे, हा त्यांच्या कवितेचा सहजधर्म आहे. तथापि, या संग्रहात अशा शब्दप्रतिमांचा प्रकर्ष नाही. आपण व प्रेयसी यांच्यातील आदिम शिवशक्तिसमागमाचा अर्थ विविध  पातळ्यांवर कवी समजून घेत आहे व त्याच पातळीवर न  राहता वेगवान संज्ञाप्रवाहातून स्फुरणारे अनेक विचारतरंग सुरतसंवेदनेच्या कक्षेबाहेर जाऊन या कवितांत तो प्रगट करीत  आहे. ‘शुभदे तुझं नाव व्हीनस’ किंवा ‘मुंबई, मुंबई, माझ्या  प्रिय रांडे’ या दीर्घ कवितांतून असंबद्ध विचारांची अनेक आवर्तने कवीने घेतली आहेत. ‘‘लोकलयीची धाटणी  पकडून, कथा-कहाण्यांना रंग भरीत, शिष्टग्राम्यतेचे अजब  मिश्रण करीत, गद्यात्मकतेकडे झुकत जाणारी तरीही कविमनातल्या सर्व भावाशयांचे पदर तरलपणाने मांडत  कलात्मक पारदर्शित्वाला स्पर्श करणारी, ही प्रभावी दीर्घ  कविता आहे... आधुनिक शंबुकाची ही विद्रोही प्रार्थनाच आहे.’’ असा ‘मुंबई’ या कवितेवर केशव मेश्रामांनी आपला अभिप्राय नोंदविला आहे.

त्यांच्या ‘या सत्तेत जीव रमत नाही’ हा अगदी वेगळ्या  धाटणीचा संग्रह आहे. मानवाच्या एकूण अस्तित्वाचा विचार ह्या कवितांत अभिव्यक्त झाला आहे. मानवी जीवनातील अटळ वेदनाभोगाचा ते तलस्पर्शी विचार करीत असल्याचे जाणवते. त्यांच्या कडव्या आत्मपरीक्षणातून  आत्मपरिस्थितीची जाणीव

मी नाही लपवले सत्य

मी नाही चोरली जात  

जे काही होते आणि आहे ते मी खुल्लमखुल्ला  सांगितले

अंगावरील सर्व लक्तरे फेकून

मी झालो गर्भाशयातून बाहेर पडणाऱ्या लहानुल्या मुलासारखा नवा

अशा स्पष्ट आणि प्रांजळ शब्दांत व्यक्त होते. ‘मी मारले  सूर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ आणि ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ हे या शतकातल्या पहिल्या दशकातील कवितासंग्रह ढसाळांची कविता प्रत्येक टप्प्यावर कशी वेगवेगळी वळणे घेते, ते स्पष्ट करणारे आहेत.

‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ ह्या संग्रहात  बाबासाहेबांविषयीचा श्रद्धाभाव वेगवेगळ्या पद्धतीने  अभिव्यक्त झालेला आहे. विभिन्न काळात लिहिलेल्या या कवितांत बाबासाहेबांनी दिलेल्या प्रेरणा, त्यामुळे संघर्षशील  झालेली मने, कवीचे त्यांच्याशी असणारे आंतरिक नाते, त्यांच्याविषयी वाटणारी अपार कृतज्ञता ह्यांचे दर्शन घडते. आपल्या ‘लुंपेन प्रोलेतारी’ कवित्वाचे सर्व श्रेय त्यांनी  अतिशय प्रांजळपणे बाबासाहेबांनाच दिले आहे.

शब्द : कविता : अक्षरांची अभिवृद्धी. अभिव्यक्ती

तू अक्षरांचा धनी : मूकनायकांना तू शिकवली

भाषाः बाराखडी स्वर आणि व्यंजनाची मस्ती

हे आमच्या अक्षराच्या धन्या- आमच्या

प्रत्येक शब्दोच्चारावर तुझा संस्कार

आमच्या प्रत्येक ओळीओळींत तू सामावलेला

ओतप्रोत

‘निर्वाणाअगोदरची पीडा’ ह्या संग्रहात त्यांचे मन  विश्वचिंतेने संपूर्णपणे ग्रासलेले दिसते. काळ जणू काही विश्वनाशाकडे जात असल्याची प्रतीती ह्या संग्रहातील  कवितांतून येते. नव्या काव्यप्रवाहातील त्याच त्या  आशयाच्या सर्व चौकटींतून मुक्त होऊन विश्वमानवाचाच ते  विचार करीत असल्याची प्रतीती येते. विश्वव्यापक वृत्तीला  स्वतःचा मृत्यू भेडसावीत नाही, पण भविष्यातील अवघ्या  मानवजातीचाच होऊ पाहणारा संहार अधिक भयावह वाटतो.

त्यातून निर्माण होणारी चिंता ‘2025 साली आपण कुठे  असू?’ यासारख्या कवितेत फार प्रखरपणे प्रगट झाली आहे. ढसाळांची कविता समग्रपणे अभ्यासताना  हे लक्षात येते की, ते विकसनशील आणि परिवर्तनशील कवी आहेत. आपल्या समग्र काव्यलेखनात विचारांचा किंवा शैलीचा  साचा त्यांनी होऊ दिला नाही. त्यांच्या प्रत्येक संग्रहात आशयाभिव्यक्तीमध्ये कमालीचे परिवर्तन झालेले दिसून येते. संवेदनांचे नवनवे प्रदेश धुंडाळण्याच्या उपजत प्रवृत्तीबरोबर  जुना प्रिय असणारा साचा मोडण्याचे धैर्य आणि सामर्थ्य  असणारा कवी म्हणून त्यांचा निर्देश करावा लागेल. पण  यामुळेच ढसाळांच्या सर्वनकारवादी भूमिकेवर, अध्यात्मावर  आणि लैंगिक संवेदनाच्या बेछूट प्रदर्शनावर हल्ला चढवीत  दलित काव्यातून त्यांना हद्दपार करताना यशवंत मनोहर  म्हणतात, ‘‘ढसाळांची कविता आंबेडकरवादात न बसणारी आहे. ही प्रवृत्ती आंबेडकरवादी कवितेत शिरून प्रदूषण  माजवणारी, आंबेडकरवादी कवितेचा चेहरा विद्रूप करणारी आहे.’’ अर्थातच, मनोहरांच्या या भूमिकेमुळे दलित  काव्याच्या सीमारेषा बंदिस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरे तर आज ढसाळांच्या मृत्यूनंतर त्यांची कविता  जसजशी अभ्यासली जाईल तसतसे हे लक्षात येईल की, तिला आंबेडकरवादी प्रवाहात किंवा साम्यवादी प्रवाहात  मारून-मुटकून बसविण्याची गरज नाही. विशिष्ट प्रवृत्तिप्रवाहाचा शिक्का कपाळावर मारून घेण्याची तिला गरज नाही. ती माणसाचे सूक्त गाणारी निरंकुश, निर्भय कविता आहे. तिला विशिष्ट वाङ्‌मयीन संप्रदायात मिरविण्याची हौस नाही. गरज असलीच तर ती अशा अनेक संप्रदायांच्या भाष्यकारांना आहे. सगळ्या सीमारेषा ओलांडून अवघ्या मराठी काव्यालाच नव्या वाटेवर आणून सोडणारी ही कविता आहे.

ढसाळांच्या डोक्यावर पाय देऊन त्यांना पाताळात गाडण्याची  घाई करण्याचीही तशी काही आवश्यकता नाही. कारण पाताळात पाय घट्टपणे रोवूनच पृथ्वीतलावर उन्नत मानेने जगत  राहिलेला, स्वतःचे सोंग आणि इतरांचे ढोंग अनुभवूनही  अवघ्या विश्वालाच पोटाशी कवळू पाहणारा प्रक्षुब्ध प्रतिमेचा  हा कवी आहे. परात्मतेचा आणि वैश्विक दुःखाचा खरा अर्थ  समजल्याने एकात्मतेच्या आणि शांतीच्या शोधात व्याकूळ  अवस्थेत आपल्या भावनाविचारांची सतत चाललेली पिंजण, सगळा नटवा थाट टाळून अनावर आवेगाने प्रगट करणारा, अदम्य विजिगीषेचा हा आमच्या पिढीला अभिमान वाटावा  असा समर्थ कवी आहे.

Tags: अक्षयकुमार काळे नामदेव ढसाळांची कविता चिकित्सा भेंडीबाजार मौलाना संत फॉकलंड रोड पिला हाऊसचा मृत्यु कामाठीपुरा केशव मेश्राम यशवंत मनोहर निर्वाणाअगोदरची पीडा मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले माझ्या प्रिय रांडे मुंबई शुभदे तुझं नाव व्हीनस मार्क्स साम्यवादी बाबासाहेब आंबेडकर Bhendibajar Moulana Sant Fokeland Road Pila Housecha Mrutyu Kmathipura Keshav Meshram Yashwant Manohar NirvanaAgodarchi Pida Majhya Priy Rande Mumbai Shubhde Tujh Naav Vinas Marx Samyvaadi Babasaheb Ambedkar Murkh Mhataryaane Dongar Halvale Golpitha Akshaykumar Kale Kavita Namdev Dhasal Chikitsa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अक्षयकुमार काळे

डॉ. अक्षयकुमार काळे काव्यसमीक्षक असून त्यांचे त्यांचे ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’, ‘मर्ढेकरांची कविता : आकलन, आस्वाद आणि चिकित्सा’ इत्यादी प्रमुख ग्रंथांसहित एकूण आठ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. उत्तम समीक्षा लेखनासाठी दिला जाणारा शासनाचा नरहर कुरंदकर पुरस्कार व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके