काय जीवन असणार हे? बारा वर्षांत अंगण ओलांडणे नसणे. निसर्ग, समुद्र, जंगलं... इतक्या जवळ तरी इतके दूर. आपल्याकडे तर आता टुरिझम संस्कृती उसळली आहे. दर सुट्टीत कुठे तरी जायचेच. मग तो विमान प्रवास असेना की समुद्रातल्या क्रूझवरचा... पण त्याने श्यामच्या आईचे जीवन उणावले का? पण तरी श्यामच्या आईला तो दिवस मिळाला हे किती छान. झाडं, जंगलं, समुद्र यानं तिचं मन भरलं असणार. पण तरी वाटत राहतंच, यापेक्षा अधिक समृद्ध आयुष्य तिला मिळायला हवं होतं. तिची श्रद्धा असलेली भारतातली देवळं, क्षेत्रं पाहायला मिळाली असती तर?
आयुष्यात पहिल्यांदाच ‘श्यामची आई’ पुस्तक वाचायला घेतलं. शहात्तराव्या वर्षी. कंटाळा केला इतकंच. खूप करून, रडकं असणार म्हणून दूर राहिलं असावं. पण वाचताना उलट खूप छान वाटलं, भरून आलं. छोटे छोटे लेख होते. इतर कुणी ती कादंबरी आहे, असे म्हटले होते. आणि त्या छोट्या लेखांपैकी एक-दोन लेख जरा गंभीर, करुण होते. ते सोडले, तर त्यात छान संस्कृतीच दिसत होती.
एक मथुरा नावाची बाई भात कांडायला यायची. म्हणून त्या अशा काम करणारांना कांड पीत म्हणायचे. मथुरेचा मुलगा श्यामच्या (आई यशोदा) घरी कामाला यायचा. त्यानं निरोप आणला. आईला जरा ताप आलाय. ती येणार नाही. पण काम अडू नये म्हणून ती तिच्याऐवजी चंद्रीला पाठवतेय.
यशोदा हळहळली. तिने केळीच्या पानावर गरम भात घातला. त्यावर लिंबाचं लोणचं घालून मुलाकरवी तिच्याकडे पाठवला. संध्याकाळी गवती चहाची काही पानं कापून, आणखी सुंठ वगैरे चहासाठी घरी पाठवली. दुसऱ्या दिवशी डोकं दुखतंय कळल्यावर उगाळून लावायला सांबर शिंग पाठवले.
मी हे वाचून थक्क झालो. मोलकरीण आजारी, तरी यशोदेनं एवढी काळजी घ्यावी? असे माणसुकीने वागले तर कशाला संघर्ष निर्माण होतील? लेबर प्रॉब्लेम सपशेल नाहीसे. त्यामुळे श्याम सुट्टीत खेड्यात यायचा. आई गेलेली. पण मथुरेला भेटायला जायचा. तिचा सुरकुतलेला हात हातात घेऊन बसायचा. आईची आठवण यायची.
मला यावरून अनुसयाची आठवण झाली. आमच्या सरकतीची, नथूची ती बायको. आमची शेती ते करत. मी पुण्यातून गावी आलो की अनुसया (वय वर्षे सत्तर ऐंशी) येऊन बसायची. माझ्या गालावरून हात फिरवायची. मला लसणाची, दाण्याची कुटलेली चटणी आणायची. तिला एव्हाना ऐकू येईनासे झाले होते. ‘छान आहे’चा नुसता हात करायची. बोलणेही कमी.
एकदा मी गावी आलो. पण गडबडीने परतलो. एस.टी. स्टँडवर एस.टी.त बसलो होतो. त्या गलक्यात मला अनुसया दिसली. वाटलं ही कुठं निघाली की काय? मी हात केला. तशी खिडकीच्या खाली जवळ येऊन उभी राहिली. हातात वर्तमान पत्राच्या कागदाचा गोळा होता. मला देताच ते उघडले तो ती माझी आवडती चटणी. मी गावी आल्याचं कळलं. तिनं चटणी केली. माझ्या घरी तिथं मी नाही, तशीच एस.टी. स्टँडवर. काय ही यातायात कशासाठी? तोवर कुळकायद्याने शेतीसंबंध संपले होते. पण हे संबंध? ते तुटतात की काय? तिचा एक मुलगा शाळेत माझ्या वर्गात. तो अचानक मृत्यू पावला. माझ्याकडे पाहून तिला त्याची आठवण येत असेल का? कसेही असो, मला तिचे प्रेम शेवटपर्यंत मिळाले, हे खरे.
त्या खेडूत जीवनात केवढी सहजता होती. शेजारची रेणू नावाची मुलगी माहेरपणासाठी घरी आली. तिने श्यामकडे नुसते पाहिले मात्र. म्हणाली, ‘‘तुझा सदरा काढ. बटन तुटलंय.’’ त्यानेही शर्ट काढून दिला. तिने गुंड्या, बटणं तर लावलीच. पण कुठं कुठं फाटलेलंही शिवून दिलं. किती सहजता ही. हा घरातला मुलगा नाही, शेजारचा. पण तरी तिची सहजता त्या आड आली नाही. त्यावरून घरात आईकडून काही ऐकावं लागलं नाही. हे ताई-भावाचं नातं की काय? यात आपलं परकं काही नसावंच?
याच रेणूबद्दल आणखी एक प्रसंग. त्यात रेणूचा फारसा उल्लेख नाही. श्यामच्या आईचा (यशोदा ताईचा) आहे. तिला श्रीखंडाच्या वड्या उत्तम येत. रेणूच्या आईने श्यामच्या आईला निरोप पाठवला. रेणू आता सासरी जायचीय. तिला श्रीखंडाच्या वड्या देऊ यात का डबाभर? श्यामच्या आईच्या अंगात ताप. पण बोलली नाही. जाऊन सगळं करून दिलं. रेणूची आई म्हणाली, तुम्हाला बरं नाही. हे मला ठाऊकच नव्हतं. हा घाट घातलाच नसता. (यशोदा ताई) श्यामची आई म्हणाल्या, "त्यात काय, माझी मुलगीच ना ती. सासरच्या लोकांना आपल्या मुलीचं नाव काढायला पाहिजे."
वडिलांच्या आणि श्यामच्या नात्याविषयी असंच काही विशेष आहे. त्या काळचे वडील कडक होते. जसे माझे वडीलही. पण श्यामच्या वडिलांना आणखी एक बाजू होती. एकदा ते श्यामवर रागावले. तो संध्या करतो की नाही यावरून. श्यामच्या आईने श्यामची समजावणी केली. त्याला शांत केले. दोघेही झोपून गेले. सकाळी वडील जंगलात गेले. तेथे आढळणारी दुर्मीळ पाने तोडून आणली. त्याच्यापासून एक भाजी करता येते. ती श्यामला खूप आवडते. म्हणून एवढ्या पहाटे जंगलात गेले होते. त्यांना राग आला. नंतर त्यांनाच ती चूक झाल्याची जाणीव झाली. का ती त्यांनी शाब्दिक रीतीने व्यक्त केली नाही. तर श्यामच्या आवडत्या कृतीने व्यक्त केली. सॉरी, एक्सक्यूज म्हणणे सोपे. पण हा अर्थ आणणे किती अवघड. किती सुंदर.
श्याम गावातून वीस मैलांवरच्या दापोलीला शिकायला जाऊ लागला. आईचा सहवास मिळायचा. म्हणून तो दर शनिवार, रविवार पालगडला गावी यायचा आणि तोही पायी पायी. पैशाची अखंड चणचण. शनिवारी दुपारी दोनला शाळा सुटली की पायी चालायला सुरुवात. तो घरी रात्री आठला पोहोचणार. सोमवारी सकाळी पहाटे चालणे सुरू. तो सकाळी 10 वाजता शाळेत, घंटाबरहुकूम.
एकदा श्यामच्या घरी गाय व्याली. श्यामला खरवस खूप आवडायचा. आदल्या रात्री आईने खरवस करून डब्यात ठेवला. सकाळी बाबांनी (श्यामच्या वडिलांनी) श्यामसाठी अशीच पायपीट करून शाळेत डबा नेऊन दिला. त्यांचं पागोटं वगैरे खेडुत अवतार पाहून मित्रांसमोर त्याला त्यांची लाज वाटली. याचे त्याला नंतर खूप वाईट वाटले. पण मला विशेष गोष्ट वाटते, फक्त खरवस घेऊन इतके मैल चालत जायचे? का, तर तो मुलाला आवडतो म्हणून? ही प्रेम दाखवण्याची रीत होती. माझे वडील उतारवयातही आजीच्या पिशव्या, धान्याच्या पिशव्या आमच्यासाठी आणायचे. ते एसटीने जरी यायचे, तरी खूप अंतर पिशव्या उचलाव्या लागत आणि त्याने त्यांचे खवाटे दुखत असत.
ब्राह्मणांच्या घरात एक तरी केशवपन केलेली विधवा असे. आळवण नावाचं विटकरी लाल लुगडं नेसलेल्या. आमच्या घरातही आजी, चुलतआजी अशा केशवपन केलेल्या विधवा होत्या. श्यामच्या घरात श्यामच्या वडिलांची बहीण अशी होती. वैधव्य आलं तेव्हाच्या दु:खाची आपण कल्पना करू शकत नाही. पण नंतर त्यांना त्या जीवनाची सवय होत असावी. आमच्या गावातल्या मनुताई हसऱ्या, हसतमुख होत्या. श्यामच्या या आजी दुर्वांची लाखोली वाहणाऱ्या कुणालाही दुर्वा तोडून बांधून द्यायच्या. नीटनीटके काम. त्यामुळे गावातून मागणी. फुलांची लाखोली म्हणून एक लाख फुले वाहायची, तसेच या दुर्वांच्या जुड्या. अशी त्या इतरही कामे कौशल्याने करीत. त्या सगळ्याला आजींनी मागणी असे. आणि त्याही हौसेने जाऊन कामे करून येत. त्या गावातला त्यांना तो ‘रोल’ मिळालेला होता.
अशी अनेक तरबेज माणसे असत, त्यांची मागणी असे. लग्नकार्य, उत्सव असले की पत्रावळ्या लावण्याचे काम, श्यामचे वडील त्यात एक्स्पर्ट. पाने हातातून जमवून आणायची. वड, तामिणी, अशाची पानं चालायची. पत्रावळ्या येतील, पण द्रोण येणं कौशल्याचं. आजच्यासारखी स्टीलच्या ताट-वाट्या नव्हत्या. आणि नंतर बायकांपुढं ते घासायला भांड्यांचा डोंगर नव्हता. काम झालं की कचरा खड्ड्यात. दुर्वांच्या जुड्या वळणं काय आणि पत्रावळ्या लावणं काय. हे प्रेमानं केलेली विनामूल्य कामं. आमच्या गावात ही काही कामं होती. कार्य निघालं की पापड तयार करणं हे असंच काम, केळीचा मधलं खोड कापून पुढचे उद्योग. शेतीमध्ये ‘इर्जिक’ होतं. शेतीचं पीक आलं की, कापणीचे दिवस यायचे. काही घरांमध्ये माणसं कमी पडायची. मग सगळं गाव एकजुटीने एक दिवसात पिकाची कापणी करून द्यायचे. रात्री सगळ्यांना त्या शेतकऱ्याकडे जेवण. थट्टा मस्करी करत.
आपण हा ठेवा आज गमावलाय, असं वाटतं. खेड्यात गेलं की मजूर मिळत नाहीत. ही सर्वत्र तक्रार. मग हा उपाय का करीत नाहीत. छोटी मोठी, कौशल्याची कामे करायला बायका घराघरात जमत. किती गोडवा. काम चालू असताना गप्पा, गोष्टी. समाजात एकत्र धरून राहणं. कुणाच्या कौशल्याला उठाव मिळण्याचं समाधान मिळणं. हे आज आपण कितपत करतो?
श्यामच्या कुटुंबाने दारिद्य्राचे चटकेही खूप खाल्ले. त्यात ते एके काळी सुस्थितीत. त्यामुळे ते फारच जड गेले असणार. आमच्या ओतुरच्या घरी असेच होते. गरिबी झाकायची आईची धडपड पाहात होतो. अनुभवत होतो. गरिबांची गरिबी उघडीवाघडी असते. हाल होतात. पण त्याची लाज वाटण्याचं कारण नसतं. घरातलं कुणीही मजुरी करते. भाजी-पाला, गोळ्या-बिस्किटं रस्त्यात उभे राहून विकून चार पैसे मिळू शकतात. इथे या गरीब ब्राह्मणांना ते करायची लाज वाटते. त्यांना श्रीमंतीचा किंवा सुस्थितीचा आव आणावा लागतो. फाटके-तुटके झाकावे लागते. ती तडफड काही वेगळीच.
मोठ्या वाड्यातून नातेवाईकांनी यांना बाहेर काढले. तेव्हाचा प्रसंग - आईच्या डोळ्यांतून खळखळ पाणी वाहतच. आई-बाबा, भावंडे सगळे परत परत वळून-वळून वाड्याकडे पाहताहेत. शेवटी मालकीच्या जमिनीच्या भरड तुकड्यावर गवताच्या छपराचं, मातीच्या विटांचं (एका खोलीचं) घर बांधतात. तसंच एकदा मारवाडी येतो. त्याचं चार हजार कर्ज घेतलं होतं. त्याने सगळं सामान, भांडी-कुंडी घराबाहेर काढून घेऊन गेला. त्या काळात कर्ज वसूल करण्याची एक रीत होती. आधी महाराकरवी दवंडी पिटून या कर्जाचा बोभाटा करायचे. कर्जदार यांच्या घराबाहेर तगादा लावण्यासाठी माणूस बसवायचा. तो नुसता ओट्यावर बसून राहणार. त्याचे चहापाणी, जेवण सगळे या कर्ज घेतलेल्यांनी करायचे. ‘श्यामची आई’मध्ये असा प्रसंग आहे. तगादेदार जेवताना श्यामच्या वडिलांशी हुज्जत घालत असतो. तुम्ही हे विका, ते विका. घरातले बायकोच्या अंगावरचे दागिने विका. असं म्हणताना म्हणाला, ‘बायको विका’.
हे ऐकताच श्यामची आतल्या खोलीत असलेली आई ताडकन् बाहेर आली आणि धाडकन् बोलत राहिली. जसा अग्नी पेटलाय अचानक, किंवा ज्वालामुखी उफाळलाय, निद्रिस्त, वडील मान खाली घालून बसलेले. आईचं आधीचं प्रेमळ समजूतदार रूप कुठे आणि हे उग्र रूप कुठे. भारतीय स्त्रीच व्यक्त झालेली.
सतत कष्ट उपसणाऱ्या या माय-लेकांच्या जीवनात एक प्रसन्न दिवस उजाडला. श्यामची आई गेली बारा वर्षे गाव सोडून कुठेही गेली नव्हती. काय म्हणायचं. आपण किती फिरतो, कित्येकदा निरर्थकही फिरतो. इथं घरात राहायचं. इतरांच्या गरजा पहायच्या. त्या भागवण्यासाठी आवश्यक ते करत यायचं. पण स्वत:साठी काही नाही. (जवळ म्हणजे वीस-तीस मैलांवर) लाडघर गावी देवी आहे. श्यामच्या आईला तिचा एक नवस फेडायचा होता. म्हणून श्याम आणि आई बैलगाडीतून निघाले. रस्ता तो काय असणार, त्याला बैलगाडी हे वाहन. आईच्या मांडीवर डोकं ठेवून श्याम पहुडलेला. केवढं सुख, केवढी शांतता. नंतर जंगल लागलं. ते दृश्य त्यांना दिसू लागलं. नंतर संगळं संपलं आणि समुद्राच्या लाटांचा आवाज.
लाडघरला त्यांची नात्यातली ‘वयनी’ किंवा वैनी राहायची. इतक्या गळ्यात पडल्या. काय बोलू आणि काय नाही. अशी अवस्था झाली की बस्स. तोवर श्याम आणि तिथलं कोणी समुद्रावर आंघोळ करून आले. तोवर गरमागरम जेवण. संध्याकाळी नवस फेडून यांची गाडी परतीच्या वाटेला. मनं खूप तृप्त झाली होती.
काय जीवन असणार हे? बारा वर्षांत अंगण ओलांडणे नसणे. निसर्ग, समुद्र, जंगलं... इतक्या जवळ तरी इतके दूर. आपल्याकडे तर आता टुरिझम संस्कृती उसळली आहे. दर सुट्टीत कुठे तरी जायचेच. मग तो विमान प्रवास असेना की समुद्रातल्या क्रूझवरचा... पण त्याने श्यामच्या आईचे जीवन उणावले का? पण तरी श्यामच्या आईला तो दिवस मिळाला हे किती छान. झाडं, जंगलं, समुद्र यानं तिचं मन भरलं असणार. पण तरी वाटत राहतच, यापेक्षा अधिक समृद्ध आयुष्य तिला मिळायला हवं होतं. तिची श्रद्धा असलेली भारतातली देवळं, क्षेत्रं पाहायला मिळाली असती तर?
काही का असेना, ‘श्यामची आई’ या पुस्तकरूपानं आणि त्यातल्या श्याम-आई यांचं भव्य, उत्तुंग जीवन पाहायला, अनुभवायला मिळालं. हे काही कमी आहे का?
(9 ते 13 फेब्रुवारी 1933 या पाच दिवसांत, नाशिक येथील तुरुंगात असताना साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिले, त्याला आता 88 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
Dominic Gonsalves- 20 Feb 2021
अनिल अवचटांचा लेख भावला!
save