डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अजून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. चळवळीचे म्हणाल, तर क्रांतिसिंह नागनाथ नायकवडी आता नाहीत. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची साथ अजून आहे; पण सुरुवातीचे काही नेते, कार्यकर्ते आटपाडी पाणी परिषदेला उपस्थित नव्हते. आजवर ज्यांनी साथ दिली अन्‌ प्रथम लाभार्थी झाले, त्या तालुक्यातील लोक अपवादानेच हजर राहिलेत.

मुंबईहून आल्यानंतर एक-दोन दिवसांत मी कामाला सुरुवात करणारच होतो, तेवढ्यात मला गुरव सरांचा फोन आला, ‘‘काय करतोस 26 जूनला? आटपाडीला ये, पाणी परिषद आहे.’’ येतो मी सर, म्हणून फोन ठेवला. गुरव सर माझे गुरू. महाविद्यालयाची चार वर्षे मी त्यांच्या हाताखाली शिकलो. साहित्य आणि सामाजिक काम या परस्परसंबधित क्षेत्राची आवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारगावच्या तळमावले कॉलेजमध्ये त्यांनी आमच्यात जोपासली.

मी आठवड्यातून किमान एक दिवस माणदेशात फिरलो नाही, तर बैचन होत असतो. तो सगळा प्रदेश, तिथली माणसं मला भारावून टाकतात. तो अफाट माळ, गुरं अन्‌ मेंढरं चारणारी, वाऱ्यासोबत हुज्जत घालणारी आदिम माणसं पाहिली की मला वाटतं- मी या एकविसाव्या शतकात नाही, सतरा-अठराव्या शतकात फिरत आहे. सगळं कसं निसर्गाच्या अधीन.

एक पोर्तुगीज कवी आहेत, नावं बदलून ते लिहीत. काय नाव त्यांचे... फर्नांदो पेसीओ. त्यांच्या कवितेध्ये दिसणारा निसर्ग आपल्या माणदेशासारखा. आपल्या आत्म्याचा संवाद या अफाट पसरलेल्या माळाशी; मध्येच कुठं तरी वाहणाऱ्या झऱ्याशी; पैगंबर आणि तुकोबाला प्रिय असलेल्या बोडक्या, ओबडधोबड डोंगरांशी. मला अशी निसर्गासोबत संवाद करणारी कविता लिहिता आली नाही. माझं सगळं बोलणं माणसांशी. त्याला जातिवंत मुसाफिर असावे लागते. विनापाश, वारं वाहते इतके सहज दिशामुक्त भटकत राहिला, तरच ते जमावं एखाद्याला. फर्नांदो पेसीओचं कवितांचं पुस्तक हिंदीत संवाद प्रकाशनानं छापलंय. परत वाचायला हवे.

कराडहून मी एकटाच निघालो आटपाडीला. जवळपास दोन-अडीच तासांचा प्रवास. सुर्लीचा घाट सोडला की क्षितिजापर्यंत अफाट माळ. क्वचित कुठं सूर्य उगवण्यासाठीचा फुटकळ डोंगर. हनुमंत वडीयेच्या बाजूने जाणारी येरळा ओलांडली की, दुष्काळ जाणवायला सुरुवात होते. आंबेगाव ते विटाचा माळ संपूर्ण कोरडा. चुकून वळवाचा पाऊस ढासळला असेल, तेवढाच. पक्षिप्रेमींसाठी तो चांगला परिसर आहे. याच परिसरात भाळवणी गावाच्या आसपास जखमी गरुड पक्षी सापडला होता. खिडकीच्या बाहेर पाऊस न पडल्याने उदास, तरीही आत्मीयतेनं हा संपूर्ण भूभाग मी डोळ्यांत साठवून ठेवत असतानाच, बंडिंगच्या तालीवर घारीसारखा करड्या-पिवळ्या रंगाचा एक मोठा पक्षी बसलेला मी पाहिला. पुढं पोल्ट्रीच्या आसपास बगळे अन्‌ आणखी कुठले काळं-करडे पक्षी माळावर बसलेले. आणखी हे दुसरेच लांब लाल चोचीचे, बगळ्याच्या जातीचे काळे पक्षी- बहुधा शराटी. इथं एकदा उतरायला हवं. विटानंतर रेवणसिद्धचा डोंगर. वळवाचा पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत आणि अजूनही त्या सुरू आहेत. पेरताना पेरकऱ्यांच्या पाठी बगळे, साळुंख्या आणि अग्निपक्षी उडत आहेत. जूनचं ढगाळ सावल्यांचं वातावरण. नुकताच हिरवाई परिधान केलेला डोंगर. इथं रेवणसिद्धचं अप्रतिम बांधकाम असलेलं, जुन्या विस्तृत वाड्यासारखं मंदिर.

पुढं बदकालात रेणावी अफाट पसरलेली, काळी रानं. एका घाटाचं वळण की पुढं तालमीच्या मातीसारखा जमिनीचा एक पट्टा. गावाचं नाव तांबखडी. आंब्याची जुनी खूप रायवळ झाडं. मग खानापूर हे तालुक्याचं ठिकाण. नंतर बेनापूर, सुलतान गादे इथं तालमीची पोरं राहतात. हा सगळा आटपाडीपुढं खवसपूरपर्यंतचा परिसर पैलवानांसाठी प्रसिद्ध. माणसं अवाढव्य. त्यांनी भिंतीसारख्या दगडावर दगड रचून तयार केलेल्या ताली... रानालगत दगडांनी रचलेल्या तालींचं हे प्राचीन बांधकाम बघायला हवे. ही करलाट काळी खपरिली चुनखडीची रानं... पाणी ठरत नाही, लगेच वाहतं. पाऊस नाहीच. लोकांची रानात मशागतीची कामं- म्हणजे नांगरून, कुळवून टाकल्यानंतर पेरणीसाठी रानं स्वच्छ वेचलेली, म्हणूनच अधिक काळी. बाजरीच्या पेरण्या झाल्या पाहिजेत एव्हाना. ज्यांची पाणी उचलून वापरण्याची ऐपत तिथं द्राक्षांचे हिरवे ताटवे, बारमाही पाण्याची केळी; इतरांची नुसतीच माळांची, पावसाच्या पाण्याला आसुसलेली रानं.

करगणी- मोठं गाव माळावर उभं. या भागात पस्तीस ते चाळीस टक्के धनगर समाज, नंतर मराठा अन्‌ बाकीची इतर दलित-पददलित ढोर अन्‌ व्हलार समाजापर्यंतची.

छावण्या अजूनही आहेत अन्‌ त्यांची गरजसुद्धा आहेच. बाकी दुष्काळी कामं आहेत, नाहीत. कसे जगतात गोर-गरीब याची खबरबात नाही. फिरलं पाहिजे, त्याशिवाय अंदाज येणार नाही.

दोन वाजता पोहोचलो मी आटपाडीला. हे तालुक्याचं ठिकाण. गुरांचा अन्‌ शेरडा-मेंढरांचा चांगला बाजार भरतो इथं. माडगूळकरांनी लिहून ठेवलंय ते सारं. इथून जवळच त्यांचे गाव शेटफळ. मी गेलोय एकदा.

गावाच्या बाहेर पंचायत समितीच्या जवळ भरलेली परिषद. वाटले, एखादा इनडोअर कार्यक्रम असेल. वक्ते बोलतील. ऐकणारे अन्‌ बोलणारे निष्किय हुशार, प्रत्यक्षात डावी भाषा बोलणारे; पण लोकांशी जिवंत संबंध नसलेल्या मध्यमवर्गीय कनवाळू बुद्धिजीवींचा परिसंवाद!

स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर एका दांडगट काळ्या शेतकऱ्याला लिफ्ट मागितली. ओळखपाळख नसताना तलफेला तंबाखू मागावी, त्यातलाच हा प्रकार. एकटा गाडीवान असेल तर देतात लिफ्ट. तोही थांबला. म्हणालो, इथं परिषद आहे ना कुठं; तिथं जाणार आहे. म्हणाला- चला, मीही तिथंच निघालोय. छावणीवर गुरांना वैरण टाकून सांगोला तालुक्यातून तो आला होता.

पुढं बघतोय, तर सगळा रस्ता माणसांनी भरलेला. बाजूच्या मोकळ्या रानात शंभर-दोनशे ट्रक, टेंपो, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या मोटारसायकली. पार्किंगला जागा नाही शिल्लक. रस्त्यावर फिरणारी कॉलेजची तरुण पोरं-पोरी. बाहेर भेळ-वडापाव, थंड आइस्क्रीम, भजी अन्‌ चहाची दुकानं. कुठल्याशा कॉलेजच्या भव्य पटांगणात टाकलेला तंबू. जवळपास वीस-पंचवीस हजारांचा जनसमुदाय. चाळीस टक्क्यांच्या आसपास स्त्रियांचा सहभाग. प्राध्यापक आणि हायस्कूल टीचर, शेतकरी, तरुण, तशीच म्हातारी रया गेलेली माणसं, कॉलेजची मुलं आणि मुली. भवानी हायस्कूलचं संपूर्ण पटांगण खच्चून गच्च. बाहेर वाहतुकीसाठी बंद रस्ता, तोही माणसांनी फुलून गेलेला.

अशी असते ही आटपाडी पाणी परिषद

गेल्या कित्येक दिवसांत लोकांच्या सहभागाचं एवढं विराट दर्शन मला झालेलं नाही. जत्रा नाही ही- जिथं न बोलावता लोक येत असतात; व्यक्तिगत कामना करून, मौजमजा करून निघून जातात. पण आजवर दुष्काळप्रवण तेरा तालुक्यांच्या भूभागावरील सर्व सृष्टीच्या जीवन-मरणाशी निगडित असलेल्या पाणी या मूलभूत गरजेचं स्वप्न उरात बाळगीत इथवर आलेली ही माणसं आहेत. ठरवून दिलेल्या शाहू महाराजांच्या जन्मादिवशी 26 जूनला न सांगताच येताहेत. इथे मुठी वळवीत शपथ घ्यावी, असं कुठलं श्रद्धास्थळ नाही. आपल्या संसदीय पद्धतीनं चालवलेल्या लढ्याचं निवेदन देण्यासाठी काळा घोड्यासारखं प्रतीकात्मक ठिकाण नाही, की हा प्रचंड प्रवाह थोपवण्यासाठी ना कसला सरकारी फौजफाटा. हा मोर्चा नाही, मोर्चापूर्व मागण्यांसाठीचा हा प्रस्फुटित आवाज. जीवन-मरणाच्या लढ्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मिक निर्भरतेचा हा एक सत्याग्रह आहे.

सुरुवातीला काही संवेदनशील पत्रकारांनी सूर्योपासना या मंदिरात 1996 मध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी घेतलेली पाणी परिषद. तिचे आयोजन करणारे पत्रकारसुद्धा कोणी मोठ्या घराण्यातले नव्हते, तर ते अल्पसंख्य दलित आणि उपेक्षित जनसमूहातील होते. ही माझ्या कादंबरीतील जाणीवपूर्वक  योजलेली काल्पनिक पात्रं नाहीत. प्रत्यक्षात कॉ. धनाजी गुरवांनी सांगितलेली ही त्यांची नावं. प्रसिद्ध दलित लेखक शंकरराव खरातांच्या नात्यातील विलास खरात, दुसरे सादिक खटिक आणि तिसरे शाम देशपांडे- जे पत्रकार म्हणून काम करीत होते. सर्वांच्या हिताच्या या कामात प्रस्थापित समाजातील कोणी अपवादानेच तेव्हा आले असतील.

याच काळात दुष्काळी भागात काम करणारे स्वातंत्र्य- लढ्यातून आलेले क्रांतिसिंह नागनाथ नायकवडी, श्रमिकांच्या चळवळीचं व जनहिताचं व्यापक भान असलेले भारत पाटणकर, धनाजी गुरव, विज्ञान चळवळीतून आलेला के.जे. जॉय, कराड तालुक्यातील इंदोलीचे जयंत निकम, प्रा. बाबूराव गुरव, अण्णासाहेब लेंगरे, धैर्यशील पाटील अशा साहित्यात अन्‌ चळवळीत सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या तरुणांनी सुरुवातीला आटपाडी तालुक्यात संघटन बांधण्याचं काम केलं.

या वीस वर्षांच्या प्रदीर्घ काळ चळवळीत काम करणाऱ्यानेच एखादी कादंबरी लिहायला हवीय. ज्यांची मी आदरानं नावं घेतलीत, त्या सर्वांत तेवढी क्षमता आहेच. रचनात्मक कामासाठी जनतेचं आंदोलन कसे उभे राहते याचा तो परिपाठ असेल. त्यात यश किती आले, हा चिंतनाचा विषय होईल; पण भविष्याची स्वप्नं पाहताना भूतकाळाच्या अनुभवातून सबक निश्चित मिळेल.

वर्षानुवर्षे दुष्काळात जगत असलेले, पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास तेरा-चौदा तालुक्यांतील हे शेतकरी. सर्वसामान्य माणसं- जे पोटासाठी मुंबईला गिरणी कामगार, माथाडी कामगार अन्‌ लोखंडाच्या जथ्यातील हमाल म्हणून कामं करीत आले आहेत. इथे राहणारे उर्वरित वर्षातील चार-पाच महिने उसतोडी कामगार म्हणून स्थलांतरित. बाकीचे मेंढपाळही तसेच वर्षातले चार-पाच महिने राहणारे इथं.

ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांच्या सार्वत्रिक संपातून विस्थापित झालेला मूळचा शेतकरी असलेला कामगार ज्यांच्याकडे एका संघटित, तरी पराभूत चळवळीचा अनुभव गाठीशी होता. नव्यानं त्यांना दिवास्वप्न दाखवून परत लोकलढ्यासाठी तयार करणं, हे खरेच आव्हानात्मक काम. अण्णांच्या नेतृत्वाखाली ते आकाराला येत गेले.

माणदेशासाठी दुष्काळ आजचा नाही. फारशी मोजदाद नसली तरी ज्ञात दुष्काळ... 1878च्या दुष्काळाची नोंद सापडते- ज्या वेळी इंग्रज सरकारने रोजगार हमीवर पिंगळी अन्‌ राजेवाडीच्या तलावाचं काम करून घेतलं. हे मला सामाजिक जाणिवेचे पत्रकार विजय लाळेंनी सांगितले.

दर तीन-चार वर्षांनंतर हे दुष्काळाचं सावट या भूमीवरील लोकांना काहीसं सवयीचं झालेलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर दुष्काळ निवारण्याचे कायमस्वरूपी ठोस काम झालेलं नाही आजवर. सुरुवातीच्या पंचवार्षिक योजनांध्ये लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या काही योजना तरी होत्या. त्यातूनच देशभरात धरणं बांधली. विजेचे सार्वत्रिकीकरण झाले. महाराष्ट्रात सहकाराचे पर्व सुरू झाले- ज्यातून साखर कारखान्यांची निर्मिती झाली. पण वंचित जनसमूहांसाठी, इलाख्यासाठी काही निश्चित योजना सरकारमार्फत वा सहकाराकरवी होऊ शकल्या नाहीत.

जागतिकीकरणाचे पर्व 1990-91 नंतर सुरू झाले. गुंतवणुकीसाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा देशात ओघ सुरू झाला. पायाभूत सुविधांच्या नावाखाली चौपदरी, सहापदरी महामार्ग निर्माण झाले. शहरे जवळ आली. परदेशी बनावटीच्या गाड्या धावायला लागल्या. पण शेतीच्या मूलभूत विकासासाठी आवश्यक गोष्टींचा विचार झाला नाही. तुलनेत तिचे परावलंबित्व अधिकाधिक वाढवले. पाणी आणि विजेचे तर दुर्भिक्ष झाले अथवा केले, वर बियाणं, खतं आणि कीटकनाशकांबाबत जागतिक कंपन्यांचे आपण मांडलिकत्व स्वीकारले. वरताण म्हणून जागतिक बाजारपेठेचं आमिष दाखवून शेतीला जुगारी बनवले.

या सर्वांतून एरवीचा कष्टाळू अन्‌ प्रयत्नशील शेतकरी हतबल बनत गेला. निसर्गावर भिस्त ठेवून कसाबसा टिकून राहिलेला हा शेतकरी... आजवर दुष्काळासारख्या नेहमीच येणाऱ्या अरिष्टाला समोरं कसं जायचं ठाऊक नव्हतं त्याला. त्यांना कृष्णा अन्‌ तिच्या उपनद्यांच्या पाण्याचं काहीसं दुर्लभ भगीरथ स्वप्न दाखवलं जाणं म्हणजे आकाशातील चंद्र खेळायला देणं, असंच वाटलं सुरुवातीला. विशेष म्हणजे, आजवर जे स्वप्न लोकांनी पाहिले नव्हते, दुरूनच जे कृष्णेच्या पाण्याचे कौतुक करीत राहिले, तिची इच्छा बाळगली नाही; पण मानवी नेणिवेतून तिचा अमूर्त पातळीवर विचार केला. माणदेशाच्या देवांना या कृष्णेच्या पाण्याचा सुरुवातीपासून सोस. म्हणून मग त्यांच्या गाण्यांतून, ओव्यांतून कृष्णा व्यक्त होत गेली. आता ते स्वप्न नजरेच्या टप्प्यात आले आहे. खूप संघर्ष करावा लागला- बारा वर्षांहून अधिक काळ. अजून ते पूर्ण झाले, असं नाहीच मुळी.

‘समान समन्यायी पाणी वाटप’ या घोषवाक्यावर दलित कष्टकरी-भूमिहीन जनसमूहांचा तिला स्थायी आधार मिळाला आहे. परिवर्तनाच्या हरएक लढ्यातील ते आघाडीचे वाहक. नाही तर आज इथं चाळीस टक्क्यांहून जास्त सहभाग  असलेल्या स्त्रिया कोणत्या समाजघटकांतून पुरुषांच्या बरोबरीने आल्या आहेत? बदलाच्या लढ्याच्या त्याच असतात अग्रदूत. ज्यांना धर्म-जातींच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांपासून उपेक्षित ठेवलं जातं, ज्यांना टँकरने आलेलं पाणीसुद्धा इतर सर्वांचे झाल्यावर उरलं-सुरलं मिळतं.

अण्णांच्या पश्चात शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, कॉ. गणपतराव देशमुख, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा जयवंत निकम, बाबूराव गुरव, संभाजी डबंग, नाना शेटे, मारुती माने, झिंबलसाहेब यांसारख्या जनहिताची तळी उचलणाऱ्या अनुभवी कार्यकर्त्यांकडे या चळवळीचे नेतृत्व जाते.

पाणी आता कुठं कडेगाव तालुक्यातून खटाव तालुक्याच्या सीमेवरून फक्त माहुलीपर्यंत आले. तेसुद्धा मधेच कडेगाव तालुक्यातील उसाला पहिल्यांदा मिळाले. खेराडवांगी हिंगणगावच्या जवळ दारे फोडून ते आणले आहे.

पाणी येत असतानाचा संपूर्ण दिवस, अर्धी रात्र मी चितळीच्या प्रशांत पवारसोबत मोटरसायकलने पाटावरून फिरत काढलेली आहे. केवढा आनंदाचा क्षण असतो, जेव्हा दोन-अडीच वर्षांनंतर असं कॅनॉलनं पाणी वाहतं. एरवी आनंद साजरा करण्याचा मान प्रथम पुरुषांना. पण स्त्रियांचं तर पाण्याशी जन्माचं नातं. त्या कशा राहतील पाठीमागे? रांग लागलेली बायका-पोरांची पाणी बघायला. पिण्याच्या पाण्याची ददात नसलेल्या भागातला मी. आम्हाला पाण्याचं फारसं अप्रूप वाटलं नाही कधी. लोकांनी ओवाळलं पाण्याला, नारळ फोडले. डोळ्यांतनं धारा आल्या आनंदाच्या. हे मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभवलं. पण एवढं सारं करून पाणी फक्त माहुलीपर्यंतच आलं. विटा-खानापूर, आटपाडी, कवठेमहकांळ, जत, मंगळवेढा आणखीच खाली राहिला. बाजूचा माण तर पाऊस अन्‌ पाण्या इदमाने हमेशाच कोरडा.

भाषणात मी ऐकलं- सरकार म्हणते, निधी उपलब्ध नाही. चाराछावणी अन्‌ पाणलोट विकास क्षेत्राखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दर चार-पाच वर्षांनी होत आहे. ह्या अवर्षणग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावं, अशी मुळात शासनाची इच्छाशक्ती आहे का- असाच प्रश्न उपस्थित होत आहे. पी. साईनाथ म्हणतात तसा हा दुष्काळ शासकवर्गाला आवडत तर नसावा? अन्‌ ही टेंभू योजना ज्यांच्यासाठी निर्माण केली आहे, त्या भागांना पाणी मिळण्यासाठी अजून किती वर्षांच्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे?

अजून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. चळवळीचे म्हणाल, तर क्रांतिसिंह नागनाथ नायकवडी आता नाहीत. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची साथ अजून आहे; पण सुरुवातीचे काही नेते, कार्यकर्ते आटपाडी पाणी परिषदेला उपस्थित नव्हते. आजवर ज्यांनी साथ दिली अन्‌ प्रथम लाभार्थी झाले, त्या तालुक्यातील लोक अपवादानेच हजर राहिलेत.

एका व्यापक परिसरात लढले जाणारे हे आंदोलन एका विशिष्ट मकसदसाठीच जर उभे राहिले असेल, तर उद्या पाणी माझ्याजवळ आल्यानंतर मला या लढ्याशी काही देणं-घेणं नाही, अशी मानसिकता निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून आवश्यक आहेत सर्वांगीण विकासाचे मुद्दे

त्यासाठी कार्यकर्ते अन्‌ राजकीय पक्षांध्ये व्यापक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, पर्यावरणीय जाण असणे गरजेचे आहे. ज्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, शाश्वत शेती आाणि आपसी भ्रातृभावी संवादांच्या शक्यता कशा निर्माण करता येतील, या बाबतीत संघटनात्मक चिंतन असायला हवे. आणि हे परत लोकांत हमेशाच राहून त्यांच्या सांस्कृतिक परिभाषेत करायचे काम आहे.

रोजच्या जगण्याच्या संघर्षात बाहेर पडलेल्या इथल्या स्त्रिया पुरुषी वर्चस्वाला फारशा बळी पडणाऱ्या आहेत, असं नाही. साक्षरतेतून त्यांचं सामाजिक भान अन्‌ वैज्ञानिक जाणीव अधिक प्रगल्भ होत जाणं गरजेचं आहे. तशीच आपलीही स्त्री-पुरुष समानतेची समज मानवी बनविण्याची पहिली अट आहे.

या भागात विशिष्ट समूहघटकांचे बाहुल्य जास्त आहे. दलित जातींमधील विविधता अन्‌ लोकसंख्याही लक्षणीय आहे. या सर्व समाजघटकांना परिवर्तनाच्या लढ्यात अग्रभागी ठेवून नेतृत्वात ते कसे पुढे राहतील यावर लक्ष दिले, तर अस्मितेच्या प्रश्नांना अवाजवी महत्त्व येणार नाही. अशा प्रश्नांना सामोरे जाताना परंपरेतून आलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचे उदात्तीकरण करायचे अन्‌ अनिष्ट प्रथांची आजच्या काळात अपरिहार्यता काय याची जाणीव प्रगल्भ करण्याचे कामही न थकता करायला हवे; तरच ही चळवळ आमूलाग्र बदलाच्या वाटचालीतील परिपाठ ठरेल.

Tags: पाणी परिषद आटपाडी आनंद विंगकर भारत पाटणकर क्रांतिसिंह नागनाथ नायकवडी माणदेश Bharat Patankar Krantisinha Naganath Nayakavadi Manadesh aatpadi Anand Viṅgkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके