डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

बहुतेक सर्व प्रमुख भाषांमध्ये पुरुषांसाठी एकच संबोधन असते; उदा. - श्री., Mr., Monsieur, तर स्त्रियांकरता किमान दोन तरी संबोधने असतातच. उदा.- कु./सौ Miss/Mrs.,Mademoiselle/ Madam. चरवरा. या दोन संबोधनांमधला भेद हा स्त्रीच्या वैवाहिक परिस्थितीचा आहे. स्त्रियांबद्दल यंत्रणेला अशी माहिती का माहीत करून घ्यायची असते? या प्रश्नाचे उत्तर वर म्हटल्याप्रमाणे स्त्रीच्या पुरुषावरील अवलंबित्वात तर आहेच, त्याचबरोबर स्त्रीच्या अस्तित्वाला कायम पुरुषांच्या संदर्भात तपासण्याच्या वृत्तीतही आहे. उदाहरणार्थ -लग्नाआधी Miss किंवा कु. असे संबोधन वापरणारी स्त्री लग्नानंतर Mrs. किंवा सौ. हे संबोधन वापरते. जर या स्त्रीचा घटस्फोट झाला तर तिने काय करावे? शिवाय तिची ओळख सतत तिच्या आयुष्यातल्या पुरुषांभोवती गुंतवण्याची उठाठेव कशाला? गेल्या दोन दशकांत या पद्धतीतल्या दोषांबद्दल आवाज उठवला जातो आहे. वेगवेगळ्या देशांतील स्त्रिया यासंबंधीचे कायदे आणि नियम बदलून घेत आहेत.

आजची चर्चा नावांबद्दल आहे, तर काही प्रसिद्ध स्त्री- पुरुषांची नावं आठवून बघू या, शेक्सपिअर, मेरी क्युरी, ब्रॅडमन, दुर्गा भागवत, डार्विन, तेंडुलकर, कल्पना चावला, ओबामा, अंगेला मर्केल, शीला दीक्षित, केजरीवाल, मोदी, सोनिया गांधी. या सगळ्यांत काही सूत्र आढळतंय का? पुरुष केवळ आडनावाने ओळखले जातायत, तर स्त्रियांचं पाहिलं नावं आणि आडनाव असं दोन्ही वापरलं जातंय. असं का बरं व्हावं? तर भाषेचे अभ्यासक असं दाखवून देतात की, केवळ आडनावातून ओळख प्रस्थापित होणे हे अतिशय प्रभाव टाकणारं, वर्चस्व सिद्ध करणारं असतं. आणि अशा प्रकारची ओळख सर्व क्षेत्रात पुरुषांना मिळते, तर स्त्रियांना या बाबतीत सहज डावललं जातं. पहिल्या नावाच्या उल्लेखातून निर्माण होणारी जवळिकीची भावना स्त्रियांसाठी ‘ठीक’ मानली जाते, तर प्रसिद्ध पुरुषांच्या नावासंबंधी घरगुती, जवळिकीचे वाटावे, असे उल्लेख कटाक्षाने टाळले जातात. जर संभाषणामधला संदर्भ माहीत असेल, तर बोलताना एखाद्या क्षेत्रातील पुरुषांचा उल्लेख केवळ आडनावाने करण्याचा व स्त्रियांचा उल्लेख दोन्ही- पहिले नावं आणि आडनावाने- करण्याचा संकेत आपल्या इथे ही दिसतो. उदाहरणार्थ- दिल्लीच्या राजकारणाची चर्चा चालू असेल, तर केजरीवाल म्हटलेलं पुरतं. मात्र केवळ दीक्षित असा उल्लेख शीला दीक्षितांच्याबद्दल केलेला आढळत नाही. अर्थात अनेकदा अरविंद केजरीवाल असं म्हटलं जात असेल, मात्र केवळ दीक्षित असं म्हटलं जात नाही.     

स्त्रियांना बऱ्याच अंशी पुरुषांवर अवलंबून राहायला भाग पाडणाऱ्या आपल्या समाजजीवनाचे पडसाद नावांच्या पद्धतीत दिसून येतात. हे अवलंबून राहणं वैयक्तिक स्वरूपाचं नाही तर व्यवस्थात्मक आहे. म्हणजे, अनेकदा विविध फॉर्ममध्ये जेव्हा नावानंतर, ‘तुमचे काळजीवाहू कुटुंबीय कोण?’ असा जो प्रश्न असतो त्यामध्ये केवळ father's name/Husband's name पराश असे दोनच पर्याय असतात. म्हणजे फॉर्म भरणारी व्यक्ती पुरुष असेल, तर त्याने वडलांचे नाव लिहावे आणि स्त्री असेल तर वडलांचे किंवा नवऱ्याचे. अशा वेळेस आईचे किंवा बायकोचे नाव का विचारले जात नाही? अनेक ठिकाणी जिथे आईचं किंवा बायकोचं नाव विचारणारा जो रकाना असतो, तो भरणं अनिवार्य नसतं. असं का? जे मूल एकल पालकत्वामध्ये केवळ आपल्या आईसोबत लहानाचे मोठे झाले असेल, त्या व्यक्तीसमोर तर यातून पेच निर्माण होतोच; शिवाय अशा सर्व स्त्रियांच्या अपरिमित कष्टांची साधी नोंदही घेतली जात नाही. अशीच अडचण वडलांच्या मृत्यूनंतरही येतच असणार. या सगळ्यातून व्यवस्थेच्या लेखी स्त्रीला फारशी किंमत नाही, हे तर स्पष्ट होतेच; त्याच्याच जोडीला आपल्या समाजात स्त्रियांच्या हातात अगदी बेताची निर्णयक्षमता आहे, हेही ठळकपणे दिसून येते, जर स्त्रियांच्या हाती खरी सत्ता असती, तर व्यवस्थेला त्याची नोंद घ्यावीच लागली असती.

नाव लिहण्याच्या विविध पद्धतींचा विचार केला असता, व्यक्तीच्या नावाचे संबोधन (श्री., सौ.), पहिलं नाव आणि आडनाव असे तीन किमान भाग असतात असं बहुतेक संस्कृतींमध्ये दिसून येतं. आधुनिक संदर्भातही अनेक सरकारी फॉर्म भरताना, बँकेचं खातं उघडण्यासाठी संबोधन, पहिलं नाव आणि आडनाव यांचा समावेश असतोच. नावाच्या या तिन्ही भागांसंबंधी समाजामध्ये कशाला मान्यता मिळते, कशाला आदर मिळतो हे सारं विलक्षण नेमकेपणा असणारं आहे. तसंच नावाच्या या तिन्ही भागांबद्दल स्त्रियांच्या संदर्भात कमालीची गुंतागुंत आहे. बहुतेक सर्व प्रमुख भाषांमध्ये पुरुषांसाठी एकच संबोधन असते; उदा. - श्री., Mr., Monsieur, तर स्त्रियांकरता किमान दोन तरी संबोधने असतातच. उदा.- कु./सौ., Miss/Mrs.,Mademoiselle/ Madam. या दोन संबोधनांमधला भेद हा स्त्रीच्या वैवाहिक परिस्थितीचा आहे. स्त्रियांबद्दल यंत्रणेला अशी माहिती का माहीत करून घ्यायची असते? या प्रश्नाचे उत्तर वर म्हटल्याप्रमाणे स्त्रीच्या पुरुषावरील अवलंबित्वात तर आहेच, त्याचबरोबर स्त्रीच्या अस्तित्वाला कायम पुरुषांच्या संदर्भात तपासण्याच्या वृत्तीतही आहे. उदाहरणार्थ -लग्नाआधी Miss किंवा कु. असे संबोधन वापरणारी स्त्री लग्नानंतर Mrs.. किंवा सौ. हे संबोधन वापरते. जर या स्त्रीचा घटस्फोट झाला तर तिने काय करावे? शिवाय तिची ओळख सतत तिच्या आयुष्यातल्या पुरुषांभोवती गुंतवण्याची उठाठेव कशाला? गेल्या दोन दशकांत या पद्धतीतल्या दोषांबद्दल आवाज उठवला जातो आहे. वेगवेगळ्या देशांतील स्त्रिया यासंबंधीचे कायदे आणि नियम बदलून घेत आहेत. जसं की- फ्रान्सने Mademoiselle हे अविवाहित स्त्रियांसाठी वापरले जाणारे संबोधन पूर्ण बाद केले, तर जर्मनीनेसुद्धा असेच बदल करून घेत Fraulein हे संबोधन गाळले. अविवाहित स्त्रियांना भेदभावाची वागणूक (discrimination) दिली जाण्याकरता अशी संबोधने वापरली जातात, या मुद्द्यांचा आग्रह धरत जर्मनीने Fraulein रद्द केलं आणि ज्या प्रकारे सर्व पुरुषांसाठी Herr हे संबोधन वापरले जाते, त्याचप्रमाणे आता सर्व स्त्रियांना एकच, Frau हे संबोधन वापरले जाते. 

या सगळ्यात अजून एक समान धागा आहे. Mademoiselle, Fraulein यासारख्या शब्दांमध्ये 'my little lady/little woman' अशी अर्थाची छटा आहे. त्याचबरोबर जो अर्थ कुमारी (कुंवारी, virgin) मध्ये अपेक्षित आहे- म्हणजे, जिचे कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध आले नाहीत अशी-असाही अर्थ या सगळ्या शब्दांना कुमारीप्रमाणेच जोडलेला आहे. स्वत:च्या खासगी, वैयक्तिक आयुष्यात यंत्रणा करत असलेला हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, हे स्त्रियांनी ठणकावून सांगितले आणि कायद्यात सुधारणा घडवून आणल्या. इंग्रजीने हा घोळ Ms या नव्या संबोधनाची भर घालून सोडवायचा प्रयत्न केला. Ms हे तटस्थ, नि:पक्षपाती संबोधन समजले जाते. त्याचा उच्चार शेवटाकडे ‘झ’सारखा केला जातो (Miz). आज भारतात आणि इतरत्र अनेक देशात हा पर्याय सरकारी फॉर्ममध्ये दिसतो. अर्थात अनेकांना तो Miss साठीचे संक्षिप्त रूप आहे असे वाटते, पण ते तसे नाही. अनेकदा Miss आणि Ms असे दोन्ही पर्यायही दिसतात, तेव्हा याचा उलगडा होतो. Ms ची भर घातल्याने प्रश्न पुरता सुटत नाही. जोवर Miss आणि Mrs पर्यायांचीही समाजाला आवश्यकता वाटते, तोवर काही स्त्रियांनी स्वत:चे संबोधन बदलणे ही केवळ सुरुवात आहे; संपूर्ण उपाय नाही, हे आपल्या लक्षात येते. भारतात आणि बाहेरही अविवाहित आणि विवाहित स्त्रिया Ms चा जाणीवपूर्वक वापर करताना दिसतात. भविष्यात केवळ Ms. आणि Mr. ही दोनच संबोधने उरायला हवीत. मराठीमध्ये श्रीमती हा तटस्थ शब्द कधीचा उपलब्ध आहे. मात्र त्याचा वापर अनेकदा विधवांसाठी केला जातो. स्त्रीच्या खासगी आयुष्याचे किती बारीक तपशील नोंदवून घेण्यात समाजाला रस असतो, हे यातून दिसते. क्वचित श्रीमती हे संबोधन तटस्थपणे वापरले जाताना दिसते; मात्र त्यामागे स्त्रीच्या व्यक्तित्वाचा, खसगी आयुष्याचा आदर करणे हा हेतू क्वचितच असतो. स्त्रीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने नाइलाजाने श्रीमतीचा वापर केलेला दिसून येतो. 
 
संबोधनांच्या या सगळ्या बारकाव्यांतून पुढे जात पहिल्या नावाचे काही विशेष दिसतात का, ते पाहूया. विक्रांती, विक्रमी, अमिताभी, अजयी, अभयी, अविनाशी, गौरवी अशी नावे मुलींना का दिली जात नाहीत? या सगळ्या शब्दांची पुल्लिंगी रूपं (विक्रांत, विक्रम, अमिताभ, अजय, अभय, अविनाश, गौरव) नावं मुलग्यांची म्हणून कायम पाहायला मिळतात. कोमल, स्निग्ध, ऋजु, ऐश्वर्य, वंदन, भक्त, स्नेह ही कायम दिसणारी मुलग्यांची नावं का नाहीत? पुन्हा एकदा या सगळ्या शब्दांची स्त्रीलिंगी रूपं मुलींची नावं (कोमल, स्निग्धा, ऐश्वर्या, वंदना, भक्ती, स्नेहा) असतातच की! अर्थात काही नावांची स्त्री-पुरुष दोघांसाठीची रूपं असतात, हेही खरं. जसं की, विनया- विनय, अमिता-अमित, स्मिता-स्मित, कल्याणी- कल्याण इत्यादी. आणि इतर काही वेळा क्रांती, मुक्ता, रुद्राणी अशी नावेही मुलींना दिली जातात. तरीही अशी नावे तुलनेने कमी दिसतात. हिंदू समाजात स्वभावगुणांचे वर्णन दर्शवणारी (आनंदी, उल्हास) नावं तर ठेवली जातातच. त्याव्यतिरिक्त अनेक नावं नक्षत्र (रोहिणी, चित्रा, अभिजित), फुले (जाई, जुई, गुलाब), राग (आसावरी, मल्हार, ललित) आणि खूप मोठ्या प्रमाणात देव-देवतांची नावे (विष्णू, श्रेया, उमा, हेरंब, ईशान) पसंतीने ठेवली जातात. असे संकेत जगातल्या बहुतेक सर्व धर्मांत दिसून येतात. मात्र, मुलग्यांच्या नावातून ठामपणा, धाडस, शौर्य दिसते; तर मुलींच्या नावातून कोमलता, प्रेमळपणा दिसून येतो. याबद्दलच्या पाश्चात्त्य देशांमध्ये झालेल्या संशोधनातून इतर काही निरीक्षणेही समोर आली आहेत. शर्ली, लेझ्ली, एव्हलिन, सिडनी, हिलरी, बेव्हर्ली ही नावं मुळात मुलग्यांची नावं आणि म्हणून अत्यंत सकारात्मक अर्थच्छटा असणारी होती. काही काळाने ही नावे मुलींसाठी वापरायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर त्यातले वेगळेपण, सकारात्मकता तर संपलीच; शिवाय त्यांच्याभोवती काहीसे नकारात्मक भाव तयार झाले. कालांतराने मुलग्यांसाठी ही नावे ठेवणे पूर्णपणे बंद झाले. हेही नोंदवले गेले की, हीच प्रक्रिया उलट घडताना दिसत नाही. आपल्याइथेही शीतल, किरण या नावांच्या बाबतीत असे घडले आहे का हे पाहणे रंजक ठरेल.
 
भारतात सर्व धर्मीय आडनावांमध्ये जातीची गुंतागुंत आहे. सध्या आपण ती बाजूला ठेवून केवळ त्यातून निर्माण होणारे लिंगभेदाचे प्रश्न पाहू या. दक्षिणेकडील काही राज्यं व त्यातील काही जाती, तसेच ईशान्येकडील राज्यांमधील काही अपवाद वगळता, बहुतेक सर्व धर्म-जतीतील स्त्रियांनी लग्नानंतर आडनाव बदलावे, असा प्रघात आहे. लग्नाआधी वडलांचे आणि नंतर नवऱ्याचे आडनाव लावावे, अशी पद्धत आहे, अशा प्रकारे आडनाव बदलणे कायद्याने बंधनकारक आहे असे अनेक स्त्री-पुरुषांनी गृहीत धरले आहे; मात्र तसे मुळीच नाही. दोन स्वतंत्र आडनावं असणाऱ्या व्यक्तींचे लग्न झालेले असू शकते, ते जोडीदार असू शकतात, हे लक्षात घेणे इतके कठीण का आहे? त्यामागे बऱ्याचदा नवऱ्याच्या कुटुंबाचा भाग असणे, नवरा- बायकोच्या नावात सारखेपण असणे, प्रेमापोटी आडनाव बदलणे अशी कारणे पुढे केली जातात. दुसऱ्याच्या कुटुंबाचा भाग व्हावं लागण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लावणारं आणि त्यासाठी स्वत:च्या अस्तित्वाचा, ओळखीचा भागच बदलायला लावणारं हे कसलं प्रेम? ज्या नावानं आपण जन्मापासून ओळखले गेलो, शिक्षण घेतलं (संधी मिळाली असेल तर), नोकरी मिळवली (संधी, पाठिंबा असेल तर); ते सर्व लग्नाच्या निमित्ताने इतक्या सहज का सोडून द्यावं? लग्न हा स्त्रीसाठी जितका महत्त्वाचा टप्पा आहे तितका पुरुषासाठी का नाही? मुली चि. सौ.कां.- चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी-सौभाग्याची आकांक्षा करणाऱ्या असतात. त्याप्रमाणे मुलाच्या नावामागे ‘सुभाग्यकांक्षी’ असं का लिहिलं जात नाही? कारण मुलाचे सुभाग्य बायकोच्या हुशार, संपन्न असण्यावर अवलंबून नाही, तर स्वत:च्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. याउलट, नवरा कसा मिळतो यावर स्त्रीचं भाग्य अवलंबून आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतला हा फरक या आपल्या सामाजिक स्थितीचे सूचक आहे. आणि म्हणून बहुतेक स्त्रियांसाठी लग्नानंतर आडनाव बदलणे हा मुळातूनच स्वत:चा, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नसतो. काही स्त्रिया याबद्दल जागरूकतेने निर्णय घेतात. त्यातल्या काही स्त्रिया लग्नानंतर केवळ नवऱ्याचे नाव आडनाव म्हणून लावतात. उदाहरणार्थ- ज्योती सुभाष. यामध्ये तुम्ही आधी एका पुरुषाच्या संदर्भात (वडील) ओळखले जात होतात ते आता दुसऱ्या पुरुषाच्या संदर्भात (नवरा) हे सूचित होते. काही जणी अनेकदा दोन आडनावं लावतात. 
उदाहरणार्थ- सोनम कपूर-आहुजा. सोनमने तर एका मुलाखतीत असंही म्हटलंय की- माझं आणि माझ्या भविष्यातल्या मुलांचं आडनाव एकच असावं, अशी माझी इच्छा आहे. मला व्यक्तिश: असं वाटतं की, या धर्तीचा विचार अनेक स्त्रिया करतात. शेवटी मुलं वडलांचं आडनाव लावणार, मग आपण वेगळे-एकटे पडू, ही भीतीही त्यात दडलेली असते. 

सोनम कपूर स्वत: त्या वक्तव्यात असंही म्हणते की- माझ्या मुलांना माझं (कपूर) आडनाव असावं, अशी माझी इच्छा आहे, मात्र पुरुषप्रधानतेशी या पातळीवर झगडणे मला अवघड वाटतं. आता सोनम कपूरला हा झगडा मोठा वाटत असेल, तर सामान्य स्त्रीनं कुठून बळ मिळवावं? शिवाय या लग्नातला स्त्रीवाद ठळक करण्यासाठी सोनमचा नवरा आनंद आहुजा यांनी इन्स्टाग्रामवर सोनमचे नाव आपले मधले नाव म्हणून बदलून लिहिले आहे. अर्थात आनंदने स्वत:च्या नावातून स्वत:च्या वडलांचे नाव कायदेशीररीत्या बदलले की काय, हे समजायला वाव नाही. मात्र तसे झाले नसण्याची शक्यता वाटते. कारण सरतेशेवटी नाव बदलण्याचा हा सगळा अट्टहास जितका समाजमानसात रुजला आहे, त्यापेक्षा किती तरी जास्त व्यक्तीकडे (स्त्री-पुरुष दोघांच्या) कायदा कोणत्या नजरेतून पाहतो यात रुजलेला आहे. मध्ययुगापासून ते पार एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत ब्रिटिशांच्या कायदे-व्यवस्थेत Coverture Laws म्हणून गाजलेले कायदेतत्त्व लग्न झालेल्या स्त्रीसाठी पुढील चौकट आखून देतं- This rule (coverture) has worked out in reality to mean that though the husband and wife are one, the one is the husband. A married woman could not own property, sign legal documents or enter into a contract, obtain an education against her husband's wishes, or keep a salary for herself. If a wife was permitted to work, under the laws of coverture, she was required to relinquish her wages to her husband. कालांतराने स्त्रिया संघटित होऊन आवाज उठवू लागल्यावर हे कायदे आधी कमकुवत आणि नंतर रद्द झाले. सोळाव्या-सतराव्या शतकात जन्मलेला शेक्सपिअर जर स्त्री म्हणून जन्माला आला असता, तर ‘नावात काय आहे?’ असं काव्यरूपातही म्हणायला धजला नसता. बाकी शेक्सपिअरची प्रतिभा स्त्रीच्या ठिकाणी असती, तर तिला प्रकाशनाचे हक्क मिळते का, हा आणखी एक भाग. अशा किती स्त्रिया कुणालाही माहिती न होता काळाच्या पडद्यामागे विरल्या असणार.

आपल्याइथेदेखील कायद्याचा असा विळखा आता स्त्रियांभोवती नाही; मात्र अनेक स्त्रिया वरच्या कायद्यात वर्णन केलेलं आयुष्य अनेक ठिकाणी जगताना दिसतातच. अशा कायद्यांचं आणि त्यामागच्या पुरुषप्रधान व्यवस्थेचं बाह्यरूप म्हणजे आडनाव बदलण्यासारख्या गोष्टींचा आग्रह धरला जाणे. ते केवळ प्रेमापोटी, नव्या कुटुंबात स्वागत म्हणून केलं जातं अशी समजूत करून घेणं, हे भाबडेपणाचं आहे. शिवाय आडनाव बदलून घेण्यासाठी करावे लागणारे कायदेशीर आणि लाल फितीत अडकलेले दिव्य आपल्यातल्या अनेकांनी जवळून पाहिले-अनुभवले असेल. जगभरात अनेक ठिकाणी स्त्रिया मुलांना आपले स्वत:चे आडनाव लावता यावे म्हणून आता झगडताहेत. वडलांऐवजी आईचे आडनाव लावण्यासाठी स्वत: झटताहेत. विकसित देशांतही पुरुषप्रधान व्यवस्था आपली पाळेमुळे घट्ट रोवून आहे. अर्थात दोघांपैकी एकाचे आडनाव स्वत:साठी किंवा स्वत:च्या मुलांसाठी निवडण्यात एक आडनाव गाळले जाण्याची अपरिहार्यता आहे. ती टाळण्यासाठी अनेक ठिकाणी त्रिनाम पद्धतीचा स्वीकार अत्यंत हळूपणे का होईना, दिसतो आहे. त्रिनाम पद्धत म्हणजे स्वत:च्या पहिल्या नावानंतर वडलांचे आणि आईचे फक्त पहिले नाव लावणे. उदाहरणार्थ- अर्चना सीमा राजेश किंवा रोहन संदीप पूजा. अनेक पिढ्यांमध्ये ही पद्धत रुजली, तर भारतातली आडनाव आणि जात यांची गुंतागुंतही या पद्धतीतून कमी होईल, असा सामाजिक भाषाशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. अनेकदा आईच्या सन्मानार्थ प्रसिद्ध व्यक्तींनी आईच्या नावाचा/आडनावाचा स्वत:च्या नावात समावेश केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ- संजय लीला भन्साळी, पाब्लो पिकासो, मर्लिन मन्रो. मात्र सर्वसामान्यांच्या नावांमध्ये असे बदल मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. आजकाल फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर अनेक स्त्री-पुरुष स्वत:चे नाव त्रिनाम पद्धतीत लिहताना दिसतात. हे बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत. असे बदल कागदोपत्री, कायदेशीर पातळीवरही सहज स्वीकारले जायला हवेत. हे सर्व घडत असताना केवळ आडनावच नाही, तर पहिलं नाव बदलाव्या लागणाऱ्या/बदलणाऱ्याही स्त्रिया आहेत. नावाच्या अशा बदलात आपल्याला कोणतीही आक्रमकता किंवा हिंसा दिसत नाही, हे आपले दुर्भाग्य म्हणायला हवे. यातील अनेक सकारात्मक बदलांचे वारे शहरी भागात जास्त वेगाने पसरताना जाणवतात. हे बदल आणि त्यामागच्या धारणा सर्वदूर पोहोचायला हव्यात. स्त्रियांच्या नावाने वंशसातत्य पुढे न नेणे, स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या संदर्भात किंवा पूर्ण स्वतंत्र असं अस्तित्वच नसणे- या सगळ्यामुळे स्त्रिया जणू अदृश्य, दिसेनाशा (invisible) होतात. त्यांना तसं दिसेनासं ठेवण्यात पुरुषप्रधानतेला मोठं यश आलं आहे आणि आपल्या समाजातील स्त्रियांच्या नाव-आडनावातले पुरुष- सातत्य त्या विजयाचं सूचक आहे. 

ही सगळी चर्चा व्यक्तींच्या नावाबद्दल आहे. आपणहून जी नावं निर्जीव वस्तू-संकल्पनांना दिली जातात, त्यातही मुळापासून लिंगभेद दिसून येतो. गाड्या (Apache, Scooty), सौंदर्यप्रसाधने (FairLovely / Handsome Axe/ Elle18,) अशा अनेक नावांमध्ये हा भेद कळत- नकळत केला जातो. अनेक प्रतिष्ठेच्या पदांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना केवळ पुल्लिंगी रूपे आहेत, स्त्रीलिंगी रूपेच नाहीत. उदाहरणार्थ - राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्री. तर जिथे ती रूपे आहेत, तिथे स्त्रीलिंगी शब्दांना अनेकदा नकारात्मक भाव जोडलेला असतो. उदाहरणार्थ- Governer म्हणजे राज्यपाल हे मानाचे पद आहे. राज्यपाल या पुल्लिंगी शब्दाला स्त्रीलिंगी पर्याय मराठीत नाही. शिवाय Governess हा इंग्रजी स्त्रीलिंगी शब्द समान अर्थाचा नाही. Governess म्हणजे मुलांचा सांभाळ करणारी आया. बारकाईने पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रातली अशी किती तरी उदाहरणे दिसून येतात. 

या सगळ्यातून पुन्हा पुन्हा हे ठळकपणे समोर येते की, पुरुषांशी संबंधित भाषा जास्त ठाम आणि सकारात्मक रचना व भाव दर्शवणारी असते. स्त्रियांचे भाषिक अस्तित्वही त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वाप्रमाणे दुय्यमत्व असणारे आहे. अनेक भाषांत-विशेषत: इंग्रजीत स्त्री-सूचक शब्दही पुल्लिंगी शब्दात फेरफार करूनच (man - wo'man', malefe'male') बनले आहेत. पुरुषाच्या विरुद्ध स्त्री हा समज आपल्या नसानसात भिनला आहे. शूर-भित्री, राकट- कोमल, रागीट- शांत, कणखर-दुबळी ही वर्णनं खरी नाहीत, हे अनेक प्रकारे दाखवून दिलं गेलं आहे. स्त्रिया कणखर, शूर नसतात काय? या प्रतीकांचा डोलारा तोलून धरणारी एक व्यवस्था म्हणजे नावांच्या पद्धती. कुणी म्हणेल, हा काय अट्टहास? स्त्री आणि पुरुष काही बाबतींत निश्चित वेगळे असतात आणि तसे फरक राहिले काही पद्धतींत-प्रथांमध्ये तर बिघडलं कुठं? तर आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, भेद करणं ही भेदभाव करण्याची पहिली पायरी आहे. (Difference is only one step away from discrimination.)अशा सगळ्या फरकांबद्दल जागरूक असण्यात नक्कीच काही गैर नाही. बदलांसाठी उत्सुक असण्यात, त्यासाठी प्रवाही कष्ट घेण्यात तर मुळीच काही गैर नाही. मूळच्या विषम आणि आपली मुळे घट्ट रोवलेल्या या पुरुषप्रधान व्यवस्थेला धडका मारत राहणे, हे गरजेचे आणि यथार्थ आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या अस्तित्वाची नव्याने आणि जास्त सहिष्णू मांडणी करण्यासाठी तसेच दोघांच्या सर्वंकष वाढीसाठी हे आवश्यक आहे. 
 

Tags: भाषा : स्त्रियांची / स्त्रियांविषयीची नामसामर्थ्य अपर्णा दीक्षित aprna dixit dixit aprana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात