डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्यांच्यात कमालीचे धैर्य होते. याचा पडताळा मला एकदा आला. आम्ही लिंगवाद निर्मूलन आंदोलनाविरुद्ध मजकूर छापला होता. त्यावर प्रतिगामी संघटनेने साधना कार्यालयाविरुद्ध मोर्चा काढला होता. मोर्चात गुंड बरेच. मी त्या मोर्चात सामील. पण एवढेच नव्हे तर यदुनाथही चाललेले. ती त्यांचीच प्रेतयात्रा चाललेली. त्यांनी खरी-खुरी तिरडी बांधून, त्यावर गवताच्या पेंढ्यांचे यदुनाथ केलेले. तिरडीभोवती यदुनाथांच्या नावाने काहीजण बोंबा मारत होते. कोणालाही ‘हे यदुनाथ’ असा पत्ता लागला असता तर काय झाले असते, कोणास ठाऊक. यदुनाथ मात्र शांतपणे चालले होते.  चेहऱ्यावर ना भीती, ना काही करण्याचा भाव.

यदुनाथ आम्हा मुलांना साठीच्या दशकात भेटले असावेत.  खादीचा शर्ट आणि  खादीचा पायजमा.  गबाळा वेश, पायजमा शर्टाचा. त्या वेळी जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या रस्त्यावर गाजत होते आणि मधु लिमये लोकसभेत सरकारचे वाभाडे काढत होते. ते आमचे हिरो होते. यदुनाथजी त्यापुढे निष्प्रभ होते.

पण एकदा त्यांची गाठ पडली आणि मी त्यांचाच झालो. एक जुना वाडा होता. तिथे साधनाचे ऑफिस. एका अर्धवट उघड्या जागेत त्यांचे टेबल.  त्यावर कागदांचे गठ्ठे. मासिकांच्या चळती. मध्येच एक पाण्याची बाटली उभी. एकदा पाणी पिण्यासाठी मी घेतली. तर म्हणाले, ‘त्यात होमिओपॅथीचे औषध टाकले आहे.’ माझा हात झटकन मागे. त्यांचे लिहिण्याचे काम शांतपणे चालूच.  त्यावेळचे साधना अगदी साधे. त्याचे ठराविक वर्गणीदार. त्यातील काही जण अंकाचे वेस्टन उघडीत असत की नाही याची शंका.

अशा परिस्थितीत त्यांची माझी भेट झाली. मी पु.ल. देशपांडे यांच्या विरोधात एक छोटासा/पानभर लेख लिहिला. ते बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूचे, तर आम्ही झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाजूचे. पु.लं. त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर. त्यांचे बटाट्याची चाळ गाजत होते. लोक त्यांच्या नाटकाला तुडुंब गर्दी करीत होते. त्यांची पुस्तके रांगा लावून विकत घेत होते. अशा वातावरणात माझा लेख, टीका करणारा पहिला असाच. कोणी प्रकाशक संपादक हातात धरायला तयार नव्हते. मग मी साधनेकडे धाव घेतली. यदुनाथजींनी वाचला आणि लाकडी ट्रेमध्ये ठेवून दिला. पुढच्या अंकात उठाव देऊन कव्हर पानावर छापला. त्या लेखाने एकच खळबळ उडाली. साधनाचे निद्रीस्त वाचक खडबडून जागे झाले. टीका करू लागले. काहींनी उचलून धरले. मला उत्साह आला. त्याचा राहिलेला आणखी एक भाग लिहिला. थत्तेजींनी तोही छापला. म्हणाले, ‘आता दर आठवड्याला लिहायचं.’ मी थक्क. त्या एका वाक्याने माझं जग इकडून तिकडे भिरकावलं गेलं.

युक्रांदमध्ये मोर्चे, सभा या सगळ्यात भाग घेणारा मी.  आता लेखनाकडे. यदुनाथांनी माझ्यात काय पाहिले कोण जाणे. पण त्या वाक्यामुळे मी आयुष्यभराचा लिहिता राहिलो. एका संपादकाचे दर्शन झाले. पु.लं.सारख्या साधनाशी निगडित लेखकाशी यदुनाथजींनी क्षणात दुरावा पत्करला. अनेक संपादक एसी केबिनमध्ये बसणारे, सभा संमेलनात उद्‌घाटने- प्रकाशने करणारे. पण इथं कमी पडले. लोकप्रियतेला छेद जाईल असे काही छापायचे नाही, असे त्यांचे धोरण. पण हा चुरगळलेल्या खादीतील शनिवार पेठेतल्या ऑफिसात बसलेला संपादक ती हिम्मत दाखवतो. काय आश्चर्य.

त्यांच्यात कमालीचे धैर्य होते. याचा पडताळा मला एकदा आला. आम्ही लिंगवाद निर्मूलन आंदोलनाविरुद्ध मजकूर छापला होता. त्यावर प्रतिगामी संघटनेने साधना कार्यालयाविरुद्ध मोर्चा काढला होता. मोर्चात गुंड बरेच. मी त्या मोर्चात सामील. पण एवढेच नव्हे तर यदुनाथही चाललेले. ती त्यांचीच प्रेतयात्रा चाललेली. त्यांनी खरी-खुरी तिरडी बांधून, त्यावर गवताच्या पेंढ्यांचे यदुनाथ केलेले. तिरडीभोवती यदुनाथांच्या नावाने काहीजण बोंबा मारत होते. कोणालाही ‘हे यदुनाथ’ असा पत्ता लागला असता तर काय झाले असते, कोणास ठाऊक. यदुनाथ मात्र शांतपणे चालले होते.  चेहऱ्यावर ना भीती, ना काही करण्याचा भाव.

काही दिवसांनी तसाच प्रसंग मी राजा ढालेचा लेख छापला तेव्हाचा. त्यात म्हणे राष्ट्रध्वजाची बदनामी झालीय. महाराष्ट्रभर गदारोळ. मी त्या अंकाचा संपादक. यदुनाथ यांचा त्या अंकाशी काही संबंध नव्हता. पण मोर्चाला ते सामोरे गेले आणि संपादकपदाचा राजीनामा दिला. मी थक्क. म्हटलं, ‘तुम्ही कशाला राजीनामा देताय.’ मी जबाबदार नाही म्हणून मी राजीनामा देणार नाही, असे म्हणायला हवे. यदुनाथ त्या गर्दीतही हसले, माझा हात दाबला. कोणी त्यांना हे अंगावर घ्यायला सांगितले होते? पण तो त्यांचा स्वभावच.

त्या काळात मी आणि सुनंदा अडचणीत होतो. मला पाचशे रुपये पगार मिळाला असता तरी भागले असते. तसे मी साधनाच्या स्टाफशी बोललो. ते म्हणाले, ‘अहो आपल्या ट्रस्टींनी त्यांना पाचशे रुपये पगार देऊ केला’, तर त्यावर हे म्हणाले, ‘एवढा पगार कशाला,  तीनशे चालेल.’ आता त्यांना तीनशे तर आम्हाला अडीचशे घेणं आलं. तुला पाचशे कोण देणार?

शुक्रवार पेठेतल्या दोन खोल्यात यदुनाथ राहात. दोन मुले. पण स्वच्छ नेकीचा संसार. सगळा साधा संसार. त्यांच्या साधेपणात भक्तीभावही होता. बाबा आमटेंवर त्यांची अशीच भक्ती. बाबा कुठेही काही बोलत असले की, ते वही काढून लिहून घ्यायचे. आम्ही त्यांना हसायचो. पण आता लक्षात येते की, बाबांचं केवढं तरी साहित्य आज छापील पुस्तकांच्या रुपात आपल्यापुढे उपलब्ध आहे.

साने गुरुजींचे ते मानसपुत्र. बोलताना ‘गुरुजी’ असा उल्लेख आला की समजायचं तो साने गुरुजींविषयी आहे. पण असा उल्लेख क्वचित. ते गुरुजींविषयी हळवे असावेत...

यदुनाथांनी मला काय दिलं? खूप काही दिलं. ‘आता दर आठवड्याला लिहायचं’ या एका वाक्यामुळे/ऑफरमुळे  माझं आयुष्य कुठल्या कुठे गेलं. जो लिहिता राहिलो ते आजपर्यंत, ऐंशी वर्षांच्या जवळपास आलो असताही. त्यांच्याकडून निर्भयपणा पाहिला, साधेपणा शिकलो. तेव्हा तरुण वय असूनही मी कधी भारी कपडा अंगावर घातला नाही, खादीच घालत राहिलो, बावळटपणा पत्करून. आणि आता तर त्याशिवाय चालत नाही. एकानं दुसऱ्याला किती द्यावं याला काही मर्यादा. एवढे खरे की, साधेपणातून  जास्त शिकता येते...!

(1967 नंतरची पाच-सहा वर्षे अनिल अवचट यांनी साधनात सातत्याने लेखन केले. काही काळ ते साधनाचे कार्यकारी संपादकही होते. त्यांनी साधनात ‘वेध’ या शीर्षकाचे पहिले सदर लिहिले, नंतर त्याचे पुस्तकही आले. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे... ‘‘आयुष्यभर पुरतील इतके विषय देणाऱ्या साधना साप्ताहिकाला.’’)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल अवचट
aawchat@gmail.com

पत्रकार, लेखक, समाजसेवक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके