डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

भारतात मीडिया, सिनेमे, जाहिराती या सगळ्यांतून विनोद म्हणून काय काय खपवले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात गर्भवती स्त्रियांसंदर्भात आक्षेपार्ह ‘विनोद’ केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठलेली आपल्याला आठवत असेल. त्याच्या कार्यक्रमातील इतर सर्व सहभागी कलाकारांनी याबद्दल खंत व्यक्त केली, भारती नावाच्या कलाकाराने कपिलच्या वतीने, तिच्या बाजूने माफीही मागितली; मात्र कपिल शर्माने यावर शेवटपर्यंत मुजोर मौन बाळगले. कुणी म्हणेल, कपिल शर्माच्या वागण्याकडे इतके लक्ष कशाला द्यावे? तर, त्याचा प्रेक्षकवर्ग तुफान मोठा आहे, हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या 2019 च्या काही भागांमध्ये अमिताभ बच्चनच्या तोंडीदेखील अशाच विनोदांची पखरण दिसते.  

‘मार्क ट्वेन प्राइज फॉर अमेरिकन ह्युमर’ हा अतिशय सन्मानाचा किताब दर वर्षी अमेरिकेतल्या एका कॉमेडियनला/विनोदी कलाकाराला दिला जातो. टीना फे हिला- जिने अभिनय आणि विनोद या दोन्ही क्षेत्रांत अनेक काळ चौफेर कामगिरी केली, तिला- 2010 या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार प्रदान करतेवेळी जो कार्यक्रम झाला, त्यामध्ये टीना कशी हा पुरस्कार मिळवणारी सर्वांत तरुण व्यक्ती आहे आणि एकूणात तिसरीच स्त्री आहे, याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. 

पुरस्कार स्वीकारताना टीना म्हणते- ‘‘हा पुरस्कार मिळवणारी मी तिसरीच स्त्री आहे, हे मलाही विशेष वाटते आहे. मात्र माझी मनापासून अशी इच्छा आहे की, स्त्रियांच्या यशाचा आलेख इतका चढता राहावा की, कोणती स्त्री कशात कोणत्या नंबरवर आहे, हे आपल्याला मोजताच येऊ नये आणि तसं मोजण्याची आपल्यावर वेळही येऊ नये.’’ या मतातून वास्तव किती ठळकपणे आपल्या डोळ्यांसमोर टीना उभं करते आहे! आज दहा वर्षांनंतर परिस्थितीत सूक्ष्म बदल झालेले दिसतात, मात्र स्त्रियांबद्दलचे विनोद आणि स्त्रियांची विनोदबुद्धी हे कायम चर्चेचे विषय बनून राहिले आहेत. अमेझॉन प्राईमवर ‘द मार्व्हलस मिसेस मेझल’ नावाच्या सिरियलने गेल्या दोनतीन वर्षांत धुमाकूळ उडवून दिला. 

अमेरिकेत साठीच्या दशकात विवाहित ज्यू तरुणीला विनोदी कलाकार/स्टँडअप कॉमेडियन बनताना काय अनुभव येतात आणि त्यांना ती कशी सामोरी जाते, याचं झकास चित्रण या मालिकेत पाहायला मिळतं. साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत कशी परिस्थिती असेल, याचा अभ्यास करून अंदाज बांधत उभी राहिलेली गोष्ट आणि आज साठ वर्षांनंतर भारतातल्या विनोदी स्त्री कलाकारांची स्थिती यात कमालीचे साम्य आहे. एकूणच, स्त्रियांना विनोदबुद्धी कमी असते किंवा नसतेच, हे गृहीतक जगभर जोपासलेले आहे. खरंच स्त्रिया कमी विनोदी असतात का, त्यांना विनोद कळत नाहीत का, पुरुषांची विनोदबुद्धी खरंच सरस असते का- या सगळ्यांचा अनेक संशोधकांनी अभ्यासही केला आहे. त्यांना कोणते निष्कर्ष मिळाले, आणि कसे मिळाले हेही आपण या लेखात पाहणार आहोत. मात्र, त्याआधी स्त्रियांबद्दल जे विनोद केले जातात, त्याविषयी आपण विचार करणार आहोत. याचं कारण म्हणजे, पुरुष आणि स्त्रिया या दोघांची स्वत: विनोद निर्माण करण्याची जी क्षमता आहे, ती त्यांना कोणत्या प्रकारचे विनोद संस्कारक्षम वयात ऐकायला-पाहायला मिळतात यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. 

स्त्रियांवर केले जाणारे विनोद हे अनेकदा विनोद आणि कॅज्युअल सेक्सिझम- म्हणजे लिंगभेदावर आधारित केलेल्या टिप्पण्या यांच्या धूसर रेषेवर असतात. त्याचबरोबर स्त्रियांबद्दल पुरुषप्रधान समाजात बघायला मिळणारी घृणा (misogyny - शब्दश: स्त्रियांप्रति द्वेष)सुद्धा विनोदांमध्ये दिसते. अनेकदा या विनोदांचा तोल बाष्कळ किंवा कधी सरळ स्त्रियांचा अपमान होईल, असा कललेला दिसतो. अर्थात ही सीमारेषा धूसर असल्यामुळे, कशाला मनमोकळी दाद द्यावी आणि कुठे अपमान वाटून घ्यावा, हे याच समाजात जन्मलेल्या स्त्रियांनाही ठरवणे कठीण होऊन जाते. एक गोष्ट मात्र निश्चित की- कुटुंबातले सदस्य, ऑफिसमधले सहकारी ज्या ‘विनोदावर’ खळखळून हसताहेत; तेव्हा मनाला ठेच लागल्याची, स्वला शह बसल्याची भावना बहुतेकींनी अनुभवली आहे. याउपर ‘इतका साधा विनोद कळत नाही का?, ‘तुझ्यावर जोक न करायला तुझ्यात काय स्पेशल आहे?’, ‘हे सगळं खिलाडू वृत्तीनं/ स्पोर्टिंग स्पिरिटनं घ्यायला शिक’, ‘हा काय जोक आहे? इतकं काय मनाला लावून घेतेस?’ अशा प्रकारे अपमानाची खिल्ली उडवली जाण्यालाही सामोरे जावे लागलेल्या पुष्कळ स्त्रियांचा अनुभव आहे. 

म्हणून या विनोदांकडेही बारकाईने पाहायला हवं. बायकांच्या संदर्भातले विनोद वेगवेगळ्या प्रकारे विभागता येतात. यातला एक प्रमुख प्रकार म्हणजे- स्त्रियांच्या शारीरिक ठेवणीवरून, हालचालींवरून केलेले विनोद. यामधील अनेक विनोद स्त्रियांच्या लठ्ठपणाबद्दल असतात; तर दुसरीकडे त्यांच्या कुरूप असण्याकडे, आकर्षक नसण्याकडे लक्ष वेधून घेणारे (यात पुन्हा चष्मा असणे, रंग उजळ नसणे, दात पुढे असणे या आणि इतर अनेक टिप्पण्या असतात- ज्यामुळे शरीराबरोबर शरमेची भावना जोडली जावी, अशा प्रकारचे संदर्भ बघायला मिळतात.) अनेक विनोद पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या वागण्याच्या पद्धतीबद्दल विनोद करताना काही ठरावीक ठोकताळे हमखास वापरले जातात. जसे की- बायका बडबड्या असतात, नवऱ्याच्या पैशांतून स्वतःसाठी खरेदीचे बहाणे सतत शोधणाऱ्या असतात; तर अनेकदा त्यांचे वागणे वेंधळेपणाचे, निरर्थक कृतींचे असते- असे दाखवून दिले जाणारे विनोदही बघायला मिळतात. त्याचबरोबर स्त्रियांच्या सासर-माहेरच्या नात्याच्या गुंत्यातून विनोदाला भरपूर ‘खाद्य’ मिळाले आहे. जसे की- माहेरच्या आलतूफालतू माणसांबद्दलही बायकांना भयंकर अभिमान असतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारे नवऱ्याच्या खिशाला परवडणारी किंवा न परवडणारी मदत त्यांना आपल्या माहेरच्या लोकांसाठी करायची असते... इत्यादी. 

अर्थात यातले काही संदर्भ भारतासाठी, महाराष्ट्रासाठी कायम वापरले जाणारे असले तरी जगभरातल्या विनोदांचा अभ्यास केल्यावर बायकांबद्दलच्या विनोदांमध्ये काही समान धागेही आढळून येतात. यातला एक प्रमुख विचार म्हणजे- बायका मुळातच बिनडोक असतात, नवऱ्यावर सतत वचक ठेवू इच्छिणाऱ्या असतात, वृत्तीने संशयी असतात. पुरुषांवर केल्या जाणाऱ्या विनोदांचा असा विचार  केल्यावर इतकी नेमकी आणि मोठी यादी तर नाहीच तयार करता येत. शिवाय त्यातल्या त्यात जे विषय पुनःपुन्हा दिसतात, ते म्हणजे- बाहेरून दारू पिऊन आल्यावर बायकोला कळणार नाही असे वागणे किंवा एकापेक्षा अधिक स्त्रियांबरोबर असणारे संबंध मिरवणे- हे आणि असे कोणतेही विषय स्त्रियांना विनोदाचा विषय बनवून केले जात नाहीत. (तसे ते केले जावेत, असं म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही.) मात्र या फरकाची नोंद घ्यायला हवी. 

स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून असे विनोद केले, तर संस्कृतीच्या रक्षणाबाबतच्या अर्थहीन चर्चेत किती तास खर्च होतील, याचा विचार लगेचच मनात येतो. या सगळ्यामागे विनोद करणाऱ्या व्यक्तीची स्त्रीला दुखावण्याची इच्छा असते असं नाही. मात्र, विनोदाच्या आडून स्त्रियांची अपमानास्पदरीत्या खिल्ली उडवली जात आहे, त्यांना कायम दुय्यम लेखलं जात आहे, हे अनेकांच्या लक्षात येत नाही, हे खरं आहे. आपलं वागणं misogynistic आहे, हे लक्षात तरी येत नाही किंवा लक्षात आले तरी फारसा फरक पडत नाही. क्वचित असं होतं आहे हे लक्षात येऊनही पुरुषांचे असे वागणे खपवून घेतले जाते, याचीही सगळ्यांना माहिती असते. नुसते खपवून घेतले जाते असे नाही, तर अनेकदा प्रोत्साहनही दिले जाते. पुरुषांनी विनोद करण्याला प्रोत्साहन देण्याच्या मुद्याला अनेक पैलू आहेत. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये जोडीदार निवडत असताना विनोद करू शकणारा, विनोदाने आपल्याला हसवू शकणारा हे निकष मुली अनेकदा महत्त्वाचे मानतात. 

अनेक संस्कृत्यांमध्ये स्त्रीवर छाप पाडण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे चतुर विनोद करून तिला हसवणे, असे मानले जाते. यामागे एक निश्चित धारणा अशी आहे की- उत्तम विनोद करू शकणे, शाब्दिक कोटी करू शकणे, हे एका प्रकारे बुद्धिमत्तेचे लक्षण मानले जाते. मानसशास्त्राच्या अनेक अभ्यासांमधून हे खरे असल्याचेही प्रस्थापित झाले आहे. इथेच स्त्री-पुरुषांमधल्या विनोदबुद्धीबद्दल जे समज आहेत, त्याचा गाभा आहे. स्त्रीने सुंदर असावे आणि पुरुषाने हुशार असावे- हे जे गृहीतक शेकडो वर्षे आपण उराशी बाळगले आहे, त्याचा परिपाक इतरही अनेक गोष्टींत दिसतो. उदाहरणार्थ- स्वत:चा ‘शहाणपणा’ मुलींनी पुढे-पुढे करून दाखवू नये, मुलग्यांसाठी मात्र त्याच वागण्या-बोलण्याला आपण ‘आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरा जाणारा’ असं म्हणतो. जिथे जोडीदारापेक्षा बुद्धीने दुय्यम असणे हेच स्त्रीसाठी वैशिष्ट्य मानले जाते, तिथे ज्या विनोदांमधून ही बुद्धी झळकते त्यापासून मुलींना लहानपणापासून परावृत्त केले जाते, यात काहीच विशेष नाही. या संदर्भातले जे अभ्यास झाले, त्यामध्ये humour production ability- विनोद निर्माण करण्याची क्षमता तपासून पाहणारे अनेक अभ्यास आहेत. अशा अभ्यासांसाठी सहभागी स्त्री-पुरुषांना व्यंग्यचित्रे दिली जातात आणि त्याला विनोदी कॅप्शन लिहून दाखवायला सांगितले जाते. नंतर परीक्षकांना स्त्री/पुरुष कोणी काय लिहिले आहे हे न सांगता, त्यातल्या विनोदाचे परीक्षण केले जाते. 

यात असे लक्षात येते की, जवळपास 60 टक्के पुरुष सर्वसाधारण सहभागी स्त्रीपेक्षा चांगली कामगिरी करतात. म्हणजे, बायकांना खरंच कमी असते की विनोदबुद्धी- यावर शिक्कामोर्तब झालं का? तर, इतक्या लवकर आणि घाईने याकडे पाहता येणार नाही. इंग्रजीत असं म्हणतात ना की, The devil is in the detail! बारकाईने पाहिलं तरच यातली मेख समजेल, तशी काहीशी इथे गत आहे. अनेकदा या अभ्यासामध्ये व्यंग्यचित्र मिळाल्यावर त्यावर विचारही न करता, अनेक मुली-स्त्रिया संयोजकांना असं म्हणतात की- ‘मी हे कसं करणार? I am not funny at all.’ तर दुसरीकडे पुरुष सहभागी बऱ्याचदा एकाच व्यंग्यचित्राला दोन कॅप्शन लिहून देतात. याशिवाय, विनोदनिर्मितीसाठी पुरुष सेक्स, अश्लील भाषा याचा अगदी सहज वापर करताना दिसतात. अनेकदा तर विनोदी टिप्पणीसाठी असे संदर्भ पुरुषांना गरजेचेही वाटतात. 

याउलट, स्त्रिया शक्यतो ‘सभ्य’ समजल्या जाणाऱ्या भाषेत कॅप्शन लिहितात. हे प्रयोग विविध वयोगटांतल्या स्त्री-पुरुषांवर मोठ्या संख्येने केले गेले आहेत. यातून केवळ प्रयोगाबद्दलच नाही, तर एकूण समाजातल्या परिस्थितीविषयीही भाष्य करता येते. असे निश्चित म्हणता येते की, संवादात विनोदी विधान करण्याचा प्रयत्न स्त्रीच्या तुलनेत पुरुष किती तरी जास्त वेळा करत असतो. त्यामुळे त्यातली काही विधानं खरंच विनोदी असण्याची संभाव्यताच मुळात खूप जास्त आहे. जगातील सर्व पुरुष सर्व स्त्रियांपेक्षा जास्त विनोदबुद्धी असणारे निश्चित नाहीत. मात्र, तसे चित्र निर्माण झाले आहे, हे खरे. अर्थात, वरील अभ्यासाचा निष्कर्ष जास्त पुरुषांची विनोदबुद्धी स्त्रियांच्या विनोदबुद्धीच्या मानाने सरस असते, असे दाखवते. 

मात्र या अभ्यासातून विनोदबुद्धीसंबंधीच्या निष्कर्षापेक्षा मुलींची आणि मुलग्यांची जडण-घडण कशी  होते, यावर जास्त नेमकेपणाने उजेड टाकला जातो. मुळातच विनोद करता येणे या छोट्या वाटणाऱ्या कृतीत इतर अनेक कृती दडलेल्या आहेत. स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगात पाऊल ठेवलेले असणे, इंटरेस्टिंग वाटाव्या अशा स्त्री-पुरुषांची मैत्री लाभणे, भाषेवर प्रभुत्व असणे, भाषा विनोदाच्या अंगाने फुलायला वाव मिळालेला असणे, विनोद निर्माण करण्यासाठी लहान वयात केलेल्या बारीक- सारीक प्रयत्नांचे कौतुक झालेले असणे, त्या-त्या वेळी योग्य प्रोत्साहन मिळालेले असणे, विनोदातून झळकणारी बुद्धिमत्ता आजूबाजूच्यांनी सहज स्वीकारणे- या सगळ्याचे मिश्रण विनोदातून प्रतिबिंबित होत असते. भारतात मीडिया, सिनेमे, जाहिराती या सगळ्यांतून विनोद म्हणून काय काय खपवले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. 

कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात गर्भवती स्त्रियांसंदर्भात आक्षेपार्ह ‘विनोद’ केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठलेली आपल्याला आठवत असेल. त्याच्या कार्यक्रमातील इतर सर्व सहभागी कलाकारांनी याबद्दल खंत व्यक्त केली, भारती नावाच्या कलाकाराने कपिलच्या वतीने, तिच्या बाजूने माफीही मागितली; मात्र कपिल शर्माने यावर शेवटपर्यंत मुजोर मौन बाळगले. कुणी म्हणेल, कपिल शर्माच्या वागण्याकडे इतके लक्ष कशाला द्यावे? तर, त्याचा प्रेक्षकवर्ग तुफान मोठा आहे, हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या 2019 च्या काही भागांमध्ये अमिताभ बच्चनच्या तोंडीदेखील अशाच विनोदांची पखरण दिसते. त्यात misogyny, casual sexism यांचे कोड्यात टाकणारे, पण ‘विनोदाची आनंदी झालर’ असणारे मिश्रण दिसते. समाजमाध्यमे, विशेषत: ट्वीटरवर उडालेला धुरोळा नेहमीप्रमाणे आपसूक खाली बसतोच. मात्र, ज्या स्त्रियांना या ‘विनोदी’, ‘खेळी-मेळीच्या’ क्षणांचे विषय व्हावे लागते- साक्षीदार व्हावे लागते- त्यांच्याकडे आलेले दुय्यमत्व, सल पुसून काढण्याची सामूहिक ताकद आपल्यात नाही, हे मात्र खरे! भारतातल्या स्टँड अप कॉमेडियनचा हा ग्रुप फोटो बघितला की, विनोदातून सहज येणारी आनंदी लहर काळवंडते. 

ताजा कलम - आक्षेपार्ह, sexist, misogynistic विनोद या विषयावर चर्चा घडवून आणत असताना, तशा विनोदांची उदाहरणे देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. जे पसरणे आणि पसरवणे हानीकारक आहे, त्याविषयीची चर्चा केवळ संदर्भांमधून उलगडायला हवी, अशा ठाम जाणीवेतून लेखाचा गाभा संदर्भ आणि गुंतागुंत समजून घेण्यावरच केंद्रित केला आहे. 
 

Tags: कपिल शर्मा अमिताभ बच्चन अपर्णा दिक्षित विनोद misogynistic language jokes on women kapil sharma jokes kbc amitabh bachhan jokes misogynistic jokes sexist jokes weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात