डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कलाक्षेत्रात नुकतं पाऊल टाकलेल्या माझ्यासारख्या नवशिक्या तरुणाला चित्रपटमाध्यमाच्या कक्षा विस्तीर्ण क्षितिजापर्यंत नेऊन दाखवणारा हा यान्चो त्याच्या वयाच्या नव्वदीमध्येसुद्धा आज चित्रपट बनवतो आहे आणि त्याच्या प्रत्येक नव्या कलाकृतीतून कित्येकांना नव्याने प्रेरणा देतो आहे. नवशिक्या मुलाच्या उत्साहानेच यान्चोला भेटावं, त्याच्या प्रतिभेविषयी आणि कलाकृतींविषयी अगणित प्रश्न विचारावेत... त्यामुळे त्या अमूर्त, दृश्यकाव्यात्मक चित्रबंधांविषयीचा गुंता सुटेल की वाढेल- हासुद्धा सृजनाचाच एक ‘बोचरा खटाटोप!’

‘प्रभावित’ होण्याच्या वेगवेगळ्या छटा असतात. चित्रपटातला वेगळा आशय ‘भावणं’, कथनशैलीच्या प्रकारामुळे ‘आकर्षित’ होणं; तसंच संकलन, छायाचित्रण, ध्वनिसंयोजन, संगीत, अभिनय, दिग्दर्शन इत्यादी तांत्रिक घटकांनी अनुभवाचा ‘विशेष ठसा उमटवणं’ किंवा यापैकी एखाद्या घटकाला ‘उत्स्फूर्त दाद दिली जाणं’ हे असं ‘प्रभावित होणं’ तात्कालिक असतं आणि चित्रपटाच्या ‘चांगल्या’, ‘दर्जेदार’, ‘अप्रतिम’ किंवा ‘लोकप्रिय’ ठरण्यासाठी महत्त्वाचंही असतं. पण या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारचा ‘चिरंतन’ अनुभव देण्याचं सामर्थ्य ज्या चित्रपटात असतं, तो चित्रपट माझ्यासाठी खऱ्या अर्थाने प्रभावित करणारा ठरतो. The film I feel influenced by as opposed to impressed with, truly and deeply affects me. माझ्यावर असा परिणाम करणाऱ्या दिग्दर्शकांबद्दल मी नंतर थोडं सविस्तर लिहिणार आहे.

पण चित्रपटक्षेत्रातला एक कलावंत असल्याने आणि अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा स्तरांवर वावर असल्यामुळे सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी साहजिकच Demystify होतं आणि कालांतराने स्वत:च्या अभिरुचीला जास्त धार येत जाते. मग ‘प्रभावित’ होण्याच्या कक्षाही थोड्याफार मर्यादित होत जातात. अशा अती वैयक्तिक कक्षेच्या पलीकडे जाऊन या माध्यमाच्या योगदानाचा व्यापक विचार करण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे.

एखाद-दुसऱ्या रसिकाला वा कलावंताला काही काळ प्रभावित करणाऱ्या कलाकृती अगणित असतात, पण अनेक सृजनशील कलावंतांना दीर्घकाळ प्रभावित करणारी कलाकृती दुर्मिळ असते. त्या कलाकृतीचे कलेच्या प्रांतात उमटलेले पडसाद वेगवेगळ्या अंगांनी, निरनिराळ्या रूपांनी किती तरी वर्षं घुमत राहिलेले दिसतात.

1925 मध्ये ‘बॅटलशिप पोटेकिन’ हा फक्त 75 मिनिटांचा रशियन मूकपट! जगभरातल्या कित्येक दिग्दर्शकांना आणि कोट्यवधी प्रेक्षकांना प्रेरणा देण्याचं काम झारच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारणाऱ्या खलाशांच्या शौर्यगाथेवरच्या या कृष्ण-धवल चित्रपटाने वर्षानुवर्षं केलं.  (1932 पासून आजतागायत प्रकाशित होणाऱ्या ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटच्या ‘साईट ॲन्ड साऊन्ड’ या प्रख्यात मासिकाने 1952 मध्ये प्रभावित केलेल्या 10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची सकारण निवड करायला जगभरातल्या सगळ्या नामवंत दिग्दर्शकांना सांगितलं. त्या दिग्गजांनी निवड केलेल्या यादीनुसार ‘बॅटलशिप पोटेमकिन’ ही पहिल्या क्रमांकाची कलाकृती ठरली. त्यानंतर दर दहा वर्षांनी निवड केल्या गेलेल्या याद्यांमध्ये हा चित्रपट अग्रस्थानी राह्यला. अगदी हल्ली 2012 मध्ये, त्याचं स्थान 11 वर घसरलं.) आणखी एक उदाहरण –

व्हिक्टोरिया डिसिका या इटालियन दिग्दर्शकाने 1949 मध्ये बनवलेल्या ‘बायसिकल थीव्ज’ या कृष्ण-धवल चित्रपटामुळे जगभरातले दिग्दर्शक इतके प्रभावित झाले की, तत्कालीन सिनेमाचा चेहरामोहराच बदलला. तोपर्यंत indoor किंवा outdoor चित्रीकरण फक्त स्टुडिओतच केलं जायचं. ही प्रथा नाकारून डिसिकाने प्रत्यक्ष स्थळावर जाऊन, उपलब्ध सूर्यप्रकाशाचा वापर करून चित्रपट बनवण्याचा नवा मार्ग दाखवला. आपल्या देशात 1952 मध्ये पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात हा चित्रपट बघितल्यानंतर प्रभावित होऊन बिमल रॉयनी ‘दो बिघा जमीन’ बनवला; राज कपूरने ‘बूटपॉलिश’, ‘जागते रहो’ या चित्रपटांची निर्मिती केली. सत्यजित रायनीसुद्धा ‘पाथेर पांचाली’ बनवला तो ‘बायसिकल थीव्ज’ बघितल्यावर. ‘असाही सिनेमा असू शकतो? मला असाच सिनेमा बनवायला आवडेल!’ अशी धारणा झाल्याचं त्यांनी प्रांजळपणे नोंदवून ठेवलं.

आज ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ निवडायला सांगितलं, तेव्हा असा एकच चित्रपट निवडणं अशक्य आहे, असं माझ्या लक्षात आलं. मग मी एखाद्या दिग्दर्शकाच्या कारकिर्दीचा आणि संपूर्ण कलात्मक प्रवासाचा एकसंध विचार करून त्याने माझ्यावर केलेल्या प्रभावाचं मूल्यमापन करायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

परदेशी दिग्दर्शकांपैकी अकिरा कुरोसावा, इन्गमार बर्गmन, आन्द्रे वायदा, किस्तॉफ किस्लोस्की, आन्द्रे तारकोवस्की, वूडी ॲलन... आणि अशा अनेक दिग्गजांनी मला समृद्ध केलं. ह्याच नामावलीत आपल्या मातीतले व्ही. शांताराम, के. असिफ, बिमल रॉय, गुरू दत्त, सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेनपासून ते अगदी राजा परांजपे, श्याम बेनेगल यांची नावंही जोडायला हवीत. तसंच ह्या प्रख्यात यादीत फारशी माहीत नसलेली, पण मला खूप आवडणारी दोन नावं- मिख्लोस यान्चो (Jansco) हा हंगेरियन दिग्दर्शक आणि यिल्माझ ग्युने (Guney) हा तुर्कस्तानी दिग्दर्शक! यान्चोने त्याच्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ कारकिर्दीत हंगेरीतल्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात चित्रपट बनवले. ग्युनेने त्याच्या देशातल्या दडपशाही करणाऱ्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणारे चित्रपट बनवले- चक्क तुरुंगातून त्याच्या सहकाऱ्यांना कधी चिठ्याचपाट्या पाठवून, तर कधी सविस्तर सूचना देऊन!

त्यावरून आठवण झाली. अगदी अलीकडे 2010 मध्ये जफर पनाही या इराणी दिग्दर्शकाला ‘सरकारविरोधी कारवाया आणि देशद्रोह’ अशा आरोपांखाली अटक करून तुरुंगात टाकल्याचं समजल्यावर जगभरातल्या कलावंतांनी त्या कृत्याचा निषेध केल होता. पनाहीला सहा वर्षांचा तुरुंगवास आणि चित्रपट बनवण्यावर 20 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पटकथा लिहिणं आणि कोणतीही मुलाखत देणं या गोष्टींची मनाई आहे; फक्त वैद्यकीय उपचारांसाठी किंवा हाजयात्रेला जाण्यासाठी देशाबाहेर जाण्याची मुभा आहे. असं असूनही पनाहीने तुरुंगातून This is not a film नावाची एक व्हिडिओ डायरी बनवून देशाबाहेर स्मगल केली, जी 2011च्या कान महोत्सवात दाखवली गेली. यंदाच्या बर्लिन महोत्सवात पनाहीच्या पटकथेवर बनवलेल्या “Closed eurrtain”  या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट लेखनाचा ‘गोल्डन बेअर’ पुरस्कार देण्यात आला. तसंच काहीसं ‘द पेशन्स स्टोन’ आणि ‘द अर्थ ॲन्ड ॲशेस’ या दोन चित्रपटांविषयी वाटतं. अफगाणिस्तानात तालिबानविरोधी ठाम भूमिका घेणाऱ्या प्रक्षोभक चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती करणारा अतिक रहिमा! बंडखोरीचा ध्वज उभा केलेले असे चित्रपट ‘प्रभावित’ होण्याचे वेगळे पदर उलगडून दाखवतात.

माझ्या कॉलेजच्या दिवसांत चित्रकलेच्या प्रांतात नवनवीन गोष्टी शिकत असतानाच इंग्रजी चित्रपट बघण्याची गोडी लागली. या गोडीला वेगळी दिशा मिळाली ती ‘फिल्म फोरम’ नामक फिल्म सोसायटीमध्ये बघितलेल्या अनोळखी भाषेतल्या एका चित्रपटामुळे! हॉलिवुडच्या तोवर पाह्यलेल्या उत्कृष्ट चित्रपटांपेक्षा सर्वार्थाने वेगळ्या अशा ‘सेवन्थ सील’ने पहिल्यांदाच मला अंतर्मुख होण्याचा अनुभव दिला. त्या पाठोपाठ, बर्गनच्याच ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’, ‘व्हर्जिन स्प्रिन्ग’, ‘थ्रू अ ग्लास डार्कली’सारख्या चित्रपटांनी माझ्यातल्या दृश्यकलेच्या भानाला नवी दृष्टी दिली. नंतर अनेक वर्षांनी या अद्वितीय दिग्दर्शकाने प्रभावित केलेल्या प्रख्यात दिग्दर्शकांची लांबलचक यादी वाचून मला भरून आलं. स्वत: अनेक अजरामर कलाकृती तयार करणाऱ्या  किस्लोवस्कीने बर्गनविषयी म्हटलंय-

‘‘मानवी अंतरंगांबद्दल दोस्तोवस्की किंवा काम्यूने जे काही साहित्यात सांगितलं, त्या दर्जाचा अनुभव चित्रपटातून देणारी बर्गमन ही बहुधा एकमेव व्यक्ती असावी!’’ बर्गमनचं बोट धरून पुढे जाता-जाता हॉलिवुडपेक्षा किती तरी वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा सिनेमा बघण्याचं भाग्य मला लाभलं. स्वीडिश, जपानी, पोलिश, हंगेरियन, फ्रेन्च, इटालियन, जर्मन अशा अजिबात न समजणाऱ्या भाषांधले चित्रपट माझ्या जाणिवांना नवनवीन परिमाणं देत गेले. तरुणपणी आडवळणाच्या छोट्याशा गल्लीतल्या ताराबाई हॉलपासून सुरू झालेला हा प्रवास नंतरच्या काळात, तीर्थयात्रेला जाण्याच्या भावनेने आंतरराष्ट्रीय महोत्सवांना हजेरी लावण्यापर्यंत चालूच राह्यला आहे. ‘अनवट’ चित्रपट पाहण्याच्या वीसेक वर्षांच्या या संपूर्ण कालखंडानेच मला ‘प्रभावित’ केलं होतं, असं म्हणायला हवं.

भारतीय चित्रपटसृष्टीत 1950च्या दशकात नव्या वाटा धुंडाळणाऱ्या चित्रपटांचा प्रवास पुढच्या कालखंडात कसा झाला याचा मागोवा घेणं महत्त्वाचं ठरेल.

1960च्या दशकाची सुरुवात बिमल रॉयच्या ‘परख’पासून झाली. अजून बाल्यावस्थेत असलेल्या आपल्या लोकशाहीवर नर्म विनोदी भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटानंतर 61 मध्ये यश चोप्राने फाळणीच्या पार्श्वभूमीवर खदखदणारा जातीयवाद आणि धर्मांध प्रवृत्तींवर कोरडे ओढणारा ‘धर्मपुत्र’ बनवला. या आधी 1959 मध्ये ह्याच तरुणाने कुमारी मातृत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडणारा ‘धूल का फूल’ बनवून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. (तरल प्रेमकहाण्या सांगणारा ‘बॉलिवुड’चा अनभिषिक्त बादशहा हे बिरूद अगदी अलीकडच्या काळात त्याला लावलं गेलं.) 1962 मध्ये गुरू दत्तचा ‘साहिब, बीवी और गुलाम’, 63 मध्ये के.ए. अब्बासचा ‘शहर और सपना’ आणि बिमल रॉयचा ‘बंदिनी’; त्या मागोमाग 1966 मध्ये बासू भट्टाचार्यांचा ‘तिसरी कसम’सारखे बदलत्या सामाजिक आणि नैतिक मूल्यांशी अडखळणाऱ्या सामान्य माणसाच्या अंतर्द्वद्वाचं भान देणारे एकाहून एक महत्त्वाचे चित्रपट बनले.

मुख्य धारेच्या महासागरात प्रवाहाविरुद्ध जाण्याचे असे प्रयत्न हिंदी भाषक चित्रपटात होत असताना, त्याच कालखंडात बंगाली भाषेत ऋत्विक घटकचा ‘मेघे ढाका तारा’, सत्यजित रायचा ‘महानगर’ आणि तपन सिन्हांचा ‘अपनजन’ आले. शहरांध्ये झपाट्याने होणाऱ्या बकालीकरणावर प्रभावी कलात्मक भाष्य करणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.

आपल्या चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या वाटचालीतला ‘मेघे ढाका तारा’ हा अत्यंत प्रेरणादायक असा मैलाचा दगड मानला जातो आणि तपनदांच्या ‘अपनजन’ची हिंदी प्रतिकृती म्हणजे गुलजारचा ‘अपने पराये’! आपल्या मराठीतसुद्धा राजा परांजपेंचा ‘जगाच्या पाठीवर’ आणि भालजी पेंढारकरांचा ‘साधी माणसं’ याच दशकातले! आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे 1965 मध्ये रामू करियात या तरुण दिग्दर्शकाने मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे जीवन आणि त्यांचे सागराशी असलेले ऋणानुबंध दाखवणारा ‘चेम्मीन’ नावाचा चित्रपट बनवून दाक्षिणात्य सिनेमात खळबळ माजवली. तोपर्यंत बहुतांशी कामोत्तेजक चित्रपटांची पैदास करणारा प्रदेश अशी ओळख असलेल्या मल्याळम सिनेमाला तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेल्या, हृषीकेश मुखर्जीचं संकलन आणि सलील चौधरींचं संगीत लाभलेल्या या फिल्मने नवा तोंडवळा दिला.

या पार्श्वभूमीवर आणि अशा चित्रपटांना लाभलेल्या लोकाश्रयामुळे असेल कदाचित; मुख्य धारेतल्या धंदेवाईक सिनेमाला सशक्त पर्याय म्हणून- भारत सरकारने फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना केली, जिचं पुढे NFDC मध्ये रूपांतर झालं, त्या FFC/NFDC ने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेल्या चित्रपटांकडे नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी- ठरावा. प्रतिथयश लेखक राजिन्दरसिंग बेदींचा ‘दस्तक’, कुमार साहनीचा ‘मायादर्पण’, मृणाल सेनचा ‘एक अधूरी कहानी’, मणि कौलचा ‘दुविधा’ आणि मुझफ्फर अलीचा ‘गमन’ या प्रत्येक चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या भाषेत एक छोटीशी पण महत्त्वाची भर घातली.

याच 1970 च्या दशकात सत्यजित रायचा ‘प्रतिद्वंद्वी’ आणि मृणाल सेनचा ‘इन्टरव्ह्यू’ हे तरुणाईच्या व्यथांना भिडणारे चित्रपट आले; तर मराठीत सत्यदेव दुबेने पथदर्शक ‘शांतता कोर्ट चालू आहे’ बनवला आणि जब्बार पटेलने ‘सामना’, शिवाय राजदत्तांचा ‘देवकीनन्दन गोपाला’ आणि जयू-चिनू पटवर्धनांचा ‘22 जून’सारखे भारतीय चित्रपटसृष्टीला मराठीची पुन्हा एकदा दखल घ्यायला लावणारे चित्रपटही या दशकातलेच. तसंच मल्याळीमध्ये अरविंदनच्या ‘उत्तरायण’ आणि ‘कांचन सीता’सारख्या सिनेमांमुळे नव्या युगाची पहाट झाली आणि त्यापाठोपाठ ‘स्वयंवरम्‌’ने अदूर गोपालकृष्णनच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सुरुवात झाली. सत्तरीच्या दशकातून ऐंशीच्या दशकात मराठी सिनेमाने प्रवेश केला तो जब्बार पटेलच्या ‘उंबरठा’ आणि माझ्या ‘आक्रीत’सारख्या केवळ भारतीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय  चित्रपटसृष्टीला दखल घ्यायला लावणाऱ्या कलाकृतींनी!

यंदाच्या वर्षी, आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले गेले; आठवणींची उजळणी झाली; अजरामर प्रणयगीतं आणि इतर गाण्यांवर चित्रित केलेल्या नृत्यांचे तुकडे जोडून नव्या गोधड्या शिवल्या गेल्या. एकूणच, गौरवशाली परंपरेतल्या चित्रपटांच्या योगदानाची गाथा सांगितली गेली. हे आजच्या झटपट- instant संस्कृतीला साजेसं आणि remixच्या जमान्यात चपखल बसणारं असल्यामुळे आपल्याला खटकलंही नाही. ह्या सगळ्या ‘लखलख चंदेरी’ झगमगाटात एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, आज मागे वळून बघताना आम्हाला हिंदीमधल्या मुख्य धारेतल्या चित्रपटांची आठवण वारंवार करून दिली गेली शोले, दीवार, दिलवाले दुल्हनिया... झालंच तर ‘मुगल-ए-आजम’ यांसारख्या बॉक्स ऑफीसवर विक्रम करणाऱ्या चित्रपटांची!

पण प्रादेशिक सिनेमाला मात्र अनुल्लेखानं मारलं. तसंच हिंदीतल्या भुवन शोम, तिसरी कसम, गरम हवा किंवा बंदिनी, दस्तक, सत्यकामसारख्या चित्रपटांना स्मृतिआडच ठेवलं गेलं. खरं तर सामाजिक भान असलेल्या, प्रवाहाबरोबर जाऊन वेगळी दिशा दाखवणाऱ्या सिनेमाचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या पायवाटांच्या टप्प्याटप्प्यांवर आधीच्या पिढ्यांनी उमटवलेल्या या छोट्या-मोठ्या पाऊलखुणांचा मागोवा घेताना तरुण पिढीला नव्या वाटा सापडतात, असा माझा विश्वास आहे. कालातीत वा कायम स्वरूपाचा अनुभव देणाऱ्या कलाकृती निर्माण होण्याची शक्यता वाढवण्यासाठी अशा retrospective ची नितांत गरज आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मला प्रभावित करून राह्यलेल्या हंगेरियन दिग्दर्शक यान्चोविषयी थोडंसं...

ज्या कालखंडात यान्चोच्या ‘इलेक्ट्रा’ चित्रपटाशी माझी भेट झाली; तेव्हा चित्रकार म्हणून मी स्वत:ची ओळख शोधत होतो, नाट्यक्षेत्रात माझी लुडबूड नुकतीच सुरू झाली होती आणि चित्रपटाशी संबंध ‘बघण्या’पुरताच होता. त्यामुळे चित्रपटाच्या तांत्रिक अंगांची फारशी जाणही नव्हती. पण यान्चोचा चित्रपट सुरू झाल्यावर काही क्षणांतच पहिली गोष्ट जाणवली ती अशी की- खूप वेळानं संपणाऱ्या लांबच-लांब शॉटसोबत बघता-बघता माझा श्वास रोखलाय; माझ्या शेजारच्या प्रेक्षकाची बोटंही खुर्चीच्या हातावर आवळली आहेत.

पडद्यावर दिसणाऱ्या एका विस्तीर्ण माळरानावर जाणाऱ्या मिरवणुकीमधून वावरणारी चित्रपटातली प्रमुख पात्रं, त्यांच्या लयबद्ध हालचाली choreographed असूनही वास्तववादी शैलीतल्या घटनांशी संबंध जोडणाऱ्या; एवढ्याच दृश्यात अचानक मिरवणुकीच्या समोरून आणि दृश्यमालिकेमध्ये काही वेळानंतर प्रमुख पात्रं बोलत-बोलत वळून परत जात असताना सूर्यास्त झालेला दिसतो, तेव्हा त्याच टेकडीवर पसरणाऱ्या संधिप्रकाशात आधीचीच मिरवणूक हातात भल्या मोठ्या मेणबत्त्या घेऊन येताना दिसते आणि मला पुन्हा एकदा जाणवलं की, अजूनही शॉट कट झालेला नाही, मघाचाच शॉट चाललाय! मला असंही जाणवलं की- मी, माझ्या दोन्ही बाजूचे शेजारी आणि आमच्यासकट सगळे प्रेक्षक शॉट संपल्यावर मगच श्वास घेतील, अशी अवस्था प्रेक्षागृहात आहे.

फक्त 13 शॉट्‌समध्ये बनवलेल्या, अमूर्तवादी घाटाच्या रूपकात्मक कथनशैलीचा वापर करून साकारलेल्या ह्या चित्रपटाची कित्येक पारायणं मी आजवर केली; तरी दर वेळेला एखाद्या ताज्या बनवलेल्या चित्रपटात प्रकर्षाने जाणवतो तो आपल्याला स्वप्नवत्‌ अवस्थेत घेऊन जाताना जुलमी राज्यकर्त्यांच्या दडपशाहीवर आसूड ओढणारा क्रांतिकारी यान्चो! सिनेमामाध्यमावरची जबरदस्त पकड वापरून कविमनाचा आकांत हळुवारपणे दाखवणारा मनस्वी यान्चो!

कलाक्षेत्रात नुकतं पाऊल टाकलेल्या माझ्यासारख्या नवशिक्या तरुणाला चित्रपटमाध्यमाच्या कक्षा विस्तीर्ण क्षितिजापर्यंत नेऊन दाखवणारा हा यान्चो त्याच्या वयाच्या नव्वदीमध्येसुद्धा आज चित्रपट बनवतो आहे आणि त्याच्या प्रत्येक नव्या कलाकृतीतून कित्येकांना नव्याने प्रेरणा देतो आहे. नवशिक्या मुलाच्या उत्साहानेच यान्चोला भेटावं, त्याच्या प्रतिभेविषयी आणि कलाकृतींविषयी अगणित प्रश्न विचारावेत... त्यामुळे त्या अमूर्त, दृश्यकाव्यात्मक चित्रबंधांविषयीचा गुंता सुटेल की वाढेल- हासुद्धा सृजनाचाच एक ‘बोचरा खटाटोप!’ एखादा कलावंत आणि त्याची कलाकृती अशी जिज्ञासा, कुतूहल आणि प्रेरणा जर इतकी वर्षं जिवंत आणि ताजी ठेवू शकत असेल, तर ते ‘प्रभावशाली’ ठरत नाही का?

Tags: अमोल पालेकर बीजलेख चित्रपटांचा प्रभाव हंगेरियन दिग्दर्शक यान्चो amol palekar films cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अमोल पालेकर,  पुणे, महाराष्ट्र

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके