डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ब्रह्मज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

आपल्या पूर्वजांच्या यशाचे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे दार्शनिक तत्त्वज्ञान. युरोप आणि मध्य-पूर्वेत एक देव, एक प्रेषित, एक धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथात सांगितलेले उपदेश  यामध्ये ज्यू, ख्रिस्ती व मुसलमान यांचे दार्शनिक तत्त्वज्ञान सीमित झाले; भारतात तसे झाले नाही. वेदांपासून ते शंकराचार्यांपर्यंत भारतात अनेक दार्शनिक तत्त्वज्ञाने झाली आणि या तीनही अंगांत भारतीयांनी बरीच प्रगती केली होती. प्राचीन भारतातील खगोलतज्ज्ञ हे उत्तम गणितीही होते. त्यांनी सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह यांची बदलती स्थाने काळजीपूर्वक मोजून अनेक सिद्धांत मांडले. भारतीय खगोलतज्ज्ञांची ख्याती दूरवर पसरली होती. खगोलशास्त्रविषयक अनेक भारतीय पुस्तकांची भाषांतरे त्या काळात अरबी आणि चिनी भाषांमध्ये करण्यात आली. या क्षेत्रातील आपल्या पूर्वजांची कामगिरी दाखवणारी एक लाखाहून जास्त हस्तलिखिते आजघडीलाही उपलब्ध आहेत.

विज्ञानदिन विशेष

मुंबईच्या राष्ट्रीय विज्ञान संमेलनात अनेक मंत्र्यांची भाषणे झाली. ‘देशामध्ये विज्ञानाचा विकास व्हावा, म्हणून सरकारची धोरणे काय असणार?’ यांसारख्या विषयांचा ऊहापोह मंत्र्यांच्या भाषणात अपेक्षित असतो. पण बहुसंख्य नेत्यांच्या भाषणात प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होते, याचीच माहिती होती. समाजाला प्रगती करायची असेल, तर आत्मविश्वास लागतो; आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व किती मोठे आहे, या जाणिवेतून आत्मविश्वास बळावतो. पण मुख्यतः इतिहासाचा अभ्यास हा इतिहासापासून शिकण्यासाठी करायचा असतो. आपली प्रगती ज्या क्षेत्रात, जेव्हा झाली तेव्हा त्याची कारणे काय होती? आपली प्रगती ज्या क्षेत्रात खुंटली, जेव्हा खुंटली; तेव्हा त्याची कारणे काय होती याचा शोध आणि त्यापासून घ्यायचा बोध महत्त्वाचा असतो. मुंबईत भाषणे करणाऱ्या नेत्यांनी असा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, मग बोध घेणे तर दूरच राहिले. म्हणून इतिहासाचा असा अभ्यास करण्याचे महत्त्व कमी होत नाही. वैज्ञानिक प्रगती करण्यासाठी अनुकूल सामजिक मानस तयार करायचे, तर भारतातील विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे.

उत्पादक श्रमपद्धतीतील तंत्रज्ञानाची भरारी

आपल्या पूर्वजांनी फार मोठी प्रगती केलेले पहिले क्षेत्र म्हणजे उत्पादक श्रमपद्धती आणि व्यावहारिक तंत्रज्ञान. भारतातल्या श्रमिकांनी फार मोठी ज्ञानसंपदा प्रत्यक्ष कार्यानुभावातून विकसित केली. शेती, पशुपालन, वस्त्रनिर्मिती, वास्तुनिर्मिती, धातुनिर्मिती, औषधी वनस्पती यांसारख्या क्षेत्रात हे योगदान फार मोठे आहे. अनेक प्रकारची फळे, धान्ये आणि भाज्या या प्रत्येक प्रकारात अनेक जाती यांचे वैविध्य भारतातल्या शेतकऱ्यांनी युगानुयुगे जोपासले आहे. विविधतेने नटलेल्या भारतातील निसर्गाने त्यांना या कार्यात चांगलीच साथ दिली. जगातील फळा-फुलांच्या नव्या जाती भारतातल्या शेतकऱ्यांना जेव्हा केव्हा उपलब्ध झाल्या, तेव्हा त्यांनी त्या आपल्या जमिनीला आणि हवामानाला योग्य असल्या तर उत्साहाने स्वीकारल्या; इतकेच नव्हे, तर त्यांच्यामध्ये अधिक योग्य गुण विकासित करण्याचे प्रयोगही यशस्वी केले. पशुधनाबद्दलही हे खरे आहे.

जगातल्या सर्वांत उत्तम दूध देणाऱ्या म्हशींच्या जाती आणि शेतीकामासाठी अत्यंत सक्षम अशा बैलांच्या जाती भारतातल्या पशुपालकांनी निर्माण केल्या. वस्त्रोत्पादनामध्ये आपल्या पूर्वजांची ख्याती जगभर पसरली होती. अत्यंत तलम सुती आणि रेशमी कापड भारतातून जगभर निर्यात होत होते. काळ्या पहाडात गुहा खोदून त्यात मूर्ती घडवताना चूक झाली तर ती सुधारायला अजिबात संधी नसते. त्यामुळे नुसती हातात कला असून पुरत नाही; दिशा आणि प्रमाण यांचे कमालीचे भौमितिक ज्ञान आणि भान असावे लागते. हे काम पिढ्यान्‌पिढ्या करून एक प्रकल्प पुरा करायचा, तर अचूक नियोजन करता यावे लागते. आपल्या पूर्वजांच्या या क्षेत्रातील कर्तृत्वाची साक्ष देणारे अनेक गुफाशिल्प प्रकल्प भारतभर आहेत.

कोणत्या वनस्पतीमध्ये कोठले औषधी गुण आहेत याचे आपल्या पूर्वजांचे प्रचंड ज्ञान हे फक्त आयुर्वेदापुरतेच मर्यादित नाही; ते वैद्य, भगत, वैदू आणि आजीबाईच्या बटव्यापर्यंत सर्वदूर पसरलेले आहे. मेलेली गुरे कापणारे ढोर हे सस्तन प्राण्याच्या शरीरविज्ञानचे मूळ संशोधक. त्यांनी मिळवलेले ज्ञान हा भारतीय शस्त्रक्रियाशास्त्राचा पाया होता. उत्पादक श्रमक्षेत्रात भारतातल्या श्रमिकांनी जी मोठी ज्ञानसंपदा आणि तंत्रकौशल्याची पातळी प्रत्यक्ष कार्यानुभावातून विकसित केली, ती इतकी प्रभावी होती की; पंधराव्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वांत संपन्न देश होता आणि भारतातील दरडोई उत्पन्न हे युरोपच्या तुलनेत खूप जास्त होते.

दार्शनिक तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र

आपल्या पूर्वजांच्या यशाचे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे दार्शनिक तत्त्वज्ञान. युरोप आणि मध्य-पूर्वेत एक देव, एक प्रेषित, एक धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथात सांगितलेले उपदेश   यामध्ये ज्यू, ख्रिस्ती व मुसलमान यांचे दार्शनिक तत्त्वज्ञान सीमित झाले; भारतात तसे झाले नाही. वेदांपासून ते शंकराचार्यांपर्यंत भारतात अनेक दार्शनिक तत्त्वज्ञाने झाली आणि या तीनही अंगांत भारतीयांनी बरीच प्रगती केली होती. प्राचीन भारतातील खगोलतज्ज्ञ हे उत्तम गणितीही होते. त्यांनी सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह यांची बदलती स्थाने काळजीपूर्वक मोजून अनेक सिद्धांत मांडले. भारतीय खगोलतज्ज्ञांची ख्याती दूरवर पसरली होती. खगोलशास्त्रविषयक अनेक भारतीय पुस्तकांची भाषांतरे त्या काळात अरबी आणि चिनी भाषांमध्ये करण्यात आली. या क्षेत्रातील आपल्या पूर्वजांची कामगिरी दाखवणारी एक लाखाहून जास्त हस्तलिखिते आजघडीलाही उपलब्ध आहेत.

विज्ञान आणि तंत्रविज्ञान कशाला म्हणायचे...

आज विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांना सर्वसामान्यांमध्ये खूप प्रतिष्ठा आहे, कारण त्यांचे फायदे रोजच्या जीवनात अनुभवास येत आहेत. त्यामुळे प्रत्येकच ज्ञान (आणि ‘न’ज्ञान) हे विज्ञान आहे, असे सांगितले जाते. मोटारगाडी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावी हे उपयुक्त आणि सत्यज्ञान आहे, पण ते विज्ञान नाही. विज्ञान कशाला म्हणायचे, वैज्ञानिक पद्धती काय असते- या प्रश्नांची खूप सखोल चर्चा गेल्या शंभर वर्षांत झाली आहे. (विज्ञानातील इतर प्रश्नांप्रमाणेच याही प्रश्नांची उत्तरे सतत सुधारत आहेत). या अभ्यासातून विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीबाबत पुढील किमान आवश्यक निकष आता सर्वमान्य आहेत-

1) विज्ञानात या जगातील इंद्रियजन्य अनुभव सत्य व प्रमाण मानले पाहिजेत.

2) अनुभवास येऊ शकेल असे अनपेक्षित भाकीत वैज्ञानिक सिद्धांताच्या साह्याने करता आले पाहिजे.

3) आज खरे वाटणारे वैज्ञानिक नियम भविष्यात चूक ठरण्याची शक्यता वैज्ञानिकांनी मान्य केली पाहिजे.

4) वैज्ञानिक नियम पडताळून पाहण्याची, ते खोटे ठरवण्याची नेमकी, शक्य आणि वैज्ञानिक समूहाला मान्य पद्धती उपलब्ध असली पाहिजे.

उदाहरण म्हणून न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताकडे बघू. गुरुत्वाकर्षणाची गणिते अचूक ठरण्यासाठी अंतराळात विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट आकाराचा आत्तापर्यंत माहीत नसलेला ग्रह असला पाहिजे, असे अनपेक्षित भाकीत करण्यात आले. अधिक शक्तिशाली दुर्बिणी जेव्हा त्या ठिकाणी रोखण्यात आल्या, तेव्हा तिथे हा डोळ्यांना न दिसणारा ग्रह सापडला. (त्याला नेपच्यून नाव दिले गेले) वस्तुमान हे अपरिवर्तनीय असते, ते नेहमीच कायम राहते- हा आधीचा वैज्ञानिक नियम आइन्स्टाइनने चूक ठरवला. वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकेल, हे त्याचे अनपेक्षित भाकीत अणुबॉम्बच्या रूपाने वास्तवात अनुभवास आले.

विज्ञान कशाला म्हणायचे, वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय, यांचे वर सांगितलेले सर्वमान्य निकष मान्य केले तर एक सरळ-सोपा निष्कर्ष निघतो. तो असा की, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्मालासुद्धा आले नाही.

तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान यांतील फरक

तांत्रिक कौशल्य, तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान यांतील फरक लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा विज्ञानाच्या आधारावर तंत्रज्ञान विकसित होते, केले जाते, तेव्हा ते तंत्रविज्ञान बनते. इंग्रजीत तंत्रज्ञानाला टेक्निक (technique) आणि तंत्रविज्ञानाला टेक्नॉलॉजी (technology) असे शब्द आहेत. झेंडे दाखवून दूरवर संदेश पोचवणे हे तांत्रिक कौशल्य आहे आणि विज्ञानाने निर्माण केलेले रेडिओ लहरींचे ज्ञान वापरून संदेशवहनाची रेडिओसारखी यंत्रे बनवणे हे तंत्रविज्ञान आहे. नाडीपरीक्षा हे तंत्रज्ञान आहे, एक्स-रे हे तंत्रविज्ञान आहे. बैलगाडी हे तंत्रज्ञान आहे, विमान हे तंत्रविज्ञान आहे. तंत्रज्ञानावर विज्ञानाचे आरोपण झाले की तंत्रविज्ञान निर्माण होते. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात तंत्रज्ञान होते, पण विज्ञानच नसल्यामुळे तंत्रविज्ञानही नव्हते.

विज्ञानामुळे तंत्रज्ञानात फार वेगाने फार मोठी सुधारणा घडून येते. विज्ञान व तंत्रविज्ञान टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने विकसित होते. विस्तव पेटवण्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञाने आणि तंत्रविज्ञाने क्रमाक्रमाने विकसित झाली :

1) निसर्गाने निर्माण केलेला विस्तव सांभाळून ठेवणे,

2) गारगोटीवर गारगोटी घासणे,

3) लाकडात लाकडाची रवी घुसळणे,

4) काड्यापेटी,

5) गॅस लायटर,

6) इलेक्ट्रॉनिक लायटर, इत्यादी.

विस्तव पेटवण्याच्या या सहा पद्धतींपैकी पहिल्या तीन पद्धती तंत्रज्ञान आहेत, शेवटच्या तीन पद्धती या तंत्रविज्ञान आहेत. सुरुवातीची तीन तंत्रज्ञाने विकसित होण्यासाठी लाखो वर्षे लागली. नंतरची तीन प्रभावी आणि सोईची तंत्रविज्ञाने विकसित होण्यासाठी विज्ञानाच्या उदयानंतर 300 हून कमी वर्षे लागली. नवी तंत्रवैज्ञानिक पद्धती विकसित झाली की आधीची तंत्रज्ञानिक पद्धती मागे पडते, हेही या  उदाहरणावरून स्पष्ट होते.

तंत्रवैज्ञानिक पद्धतींच्या विकासाचा एक क्रम, एक उतरंड असते. मोटारगाडीचा शोध लागण्याआगोदर चाके, लोह, गिअर, इंजिन इत्यादी अनेक तंत्रज्ञाने आणि तंत्रविज्ञाने विकसित झालेली असणे आवश्यक होते. जेव्हा सायकल बनत नाही, तेव्हा मोटारगाडी कशी बनेल? ज्या समाजात इंधन जाळून पाणी उपसणारा पंप बनत नाही, त्या समाजात इंधन वापरून उडणारे विमान कसे बनू शकेल? आज भूतकाळात आणि भविष्यकाळात संचार करू शकणारी यंत्रे (Time Travel Machines) अनेक कथांत आणि सिनेमांत असतात. त्यातून कादंबरी लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती दिसते. हजार वर्षांनी आजच्या या कथा, सिनेमे पाहून जर आपल्या वंशजांनी असा निष्कर्ष काढला की, 2014 मध्ये असे भूतकाळात आणि भविष्यकाळात संचार करू शकणारे यंत्र आमच्या पूर्वजांनी बनवले होते, तर ते कसे होईल? स्वर्गात आपला ऊर अभिमाने भरून येईल का?

प्राचीन भारतात विज्ञानाचा उदय का झाला नाही?

प्राचीन व मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्माला आले नाही, याबद्दल आपल्याला फार खेद आणि कमीपणा वाटण्याची गरज नाही. युरोपमध्येही विज्ञान व तंत्रविज्ञान यांचा जन्म जेमतेम 500 वर्षेच जुना आहे आणि मानवी समाजाचा इतिहास लाखो वर्षांचा आहे.

प्रश्न आहे तो हा की- प्राचीन भारतात एवढी संपन्नता, एवढे वैविध्य, एवढी बौद्धिक भरारी असताना विज्ञानाचा उदय का झाला नाही? युरोपमध्ये तमोयुगात पूर्वजांच्या ज्ञानवारशाशी तेथील लोकांचा संबंध 1500 वर्षे तुटला होता. युरोपमध्ये विज्ञानाचा जन्म होण्याअगोदर बौद्धिक पुनरुत्थान (renaissance) होणे आवश्यक होते. भारतात असे घडले नाही, कारण त्याची आवश्यकताही नव्हती. पूर्वजांच्या ज्ञानवारशाशी आपला सातत्याचा व जिवंत संबंध होता आणि तरीही भारतात विज्ञानाचा उदय का झाला नाही? या प्रश्नातील वास्तविकता मान्य करून आपण जितके नेमके उत्तर शोधू, तितके वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक प्रगतीला योग्य सामाजिक मानस आजच्या भारतात तयार होईल.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्मले नाही, याची दोन मुख्य करणे आहेत. ती म्हणजे-

1) अद्वैत तत्त्वज्ञानाचा मोठा व निर्णायक विजय आणि ज्ञानसाधनेचा ब्रह्मज्ञान हाच उद्देश याचा स्वीकार.

2) ज्ञानसाधना आणि  श्रमिक जाती यांची पूर्ण फारकत करणारी जातिधिष्ठित समाजव्यवस्था.

शंकराचार्यांनी ज्या अद्वैतवादाचे समर्थन करून त्याची विजयी स्थापना केली, त्याचा सध्याच्या विषयाच्या संदर्भात थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे-

आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत. सर्व विश्व एकच ब्रह्मरूप आहे. दिसणारे वैविध्य ही माया आहे. ब्राह्मणांनी जी ज्ञानसाधना करायची, तिचा उद्देश ब्रह्माचे साक्षात्कारी ज्ञान होणे हा आणि हाच असला पाहिजे. कर्मकांड आणि तपस्या या साधनांतून ‘याचि देही, याचि डोळा’ आत्मा आणि ब्रह्म यामधील द्वैत लयाला जाऊ शकते. लक्षावधी योनींतून प्रवास करून ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे ही मोक्षप्राप्तीची संधी प्राप्त झाली आहे. तिचा फायदा करून घेऊन ब्रह्म अनुभवले पाहिजे. जीवनातील इंद्रियजन्य सुखांच्या पूर्तीसाठी, त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी श्रम वाया घालवता कामा नयेत. ब्रह्माचे दर्शन-ज्ञान झाल्यावर प्राप्त होणारा ब्रह्मानंद हेच परम सुख आहे. तर्काने ब्रह्माचे आकलन शक्य नाही, त्यासाठी कर्मकांड आणि तपस्या हेच मार्ग आहेत. द्वैताचा स्वीकार म्हणजे अविद्येचा स्वीकार करून ब्रह्मज्ञान नाकारणे आहे.

शंकराचार्यांनी सांगितलेल्या जीवनदृष्टीशी, ज्ञानसाधनेच्या पद्धतीशी विज्ञानाचा पाया आणि कार्यक्रम विसंगत आहे. विज्ञान इंद्रियजन्य अनुभव हे प्रमाण मानते. या मायावी जगातले द्वैत खरे मानून त्यातल्या संबंधांचे नियम शोधणे हे विज्ञानाचे कार्यक्षेत्र आहे. हे स्थान आणि वेळ यांमधले द्वैत आहे, वस्तुमान आणि ऊर्जा यामधील आहे, सजीव आणि निर्जीव यांमधील आहे, इत्यादी. द्वैताचा शोध आणि वर्गीकरण जिथे संपते, तिथे विज्ञानप्रदेश संपतो. विज्ञानसाधना ही शांकरमताप्रमाणे अविद्या आहे. योग्य मार्गांनी उपसना करून मोक्षप्राप्तीची दुर्मिळ संधी ज्यांना मिळाली आहे; ते हे चुकीचे, अविद्येचे, विज्ञानाचे मार्ग का बरे चोखाळतील?

तंत्रज्ञानाचा विकास निव्वळ कार्यानुभवातून एका मर्यादेपर्यंतच होऊ शकतो. समुद्रात दूरवर जाणाऱ्या बोटींना ग्रह-तारे बघून आपले स्थान सोपेपणे ठरवता यावे म्हणून कोपर्निकसला सूर्यकेंद्री रचनेचा नवा विचार मांडावासा वाटला. तंत्रज्ञानावर विज्ञानाचे आरोपण केले की, तंत्राविज्ञानाचा जन्म होतो. या तंत्रविज्ञानाचे क्रांतिकारी फायदे समाजाला मिळाले की, वैज्ञानिक संशोधनाला पाठबळ मिळते. भारतीय समाजात श्रम करणाऱ्या जातींना कोठलेही अधिक व्यापक, सैद्धांतिक ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाकारला गेला. त्यांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान कुंठित झाले, ते तंत्रविज्ञान बनू शकले नाही. व्यापक ज्ञानाचे कुरण ज्यांच्यासाठी राखीव करण्यात आले; त्यांनी श्रमजीवीज्ञान, तंत्रज्ञान यांची साधना दुर्लक्षित केली. एवढेच नाही, तर अशी ज्ञानसाधना चुकीची मानली आणि निव्वळ कर्मकांड व तपस्या हाच मार्ग स्वीकारला.

अद्वैतावर आधारलेली जीवनाची पद्धती आणि श्रेयकल्पना सगळ्याच समाजात पसरली, मान्यताप्राप्त झाली. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ते ‘आजि म्या ब्रह्म पाहिले’ असे अनेक रूपांनी ते सर्वांच्या संस्कृतीत रुजले. ‘सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रह्मानंद’ अशी अद्वैती परंपरेशी नाते संगणारी काव्यपंक्ती विंदा करंदीकरांसारख्या भौतिकवादी मार्क्सवादी कवीलासुद्धा सामाजिक जाणिवेचे महत्त्व सांगताना लिहाविशी वाटते ती त्यामुळेच.

इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर भारतात अद्वैत मताचे, तत्त्वज्ञानाचे, जीवनदृष्टीचे प्राबल्य झाले. इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर सांख्य, चार्वाक यांसारखे वैज्ञानिक पद्धतींशी कमी विसंगत विचार मागे पडले, बौद्ध धर्म भारतातून जवळपास हद्दपार झाला, तंत्रज्ञानाचा विकास थंडावला आणि विज्ञान जन्मलेच नाही. हा काही काक-तालीय अपघात नाही.

तंत्रज्ञानाचा विकास आणि जातिव्यवस्था

मध्ययुगीन भारतात विज्ञानाचा जन्मच झाला नाही, त्यामुळे विज्ञानावर आधारलेले तंत्रविज्ञान निर्माण झाले नाही, हे खरेच. पण जातिव्यवस्था आणि निव्वळ तंत्रज्ञानाचा विकास (तंत्रविज्ञानाचा नव्हे) यांचा संबंध काय आहे? जाती असलेल्या मध्ययुगीन भारतात तंत्रज्ञानाचा चांगला विकास झाला, हे आपण या लेखाच्या सुरुवातीला पाहिले. जातिव्यवस्थेत व्यावसायिक एकाग्रता (specialization) जोपासली जाते. कारागीर एकच काम आयुष्यभर करतो, पिढ्यान्‌पिढ्या करतो. त्याला उपजीविकेचे दुसरे साधन नसते, वापरायला बंदी असते. व्यावसायिक एकाग्रता ही तंत्रज्ञानाच्या विकासाला नक्कीच पोषक असते. भारतात तंत्रज्ञानाचा चांगला विकास झाला, यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

या मध्ययुगातच तंत्रज्ञानाचा विकास हळूहळू कुंठित झाला का? वस्त्रउद्योग, चर्मोद्योग या जीवनावश्यक क्षेत्रांचा जो तोकडा इतिहास उपलब्ध आहे, त्यावरून असे झाले असावे, असे जाणवते. मध्ययुगातच भारतात उत्पादक- तंत्रज्ञानाचा विकास मंदावला, याची तीन तर्कसुसंगत कारणे लक्षात येतात. ती पुढीलप्रमाणे-

1. श्रमिकांना लिहिता-वाचता येणे, तंत्रज्ञानाची लिखित माहिती उपलब्ध असणे, विशिष्ट ज्ञानाची अधिक व्यापक ज्ञानाशी नाळ जोडली जाणे- हे तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक असते. जातिव्यवस्थेमध्ये श्रमिकांना व्यापक ज्ञान नाकारले गेले, इतकेच नाही तर दलित जातींना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले.

2. प्रत्येक जातीचा स्वतःबद्दलचा एक दुरभिमान जातिव्यवस्थेत जोपासला जातो. ‘आमच्यात असे नाही’ या म्हणण्यामागे ‘आमचे ते चांगले आहे, तुमचे आम्ही स्वीकारणार नाही’ असा बाणा आणि व्यवहार असतो. सगळेच समाज ‘आमचे आणि त्यांचे’ असा भेद करतात, हे खरे; पण जातिव्यवस्थेत या भेदाची परिसीमा पाहावयास मिळते, ती जीवनाच्या सर्व अंगांना पूर्णतः व्यापून टाकते. रोटी-बेटीबंदीमधून या व्यवहाराला भौतिक पाठबळ मिळते. सारस्वत आणि सीकेपी या दक्षिण कोकणातल्या शेजारी राहणाऱ्या दोन लहान जाती. दोन्ही जाती मांसाहारी, मासे खायला आवडणाऱ्या. आपल्या पाककला तंत्रज्ञानाबद्दल दोघांनाही अभिमान. पण या जीवनावश्यक आणि आनंददायी तंत्रज्ञानात परस्परांकडून काही स्वीकारायला त्यांचा ठाम नकार आहे. पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून सारस्वत आमसूल वापरणार, चिंच वापरणार नाहीत; पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून सीकेपी चिंच वापरणार, आमसूल वापरणार नाहीत! तंत्रज्ञानाचा विकास देवाण-घेवाणीतून होतो. जातिव्यवस्थेमुळे अशी देवाण-घेवाण कठीण बनते.

3. उत्पादक काम करणाऱ्या श्रमिकांचे गट जितके लहान, एकमेकांपासून जितके विभक्त; तितके त्यांच्यामाधील ज्ञान आणि कौशल्य यांची देवाण-घेवाण कमी. कापूस पिकवणारे शेतकरी वेगळे, कापूस पिंजणारे पिंजारी वेगळे, सूत कातणाऱ्या जाती वेगळ्या, विणकर वेगळे, कोष्टी वेगळे. कोष्टींमध्ये देवाची वस्त्रे विणणारे देवांग कोष्टी वेगळे, कापड रंगवणारे वेगळे. या कोणामध्येही रोटी-बेटीव्यवहार तर पूर्णतः अशक्य. या सर्वांमध्ये फक्त तंत्रज्ञानविषयक माहितीची, कौशल्यांची देवाण-घेवाणही कठीण गेली तर त्यात नवल ते काय?

थोडक्यात, तंत्रज्ञानविकासाच्या संदर्भात जातिव्यवस्थेचा परिणाम दोन परस्परविरोधी प्रकारचा आहे. सुरुवातीला जातिव्यवस्थेतील व्यावसायिक एकाग्रतेमुळे (स्पेशलायझेशनमुळे) विकासाला चालना मिळते. पण कालांतराने जातिव्यवस्थेतील- 1) श्रमिक जातींवर ज्ञानसाधनेला बंदी,

2) जाती-पोटजातींतील अभिमान आणि

3) जाती-जातींमधील अभिसरण फार मर्यादित असणे

- यांमुळे तंत्रज्ञानाच्या विकासाला खीळ बसते. हे प्रत्यक्षात कसे घडले याचा मध्ययुगातील तपशीलवार इतिहास उपलब्ध नाही, पण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकातसुद्धा हे घडतच राहिले. श्रमिक काम करत असलेली चर्मोद्योग आणि सार्वजनिक स्वच्छता ही दोन मोठी क्षेत्रे आहेत. वानगीदाखल या क्षेत्रात जातिव्यवस्थेमुळे तंत्रज्ञानाचा विकास कसा कुंठित झाला, हे समजून घेणे उद्‌बोधक आहे.

चर्मोद्योग विकास आणि जातिव्यवस्था

तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या दोन प्रदेशांत चर्मोद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. तमिळनाडूमध्ये हा उद्योग आंध्रमधून तेराव्या शतकात आलेल्या मादिगा जातीच्या श्रमिकांनी सुरू केला. झाडाच्या खोडांमधून मिळालेली रसायने वापरून कातडी कमावण्याचे तंत्रज्ञान तमिळनाडूमध्ये खूपच प्रगत अवस्थेत पोचले होते. त्यांनी तयार केलेली चामडी उच्च दर्जाची असते, असे मत इंग्रजी अभ्यासकांनी नोंदवले आहे. पण त्याचबरोबर हे कातडी कमावणारे लोक नवे तंत्रज्ञान (मुख्यतः क्रोमियमचा वापर करण्याचे) स्वीकारत नाहीत, अशी तक्रारही त्यांनी नोंदवली आहे.

तमिळनाडूच्या तुलनेत कातडी कमावण्याचे तंत्र उत्तर प्रदेशमध्ये कमी विकसित होते. उत्तरेत चर्मकारांचे वेगळे मोहल्ले शहरातील कसब्यामध्ये असत (आजही ते आहेत). तिथे हे काम चमार जातीचे श्रमिक करत (करतात). 1820 मध्ये जोन क्रीफोर्द या गोऱ्या साहेबाने बरेलीतील कसब्यात जातिनिहाय 71 व्यवसाय चालू असल्याची नोंद केली आहे; त्यांमध्ये चामड्याचे व्यवसाय करणाऱ्या चमार आणि मोचीमधील 15 व्यवसायांची (पोटजातींची?) नोंद आहे (जोडे करणारे, बाटल्या बनवणारे, खोगीर बनवणारे, लगाम बनवणारे, इत्यादी). त्यांना मदत करू पाहणाऱ्या स्टुअर्ट नावाच्या गोऱ्या साहेबाबद्दल चमारांना फार प्रेम होते. ते त्याला ‘बडा मोची’ म्हणत. त्यांच्या भगवानदास देवळाबाहेर चमारांनी स्टुअर्ट साहेबाचा पुतळा उभारला,  पण गावोगाव पसरलेल्या चमारांनी कातडी कमाविण्याचे नवे तंत्र आत्मसात केले नाही.

हे चमार चांगल्या कातडीचे वाईट चामडे बनवतात, असे 1918 मध्ये नेमलेल्या शोधसमितीने म्हटले आहे. शहरात येणाऱ्या कातडी कमावण्याच्या नव्या कारखान्यांच्या स्पर्धेत गावोगावचे चमार टिकणार नाहीत, त्यांच्यासाठी काय करावे; या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी 1907 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने चटर्जी यांची नेमणूक केली. चटर्जींनी चमारांना नवी तंत्रे शिकवण्यासाठी दोन प्रकारच्या शाळा सुरू करण्याची सूचना केली. पहिली शाळा कातडी कमावण्याचे प्रशिक्षण देणारी आणि दुसरी शाळा चामड्याच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देणारी. चमार हे बाहेरचे काही स्वीकारत नाहीत; तेव्हा त्यांच्यातील प्रमुख व्यक्तींचे यासाठी साह्य घ्यावे, असेही चटर्जींनी सुचवले. उत्तर प्रदेश सरकारने ही सूचना स्वीकारली. बाबू खेमचंद या चमार नेत्याचे साह्य घेऊन 1908 मध्ये पहिली शाळा सुरू केली. या शाळेत फक्त चमारांच्याच मुलांना प्रवेश होता! म्हणजे बंगाली ब्राह्मण विचारवंत, चमार नेते आणि इंग्रज राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन ‘चर्मोद्योगाचे शिक्षण फक्त चमारांसाठी’ आणि ‘चमारांना फक्त चर्मोद्योगाचे शिक्षण’- असे धोरण राबवले. हे धोरण इंग्रजांच्या ‘तोडा’ राजनीतीशी जसे सुसंगत होते, तसेच जातिव्यवस्थेशीही सुसंगत होते. (पुढे बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व कमी करण्यासाठी(?) इंग्रज सरकारने बाबू खेमचंद यांना गोलमेज परिषदेसाठीही बोलावले)

मैलासफाई तंत्रज्ञान आणि जातिव्यवस्था

मैलासफाईचे तंत्रज्ञान कसे विकसित झाले आणि कसे विकसित झाले नाही, याबाबत अहमदाबाद शहराचा गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास फार बोलका आहे. अहमदाबाद शहरात घरोघरीच्या शौचालयांतून मैला गोळा करून तो वाहून नेण्याचे काम भंगी जातीतील श्रमिक एकोणिसाव्या शतकात करीत असत. हे काम कमालीचे घाण म्हणून स्पृश्य समाज ते अजिबात करीत नसे. रणछोडलाल छोटालाल हे अहमदाबादचे पहिले नगराध्यक्ष एक यशस्वी मिल-मालक होते. इंग्रजांच्या CIVIC SENSE ने ते भारावलेले होते. अहमदाबादमधील जास्त मृत्युदराचे प्रमुख कारण जमिनीखालची भुयारी गटारे अहमदाबादमध्ये नाहीत, हे असल्याचे (इंग्रज सैन्याच्या एका अहवालात) त्यांच्या वाचनात आले.

रणछोडलालनी अहमदाबादमध्ये भुयारी गटारे बांधण्याचे मनावर घेतले. त्यांनी 1886 मध्ये याची एक योजना मांडली. त्यासाठी त्याअगोदर पाच वर्षे कर्नल वॉल्टर डुकेट यांनी बनवलेला अभियांत्रिकी आराखडा त्यांना उपयोगी पडला. अहमदाबादमध्ये भुयारी गटारे बांधण्याच्या या योजनेला तीन प्रकारचा विरोध झाला.

1) अहमदाबादमधील नागरिक मागासलेले आहेत, त्यांना हे तंत्रज्ञान झेपणार नाही, असे इंग्रज अधिकाऱ्यांचे मत होते;

2) आपला रोजगार बुडेल, आपल्याला दुसरा रोजगार मिळणार नाही, या भीतीतून भंग्यांचा विरोध होता;

3) पण सर्वांत महत्त्वाचे कारण हे उच्च जातीयांचा विरोध हे होते. भंग्यांनी मैला वाहून नेणे बंद झाले तर भंगी दुसरी कामे करू लागतील, त्यातून जातींची उतरंड कोलमडेल, ही भीती त्यामागे होती. शिवाय सर्वांचेच संडास सामाईक गटाराला जोडले जाणार, यातून होणारी ‘संगत’ त्यांतील शुद्ध-अतिउच्च यांना मान्य नव्हती. (पूर्वी याच कारणाने त्यांनी अहमदाबादमधे नळातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला विरोध केला होता!) हा विरोध कृतिशील होता. त्यांना ‘मागास’ म्हणणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अहवालाचा प्रचारासाठी वापर करण्यास त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. मग त्या अहवालातील मुख्य मुद्दा अहमदाबादमधील हे नागरिक मागासलेले आहेत, याकडेही त्यांनी काणाडोळा केला. त्या अहवालाच्या प्रती गावभर वाटण्यात आल्या. विरोधकांनी रोजच्या रोज सभा घेतल्या. उच्च जातीयांचा हा विरोध आक्रमकही होता. जाहीर सभेत आपली बाजू मांडण्यासाठी गेलेल्या छोटालालांवर या उच्च जातीयांनी दगड मारले आणि शेण टाकले. तरीही छोटालालांनी आपला आग्रह सोडला नाही. अहमदाबादमधले पहिले भुयारी गटार खादिया भागात 1893 मध्ये कार्यान्वित झाले.

भुयारी गटार फार सोईचे आहे, हे जनतेला अनुभवातून पटले. लोकांच्या मागणीमुळे 1897 मध्ये अहमदाबादच्या मध्यवस्तीत भुयारी गटारे करण्यात आली. भंग्यांचे काय करायचे, हा प्रश्नही सोडवण्यात आला. शहरातील वाढता घनकचरा निवडण्याचे, वाहण्याचे आणि गटारे साफ करण्याचे काम अहमदाबाद नगरपालिकेने भंग्यांना व फक्त भंग्यांनाच देण्याचे ठरवले. जुन्या शहराच्या तटबंदीच्या आतील सर्व भागात 1930 पर्यंत भुयारी गटारे बांधण्यात आली.

दारूबंदीच्या काळात बेकायदा दारू साठवण्यासाठी भुयारी गटारांचा वापर सुरू झाला. त्याचबरोबर ओला व सुका घनकचरा वेगळा न करणे आणि घनकचरा भुयारी गटारांत टाकणे, हे चालूच राहिले. अहमदाबादमधील नागरिक भुयारी गटारांसाठी लायक नाहीत, हे इंग्रज अधिकाऱ्यांचे म्हणणे जणू काही अहमदाबादमधील नागरिक सिद्ध करत होते! त्यामुळे गटारे वारंवार तुंबू लागली, कचऱ्याची विल्हेवाट अधिक कठीण झाली. भंग्यांचे काम वाढले, रोजगार टिकून राहिला. भुयारी गटारांनी जातिव्यवस्था धोक्यात आली नाही, तर जाती टिकवून ठेवण्याचे एक नवे सार्वजनिक हत्यार उपलब्ध झाले.

पुढे काय झाले, याविषयी या विषयावर एका अलीकडच्या अभ्यासक स्टेफनी टॉम यांचे लिखाण उद्‌धृत करणे मला योग्य वाटते. त्या लिहितात- ‘परंपरेनुसार भंग्यांना कोठलेही शिक्षण-प्रशिक्षण दिले जात नाही, गू- घाण साफ करण्यासाठी त्यांना कोणतीही अवजारे दिली जात नाहीत. मिळेल ते लाकूड आणि पत्रे घेऊन ते गू-घाण खरवडतात, ती बादल्यांमध्ये भरतात आणि तिची वाहतूक करतात. भंगी अत्यंत प्राथमिक अवजारे वापरतात. भंगी अडाणीच नव्हे तर मतिमंद असतात, अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात याचा वापर झाला. भंग्यांना त्यांचे काम तिरस्करणीय वाटत नाही, तर त्यांना आधुनिक अवजारे पुरवून त्यांचा वापर करण्याचे प्रशिक्षण कशासाठी द्यावयाचे- अशी सोईस्कर मनोभूमिका बनली. त्वचेतून आणि इतर वाटांनी विषारी पदार्थांनी त्यांच्या शरीरात प्रवेश करू नये, म्हणून त्यांना संरक्षक वेश देण्यात आले नाहीत; कारण ते ज्या विषारी पदार्थांच्या सातत्याच्या सान्निध्यात असतात, ते त्यांच्या शरीरात भिनलेले आहेत आणि त्यांना नव्याने अपाय करू शकणार नाहीत, असाही समज रूढ आहे. आणि तो भंग्यामध्येही आहे. भंग्यांना सुधारित अवजारे देणे याचा अर्थ भंग्यांना बुद्धी आहे, भावना आहेत, त्यांना घाणीचा त्रास होतो हे मान्य करणे- असा होणार!

त्यामुळे अहमदाबादमध्ये मैलासफाईचे तंत्रज्ञान विषम पद्धतीने विकसित झाले. एका बाजूला भुयारी गटारे, मैला परिवर्तित करणारी संयंत्रे आणि पंपिंग स्टेशन्स मोठ्या प्रमाणावर विकसित झाली, त्यात सातत्याने नवी तंत्रज्ञाने वापरात आणली गेली; दुसऱ्या बाजूला, गटारसफाई आणि कचरा वेगळा करण्याच्या तंत्रज्ञानात काहीही प्रगती झाली नाही. सन 1924 ते 28 च्या दरम्यान शहराध्यक्ष वल्लभभाई यांनी शहरातील मैला परिवर्तित करणारी संयंत्रे आणि पंपिंग स्टेशन्स यांच्या सुधारणांसाठी मोठा निधी निश्चित केला. सन 1985 ते 1995 च्या काळात जागतिक बँकेच्या साह्याने शहराबाहेरील भागात भुयारी गटारे बांधण्यासाठी मोठे निधी उपलब्ध झाले, तर 2009 मध्ये पंपिंग स्टेशन्स सुधारण्यात आली. त्यामध्ये आठमार्गी तापमानमापक, अल्ट्रासॉनिक ट्रान्समीटर, इलेक्ट्रोमॅग्नॅटिक फ्लो मीटर, इत्यादी वापरण्यात आले. त्यायोगे हे पंप आता दुरूनच पूर्णतः नियंत्रित करता येतात. पण गटाराची सफाई आणि कचऱ्याची विभागणी यासाठीची अवजारे अजूनही बादली व फावडे हीच आहेत.

निष्कर्ष : आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व मोठे होतेच, ते आपल्याला स्फूर्तिदायक आहे; पण त्याचबरोबर जातीवर आधारित जन्मसिद्ध विषमता, ज्ञानसंपादनाचे ब्राह्मणांचे राखीव अधिकार, अद्वैताच्या स्वीकारातून उपयुक्त ज्ञानसाधनेला विरोध, जाती-पोटजातींचे आनुवांशिक व्यवसाय आणि जाती-पोटजातींचा अनाठायी गर्व हे आपण नाकारलेच पाहिजे. प्रत्यक्ष जीवन ही माया मानून भौतिक प्रश्नाची सोडवणूक न करता निव्वळ ब्रह्मज्ञान हेच खरे ज्ञान, हे अद्वैती तत्त्वज्ञान आपण नाकारायला हवे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मार्ग स्वीकारून आपण जीवनातल्या वास्तविक प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. ज्ञानसाधनेचा, संशोधनाचा अधिकार हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार म्हणून मान्य करून जोपासला पाहिजे. बाबा आढाव यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येकाने ‘सत्यशोधक’ बनण्याची गरज आहे.

ताजा कलम : गटारांची सफाई आणि कचऱ्याचे वर्गीकरण याबद्दलच्या वापरात असलेल्या तंत्रज्ञानाची आधी वर्णिलेली परिस्थिती अहमदाबादपुरती मर्यादित नाही. याला पुष्टी देणाऱ्या दोन बातम्या हा लेख लिहून संपत आला त्या वेळी मला पुण्याच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या. सफाई करायला भुयारी गटारात उतरलेल्या कंत्राटी कामगाराचा गुदमरून मृत्यू (सकाळ, पुणे, 28 जाने. 2015) आणि कचरा वेगळा करताना विषारी वायूने ‘महानगरपालिकेच्या कामगाराचे डोळे गेले’ (लोकसत्ता, पुणे, 29 जाने. 2015). तेव्हा लेखातील मांडणीला अधिक पुष्टी मिळण्याअगोदर लेख लिहायचे थांबवलेले बरे, असा विचार करून हा लेख लिहायचे मी थांबवले.

Tags: विज्ञान आणि तंत्रज्ञान भारत आनंद करंदीकर विज्ञान आणि तंत्रविज्ञान तंत्रज्ञान ब्रह्मज्ञान विज्ञानदिन विशेष Science and Technology India Aanand Karandikar Vidnyan aani Tantravidnyan Tantradnyan Bramhdyan science day weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Chandramohan Kulkarni- 28 Feb 2021

  महत्वाचा लेख आहे. शब्दसंख्येची मर्यादा जाणवते. सगळाच विषय समजून घ्यायला आवडेल. chandramohan

  save

 1. Yogesh- 01 Mar 2021

  आतापर्यंत च्या लेखामधील सर्वात विस्तृत लेख. विज्ञानाला जातीयव्यवस्था कारणीभूत होती /आहे हे माहिती होत परंतु इतक्या सखोल नक्कीच नव्हतं. Thank you आनंद करंदीकर सर आणि साधना.

  save

 1. Avinash Yamgar- 01 Mar 2021

  उत्तम लेख... धन्यवाद..

  save

 1. Subhash Athale- 02 Mar 2021

  हिंदू धर्म नष्ट झाल्याशिवाय 1 जाती व्यवस्था नष्ट होईल काय? 2. विज्ञानाची उपेक्षा, मोक्ष साधना व अंधश्रद्धा या गोष्टी कमी होतील काय?

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके