डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आवाज नसलेल्यांच्या बातम्या करणे हे मूल्य सुरुवातीपासून पाळले!

‘टाइम्स इंटरनेट मीडिया’च्या सहायक संपादक अलका धुपकर एक पत्रकार म्हणून त्यांना जे करावंसं वाटतं, ते मन लावून करतात, अभ्यासूपणे आणि सचोटीनं करतात. कोकणात 20-22 वर्षांपूर्वी ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ म्हणून त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली, तिथपासून दै. पुणे सकाळ, महानगर, बेळगाव तरुण भारत, मुंबई सकाळ, मिड-डे, आयबीएन-लोकमत, मुंबई मिरर आणि आता टाइम्स समूह असा त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख आहे. ‘आयबीएन-लोकमत’मध्ये असताना ‘आजचा सवाल’ या चालू घटना-घडामोडींवरील चर्चात्मक कार्यक्रमाच्या अँकरिंगने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. मात्र वैशिष्ट्यपूर्ण बातम्या हे त्यांच्या पत्रकारितेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यासाठी त्यांना आजवर चामलीदेवी जैन, लाडली, रामनाथ गोयंका पुरस्कार आणि एशियन जर्नालिझम फेलोशिप अशा अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आलंय.

प्रश्न - तू कोकणातल्या एका मध्यम वर्गीय घरातली मुलगी. तुझ्या घरचं वातावरण खूप धार्मिक होतं. घरचं वातावरण आणि बाहेरचं जग यांच्यामध्ये अंतर्विरोध आहेत, असं केव्हा लक्षात आलं?

- माझ्या गावाचं नाव पिंगळी गुढीपूर. कुडाळ तालुक्यात (जिल्हा सिंधुदुर्ग) हे गाव आहे. माझं घर धार्मिक आहे. वडील नेरूरच्या शाळेमध्ये क्लर्क होते आणि ते पौराहित्याचंही काम करायचे. मीपण सगळ्या धार्मिक गोष्टी करायचे. टिपिकल मध्यम वर्गीय घरांमध्ये सण, समारंभ, त्यासोबत येणारी कर्मकांडं, लग्नं आणि त्या निमित्तानं येणारी गेट टुगेदर्स, असा खूप मोठा धार्मिक परंपरेचा भाग असतो! तो आमच्याकडेही असायचा. माझ्या लहानपणी आमच्या घरामध्ये काही लोकांसाठी वेगळी भांडी असायची. काहींना घरात प्रवेश नसायचा, काहींना स्वयंपाकघरात नसायचा. काहींना अंगणापर्यंतच असायचा, तर काहींना देवघरात नसायचा. महिलांवर बंधनं होती.

हे सगळं मला ठळकपणे जाणवायला लागलं अकरावी-बारावीला गेल्यावर, खरं तर महाविद्यालयात गेल्यानंतर. तोपर्यंत घर, कुटुंब, आई-बाबा आणि नातलग हेच माझं विश्व होतं. पण अकरावी-बारावीत असताना मी नव्या लोकांना भेटले. राज्यशास्त्राच्या टोपलेसरांनी मला नव्या जगाची ओळख करून दिली. त्याच काळात वाचायला लागले, प्रश्न पडायला लागले. महाविद्यालयात इतर लोक जे बोलायचे, त्याचे विषय खूप वेगळे होते. अनेकांनी पुस्तकं वाचलेली होती. त्याचे संदर्भ त्यांच्या बोलण्यात यायचे. राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना, समाजसुधारक, राजकीय विचारवंत, तत्त्वज्ञ यांचे ओघवते उल्लेख होते. काही ठिकाणी व्यवस्थित संदर्भ होते. त्यातून मला कळलं की, आपल्याला माहीत नसलेलं खूप मोठं आणि वेगळं जग आहे.

एक गमतीशीर गोष्ट अशी की, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. तिथं सर्व जातिधर्मांची मुलं होती. आमची मैत्री होती. आम्ही डबे एकत्र खायचो. छान वातावरण होतं. तेव्हा असं कधी जाणवलं नाही की, वेगळं जग असेल वगैरे. तेव्हा माझ्याकडे ‘भटजींची मुलगी’ किंवा ‘गुरुजींची मुलगी’ असंच बघितलं जायचं. पण मदतीसाठी अनेकांना आमचं घर खुलं असायचं. बाबांची खूप वेगवेगळ्या वर्गांतल्या, वेगवेगळ्या समूहांतल्या लोकांशी मैत्री होती. माझे आई-बाबा तसे लवचीक स्वभावाचे होते. पण मला माझे बाबा कायम ‘कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी’ वाटतात. त्यांनी मला सगळं करू दिलं. त्या काळात मला जे नवीन दिसत होतं, मी जे काही करत होते, निर्णय घेत होते, त्यात त्यांनी मला कधी थांबवलं नाही. आमचे कधी वाद झाले नाहीत. ते कर्मठ नव्हते. आपण असं म्हणू शकतो की, भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे ते त्यांना हवं तसं जगले. त्यांना हवं ते कर्मकांड त्यांनी केलं. तो त्यांच्या श्रद्धेचा, स्वातंत्र्याचा विषय होता.

प्रश्न - म्हणजे आई-बाबा ज्या कर्मठ तत्त्वांना धरून जगले, आयुष्यभर वागले, ती कर्मठ तत्त्वं त्यांनी कधीही तुझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला नाही?

- कधीच नाही. ते आता नाहीत म्हणून मी हे सांगत नाहीये. पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला, तेव्हा मी पहिल्यांदा घराबाहेर राहायला लागले. घराबाहेर पडताना आम्ही सगळीच भावंडं आई-बाबांना नमस्कार करायचो, देवघरात जाऊन देवांपुढे हात जोडायचो. मला आता नेमकं आठवत नाही, पण या काळात मी आई-बाबांना नमस्कार करणं बंद केलं आणि देवघरात जाऊन किंवा बाहेरून देवाला नमस्कार करणंही. ते तेव्हा नाराज झाले, पण त्याचा त्यांनी कधी इश्यू केला नाही. मला ते कधी म्हणाले नाहीत की, मी चुकीचं वागतेय किंवा मी हे का केलं पाहिजे. तसं मला काही आठवत नाही. त्यांना वाईट वाटलं असेल, पण त्याचा काही इश्यू झाला नाही.

आता मला असं वाटतं की, मी इतक्या कठोरपणे का वागले आई-बाबांशी? जरी देवाला नाही, तरी आई-बाबांना नमस्कार केला असता, तर काय बिघडलं असतं? पण ते वय ‘नाही, मी माझं बदललेलं वागणं दाखवणार’, असं होतं. हे मी अनेक वर्षं केलं. आता मला असं वाटतं की, त्यांनी एवढं सगळं केलं माझ्यासाठी, मी कशाला नाराज केलं त्यांना? पण हा आत्ताचा विचार आहे.

प्रश्न - महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तू दै. ‘सकाळ’ची ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ म्हणून काम करायला सुरुवात केलीस. ते काम कसं मिळालं आणि तो अनुभव कसा होता?

- अकरावीत असताना मला कळलं की, पत्रकारितेचा कोर्स असतो. बाकीच्याही बऱ्याच गोष्टी कळल्या. म्हणजे आयएएस, राजकारणी, पीआयएस बनू शकतो. पण मला असं वाटलं की, मला पत्रकार बनायचंय. कारण मी ते काम चांगल्या पद्धतीनं करून शकेन. बारावीपर्यंत माझं ते नक्की झालं. आमच्या गावी ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ ही वर्तमानपत्रं एक दिवस उशिरा यायची. त्या काळी ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये खूप करिअर ओरिएंटेड जाहिराती असायच्या. त्याशिवाय मी वेगवेगळी मासिकं वाचायचे. त्यातली माहिती समजून घ्यायचे. त्यातून मला कळलं की, पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेचा कोर्स आहे. बारावीला 70-72 टक्के मार्क मिळाले, माझ्या महाविद्यालयात मी पहिली आले. मग आम्ही थेट पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. पण तिथं कळलं की, पदवीनंतर प्रवेश मिळतो. रानडेमधून निघताना आम्हांला असं सांगण्यात आलं की, तुम्ही पदवीसाठी राज्यशास्त्र हा विषय घेतला तर त्याचा फायदा होईल. पण तो कुडाळ, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या ठिकाणी नव्हता, फक्त बांदा महाविद्यालयात होता. म्हणून मग मी तिथं बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याच वर्षी दै. ‘सकाळ’मध्ये विद्यार्थी प्रतिनिधीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. तेव्हा अरविंद शिरसाट सावंतवाडीला ‘सकाळ’चे ब्यूरो चीफ होते. त्यांच्या ऑफिसात जाऊन मी अर्ज भरला. ‘कोल्हापूर सकाळ’चे संपादक अनंत दीक्षित यांनी मुलाखत घेतली. माझी निवड झाली.

बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी वेंगुर्ल्याला खर्डेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी सकाळी साडेचारला घरातून निघायचे. आमच्या ओळखीचे एक जण कुडाळला होते. त्यांच्या दुकानात सायकल ठेवायचे. सातची एसटी होती. तिने वेंगुर्ल्याला महाविद्यालयात जायचे. दुपारी साडेबाराच्या एसटीने कुडाळला यायचे. ‘सकाळ’च्या ऑफिसला जायचे. तिथं अर्जुन राणे, प्रशांत पोळकर, प्रमोद ठाकूर असे सगळे पुरुष सहकारी होते. त्यांच्यामध्ये मी एकटीच मुलगी. पण त्यांनी मला खूप मदत केली. खर्डेकर महाविद्यालयातले शिक्षक, ग्रंथालयातील कर्मचारीवर्ग यांनीही खूप मदत केली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. जत्रा-यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक गोष्टी खूप जवळून कव्हर केल्या.

प्रश्न - रानडे इन्स्टिट्यूट आणि ‘पुणे सकाळ’चा अनुभव कसा होता?

- रानडे इन्स्टिट्यूटमधला सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे मला मिळालेले मित्र! आता दै. ‘दिव्य मराठी’मध्ये असलेली दीप्ती राऊत माझी बॅचमेट. ती त्या कोर्सला पहिली, तर मी चौथी आले. अशी बरीच नावं आहेत. आम्ही खूप चर्चा करायचो. त्यामुळेच मध्यंतरी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारिता विभाग हलवण्याचा बेत हाणून पाडला गेला, त्याचा मला फार आनंद झाला. त्या वास्तूचं स्वतःचं असं महत्त्व आहे. मी मराठी कोर्सला होते. तिथं माझ्यापेक्षाही खूप सामान्य घरांतून मुलं आलेली होती. त्यामुळे ते एक सांस्कृतिक केंद्र आहे. तिथं माझ्यावर बातमीचा संस्कार झाला. राज्यशास्त्रात पदवी घेतली होती खरी, पण मला डावं, उजवं, फंडामेंटल हे काही कळत नव्हतं. ते सगळं तिथं कळलं.

आम्ही बातम्या कव्हर करण्यासाठी पुण्यात प्रचंड फिरायचो. तेव्हा मी ‘सकाळ’मध्येही काम करत होते. नुकताच ‘युवा सकाळ’ सुरू झालेला. त्यात जरा सविस्तर लिहिता यायचं. मंदार कुलकर्णी त्याचं काम पाहायचे. खूप वेगवेगळ्या विषयांवर तरुणांशी बोलून लिहिण्याची संधी तेव्हा मंदार आणि बागूल सरांनी दिली. रमेश डोईफोडे सर तेव्हा पुण्याचे ब्यूरो चीफ होते. त्यांच्या हाताखाली मी काम करायचे. ते टेरर होते. त्यांची खूप भीती वाटायची. ते पत्रकांवरून बातम्या लिहायला बसवायचे, आणि ते मला अजिबात आवडायचं नाही. मला फील्डवर जाऊन बातम्या करायला आवडायच्या. माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. चव्हाणचं जाधव व्हायचं किंवा काना-मात्रांच्या चुका व्हायच्या. त्यामुळे लोकांच्या तक्रारी यायच्या. एक दिवस डोईफोडे सर मला न्यूजरूममध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं- ‘‘या मुलीला आजपासून कुठलंही काम द्यायचं नाही. ही खूप चुका करते. जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत तिला ही शिक्षा आहे.’’ पण या सगळ्यांतून बातमी नीट लिहिणं, समजून घेणं, हे शिकायला मिळालं.

प्रश्न - सकाळनंतर तू थेट आयबीएन-लोकमतमध्ये आलीस का?

- ‘पुणे सकाळ’ सोडल्यानंतर काही दिवस मी घरी होते. त्यानंतर ऑक्टोबर 2003च्या दरम्यान मुंबईत आले. सगळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाऊन नोकरीसाठी अर्ज केले. तेव्हा दै. ‘महानगर’मध्ये निखिल वागळे सरांनी नोकरी दिली. त्यानंतर मी दै. ‘बेळगाव तरुण भारत’मध्ये काही काळ काम केलं. तिथं आरोग्य, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण या विषयांची बातमीदारी केली. उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या काही विभागांच्या कॉर्डिनेशनचंही काम केलं. तिथंही माझ्या खूप चुका व्हायच्या. कारण मी तशी नवखीच होते, शिकत होते. तेव्हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला झाला होता. तो ज्यांनी केला, त्यातल्या मराठवाड्यातल्या काही तरुणांच्या गावांमध्ये जाऊन रिपोर्ताज केला. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. वीज पडून मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू झाले होते. सुनील तांबे सरांनी मला तो विषय सुचवला. त्यावर रिपोर्ताज केला.

पण नंतर ‘बेळगाव तरुण भारत’ची सगळी मॅनेजमेंट बदलली. त्यामुळे ते काम सोडलं. मग मी काही काळ फ्री-लान्सिंग केलं. ‘साप्ताहिक सकाळ’साठी, ‘परिवर्तनाचा वाटसरू’साठी काही लेख लिहिले. त्या काळात ‘साप्ताहिक सकाळ’साठी केलेली स्टोरी बरीच गाजली. मुकेश अंबानींचा रायगडमध्ये एसईझेड येणार होता. त्याला प्रचंड विरोध होत होता. ती स्टोरी चांगली झाली. त्यामुळे मला ‘मुंबई सकाळ’मध्ये नोकरी मिळाली. तिथं मी आरोग्य क्षेत्र बघायचे, भरपूर बातम्या करायचे. ‘सकाळ टुडे’ या पुरवणीत काम करायचे.

दरम्यान ‘मिड-डे’ या इंग्रजी टॅब्लॉइडला ‘हेल्थ रिपोर्टर’ हवा होता. किरण तारे या मित्रानं मला सांगितलं की, तू प्रयत्न का करत नाहीस? मी केला. निवड झाली. पण तेव्हा मिड-डे खूप सेलिब्रेटी ओरिएंटेड होता आणि माझं क्षेत्र सार्वजनिक आरोग्याच्या बातम्या करणं, हे होतं. त्याकडेच माझा जास्त ओढा होता. त्यामुळे मी तिथं पूर्णपणे मिसमॅच होते. मग मी ती नोकरी सोडायचं ठरवलं. पुढं काय करायचं माहीत नव्हतं. ‘मिड-डे’मध्ये दीपक लोखंडे पोलिटिकल ब्यूरो चीफ होते. त्यांनी सांगितलं, ‘‘राजदीप सरदेसार्इंचं मराठी चॅनेल येतंय, तू प्रयत्न का करत नाहीस?’’ मी म्हटलं, ‘‘चॅनेलमध्ये जशा मुली दिसतात, तशी मी दिसत नाही. मला मेकअप वगैरे लावायचा नाही. मला पत्रकारिता करायचीय.’’ ते म्हणाले, ‘‘नाही, नाही, राजदीप सरदेसार्इंचं चॅनेल आहे. तू विचार कर’’. मग मी त्याचे संपादक निखिल वागळे सरांना भेटले. त्यांनी माझी स्क्रीन टेस्टही घेतली नाही. ती झाली असती तर मी नक्कीच फेल झाले असते.

प्रश्न - तुझी स्क्रीन टेस्ट होऊन तू फेल झाली असतीस तरी तुला आयबीएन-लोकमतमध्ये घेतलंच असतं. तो टीव्ही जर्नालिझममधला खूप चांगला प्रयोग होता. त्याची सुरुवातीची टीम वागळे सरांनी खूप विचारपूर्वक निवडली होती. वर्तमानपत्रांत सरकारी पद्धतीची जी हायरारकी असते, ती तिथं नव्हती. गुणवत्तेच्या जोरावर वागळे सरांनी प्रत्येकाला संधी दिली. आयबीएन-लोकमतमध्ये तू सलग आठ-नऊ वर्षं खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलंस, बातमीदारीपासून ते ‘आजचा सवाल’सारख्या डिबेट शोचं अँकरिंग करण्यापर्यंत. त्याबद्दल काही?

- विद्यार्थी प्रतिनिधी असताना ग्रामपंचायतीच्या, जिल्हा परिषदेच्या बैठका कव्हर केलेल्या होत्या. तिथंच मला सांस्कृतिक घटना-घडामोडींचं महत्त्व कळलं. शेती तर आमच्या घरीच होती. ‘महानगर’मध्ये मी ‘वर्ल्ड सोशल फोरम’पासून विविध प्रकारचं काम केलं. त्यानंतर ‘बेळगाव तरुण भारत’मध्ये पत्रकार म्हणून माझा खऱ्या अर्थानं दृष्टिकोन घडला असं मी म्हणेन. ‘मुंबई सकाळ’मध्येही मी खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. या सगळ्यांचा उपयोग झाला तो आयबीएन-लोकमतमध्ये. वर्तमानपत्रांपेक्षा न्यूज चॅनेलचा प्रभाव आणि पोच अधिक असते. टीव्हीवर दिसत असल्यामुळे तुम्ही लोकांच्या आठवणीत जास्त काळ राहता. तिथली कामाची पद्धतीही खूप वेगळी होती. पण लोकांना असं वाटतं की, माझी आयबीएन-लोकमतमधली नोकरी हीच पहिली आणि शेवटची! अजूनही मला विचारलं जातं की, तुम्ही पत्रकारिता का सोडली? मी कंटाळते उत्तरं देऊन. आयबीएन-लोकमतच्या आधीपण मी पत्रकार होते, नंतरपण पत्रकार आहे.

मात्र हे खरं की, आयबीएन-लोकमतमध्ये मी पत्रकारितेचे सर्व गंभीर प्रकार शिकले. तिथं आम्हां सगळ्यांचं शास्त्रीय ट्रेनिंग झालं होतं. बातमीसाठी जाताना संपादकाने मला कधीही सांगितलं नाही की, याला टीआरपी मिळाला पाहिजे वगैरे. आवाज नसलेल्या लोकांच्या बातम्या केल्या पाहिजेत किंवा जे लोक विकास प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत, त्यांच्या बातम्या आपण प्राधान्यानं केल्या पाहिजेत, ही पत्रकारितेची मूल्यं मी पहिल्यापासून पाळत आले होते, ते मला तिथंही करायला मिळालं.

प्रश्न - अगदी ‘आयबीएन-लोकमत’मधले वागळे सरांचे ‘ग्रेट भेट’ आणि ‘आजचा सवाल’ हे दोन कार्यक्रम खूप गाजले, अल्पावधीतच लोकप्रिय झाले. नंतरच्या काळात ‘आजचा सवाल’ करण्याची जबाबदारी तुझ्याकडे आली. तो कार्यक्रम तू खूप चांगल्या पद्धतीनं केलास, त्याचा लौकिक कायम ठेवत... आजही अलका धुपकर म्हटलं की, लोक पहिल्यांदा ‘आजचा सवाल’ करणाऱ्या का? असंच विचारतात. पण हा कार्यक्रम करताना सुरुवातीला दडपण वाटलं होतं का?

- मला अजूनही आठवतं की, वागळे सर सुट्टीवर असताना त्यांनी अचानक ‘आजचा सवाल’ करायला सांगितला. त्या दिवशी उच्च शिक्षण किंवा शालेय शिक्षण या संदर्भातला विषय होता. त्याच्या आधी एक सांगितलं पाहिजे की, बातमीदारी करत असताना मी, सुवर्णा दुसाने आणि विनोद तळेकर आठवड्यातून तीनदा अर्ध्या अर्ध्या तासाचं बातमीपत्र सादर करायचो. आता बीबीसीला असलेली योगिता लिमये तेव्हा सीएनएन-आयबीएनला होती. मी तिला म्हणाले, ‘‘मला अँकर बनायचं नाहीये.  पण आता मला आठवड्यातून एकदा बुलेटिन करावं लागणार. मला बातमीदारीच खूप आवडते.’’ तेव्हा योगिताने मला सांगितलं, ‘‘टीव्ही पत्रकारितेमध्ये जेवढी कौशल्यं शिकता येतील, ती शिकून घे. नाही म्हणू नकोस.’’ ते मी ऐकलं.

पण तरीही मनावर दडपण होतं की, जो ‘आजचा सवाल’ वागळे सर करत आहेत, तो आपल्याला करायचाय, त्यांच्या जागेवर बसायचंय. लोक आपली त्यांच्याशी तुलना करणार. प्रत्यक्षात घडलंही तसंच. अनेक जण मला म्हणायचे, ‘‘तुला हसायला काही प्रॉब्लेम येतो का? इतकी गंभीर का असतेस?’’ पण मला नाही हसावंसं वाटायचं तेव्हा. माझी आवाजाची पट्टीही जरा वरची लागायची. त्याबद्दलही वागळे सर मला सांगायचे. त्यावर मला खूप काम करावं लागलं.

प्रश्न - आयबीएनमध्ये असतानाच बातमीसाठी तू रायगड तालुक्यात गेली होतीस, तेव्हा तुला मारहाणही झाली होती?

- हो, मोतीराम चाया पाटील हा एका राजकीय पक्षाशी संबंधित नेता आहे. त्याच्याबाबत गावकऱ्यांची तक्रार होती. तो सहकारी संस्था, त्यातले पैशांचे व्यवहार पाहायचा. पण आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवली की, तिला बगल द्यायचा. त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी न्यायालयात तक्रारही दाखल केली होती. ती बातमी कव्हर करण्यासाठी आम्ही गेलो. गावकऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. मग मी त्याची बाजू समजून घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. पण तो बाहेरच आला नाही. त्याच्या घरातून निघालो, तेव्हा त्याने गावातल्या महिलांना मी आणि कॅमेरामन संदीप पवारवर हल्ला करायला पाठवलं. आम्हांला मारहाण झाली. त्यात संदीपचं लॉकेट, माझा दुपट्टा आणि आयबीएनचा बूम हरवला. त्यांनी आमचा कॅमेराही फोडला. पुढे त्या केसमध्ये काहीच झालं नाही. स्थानिक हितसंबंधांमुळे पोलिसांनी नीट तपास केलेला नव्हता. त्यामुळे हा खटला आपण पुढे चालवायचा नाही असं आम्ही ठरवलं. मात्र तो अनुभव भयानक होता.

प्रश्न - आयबीएन-लोकमतनंतर तू थेट इंग्रजी पत्रकारितेकडे वळलीस. ‘मुंबई मिरर’मध्ये गेलीस.

- ऑक्टोबर 2007मध्ये मी आयबीएन-लोकमत जॉइन केलं, फेब्रुवारी 2015ला सोडलं. या मधल्या काळात खूप गोष्टी बदलल्या. फेसबुक आलं आणि त्यानं आपलं जग व्यापलं. व्हॉट्‌सॲप, टि्वटर आलं. ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ हीच ‘रिॲलिटी’ बनत चालली होती. 2014ला तर जगच बदलून गेलं. त्यामुळे मी प्रयत्न करत होते की, आता आपल्याला काय वेगळं करता येईल मी आरोग्य क्षेत्राची बातमीदारी करत होते तेच क्षेत्र पाहणाऱ्या एका पत्रकार मैत्रिणीनं सांगितलं, ‘‘ ‘मुंबई मिरर’मध्ये जागा आहे.’’ मी तिथं गेले. तेव्हा मुंबईकेंद्रित एका टॅब्लॉइड वर्तमानपत्रात गेले म्हणून अनेकांनी नाकं मुरडली होती. ‘‘पदावनती करून घेतलीस,’’ असंही ऐकवलं. ‘‘दुसरं एखादं चॅनेल का जॉइन केलं नाहीस,’’ असेही सल्ले दिले गेले. पण मला वाटतं, माझा निर्णय खूपच योग्य होता. कारण त्यामुळे मला ‘मुंबई मिरर’च्या मीनल बघेल या धर्मनिरपेक्ष, पारदर्शक, निर्भीड आणि उत्तम संपादकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

प्रश्न - थोडासा टिपिकल प्रश्न. मराठी पत्रकारितेतून थेट इंग्रजीत जाताना भीती नाही का वाटली? त्यातही टाइम्ससारख्या मोठ्या माध्यमसमूहात जाताना...!

- नाही, कारण मी आधी ‘मिड-डे’मध्ये काम केलं होतं. आयबीएन-लोकमतमध्ये असतानाही नेटवर्क-18च्या लोकांशी मेल करताना वा बोलताना इंग्रजीतूनच संपर्क साधावा लागायचा. त्यामुळे थोडाफार आत्मविश्वास होता. अर्थात कॉन्व्हेंटमध्ये शिकून इंग्रजी पत्रकारितेमध्ये आलेला एखादा पत्रकार जशी बातमी लिहील, तशी माझी कधीच असणार नाही. तेवढी मास्टरी यायला काही वर्षं जावी लागतील. पण जर्नालिझम इज ऑल अबाउट कम्युनिकेशन्स. आपण जनतेशी महत्त्वाची माहिती कम्युनिकेट करतो. मला असं वाटतं की, माझ्याकडे जे काही सांगण्यासारखं आहे, ते माझ्या भाषिक कौशल्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला फार अडचण आली नाही.

मी अजिबात परफेक्ट नाही, पण मला नवनव्या गोष्टी शिकायला आवडतात. चुका होत असतील, मात्र माझा हेतू चांगला असतो. इंग्रजी ही माझी पहिली भाषा नाही, हे मी नाकारू शकत नाही. ती मी शिकतेय. पण हेही तितकंच खरं की, मी कधी आळस करत नाही.

प्रश्न - गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून तू पत्रकारिता करत आहेस. 2014नंतर पत्रकारिता पूर्णपणे बदलून गेली आहे. लॉकडाउनच्या काळात आणि कोविड महामारीनंतर तर ती अजूनच बदलली आहे. वर्तमानपत्रं, टीव्ही वाहिन्या ज्या मार्गानं चालल्या आहेत, त्याबद्दल काय वाटतं?

- निराशा वाटते. आपण कितीही म्हणत असलो की, मी टीव्ही बघणार नाही, त्यापेक्षा नेटफ्लिक्स, ओटीटीवर काहीतरी चांगलं बघेन, पुस्तक वाचत बसेन किंवा ऑफिसचं काम करत बसेन. हा पर्याय माझ्याकडे आहे, पण भारत देशातल्या सर्व गोरगरिबांपुढे तो नाही. टीव्ही मीडियाला ‘मास मीडिया’ यासाठीच म्हटलं जातं की, तो खूप प्रभावशाली मीडिया आहे. सध्याच्या काळात टीव्हीची पत्रकारिता खरोखरच रसातळाला चालली आहे. सगळेच टीव्ही पत्रकार वाईट आहेत, असं नाही. मात्र हल्ली रोज प्रोपगंडा चालवला जातो. याआधी काय होतं? तुम्ही कुणाचीतरी बाजू घेणं, सुहानुभूतीदार असणं हे चालायचं. याआधी पत्रकारांवर आरोप झाले नाहीत का? पं. नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी यांच्या काळात असं काही झालंच नाही का? कवितेवर, कलेवर कधी बंधनच आलं नाही का? आत्ताच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे आलं आहे का? तर तसंही अजिबात नाही. हे पूर्वीपण होतं. आपल्या देशात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना घडूनही लोक गप्प बसतात. आणि यामध्ये टीव्ही माध्यमांनी, टीव्ही पत्रकारांनी मोठी भूमिका बजावलेली आहे. नावं घ्यावी तेवढी कमी आहेत. ‘न्यूज लाँड्री’ची मनीषा पांडे आपल्या शोमधून या सगळ्यांची नावं घेत शाळा घेत असते.

2014च्या आधीही आपल्या देशात संघपरिवाराचे, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक नव्हते का? होते. पण आज प्रत्येक घर, मित्रपरिवार आणि कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांची विभागणी झालीय. त्यामुळे देशही विभागला गेलाय. आणि हे सगळं करण्यात माध्यमांचा साधन म्हणून वापर करण्यात आलाय, येतोय. मला असं वाटतं की, काळ कठीण आहे, परीक्षा बघणारा आहे. पण निराश होऊन फक्त वैयक्तिक आयुष्यावर फोकस करण्याऐवजी ते करत राहणं- तो भलेही खारीचा वाटा असेल- हे माझं काम आहे आणि माझी प्रत्येक भारतीय नागरिकाकडूनही तीच अपेक्षा आहे.

माझ्यापुरतं विचारशील तर जेव्हा सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलनं सुरू होती, तेव्हा मी मुंबईतल्या 100 वर्षं जुन्या नर्सिंग होम्समध्ये गेले. तिकडं 90-90 वर्षांचे म्हातारे मुस्लिम येऊन ‘आमची जन्माची सर्टीफिकेटं द्या’ म्हणून विचारत होते. ती मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. मी त्याच्या बातम्या केल्या. त्याची छायाचित्रं सोशल मीडियावर टाकली. सीएए आणि एनआरसी मी थांबवू शकते का? माझं ते काम आहे का? मला माहीत नाही, मी कार्यकर्ती नाही. मग पत्रकार म्हणून माझं काय काम आहे? सीएए-एनआरसीचे लोकांच्या जीवनावर काय परिणाम होत आहेत आणि ते कसे दहशतीखाली जगताहेत, हे दाखवणं माझं काम होतं, ते मी केलं. अशा असंख्य बातम्यांची उदाहरणं मी सांगू शकेन- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं वार्तांकन करण्यापासून लातूरच्या पाण्याच्या प्रश्नापर्यंत

प्रश्न - त्यातलंच एक म्हणजे नाशिक-मुंबईचा शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’. त्याच्याकडे तर सुरुवातीला माध्यमांनी दुर्लक्षच केलं होतं.

- हो, त्याची छायाचित्रं मी पहिल्यांदा फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. ते असं सांगत होते की, हे शेतकरी नाहीत, हे डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत आणि अडीचशेच्या वर हे लोक नाहीत. तेव्हा मी हे सांगून सांगून दमले की, ‘नाही, हा मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी येतोय.’ माझ्याकडे पर्याय नव्हता, म्हणून मग मी त्याची छायाचित्रं फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. त्या वेळी काही लोकांनी माझ्यावर टीका केली की, ‘शेतकऱ्यांच्या पावलांची छायाचित्रं टाकून ही तिचं करिअर बनवतेय.’ पण मला दिसत होतं की, हे शेतकरी कुठल्या पायानं चालत येताहेत, त्यांची अवस्था काय आहे. एका शेतकरी बाईच्या पायामध्ये काच घुसली. तिनं त्याला चिंधी बांधली आणि ती चालू लागली. हे बघितलं तेव्हा मी म्हटलं की, ही छायाचित्रं काढली पाहिजेत. मी जे पहिलं छायाचित्रं टाकलं त्याला कॅप्शन दिली होती - ‘या अनवाणी पायांची भीती कुणाला वाटतेय?’ ती मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून दिली होती. मला वाटतं- हे काम तुम्ही करू शकता. मी जर घरातच बसले हातावर हात ठेवून, तर काहीच होणार नाही.

अर्थात, असं नाही की, उद्या भाजप सत्तेतून गेल्यावर सगळं नीट होणार आहे. तेव्हाही आव्हानं असणारच आहेत. त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, असं मला वाटतं. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे. उदाहरणच द्यायचं तर लॉकडाउनमध्ये आपल्या फिरण्यावर बंधनं होती. तेव्हा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ‘लॉकडाउन गप्पा’ या नावानं मी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या 62 लोकांच्या मुलाखती घेतल्या. सोशल मीडियावर टिवल्याबावल्या करण्यापेक्षा तो वेळ प्रामाणिक आणि गंभीरपणे कामासाठी वापरणं, मला अधिक महत्त्वाचं वाटतं.

माझं भारत देशावर प्रेम आहे, मी गांधी मानते, सेक्युलॅरिझम मानते. त्यामुळे माझं काम मी करते आणि करत राहणार! त्यासाठी मी माझ्या परीनं मार्ग शोधेन. तंत्रज्ञानानं किती तरी साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. मेन स्ट्रीम पत्रकारिता तुमच्या हातात नाही, पण जी स्पेस आहे ती सोडू नका. जिथं तुम्ही आहात तिथं पाय रोवून उभं रहा, सचोटीनं काम करा... आणि हे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येकाला लागू आहे.

मुलाखत व शब्दांकन : राम जगताप
Mob. 8108413720
jagtap.ram@gmail.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अलका धुपकर,  मुंबई
alaka.dhupkar@gmail.com

पत्रकार 


Comments

  1. Kapilanand Kamble- 11 Nov 2021

    खूप छान मुलाखत...! वाचून मराठी मधील निर्भीड पत्रकार निखिल वागळे आपल्या सारखे अनेक आहेत. याचा अभिमान वाटला.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके