डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाषेची स्थित्यंतरं शेकडो वर्षांपासून होत आलेली आहेत, पुढची शेकडो वर्षे होणार आहेत. आपल्याला उपलब्ध असलेली भाषा त्या भाषेचे केवळ एक प्रारूप (version) आहे. ज्या शुद्ध-अशुद्ध च्या संकल्पनांना कवटाळण्यात इतकी ऊर्जा खर्च होते आहे, ते संदर्भ काही काळाने अप्रस्तुत ठरणार आहेत. अर्थात पैसा, मालमत्ता, नावलौकिक या सगळ्यांप्रमाणे भाषाही एक सत्तेचं रूप आहे. त्यामुळे भाषेबद्दलची कितीही व्यापक समज अंगिकारली तरी हे सत्तासंघर्ष अटळ आहेत. विशेषत: कोणते तरी एक वंचितपण ज्यांच्या वाट्याला आले आहे, त्यांना या लढाईत भाग घेण्याशिवाय पर्याय नाही. आज स्त्रिया आणि पुरुष यांच्या भाषेच्या वापराचे, त्यातल्या सूक्ष्म फरकांचे अभ्यास करणाऱ्या पहिल्या पिढीतल्या स्त्री-अभ्यासकांचा प्रवास पाहिल्यावर हे लगेच लक्षात येते.
 

स्त्रियांची भाषा असं म्हणत असताना इतर जेन्डर आयडेन्टिटीचे प्रश्नही त्यात सामावलेले असतात. विविध प्रकारच्या वंचितपणाला सामोरं जावं लागणाऱ्या सगळ्यांच्या भाषेचे ते प्रश्न असतात, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. त्याचबरोबर, स्त्रियांचा म्हणवला जाणारा गटही एकसंघ नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

स्त्रिया आणि भाषा यांचे काही बाबतीत चक्रावून टाकणारे नाते आहे. बहुतेक स्त्रिया अशी भाषा वापरतात जी त्यांच्या समाजात, वर्तुळात ‘सभ्य’, ‘सन्माननीय’ समजली जाते. स्त्रीने ‘असभ्य’, ‘अश्लाघ्य’ भाषा वापरणे हे एक प्रकारचे चारित्र्यहनन समजले जाते. भाषेच्या बाबतीत बरोबर काय व चूक काय; याचे नियम जिथे ठरले आहेत, तिथे स्त्रिया बहुतेकदा ‘बरोबर’ पर्यायाची निवड करतात. त्यामुळे पठडीतली भाषा वापरण्याकडे स्त्रिया जास्त कल दाखवतात, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. मात्र ज्या गोष्टींसाठी भाषेचे नियम नाहीत, तिथे स्त्रिया जास्त सर्जनशीलपणे व चतुराईने भाषा वापरताना दिसतात. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण, आगळ्या-निराळ्या शब्दांची जास्तीत जास्त भर भाषेत स्त्रियांकडूनच घातली जाते, असंही दिसून येतं. ज्या स्त्रियांचा भाषेचा वापर मर्यादित आहे (सभ्य, नियमाला धरून) त्यांनीच भाषा सर्जनशील, प्रवाही ठेवावी (नवे शब्द, नवे नियम) याला Genderparadox in language म्हणून ओळखलं जातं. विल्यम लोबव या सामाजिक भाषातज्ज्ञाने मांडलेले हे सूत्र खूप गाजले आणि आजही ते महत्त्वाचे मानले जाते.

स्त्रियांच्या भाषेचा वापर त्यांच्या चारित्र्याशी, खाजगी आयुष्याशी जोडला जाणे हे toxic masculinity चाच एक आविष्कार आहे. मोकळं-ढाकळं बोलणारी, मोकळेपणानं आपलं मत मांडणारी स्त्री, संभाषणात ‘पुरुषी’ म्हणून ओळखली जाते. तर कधी त्यापुढे जाऊन बोलण्यातला स्पष्टपणा, मोकळेपणा याची स्वभावाशी गल्लत केली जाते. मोकळेपणाने बोलणारी म्हणजे अवेलेबल, चारित्र्यहीन इथपर्यंत समज करूनही घेतले जाते. आपल्या सगळ्यांना असे प्रसंग पहायला, अनुभवायला मिळत असतात.  अनेकदा, संभाषणात इतर सर्व पुरुष असतील तर अशी स्त्री अडचणीची वाटते. बायकांनी शिव्या देणे, शिवराळ बोलणे तर फारच चूक मानले जाते. असे बोलणे केवळ रागाचा स्फोट होत असेल तरच स्त्रिया वापरताना दिसतात. ज्याबद्दल नंतर अनेकदा त्यांना कमीपणा वाटतो, किंवा अपमानित वाटते, वा अनेकदा भाषेचा असा उग्र वापर केल्याने संभाषणातून सपशेल माघार घ्यावी लागते. अशा स्पष्ट बोलणाऱ्या स्त्रियांमुळे आपल्या बोलण्यावर, व्यक्त होण्यावर मर्यादा येतात, असंही वाटून घेणारे पुरुष आहेत. 

या सर्व गुंतागुंतीच्या सांस्कृतिक-सामाजिक परिस्थितीत स्त्रिया शब्दांची, वाक्यरचनेची निवड करताना अनेक दोर ताणून धरत असतात. एकीकडे तुम्हाला आत्मविश्वास असणारी व्यक्ती दिसायचे असते, तर दुसऱ्या बाजूला सतत आपल्या चारित्र्याची कळत-नकळत परीक्षा होऊ नये, अशीही मनापासून इच्छा असते. विशेषत: कामाचे ठिकाण पुरुषप्रधान असेल किंवा घरात पुरुषांचा वरचष्मा असेल तर आपण स्त्री ‘असूनही’ कमी नाही, हे सिद्ध करण्यातली अपरिहार्यता असते. हा ताण सगळ्या स्त्रियांसाठी सारखा नसतो. जर का स्त्री उच्चजातीय, उच्चवर्गीय असेल तर तिच्या बोलण्याला, शब्दनिवडीला होणारा विरोध, कुचेष्टा, अपमान तुलनेने कमी असतो. अर्थात, व्यावसायिक-वैयक्तिक अशा बदलत जाणाऱ्या संदर्भानुसारही मिळणारी वागणूक बदलत जाते. ज्या जाती/वर्गांमध्ये स्त्री ही संस्कृतीची रक्षणकर्ती मानली जाते, तिथे तिच्या भाषिक अभिव्यक्तीवर जास्त बंधन असते असे दिसते. यामध्ये कमी-जास्त प्रमाणात हिंदू धर्मातल्या सर्व जाती आपापल्या भूमिकांवर ठाम असताना दिसून येते. उच्चजातीय स्त्री म्हणजे सर्व स्वातंत्र्य बहाल केलेली, अशी भोळसट समजूत आहे. जाट, रजपूत, मराठा अशा अनेक जातीतल्या स्त्रियांच्या भाषिक अभिव्यक्तीवर अतिशय कडक बंधनं दिसून येतात. स्त्रीची अभिव्यक्ती, तिचा पेहराव, तिची भाषा यावर बंधन घातले की संस्कृतिरक्षण होते, या धारणेमागे काय विचार असतो? नुसतं ‘पुरुषप्रधानता’ असं ढोबळ उत्तर देऊन भागणार नाही.

मानवी आयुष्याच्या ठराविक आयामांमधून स्त्रीला वगळलं तर त्याचा परिणाम म्हणून तिचं दुय्यमत्व बळकट होत जातं. अनेक पिढ्यांतून झिरपत आलेल्या या दुय्यमत्वाचा सामना करताना स्त्रियांची जी दमछाक होते, कधी पिछेहाट होते, त्यातून ‘ठराविक गोष्टी नाहीच जमत बायकांना’ हा समज आणखी दृढ होत जातो. याचे भाषेसंबंधी उदाहरण पहायचे झाल्यास, आपल्याकडे व्यासपीठांवर होणाऱ्या कार्यक्रमांचे विश्लेषण करावे, लगेच मुद्दा लक्षात येईल. ‘महान वक्ते’ हे केवळ पुरुषच घडून गेले आहेत, अशा उदात्तीकरणामुळे पुरुष सहज व्यासपीठ व्यापून असतात. हे सूत्रसंचालकापासून ते प्रमुख वक्त्यांपर्यंत घडतं. कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी स्त्रिया (बहुतेकदा साडी नेसून, नटून) हार-तुऱ्यांची ताटं सांभाळताना दिसतात. कुणी म्हणेल, ‘छे, असतात की आजकाल स्त्रिया सगळीकडे. भाषणं देतात, सूत्रसंचालन करतात, माईकमधून बोलतात.’ असा विचार मनात आलेल्या सगळ्यांनी, असं घडण्याचं प्रमाण काय आहे, या प्रश्नाचंही प्रामाणिक उत्तर शोधावं. अशा कार्यक्रमाची आपल्याला आठवण आहे का, जिथे स्त्रियाच संयोजक आहेत, व्यासपीठावरच्या संभाषण-संवादाची सूत्रे स्त्रियांच्याच हाती आहेत, प्रमुख वक्तीही स्त्रीच आहे आणि प्रेक्षक मात्र बहुसंख्येने पुरुष आहेत? हा झाला मुद्दा स्त्रियांना सार्वजनिक संवादात पुरेशी संधी मिळण्याची. त्यापुढे जाऊन जिथे काही प्रमाणात स्त्रियांना संधी मिळते, तिथेही त्या स्त्रिया कोण असतात? तर ज्यांचं बोलणं प्रमाण मराठीच्या जवळ जाणारं असेल, किंवा ‘शुद्ध’ असेल आणि शक्यतो दिसण्यात उजवेपण अशाच स्त्रियांना प्रामुख्याने संधी मिळताना आपण पाहिलं आहे. 

भारताच्या संदर्भात तीन वेगवेगळ्या अक्षांवर स्त्रियांच्या भाषेचा प्रश्न तपासता येतो. जात, वर्ग आणि लिंगभाव यांच्या विविध मांडण्या होतात. भारताच्या संदर्भात दलित स्त्रीकडे triple disadvantage आहे, ही जी मांडणी आहे ती भाषेच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते. श्रीमंत-गरीब या फरकामुळे जे फरक भाषेत दिसतात, त्यातही जास्त कठोर समीक्षाही आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तीच्या वाट्याला येते. पश्चिमेकडे वर्गभेद जुन्या काळापासून चालत आलेला आहे. Pygmalion नाटकावर आधारित My fair lady या गाजलेल्या हॉलिवुड सिनेमाचे उदाहरण आठवून पाहा. गरीब, फुलं विकणाऱ्या मुलीची भाषाशुद्धी केली की, तिला राणीच्या दरबारीही मान मिळेल, असा दावा आणि मग प्रयोग करणाऱ्या भाषाशास्त्रज्ञाची ही गोष्ट आहे. Pygmalion या मूळ नाटकाचा पु.ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद- ‘ती फुलराणी’ हा नाट्यप्रयोग म्हणूनही तुफान गाजला. गरीब व्यक्तीने श्रीमंतांसारखे बोलणे शिकून आपली समाजातली पत सुधारावी हे गृहीतक आपल्याला अगदी साधे, सहज वाटते. यातच वर्गभेदातून आलेला भाषिक भेदभाव किती खोलवर रुजला आहे, हे लक्षात येते. विशेषत: भारताच्या संदर्भात, वर्गवास्तव हे जातवास्तवाशी जोडलेले आहे. वंचित जातीगटांतील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल असण्याची शक्यता खूपच जास्त आहे, हे आकडेवारीनं अनेकदा सिद्ध केलं आहे. त्यात जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांच्या तुलनेत येणारे दुय्यमत्वही तुम्हाला सहन करावे लागणारच आहे, आणि म्हणून उच्चजातीय, उच्चवर्गीय पुरुष जी प्रमाण भाषा वापरेल त्याच्या जवळ जाणारी भाषा आत्मसात करण्यात अनेक स्त्रियांना शक्ती खर्च करावी लागते. 

भाषेची स्थित्यंतरं शेकडो वर्षांपासून होत आलेली आहेत, पुढची शेकडो वर्षे होणार आहेत. आपल्याला उपलब्ध असलेली भाषा, त्या भाषेचे केवळ एक प्रारूप (version) आहे. ज्या शुद्ध-अशुद्धच्या संकल्पनांना कवटाळण्यात इतकी ऊर्जा खर्च होते आहे, ते संदर्भ काही काळाने अप्रस्तुत ठरणार आहेत. अर्थात पैसा, मालमत्ता, नावलौकिक या सगळ्यांप्रमाणे भाषाही एक सत्तेचं रूप आहे. त्यामुळे भाषेबद्दलची कितीही व्यापक समज अंगिकारली तरी हे सत्तासंघर्ष अटळ आहेत. विशेषत: कोणते तरी एक वंचितपण ज्यांच्या वाट्याला आले आहे, त्यांना या लढाईत भाग घेण्याशिवाय पर्याय नाही. आज स्त्रिया आणि पुरुष यांच्या भाषेच्या वापराचे, त्यातल्या सूक्ष्म फरकांचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या पिढीतल्या स्त्री-अभ्यासकांचा प्रवास पाहिल्यावर हे लगेच लक्षात येते. ऑस्ट्रियन भाषातज्ज्ञ डेल स्पेंडर यांनी ‘मॅन मेड लँग्वेज’ लिहिले तर ‘लँग्वेज अँड विमेन्स प्लेस’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अमेरिकी भाषातज्ज्ञ रॉबिन लेकॉफ या अभ्यासकांनी या  विषयाला खरी वाचा फोडली. डेल स्पेंडर त्यांनी स्वत:च्या पीएच.डी. प्रबंधासाठी हा विषय निवडला, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करायला कोणीही राजी होईना. कारण विद्यापीठांमध्ये भाषाशास्त्राचे विभाग आणि अभ्यास हे केवळ पुरुषांचे क्षेत्र होते. अशा परिस्थितीत हा कसा सिरियस अभ्यासाचा विषयच होऊ शकत नाही, इथंपासून हा सगळा स्त्रीवादी विचारांचा धूर्तपणा आहे इथपर्यंतच्या शेरेबाजीचा सामना त्यांना करावा लागला. विविध प्रकारच्या चेष्टा व अपमान या सगळ्यांतून मार्ग काढत त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला आणि पुस्तक नावारूपाला आणले. त्यानंतर अनेक जणींनी हा अभ्यास, निरीक्षणं नेटाने पुढे नेली. त्याचा परिणाम म्हणजे आपली भाषेबद्दलची समज आणि जाणीव प्रगल्भ होत जाते आहे. गेली 70-80 वर्षे जगभरात या विषयावर सखोल अभ्यास आणि मांडणी करणाऱ्या या सगळ्यांना सलाम! 

(मागील वर्षभर महिन्यातून एक लेख याप्रमाणे  प्रसिद्ध झालेली ही लेखमाला समाप्त झाली आहे. - संपादक)

Tags: भाषा : स्त्रियांची / स्त्रियांविषयीची weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके