डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

समाजात विविध पातळ्यांवर चर्चा होण्यासाठी, खऱ्या बदलाची सूत्रं गोवली जाण्यासाठी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अशा संकल्पना अस्तित्वात आहेत, याची प्राथमिक माहिती तर असणे आवश्यक आहे. आपण जे अनुभवतो आहोत, तो आपल्या एकटीचा अनुभव नाही; तर जगभरात अनेक स्त्रियांना येणारा हा अनुभव आहे, त्याला नाव आहे, त्या अनुभवांच्या विचारपूर्वक विभागण्या (categories) केल्या आहेत, मला येणाऱ्या अनुभवांचा कुठे तरी शिस्तशीर अभ्यास होतो आहे- ही माहिती खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी आहे. स्वत:च्या अनुभव-विश्वाची अशा प्रकारे दखल घेतली जाणे आणि आपले विचार वैध ठरवले जाणे (validate) अतिशय समाधानकारक आहे. व्यक्तीचा स्व बळकट होण्यासाठी, आतून स्वत:बद्दल विश्वास वाटण्यासाठी या सगळ्या अनुभवांची पद्धतशीर विभागणी होणे याचे खूप मोठे योगदान आहे. आणि हे काम सामाजिक व भाषिक अशा दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी व्हायला हवे आहे. आजच्या काळाची ती निकड आहे.

 

पॅट्रिक हॅमिल्टन या नाटककाराने 1938 मध्ये लिहिलेलं ‘गॅसलाईट’ हे नाटक आलं. त्याच नाटकावर आधारित ‘गॅसलाईट’ नावाचा सिनेमा 1944 मध्ये आला. इनग्रिड बर्गमन (पॉला) आणि चार्ल्स बोयर (ग्रेगरी) अशी प्रमुख पात्रं त्यात आहेत. पॉला आणि ग्रेगरी यांचे नुकतेच लग्न झालेले आहे. पॉलाकडे वारसाहक्काने आलेल्या समृद्ध बंगल्यात हे जोडपे राहते आहे. लग्नानंतर काहीच काळात पॉलाबरोबर विचित्र घटना घडू लागतात. तिने आठवणीने ठेवलेल्या वस्तू, जिथे ठेवल्या तिथे सापडेनाशा होतात. आपल्या नवऱ्याच्या भूतकाळाशी संबंधित पत्र मिळते, मात्र हातात कोणताच कागद नसताना ती बरळते आहे, असं नवरा तिला दाखवून देतो. घरातल्या गॅसवर चालणाऱ्या दिव्यांचा प्रकाश सतत कमी-जास्त होतो आहे असं पॉलाला वाटत राहातं. मात्र असं काही होत नाहीये, हे सगळे पॉलाच्या मनाचे खेळ आहेत- असं ग्रेगरी तिला सांगत राहतो. तिच्याबद्दल वाटत असणारी काळजी त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत राहते. बाहेर चार लोकांत जाऊन हसं होऊ नये, म्हणून शेवटी पॉलाने फारसं घराबाहेर पडू नये, असं ग्रेगरी सुचवतो. पॉला घरातच कोंडली जाते. पॉलाच्या आईला वेडाचे झटके येत होते आणि त्याच दिशेने पॉला जाते आहे, असे सुचवल्यावर आपल्या आईला अशा प्रकारचा आजार असल्याचेच पॉलाला आठवत नाही. आता पॉला जास्तच आक्रमक वागू लागते. काहीबाही बडबडते, खऱ्या-खोट्याचा व योग्य-अयोग्याचा तिचा अंदाज सारखाच चुकू लागला आहे. हिस्टेरिया झाल्यासारखे, किंचित वेडसरपणाची झाक असलेले तिचे वागणे आहे. आणि नवरा हे सगळे सहन करतो आहे. ते राहत असलेल्या बंगलीत अनेक वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा तपास पुन्हा काही कारणाने सुरू होतो. मग मात्र वेगाने घटना घडतात. तपास करणारा एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर पॉलाला हे दाखवून देतो की, तिच्या नवऱ्याने तिला शिस्तशीर पद्धतीने या वेडसरपणाकडे ढकलले आहे. तिच्या ‘गहाळ’ झालेल्या वस्तू ग्रेगरीनेच दडवून ठेवल्या आहेत, ग्रेगरी खुनाच्या गुन्ह्यात दोषी असल्याचे पत्रही खरं अस्तित्वात आहे आणि लपवून ठेवले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गॅसवर चालणाऱ्या दिव्यांचा (gaslight) प्रकाश सतत कमी-जास्त होतो आहे. इतकंच नाही, तर ग्रेगरी स्वत: घरातल्या बंद माळ्यावर जाऊन तिथले दिवे सुरू करतो आहे आणि त्यामुळे घरात इतर सगळीकडे दिव्यांमधला गॅसचा पुरवठा कमी होऊन ते खरंच मिणमिणते होताहेत. शेवटी अर्थातच असे लक्षात येते की- ग्रेगरीचा खुनाशी संबंध तर आहेच, शिवाय पॉलाचे मानसिक संतुलन पुरते ढासळले की, त्या निमित्ताने संपत्तीवर कब्जा करण्याचा ग्रेगरीचा हेतू आहे Strange drama of a captive sweetheart!  अशा वर्णनासकट झळकलेल्या या सिनेमातल्या भूमिकेसाठी इनग्रिड बर्मनला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं ऑस्कर मिळालं आणि शिवाय सिनेमाला आणखी सहा ऑस्कर बक्षिसं मिळाली.

या कथाबीजाचा संदर्भ पुढे जाऊन साठच्या दशकात gaslightingही संज्ञा तयार झाली. आजकाल gaslighting हा शब्द राजकीय नेतृत्व, मीडिया, मनोरंजन, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांत वागण्यातले काही नेमके विशेष- मुख्यत: संभाषणातले- पॅटर्न दाखवून देण्यासाठी वापरला जाताना दिसून येतो. एखाद्या व्यक्तीची वास्तवाबद्दल जी काही समजूत आहे, योग्य-अयोग्यविषयीच्या ज्या धारणा आहेत, त्यांना तडा जाईल किंवा त्या व्यक्तीचे वास्तवा-संदर्भातले आकलनच कमजोर होईल, असे दुसऱ्या व्यक्तीने (जाणीवपूर्वक किंवा चुकून) बोलणे याला gaslighting  म्हणतात. यामध्ये समोरच्या व्यक्तीचे म्हणणे खोडून काढणे, समोरच्या व्यक्तीचे चुकते आहे हे फारसा विचार न करता मांडणे- या आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. कधी कधी gaslighting  मतभेदाच्या जरासेच पुढे जाणारे, सौम्य असू शकते. मात्र अनेकदा त्याचे स्वरूप उग्र असू शकते आणि एखाद्याला सिनेमातल्या पॉलासारखे जे समोर दिसते आहे ते खरे मानावे की नाही इतक्या संभ्रमात टाकणारे असू शकते. ज्याला इंग्रजीत आपण crazy  किंवा मराठीत वेडसरपणाचे म्हणतो, तसा दुसऱ्याच्या वागण्याचा अर्थ लावला जातो आणि ते तसं आहे, हे त्याही व्यक्तीला पटवून दिलं जातं. 

संभाषणात gaslighting ओळखायचं कसं, याचे काही ठोकताळे आहेत. संवादामध्ये खाली दिलेल्या वाक्यांपैकी कोणती वाक्ये ऐकायला मिळतात का किंवा पुन:पुन्हा एखादे वाक्य ऐकायला मिळते का, यावरून हे ठरवता येते.

1. हे सगळं तुझ्या मनात आहे, खरं असं काही नाहीये.

2. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत.

3. सारखा इतका संशय तुझ्याच डोक्यात कसा येतो?/ अजिबातच कसा कधी संशय येत नाही तुला?

4. या सगळ्यात फार काही अर्थ नाही.

5. उगीच इतकं मनाला लावून कशाला घ्यायचं?

6. इतकं इमोशनल होण्यासारखं काय आहे यात?

7. तू जरा अतीच आहेस. इतक overreact  होण्यासारखं काही नाहीये.

8. तुझ्या अंगात आलंय का?

9. असं काही झालंच नव्हतं. मी तुझ्याशी खोटं बोलेन का?

10. इतका राग येण्यासारखं काही घडलंच नाहीये.

11. जास्त विचार करू नकोस.

12. तुझी तब्येत बरी नाही का?

13. जग तर वाईटच आहे. तुलाच कळायला हवं होतं.   

अर्थातच संवादात असे वर्तन स्त्री आणि पुरुष दोघे दाखवू शकतात. मात्र केवळ स्त्रियाच नव्हे, तर इतर शोषित गटातल्या व्यक्तींनाही खूप मोठ्या प्रमाणात gaslighting ला सामोरे जावे लागते. तृतीयपंथी व्यक्ती, स्त्रिया, लहान मुलं-मुली- सगळे जण कमी-जास्त प्रमाणात हा अनुभव घेतच असतात. Mansplaining  - मॅन्सप्लेनिंगविषयीच्या चर्चेत पुरुषांना संवादात वर्चस्व राखणे हे का महत्त्वाचे वाटते आणि ते मॅन्सप्लेनिंगच्या माध्यमातून कसे केले जाते, हे आपण पाहिलेच आहे. त्याला जोडूनच gaslighting च्या संदर्भातही संवादात पुरुष वरच्या यादीतील वाक्यं म्हणताना अनेकदा दिसतात. वरील वाक्यांकडे बघितलं, तर काही निष्कर्ष अगदी सहज काढता येतात. जेव्हा व्यक्ती असं म्हणते की- इतका राग येण्यासारखं काही घडलंच नाहीये; तेव्हा किती राग म्हणजे ‘ठीक’ आहे, या घटनेचा राग येणे ‘योग्य’ आहे का- अशा अनेक गोष्टी त्या बोलणारी व्यक्ती ऐकणाऱ्याच्या मनात ठसवत असते. त्या क्षणी आलेला राग तर त्यातून ‘कमी महत्त्वाचा’ किंवा ‘क्षुल्लक’ किंवा बोलणाऱ्याला ‘वैताग वाटेल असा’ ठरतोच. शिवाय पुढच्या वेळेस किती, कसं, कोणत्या मुद्यावर राग वाटून घेणे ‘ठीक’ (agreeable) आहे, याबद्दल दुसऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण करणारा ठरतो. यात भरीस भर म्हणजे जर या दोन व्यक्तींमधील नात्यातील सत्ता विषम विभागली असेल, मुळातूनच कुणी श्रेष्ठ-कनिष्ठ आहे अशा धर्तीवर नाते बेतलेले असेल, तर ‘कनिष्ठ’ व्यक्तीची पुष्कळच कुचंबणा होते. हे सगळं आपल्याला कुठल्याही पुरुषप्रधान (patriarchy) समाजात दिसत असतंच. मुळात पुरुष केवळ पुरुष आहे म्हणूनच त्यांचं श्रेष्ठत्व विनातक्रार मान्य केलं जातं. मग त्याला जे ‘ठीक’ वाटतं, त्याला जे उचित वाटतं- त्याच्याशी मन मारून किंवा राजीखुशीने जुळवून घेण्याची जबाबदारी आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांची निश्चित असते. तसंच- त्याच्यापेक्षा कनिष्ठ असणारे इतर पुरुष (लहान भाऊ, कनिष्ठ अधिकारी, वयाने लहान कुटुंबीय), छोटी मुलं-मुली या सगळ्यांनीही आपली पायरी ओळखून वागावे, अशी अपेक्षा असते. अजूनही आपल्या समाजात कुटुंबप्रमुख ही संकल्पना कुटुंबातल्या (कर्त्या, वयाने मोठ्या, दरारा असणाऱ्या) पुरुषाशीच का जोडलेली आहे? तर, त्या व्यक्तीला जे उचित वाटेल तसेच वागायचे अलिखित बंधन इतर सर्वांवर आहे. इतकी सत्ता घरात आणि घराबाहेरही वागवणाऱ्या पुरुषांची, त्यांच्या बोलण्याची चिकित्सा होणे साहजिक आहे. म्हणूनच हे प्रमुख पुरुष काय बोलतात आणि त्यांच्या बोलण्याचे ऐकणाऱ्याच्या मनावर काय परिणाम होतात, हा भाषाशास्त्रामधल्या अर्थविन्यास (discourse) या शाखेमधला अभ्यासाचा विषय राहिला आहे.

अमेरिकी भाषाशास्त्रज्ञ स्टँटन वर्थहम असं मांडतात की- स्व:बद्दल ठरावीक, निश्चित ओळख तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात संभाषणांमधून संवादांच्या संदर्भात घडते. एखादा मुद्दा-दृष्टिकोन जर संवादामध्ये पुन:पुन्हा, सवयीने येऊ लागला; तर एखादी व्यक्ती आपली स्वत:बद्दलची संपूर्ण ओळख (identity) त्या मुद्याभोवती गुंफते. ती व्यक्ती संवादातून पुन:पुन्हा ऐकायला मिळणाऱ्या या गोष्टींना कळत-नकळतपणे आपण कोण आहोत हे ठरवण्यासाठीचे मापदंड मानू लागते. त्यामुळे बोलणारी व्यक्ती फारसा विचार न करता जेव्हा ‘काय तू, कायम पळपुटेपणा का दाखवतेस?’, ‘तू काही कामाचा नाहीस’, ‘जमणारे का तुला? तुझ्याच्यानं होणार नाही, सोड-’ अशी वाक्यं उच्चारते; तेव्हा समोरची व्यक्ती आपण कोण आहोत, कोण बनू शकतो याबद्दलचे ग्रह या संवादांसंदर्भात ठरवत असते. त्यात वर म्हटल्याप्रमाणे मुळात बोलणाऱ्या व्यक्तीचे नात्यात वर्चस्व असेल, तर ही प्रक्रिया आणखी दृढ होते. घरातल्या कुटुंबप्रमुखाचे (आजोबा, चुलते, वडील) म्हणणे मनावर घेतले म्हणून आयुष्याची, व्यवसायाची, जोडीदारनिवडीची दिशा मनाविरुद्ध बदललेले किती तरी जण आपल्यात आहेत; आपल्या आजूबाजूला आहेत.

रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला दिसणारी gaslighting ची उदाहरणं सिनेमातल्या ग्रेगरीच्या वागण्यापेक्षा वेगळी असतात. कथेत नाट्य, अचंबा आणण्याकरता तिथे अनेक गोष्टी आखल्या आहेत. खऱ्या आयुष्यात gaslighting  करणारी व्यक्ती संवादाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचे जे भावनिक manipulation  करत असते, ते खूप विचारपूर्वक केलेले असते असे नाही. ग्रेगरीने पक्कं ठरवलं होतं की, आपली बायको जगाच्या नजरेत वेडी (crazy)  ठरली पाहिजे. संवादात असा विचार प्रत्येक जण प्रयत्नपूर्वक करत नाही. दुसरा फरक म्हणजे- gaslighting  होती) त्या व्यक्तीच्या मनात नसतं. कुठलं घबाड मिळवण्यासाठी म्हणून ते समोरच्या व्यक्तीला वेडं ठरवण्याचाही प्रयत्न करत नसतात. 

Gaslighting चे प्रत्येक उदाहरण लिंगभेदाचे असतेच असं नाही. मात्र, आपल्याभोवती असणारा लिंगभेद, स्त्री-पुरुषांमधले असमान नाते आणि gaslighting यांचा जवळचा संबंध आहे, असे दिसून येते. जसं की- 1. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त प्रमाणात gaslighting ला बळी पडतात. 2. पुरुष मोठ्या प्रमाणात gaslighting करतात. असेही दिसून येते.

वरचे दोन मुद्दे तर आपण पाहिलेच, शिवाय-

3. अनेकदा स्त्रिया जेव्हा लिंगभेदाचे प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्याला खूपदा gaslighting च्या स्वरूपात प्रतिसाद दिला जातो. उदाहरणार्थ- ‘क्वीन’ सिनेमात जेव्हा कंगना राणावतने साकारलेल्या राणीला मैत्रिणीच्या लग्नात मनोसक्त नाचायचे आहे, तेव्हा तिचा होणारा नवरा तिला बाजूला खेचतो आणि, ‘हे असलं वागणं तुला शोभतं का? माझ्या आईने तुला असं नाचताना पाहिलं तर? असं नाचणं बरं का?’ अशा नैतिक उलटतपासणी घेणाऱ्या प्रश्नांचा भडिमार करून तिला रडकुंडीस आणतो. ‘अनेक बायका-मुली नाचताहेत, मला नाचायला आवडतं-जमतं; तर काय गैर आहे, मी स्वत:च्या मैत्रिणीच्या लग्नात नाचले तर?’ या राणीच्या प्रश्नांना या संवादात फारसा थारा नाही.

4. gaslighting ला बळी पडणाऱ्या व्यक्तीच्या मनात लिंगभेदावर आधारित काही गृहीतके मुळातच तयार आहेत- या पायावर भावनिक manipulation  केले जाते. उदाहरणार्थ- स्त्रिया कमकुवत आहेत हे जर बायकोलाही मनातून वाटत असेल तर, ‘मला न विचारता अशी कशी परवानगी दिलीस मुलाला सहलीला जायला?’पासून ‘परवानगी देणारी तू कोण?’पर्यंत कुठलाही मुद्दा गरजेप्रमाणे पटवून देता येतो. 

5. जेव्हा gaslighting चा हेतू साध्य होतो, बोलणाऱ्या व्यक्तीचा स्वार्थ (कळत-नकळतपणे) साधला जातो, तेव्हा लिंगभेदावर आधारित व्यवस्थेचे जे दोष बळी पडलेली व्यक्ती समोर आणू पाहते आहे, ते दूर तर होत नाहीतच; पण अजून दृढ होतात. इथे अनेक गंभीर उदाहरणांचा विचार करता येईल. जसे की- लैंगिक शोषणाला बळी पडलेली स्त्री जेव्हा त्याबद्दल कुणाशी बोलू पाहते, तेव्हा अगदी कुटुंबीयसुद्धा- ‘तुझा काही गैरसमज झाला असेल, इतकं सिरियस नक्की काही झालंय का?’ असे प्रश्न उपस्थित करताना दिसतात. मुलायमसिंह यादव यांचे बलात्काराच्या दोषींना कोणती शिक्षा असावी, याबद्दलचे वक्तव्य आठवून पाहा. ‘लडके, लडके है, गलती हो जाती है,’ असं जेव्हा ते जाहीरपणे म्हणतात; तेव्हा किती चुकीचे वर्तन म्हणजे ‘अतिशय’ चुकीचे हे ठरवण्याचा मक्ता ते सहज घेतात. म्हणजे अशा अत्याचाराला बळी पडलेल्यांनी काय समजावे, तर यात काय वाटून घ्यायचं? मुलग्यांकडून ‘एवढ्या चुका’ तर होणारच. लेस्बियन, गे अशा अनेक व्यक्तींचे अनुभव वाचले तर त्यांना मिळालेल्या प्रतिसादात काही समान धागे बघायला मिळतात. जेव्हा त्यांनी आपली ओळख कुणासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेकदा- ‘तुला खात्रीनं असं वाटतंय का? अरे/अगं, ही एक फेज असेल- काही दिवसांनी तुला असं वाटणारही नाही बघ,’ किंवा ‘हे काय फॅड? असं कुठे असतं का?’ असं म्हणून पूर्ण निकालातही काढलं जातं.

6. तसेच gaslighting मुळे लिंगभेदावर आधारित वागण्याचे, वृत्तीचे काही ठरावीक मापदंड अधिक बळकट होतात. ‘इंग्लिश-विंग्लिश’ सिनेमामध्ये शशीचा नवरा तिचे कुटुंबीय, स्वत:ची दोन मुलं, मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर ‘कौतुकाने’ म्हणतो, ‘हिचा जन्म तर उत्तम बुंदीचे लाडू करण्यासाठीच झाला आहे’; तेव्हा मुळात स्त्रियांची जागा स्वयपाकघर आहे, हा लिंगभेदावर आधारित समज आणखी घट्ट रुजतो. यातली काही उदाहरणे सिनेमातल्या घटनांवर आधारित असली तरी त्या घटना, संवाद हे सिनेमा बनवणाऱ्यांच्या आणि आपल्या भोवतालात कायम घडताना दिसत असतातच.

असे संवाद जेव्हा पिढ्यान्‌पिढ्या घडत राहतात, तेव्हा त्यातून काही ठरावीक प्रतिमानं-कथनं (narratives) तयार होतात. गर्लफ्रेंड या कशा आपल्या बॉयफ्रेंडच्या मानगुटीवर बसून आपल्या मनासारखं वागतात, यातून crazy girlfriend  असे प्रतिमान हमखास निर्माण झाले आहे. त्यावर आधारित, असंख्य मिम इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यातलं एक इथे देते आहे.

आता, ‘एका तासात फोन करतो’ सांगून दिवसभर फोन न करणाऱ्या व्यक्तीची नात्यात काय जबाबदारी आहे, याची चर्चा तर होत नाहीच. मुलायमसिंहांना मुलग्यांच्या वागण्यात ज्या ‘साध्यासुध्या’ चुका आढळतात, त्याच्या तुलनेत तर ठरल्यावेळी फोन न करणे, ही चूकही मानता येणार नाही. शिवाय हे मिम कसे problematic आहे असं एखादीने दाखवून द्यायचा प्रयत्न केला, तर बायकांना कशी विनोदबुद्धी जरा कमीच असते (किंवा नसतेच)- ही मतंही बळकट करण्याची आणखी एक संधी मिळते. या सगळ्याचा शेवट ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असा होतानाच अनेकदा दिसतो. 

भ्याड हल्ल्यात मारल्या गेलेल्या गौरी लंकेश यांच्या घृणास्पद मृत्यूनंतर ट्वीटरवर एक जण म्हणतो- ‘एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी, सारे पिल्ले एक सूर में बिलबिला रहे है,’ ही आणि अशी अनेक अवमानकारक, प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या त्या एकाला आपले पंतप्रधान मोदी ट्वीटरवर फॉलो करतात. हा त्यातला आणखी एक बारकावा. त्या घटनेनंतर आज तीन वर्षांनंतरही करत आहेत. अशा वक्तव्यांना संस्थात्मक पातळीवर दिली जाणारी मान्यता दाखवून देणे, हा या उदाहरणाचा मुख्य हेतू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कित्येक वर्षांच्या सातत्यपूर्ण वापरातून 'crooked Hillary'  ही शब्दजोडी आणि त्यातले प्रतिमान अनेकांच्या मनात पक्के ठसवले. आता ते डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार बनलेल्या कमला हॅरिस यांना 'crazy lady', 'ill and angry mad woman'  अशी नावं आणि त्यांच्याबरोबर येणारी प्रतिमानं योजण्यात मग्न आहेत.

खासगी, वैयक्तिक नात्यातल्या कुचंबणेपासून ते जगातल्या सगळ्यात बलाढ्य राजकीय रंगमंचापर्यंत ही अवहेलना स्त्रियांच्या वाटेला येते आहे. ज्या भावनिक manipulation वर या सगळ्याचा तोल सावरून आहे, त्यातल्या manipulation  ला मराठीत चपखल शब्दही सहज मिळत नाही. mansplaning, gaslighting  अशा एकाच वेळी व्यापक आणि गुंतागुंतीच्या संकल्पनांचे अजून मराठीच्या भाषाशास्त्राच्या शाखेने नेमके संहितीकरण केलेले दिसून येत नाही. समाजात विविध पातळ्यांवर चर्चा होण्यासाठी, खऱ्या बदलाची सूत्रं गोवली जाण्यासाठी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अशा संकल्पना अस्तित्वात आहेत, याची प्राथमिक माहिती तर असणे आवश्यक आहे. आपण जे अनुभवतो आहोत, तो आपल्या एकटीचा अनुभव नाही; तर जगभरात अनेक स्त्रियांना येणारा हा अनुभव आहे, त्याला नाव आहे, त्या अनुभवांच्या विचारपूर्वक विभागण्या (categories)  केल्या आहेत, मला येणाऱ्या अनुभवांचा कुठे तरी शिस्तशीर अभ्यास होतो आहे- ही माहिती खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी आहे. स्वत:च्या अनुभव-विश्वाची अशा प्रकारे दखल घेतली जाणे आणि आपले विचार वैध ठरवले जाणे (validate) अतिशय समाधानकारक आहे. व्यक्तीचा स्व बळकट होण्यासाठी, आतून स्वत:बद्दल विश्वास वाटण्यासाठी या सगळ्या अनुभवांची पद्धतशीर विभागणी होणे याचे खूप मोठे योगदान आहे. आणि हे काम सामाजिक व भाषिक अशा दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी व्हायला हवे आहे. आजच्या काळाची ती निकड आहे.    

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात