डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

असे म्हटले जाते की, Fatherland या शब्दातून शासन आणि सुव्यवस्था याकडे जाणारा, तर Motherland मधून जन्म आणि पोषण असे सूचित करणारा अर्थ तयार होतो. शिवाय यातील अनेक देशांनी, संस्कृतींनी सोईस्कररीत्या कधी आपल्या देशाला पितृभूमी म्हटले आहे, तर गरज पडेल जेव्हा आईच्या रूपकाला हाताशी धरून मातृभूमीही म्हटले आहे. मात्र राजकीय किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी जर आपल्या जन्मभूमीबद्दल अभिमान जागृत करायचा असेल तर हाक कायमच भूमिपुत्रांना दिली जाते, मुलींना-लेकींना नाही. हा भेद इंग्रजीतल्या sons of Soil  मधूनही दिसतो. थोडक्यात, आई म्हणून रक्षणाची गरज असलेली मातृभूमी तिची प्रतिष्ठा भूमिपुत्रांच्या शौर्यानेच टिकवून ठेवत असते,  असे हे भाषिक-मानसिक समीकरण आहे.

हे समीकरण कुणाला वगळते?  तर पित्यालाही आपल्या रक्षणाकरता पुढच्या पिढीची गरज असते, हे पूर्ण नाकारले जाते.

या लेखात दिलेल्या फोटोत दाखवलेला संदेश सहायक आयुक्त कार्यालय, औंध, पुणे यांच्या वतीने रस्त्याकडेच्या भिंतीवर रंगवलेला आहे. मुलींच्या आणि मुलांच्या जन्मदरातील फरक आणि त्यामागील सामाजिक जडण-घडण यावर भाष्य करावे आणि एकूणातच जागरूकता निर्माण करावी म्हणून हा संदेश आहे, असे आपल्या लक्षात येते. या मजकुरात, त्यातल्या भाषेत काही आक्षेपार्ह आहे असे कदाचित वाटणार नाही; मात्र जरा बारकाईने विचार केल्यास लक्षात येते की, मुली शेवटी कशाला हव्यात?- तर मुलगे जन्माला घालण्यासाठी. यात दोन बाबींकडे पाहायला हवे आहे. ते म्हणजे- मुलगी जन्माला घालणाऱ्या आयांचे आपल्या समाजाला फारसे कौतुक नाही, मात्र आईपण (विशेषत: मुलग्यांचे) स्वीकारलेल्या मुलींचे कौतुक आहे. तर ‘जनहितार्थ जारी’ असे संदेशसुध्दा अनेकदा कळत-नकळत प्रतिगामी विचार दृढ करणारे ठरतात.

आई या प्रतिमानाला समाजात दिले जाणारे महत्त्व आपल्या इतिहासातून-मिथकांमधूनही कायम अधोरेखित होतच आले आहे. अर्थात, तुम्ही पुरुषाची- शूर मुलग्याची आई असाल, तरच! यशोदेने वाढवलेला कृष्ण, कौसल्येने जन्माला घातलेला एकमेवाद्वितीय राम, कुंतीचे पाच पांडव, सीतेचे लव-कुश या सगळ्या आया तर कायमच वाखाणल्या जातात. मात्र अशा धोरणी, प्रेमळ, शूर, निष्ठावान मुली कुणी जन्माला घातल्या, हे आपल्या सामूहिक स्मरणात नसते. बाकी गणपती-नवरात्रात नऊवारी साडी, फेटा, गॉगल्स असा वेष करून बुलेटवर फेरी काढणाऱ्या ‘जिजाईच्या लेकी’ आपल्या मनावर जो बदल ठसवू पाहात आहेत, त्या सगळ्या परिश्रमाला जिजाईसारखे होण्याचे लक्ष्य घालून देणे, हे counter-productive नाही का? शिवाजीमहाराज हेच मुळात एक गुंतागुंतीचे प्रतिमान आहे. त्यात भर म्हणून जेव्हा त्यांच्या आईचा उल्लेख अशा ‘सक्षमीकरणां’साठी आवर्जून केला जातो, तेव्हा ही गुंतागुंत समजलेली कुणीही व्यक्ती अशा भाषिक अभिव्यक्तीला विरोध करू धजत नाही. अर्थात केवळ शूर-महान पुरुषांच्या आयांनाच वंदनीय मानणे आणि अशी आई बनण्याचे ध्येय इतर स्त्रियांना आपसूक घालून दिले जाणे, हे केवळ योगायोग मानायचे का? ‘बेटी नहीं तो माँ नहीं, माँ नहीं तो ‘बेटी’ नहीं’ ही कधी घोषणा ठरेल काय?  मुलगा जन्माला यायला हवा असेल तर/आणि म्हणूनच मुली पाहिजेत असे म्हणण्यातून मुलग्यांसाठीचा हव्यास अधिक ठळक होत नाही का?

प्राचीन संस्कृती आणि तरुण, आधुनिक राष्ट्र-राज्याची घडण असा आपला देश आहे. (India is an ancient

civilisation and a young nation.) हजारो वर्षांच्या जडण-घडणीला, स्वातंत्र्य-समता-बंधुता यांचे तुलनेने नवे संदर्भ वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याने प्राप्त करून दिले. या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये भाषिक अभिव्यक्तींनी काळाला अनुसरून वेगवेगळी रूपं धारण केली. एकसंध, एकजूट असणारा देश (nation) अशी ओळख ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येण्याआधी आपल्याला फारशी भासली नाही आणि ‘तो’ भारत निर्माण करण्याच्या आणि टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘त्या’ची ‘ती’ भारतमाता कधी-कशी झाली, हे रंजक तर आहेच; पण त्यातून खूप काही शिकण्यासारखेही आहे.

भारतातल्या दक्षिणी राज्यांमध्ये 1920 आणि 1930 ची दशकं राजकीय-सामाजिक स्वरूपाची उलथापालथ घडवणारी ठरली. उत्तरेकडून येणारा हिंदी भाषेकरताचा दबाव मोडून काढण्यासाठी पेरियार आणि तेव्हाच्या जस्टिस पार्टी (नंतरची द्रविड कळघम) ने कंबर कसली. एकीकडे पाश्चात्त्य, युरोपी वसाहतवाद्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या self-respect चळवळीने जोरदार मूळ धरलेच होते. या चळवळीच्या पाठिंब्यामुळे जस्टिस पार्टीने रचलेल्या भक्कम पायावर पेरियारांनी हिंदी वर्चस्वालाही उघड आव्हान दिले. दरम्यान तमिळ भाषा आणि तमिळ आईचे प्रतीक या दोन्हींचा घट्ट संबंध जोडला गेला. ज्याप्रमाणे, मराठीला जिव्हाळ्याने मायमराठी म्हटले जाते, त्याप्रमाणेच आईसारखी ममता जिच्याबद्दल वाटावी ती तमिळताय सगळ्या तमिळ अस्मितेचे सूचक बनली. जी शुद्धता आणि प्रतिष्ठा आईच्या व्यक्तित्वाशी जोडली जाते, त्याच समांतर रेषेवर तमिळ भाषेची इभ्रत पणाला लागली. आईची जी ऐतिहासिक, कधीही न बदलणारी, सातत्य असणारी प्रतिमा जनमानसात असते/होती, ती भाषेवर लादण्यात आली. त्याचे दृश्य परिणाम तेव्हाच्या तमिळनाडूच्या समाजजीवनात उमटू लागले.

भारतीदासनसारखे कवी स्त्रीतल्या ‘शक्ती’चा प्रत्यय त्यांच्या कवनांमधून अधिक ठळकपणे मांडू लागले. सगळ्या तमिळ स्त्रिया नव्याने निपजलेल्या ताय-कुलम्‌ (mother-community) च्या आपसूक सभासद झाल्या. Self-respect चळवळीतला स्त्रियांचा गट (the womencadre) आता केवळ स्त्रियांचा गट म्हणून पुढे न येता आयांचा गट म्हणून एकत्र येऊ लागला. तमिळ स्वाभिमान टिकवणे, तमिळ संस्कृती जतन करणे, याबरोबरच तमिळ कला-संस्कृतीच्या वैशिष्ट्यांनी सार्थ पुरुषाला जोरदार पाठिंबा देणे हा या गटाचा मुख्य हेतू बनला. याच women Cadre चे याआधीचे मुख्य धोरण स्त्रियांना सुशिक्षित करणे, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा आत्मसन्मान (self respect) जागृत करणे हा होता. आता मात्र या गटाच्या होणाऱ्या सभांना mothers' conference, mothers' procession असे संबोधले जाऊ लागले. या सभांमध्ये धाडसी, पवित्र, तमिळ ऐक्य जपणाऱ्या इतिहासातील तमिळ आयांचे (अर्थातच ज्यांचे मुलगे कर्तृत्ववान ठरले अशा आया) दाखले देऊन धडाकेबाज भाषणे करण्यात आली. इतकेच नव्हे, तर तेव्हाच्या तमिळनाडूच्या नकाशात हिंदीच्या बेड्यांमध्ये बंदिस्त तमिळ आई जागोजागी झळकू लागली.

Mother, Mother-Community and Mother-Politics in Tamil Nadu  या दीर्घ लेखात सी.एस. लक्ष्मी म्हणतात की, तमिळ अस्मितेच्या हिंदी विरोधातल्या या लढ्यात तमिळ भाषेसाठी आईची उपमा निवडण्याला अनेक परिमाणे आहेत. जेव्हा प्रत्येक चर्चा, संभाषण आईच्या प्रतिमेभोवती गुंफले जाते, तेव्हा या सगळ्यात तमिळ पुरुष हा आईची काटेकोर-काळजीपूर्वक आखलेली व्याख्या कृतीमध्ये तंतोतंत लागू करू पाहतो. ज्या आईला तो पूज्य स्थानी मानतो आहे, तिचा तो एकाच वेळी रक्षणकर्ता, तिला सांभाळून घेणारा आणि अप्रत्यक्ष परंतु संपूर्ण मालकीचा हक्क बजावणारा होतो. म्हणजे स्त्री आईच्या रूपात पूज्य स्थानी तर जातेय, मात्र स्थाननिवडीचा कोणताचा अधिकार तिच्याकडे नाही. पुरुषांचे पुरुषत्व हे त्यांच्या स्त्रीवर अप्रतिष्ठेची, खालमानेची वेळ न येण्यावर टिकून असते, हे कालातीत प्रतीक तमिळनाडूसारख्या तेव्हाही आणि आताही पुढारलेल्या समजल्या जाणाऱ्या समाजाने बिनधोकपणे वापरले. म्हणजे तमिळ अस्मितेचा जागर हा तमिळ आईच्या संरक्षणार्थ करण्यामध्ये पेरियारांसारख्या द्रष्ट्यानेही पुढे-मागे पाहिले नाही. अर्थात या बाबतीत सामाजिक चळवळ यशस्वी करण्याची जबाबदारी ज्या प्रकारे भाषेने व भाषिक-मानसिक प्रक्रियांनी उचलली, त्याला तोड नाही.

हा विषय केवळ तमिळ ताईचाच नाही, तर इतरही भाषांचा आहे. हे सारे तमिळनाडूमध्ये घडत असताना, साधारण याच काळात प्रसिद्ध मराठी कवी माधव जूलियन ‘मराठी असे आमुची मायबोली’ असे लिहून सर्वव्यापी मान्यता मिळवताना दिसून येतात. आईचे पुत्र तिचे ऋण फेडतील आणि तिला वैभवाच्या शिखरावर नेतील, असे ते म्हणतात-

‘हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू,

वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे,

हिला बैसवू वैभवाच्या शिरी!’

अशा वैभवाचा आशावाद बाळगणारे जूलियन हिंदीचे वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे मान्य करतात; मात्र महाराष्ट्रातील लोक मराठीलाच कसे मानतात, हे मांडतात-

‘जरी मान्यता आज हिंदीस देई,

उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी,

मनाचे मराठे मराठीस ध्याती,

हिची जाणुनी योग्यता थोरवी।’

जे बदल तमिळ भाषेच्या, मराठीच्या बदलत्या रूपाने केले तसेच बदल विविध राज्यांमध्ये घडताना दिसले. बंगाली भाषेबद्दल नोंद करताना यशोधरा बागची म्हणतात- वसाहतवादाशी सामना करत असताना बंगाली आईच्या प्रतिमानातील सामर्थ्य आणखी तीव्र करण्यात आले. त्यांनी जन्माला घातलेल्या पुरुषांच्या महानतेच्या मोजपट्टीने बंगाली आयांचे श्रेष्ठत्व मोजले जाऊ लागले. इतकेच नव्हे तर, या पुरुषांनी आपल्या मातांची कूसच त्यांच्यापोटी जन्माला येऊन महान केली आहे, असेही म्हटले गेले. राष्ट्रवादाने आईपणातली थोरवी उसनी घेतली.

आता हा प्रश्न बांग्ला वा मायमराठी किंवा तमिळतायचा न उरता भारतमातेचा प्रश्न होतो. व्यासपीठांवरून, माध्यमांमधून जितक्या हिरीरीने स्त्रियांशी संबंधित रूपकं आणि उपमा- मालमत्तेसाठी, जमिनीसाठी किंवा उपभोग्य वस्तूंसाठी- वापरल्या जातात तितकी भाषा अधिकाधिक पुरुषी अहंभावाला शरण जाते आणि भाषेबरोबर खऱ्या-खुऱ्या, हाडामांसाच्या स्त्रियांनाही पाऊलभर मागे हटवले जाते. स्त्रीला तिचं व्यक्तित्व नाकारलं जातं आणि सगळ्या स्त्रियांना एकगठ्ठा समूह- आयांचा समूह म्हणून गणलं जातं. त्यामुळे खऱ्या स्त्रियांना कोणत्याही व्यापक चर्चाविश्वामध्ये सामान्य व्यक्ती म्हणून भाग घेणे जवळजवळ अशक्य बनते. एक तर त्यांनी ही larger than life आईची भूमिका स्वीकारावी किंवा ज्या स्त्रियांना (आयांना) पुरुषांच्या रक्षणाची गरज आहे अशा कंपूत जावं- अशा दोनच पर्यायांच्या कचाट्यात स्त्री सापडते.

सामाजिक भाषाशास्त्राच्या (sociolinguistics) अनेक अभ्यासकांनी अशा चळवळींचा अभ्यास करताना असं म्हटलं आहे की- भाषा आयांचे असे कंपू ठळकपणे बनवते, राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी आई गटाचा वापर प्रभावी खेळी म्हणून केला जातो. याउपर म्हणजे- ज्या स्त्रिया या गटात सहभागी होतात, त्यांच्या खऱ्या वास्तवात कोणताही सकारात्मक बदल होताना दिसत नाही. म्हणजेच आईपणाला महत्त्व देणाऱ्या समाजामध्ये स्त्रियांना अधिक प्रतिष्ठा मिळतेच किंवा त्यांच्या आरोग्याची स्थिती अधिक उत्तम असते किंवा त्या समाजात कुपोषणाला कमी स्त्रिया बळी पडतात, असे दिसून येत नाही. शिवाय एकंदर मूल्यव्यवस्थादेखील स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबतच्या विचारांचा स्त्रियांना प्रत्यक्ष फायदा होईल, अशा विचारप्रक्रियांकडे झुकताना दिसत नाही.

जगभरामध्ये असे अनेक देश आहेत, जे आपल्या देशाला पितृभूमी- (fatherland) म्हणतात. जर्मेनिक (Germanic) भाषांचा प्रभाव असणाऱ्या बहुतेक सर्व देशांमध्ये हे खरे आहे. उदाहरणार्थ- जर्मन, स्वीडिश, नॉर्वेजियन, डच इत्यादी. तर मातृभूमी motherland म्हटलं की सगळ्यात आधी Mitera Patrida चा उल्लेख येतो. लॅटिन भाषेचे मूळ घेऊन येणाऱ्या भाषा आणि काही स्लाविक भाषा, मातृभूमी म्हणणे पसंत करतात. तर फ्रेंचसारख्या भाषेने la modre patria किंवा स्पॅनिश भाषेने la modre patria ज्याचा शब्दश: अर्थ Mother Father Land असे पर्यायही स्वीकारले आहेत. आपल्याकडे जन्मभूमी हा पर्यायी शब्द उपलब्ध आहे. वर दिलेले फरक हे भाषेच्या रचनेतूनही येतात, त्याचबरोबर त्या-त्या ठिकाणच्या संस्कृतीतील फरकाकडे बोट दाखवतात.

असे म्हटले जाते की, Fatherland या शब्दातून शासन आणि सुव्यवस्था याकडे जाणारा, तर Motherland मधून जन्म आणि पोषण असे सूचित करणारा अर्थ तयार होतो. शिवाय यातील अनेक देशांनी, संस्कृतींनी सोईस्कररीत्या कधी आपल्या देशाला पितृभूमी म्हटले आहे, तर गरज पडेल जेव्हा आईच्या रूपकाला हाताशी धरून मातृभूमीही म्हटले आहे. मात्र राजकीय किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी जर आपल्या जन्मभूमीबद्दल अभिमान जागृत करायचा असेल तर हाक कायमच भूमिपुत्रांना दिली जाते, मुलींना-लेकींना नाही. हा भेद इंग्रजीतल्या sons of soil मधूनही दिसतो. थोडक्यात, आई म्हणून रक्षणाची गरज असलेली मातृभूमी तिची प्रतिष्ठा भूमिपुत्रांच्या शौर्यानेच टिकवून ठेवत असते, असे हे भाषिक-मानसिक समीकरण आहे.

हे समीकरण कुणाला वगळते?  तर पित्यालाही आपल्या रक्षणाकरता पुढच्या पिढीची गरज असते, हे पूर्ण नाकारले जाते. बापही कधी परिस्थितीमुळे हरलेला, मुळातच क्षीण असू शकतो- ही शक्यता वगळली जाते. पुरुषाची कायमच जेतेपण मिळवण्याची आणि मिरवण्याची जबाबदारी भाषा वाढवून ठेवते. तसंच मुलगी ही पालकांच्या (या संदर्भात जन्मभूमीच्या) रक्षणार्थ पुरेशी सक्षम असू शकते, ही शक्यता तर विचारातही घेतली जात नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, सैन्याच्या सशस्त्र दलांमध्ये स्त्रियांची भरती पहिल्यांदा 1992-93 मध्ये सुरू झाली- ज्यात अजूनही स्त्रिया मुख्यत्वे शिक्षण, ट्रेनिंग अशाच जबाबदाऱ्या निभावत आहेत आणि सीमेवर आपल्या आईचं रक्षण करायला त्या सशस्त्रपणे उतरू शकत नाहीत. हल्लीच आलेल्या बातमीवरून हे ही लक्षात येते की, स्त्रियांनी सैन्यात कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करण्यास पुरेशी बढती मिळवूनही त्यांच्या अधिकाराखाली काम करणाऱ्या पुरुषांना स्त्रीकडून आज्ञा घेणे जमणार नाही म्हणून, या धाडसी-कर्तृत्ववान स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षा डावलल्या जात आहेत. वरील समीकरण अशाही स्त्रियांना वगळते, ज्यांच्या पोटी मुलीच जन्माला येतात.

स्त्रीविषयीच्या भाषिक अभिव्यक्तीचे हे एक उदाहरण झाले. त्यातून सगळ्या स्त्रियांचे विभाजन आई असणाऱ्या आणि आई नसणाऱ्या (mother and non - mother) अशा दोनच कृत्रिम गटांत होते. जन्म देऊन सृष्टीचे चक्र चालू ठेवणारी असे म्हणून तिला अत्यंत उच्च दर्जा एकीकडे मिळतो, तर दुसरीकडे सर्वच प्रकारच्या निर्णय-प्रक्रियांपासून तिला वंचित ठेवत तिची कार्यकारी ऊर्जा क्षीण बनवली जाते. (High status - low agency) स्त्री (आई)च सर्व प्रक्रियांच्या केंद्रस्थानी आहे- हा आभास जेव्हा भाषा निर्माण करत असते, तेव्हा खऱ्या स्त्रियांच्या वाट्याला ही आभासी फसवणूक येते. शपथही कायम आईच्या नावाने घेणारा आपला समाज, खऱ्या आयांनी शपथेवर कुठले नेत्रदीपक काम करावे अशी परिस्थिती निर्माण करत नाही.

Tags: साधना सदर बेटी बचाओ स्त्री चळवळ अपर्णा दीक्षित beti bachao sadhana series sadhana sadar aparna dixit women movement striyanchi bhasha stri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात