डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे विषय घेऊन केंब्रिजमधून आपली विद्यार्थीदशा सुरू करणाऱ्या नेहरूंना अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचेही आकर्षण होते. तो काळ विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला या संशोधनाच्या क्षेत्रातही फार मोठे बदल घडविणारा होता. नेहरूंचे चौकस मन आणि ज्ञानाची तृष्णा त्यांना त्याही गोष्टींकडे वळवितच होती. सर जे.जे. थॉमस यांचा गॅसमधून वीज प्रवाहित करण्याचा युगप्रवर्तक शोध नुकताच पुढे आला होता. बर्गसनच्या तत्त्वचिंतनाने इंग्लंड भारावले होते. एच.जी. वेल्स आणि बर्नार्ड शॉ यांच्या वाङ्‌मयाने इंग्लंडसह साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. आईनस्टाईनचे संशोधन जगात एका नव्या क्रांतीला जन्म देत होते. थॉमस हार्डीचे लिखाण साऱ्यांना रिझवीत आणि दिपवीत होते. याच काळात स्पेनचे पॅब्लो पिकासो त्यांच्या नव्या चित्रसृष्टीने जगाच्या सांस्कृतिक विश्वात खळबळ माजवीत होते.

जवाहरलालांच्या वयाच्या दहाव्या वर्षी (1899 मध्ये) मोतीलालजी त्यांच्या कुटुंबासह आनंद भवनमध्ये राहायला आले. त्या महालवजा वास्तूत पोहण्याच्या तलावापासून घोड्यांच्या तबेल्यापर्यंतच्या साऱ्या वैभवी सोई होत्या. घर विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात न्हाऊन निघणारे होते आणि त्यातच मोतीलालजींच्या मित्रांच्या सायंकाळच्या मैफली रंगत होत्या. त्यात चित्तरंजन दासांपासून तेजबहादूर सप्रूंपर्यंतचे नामांकित कायदेपंडित व नामवंत लेखक आणि विचारवंत भाग घेत. याच काळात नेहरूंनी घोडसवारी आणि उत्तम प्रतीचे पोहणे शिकून घेतले. हा बोअर युद्धाचा काळ होता. त्याच्या बातम्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. नेहरूंच्या मनाचा कल इंग्रजांविरुद्ध व बोअरांच्या बाजूने जाणारा आहे...

या काळातली एक घटना त्यांचे मन सांगणारी आहे. त्यांच्या पाठीवर तब्बल 11 वर्षांनी विजयालक्ष्मींचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी मोतीलालजी विदेशात होते. आईजवळ मग जवाहर आणि घरची इतर माणसे होती. प्रसूतिगृहातून बाहेर येणाऱ्या डॉक्टरांनी जवाहरलालांना निराशेच्या सूरात ‘तुला बहीण झाल्याचे’ सांगितले. त्यावर त्याही वयात जवाहरलाल संतापले. ‘तर’ असे काहीशा तिरस्काराने म्हणून ते डॉक्टरांपासून दूर झाले. ही माणसे मुलींच्या जन्माचा असा  दुस्वास का करतात, हा प्रश्न मग त्यांनी आईलाच विचारला.

मोतीलालजींच्या विदेशवारीनेही या काळात काश्मिरी ब्राह्मणांच्या वर्गात वादळ उठविले. विदेशवारीनंतर त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह मोतीलालजींना वेडगळपणाचा वाटत होता. परिणामी, त्यांच्या घरावर बहिष्कार टाकण्यापर्यंत या काश्मिरी ब्राह्मणांची मजल गेली. पण मोतीलालजी बधले नाहीत. अखेर कर्मठांनीच माघार घेतली व बहिष्काराचा विचार सोडून दिला. याच काळात त्यांचा थिऑसॉफिस्टांशी संबंध आला. त्या पंथाच्या रशियन संस्थापक मादाम ब्लाव्हाट्‌स्की यांच्याकडूनच त्यांनी त्या पंथाची दीक्षा घेतली. मात्र त्याबाबतचे आचरण त्यांनी लगेच सोडलेही होते.

ॲनी बेझन्ट या त्या पंथाच्या भारतातील आघाडीच्या नेत्या होत्या. त्या अतिशय प्रभावी वक्त्या होत्या. त्यांच्या भाषणांनी जवाहरलाल भारावले होते. या बेझन्ट बाईंनीच त्यांना फर्डिनांड टी. ब्रुक्स हा शिक्षक मिळवून दिला होता. जवाहरलालांनी त्या पंथाची दीक्षा घेण्याची परवानगी मागितली तेव्हा, ‘‘घ्यायची असेल तर घे’ असे त्यावर मोतीलालजी म्हणाले.

लंडन येथील हॅरो स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला जाणाऱ्या पंधरा वर्षे वयाच्या जवाहरलालांसोबत प्रत्यक्ष मोतीलालजी आणि स्वरूपराणी त्यांच्या विजयालक्ष्मी या धाकट्या कन्येसह इंग्लंडला आले. सोळाव्या शतकाच्या मध्याला पहिल्या एलिझाबेथ राणीने स्थापन केलेली ही शाळा लंडनपासून नऊ मैल अंतरावर होती. तीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या राहण्याची सोय होती. नेहरूंचे वय येथे येणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा तीन वर्षांनी अधिक होते. त्यामुळे तीत समरस व्हायलाच त्यांना काही काळ घालवावा लागला. बडोद्याच्या गायकवाड घराण्याचे राजपुत्र त्या शाळेत होते, क्रिकेटमधील प्रावीण्यामुळे व स्वभावातील गोडव्यामुळे ते विद्यार्थ्यांत अतिशय प्रिय होते. मात्र ते नेहरूंच्या बरेच पुढे असल्याने त्या वेळी त्यांचा प्रत्यक्ष संबंध फारसा आला नाही. कपुरथला संस्थानचे राजपुत्रही त्या शाळेत होते, पण त्यांच्या सरंजामी वृत्तीने व वैभवाचा देखावा करण्याच्या स्वभावामुळे ते साऱ्यांच्या टिंगलटवाळीचा विषय होते. ‘तुम्ही माझ्या राज्यात या, मग मी एकेकाला दाखवतो’ अशी धमकी वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना देईपर्यंत त्या राजपुत्राच्या रागाचा पारा वर चढायचा.

त्या साऱ्यांत ज्ञान, अध्ययन व मूलभूत ग्रंथांचा अभ्यास या बळावर नेहरूच फार पुढे होते. त्यामुळे ते साऱ्यांच्या विस्मयाचा विषयही होते. तत्त्वज्ञानापासून धर्मशास्त्रापर्यंत आणि वाङ्‌मयाच्या समीक्षेपासून उत्तमोत्तम कवितांपर्यंतचे सगळेच विषय त्यांना अवगत होते. त्यातून ते दर दिवशी वृत्तपत्रांचे अतिशय सूक्ष्म वाचन करीत. त्यामुळे सामान्य ज्ञानातही ते साऱ्यांच्या पुढे असत.

तो काळ इंग्लंडच्या निवडणुकांचा होता आणि त्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे कॅम्पबल बरनान सरकार मोठ्या बहुमतानिशी पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. वर्गातल्या अध्यापकांनी इंग्लंडच्या तत्कालीन राजकीय स्थितीविषयी विचारलेल्या प्रश्नाला नेहरूंखेरीज दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उत्तर देता आले नाही. नेहरूंच्या उत्तरात इंग्लंडचे राजकीय विश्लेषण होते, लिबरल पक्षाच्या विजयाची कारणे होती आणि कॅम्पबेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सभासदांची नावेही त्यांच्या अनुक्रमानिशी होती. त्यांच्या उत्तराने शिक्षक थक्क झाले होते आणि वर्ग थिजून गेला होता.

त्याच सुमारास मोतीलालजींना लिहिलेल्या पत्रात नेहरू म्हणतात, ‘इथल्या विद्यार्थ्यांना क्रिकेट आणि टेनिसखेरीज काही येत नाही. त्यांना राजकारणात रस नाही आणि समाजकारण समजून घेण्याची इच्छा नाही. मला येथे कंटाळल्यागत होऊ लागले आहे.’ हाच काळ राईट ब्रदर्स यांनी लावलेल्या विमानाच्या शोधाचा होता. त्यांचे विमान त्याच्या अखेरच्या उड्डाणात 24.1 मिनिटे हवेत राहिले होते. नेहरू त्या संशोधनाने कमालीचे उत्तेजित झाले होते. ते प्रत्यक्ष पाहण्याचा व त्यामागील विज्ञानाचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न त्यांनी काही काळ केला. मोतीलालजींना या वेळी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात- ‘हा प्रयोग यशस्वी झाला तर थोड्याच काळात मी प्रत्येक विकेंडला तुम्हाला भेटायला भारतात येऊ शकेन.’

हॅरोचे विद्यालय इंग्लंडच्या इतिहासात मान्यता पावलेले होते. त्या शाळेने चार पंतप्रधान इंग्लंडला दिले होते. पिल, पामर्स्टन, बाल्डविन आणि विन्स्टन चर्चिल. त्यापुढे पाचव्या पंतप्रधानाचा समावेश व्हायचा होता. ते पंतप्रधान होते भारताचे पं.जवाहरलाल नेहरू. (हॅरो विद्यालयाच्या 1952 मध्ये झालेल्या वार्षिकोत्सवात नेहरू व चर्चिल हे दोघेही पंतप्रधानपदावर असताना एकमेकांजवळ उभे राहून त्या शाळेची गाणी म्हणत असल्याचे छायाचित्र आजही त्या शाळेत लागले आहे.) या शाळेत असतानाच कुठलीशी स्पर्धा जिंकल्याने नेहरूंना जी.एम. ट्रॅव्हेलीनने लिहिलेल्या गॅरिबाल्डीच्या चरित्राचा एक खंड बक्षीस म्हणून मिळाला. नेहरू गॅरिबाल्डीच्या चरित्राच्या, त्याच्या पराक्रमाच्या व त्याच्या चारित्र्याच्या प्रेमात एवढे पडले की, त्यांनी त्या चरित्राचे इतरही दोन खंड परिश्रमपूर्वक मिळविले. त्यांची त्यांनी अनेक पारायणे केली.

इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यातील गॅरिबाल्डीचा सहभाग हाच काही काळ त्यांच्या प्रेरणेचा स्रोत बनला. गॅरिबाल्डीसारखा स्वातंत्र्याचा लढा भारतातही उभा व्हावा आणि आपण त्यात सहभागी व्हावे, या विचारानेच त्यांचे मन दीर्घ काळ व्यापले होते. तो प्रभाव त्यांच्या मनावर एवढा खोलवर होता की, इटली व भारताच्या राजकीय, भौगोलिक व ऐतिहासिक प्रवाहांचे सारखे स्वरूप त्यांच्या मनात कायमचे रूढ झाले.

पुढे आपल्या आत्मचरित्रात इटलीविषयी लिहिताना त्यांनी तेथील रोम शहराची तुलना आपल्या बनारसशी केली... जपानने रशियाच्या केलेल्या पराभवाच्या आठवणी मनात ताज्या होत्या. याच सुमारास तुर्कस्तानने ग्रीकांना हरविले होते आणि त्यावर गॅरिबाल्डीच्या विषयाचा परिणाम मनात होता. स्वातंत्र्याच्या प्रेरणा जागवायला याहून आणखी काय हवे होते? हा काळ भारतातल्या वाढत्या असंतोषाच्या बातम्या इंग्लंडपर्यंत पोहोचविणाराही होता. लॉर्ड कर्झनने बंगालच्या केलेल्या फाळणीमुळे (1905) त्या प्रदेशात जेवढी अशांतता उसळली, तेवढाच सारा देश अस्वस्थ झाला होता. ही फाळणी प्रशासकीय कारणांसाठी केल्याचे ब्रिटिश सरकार कितीही सांगत असले, तरी तिच्या धार्मिक कडा साऱ्यांना दिसत होत्या. खरे तर पुढे झालेल्या देशाच्या धार्मिक फाळणीची ही नांदीच होती.

देशात स्वदेशी मालाच्या वापराची व विदेशी मालावरील बहिष्काराची चळवळ सुरू झाली होती. या असंतोषाची बिजे काँग्रेस संघटनेतही खळबळ करणारी होती. त्या काळापर्यंत काँग्रेसवर असलेला फिरोजशहा मेहता व ना. गोखले आदी मवाळांच्या प्रभावाला लोकमान्य टिळकांचे ज्वालाग्राही राजकारण आव्हान देत होते. 1907 मध्ये सुरतला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात टिळकांनी मवाळांना संघटनेतून जवळजवळ हद्दपारच केले होते. मोतीलालजी या अधिवेशनाला हजर होते. त्यांना टिळकांचा अतिरेक आवडला नसला, तरी त्यांच्या  नेतृत्वातले लढाऊपण आकर्षून गेले होते. अधिवेशनाच्या अखेरीस मवाळ पुन्हा शिरजोर झाले आणि संघटना त्यांच्याकडेच राहिली. मात्र या वेळी त्यांच्या प्रभावाला तडेही गेले होते. त्यानंतर लगेच 1908 मध्ये टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याने त्यांची देशभक्ती इतर साऱ्यांहून काकणभर सरस आणि अधिक लखलखती झाली.

अगोदर टिळकांनीच वंगभंगाविरुद्धच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. देशात राष्ट्रभक्तीचे जागरण करायला त्यांनी महाराष्ट्रात गणेशोत्सव व शिवरायांचा उत्सव सुरू केला होता. 'केसरी’ हे त्यांचे वर्तमानपत्र. टिळक आपल्या प्रत्येक अंकातून इंग्रज सत्तेवर एकाहून एक कठोर प्रहार करीत होते. अहिंसा ही त्यांची गरज होती, मात्र हिंसाही त्यांना वर्ज्य नव्हती. टिळकांच्या गणेशोत्सवाने बंगालला कालिमातेच्या उत्सवाची प्रेरणा दिली, तर तिकडे पंजाबात इंग्रजविरोधी उठावाचा आरंभ झाला होता. नेमक्या याच काळात देशात सांविधानिक सुधारणांच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या.

कॅम्पबेल सरकारने पूर्वी कॅनडाचे गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड मिन्टो यांना भारतात व्हाईसरॉय म्हणून पाठविले. लॉर्ड मोर्ले हे तेव्हा त्या सरकारात भारतमंत्री होते. भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर अर्थातच नव्हता. पण तुकड्या-तुकड्याने ते देता आले आणि तेथील असंतोष आवरता आला तर तो करावा, हा त्यामागचा हेतू होता. त्यांनी आणलेली मोर्ले- मिन्टो योजना, मुसलमानांना वेगळे मतदारसंघ देणारी व आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणारी होती. मतदारांच्या संख्येत काहीशी वाढही केली गेली. या घटनांच्या बातम्या इंग्रजी वृत्तपत्रांतून फारशा उमटत नसल्या तरी नेहरू त्यांची आतुरतेने वाट पाहत व देशात होत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवीत. याच काळात द.आफ्रिकेत महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अभिनव व अहिंसात्मक सत्याग्रहाची वृत्तेही त्यांच्यापर्यंत पोहोचत व तिथे जगावेगळे काही घडत असल्याबद्दलची त्यांची उत्सुकता चाळवली जाई. तीन वर्षे हॅरोमध्ये राहून नेहरू केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले.

हॅरोमध्ये ते रमले नसले, तरी ती संस्था सोडताना त्यांचे डोळे पाणवले होते. त्या संस्थेतील शिक्षक व मार्गदर्शकांविषयीचा जिव्हाळा त्यांच्या मनात होता. घरापासून एवढी वर्षे दूर राहिलेल्या जवाहरलालांना त्यांनीच आपुलकीने सांभाळले व जपले होते. हॅरो विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व अनेक शिक्षकांनी नंतरच्या काळात नेहरूंविषयी अतिशय आत्मीयतेने लिहिलेही आहे.

रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र हे विषय घेऊन केंब्रिजमधून आपली विद्यार्थिदशा सुरू करणाऱ्या नेहरूंना अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचेही आकर्षण होते. तो काळ विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला या संशोधनाच्या क्षेत्रातही फार मोठे बदल घडविणारा होता. नेहरूंचे चौकस मन आणि ज्ञानाची तृष्णा त्यांना त्याही गोष्टींकडे वळवीतच होती. सर जे.जे. थॉमस यांचा गॅसमधून वीज प्रवाहित करण्याचा युगप्रवर्तक शोध नुकताच पुढे आला होता. बर्गसनच्या तत्त्वचिंतनाने इंग्लंड भारावले होते. एच.जी. वेल्स आणि बर्नार्ड शॉ यांच्या वाङ्‌मयाने इंग्लंडसह साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. आइन्स्टाईनचे संशोधन जगात एका नव्या क्रांतीला जन्म देत होते. थॉमस हार्डीचे लिखाण साऱ्यांना रिझवीत आणि दिपवीत होते. याच काळात स्पेनचे पाब्लो पिकासो त्यांच्या नव्या चित्रसृष्टीने जगाच्या सांस्कृतिक विश्वात खळबळ माजवीत होता. त्या साऱ्यांसोबत फ्रॉईडने सांगितलेले माणसाच्या मूलभूत प्रेरणांधील लैंगिकतेचे माहात्म्य एक नवा कोलाहल उभा करीत होते. मात्र याही वातावरणात नेहरूंचे कवितेविषयीचे प्रेम जागे होते. राजकारण आणि भारतातील घडामोडी यावरचे लक्ष कायम होते. वयाच्या मागणीप्रमाणे त्यांच्यात स्त्रीविषयक आवडही होती. पण त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ती कमालीची ‘अनुत्साही’ होती. त्याविषयीच्या त्यांच्या मनातील मर्यादा धार्मिक नव्हत्या आणि लैंगिकता म्हणजे पाप हेही त्यांना मान्य नव्हते. तरीही ते त्याविषयी पुरेसे नीरस मात्र होते.

याच काळात त्यांच्या शेल्फवर ऑडेन, मॅन्सफिल्ड, वॉल्टर मरे, स्पेन्सर, इलियट आणि यिट्‌स यांची पुस्तके आली. पुढे ती आनंद भवनातही त्यांच्यासोबत गेली. या साऱ्यांसोबत ते असत. त्यांचे मन त्यात असे. मात्र त्यांचा आत्माच त्यातून मुक्त असे. हा सारा आपल्याभोवतीच्या एका सांस्कृतिक नेपथ्याचा भाग आहे, असे त्यांना वाटे. तरीही त्यातल्या अनेक कवींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्या ते स्वत:शी गुणगुणतही. याच काळात त्यांना त्यांचे अनेक भावी मित्र व सहकारी मिळाले. जे.एम. सेनगुप्ता त्यांच्याहून वडील होते. केंब्रिजनंतर ते बंगालमध्ये गेले आणि त्यांनी त्या प्रांतात स्वत:चे नेतृत्वच उभे केले. सय्यद अहमद हे बिहारमधून आलेले स्नेही पुढे त्यांच्या मंत्रिमंडळाचे सभासदही झाले. सैफुद्दीन किचलू हे मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंपासून दूर झाले आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते बनले. त्यांचे तेव्हाचे व नंतरही आयुष्यभर राहिलेले मित्र होते श्रीप्रकाश. त्यांच्यामते, नेहरू तेव्हा होते तसेच ते अखेरपर्यंत राहिलेही. पुढे सरहद्द गांधी म्हणून ख्यातकीर्त झालेल्या बादशहा खानांचे बंधू डॉ.खानसाहेब हेही या काळात नेहरूंचे जिव्हाळ्याचे मित्र झाले. त्या दोघांतले मैत्रही अखेरपर्यंत कायम राहिले...

मात्र स्वभावातल्या मूळच्या एकाकी वृत्तीने नेहरूंना फार मित्र जोडता आले नाहीत. केंब्रिजमध्ये 'मजलिस' या नावाची भारतीय विद्यार्थ्यांची एक संघटना होती. तिच्याशी अल्पकाळ संबंध ठेवून मग ते दूर झाले. त्यांच्या स्वभावातले एकटेपणच त्यांना तिच्यापासून दूर नेणारे ठरले. याच काळात इंग्लंडमध्ये आलेल्या अनेक थोर भारतीयांची भाषणेही त्यांनी ऐकली. त्यातले बंगालचे बिपीनचंद्र पाल त्यांना फारसे भावले नाहीत. ग्लॅडस्टन हा इंग्लंडचा पंतप्रधान एकट्या महाराणीशी बोलतानाही जसा भाषण दिल्यासारखा जोरात बोलायचा, तसेच काहीसे बिपीनबाबूंचे होते. समोर एक जण असो वा हजार, ते लाखांच्या सभेत बोलावे तसे वरच्या पट्टीत आणि मोठ्या आवाजात बोलायचे. ‘प्रसंगी ते काय बोलतात, ते त्यांच्या कंठाळी आवाजाने मला कळतही नसे’, असे नेहरूंनीच लिहून ठेवले आहे. पंजाबचे लाला लजपत राय मात्र त्यांना खोलवर प्रभावित करून गेले. गोपाळकृष्ण गोखले यांच्या भाषणाएवढेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणही नेहरूंच्या आदराचा विषय झाले. पुढे 1915 मध्ये गोखल्यांना त्यांच्या वयाच्या 49 व्या वर्षी मृत्यू आला, तेव्हा नेहरू मनातून दुखावलेही होते.

Tags: गॅरिबाल्डी जी.एम. ट्रॅव्हेलीन हॅरो विद्यालय सुरेश द्वादशीवार विन्स्टन चर्चिल पंडित जवाहरलाल नेहरू Garibaldi and the Thousand g.m. trevelyan haro school wiston Churchill Suresh dwadashiwar Pandit Jawaharlal Neharu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके