डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपण कोण आणि नक्की कुठले, हा संभ्रम त्यांच्या मनात क्षणभरही निर्माण झाला नव्हता. आपण 100 टक्के अमेरिकन आहोत (with Indian heritage), we belong here आणि इथेच राहणार व फुलणार आहोत हे स्पष्ट होते. आता तर त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक जणांनी अमेरिकन मुला-मुलींशी लग्ने करून मल्टिकल्चरल, मल्टिरिसिअल सुखी संसार थाटले आहेत. कुठल्याही सांस्कृतिक संघर्षात त्यांची कुतरओढ होत नाही, अमेरिकन समाजाने त्यांना इतके आपलेपणाने सामावून घेतले आहे की, ते पाहूनच त्यांच्या आई-वडिलांना आपण उगाचंच काळजी केली असे वाटावे. म्हणजे ते ABCD नक्कीच नाहीत.  

American Born Confused Deshis म्हणजे ABCD. अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलांसाठी हे खास उपरोधिक लेबल सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी चिकटवले गेले होते. म्हणजे, आपण नक्की कोण- अमेरिकन की भारतीय- हा गोंधळ वा आयडेंटिटी क्रायसिस त्यांच्यात आहे, हे त्यातून अधोरेखित होत होते. खरे म्हणजे आता पहिली NRI पिढी अमेरिकेत येऊन पंचेचाळीस वर्षे झाली. तीसेक वर्षांपूर्वी त्यांचे संसारवेल फुलत होते. त्यांच्या व्यवसायात त्यांची उत्तम प्रगती होतच होती आणि पाच-दहा वर्षांची चिमुकली फुले (मुले) त्या वेलीवर बहरत होती. मुळात NRI मंडळी हुशार, कामसू आणि महत्त्वाकांक्षी. सर्व अडचणींवर मात करून मध्यमवर्गातून इकडे येणे, येथील फास्ट मूव्हींग आणि तंत्रज्ञानात अग्रगण्य असलेल्या समाजात त्या त्या क्षेत्रांत सर्वांत पुढे राहणे सोपे नसते, पण त्यांनी ते करून दाखवले. त्याचे उत्तम रिवार्डही त्यांना मिळत गेले. गुणवत्तेचे चीज करणाऱ्या या समाजात ते समृद्ध झाले आणि त्या वेलाची पाळेमुळे किती खोलवर व घट्ट रूजत गेली, हे त्यांनाही कळले नाही. खरे म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठे  स्थित्यंतर या NRI पिढीने केले. कालपरवापर्यंत सामाजिक, तांत्रिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे सर्वच बदल हळूहळू व्हायचे, त्यामुळे लोकांना सामावून वा सावरून घ्यायला वेळ आणि संधीही असे. म्हणजे आपले आजोबा खेड्यातून तालुक्यात आले. सायकल बघितली, वडील तालुक्यातून शहरात आले- त्यांनी स्कूटर वा छोटी गाडी चालवली. म्हणजे आयुष्य तसे ‘संथ वाहते कृष्णामाई’च होते. पण सत्तरीच्या दशकात अचानक ही NRI पिढी IIT किंवा मेडिकल कॉलेजमधून (एखादी गाडी जशी बोगद्यात शिरली की, दुसऱ्या बाजूनेच बाहेर पडते, तशी) मुंबईत जाऊन अमेरिकेत अवतरली.

अचानक देश, वेष, भाषा, संस्कृती, अंतर, सामाजिक संकेत, पद्धती आणि मुख्यत: तंत्रज्ञान हे दिवसरात्रीसारखे क्षणार्धात बदलले. इतक्या टोकाचा आणि ओव्हरनाईट बदल खरोखरच जगाच्या इतिहासात कुठल्याही पिढीने केला नसेल. इतकेच नव्हे, पण अमेरिकेसारख्या तांत्रिक दृष्ट्या सर्वांत प्रगत देशाच्या महान वेगाने बदलणाऱ्या वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रांचे तज्ज्ञ किंवा Leading edge म्हणून नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. म्हणूनच भारतीय माणूस रस्त्यावर भेटला तर सामान्य अमेरिकन आपोआपच त्यांना डॉक्टर, इंजिनियर किंवा कॉम्प्युटर एक्सपर्ट समजून आदराने वागवतो, म्हणजे हे सर्व स्थित्यंतर त्यांनी यशस्वीपणे पार पाडले, पण पचवले का?

ज्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि भावनिक पाया बावीसाव्या वर्षांपर्यंत भारतात घडला, त्यांचा मूळ गाभा भारतीयच असणार. अधूनमधून मायभूमीला जाणे, तिची सतत आठवण येणे, आप्तांच्या भेटीगाठीत आनंद आणि आई-वडिलांचे काय, या यक्षप्रश्नाने लागलेली रूखरूख ही त्या यश-आनंदाची दुसरी बाजू. तरीही करियरच्या शिखरावर असताना आणि तिथे टिकून राहायच्या धडपडीत या सर्वांचा खोलवर विचार करायला वेळ होता कोणाला? पण मुलांचे काय? दोन वर्षांत थोडे पैसे आणि अनुभव पदरी पाडून भारतात परत जायचे, ही दर दोन वर्षांनी केलेली प्रतिज्ञा करून आता पंचवीस वर्षे झाली. तरी आपल्या मुलांना ‘भारतीय संस्कृती’ शिकवायची हा पण ठरलेला!

मुलांसाठी अमेरिकन सुखांचा त्याग करायचा म्हणजे त्यांना तरी अधांतरी वाटायला नको- ‘ना घर का, ना घाट का’ असे व्हायला नको, यासाठी मराठी मंडळांत त्यांना Elephant God दाखवून आणि मुलींना सक्तीने भरतनाट्यम्‌ वगैरे शिकवून भारतीय संस्कृती जपण्याचा अपुरा प्रयत्नही करून झाला. मोडके-तोडके मराठी शिकवायचे, कधी ते घरात बोलायची सक्तीही करायची. शक्यतो भारतीय वेष, भाषा, अन्न आणि मित्रांच्या गोतावळ्यात राहून हा भारतीय संस्कृती शिकवायचा प्रयत्न किती यशस्वी झाला, यात शंकाच आहे. शिवाय, नक्की ‘भारतीय संस्कृती’ म्हणजे काय, याचा खोलवर विचार करायला करियरच्या स्पर्धेत आणि पैशाच्या पाठलागात त्यांनाही जमले नाही. मग default option म्हणजे थोडे कर्मकांड, थोडे भारतीय संगीत आणि अन्न, कधीमधी झब्बा आणि साडी. त्यातही अर्थात नटणे हाच मुख्य उद्देश, पण थोडा प्रयत्न केल्याचेही समाधान.

आता, अशा सर्व ‘प्रयोगांतून’ गेलेली ही लहान मुले तिशी-पस्तिशीची झालीत. बहुतेकांचे स्वत:चे संस्कार आणि चिमुकली बाळेही आहेत. म्हणजे जगाचे रहाटगाडगे आणखी थोडे पुढे सरकरले, पण त्यांची ‘धड ना इकडे, ना तिकडे’ अशी मानसिक अवस्था झाली का? आयडेंटिटी क्रायसिस आहे का? ते ‘स्वत:ला शोधत’ द्विधा मन:स्थितीत दु:खी, निराश फिरतात का? म्हणजे ते खरेच ABCD (American Born Confused Deshis)  झाले का? की उगाचंच भारतीय लोकांनी त्यांना हे लेबल लावले होते?

‘ही मुले लहान असताना त्यांच्या रंगावरून किंवा वेगळेपणावरून चिडवली, छळली जातील आणि त्यांच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण होईल. पुढे नोकरीतही त्यांच्या वेगळेपणामुळे Descrimination होईल, ते अमेरिकन मुख्य प्रवाहापासून वेगळे, एकटे आणि एकाकी पडतील, मग आपण नक्की कुठले (A Sense of Belonging) या गोंधळात ते आपण ABCD आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करतील’ अशी सर्वांना भीती होती.

पण आजची वस्तुस्थिती या सर्व भयाण चित्राच्या एकदम उलट आहे. शाळेत या हुशार विद्यार्थ्यांचे कौतुकच झाले. इतर अमेरिकन मुले त्यांची मित्रमंडळी झाली, आणि ती घट्ट मैत्री आजही छान टिकून आहे, शिक्षकांनी त्यांना विशेष उत्तेजन आणि शिकवण्या देऊन हार्वर्ड, येल,  कोलंबिया यांसारख्या टॉपच्या विद्यापीठांची दारे खुली केली. पुढे जॉब मार्केट किंवा करियरमध्ये अमेरिकन कंपन्या आणि स्टार्टप्स्‌ हात धुवून आणि हात जोडून त्यांच्यामागे लागल्या. गुणवत्तेला रंग, रूप, वंश, धर्म नसतो हे अमेरिकन फेअरनेस आणि सेक्युलॅरिझमचे तत्त्व इथे प्रत्यक्ष राबवलेले दिसते. हे सर्व ठीक, पण वैयक्तिक जीवनाचे काय?

या मुलांना भाषा, उच्चार, संदर्भ, सांस्कृतिक संकेत इत्यादी कुठलेच अडथळे नसल्याने mainstream अमेरिकन जीवनाचे सरमिसळ आणि अस्सल घटक होण्यास त्यांना कुठलीच अडचण नसते. आपण कोण आणि नक्की कुठले, हा संभ्रम त्यांच्या मनात क्षणभरही निर्माण झाला नव्हता. आपण 100 टक्के अमेरिकन आहोत (WITH Indian Heritage), we belong here आणि इथेच राहणार व फुलणार आहोत हे स्पष्ट होते. आता तर त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक जणांनी अमेरिकन मुला-मुलींशी लग्ने करून हे मल्टिकल्चरल, मल्टिरिसिअल सुखी संसार थाटले आहेत. त्यांची चिमुकली तर आणखीनच हुशार, सुंदर आणि गुणी आहेत. सुखी संसार, व्यावसायिक यश, अमेरिकन मित्रमंडळी आणि कुठल्याही जुन्या संकेत वा रूढींची ओझी न बाळगणारी ही तरुण अमेरिकन-भारतीय पिढी कुठल्याही बाबतीत confused नाही हे नक्की.

कुठल्याही सांस्कृतिक संघर्षात त्यांची कुतरओढ होत नाही, अमेरिकन समाजाने त्यांना इतके आपलेपणाने सामावून घेतले आहे की, ते पाहूनच त्यांच्या आई- वडिलांना आपण उगाचंच काळजी केली असे वाटावे. म्हणजे ते ABCD नक्कीच नाहीत. पण थांबा, अमेरिकेत NRI मात्र खरोखरच ABCDs आहेत. Where do I really belong अशा प्रश्नाने ग्रासलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पण ती NRI पिढीची मुले नव्हे, तर पहिल्या पिढीतील NRI च आहेत. आत्तापर्यंत आपल्या मुलांची चिंता करणारी येथील First Generation Immigrants पिढीच ABCD  म्हणजे America Based Confused Deshis आहेत! हे विधान तर धक्कादायक आहे, खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का?

आपल्याला तर वाटत होते की, ते एवढे यशस्वी, पैसेवाले, सुखवस्तू, सारे कसे छान छान. मग confusion, मानसिक गोंधळ, असमाधान आलेच कुठून? हे लोक भारतात मधूनमधून येतात, तेव्हा तरी ते  असे काही म्हणत नाहीत, मग हे सारे काय गौडबंगाल आहे? बरेचसे अमेरिकास्थित First Generation NRIs सध्या दुभंगलेल्या मानसिक अवस्थेत आहेत. सारे सुखवस्तू, पण बरेचसे बेचैन, अस्वस्थ आणि थोडे गोंधळलेले. आता साठी-पासष्ठी ओलांडलेले हे NRIs सुखवस्तू असले तरी आपण सुखी आहोत असे छातीठोकपणे सांगू शकत नाहीत.

या सर्वांचे विश्लेषण त्यांच्या जीवनप्रवासात आहे. थोडे पैसे आणि अनुभव गाठीला बांधून परतण्याची, आई-वडिलांची उतारवयात काळजी घेण्याची आणि ‘आपल्या’ संस्कृतीत मुले वाढवण्याची आकांक्षा पहिली पंचवीस वर्षे तरी त्यांनी बाळगली होती. पण जशी वर्षे गेली तशा प्रतिज्ञा पुसट झाल्या, आणि शेवटी आपण इथेच कायमचे स्थायिक होणार हे त्यांना मनोमन उमगले. त्या दृष्टांताबरोबर येणारी separation anxiety - आपला देश, उत्तम संस्कृती यांच्याशी संबंध कायमचा तुटणार काय, या भीतीने मन कातर झाले. पैशाची मलमपट्टी यावर उपाय करू शकली नाही. शिवाय आई- वडिलांचे काय? हा तर न सुटणारा यक्षप्रश्न.

अचानक मर्सेडिस, मँन्शन, कपडे, दागिने, पाटर्या यात मन रमेनासे झाले. सभोवती होणारे सांस्कृतिक बदल तर मन अधिकच बेचैन आणि कातर करणारे वाटले. पूर्वी आजोबांची आणि नंतर वडिलांची अबाधित सत्ता होती. वयाला मान होता. पण इथे तर सारेच उलटे मुलांना त्यांचा उपदेश ऐकायला वेळ नव्हता आणि गरजच वाटत नव्हती. त्यांना लागणारे ज्ञान, साध्या CD-Rom वर होते.

बायकोने बंड जरी केले नसेल, तरी तिच्या आचार-विचारांचे स्वातंत्र्य त्याच्या भारतीय पिंडाला बोचू लागले. ‘मी हे करू का हो?’ असे प्रश्न ती विचारत नाही. बहुतेकजणी प्रोफेशनल असल्याने ‘मी जॉनबरोबर दोन दिवस कॉन्फरन्सला जाते आहे, तू स्वयंपाकाचे बघ.’ असेही ती म्हणते. तेव्हा त्याच्यातला अस्सल, कर्मठ भारतीय जागा होऊन आणखीच अस्वस्थ करू लागतो.

व्यवसायातही सारेच काही प्रेसिडेंट होऊ शकत नाहीत. बहुतेकजण मध्यमवयात middle management मध्ये comfortable and stuck in place अशा glass ceiling मध्ये अडकलेले असतात. मग अशा द्विधा आणि वैफल्यावस्थेत पैसेही मन:स्वास्थ्य देऊ शकत नाहीत. आपण नक्की कोण आणि कुठे असावे? असा आयडेंटिटी क्रायसिस त्यांना भेडसावू लागतो, आपण आधीच भारतात परत गेलो असतो तर? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. मग ‘लाख दुखोंकी एक दवा है’ असा रामबाण उपाय सापडून रातोरात तो कडवा धार्मिक बनतो. त्याचीही अमेरिकेत झकास सोय आहे. पन्नास हजार डॉलर्स देऊन देवळाच्या भिंतीवर नाव आणि वर्षातून एकदा फर्स्ट क्लासने भारतातून येणाऱ्या एखाद्या गुरु, माता, पंडित किंवा अमुक तमुकानंदांचे प्रवचन ठेवले की, एकदम त्याला सेन्स ऑफ बिलॉगिंग येतो आणि आपला आत्मा ड्रायक्लिन होऊन स्वर्गात जागा बुक केल्याचा आनंद मिळतो.

आतापर्यंत बहुतेकजण रिटायरही झालेत. त्यामुळे भरपूर वेळ आणि पैसा आहे. त्यांचा उपयोग ते आपल्या कर्मभूमीत- लोकल कम्युनिटीत गरिबांना मदत करणे, पर्यावरण वा कलेला उत्तेजन देणे, गरिबांच्या मुलांना शिकवणे अशा गोष्टीत करतात का? तर नाही! कारण त्यांची मानसिकता आता पक्की इंडिया फोकस्ड झालेली असते. मग देवळे, पूजाअर्चा, स्वभाषिक मंडळे आणि फक्त भारतीय मित्रमंडळी यांतच त्याला comfortable वाटू लागते आणि बहुतेक दिवस त्यातच रमतात. त्यांची ‘फक्त भारतीय’ आयडेंटिटी अधिकच घट्ट होते. अमेरिकेत राहून भारतातील व्हॉटस्‌ॲप ग्रुपमध्ये त्याचे तासन्‌तास जातात. मग तेथील मित्र, नातेवाईक आणि शाळा-कॉलेजच्या ग्रुप्समध्ये तर तो इतका रमतो की, आपल्या अमेरिकन शेजाऱ्याशी ओळखही नाही हेही सोईस्करपणे विसरतो. म्हणजे ‘पाण्यात राहून सुकी काष्ठी’ अशी परिस्थिती होते. बहुतेकांना अमेरिकन मित्र नसतातच, किंवा अगदी एक-दोन. अमेरिकन समाजाशी तर संबंध नाहीच. कुठेही गुंतवणूक, बांधिलकी,  volunteering किंवा आपलेपणा नाही. सारे लक्ष भारतावरच.

म्हणजे शरीराने इकडे, पण मनाने तिकडे अशा दोलायमान अवस्थेत यातील कित्येकजण जगत असतात. मग सरळ भारतातच वानप्रस्थाश्रमासाठी का जात नाहीत? पण डॉलरचा मोह, कुटुंबाचे पाश आणि तेथील हेल्थकेअरच्या ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या  भयकथा इत्यादींमुळे तेही करण्याची हिंमत होत नाही. मग ना धड इकडे, ना तिकडे अशा अधांतरी अवस्थेत ते किती समाधानी असतात हे त्यांना ठावे.

आता तर व्हॉटस्‌ॲप ट्रोल आर्मी आणि धार्मिक उन्मादाच्या जमान्यात हे NRIs भारतीय राजकारणात (आपल्या आलिशान घरात बसूनच) घुसले आहेत. भारतातून येणाऱ्या राजकारणावरील बातम्या एकमेकांना फॉरवर्ड करणे आणि आपला धर्म कसा धोक्यात आला आहे याची तावातावाने चर्चा आणि चिंता करणे यात मोकळा वेळ झक्क जातो. पण त्याचवेळी अमेरिकन समाजात आपल्या अवतीभवती काय चालले आहे, गरिबांची काय अवस्था आहे, इत्यादींची त्यांना फारशी चिंता नसते. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवरही त्यांचे काही लक्ष वा म्हणणे नसते. एक इन्कम टॅक्स रेट सोडल्यास इतर काही अमेरिकन विषय त्यांच्या ध्यानीही नसतात. पण अमेरिकेत राहून फक्त भारतावर लक्ष अशा एका विचित्र quantum state मध्ये हे लोक वावरत असतात. म्हणजे वटवाघळासारखीच अवस्था- धड ना प्राणी, ना पक्षी आणि अधांतरी लोंबकळणारी मानसिकता.

यावर कळस म्हणजे त्यांचे जीवन इतक्या विरोधाभासांनी भरलेले आहे की, हसावे की कीव करावी कळत नाही. आरामात उंची दारू, चवदार पदार्थ सेवन करत आणि उत्तम घरात राहून वैराग्य, अध्यात्म आणि मोक्षाची चर्चा, स्वत: आणि कुटुंबीय हँबर्गर (गोमांस) भक्षण करत भारतात गोहत्या इत्यादींवर परकीयांना दोष देणे (म्हणजे फॉरिनच्या गोमातेच्या पोटी देव नसतात म्हणून?) अमेरिकेत कडक सेक्युलॅरिझम तर भारतात धार्मिक पुरस्कर्ते. भारतीय संस्कृतीचे गोडवे गातानाच आरक्षणाने ‘ते’ कसे माजले आहेत, जातीव्यवस्था कशी गुणवत्तेवरच आधारित होती इत्यादींचे तावातावाने समर्थन करणे, स्त्रियांनी कसे शालीन राहून संस्कृती सांभाळावी इत्यादी... अमेरिकेचे दोष तर पदोपदी काढणे, इथे म्हाताऱ्या लोकांचे किती हाल होतात, मुले विचारत नाहीत वगैरे... पण भारतात त्यांचे जर इतके लाड होतात, तर तिथेच का जात नाही, हे विचारायचे नाही.

आता तर यातील निम्म्याहून अधिकांच्या मुला- मुलींची लग्ने अमेरिकनांशी झाली आहेत. मग John किंवा Tom नावाच्या नातवंडाला मांडीवर खेळवत आणि अमेरिकन व्याह्यांबरोबर तसे बरे संबंध ठेवून, अन्य धर्मीय (उपरे, परदेशी इत्यादी) कसे वाईट असतात याची चर्चा करताना त्यातील विसंगतीही त्यांच्या लक्षात येत नाही! म्हणजे आपल्या कर्मभूमीसाठी काही करायचे नाही आणि जन्मभूमीत जाऊन राहायची इच्छा नाही असे अधांतरी लोकच खरे ABCD म्हणजे America Based Confused Deshis! अर्थात, सरसकट असे काहीच नसते. म्हणजे याला अपवादही अनेक आहेत. न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेची नाटके आणि अमेरिकन संगीतात रस घेणारे होमलेस शेल्टर्समध्ये  volunterring करणारे आणि अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय विषयांमध्ये रस असणारे, भाग घेणारे NRIs आहेत. पण Exception proves the rule या संकेताप्रमाणे असे भारतीय फार कमी. असा healthy balance साधणारेच खरे सुखी, पण हे ABCDs त्यात नक्कीच नाहीत!

बिझिनेस एथिक्स

पण यापुढे जे घडले ते भारताच्या मानाने अद्‌भुत होते. दोन तासांच्या इंटरव्ह्यूनंतर मी ट्रेडिंग डेस्कवर परतलो आणि दिवस कसा गेला, कळले नाही. त्या दिवशी बराच तोटा झाला होता. वीस मिलियन हरलो, पण रक्ताच्या धारा निघत असतानाही पुढील खेळीचा विचार करण्याची मलाही सवय होतीच, त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असे म्हणून मी दिवस आवरला. तेवढ्यात माझ्या बॉसची हाक आली. त्याला अर्थात आजचा तोटा माहीत होताच, पण त्याला बोलायचे होते त्याच्या मुलाच्या इंटरव्ह्यूबद्दल. ‘‘So, What do you think about him?’’  त्याने सहजपणे विचारले.

गोष्ट जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची, पण माझ्या मनात कायमची ठसून राहिली आहे. त्या वेळी मी अमेरिकेतील जगप्रसिद्ध कमॉडिटी ट्रेडिंग फर्ममध्ये क्रूड ऑईल ट्रेडिंगचा म्हणजे त्याच्या ‘लीधो-दीधो’च्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून काम करत होतो. खरे म्हणजे मराठी माणूस आणि कमॉडिटी ट्रेडिंग म्हणजे विळ्या-भोपळ्याचे नाते असणार, अशी समजूत. त्यातून जोखीम (रिस्क) आणि त्यात पडणाऱ्याच्या आयुष्याचे वाटोळेच होते, अशी खात्री. त्यात मी कसा पडलो, ही वेगळीच गोष्ट; पण कमॉडिटी ट्रेडिंगबद्दलचे बहुतेक समज खरेही आहेत.

आयुष्यात बहुतेक गोष्टींत विन-विनचा पर्याय असतो. थोडी तडजोड, तर थोडी समजूत होऊन. पण कमॉडिटी ट्रेडिंगचे तसे नाही. अगदी झिरो सम गेम असतो. Biilions of Dollars पणाला लावलेले असतात, त्यामुळे होणारा नफाही अवाढव्य असतो आणि तोही साहेबांना लगेच हवा असतो- पंचवार्षिक योजनेत वगैरे नव्हे! म्हणजे सारेच चक्र अफाट वेगाने फिरत असते. शिवाय, या नफ्यातोट्याचे परिणामही अगदी टोकाचे  नफा मिळला तर मालक Miilions of Dollars बोनस म्हणून देतो, तर तोटा झाल्यास ताबडतोब बाहेरची वाट दाखवतो. तिथे सारे काही ब्लॅक ॲन्ड व्हाईट आणि दया- माया काही नाही. शिवाय खासगी कंपनीत किती बोनस द्यायचा, हेही मालकच ठरवतो आणि तुमचे सारे आयुष्य त्यावर अवलंबून असते.

तुम्ही ज्याच्याशी ट्रेडिंग करता, तेही अगदी हुशार हार्वर्ड एमबीए, दिवसाला सोळा तास काम करणारे आणि चतुर असतात. कामाशिवाय त्यांना दुसरे आयुष्य नसते. नफा हे एकमेव ध्येय. तुम्हाला जिंकायचे, तर त्याला हरवावे लागते. तेही दर वर्षी. म्हणजे तुमच्यातही काही वेगळेच टॅलेंट पाहिजे, नाही तर बाहेरची वाट. पण जिंकल्यास मिळणारा बोनस इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा दसपटीने मोठा. म्हणजे साऱ्या आयुष्याची कमाई दोन-चार वर्षांत होऊ शकते. हेच तर मला खरे आकर्षण होते आणि त्यावर मी सारे करिअर पणास लावले होते.

अनिश्चितता आणि जोखीम हा कमॉडिटी ट्रेडिंगचा स्थायिभाव. त्यामुळे सतत तणाव, आक्रमकता आणि भीती यांचे संमिश्र रसायन नसानसांत; म्हणजे यात नॉर्मल पर्सनॅलिटीची माणसे कमीच. त्यामुळे अगदी शेलक्या लोकांना ट्रेडर म्हणून घेतात. केवळ दहा जणांचे ट्रेडिंग डेस्क म्हणजे दहा माणसे कंपनीला Billions of Dollars  मिळवून देणार- झिरो सम गेममधून, किंवा पूर्ण दिवाळे वाजवणार. अत्यंत टोकाचा, All or Nothing असा हा धंदा.

या धंद्याचे मुख्य भांडवल म्हणजे ट्रेडर्स. पैसा घालणाऱ्या कित्येक कंपन्या असतात. पण खरे टॅलेंट- ट्रेडर हा मध्यवर्ती. He can make or breakl the whole company. पण हे ट्रेडिंगचे नक्की काय कौशल्य आहे? माझे उत्तर Rational risk taking. जगातले 98 टक्के लोक जोखीम घ्यायला घाबरतात, तर उरलेले दोन टक्के लोक कुठलीही रिस्क बेदरकारपणे घेतात. All or nothing, red or black वर सारी आयुष्याची कमाई लावणारे असे ते लोक. म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक Rational risk takers असतात. याला एका अमेरिकन गाण्यात पोकर या पत्त्याच्या ‘जुगारातील पाने’ (Know when to hold them and know when to fold them) असे म्हटले आहे. असे लोक निवडून त्यांना ट्रेडिंग डेस्कवर घेणे, हे तर त्याहीपेक्षा विरळा कौशल्य.

माझा बॉस आणि कंपनीचा मालक त्यापैकी एक. स्वत: बारा-बारा तास ट्रेडिंग डेस्कवर बसून तो सर्व ट्रेडिंग बघायचा. म्हणजे सारे महत्त्वाचे निर्णय आम्ही एकत्र घ्यायचो. अगदी निर्विकार चेहऱ्याने तो बसलेला असे, पण कॉम्प्युटरवर पै न्‌ पैचा हिशोब व सर्व कमॉडिटी पोझिशन्स त्याला तंतोतंत माहीत असायच्या. अगदी Hundreds of millions of dollars चा तोटा होत असतानाही तो शांतपणे Don’t get married to the position, where is the market going from here? असे प्रश्न विचारायचा. म्हणजे फक्त भविष्याकडे नजर. झाल्या- गेल्या चुकांची चर्चा नाही. शिवाय दर वर्षी मुख्य ट्रेडर्सचा बोनस तोच ठरवत असे. म्हणजे तुम्हाला दोन मिलियन डॉलर्स द्यायचे की दहा, ते फक्त तोच ठरवायचा. यालाच Discretionary bonus म्हणतात. अपील नाही. केवळ त्याचाच अंदाज आणि त्याच्या मनावर किंवा ॲसेसमेंटवर तुमच्या आयुष्याची कमाई अवलंबून. साऱ्या ट्रेडिंग डेस्कला त्याच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. ट्रेडिंग डेस्कवर तसे भरपूर टॅलेंट आणि इगोवाले तरुण होते (यंग बक्स) पण बॉसचा वावर, व्यक्तिमत्त्व आणि प्रभाव काही वेगळाच होता. माझे आणि त्याचे संबंध तसे चांगले होते. मला त्याच्याविषयी आदर तर होताच, पण त्यालाही माझ्या विचारांचे वेगळेपण (Thinking out of the box) आणि ट्रेडिंग डेस्क मॅनेज करण्याचे कौतुक होते. पण अर्थात नफा सर्वांत महत्त्वाचा, हेही अधोरेखित.

अशा सर्व पार्श्वभूमीवर हा बॉस एके दिवशी सहज माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘सुनील, माझा मुलगा आता कॉलेजमधून ग्रॅज्युएट होत आहे. त्याला ट्रेडिंगमध्ये यायची फार इच्छा आहे- बापाच्या पावलावर पाऊल टाकायची. तू जरा त्याचा इंटरव्ह्यू घे आणि बघ तुला काय वाटते ते.’’

मी त्याच्या मुलाला कित्येकदा भेटलो होतो. ऑफिसमध्ये सहज यायचा तेव्हा, पण उत्तम ओळख अशी नव्हती. मी अर्थात ‘हो’ म्हणालो आणि त्याला पुढच्या आठवड्यात भेटायला बोलावले. बॉसचाच मुलगा म्हणजे हुशार वगैरे होताच अन्‌ बापाचीही त्याला ट्रेडिंगमध्ये आणायची इच्छा दिसली. आता माझी थोडी संमती मिळाली की झालेच. मुलगाही त्याच थाटात उगवला. ट्रेडिंग डेस्कपाशी बसूनच आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग जरा आतल्या ऑफिसमध्ये गेलो. एकदम ट्रेडिंगवर बोलण्याआधी कॉलेज, पुढे काय करायची इच्छा आहे, खरी आवड कशाची, त्यागाची तयारी इत्यादी गप्पाही झाल्या. मुख्यत: जोखीम आणि त्याची किंमत यावरचे त्याचे विचारही जाणून घेतले. जेवढ्या जास्त गोष्टी झाल्या, तसतसे मला जाणवत गेले की, मडके अजून जरा कच्चे आहे. म्हणजे पुढे कदाचित तयार होऊ शकेल, पण या क्षणी तरी ट्रेडिंग डेस्कवर बसायची त्याची तयारी किंवा लायकी नाही. ज्या धंद्यात ट्रेडर हेच मुख्य भांडवल, त्यात असला कच्चा दुवा घेणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असे मला वाटले.

पण यापुढे जे घडले ते भारताच्या मानाने अद्‌भुत होते. दोन तासांच्या इंटरव्ह्यूनंतर मी ट्रेडिंग डेस्कवर परतलो आणि दिवस कसा गेला, कळले नाही. त्या दिवशी बराच तोटा झाला होता. वीस मिलियन हरलो, पण रक्ताच्या धारा निघत असतानाही पुढील खेळीचा विचार करण्याची मलाही सवय होतीच, त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लडेंगे’  असे म्हणून मी दिवस आवरला. तेवढ्यात माझ्या बॉसची हाक आली. त्याला अर्थात आजचा तोटा माहीत होताच, पण त्याला बोलायचे होते त्याच्या मुलाच्या इंटरव्ह्यूबद्दल. ‘‘So, what do you think about him?’’ त्याने सहजपणे विचारले. ट्रेडिंगच्या धंद्यात beating around the bush ची पद्धतच नाही. सारे उघड, सरळ आणि रोखठोक.

आता मी भारतात असतो, तर हा खरोखरच यक्षप्रश्न होता. तिथे मालकाचा मुलगा म्हणजे ‘छोटे मालक’ म्हणून लहानपणापासूनच लोक ठरवून टाकतात आणि तसे वागतातही. आपले सारे आयुष्य ज्याच्या हाती आहे, त्याच्या पोराला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही; आणि तशी हिंमत दाखवणाऱ्याला भिकेचे डोहाळे लागलेत, असेच लोक समजतील. माझ्या बाबतीत तर साऱ्या आयुष्याची कमाई दोनचार वर्षांत कमवायच्या कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये, एका खासगी कंपनीत ‘सारा बोनस अपनी मुठ्ठीमें’ अशा बॉसला आता काय सांगावे? अशा वेळी सेफ गेम खेळणे- हाच मार्ग बहुतेकांनी स्वीकारला असता. पण एका क्षणाचाही विलंब न लावता मी बॉसला सांगितले, ‘‘मुलगा हुशार आहे, पण अजून तयार नाही. कदाचित एमबीए आणि कुठे तरी इंटर्नशिप केल्यावर होईल, पण आत्ताच मी त्याला ट्रेंडिंग डेस्कवर घेऊ शकत नाही.’’ मी थांबलो, आणि क्षणभर तोही काही बोलला नाही.

तो क्षण लांबल्यासारखा वाटला. बॉस माझ्याकडे बघत होता- डोळ्याला डोळा लावून. अगदी हिंदी सिनेमातल्यासारखा हाय टेन्शन ड्रामाचा क्षण होता. अन्‌ तो सहजपणे म्हणाला, ’’ Thank you, Sunil. प्लीज, तू पुन्हा एकदा भेटून त्याला हे सांग, म्हणजे पुढील शिक्षणाची तो तयारी करू शकेल. जरा मार्गदर्शन कर त्याला.’’

या क्षणाला भारतीय सिनेमाप्रमाणे रिटेक करायचा असता, तर तिथे बॉस आला असताना मान लचकेपर्यंत जोरजोराने हलवून ‘‘यस्स सर, यस्स सर, यू आर ॲब्‌सोल्यूटली राईट सर’’ असे म्हणतात व तो केबिनमधून बाहेर पडताच, ‘‘साला क्या मा...’’ म्हणतात असे कानांवर आलेले आहे. अशा वेळी किमान त्यातला पूर्वार्धाचा तरी डायलॉग झाला असता आणि त्याच्या मुलावर आणखी काही गुणांची लेणी चढवून तिथेच त्याची प्राणप्रतिष्ठापना केली असती. पण इथे माझे पूर्ण भवितव्य ज्याच्या हाती आहे, त्या मालकाच्या मुलाला स्पष्टपणे नाकारताना क्षणभरही किंतु माझ्या मनात आला नाही की, हा माणूस त्याच्या मुलाला (भावी मालक?) नाकारल्यामुळे मनात डूख धरून माझे काही मिलियन काटेल किंवा पाय ओढेल. यातच अमेरिकन बिझिनेस एथिक्स आणि प्रोफेशनॅलिझमची प्रचिती येते.

माझ्या धाडसाचेही मला थोडे कौतुक वाटले. फारच कमी भारतीयांनी हे धाडस दाखवले असते. पण मुख्यत: या प्रसंगात बरेच काही सामावले आहे. अमेरिकेत फेअरनेसवर फार भर आहे. गुणवत्ता अग्रगण्य आहे. तिला रंग, रूप, धर्म, वंश इत्यादी वैशिष्ट्ये नसतात. म्हणून तर सुंदर पिचाई, सर्गेबिन, इंद्रा नूयी आणि असे हजारो परकीय लोक येथील मोठमोठ्या धंद्यांचे प्रमुख आहेत. कारण असा उदारमतवाद, सेक्युलॅरिझम व फेअरनेस हा धंद्याच्या आणि समाजाच्या उन्नतीला पोषक असतो, हे त्यांनी जाणले आहे. पण धंदा, नफा यांच्या पलीकडे फेअरनेस आणि सेक्युलॅरिझम ही अमेरिकेची Founding preinciples आहेत. म्हणूनच अमेरिका बहुतेक क्षेत्रांत टॉपला आहे. Fast Forward - पुढे मी आणखी काही वर्षे तिथे काम केले, पण मला आपल्यावर अन्याय झाला किंवा short change केले, असे एकदाही वाटले नाही. आता आम्ही दोघेही केव्हाच रिटायर होऊन फ्लोरिडामध्ये राहतो. बॉस अन्‌ मी अधून-मधून एकत्र येऊन छान सिंगल-माल्ट घेत गप्पाही मारतो. मुख्य म्हणजे, तो पोरगा अखेर काही वर्षांनी स्वत:च्या कर्तृत्वावर कमॉडिटी ट्रेडर झाला आणि आज स्वत:चा कमॉडिटी hedge funds ही चालवतो- बापाची मदत न घेता!

Tags: Sunil Deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील देशमुख

उद्योजक, प्रवर्तक महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके