डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मेहरुन्निसा दलवाई : समर्थ आणि निर्भय

हमीदभाई गेल्याचे दु:ख भाभींना होते, पण नंतर मात्र त्यांच्याकडून मी चारपाच वेळा ऐकले ते अंतर्मुख करणारे आहे. त्या म्हणायच्या, ‘‘हमीद गेल्यानंतर मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्यातल्या अनेक गुणांचा मला साक्षात्कार झाला.’’ हमीदभाई असेपर्यंत समर्थपणे गृहिणीपद सांभाळणाऱ्या मेहरुन्निसाभाभींनी चळवळीमध्येही तितक्याच समर्थपणे नेतृत्व केले. अनेक माणसे जोडली. त्या लिहीत नव्हत्या; पण त्यांना जेवढी वैचारिक  स्पष्टता आली होती, तेवढी त्यांच्या ध्येयनिष्ठ जगण्याला बळ देणारी होती. 

दि.8 जून 2017 रोजी मेहरुन्निसा दलवाई यांचे पुण्यात निधन झाले. वयाची 87 वर्षे पूर्ण करून 88 वे वर्ष सुरू झाले होते. तसे निधन अकाली होते असे नव्हे, उलट कोणालाही हेवा वाटावा असे निधन त्यांना लाभले आणि तरीही दु:खाची भावना माझ्यासह अनेकांच्या मनात आहे.

हमीद दलवार्इंसारख्या चळवळीत सर्वस्व झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर संसार करणे, ही सोपी गोष्ट नव्हती. ही भूमिका त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. हमीदभाई आणि मेहरुन्निसांचे लग्न जमले, तेही अपारंपरिक पद्धतीने. हमीदभार्इंबरोबर लग्न करण्याचा निर्णय मेहरुन्निसांच्या घरच्यांना भावला नव्हता. त्या वेळी हमीदभाई चळवळीचा नेता वगैरे झाले नव्हते. स्थिर नोकरी नसलेला, स्वत:चे घर नसलेला, लौकिक अर्थाने उनाडक्या करणारा हमीद लग्नाच्या मार्केटमध्ये शून्य किंमत असलेला तरुण होता. पण मेहरुन्निसाभाभीने घरच्यांची नाराजी स्वीकारून हे लग्न केले. एका अर्थाने संघर्षमय जीवनाच्या वाटेवरचे हे पहिले पाऊल होते. बँकेऐवजी खादी ग्रामोद्योग कमिशनमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. त्यांच्या वडिलांचा तो सल्ला होता. पण लग्न हा विषय अवघड होता. एका अर्थाने तो आंतरजातीय विवाहही होता, मुस्लिमांमध्ये जाती नसल्या तरी बिरादरी आहेत. हमीद कोकणी, तर भाभी दखनी.

दै. ‘मराठा’मधील नोकरी हमीदभार्इंच्या भ्रमंतीला उपकारक ठरली. ठिकठिकाणी ते फिरले व त्यावर लिखाणही केले. हमीदभार्इंची ‘इंधन’ ही एक अतिशय महत्त्वाची कादंबरी. त्यात सत्य घटना आणि काल्पनिक  कथानक बेमालूमपणे मिसळून गेलेले. कोकणाच्या खेड्यातील हिंदू-मुस्लिमांचे पारंपरिक जैविक संबंध व सौहार्द- एकमेकांत गुंतलेले सांस्कृतिक जीवन आणि एखाद्या घटनेत ते संबंध तणावपूर्ण होऊन दंगलीत कसे  रूपांतरित होतात, याचे वर्णन या कादंबरीत आहे. यातील अनेक पात्रे गावकऱ्यांना ओळखीची वाटली. या कादंबरीमुळे गावाची बदनामी झाल्याची भावना गावकऱ्यांत झाली. चिपळूणमध्ये या कादंबरीचा निषेध करणारी सभा झाली. ही सभा सर्व हिंदू-मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन घेतली होती. हमीदभार्इंच्या चिपळूणमधील घरावर दगडफेक झाली. दहशतीचे वातावरण होते. भाभी गरोदर होत्या. या सर्व प्रसंगांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले. हमीद म्हणजे वादळ. असे वादळ आपल्या पदरात घेऊन ते सांभाळण्याचे आव्हानात्मक कार्य भाभींनी केले. याच काळात हमीदभार्इंनी समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. यात सात मुस्लिम महिला सहभागी झाल्या, त्यात भाभीही होत्या. या मागणीसाठी सात मुस्लिम महिला त्या काळात रस्त्यावर उतरल्या, हे आश्चर्यजनक आहे. सात हा आकडा फार लहान नव्हता.

हमीदभार्इंनी शेवटपर्यंत संसारामध्ये लक्ष घातले नाही. आर्थिक जबाबदारीसह घर व मुलींना सांभाळणे, जाणाऱ्या- येणाऱ्यांची काळजी घेणे हे सर्व भाभींनी केले. हमीदभार्इंच्या आयुष्यातील शेवटची दीड-दोन वर्षे अतिशय कठीण गेली. किडनी निकामी झाल्यानंतर ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन झाले. वर्ष-दीड वर्षाने दुसऱ्याची बसवलेली किडनीही निकामी  झाली. हा सर्व काळ अतिशय अवघड होता. नोकरी, संसार, हॉस्पिटल व हमीदच्या गोतावळ्यातील जाणाऱ्या-येणाऱ्या सहकाऱ्यांची काळजी घेणे- हे सर्व काम भाभी करत राहिल्या. या काळात त्यांना महंमद दलवाई व अब्दुल कादर मुकादम यांची मदत झाली, पण भाभींवरील ताण खरोखरच जीवघेणा होता. हमीदभार्इंच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे दहन करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणणे, हाही मोठा संघर्ष होता. नात्यातील अनेक जण मृतदेह गावी घेऊन जाऊ इच्छित होते, पण भाभी व मंडळाचे सर्व सहकारी दहनाच्या निर्णयाशी ठाम राहिले.

हमीदभार्इंच्या निधनानंतरही मुस्लिम सत्यशोधक मंडळाची वाटचाल सुरू होती; पण त्याचे नेतृत्व भाभींनी करावे, अशी कल्पना मंडळाचे कट्टर समर्थक प्रा.ए.बी.शहा व इतरांच्या मनात आली. भाभींना त्या दृष्टीने तयार करून व प्रयत्न करून सक्रिय केले. सुरुवातीला कोणी तरी भाषण लिहून द्यायचे व ते भाभींनी वाचायचे, असे चालायचे. हमीदभार्इंचे चुलतभाऊ महंमद हे भाभींना भाषण लिहून देत असत. हळूहळू भाभी स्वत:ही लिहून बोलू लागल्या. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे काम चालवण्यासाठी आवश्यक तेवढे चळवळीचे व इस्लामचे ज्ञान भाभींनी मिळवले, पण त्यांची ताकद निष्ठा व निर्भयपणात होती. त्यांना जे पटले, ते त्या निर्भयपणे मांडत असत. स्त्री-पुरुष समानतेचा विचार त्या वैचारिक पद्धतीने मांडण्याऐवजी दैनंदिन अनुभवातून मांडत असत. स्वयंपाक, घर, संसार, बाजार यात स्त्रियांना मिळणारी वागणूक, बुरखा घातल्याने होणारा त्रास इत्यादी मुद्दे त्या सोप्या पद्धतीने सांगत. चळवळीचे विरोधक अनेकदा आक्रमक पद्धतीने अंगावर येत, पण त्या कधी मागे हटल्या नाहीत. मुंबईत मंडळाचे कामकाज करत त्यांनी एक छोटासा ग्रुप तयार केला होता. अधूनमधून छोटे-मोठे कार्यक्रम त्या घेत असत, पण बाहेरगावी फिरणे व प्रश्न समजून घेणे असेही काम त्या करीत असत. अलिगढ येथे दंगल झाली असता हुसेन जमादार आणि भाभी तिथे जाऊन पाहणी करून आल्या होत्या.

शाहबानोच्या प्रकरणानंतर तलाकची चर्चा जोरात सुरू होती. त्या काळात भाभी, हुसेन जमादार, मुमताज रहिमतपुरे व इतरांनी मिळून तलाक मुक्तिमोर्चा आयोजित केला होता. हमीदभार्इंच्या आजारपणात शरद पवार यांनी फार मोठी साथ दिली होती, या तलाक मुक्तिमोर्चालाही शरद पवार यांचे सहकार्य मिळाले. अनेक ठिकाणी हा मोर्चा गेला. नंतर मंडळापासून दूर गेलेले मंडळाचे जुने सहकारी प्रा.फ.ह.बेन्नूर व अमरावतीचे वजीर पटेल यांनी अनुक्रमे सोलापूर व अमरावती येथे मोर्चाला सहकार्य केले. अमरावतीमध्ये तर या मोर्चाच्या स्वागतासाठी जवळपास सात-आठशे मुस्लिम महिला आल्या होत्या. तसाच प्रतिसाद सोलापूरलाही होता. नगरमध्ये या मोर्चावर हिंसक जमावाने हल्ला केला. मोर्चा तिथे स्थगित करून त्याचा शेवट  दिल्लीमध्ये राजीव गांधी व राष्ट्रपती झैलसिंग यांना निवेदन देऊन करण्यात आला. भाभींचे नेतृत्व या संपूर्ण मोर्चात तावून-सुलाखून उजळले गेले.

शाहबानोच्या प्रकरणात सर्व प्रयत्न झाले, मात्र यश मिळाले नाही. तलाकपीडित महिलेला पतीपासून मिळत असलेली पोटगी रद्द करणारा नवा कायदा अस्तित्वात आला. चळवळीत निराशेची लाट आल्यासारखी परिस्थिती होती. त्यानंतर बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्यानंतर मुंबईत फार मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अत्यंत विषारी वातावरणाचा मुकाबला मुंबईसह सर्व देशवासीयांना करावा लागला. चळवळीतील अनेक कार्यकर्तेही बिथरले. ‘हमीदभार्इंचे दहन केले ती चूक होती; चला, आपण क्षमा मागू या’ अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेतली. तर समान नागरी कायद्याची भूमिका आपण सोडू या, असे काहींचे म्हणणे होते. या कठीण काळात एका बाजूला भाभी अनेकांना आधार देत होत्या, तर दुसऱ्या बाजूला भूमिका बदलण्याच्या सूचनेला विरोधही करत होत्या. शाहबानो प्रकरणात चळवळीत पराभवाची भावना आणि बाबरी मशीद पडणे या दोन्ही घटना अनेकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने कसोटीच्या होत्या. ती कसोटी भाभींनी मात्र व्यवस्थित पार केली.

मुमताज रहिमतपुरेंचे कोल्हापूरमध्ये निधन झाल्यानंतर तिच्या दफनविधीला कब्रस्तानमध्ये जागा देण्यास तेथील काही मुस्लिम पुढाऱ्यांनी विरोध केला. पोलीस व काही नेते यांनी मध्यस्थी केली आणि पोलीस बंदोबस्तात तो विधी पार पडला. पण ही परिस्थिती चिंताजनक होती. मुमताजचे योगदान मराठी साहित्यात फार मोठे होते.

मेहरुन्निसाभाभी व हुसेन जमादार यांनी पुढाकार घेऊन  हमीदभार्इंच्या नावाने पुरस्कार सुरू केला आणि 3 मे 1991 रोजी पहिला पुरस्कार मुमताज रहिमतपुरे यांना मरणोत्तर देण्यात आला. तेव्हापासून दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार व पुरस्कार समारंभाची जबाबदारी भाभींनी शेवटपर्यंत पेलली. अगदी शेवटचा पुरस्कार 3 मे 2017 रोजी पुणे येथे इब्राहिम खान यांना दिला.

हमीद दलवार्इंनी त्यांच्या मृत्युपत्रात इस्लामचा चिकित्सक अभ्यास करणारे एक केंद्र असावे, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे भाभी, अन्वर शेख, मी व इतरांनी विचारविनिमय करून पुण्यातील हमीदभार्इंच्या घरामध्ये हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे काम सुरू केले. सुरुवातीची पाच वर्षे मी विश्वस्त सचिव म्हणून काम केले. भाभी अध्यक्ष होत्या. या इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही नागपूर, अर्णी, लोहारा (जि.उस्मानाबाद), कोल्हापूर, पुणे, मालेगाव, मुंबई अशा अनेक ठिकाणी Secularism and Liberalism या विषयावर चर्चासत्रं घेतली. यातील मालेगावमधील शिबिर आव्हानात्मक होते. डॉ.सुगन बरंठ व डॉ.संजय जोशी यांच्या मदतीमुळे ते शक्य झाले. मालेगावसारख्या ठिकाणी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे नाव घेऊन कार्यक्रम झाला. त्यात अनेक मुस्लिम महिलांसह लोक सहभागी झाले. भाभींचा आत्मविश्वास वाढत होता.

यादरम्यान भाभींनी ‘मी भरून पावले आहे’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. या पुस्तकाची सर्व कहाणी हा एक स्वतंत्र विषय होईल, पण या पुस्तकाचे स्वागत जोरात झाले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. अहमदनगर येथे भरवण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाभींना एका परिसंवादात वक्त्या म्हणून बोलावण्यात आले. या संमेलनाला त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. या संमेलनात काय बोलावे याची आम्ही सविस्तर चर्चा केली होती, त्याप्रमाणे त्यांचे भाषण अगदी व्यवस्थितपणे पार पडले. उर्दू लिपीत लिहिलेल्या आणि त्यावर सरिता पदकी व ज्योती जोशी यांनी कष्ट घेऊन तयार  केलेल्या पुस्तकाच्या आधारे भाभी चक्क मराठी साहित्य संमेलनात पोहोचल्या. या पुस्तकातील त्यांचे अनुभव, मनोगत हे हमीदभाई व चळवळीचा इतिहास नोंदवण्याचाही एक महत्त्वाचा भाग होता, म्हणूनच ते पुस्तक महत्त्वाचे होय.

हमीदभाई गेल्याचे दु:ख भाभींना होते, पण नंतर मात्र त्यांच्याकडून मी चार-पाच वेळा ऐकले ते अंतर्मुख करणारे आहे. त्या म्हणायच्या, ‘‘हमीद गेल्यानंतर मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्यातल्या अनेक गुणांचा मला साक्षात्कार झाला.’’ हमीदभाई असेपर्यंत समर्थपणे गृहिणीपद सांभाळणाऱ्या मेहरुन्निसाभाभींनी चळवळी- मध्येही तितक्याच समर्थपणे नेतृत्व केले. अनेक माणसे जोडली. त्या लिहीत नव्हत्या; पण त्यांना जेवढी वैचारिक स्पष्टता आली होती, तेवढी त्यांच्या ध्येयनिष्ठ जगण्याला बळ देणारी होती. जिद्द, निष्ठा, लोकांशी प्रेमाने वागणे, लोकांना अडचणीच्यावेळी साथ देणे व मदत करणे या भांडवलावर त्यांनी केलेली वाटचाल थक्क करणारी आहे.

Tags: हमीद दलवाई अन्वर राजन मुस्लिम सत्यशोधक मंडळ मी भरून पावले आहे समान नागरी कायदा मेहरुन्निसा दलवाई Mi Bharun Pavale Aahe Secularism and Liberalism Anwar Rajan Nirbhay Samarth Mehrunnisa Dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अन्वर राजन

सामाजिक कार्यकर्ते 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके