डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

इव्हान इलिच यांचे 'मेडिकल नेमेसिस'

मला डॉक्टरी व्यवसाय ‘बायोमेडिकल’ पद्धतीने करायचा नाही, तर अधिक सर्वसमावेशक- व्यापक दृष्टिकोनातून करायचा आहे ह्याची खात्री व विश्वास मला, ‘मेडिकल नेमेसिस’ आणि त्यानिमित्ताने केलेल्या संशोधनामुळे आला. त्यातून ‘मन’ नावाच्या विषयाबद्दलचे वैज्ञानिक आकर्षण निर्माण झाले. दरम्यानच्या काळामध्ये मी कुष्ठरोगावर एक एकांकिका लिहिली होती. तिचे नाव होते ‘झडलेला मोहोर’. रस्त्यावर भीक मागणाऱ्या जोडप्याची कहाणी होती ती. त्यापुढच्या वर्षीची एकांकिका होती ‘पार्टनर’. होमोसेक्शुअल माणसाच्या भावनिक संघर्षावरची.  

पंचेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1976 मध्ये मला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेज आणि के. ई. एम. रुग्णालयाचा प्रशस्त, ऐतिहासिक परिसर ओळखीचा होण्यात काही काळ गेला. पण वर्ष-दीड वर्षात माझे बस्तान बसले. अभ्यास सोडूनच्या अनंत अवांतर हालचाली सुरू झाल्या. त्यात महत्त्वाचे होते, मराठी वाङ्‌मय मंडळ. त्यामुळे छत्रछाया मिळाली डॉ. रवी बापट आणि डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या संवर्धकांची. महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करणारे पत्रकार अशोक जैन हे बापटसरांचे मित्र. 1978 मध्ये, ‘हवा कॉलेजची’ हे सदर लिहिण्यासाठी Cub Reporters म्हणजे पत्रकार छाव्यांची निवड व्हायची होती. अशोक जैनांनी माझी रीतसर लेखी परीक्षा घेतली. मी घेतलेली पहिली जाहीर मुलाखत होती दादा कोंडके यांची. मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन हे ह्या मुलाखतीचे निमित्त होते. त्याचेच वृत्त लिहायला सांगितले मला अशोक जैनांनी. मीच त्या 'Event' चा भाग होतो, पण त्यापासून बाजूला होऊन त्याच घटनेचे रिपोर्टिंग केले. ते जैनांना खूप आवडले. आणि मग मी नियमितपणे ‘हवा कॉलेजची’ लिहू लागलो. ते लेख घेऊन मटाच्या कार्यालयात जाऊ लागलो. म्हणून दिनकर गांगल भेटले. भालचंद्र वैद्य आणि त्या वेळचा मटा परिवार मित्र बनला. रविवार पुरवणीसाठी लिहू लागलो.

‘ग्रंथाली’ वाचक चळवळीच्या नव्हाळीचे दिवस होते ते. एक दिवस दिनकर गांगलांनी एक इंग्रजी पुस्तक हातात दिले, ‘Medical Nemesis’. लेखक होते इव्हान (आयव्हॅन) इलिच (एलिच)! ‘नेमेसिस’ हा शब्दच तोवर कानांवरून ‘गेलेला’ नव्हता. केलेल्या चुकीबद्दलची अटळ अद्दल!... शब्दार्थ सापडला. वैद्यकव्यवस्थेच्या दुष्कृत्यांचे प्रायश्चित्त... महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जेमतेम दुसऱ्या वर्षाला असलेल्या आणि डॉक्टर होण्याच्या इच्छेने भारावलेल्या तरुणाच्या हातात हे पुस्तक पडले.

इव्हान इलिच (1926-2002) हे धर्मगुरू होते. त्यांनी 1960 मध्ये अधिकृत धर्मगुरुपदाचा राजीनामा दिला. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी चर्चच्या यंत्रणेविरोधात पुरेशी बंडखोरी केली होती. ते स्वतःला ‘Errant Pilgrim’ म्हणजेच ‘भरकटलेला यात्रेकरू’ म्हणायचे. त्यांचे पहिले पुस्तक प्रचलित शिक्षणपद्धतीला छेद देणारे होते. ‘Deschooling Society’ असे ह्या पुस्तकाचे नाव. मी हे पुस्तक त्या मानाने अलीकडच्या काळात वाचले. ह्या पुस्तकातही त्यांच्या ‘मेडिकल नेमेसिस’ पुस्तकाच्या मांडणीबद्दलच्या काही दिशा जाणवतात. शिक्षणव्यवस्था जन्माला आली ती ज्ञानप्रसारासाठी, माणसाने ‘शहाणे’ व्हावे म्हणून! पण त्या व्यवस्थेमुळे शहाणपण न पसरता खरे तर ज्ञानाबद्दलचे अज्ञानच पसरत चालले आहे. शाळाकॉलेजांच्या ‘यंत्रणे’मुळे आपण शिक्षणापासून दूर चाललो आहोत, ही भूमिका 1971 मध्ये हा लेखक मांडत होता. त्यांनी 1975 मध्ये ‘मेडिकल नेमेसिस’ प्रसिद्ध केले. ह्या पुस्तकाचे उपशीर्षक आहे, ‘Limits od Medicine’ म्हणजे वैद्यकशास्त्राच्या मर्यादा!

वैद्यकव्यवसाय निर्माण झाला तो फक्त आजाराच्या उपचारासाठी नव्हे, तर आरोग्याच्या रक्षणासाठी. ‘स्वस्थस्य्‌ स्वास्थरक्षणमं व्याधितानां व्याधिपरिमोक्ष:॥’ ह्या आयुर्वेद वचनाचा हुंकार देशोदेशींच्या सर्व प्राचीन वैद्यकशास्त्रांमध्ये होता. शरीर, मन, समाज-पर्यावरण ह्यामध्ये भिन्नता नव्हती. सर्वसमावेशक दृष्टिकोन होता. युरोपमध्ये सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या कालखंडात (रेनेसान्स) एक नवा दृष्टिकोन रुजला. त्याला म्हणतात, ‘Biomedical Model’. शरीर हे एक यंत्र आहे. त्यातला बिघाड दूर करणारा तंत्रज्ञ म्हणजे डॉक्टर. जे दिसते, मोजता येते ते वैज्ञानिक. मन नावाचा प्रकार अर्थातच ‘दिसत’ नाही. त्याचे वैद्यकशास्त्रात काय काम?... मी विचार करतो म्हणून मी आहे, असे सांगणाऱ्या तत्त्वज्ञ-गणितज्ञ रेने डेकार्टेसने मन आणि शरीर ह्यांच्यामध्ये ‘द्वैत’ आहे, असे मांडले. वैद्यकशास्त्र हे शरीरासाठी आणि तत्त्वज्ञान हे मनासाठी. त्याच्या लेखनामध्ये काळानुसार पुढे-पुढे ‘अद्वैती’ कल्पना दिसू लागल्या, पण रूढ झाली ती कार्टेशियन विचारसरणी. वैद्यकशास्त्र आजारांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करू लागले. त्या काळाची ती गरजच होती. अनेक आजारांवर उत्तरे शोधायची होती. आधुनिक वैद्यकव्यवस्था ह्या बायोमेडिकल म्हणजे आजारकेंद्रित दृष्टिकोनातून निर्माण झाली. ह्या ‘व्यवस्थे’ला कळून चुकले की, आपल्या व्यावसायिक ‘हिता’साठी आजारांचे अस्तित्व हा कळीचा मुद्दा आहे. म्हणून आजाराचे महत्त्व वाढल्याशिवाय ‘उपचारांचे’ आणि वैद्यकव्यवस्थेचे महत्त्व कसे वाढणार?

म्हणून डॉक्टरमंडळींना ‘जीवनदाते’ असे स्टेटस मिळाले. त्यातून जन्माला आली वैद्यकसत्ता! धर्मसत्ता आणि राजसत्तेइतकीच मातब्बर. ह्या सत्तेला स्वतःच्या प्रसारासाठी जगण्याचे ‘वैद्यकीकरण’- म्हणजे ‘Medicalization’ करणे आवश्यक होते. जन्मापासून मरण्यापर्यंतचा प्रवास जितका ‘डॉक्टरी यंत्रणे’वर अवलंबून असेल, तेवढा पथ्यकर. आरोग्याचे पुष्टीकरण हा मुद्दा दूर पडला तरी चालेल. आमच्या वैद्यकीय शिक्षणाच्या शाखांमध्ये PSM² (Preventive Social Medicine) अर्थात Community Medicine (सध्याचे ह्या शाखेचे नाव) ह्या विषयाला अत्यंत गौण स्थान दिलेले आहे. असेच कमी महत्त्वाचे स्थान मनोविकारशास्त्रालाही दिले गेले. बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सायकिट्री डिपार्टमेंट्‌स ही शवागार म्हणजे Morgue च्या जवळ असायची. मुद्दा असा की, बायोमेडिकल दृष्टिकोनामध्ये मन आणि समाजपर्यावरण ह्याला महत्त्व नाही. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहप्रवासी मानायची वृत्ती नाही. जीवनाचे वैद्यकीकरण वाढत जाणे म्हणजे Iatrogenesis ला आमंत्रण. तारक व्यवस्थेने तयार केलेले मारक आजार, म्हणजे Iatrogenic Disorders. अनास्थेमुळे, चुकीच्या पायाचे प्युटिशन करणे हे ह्या अक्षम्य निष्काळजीपणाचे वैयक्तिक उदाहरण. पण अनेक आजारांच्या ‘उपचार’पद्धतींमुळे होणारे दुष्परिणाम हा ह्याचाच व्यापक भाग.

गंमत म्हणजे, ह्या संकल्पनेची चर्चा फ्लॉरेन्स नाइटिंगेलने केली आहे... होतीच! आधुनिक नर्सिंगची आई! सन 1855 ते 1863 मध्ये तिने भारतात येऊन ‘रॉयल कमिशन ऑन इंडिया’चा भाग म्हणून अभ्यासपाहणी केली. ब्रिटिश सैनिकांच्या आजारांचे उपचार करून त्यांचा मृत्यूदर तेव्हाच कमी करता येईल, जेव्हा सामान्य भारतीय नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा दर्जा वाढेल! आपल्याला आजही चक्रावून टाकेल असे संशोधन आहे ते. सार्वजनिक आरोग्याचे संवर्धन म्हणजेच आजारांचे प्रतिबंधन. इलिच मांडतात की, हे तत्त्व झुगारून प्रचलित वैद्यकव्यवस्था फक्त स्वतःचा अहंकार आणि सत्ता जोपासत आहे.

हे पुस्तक वाचून मी भांबावून गेलो. दिनकर गांगल म्हणत होते की, ह्या पुस्तकाचे तू मराठी भाषांतर कर. हे 1975 मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक तीन वर्षांतच माझ्या हातात पडले होते. त्या वेळच्या कालगतीप्रमाणे ते ‘ताजे’ होते. ह्या विषयावर अधिक वाचायला हवे, म्हणून मी  माझ्या ॲनोटॉमीच्या शिक्षकांकडे गेलो. डॉ. एम. एल. कोठारी आणि डॉ. लोपा मेहता. कोठारीसर माझे आवडते प्राध्यापक. ह्या दोघांनी त्यांचे खासगी ग्रंथालय मला खुले केले. नॉर्मन कजिनस ह्या लेखक संशोधकाची शरीर-मनाचे नाते उलगडणारी पुस्तके मी वाचली ती सरांमुळेच. सर आणि मॅडमनी जी. एस. मेडिकलच्या लायब्ररीमध्ये येणाऱ्या शास्त्रीय नियतकालिकांचे संदर्भ काढून दिले. अँटिबायोटिक्सच्या अतिवापरापासून सार्वजनिक आरोग्यावरचे दुर्लक्ष अशा अनेक सूत्रांवरचे संदर्भ मिळत गेले. आणि लक्षात आले की, ह्या पुस्तकाचे भारतीयीकरण करू या. एका अर्थाने ती स्वतंत्र निर्मिती होईल, अधिक अर्थपूर्ण होईल- हा प्रयास. बापटसर, डहाणूकर मॅडमनी भरघोस पाठिंबा दिला. मी पुस्तकाच्या प्रकरणांची आखणी केली. दरम्यान, अभ्यास सुरू होता. म्हणजे पुस्तकाच्या निमित्ताने होणारा आरोग्यव्यवस्थेचा अभ्यास! आणि पुस्तकाचे नाव सुचले, ‘वैद्यकसत्ता.’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा माझी इंटर्नशिप संपून मनोविकारशास्त्रातील उमेदवारी सुरू झाली होती. वर्ष होते 1983. पण तोपर्यंत ह्या पुस्तकाने माझ्या विचारामध्ये जबरदस्त उलथापालथ घडवून आणली होती. वैद्यकव्यवसायाकडे पाहण्याचा सारा दृष्टिकोन एका पुस्तकामुळे बदलला होता.

मला डॉक्टरी व्यवसाय ‘बायोमेडिकल’ पद्धतीने करायचा नाही, तर अधिक सर्वसमावेशक- व्यापक दृष्टिकोनातून करायचा आहे ह्याची खात्री व विश्वास मला, ‘मेडिकल नेमेसिस’ आणि त्यानिमित्ताने केलेल्या संशोधनामुळे आला. त्यातून ‘मन’ नावाच्या विषयाबद्दलचे वैज्ञानिक आकर्षण निर्माण झाले. दरम्यानच्या काळामध्ये मी कुष्ठरोगावर एक एकांकिका लिहिली होती. तिचे नाव होते ‘झडलेला मोहोर’. रस्त्यावर भीक मागणाऱ्या जोडप्याची कहाणी होती ती. त्यापुढच्या वर्षीची एकांकिका होती ‘पार्टनर’. होमोसेक्शुअल माणसाच्या भावनिक संघर्षावरची. ह्या दोन्ही एकांकिका खूप गाजल्या, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये. पण महत्त्वाचा भाग असा की मी मेडिकल निदानांकडे व्यापक दृष्टीने पाहायला लागलो होतो... With symptoms, patient brings in a story, a script! आजाराच्या लक्षणांच्या बरोबरीने येणारी माणसाची कहाणी समजून घ्यायची, तर मनोविकारशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊ या. म्हणजे, ध्येय नक्की झाले.

व्यापक म्हणजे Bio-Psycho-Social अशा दृष्टिकोनाचा शास्त्रीय अभ्यास करू लागलो. त्यातून माझे पुढचे पुस्तक आले- ‘आरोग्याचा अर्थ’. पदव्युत्तर शिक्षण घेतानाच व्यसनाधीनता, लहान मुलांचा मधुमेह अशा समस्याग्रस्त व्यक्ती आणि कुटुंबांबरोबर काम करू लागलो. असे चाकोरीबाहेरचे काम करण्याचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले ते डॉ. एल. पी. शहा (मनोविकारशास्त्र प्राध्यापक) आणि डॉ. विजय आजगावकर (मधुमेहतज्ज्ञ) ह्यांच्यामुळे. आणि मनोविकारशास्त्र नव्हे, तर मन आरोग्याच्या क्षेत्रात मी एक चक्क संस्था उभी करणार ह्याचे संकल्प टिपण तयार केले एम.डी.ची डिग्री मिळण्याआधीच!

हे सारे होत होते मेडिकल नेमेसिस हे पुस्तक हाती आल्यामुळे. वैद्यकसत्ता प्रसिद्ध झाल्यावर ते गाजले. त्यावर चर्चा झाल्या. ग्रंथालीने अनेक शहरांमध्ये ह्यानिमित्ताने कार्यक्रम केले. आजही ह्या दोन्ही पुस्तकांचे संयुक्त रूप ‘आरोग्याचा अर्थ’ ह्या नावाने उपलब्ध आहे. आपण लिहिलेली दोन पुस्तके चाळीस वर्षांनंतर वाचकप्रिय आणि रेलेव्हंट आहेत ह्याचा आनंद मानायचा की इव्हान इलिचनी केलेली मांडणी आज जास्तच महत्त्वाची वाटते आहे ह्याबद्दलचे दुःख?... पण एक मात्र नक्की झाले. ह्या पुस्तकातल्या आशयाने माझ्यातल्या उमलत्या डॉक्टरच्या विचारधारेला एक भक्कम बैठक दिली. कदाचित त्यामुळेच मी कायमच स्वतःला मन-आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता मानू लागलो. ‘तज्ज्ञपणा’ची झूल मनातून तरी केव्हाच उतरली. औपचारिक ओळखीसाठी पूर्वी मनोविकारतज्ज्ञ होतो, नंतर मनोविकासतज्ज्ञ झालो... पण Activistपणा काही लोपला नाही. हे सारे ऋण त्या एका पुस्तकाचे!

Tags: मेडिकल नेमेसिस इव्हान इलिच ग्रंथ पुस्तक दिन वाचन आनंद नाडकर्णी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आनंद नाडकर्णी,  ठाणे
anandiph@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली मराठी पुस्तके विशेष वाचकप्रिय ठरली असून, त्यांच्या iph या संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात, वेध हा त्यातील विशेष उल्लेखनीय.


Comments

 1. Shilpa Khare- 22 Apr 2021

  अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. तुमचं वाचन सखोल, आणि प्रत्येक विषयावरील आहे हे तुमच्या लेखातून, तुमच्या मुलाखतीतून नेहमीच जाणवतं, सहजसोप्या भाषेमुळे तुमचे विचार कानातून मनापर्यंत थेट पोहोचतात नेहमीच

  save

 1. Shilpa Khare- 22 Apr 2021

  अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. तुमचं वाचन सखोल, आणि प्रत्येक विषयावरील आहे हे तुमच्या लेखातून, तुमच्या मुलाखतीतून नेहमीच जाणवतं, सहजसोप्या भाषेमुळे तुमचे विचार कानातून मनापर्यंत थेट पोहोचतात नेहमीच

  save

 1. Megha Palkar- 23 Apr 2021

  छान माहिती मिळाली.

  save

 1. Padmaja Agashe- 23 Apr 2021

  Dr you are great and you are the best guide for next generation

  save

 1. Suresh Rajaram Patil- 24 Apr 2021

  Really eye opener regarding medical science & practitioners. The socialisation of medical sciences is must for future generations & healthy lifestyle.

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके