डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

केशवसुतांना त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीची चांगली जाण होती. त्याबद्दल त्यांची मते पुरोगामी, सुधारणावादी होती. स्त्रीमध्ये विविध गुण असतात, ती कर्तबगार असते याची जाणीव केशवसुतांना आहे. आपल्या समकालीन स्त्रीमधील गुणांचे वर्णन केशवसुतांनी जितक्या मोकळेपणे आणि समग्रपणे केले आहे, तितके त्यांच्या आधीच्या किंवा नंतरच्या कवींनी केले आहे असे मला आढळलेले नाही.

केशवसुतांच्या कवितेत ‘मर्दानगी’ शोधूनही सापडत नाही. त्यांच्या कवितेत युद्धखोरी नाही, मनगटशाही नाही, जातीय दुरभिमान नाही, स्त्री-सौंदर्याच्या निव्वळ आत्ममग्न ‘भोगी’ जाणिवा नाहीत, पुरुषी श्रेष्ठत्व नाही. जे नाही ते नाही म्हणून सिद्ध करणे फारच कठीण आहे (‘शोधून दाखवा!’ एवढे आव्हान शक्य आहे!). केशवसुतांच्या कवितेत जे आहे ते किती विलक्षण विविधांगी माणूसपणाकडे झेपावणारे आहे, ते पहिले की मन थक्क होते.

माणूसपणाची विविध अंगे

केशवसुतांच्या काळात स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात होत होती. स्वातंत्र्याची मानवी ओढ केशवसुतांच्या कवितेत आहे-

‘‘राष्ट्रत्वाला फिरुन अमुचा देश येईल केंव्हा?’’

(एका भारतीयाचे उद्‌गार, समग्र केशवसुत, पृ.12८).

ही ओढ नुसती भावनिक पातळीवर नाही; आपला प्रिय धाकटा भाऊ, बापू, या स्वातंत्र्यलढ्यात कृतिशील सहभाग घेईल, अशी त्यांना आशा आहे :

‘’बापू गड्या! ध्वज उभा करशील काय?

तू देशकारण करू झटशील काय?’’

(गोष्टी घराकडिल मी वदता गड्या रे, समग्र केशवसुत, पृ.140).

जातिव्यवस्थेत किती कमालीचा अन्याय आहे याची त्यांना बोच आहे-

‘‘जरी त्यावरी सांवली माझि गेली,

तरी काय असे बाधा ठेविलेली?’’

(अन्त्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, समग्र केशवसुत, पृ.150) असा प्रश्न त्यांच्या कवितेत अन्त्यजाचा मुलगा विचारतो.

मजूरअड्‌ड्यावर आलेल्या कामगाराला काम मिळाले नाही, त्याचे दु:ख वर्णन करणारी कविता केशवसुतांनी लिहिली :

‘‘पोटा, करुनी मजुरीस मी भरी;

कोणी दिले न आज काम हो परी!’’

(मजुरावर उपासमारीची पाळी, समग्र केशवसुत, पृ.160).

शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारले तर केशवसुतांना राग आला.  100 वर्षांपूर्वीही, एक पूर्ण कविता लिहिण्याइतका तो विषय त्यांना महत्त्वाचा वाटला. अत्यंत जळजळीत भाषेत ते विचारतात,

‘‘कोणे मूर्खपणे गुरुपण तुला क्रूरा! असे रे दिले?

का खाटीक न जाहलास?- तुजला ते शोभते चांगले!’’

(मुलास झोडपणाऱ्या एका पंतोजीस, समग्र केशवसुत, पृ.163).

आपण कवी म्हणून जे सर्जक श्रम करतो, त्याबद्दल केशवसुतांना नुसती जाणीवच नाही तर अभिमान आहे:

‘‘शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?

पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते?’’

(‘आम्ही कोण?’, समग्र केशवसुत, पृ.2७)

कवितेतील स्त्री आणि स्त्री-पुरुष संबंध

केशवसुतांना त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीची चांगली जाण होती. त्याबद्दल त्यांची मते पुरोगामी, सुधारणावादी होती. आपले मित्र ह.ना.आपटे यांना ते लिहितात :

‘‘धीरा! उन्नतीचे पथांत उमदा राऊत तू चालसी!

नाही काय? करूनि चीत अगदी ती रूढिकाराक्षसी,

टांकाने अपुल्या दुराग्रह जुना मर्मी तसा विन्धुनी,

स्त्रीजातीस असाच काढ वरती! -घे कीर्ति संपादुनी!’’

(‘पण लक्षांत कोण घेतो?’च्या कर्त्यास, समग्र केशवसुत, पृ.202)

स्त्रीमध्ये विविध गुण असतात, ती कर्तबगार असते याची जाणीव केशवसुतांना आहे. आपल्या समकालीन स्त्रीमधील गुणांचे वर्णन केशवसुतांनी जितक्या मोकळेपणे आणि समग्रपणे केले आहे, तितके त्यांच्या आधीच्या किंवा नंतरच्या कवींनी केले आहे असे मला आढळलेले नाही. ते लिहितात :

‘‘विद्वत्ता, सुकवित्व, गद्यरचनाचातुर्य, वाक्‌कौशल,

चित्ताची समुदात्तता, रसिकता, सौजन्य ते दुर्मिळ,

ऐसे आढळती नरांतही क्वचित् एकत्र जे सद्‌गुण,

त्यांही मंडित पण्डिते सति! तुला माझे असो वन्दन!’’

(‘श्रीमती सौभाग्यवती काशीबाई हेरलेकर यांस’, समग्र केशवसुत, पृ.2७1).

केशवसुतांच्या कवितेत स्त्री आणि स्त्री-पुरुष संबंध यांविषयीच्या जाणिवेचे अनेक पदर आहेत. त्यातील महत्त्वाचा पदर उघडपणे लैंगिक सुखाचा आहे. प्रियाराधन, लैंगिक संबंधाआधीचा प्रणय आणि शरीरसुख यांचे केशवसुत अत्यंत मोकळेपणे वर्णन करतात. त्यातील काही नमुने वाचकांपुढे ठेवण्याचा मोह मला आवरत नाही :

‘‘तैसा येईन मी समुत्सुक गडे तूझ्याकडे चालत’’,

“तैशी घेईन मी तुला निजकरी तारे! त्वरेने बरे!”,

“आलिंगन तशी तुला दृढ उरी गे मंजुले! चांगुली”,

“तैशी सेवीन गोड ओष्टवटीका तुझी गडे! सुंदर”

(नाही ज्यापरी डोंगळा कधीहि तो गेला झणी, समग्र केशवसुत, पृ.12८).

पहिल्या रात्रीच्या अनुभवाचे हे वर्णन पाहा :

‘बायांनी धरुनी बळे’

(काही निवडक कडवी)

‘‘पानांच्या तबकातुनी जवळच्या, तांबुल जो दीधला

कांतेने स्वकरे मुखांत दुरुनी, चावुनी तो चांगला,

त्याचा भाग तिच्या मुखात अपुल्या जिव्हेमुळे द्यावया,

कोणी घेत असेल पुष्टजघनी अंकावरी ती प्रिया!

लज्जा सोडूनी जी परंतु विनये अंकावरी बैसली,

हातांची रचिली जिने पतीचिया कंठास हारावली,

तीचे उच्च कुचद्वया अपुलिया वक्षावरी दाबुनी,

कोणी पीत असेल ऐहिक सुधा वेगे तिला चुंबूनी!

केंव्हा दंत मुखावरी, स्तनतटी केंव्हा नखे रोवुनी,

गाढालिंगन देऊनी, निजकरे श्रोणी जरा तिम्बुनी,

केंव्हा अंगुलि त्या हळू फिरवुनी अंकी स्वकान्तेचिया,

कोणी यत्न असेल तो करित ती कामोद्धता व्हावया’’

(केशवसुतांना चुंबन फार आवडताना दिसते. प्रेम आणि प्रणय याविषयीच्या कवितांतून ते अनेक वेळा येते.)

लैंगिक सुखाचा अनुभव त्याला तिच्यात एकजीव करतो : केंव्हा त्या रजनी ?-- जीयांत विसरू मीतूपणाला मुळी! (नैर्ॠत्येकडला वारा, समग्र केशवसुत, पृ. 242) केशवसुतांच्या प्रेम आणि प्रणयविषयक कवितांचा विशेष असा की- या कवितांतील पुरुष आक्रमक नाही, आत्ममग्न शोषक नाही. तिला काय वाटते, तिला आनंद मिळतो आहे का; हे कवितेतील पुरुषाला महत्त्वाचे वाटते. ती कृतिशील आहे. ती निव्वळ सुंदर मादक बाहुली नाही. मर्दानगीच्या जमान्यातील पुरुषांना केशवसुतांचा प्रियकर ‘अजिबात पुरुष’ वाटणार नाही, कारण तो रडतो आणि त्याची त्याला लाज वाटत नाही :

‘‘टिपाया मी त्यांते, पदर सरसावी, परि गडे,

भिजोनी तो तुझे नयन सुकणे, हे नच घडे;-

असे का व्हावे हे न कळुनि रडे मी खळाखळा,

पुसाया तैं लागे अहह! नयना तोच मजला!’’

(प्रियेचे ध्यान, समग्र केशवसुत, पृ.121)

केशवसुतांच्या कवितेतील प्रियकर पुरुषाचा माणूसपणा एका अत्यंत वेगळेपणाने अचानक समोर येतो. ‘‘तुला पुढे कधीतरी मी तुझ्यासाठी कमी वाटलो तर काय?’ असा ‘मर्दानगी’ पुरुषाला कधी न पडणारा प्रश्न केशवसुतांच्या कवितेत प्रियकराला पडतो. तिला असे वाटू शकते, ही शक्यता या प्रियकर पुरुषाला जाणवते, हीच त्याची माणूसपणाच्या दिशेने मोठी झेप आहे. पण केशवसुतांची माणूसपणाकडची झेप, शंभर वर्षापूर्वी, याहीपुढे जाते. ते म्हणतात :

‘‘त्वत्प्रीतीस अपात्र हा जन तुला कालांतरी वाटला,

तोडावा तुजला मदीय जर हा संबंध गे लागला,

----------------------------

कंठी घालुनी हात, चुंबन हळू माझे गडे! तू करी,

मेरी जान्! गुलगार! सांग निघुनी जायास माते दुरी-

तेणे त्रास तुला न पडणे होईल माझे करे,

कां की ते तव सांगणे मज गडे वाटेल तेव्हां खरे !’’

(त्वत्प्रीतीस अपात्र हा जन-, समग्र केशवसुत, पृ.1८5)

‘आधी हो म्हणून आता नाही म्हणतेस? नव्हे, आधीच नाही म्हणतेस? तुझ्यावर ॲसिड टाकून तुला जन्माची विद्रूप करणे हे माझे पुरुषी कर्तव्य आहे’ असे मानणाऱ्या मर्दानगीच्या जमान्यात केशवसुतांचा प्रियकर हा मला स्वप्नातला आदर्श माणूस आहे असे वाटू लागते! केशवसुतांनी दाखवलेली पुरुषभानाची, माणूसपणाची वाट नंतरच्या कवींनी किती वहिवाटली? किती पुढे प्रवास केला? की, ते माघारी फिरले? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या प्रवासाला आता सुरुवात करू!

केंव्हा त्या रजनी? - जीयांत विसरू मीतूपणाला मुळी! (नैॠत्येकडला वारा, समग्र केशवसुत, पृ. 242)

Tags: केशवसुत पुरुष आनंद करंदीकर MarathiKavita Purush Anand Karandikar प्रेमकविता मराठी कविता Poetry Marathi Poetry Keshavsut weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके