Diwali_4 बाईमाणूस
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

पुरुषांसाठी वापरले जाणारे शब्द हे स्त्री आणि पुरुष या सगळ्यांसाठी वापरण्याचा संकेत असण्याचे एक स्पष्टीकरण सामाजिक भाषाशास्त्राने वारंवार दाखवून दिलं आहे की- जेव्हा असे शब्द निवडले जातात, तेव्हा समाजातल्या प्रबळ गटासाठी संबोधला जाणारा शब्दच सर्वसाधारण शब्द म्हणून मान्य होतो. प्रबळ गटाचे प्राबल्यही या निवडीतून टिकून राहते. मराठीच्या इतर रूपात किंवा ग्रामीण बोलीत माणूस हा पुरुष असतो, तर इतर बाईमाणसं असतातच की. (तिथं जायला तर माणसं पण घाबरतात, बाईमाणसानी तर जावंच नये.) अर्थात पुरुषांकरता वापरला जाणारा शब्द स्त्री-पुरुष दोघांसाठी निवडण्याची गुंतागुंत ठरावीकच भाषांमध्ये होते. माणसातला नर आणि मादी यामधला भेद बहुतेक सर्व भाषा करतात. मात्र माणूस सोडून इतर प्राणी, निर्जीव वस्तू, भावना, संकल्पना या सगळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि कधी कधी नपुसकलिंगी अशी वर्गवारी सगळ्या भाषा करत नाहीत.

वर्तमानपत्रात आलेल्या काही बातम्यांचे मथळे इथे दिले आहेत-

- पाणी न दिल्याच्या रागातून रेल्वे कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

- धक्कादायक! येरवडा जेलमधून सुटलेल्या कैद्याच्या स्वागताला गर्दी

- येरवडा जेलमधून जामिनावर सुटलेल्या आरोपीची हत्या

- पोलीस चकमकीत एक अतिरेकी ठार

ही वाक्ये वाचल्यावर रेल्वे कर्मचारी, कैदी, आरोपी, अतिरेकी या सगळ्या व्यक्ती पुरुष आहेत, असं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं का? मराठी भाषा जर तुमची प्रथम भाषा (मातृभाषा) आणि परिसराची भाषा असेल, तर तसं झालं असण्याची शक्यता खूप जास्त आहे. रेल्वे कर्मचारी, कैदी, आरोपी, अतिरेकी स्त्रिया नसतात का? तर, निश्चित असतात. तसं असेल तर आपण महिला कर्मचारी, महिला कैदी, स्त्री/महिला अतिरेकी असा आवर्जून उल्लेख करतो. याला एक कारण म्हणजे, या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे भाषेत उपलब्धच नाहीत. मात्र भाषेने आपली काही ठरावीक जडण-घडण झालेली असते, त्यातून ठरावीकच चित्रं ती भाषा बोलणाऱ्यांच्या मनात तयार होत असतात. आता वर्तमानपत्रातच आलेले मात्र जास्त सविस्तर वृत्तांत पाहू.

- शिक्षण खात्याने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना प्रत्येक परीक्षा केंद्रावर सामाजिक अंतर राखणे सक्तीचे असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार तालुकानिहाय विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ज्या परीक्षा केंद्रावर खोल्यांची संख्या कमी आहे, त्या केंद्रापासून जवळ असलेल्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... 20 उपकेंद्रांची भर पडल्याने पर्यवेक्षकांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

या उदाहरणात विद्यार्थी हा शब्द विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोघांना संबोधून आहे, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक हा शब्द पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षिका या दोघांना संबोधणारा आहे.

- लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1000 रुपयांच्या अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र घेण्याची सक्ती करू नये. तसेच कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

या लिखाणात शेतकरी हा शब्द वापरताना पुरुष शेतकऱ्यासाठी योग्य असे व्याकरण निवडले आहे. ते ‘कोणताही शेतकरी’ या शब्दांमधून दिसते. किंबहुना, जमिनीतून पिकाचा दाणा उभा करण्यासाठी राबणाऱ्या स्त्रियांसाठी मराठीत शेतकरीला समांतर शब्दच नाही. शेतकरीण या कधी-मधी वापरला जाणाऱ्या शब्दाचा उल्लेख कोणत्याही शब्दकोशात नाही. आधीच्या उदाहरणांप्रमाणे जिल्हाधिकारी व्यक्ती पुरुष असेल, असं चित्र पुन्हा डोळ्यांसमोर आलं का?

लिखाणाचा अजून एक शेवटचा नमुना पाहू.          

- कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्रमानव आपला सहकारी, सेवक, मित्र म्हणून प्रस्थापित होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर टेक्नॉलॉजीच्या संयोगातून धोकादायक कामे करून घेता येतील. उदाहरणार्थ- बॉम्ब निकामी करणं... विषारी पदार्थ हाताळणं... माणसाची अशा धोकादायक स्थितीतून कायमची सुटका होईल.

घरगुती यंत्रमानव वृद्धांना लागणाऱ्या लागणाऱ्या रोजच्या गोष्टी- वेळच्या वेळी औषध देण्यापासून त्यांनी विसरलेला चष्मा शोधण्यापर्यंत- सगळी कामं नित्यनेमाने व्यवस्थितपणे करतील.

पहिल्या वाक्यातला यंत्रमानव पुरुषार्थी आहे, कारण मुळात एकवचनी मानव हाच पुरुषार्थी आहे. तो सहकारी, सेवक, मित्र बनू शकतो आणि धाडसी कामं करू शकतो. मात्र जेव्हा हा पुरुषार्थी मानव सेवा करू पाहतो आहे तेव्हा मानवचे अनेकवचन वापरून, ‘ते’ या सर्वनामाच्या मदतीने उरलेले लिखाण केले गेले आहे. आता हे फार ठरवून लिहिले जाते असे नाही. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे आपली भाषा आपली विचारप्रक्रिया घडवण्यात मोलाचा वाटा उचलत असते.

अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुष या सगळ्यांसाठी पुरुषांसाठी वापरले जाणारे शब्द वापरण्याचा संकेत जगातल्या अनेक भाषांत दिसतो. आता कुणी म्हणेल, इतकं काय त्यात? सारखं विद्यार्थी-विद्यार्थीनी, मुलं-मुली असं कशाला म्हणायची उठाठेव? ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला कळलं म्हणजे झालं. असं असेल तर सर्वांसाठीचा एक शब्द म्हणून स्त्रीलिंगी शब्द का निवडले जात नाहीत? का हा दुर्दैवी योगायोग समजायचा? हा असाच शेकडो वर्षे चालत आलेला संकेत आहे की, निव्वळ योगायोग आहे, की आपल्या समाजातल्या खोलवर रुजलेल्या धारणांचे प्रतिबिंब आहे, हे समजून घ्यायला हवं. संस्कृतीचे प्रतिबिंब भाषेत दिसते, हे समजून घेणे सोपे आहे. मात्र अनेक अभ्यासकांचा असा दावा आहे की, आपली भाषा आपल्या भोवतालचं जग घडवत असते. (Language determines the worldview of the person.) हा दावा खूप मोठा आहे. किंबहुना, आणखी नवे प्रश्न जन्माला घालणारा आहे. मी वेगळी भाषा घेऊन जन्मले असते, तर माझी विचारप्रक्रिया पूर्ण वेगळी असती का? मला जग वेगळं भासलं असतं का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी भाषांमधले काही मूलभूत फरक समजून घेतले पाहिजेत. त्यात दडलेला विचित्रपणा, चमत्कारिकपणा उलगडून पाहायला हवा.      

पुरुषांसाठी वापरले जाणारे शब्द हे स्त्री आणि पुरुष या सगळ्यांसाठी वापरण्याचा संकेत असण्याचे एक स्पष्टीकरण सामाजिक भाषाशास्त्राने वारंवार दाखवून दिलं आहे की- जेव्हा असे शब्द निवडले जातात, तेव्हा समाजातल्या प्रबळ गटासाठी संबोधला जाणारा शब्दच सर्वसाधारण शब्द म्हणून मान्य होतो. प्रबळ गटाचे प्राबल्यही या निवडीतून टिकून राहते. मराठीच्या इतर रूपात किंवा ग्रामीण बोलीत माणूस हा पुरुष असतो, तर इतर बाईमाणसं असतातच की. (तिथं जायला तर माणसं पण घाबरतात, बाईमाणसानी तर जावंच नये.) अर्थात पुरुषांकरता वापरला जाणारा शब्द स्त्री-पुरुष दोघांसाठी निवडण्याची गुंतागुंत ठरावीकच भाषांमध्ये होते. माणसातला नर आणि मादी यामधला भेद बहुतेक सर्व भाषा करतात. मात्र माणूस सोडून इतर प्राणी, निर्जीव वस्तू, भावना, संकल्पना या सगळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि कधी कधी नपुसकलिंगी अशी वर्गवारी सगळ्या भाषा करत नाहीत. ज्या भाषा हा भेद करतात, त्या भाषा म्हणजे भाषांमध्ये व्याकरणिक लिंग (Grammatical Gender) असणाऱ्या भाषा.  

मराठीत अर्थातच  स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी या तिन्हींचा वापर होतो आणि त्याप्रमाणे सर्वनामे व क्रियापदे आपली रूपे बदलतात. जसे की- शाम आला, रजनी आली. हा झाला व्यक्तींमधला भेद. शिवाय हत्ती आला, चिमणी आली, जनावर आलं. आणि झोप आली, आळस आला, स्फुरण आलं. इंडो-युरोपीय गटातून आलेल्या बऱ्याच भाषा मराठीसारख्या आहेत. उदा- गुजराती, संस्कृत. मात्र सर्व भारतीय भाषा मराठीसारख्या नाहीत. उदा. हिंदीत माणूस आणि प्राण्यांबरोबर निर्जीव वस्तूंची स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशी वर्गवारी आहे, मात्र हिंदीत तशी नपुसकलिंगी वर्गवारी नाही. तर, दक्षिणेकडच्या म्हणजे द्रविडी भाषांमध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशी वर्गवारी फक्त माणसाकरता व देवतांकरता आहे. प्राणी आणि निर्जीव वस्तू सर्व नपुसकलिंगी आहेत. यातही थोडी मजा आहे. आकाशात तळपणारा सूर्य इतर कुठल्याही निर्जीव वस्तूप्रमाणे आहे, मात्र सूर्यदेव पुल्लिंगी आहे; गंगेचा उल्लेख नदी म्हणून आला तर ती निर्जीव आहे, देवी म्हणून आला तर स्त्रीलिंगी आहे. 

जगभरातल्या भाषांमध्येही हा फरक दिसून येतो. इंग्रजी या बाबतीत द्रविडी भाषांशी साध्यर्म दाखवणारी आहे. इथे केवळ माणसांची वर्गवारी स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आहे. तर स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, लॅटिन, ग्रीक या सगळ्या व्याकरणिक लिंग असलेल्या भाषा आहेत. या सगळ्या भाषांमध्ये निर्जीव वस्तूंनाही मराठीप्रमाणे लिंगभाव नेमून दिला आहे. फ्रेंचमध्ये तर प्रत्येक देशाच्या नावाला स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा लिंगभेद नेमून दिला आहे. अशा प्रकारे भेदभाव केल्याने आपल्या विचारात, जगाच्या जडण-घडणीबद्दलच्या समजुतीत वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडतो, असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. अशाच एका प्रयोगात 12 व्या शतकापासून आतापर्यंतच्या चित्रकारांचा अभ्यास केला गेला.  स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषिक कलाकारांची चित्रं यात अभ्यासली गेली. यात अशा चित्रांचा समावेश होता, ज्यात- न्याय, सत्य, काळ, शांतता अशा अमूर्त संकल्पना चित्ररूपात मांडल्या आहेत. अशा जवळपास 800 चित्रांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की, 80 टक्के वेळा चित्रकाराच्या भाषेत जो लिंगभाव या अमूर्त संकल्पनांशी जोडला आहे तशाच प्रकारे तो चित्रात मांडला गेला आहे. म्हणजे, जर मृत्यू हा एखाद्या भाषेत स्त्रीलिंगी शब्द असेल, तर चित्रात मृत्यू दर्शवण्यासाठी स्त्रीप्रतिमेचा वापर केला आहे.  याच अभ्यासकांच्या गटाने आणखी एक मजेशीर प्रयोग करून पाहिला. त्यांनी रोजच्या वापरातल्या 24 निर्जीव वस्तूंची यादी तयार केली. या 24 वस्तूंसाठी जर्मन आणि स्पॅनिशमध्ये विरुद्ध लिंगभाव आहे. जर्मनमध्ये 12 वस्तू पुल्लिंगी आहेत, तर स्पॅनिशमध्ये स्त्रीलिंगी आणि उरलेल्या 12 याच्या उलट. मग या प्रयोगात सहभागी होण्यासाठी उत्तम इंग्रजी अवगत असणाऱ्या आणि जर्मन/स्पॅनिश मातृभाषा असणाऱ्या व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले. यातल्या प्रत्येक वस्तूसाठी त्यांना तीन विशेषणे इंग्रजीत लिहायला सांगितली गेली. यातून काय निष्पन्न झालं याचा आपण सगळे लगेच अंदाज बांधू शकतो. जर्मनमध्ये किल्ली पुल्लिंगी आहे- तर मूळच्या जर्मन भाषकांनी किल्लीसाठी  hard, heavy, metal, serrated, Useful अशी विशेषणे लिहिली. तर स्पॅनिश भाषकांनी golden, intricate, little, shiny, tiny अशी विशेषणे लिहली. तसंच, bridge (पूल) हा शब्द जर्मनमध्ये स्त्रीलिंगी आहे आणि स्पॅनिशमध्ये पुल्लिंगी. जर्मन भाषकांनी elegant, beautiful, fragile, peaceful, slender, pretty ही विशेषणं वापरली तर स्पॅनिश भाषकांनी long, big, strong, Dangerous ही विशेषणं वापरली. आता या सगळ्यांतून भाषेतल्या लिंगभेदाचा आपल्या विचार-प्रक्रियेवर परिणाम होतो, हे दिसून येतं. मात्र असंही म्हटलं जाऊ शकतं की, इतर सांस्कृतिक घटकही याला कारणीभूत असू शकतात. हा केवळ परस्परसंबंध (correlation) आहे, कार्यकारणसंबंध (causation) नाही.  मात्र यावरही खूप काम झाले आहे आणि त्यातून असे निष्कर्ष काढले जाऊ शकतात की- सांस्कृतिक घटक जरी पूर्ण बाजूला सारले तरी भाषेतला, मुख्यत्वे व्याकरणातला लिंगभाव विचारप्रक्रियेवर, ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतोच. हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवे की, जर असे व्याकरणिक लिंगभाव असणारी भाषा शिकायची असेल तर त्या-त्या भाषकांकडून कोणत्या निर्जीव वस्तूंसाठी कोणते लिंग उपयोजले आहे, हे माहीत करून घेण्याशिवाय पर्याय नाही. मराठीत झाड नपुसकलिंगी आहे, तर वृक्ष पुल्लिंगी. रग पुल्लिंगी, चादर स्त्रीलिंगी, तर पांघरूण नपुसकलिंगी आहे. यात कोणताही नियम दिसत नाही. अ-आ, इ-ई, उ-ऊ हे फरक ऱ्हस्व-दीर्घ असे मानले तर संस्कृतमध्ये यातले दीर्घ स्वर फक्त स्त्रीलिंगी नामात असतात. मराठीत तेही नाही. शाळा स्त्रीलिंगी तर घोडा पुल्लिंगी, धोबी पुल्लिंगी तर दरी स्त्रीलिंगी. म्हणजे अर्थ, रूप यावरून मराठीत शब्दाचे व्याकरणिक लिंग निश्चितपणे सांगता येत नाही. व्याकरणिक लिंग व स्त्री-पुरुष भेद यांचे मराठीतले नाते तर्कावर आधारित नाही. वस्तू बघितल्यावर आपोआपच त्याचं लिंग काय ठरवलं असेल, हे कुणालाही हमखास ओळखता येत नाही. स्वत:च्या भाषेत असे व्याकरणिक लिंग नसणाऱ्या भाषिकांना निर्जीव वस्तूंना लिंगभाव ठरवणं ही नसती उठाठेव वाटते आणि अनेकदा सगळा प्रकार उगीचच क्लिष्ट केला आहे, असंही वाटत राहतं. भाषा शिकणाऱ्याची भाषासुद्धा व्याकरणिक लिंग असणारी असेल तर असं शिकणं थोडं सोपं होतं, मात्र तसं नसेल तर मोठीच पंचाईत होते. म्हणूनच असं व्याकरणिक लिंग नसणाऱ्या दक्षिणेकडच्या अनेक लोकांचा हिंदी बोलताना गोंधळ होतो. ते इंग्रजी मात्र लवकर आत्मसात करू शकतात.   

भाषांमध्ये पुरुष चांगला, ताकदवान, सत्ताधारी, कर्तृत्ववान असाच दिसतो. स्त्री मात्र दुबळी, अबला, वेलीसारखी परावलंबी, सुंदर म्हणून उपभोग्य वस्तू, पायाची दासी, पतिव्रता असते. ‘पत्नीव्रत’ पुरुष असा वापर अजिबात दिसत नाही. स्त्री-पुरुष भेद हे भाषेमुळे प्रामुख्याने मनात रुजतात. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर- पाटा हा मोठा असतो, तर पाटी लहान असते. हाच भेद गोटा-गोटी, लोटा-लोटी, वडा-वडी, बुधला-बुधली या पुल्लिंगी-स्त्रीलिंगी जोड्यांत दिसतो. भाषेच्या या घडणीचा परिणाम भाषकाच्या दृष्टिकोनावर होतो. एखाद्या मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला मोठी बाटली/वाटी/बशी/पाटली इत्यादी वस्तूंना काय म्हणशील असे विचारले तर- बाटला/वाटा/बशा/पाटला याप्रमाणे करण्याची शक्यता अधिक आहे. मुलगी ही मुलापेक्षा कनिष्ठ, नाजूक, रूपवान असते हे सांस्कृतिक समज भाषेतूनही येतात आणि टिकून राहतात. भाषा हा संस्कृतीचा भाग असतो तो असा. भाषेमुळे कदाचित स्त्री-पुरुषातील अबला-शक्तिमान हा फरक सहज पटणारा, सार्वत्रिक, नैसर्गिक असा वाटतो. मात्र जनुकांच्या आणि एकंदरीतच जीवशास्त्राच्या अभ्यासाने नराचे प्रधान असणे आणि मादीचे गौण असणे निसर्गदत्त नाही, हे अनेकदा दाखवून दिले आहे.

पुरुषप्रधानतेतून येणारे हे प्रभाव कधी फारसे महत्त्वाचे नसले तरी अनेकदा व्यक्तीची निर्णयप्रक्रिया ठरवणारे असतात. याची दखल घेत अनेक देशांनी, प्रशासनांनी लिंगभावांच्या दृष्टीने तटस्थ अशा शब्दांचा आपल्या कामकाजात समावेश करून घेतला आहे. उदाहरणार्थ- airhostess च्या ऐवजी flight attendant, fireman च्या ऐवजी fire-fighter. अनेक स्त्रियांच्या संघटनांनी आणि चळवळींनी हा मुद्दा 70 च्या दशकात उचलून धरला की, आधीच अनेक क्षेत्रे ही केवळ पुरुषांची किंवा केवळ स्त्रियांची अशी विभागली गेली आहेत आणि भाषेत असणारे लिंगभेद यात भर घालत आहेत. हे सगळे आपल्याशी खूप जवळून जोडले आहे, कारण आपली भाषा व्याकरणिक लिंग असणारी आहे. सोशल मीडियावर फिरणारे हे पोस्टर पाहा. योद्धा या शब्दालासुद्धा समांतर स्त्रीलिंगी शब्द नाही.

हे चित्र पाहून मुली, स्त्रिया ज्यांना योद्धा (कोरोनासाठी किंवा इतर कशासाठी) बनायचे आहे, त्यांच्याकडे काय पर्याय आहे? तर, चित्रातल्या ‘पुरुषासारखं’ बनावं. यात मुळात आपली संस्कृती योद्धा या रूपकाकडे कशी पाहते हे चित्रातून स्पष्ट होतंच, शिवाय त्याला भाषेतून बळकटी मिळते. सोबतच्या सात मुद्यांतली भाषा पाहा. मास्कची विल्हेवाट लावतो, सोशल डिस्टन्स पाळतो, भाग पाडतो, जबाबदारी ओळखतो- असा हा योद्धा आहे. सोशल डिस्टन्स पाळणारी, देशाप्रति व समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखणारी, अनावश्यक घराबाहेर न पडणारी, दुधाची पिशवी दररोज स्वच्छ धुऊन घेणारी, बाहेरून आणलेल्या किराणामालाची पाकिटं निर्जंतुक करण्याची दक्षता बाळगणारी, वयोवृद्ध आणि मुलं-बाळं यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटणारी, या सगळ्याला न कंटाळणारी अशी कोरोना योद्धा पोस्टरवर बघायला मिळत नाही. हा सगळा भाग शब्दांच्या निवडीचा तर आहेच, त्याचबरोबर भाषेतून रुजवलेल्या संस्कारांचासुद्धा आहे.

आज दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अनेक कुटुंबं घरात अडकून पडलेली आहेत. जेव्हा या संकटाचा कुटुंब म्हणून सर्व जण सामना करतायत, तेव्हा काही गोष्टी ठळकपणे समोर येतात. घरात स्वयंपाकात, इतर घरकामात घरातले इतर सदस्य घरातल्या स्त्रियांना ‘मदत’ करताहेत. जोपर्यंत आपण याला मदत म्हणत राहू, तोपर्यंत ही कामं घरातल्या स्त्रिया सोडून कुणाचीच असणार नाहीत. शिवाय मदत मागणारीची आणि देणाऱ्याची सामाजिक संदर्भातून व भाषेतून आलेली जाणीवही कधी बदलणार नाही. हे अशा काही थोडक्या नशीबवान स्त्रियांच्या बाबतीत आहे, ज्यांना ही ‘मदत’ मिळतेय.

भाषेतून येणाऱ्या या सर्व प्रभावांचं काय करायचं? यात पहिला मुद्दा म्हणजे भाषा वापरणाऱ्यांनी भाषेच्या जास्त सजग वापराची जबाबदारी घेतली पाहिजे. माझं बोलणं स्त्री-पुरुष सगळ्यांना सामावून घेणारं आहे का की माझ्या बोलण्यातून कुणाला वगळलं जातं आहे- हा विचार जाणीवपूर्वक केला पाहिजे. याइतकंच महत्त्वाचं म्हणजे, लहान मुला-मुलींशी बोलताना अधिकाधिक काळजीपूर्वक बोललं पाहिजे. अमेरिकेतल्या सिनेटमध्ये मंत्रिपदावर काम करणाऱ्या एका महिला सदस्यांच्या आठ वर्षांच्या मुलीची गोष्ट बोलकी आहे. या सिनेटरबार्इंची एक जवळची सहकारी आणि मैत्रीणसुद्धा सिनेटमध्ये मंत्रिपदावर काम करणारी आहे. मुलीने आपल्या सिनेटर आईची आणि तिच्या सिनेटर मैत्रिणीची मैत्री पाहिली आहे. एकदा ही आई आपल्या मुलीला सांगते की, आज माझे काही सिनेटर सहकारी घरी जेवायला येणार आहेत. या संध्याकाळच्या जेवणाविषयी आई-मुलगी सहज गप्पा मारताहेत. पाहुण्यांच्या यादीत पुरुषांची नावं पाहून, चकित होऊन मुलगी विचारते, ‘आई, मुलग्यांना पण सिनेटर होता येतं का?’ (Can boys also be senators?) स्त्रियांप्रति भेदभाव बाळगणाऱ्या समाजाची घडी अंगवळणी पडलेल्या आपल्या सगळ्यांना या संभाषणातली ताकद लगेच समजून येईल. समाजाचे असे आशादायी चित्र लहान मुला-मुलींसमोर उभं करण्याची, नव्या शक्यतांना जन्म देण्याची ताकद भाषेत जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या बदलात नक्की आहे. ही भाषिक शक्यता अजमावून पाहणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. शेकडो वर्षे भाषिक आणि सामाजिक गौणत्व स्वीकाराव्या लागलेल्या स्त्रियांबरोबरच इतर घटकांप्रति ते आपले किमान कर्तव्य आहे.

 

ताजा कलम :

मागील लेखावर खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या. या प्रतिसादाकरता मनापासून आभार.  एका प्रतिक्रियेत असाही सूर उमटला की-  बहुतेक स्त्रियांना यात रस नसावा, असे वाटते. याबाबतीत काही मुद्दे मांडावेसे वाटतात-  माहिती मिळणे हा बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा पहिला टप्पा आहे. मध्यमवर्गीय, सुशिक्षित घरी जन्म घेऊनही अनेक स्त्री-पुरुषांना लग्नानंतर कायद्यानं आडनाव बदलावं लागत नाही, ही माहितीच मिळालेली नसते. त्यामुळे अगदी बेसिक वाटली तरी माहिती पुन:पुन्हा नव्या संदर्भासह पोहोचवणे या प्रक्रियेचे अनेक फायदे असतात, असं वाटतं. शिवाय स्वतःच्या नावासंबंधीचे आणि एकूणात आयुष्यातलेच निर्णय स्वतंत्रपणे घेणाऱ्या काही स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत, हे कळल्यावर बदलाचा विचार करण्याचं बळ येतं.  या लेखावर आलेल्या इतर अनेक प्रतिक्रिया खूप आश्वासक आहेत. पुरुष आणि स्त्रिया दोघांनी असं म्हटलं आहे की- त्यांना विषयातले सर्व बारकावे आजूबाजूला असूनही जाणवले नव्हते  आणि ज्यांना बारकावे माहीत आहेत, त्यांना बदल करण्याची कळकळ आहे असंही लक्षात आलं.                                     

Tags: भाषा साधना सदर अपर्णा दीक्षित समानता लिंग समभाव sadar sadhana series aparna dixit feminism bhasha gender equality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात