डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अज्ञानाविरुद्ध संघर्ष आणि विज्ञानावर निष्ठा

नानासाहेब मला एकदा- जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी म्हणाले होते, "अनुताई तुम्ही स्त्रियांसाठी राखीव जागांची मागणी केली पाहिजे." पण मी त्यांना म्हटले, "आम्ही राखीव जागांची मागणी करणार नाही. आम्ही समता मागतो." पण आता राजकारण इतके बिघडत चालले आहे की शेवटी राखीव जागा निर्माण कराव्या लागल्या. त्याशिवाय स्त्रिया निवडून येणेच कठीण.
 

एप्रिल अखेर पंजाब विद्यापीठातील स्त्री अभ्यास गटाने घेतलेले स्त्री स्वातंत्र्यसैनिकांचे राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासत्र संपवून मी परतीच्या प्रवासावर होते. 2 मे ला सकाळीच कल्याण स्टेशनवर गाडी थांबली. मराठी पेपर घ्यावा म्हणून मी गाडीतून उतरणार तोच समोरचा प्रवासी पेपर घेऊन आला. त्याच्या हातातल्या वृत्तपत्रात नानासाहेबांचा जवळजवळ पानभर मोठा फोटो चटकन नजरेत भरला आणि मी दचकलेच. शंका खरी ठरली. नानासाहेबांना अगदी अचानक मध्यरात्रीनंतर झोपेतच मृत्यूने गाठले होते. बिछान्याला रखडणे नाही, कुणाकडून सेवा करून घेणे नाही. त्यांच्या दृष्टीने 'सुखाचेच मरण.' पण मागे राहिलेल्या आप्तांना, आमच्यासारख्या हजारो सहकाऱ्यांना आणि अनुयायांना कल्पना देखील न देता त्यांनी आपला मृत्युलोकातला प्रवास संपवला होता. मला तर त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. मग पुण्याला पोचेपर्यंत मनात अनेक प्रसंग, असंख्य आठवणी दाटून आल्या. डोळ्यांत येणारे अश्रू आवरुन धरण्याचा प्रयत्न करीतच मी पुण्याला पोचले आणि दोन तासातच राधाला भेटायला घरी गेले.

एस.एम.जोशीचा प्रथम परिचय स्वातंत्र्य आंदोलन तापत असतानाच 1941 साली झाला. पण नानासाहेब मात्र तेव्हा गुलबर्ग्याच्या तुरुंगात होते. त्यांची भेट तुरुंगातून सर्व मोठे नेते सुटून आल्यावरच झाली.

नानासाहेबांच्या घरी येणे जाणे सुरू झाल्यानंतर मला प्रथम जाणवले ते एका सनातनी विचारांच्या कुटुंबात जन्माला येऊनही ते अगदी तारुण्यातच पूर्णपणे पुरोगामी, विज्ञानवादी बनले होते. म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी पुष्कळ वाचन आणि चिंतन केले असले पाहिजे. मी तुरुंगातून सुटून आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाची पूर्ण वेळ सेवक म्हणून कामाला सुरुवात केली. हळू हळू समाजवाद्यांच्या कळपात जाणे येणे नित्याचे झाले. स्वातंत्र्याची व त्यानंतर नवभारत निर्मितीची स्वप्ने रंगवलेली कानी पडू लागली. त्यावर नानासाहेबांची अनेक बौद्धिके ऐकली. समता, न्याय, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि पक्की विज्ञाननिष्ठा यांवर त्यांची वैचारिक बैठक आधारलेली आहे हे लक्षात आले आणि म्हणून त्यांचे मार्गदर्शन मोलाचे वाटू लागले. एस.एम. ना अगोदरच मानले होते आणि आता नानासाहेबांनाही. समाजवादी महाराष्ट्राची उभारणी करणारी ही जोडी त्यांच्या विचारांनी तीन पिढ्या घडल्या.

नानासाहेबांच्या घरी जाणे येणे सुरू झाले आणि सुमतीबाईंचाही परिचय झाला. लहानपणीच वैधव्य आल्यानंतर त्या कॉलेज शिक्षण घेऊ लागल्या आणि कॉलेजमधेच नानासाहेबांचा त्यांच्याशी परिचय झाला. वयाने मोठ्या असलेल्या या विधवा स्त्रीशी नानासाहेबांनी लग्न केले ते त्यांच्या आईवडलांना मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे घरात विभक्त संसार करावा लागला. पण नानासाहेबांनी आईवडलांचा योग्य तो आदर राखला, तरीही आपल्या तत्त्वांशी ते प्रामाणिक राहिले. या सर्व प्रकरणी अर्थातच त्यांनी मानसिक यातना भोगल्या असणारच.

1959 साली आम्ही समाजवादी महिला सभेची स्थापना केली. सुमतीबाई सुविद्य होत्या. सेवासदन ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्य होत्या आणि शिवाय 1946 साली नानासाहेबांनी त्यांना हंगामी विधिमंडळासाठी उभे करून निवडून आणले होते. तेव्हा समाजवादी वर्तुळातील या ज्येष्ठ कार्यकर्तीला आम्ही समाजवादी महिला सभेच्या पहिल्या अध्यक्षा केले होते, त्यानिमित्ताने नानासाहेबांच्या घरी जाणे वाढले व मार्गदर्शनही घेणे सोपे झाले.

अन्यायाविरुद्ध संघर्षाच्या लढ्यात नानासाहेब प्रत्येक वेळी उतरलेले दिसतात. स्वातंत्र्यलढ्यात ते आघाडीवर होते. नंतरही हैद्राबादचा लढा, गोव्याचा लढा अशा मोक्याच्या लढ्यात ते अग्रभागी राहिले. या शिवाय विरोधी पक्ष म्हणून काम करताना महागाई, भूमिमुक्ती, संयुक्त महाराष्ट्र आणि शेवटी आणीबाणी अशा अनेक लढ्यात ते सहभागी झालेच.

विज्ञाननिष्ठा ही नानासाहेबांची सहज प्रवृत्तीच बनली होती. स्वातंत्र्याचा लढा असो, जातिधर्मवादाचा-मानवतेचा प्रश्न असो, किंवा स्त्री-पुरुष समतेचा प्रश्न असो, नानासाहेबांनी योग्य अशीच भूमिका प्रत्येक वेळी घेतली होती. अयोध्या प्रश्नाच्या वेळी नानासाहेबांनी केलेली परखड भाषणे ऐकून जातिवादी संघटनांचा तिळपापड झाला होता. त्यांनी जणू नानासाहेबांवर डूकच धरला. त्यांना घाणेरडी पत्रे लिहिणे, फोनवर धमक्या देणे, घरावर पाळत ठेवणे, आपल्या खास वृत्तपत्रातून नानासाहेबांवर गलिच्छ आरोप करणे, हे सर्व प्रकार झाले. मला वाटते अशा प्रकारचा छळ नानासाहेबांइतका कुणालाच सहन करावा लागला नसेल. पण कुठल्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी, विचारांशी तडजोड न करता नानासाहेबांनी या सर्व विरोधाला तोंड दिले.

या सर्वांआधी समाजवादी पक्षातच फूट पडण्याची वेळ आली तेव्हा खरा सत्व परीक्षेचा क्षण आला. बनारसला प्रजासमाजवादी व संयुक्त समाजवादी अशी फूट पडली तेव्हा समाजवाद्यांचे दोन्ही नेते एस.एम. व गोरे- ज्यांची नावे सतत जोडीनेच घेतली जात, त्यांच्यामधेही फूट पडली- एस.एम. नी संयुक्त समाजवाद्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि नानासाहेब प्रजा समाजवादी पक्षातच ठामपणे राहिले. त्या वेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची परीक्षा होती. एस. एम.बद्दल अतिशय जिव्हाळा, प्रेम, आदर असतानासुद्धा आम्ही नानासाहेबांचे नेतृत्व स्वीकारले कारण वैचारिक दृष्ट्या तेच अधिक कणखर व अचूक होते असे आम्हाला वाटले. शिवाय एस.एम. प्रमाणे नानासाहेबही आम्हांला प्रिय होतेच. मनाला त्या वेळी विलक्षण यातना झाल्या, तरीही नानासाहेबांचे मत हेच आम्हाला योग्य वाटले व त्यांच्या मागे आम्ही राहिलो. अर्थात बऱ्याच मंडळींनी एस. एम. च्या नेतृत्वामुळे संसोपात प्रवेश केला होता.

स्त्री-पुरुष समतेबाबत नानासाहेबांचे विचार अर्थातच समता, मानवता व विज्ञानाला धरूनच होते. राजकारण की समाजकारण हा प्रश्न त्यांच्यापुढे येण्याचे कारणच नव्हते. राजकारण हे त्यांनी जीवनात पत्करलेच होते. त्यात गांधीजी आणि मार्क्स त्यांना गुरुस्थानी वाटत, पण त्या काळात एका तरुण विधवेशी लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा त्यांच्यावर गांधीजींप्रमाणेच महर्षी कर्व्यांच्या व आगरकरांच्या विचारांचा, कार्याचाही प्रभाव होता हे स्पष्टच झाले.

सुमतीबाईशी त्यांनी पुनर्विवाह केल्या नंतरच्या काळात नेरळचे कार्यकर्ते हरिभाऊ भडसावळे व भिवंडीचे कार्यकर्ते प.स. भागवत या दोघांची लग्ने अशाच दोन तरुण विधवा स्त्रियांशी करून देण्यात नानासाहेबांनी पुढाकार घेतला होता. या दोघीही विधवा तरुण स्त्रिया ट्रेनिंग कॉलेजमध्ये सुमतीबाईच्या शिष्या होत्या.

नानासाहेबांना शुभा ही एकच कन्या. तीच त्यांच्या कुटुंबातील सर्वस्व. शुभाचे शिक्षण पुरे झाले, लग्न झाले व ती डॉ. जोशीबरोबर अमेरिकेतच स्थायिक झाली. ती, जावई व त्यांच्या दोन उमद्या- दोघीही वकील झालेल्या जुई व सायली- सायली नुकतीच बॅरिस्टरही झाली- हे नानासाहेबांचे कुटुंबातील प्रेमाचे घर. त्या घरी ते वर्षातून एकदा जात व महिना-दोन महिने विश्रांती, मायेची माणसे यांच्या सहवासात त्यांना एक बदल मिळे. 'पिट्सबर्ग डायरी' हे त्यांनी अमेरिकेत बसून साधनेच्या वाचकांसाठी लिहिलेले लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले आहेत.

पुढच्या काळात सुमतीबाई दम्याच्या विकाराने सतत आजारी असताना व त्या नंतरही नानासाहेबांनी आपल्या घरी प्रथम दोन दलित वर्गातील मुलीना मदतीला म्हणून ठेवले होते. पहिली लग्न करून धुळ्याला गेली. दुसरी रंजना ही केवळ कामाला राहिली असे नाही तर नानासाहेबांनी तिला एक कार्यकर्ती म्हणूनच तयार केली. ती लग्न करून नगर जिल्ह्यात गेली. आज ती एक प्रभावी कार्यकर्ती म्हणून गणली जाते. तिने नगर जिल्ह्यात जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली. ती एक चांगली वक्ती बनली आहे. राधा ही तर पुष्कळ वर्षे नानासाहेबांकडे आहे. लहानपणीच परित्यक्ता म्हणून जगत असलेली ही मुलगी नानासाहेबांकडे आली आणि त्यांनी तिला आपली मुलगी असल्यासारखीच वागणूक दिली. राधा समाजवादी महिला सभेत येऊ लागली. एक कार्यकर्ती म्हणून तयार झाली. नानासाहेबांच्याच घरात खालच्या मजल्यावरचा हॉल हा त्यांनी महिला सभेच्या कामाला दिला आहे. तिथले कुटुंब कला केंद्र राधा व आणखी काही स्त्रिया मिळून सांभाळतात. खूप स्त्रिया रोज मार्गदर्शन घ्यायला येतात. राधाने या कामात स्वतःला ओतून घेतले आहे. नुकताच कॉलेजच्या मंडळीनी कौटुंबिक प्रश्नांवरील कायदे व त्या प्रश्नांचे निराकरण संबंधी सहा आठवड्यांचा एक कोर्स तयार करून त्याची परीक्षा घेतली, त्यात राधा दुसऱ्या क्रमांकाने पास झाली. शिवाय ती पुणे शहर समाजवादी महिला सभेची सेक्रेटरी व सुमतीबाई गोरे ट्रस्टची कार्यकर्ती म्हणूनही काम करते. राधाच्या नावे नानासाहेबांनी खालच्या दोन खोल्या करून देऊन तिची पुढची व्यवस्थाही केली आहे.

आपल्या उत्तरार्धात नानासाहेबांनी स्त्री मुक्तीच्या प्रश्नाचाही गांभीर्याने विचार केला. समाजवादी महिला सभेने त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. राष्ट्राच्या घडामोडीत एखादा महत्त्वाचा प्रश्न आला की आमच्या कार्यकर्त्या त्यांच्याकडे जात व त्यांचे मार्गदर्शन घेत. मी ज्या वेळी प्र.स. पक्षात काम करीत होते त्या वेळी मला नेहमी वाटे की स्त्रियांमध्ये काम वाढावे. स्त्री कार्यकर्त्या तयार व्हाव्यात यासाठी कुणी खास लक्ष देत नाही. राष्ट्र सेवा दलात भाऊसाहेब रानडे यांनी मोलाचे काम केले. मुली प्रत्येक क्षेत्रात- मग ते अभ्यासमंडळ असो, क्रीडा क्षेत्र असो कला क्षेत्र असो-पुढे यावे यासाठी भाऊसाहेब जातीने लक्ष घालीत, पालकांना भेटत, मुलींना धीर देत, प्रसंगी जामत- त्यामुळे राष्ट्र सेवा दलातून अनेक उत्तम कार्यकर्त्या तयार झाल्या..

नानासाहेब मला एकदा-जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी- म्हणाले होते, "अनुताई तुम्ही स्त्रियांसाठी राखीव जागांची मागणी केली पाहिजे." पण मी त्यांना म्हटले, "आम्ही राखीव जागांची मागणी करणार नाही. आम्ही समता मागतो." पण आता राजकारण इतके बिघडत चालले आहे की शेवटी राखीव जागा निर्माण कराव्या लागल्या. त्याशिवाय स्त्रिया निवडून येणेच कठीण. देशाचा, समाजाचा, मूल्यांचा विचार करणारे व त्यासाठी लढणारे नेते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राहिले. बाकी सर्व स्वार्थ, सत्ता यांवर डोळा ठेवूनच राजकारणात येतात. सत्य, समता यांसारख्या मूल्यांची घसरणच सुरू झाली आणि आता तर राजकारणात गुंडांचे स्थान वाढतच चाललेले स्पष्ट दिसते. तेव्हा स्त्रियांना सरळ लढतीत उतरणे कठीणच. अजून स्त्री वैचारिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालेली नाही आणि ती तशी झाली पाहिजे यासाठी नानासाहेबांचा आग्रह होता.

अयोध्या प्रश्न, काश्मीर, रशियातील घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांच्याकडे जाऊन आम्ही चर्चा केली आहे. मधून मधून आमच्या 300-350 कामगार स्त्रियांसमोर येऊनही ते बोलत असत. जातीपाती, अंधश्रद्धा स्त्रियांनी सोडल्या पाहिजेत यांवर त्यांचा भर असे. मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठीही स्त्रियांनी पुढे यावे असे त्यांना वाटे.

समाजवादी महिला सभा सातत्याने इतकी वर्षे अभ्यासमंडळ, उद्योग, बालवाडी, स्त्रीमुक्ती अशा क्षेत्रात चौफेर काम करते, आदिवासींमध्येही काम उभे करते याबद्दल त्यांना समाधान वाटे पण तुम्ही अजून आपल्या कामाला धार आणली पाहिजे, उपक्रमशीलता वाढवली पाहिजे व खंबीर अभ्यासू कार्यकर्त्या तयार केल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे.

समाजवादी महिला सभेने त्यांच्या अपेक्षा प्रयत्नपूर्वक पुऱ्या कराव्यात हीच इच्छा! तीच नानासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Tags: शुभा. एस.एम.जोशी अनुताई लिमये Shubha SM Joshi #Anutai Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके