डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यंदा पुण्यात भरणारे अमृत महोत्सवी साहित्य संमेलन हे दहावे आहे. या आधी पुण्यात नऊ साहित्य संमेलनांचे आयोजन पार पडले त्यांची ही झलक. 

पुण्यातील पहिले संमेलन : क्रमाने पहिले : 1878 – अध्यक्ष : न्या. मा. गो. रानडे


 अध्यक्षीय भाषण उपलब्ध नाही; परंतु अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात अशा संमेलनांच्या आवश्यकतेसंबंधीचे विवेचन केले व उपस्थितांच्या काही शंकांना उत्तरे दिली असा उल्लेख आढळतो

---

पुण्यातील दुसरे संमेलन : क्रमाने दुसरे : 1885 – अध्यक्ष : कृष्णशास्त्री राजवाडे


अध्यक्षीय भाषण उपलब्ध नाही; परंतु अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात पत्रांद्वारे ज्या सूचना आल्या होत्या त्यांचा परामर्श घेतल्याचा उल्लेख आढळतो

---

पुण्यातील तिसरे संमेलन : क्रमाने चौथे : 1906 – अध्यक्ष : वा. गो. कानिटकर


अध्यक्षीय भाषण उपलब्ध नाही; परंतु अध्यक्षांनी आपल्या भाषणात मुंबई युनिव्हर्सिटीने मॅट्रिक्यूलेशनच्या नवीन अभ्यासक्रमात मराठीचा विषय ऐच्छिक न ठेवता जरुरीचा ठेवला याबद्दल युनिव्हर्सिटीचे आभार मानल्याचा उल्लेख आढळतो.

---

पुण्यातील चवथे संमेलन : क्रमाने पाचवे : 1907 – अध्यक्ष :  वि. मो. महाजनी


एक गोष्ट आपण ग्रंथकारांनी चांगली लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की, आपले वाङ्मय मराठी आहे. राष्ट्रीय आहे, म्हणजे महाराष्ट्रांतर्गत सर्व लोकांचे आहे. केवळ ब्राह्मणांचे नव्हे किंवा त्रैवर्णिकांचे नव्हे. महाराष्ट्रातील साऱ्या जातींच्या, साऱ्या धर्म-पंथाच्या लोकांचे आहे. म्हणून आपले सर्व लेखन राष्ट्रीय बुद्धिपोषक पाहिजे. ते जाती-जातीत द्वेष वाढविणारे नसावे. आम्ही सर्व एका देशात जन्मलेले. सर्वांचे अधिकार एकाच प्रकाराने म्हणजे गुणकर्मानुसार प्राप्त झालेले व मिळणारे आहेत, अशी आपली भावना असावी. ठिकठिकाणी पसरलेल्या दोन कोटी महाराष्ट्रीयांनी एक व्हावे, लोकांत साक्षरतेचा प्रचार करून वाङ्मयाविषयी अभिरुची ग्रंथकारांनी उत्पन्न करावी व वाढवावी. पौरस्त्य व पाश्चात्त्य झगड्यात आपण जपानचे उदाहरण पुढे ठेवावे. आपल्या वाङ्मयाची पूर्वीची पीटिका कायम ठेवून युरोपियन ज्ञानभांडारातील शास्त्रीय रत्ने मराठीत आणून पांगलेल्या व धनहीन झालेल्या महाराष्ट्रात विचारजागृती उत्पन्न करावी. राष्ट्रोन्नती करण्याच्या कामी लेखकांवर फार मोठी जबाबदारी असते. सार्डोनिया प्रांताला इटलीचे जसे राष्ट्रीय पद मिळाले तसे महाराष्ट्रास महत् राष्ट्रपद मिळण्याचा कधी काळी, लोकांच्या कर्तव्यबुद्धीने, ईश्वरी प्रसादाने व कर्तृत्वाने सुयोग येईल. अशी महत्तम आशा मनी धरून आपण ग्रंथ लिहिले पाहिजेत.

---

पुण्यातील पाचवे संमेलन : क्रमाने सहावे : 1908 - अध्यक्ष : चिं. वि. वैद्य

संस्कृत भाषेपासून निघालेल्या भाषांच्या आतल्या भाषा व बाहेरच्या भाषा असे दोन भेद विद्वान लोक करीत असतात. बंगाली, पंजाबी, काश्मिरी व सिंधी ह्या बाहेरील भाषा असून राजस्थानी, गुजराथी व हिंदी या आतल्या भाषा होत. मराठी काही आतल्या भाषेसारखी, काही बाहेरच्या भाषेसारखी आणि काही दोहोहूनही निराळी आहे. इसवीसनाच्या पाचव्या शतकात मराठी भाषेस हल्लीचे स्वरूप येऊन मराठी वाङ्मयाची सुरुवात नवव्या शतकात झाली असावी. आचार्यांनंतर धर्मजागृतीकरिता विद्वान लोकांनी मराठी भाषेच्याद्वारे यत्न केल्याने महाराष्ट्र वाङ्मयाचा आरंभ झाला. ज्ञानेश्वर, मुकुंदराव व नामदेव यांचे ग्रंथ मराठी वाङ्मयाचा पाया होत. या पायावर मजले व पुढील कवींनी लहान व कित्येकांनी मोठे असे मनोरे यावर उभारले. वामन पंडित, मोरोपंत, श्रीधर, महिपती यांच्या मनोहर व उंच मनोऱ्याशिवाय रघुनाथ पंडित, अमृतराव, राम जोशी वगैरेंचेही लहान मनोरे या महाराष्ट्र सरस्वती मंदिरावर आहेत. 
1818 मध्ये महाराष्ट्राचे स्वातंत्र्य गेले, धर्मजागृती राहिली नाही. पाश्चात्यांचे तितके सारे गोड वाटू लागले पण एकोणसाव्या शतकाच्या शेवटी स्वदेश व स्वराज्य यांच्या कल्पनांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस पुन्हा स्फूर्ती मिळाली. जुन्या वाङ्मय मंदिराची अधिष्ठात्री देवता भगवद्भक्ती होती. नव्या वाङ्मय मंदिरांतील अधिष्ठात्री देवता स्वदेशभक्ती ही आहे. या मंदिराचा पाया के. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी घातला!

---

पुण्यातील सहावे संमेलन :  क्रमाने तेरावे : 1927 -  अध्यक्ष : श्री. कृ. कोल्हटकर


विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या काळी आपल्या भाषेविषयी जी उद्वेगजनक अनास्था वसत होती, तिथे सांप्रतच्या  अतिरिक्त अभिमानात रूपांतर होण्याची कारणे देताना, पहिले स्थान खुद्द शास्त्रीबुवांच्या लेखांस दिले पाहिजे. त्या लेखांनी महाराष्ट्रीयांच्या स्वभाषेविषयी निद्रित अभिमानास जागे केले. त्यानंतर महादेव गोविंद रानड्यांसारख्यांच्या परिश्रमाने मराठीस उच्च व दुय्यम शिक्षणाच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठरावांनी समाजात भाषाविषयक जागृती होण्यास बरेच साहाय्य झाले. मागे स्वदेशीची व अलीकडे असहकारितेची जी लाट हिंदुस्थानभर उचंबळली, तिने परभाषाद्वेषाबरोबर महाराष्ट्राच्या स्वभाषा-प्रेमास ऊत आलेला असल्यास नवल नाही. विलायती कपड्यांच्याप्रमाणे इंग्रजी शब्दांची होळी जर करता आली असती तर त्या शब्दांबद्दलचा तिटकारा आहे, यापेक्षाही अधिक वाढला असता.
 राष्ट्रीय सभेने हिंदुस्थानाची प्रांतवार पूर्वघटना केल्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या प्रांतिक परिषदांच्या अधिवेशनांतून मराठीत भाषणे होऊ लागली आहेत. शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे होऊ लागल्यामुळे वाचकांचा व लेखकांचाही वर्ग वाढीस लागला आहे. मराठी भाषा ही दुय्यम शिक्षणात माध्यम व वरिष्ठ शिक्षणात ऐच्छिक झाल्यापासून अनेक चांगल्या शालोपयोगी पुस्तकांची निर्मिती होऊ लागली आहे. इंग्रजी वाङ्मयाकडे फाजील पक्षपाताने झुकत चाललेली महाराष्ट्रीयांची दृष्टी परत खेचून मराठी भाषेकडे वळती करण्याचे मुख्य श्रेय मराठी भाषेत स्वतंत्र व सरस ग्रंथरचना करणाऱ्या लेखकांसच दिले पाहिजे.

---

पुण्यातील सातवे संमेलन : क्रमाने बत्तीसावे : 1949 - अध्यक्ष : शं. द. जावडेकर


माझ्या मते सत्याग्रही समाजवाद हाच आपला आजचा महाराष्ट्र धर्म बनला पाहिजे ही निष्ठा जनतेच्या अंत:करणात दृढमूल होईल अशा साहित्याची निर्मिती हे साहित्यिकांचे क्रांतिकार्य आहे असे मी मानतो. समाजाचा सर्वांगीण सर्वोदय व्हावयाचा असेल तर त्यात विज्ञान, समाजज्ञान, मनोविज्ञान आणि आत्मज्ञानी तत्त्ववेत्ते या सर्वांचे सहकार्य झाले पाहिजे आपले एकंदर समाजजीवन समृद्ध सुसंवादी आणि सुसंस्कृत होईल अशी दक्षता घेण्याची संधी निर्माण करून देणे हा आपल्या संमेलनाचा हेतू आहे

---

पुण्यातील आठवे संमेलन : क्रमाने बावन्नावे : 1977 - अध्यक्ष : पु. भा. भावे


संयम आणि सूचकता हे मोठ्या कलाकाराचे लक्षण आहे. आमच्या नवलेखनात ह्या गुणांचा ठणठणाट आहे. आमच्या अनेक नव्या लेखकांना शिव्या तेवढ्या येतात. मोठ्या सत्त्वाचे लेखन त्यांना पेलतच नाही. नवतेच्या नावावर आज हवे ते गलिच्छ लिखाण केले जाते. कलाहीन आणि दुर्बोध गलिच्छतेचाच एक पंथ बनविण्याचा आज अनेकांचा खटाटोप आहे. त्यांच्या या बीभत्सतेला आता खरोखरच काही ताळतंत्र उरलेला नाही. कलाकाराला कलेची काही पथ्ये पाळावी लागतात. पण वारा प्यालेल्या आमच्या अनेक नवलेखकांना हे ठाऊकच नाही! ते म्हणतात, “कलाकार स्वतंत्र असला पाहिजे.” आता कलाकारांचे स्वातंत्र्य तर मीही काही एका संदर्भात मानतो. शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक हा स्वतंत्र असलाच पाहिजे. कुठल्याही स्टालिनचा किंवा माओचा तो दास असता कामा नये! कुठल्याही माथेफिरुमताचा तो भाट असता कामा नये. समाजकल्याणासाठी लेखक स्वतंत्र असला पाहिजे. पण लेखकाचे वा अन्य कुणाचेही स्वातंत्र्य अमर्याद नसते; अमर्याद असू शकत नाही, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे! मोठा प्रतिभावंत लेखक झाला तरी त्याला समाजाचे काही नियम पाळावेच लागतात. भारतीय दंडविधानापासून अगदी मोठ्यातला मोठा लेखकही मुक्त नाही.

---

पुण्यातील नववे संमेलन : क्रमाने त्रेसष्टावे : 1990 - अध्यक्ष : यू. म. पठाण


‘आंतरभारती’च्या चळवळीनं देशाची एकसंधता व एकात्मता साधण्यास फार मोलाचा हातभार लावला आहे. अन्य भाषांतील उत्कृष्ट साहित्य मराठीत अनुवादित व्हायला हवं. साहित्य अकादमी नॅशनल बुक ट्रस्ट, म.रा.साहित्य संस्कृती मंडळ आणि काही सामाजिक संस्था या दृष्टीनं जे प्रयत्न करीत आहेत, त्यांचा इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. अन्य भाषांत मराठी साहित्य अनुवादित करण्याच्या या प्रक्रियेला अधिक गती यायला हवी. या दृष्टीनं भारतातल्या अन्य भाषा जाणणाऱ्या मराठी साहित्यिकांनी यात विशेष लक्ष घातलं, तर हे कार्य सुकर होईल. यामुळें मराठी साहित्याच्या गुणवत्तेची दखलही भारतीय साहित्यात घेतली जाईल व त्याला मानाचं स्थान प्राप्त होईल. अनुवादित ग्रंथांना पुरस्कार देण्याच्या साहित्य अकादमीच्या योजनेचा राज्य शासनानं नि साहित्य संस्थांनीही विचार करायला हवा. हिंदीसारख्या अन्य भारतीय भाषांत मराठी साहित्याचा अनुवाद झाल्यास त्याला अधिक मोठा वाचकवर्गही लाभेल.


संकलन- अनिल बळेल
 

Tags: अनिल बळेल पुणे अखिल भारतीय साहित्य संमेलन anil balel pune akhil bharatiya sahitya sammelan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल बळेल

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) ते नोकरीस होते. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. त्यानंतर कथा लेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले. पुण्यात ग्रंथाली केंद्राची सुरुवात आणि त्यांचे संचलनही त्यांनी केले. बळेल यांना "विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक' या पुस्तकासाठी कोशकार स. मा. गर्गे पुरस्कार दिला होता. यांसह लेखनासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सत्तावीस पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके