Diwali_4 अपना बॉम्बे टॉकीज है ये
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

या वर्षीच्या मे महिन्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षं पूर्ण झाली. गेलं वर्षभर त्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे होत होते. बॉलीवूड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीने आजच्या चार दिग्दर्शकांना घेऊन ‘बॉम्बे टॉकीज’ हा चार लघुकथांचा सिनेमा सादर केला. या चारही कथांना सिनेमाची पार्श्वभूमी आहे. गुणवत्तेमध्ये वर-खाली असले तरी हे सिनेमे पाहून हिंदी सिनेमा वयात आलाय असं निश्चितपणे म्हणता येईल. करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांच्या ‘बॉम्बे टॉकीज’विषयी-

अक्कड बक्कड बम्बे बो अस्सी नब्बे पूरे सौ सौ सौ बरस का हुआ ये खिलाडी न बुढ्ढा हुआ... भारतीय चित्रपटसृष्टीला या गीताने सलाम करून ‘बॉम्बे टॉकीज’ हा सिनेमा सुरू होतो. म्हटलं तर चार छोट्या छोट्या गोष्टी मिळून तयार झालेला हा एक सिनेमा. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी सादर केलेला. पण तरीही चारही गोष्टींमध्ये एक दुवा समान आहे. सिनेमा. 3 मे 1913 या दिवशी दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सिनेमा नावाच्या एका अनोख्या दुनियेची ओळख भारतीयांना झाली. आजही या दुनियेचं गारुड कमी झालेलं नाही. किंबहुना, विविधांगांनी ते आपल्या मनावर अधिकाधिक स्वार होतंय. या वर्षी शंभर वर्षांच्या या तरुण खेळाडूचा सन्मान करायचा म्हणून व्हायकॉम 18 आणि आशिश दुआ यांनी एका सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं. करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांचा मिळून एक सिनेमा. या दिग्दर्शकांची निवडही खास वाटते. दोन अगदी मुख्य प्रवाहातले दिग्दर्शक. करण जोहर आणि झोया अख्तर. पण त्यातही पहिल्याचा सिनेमा कचकड्याचा, फील गुड सदरात मोडणारा. 

व्यावसायिक सिनेमांची सगळी चौकट मानणारा. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना आणि माय नेम इज खान हे करणचे सिनेमे पाहिले तर त्याचा चकचकीतपणा पहिल्यांदा नजरेत भरतो. गोष्ट सांगण्याची त्याची हातोटी आपल्याला भावते खरी पण सिनेमा संपताक्षणी आपण त्यातून बाहेर पडतो. तो सिनेमा आपल्याबरोबर राहत नाही. झोया अख्तरचं तसं होत नाही. लक बाय चान्स असो किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा, या दोन्ही सिनेमांमध्ये तिने आपल्या भोवतालचंच जग मांडलंय, पण त्यातही तिची संवेदनशीलता भावणारी आहे. लक बाय चान्स या सिनेमाचा शेवट त्यातल्या नायिकेवर होतो, तिच्या निर्णयावर होतो हे विसरता येत नाही. त्यामुळे मुख्य प्रवाहातले व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून हे दोघे ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये असले, तरी त्यांच्या सेन्सिबिलिटीजमध्ये खूप अंतर आहे.  

उरलेले दोघे आहेत दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप. मुख्य प्रवाहातलेच. पण अजिबात व्यावसायिक नाहीत. दिबाकर बॅनर्जीच्या या आधीच्या सिनेमांवर एक नजर टाकून पहा. खोसला का घोसला, ओये लकी लकी ओये, लव्ह सेक्स और धोका आणि शांघाय. कुणी मोठे स्टार्स नाहीत पण म्हणून हे सिनेमे मुख्य प्रवाहातले नाहीत असं नाही म्हणता येणार. गोष्ट सांगण्याची या दिग्दर्शकाची पद्धत मात्र अगदी वेगळी. आणि अनुराग कश्यपविषयी काय सांगावं? ‘ब्लॅक फ्रायडे’ हा त्याचा पहिला सिनेमा. 2004 साली आलेला हा सिनेमा मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांवर होता. त्याचं लेखनही अनुराग कश्यपनेच केलं होतं. त्या वर्षीच्या एका चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा पाहिल्यानंतर ताबडतोब या नवीन दिग्दर्शकाविषयी उत्कंठा निर्माण झाली होती. नो स्मोकिंग हा काही फार बऱ्या सिनेमांमधला एक नसला तरी तिथेही अनुराग कश्यपची शैली वेगळी आहे एवढं निश्चितच जाणवत होतं. जर्मन दिग्दर्शक फत्तेह अकीन याचा मॅड फिल्म्स बनवण्याचा प्रभावही लक्षात येत होता. नंतरचे ‘देव डी’ आणि ‘गुलाल’ हे सिनेमेही लक्षणीय होते. मात्र अनुराग कश्यप खरा अवतरला ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’ने. दोन भागांतल्या या साडेपाच तासांच्या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपट महोत्सवांमधून खळबळ उडवून दिली. 

दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप हे म्हटलं तर एका स्कूलचे पण तरीही खूप वेगळे. तर, असे चार दिग्दर्शक एकत्र आणण्याची कल्पनाच इंटरेस्टिंग म्हणायला हवी. आणि सिनेमाला ‘बॉम्बे टॉकीज’ हे नाव देण्याचीही. 1934 साली मुंबईतल्या मालाडमध्ये वसलेल्या बॉम्बे टॉकीज नावाच्या या स्टुडिआने 102 सिनेमांची निर्मिती केलेली आहे. हिमांशू राय आणि देविका राणी यांचा हा स्टुडिओ. (कंपनीचे फायनॅन्सर होते राजनारायण दुबे. भारतातली ही पहिली पब्लिक लिमिटेड फिल्म कंपनी). अछूत कन्यासारखे त्या वेळी वादग्रस्त असलेल्या विषयांवरचे सिनेमे बॉम्बे टॉकीजने केले. त्या आधी जवानी की हवा नावाचा देविका राणी नायिका  असलेला सिनेमाही याच बॅनरखाली आला होता. थोडक्यात, शंभर वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीला सलाम करायचा तर त्या सिनेमाला ‘बॉम्बे टॉकीज’ हे नाव सर्वार्थाने योग्य ठरतं. चारही सिनेमांना संगीत दिलंय अमित त्रिवेदी या संगीतकाराने तर छायाचित्रण केलंय राजीव रवी यांनी. सिनेमे वेगळे असले तरी छायाचित्रकार एकच असल्याने ‘बॉम्बे टॉकीज’ला एकसंधपणा निश्चितच आलाय. 

यातली पहिली कथा आहे करण जोहरची. नाव आहे ‘अजीब दास्तां है ये’. त्या अर्थाने या चित्रपटाला सिनेमाची पार्श्वभूमी नाही. यातली नायिका एका सिनेमॅगझिनमध्ये काम करते एवढंच. पण हिंदी सिनेमातल्या गाण्यांची उथली भूमिका महत्त्वाची आहे. नायिकेचा, गायत्रीचा (राणी मुखर्जी) नवरा देव (रणदीप हुडा) एका न्यूज चॅनेलमध्ये मोठा ॲन्कर आहे. वरकरणी सुखी दिसणारं हे जोडपं. श्रीमंत, सुखवस्तू. पण पलंगाच्या दोन टोकांना एकमेकांकडे पाठ करून झोपणारं. सकाळी उठून आपापल्या कामाला लागणारं. अविनाश (सकीब सलीम) हा गायत्रीच्या ऑफिसमध्ये लागलेला इटर्न. आपण समलिंगी असल्याचं वडिलांना सहन होत नाही म्हणून भांडून घरातून बाहेर पडलेला तरुण, आगाऊ, रागीट मुलगा. या तिघांची ही गोष्ट. जोडीला अविनाशच्या यायच्या जायच्या रस्त्यावरच्या पुलावर पैशांसाठी गाणारी एक लहान मुलगी. ‘अजीब दास्तां है ये’ किंवा ‘लग जा गले..’ या सारखी जुनी गाणी ती गाते. गायत्रीच्या घरी अविनाश आणि देवची भेट होते आणि अविनाशला देवचं आकर्षण वाटतं. त्याच्या आगाऊ स्वभावानुसार तो देवशी लगट करतो. मुस्काटात खातो आणि स्वत:शी झगडणारा देव एका क्षणी त्याचं आवेगाने चुंबनही घेतो. या तीनही व्यक्तिरेखांना आपापली होणारी ओळख हा या कथेचा गाभा. करण जोहरच्या नेहमीच्या साच्यापेक्षा ही गोष्ट अर्थातच वेगळी आहे. किंबहुना, अधिक गंभीर आहे. त्यातल्या त्यात वास्तवाकडे जाण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे असं जरी म्हणता आलं नाही तरी प्रयत्न प्रामाणिक आहे एवढं निश्चित. 

यातल्या अविनाशच्या वागण्यात खूप साऱ्या विसंगती आहेत. तो रागीट आहे खरं, पण आपल्या बॉस कम मैत्रिणीला तो सगळ्यांसमोर ‘युवर हजबंड किस्ड मी’ असं का सांगेल? कामाच्या पहिल्याच दिवशी आपल्या बॉसशी फ्लर्ट का करेल? तिला ‘गले में मंगलसूत्र और आँख में कामसूत्र?’ असं ओळख झालेली नसताना का म्हणेल? त्यामुळे काही वेळेला करण जोहर उतर दिग्दर्शकांच्या तुलनेत आपण कुठे कमी पडता नये यासाठी नको एवढा प्रयत्न करतोय असं वाटतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न प्रामाणिक असला तरी. 

दुसरी आणि चारही कथांमधली सर्वांत सरस कथा आहे ‘स्टार’. दिग्दर्शक आहे दिबाकर बॅनर्जी. सत्यजित रे यांनी 1963 साली लिहिलेल्या (आणि 1984 साली इंग्लिशमध्ये स्वत:च अनुवाद केलेल्या) ‘पाटोल बाबू फिल्मस्टार’ या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. रेंचा बंगाली पाटोल बाबू इथे मराठी गिरणी कामगार झालाय. छोट्या छोट्या नाटकांमधून काम केलेला हा कलावंत. मात्र आता बेकार आहे. बायको नोकरी करतेय. चाळीतल्या एका खोलीत कसाबसा संसार चाललाय. एक दिवस बायकोने नोकरीसाठी पाठवलेल्या पत्त्यावर हा जातो, नोकरी मिळत नाही पण परतत असताना रस्त्यावर शूटिंग चाललंय म्हणून पाहायला थांबतो आणि एक छोटीशी भूमिका त्याला मिळते. हीरोला धक्का मारून पुढे जायचं. बस्स, इतकाच रोल. पण नाटकातली सवय म्हणून हा आपल्या भूमिकेचा विचार वगैरे करू लागतो.

आपल्या हातात वर्तमानपत्र असेल तर? मग ते कुठलं असायला हवं? लोकसत्ता किंवा सामना, इंग्लिश नको. हीरोचा धक्का बसल्यावर आपले भाव कसे हवेत? हे प्रश्न तो स्वत:लाच विचारतो आणि त्याची उत्तर देऊ लागतो. त्याला आपले दिवंगत वडील भेटतात. ते त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या ‘नटसम्राटा’च्या गोष्टी सांगतात. तुझ्यात काही अर्थच नाही असंही म्हणतात. नायक ती छोटीशी भूमिका करतो आणि मिळणारे पैसेही न घेता घराच्या दिशेने धावत सुटतो. आज मुलीला सांगायला त्याच्याकडे खरीखुरी गोष्ट असते. कॅमेरा नवाजउद्दीन सिद्दिकीच्या चेहऱ्यावरून हळूहळू मागे जातो. चाळीतल्या खिडक्या दिसू लागतात. आणि त्यातल्याच एका खिडकीत मुलीला उत्साहाने गोष्ट सांगणारा स्टार! 

रेंच्या कथेचा शेवटही असाच आहे. इथले पाटोल बाबू पन्नाशीचे गृहस्थ आहेत. एकेकाळी स्टेजवर खूप भूमिका केलेले. सिनेमातल्या एका छोट्या भूमिकेसाठी ते जातात, आपला डायलॉग काय आहे विचारतात तेव्हा साहाय्यक त्यांना एका कागदावर लिहून देतो, ‘ओह!’ ते नाराज होतात. एकच शब्द. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, हा एक शब्द कितीतरी विविध प्रकारांनी उच्चारता येतो, त्यात वेगवेगळ्या भावना आणता येतात. रागाचा ‘ओह’ निराळा आणि आश्चर्याचा वेगळा. त्यांचा शॉट पहिल्याच फटक्यात ओके होतो. त्यानंतर रे लिहितात, ‘पाटोल बाबूंनी आपलं वुलन  जॅकेट काढलं आणि सुटकेचा एक नि:श्वास सोडला. समाधानाच्या भावनेने त्यांचं पूर्ण मन व्यापून गेलं. त्यांनी त्यांचं काम नीट केलं होतं. उतकी वर्षं जगण्यासाठी करत असलेल्या झगड्याने त्यांचं मन निबर झालेलं नव्हतं. गोगोन पकराशींना त्यांच्या अभिनयामुळे बरं वाटलं असतं. त्या एका दृष्यात त्यांनी किती कल्पनाशक्ती आणि मेहनत घातली होती. या लोकांना त्याची जाणीव तरी होती का? बहुधा नाही. ते रस्त्यावरच्या लोकांपैकी एखाद्याला पकडत असतील, जे काम करायचं ते करायला लावत असतील, त्यांच्या कामाचे पैसे देत असतील आणि त्यांना विसरून जात असतील. पैसे देत असतील, होय, पण किती? दहा, पंधरा, पंचवीस रुपये? त्यांना या पैशाची त्या क्षणी गरज होती हे खरं, पण हे छोटंसं काम इतक्या नेमकेपणाने आणि मन लावून केल्याचं जे तीव्र समाधान होतं त्याच्यासमोर वीस रुपयांना काय किंमत होती? 

दहा मिनिटांनी नरेश दत्त पानाच्या दुकानाजवळ पाटोल बाबूंना शोधत आला तेव्हा ते तिकडे नव्हते. ‘असं कसं? या माणसाला पैसेही दिले नाहीत. विचित्रच दिसतोय,’ तो म्हणाला. दिग्दर्शक ओरडत होता, ‘सूर्य ढगांबाहेर आला आलाय, सायलेन्स सायलेन्स. नरेश, लवकर ये आणि या लोकांना मार्गातून दूर कर’...’ मुळात कथाच ताकदवान असेल तर सिनेमा चांगला होणारच. त्यातून दिबाकर बॅनर्जीसारख्या दिग्दर्शकाने त्यातले छोटे छोटे क्षण खूप उत्कट केले आहेत. ‘स्टार’ची गोष्ट संपते तेव्हा आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या असतात. मात्र, या बासुंदीत मिठाचा खडा पडला आहे तो नायकाच्या मराठी संवादांचा. ते इतके अमराठी आहेत की जगातला कोणताही मराठी माणूस असं बोलणार नाही हा विचार सारखा मनात येत राहतो. नवाजुद्दीनच्या अप्रतीम अभिनयाला सफाईदार मराठी उच्चारांचीही जोड मिळाली असती तर या सिनेमात दोष काढायला जागाच शिल्लक राहिली नसती. 

तिसरी कथा आहे झोया अख्तरची. नाव आहे ‘शीला की जवानी’. 12 वर्षांचा मुलगा वडील सांगतात म्हणून फूटबॉल खेळतो खरा, पण त्याचं खरं मन असतं ते नाचात. कटरिना कैफचा ‘शीला की जवानी’वरचा नाच पाहताना तो हरखून जातो. कटरिनाची मुलाखत टीव्हीवर ऐकताना तिचा शब्दन्‌शब्द कानात साठवतो आणि ती परी बनून त्याला भेटते आणि सांगते, ‘प्रत्येकाने आपलं स्वत:चं स्वप्न पाहायचं असतं, ते प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न करायचे असतात’ तेव्हा आपल्याला मोठं होऊन काय करायचं आहे ते पक्कं ठरवतो. एरवी हिंदी सिनेमातल्या गाण्यांवर नाचणाऱ्या लहान मुलांना टीव्हीच्या पडद्यावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहताना किळस येते. ती मुलं आणि त्यांचे पालक दयनीय वाटतात. या सिनेमात शेवटी हा मुलगा मुलीचे कपडे घालून ‘माय नेम इज शीला, शीला की जवानी’ या गाण्यावर नाचतो तेव्हा मात्र तो बेभान होऊन आपलं स्वप्न जगतोय असं वाटतं. दिग्दर्शिकेचं यश हे की तिने त्यात कुठेही बीभत्सपणा येऊ दिलेला नाही. सिनेमाचं जग म्हणजे लहानांसाठी कदाचित परीकथा आहेत, पडद्यावरच्या व्यक्तिरेखांचा या लहानग्यांवर काही वेळा खोलवर परिणाम होत असतो असंही तिला सुचवायचं असेल का? आपण आपल्यासाठी जो काही शोध किंवा बोध घ्यायचा तो घ्यावा. 

चौथी आणि शेवटची कथा आहे अनुराग कश्यपची. ‘मुरब्बा’ हे कथेचं नाव. (दिबाकर बॅनर्जीच्या कथेनंतर या गोष्टीचा नंबर लागतो). उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावात राहणारा नायक. त्याचे आजारी वडील त्याला सांगतात, ‘माझी एक इच्छा आहे. माझे वडील युसूफसाहेबांचे फॅन होते. ते आजारी पडले तेव्हा त्यांनी मला एक मधाची बाटली दिली. म्हणाले मुंबईला जा आणि युसूफसाहेबांना या बाटलीत बोट बुडवून मध चाखायला सांग. तो मध घरी घेऊन ये. त्या बाटलीतला मध घेतल्यावरच मला बरं वाटेल. मी त्यांची इच्छा पूर्ण केली. मला अमिताभ बच्चन आवडतो. ही मुरंब्याची बरणी घेऊन जा. त्यातला अर्धा आवळा बच्चनसाहेबांना दे आणि अर्धा घरी घेऊन ये. तो खाल्ला की मला बरं वाटेल.’ मुलगा मुंबईला येतो. बच्चनसाहेबांच्या घरापर्यंत पोहोचतो. आणि मग सुरू होते त्याची घरात शिरायची धडपड. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ तेच. गेटवरच्या सुरक्षा रक्षकांना गयावया करून सांगायचं, त्यांची ड्युटी बदलली की नवीन येणाऱ्यांसमोर पुन्हा तीच आर्जवं करायची. दरम्यान मुंबई नगरीचा अनुभव घ्यायचा. रस्त्यावर हुबेहूब बच्चनसारखा दिसणारा एकजण. नाव सांगतो विजय. येणारे जाणारे टूरिस्ट्‌स त्याच्याबरोबर फोटो काढून घेतात आणि त्याला पैसे देतात. हीच त्याची कमाई. 

एक दिवस नायक टपरीवर बुरजी पाव खात असताना एक पुरुष बाजूला येऊन उभा राहतो आणि ओळखीचं हसतो. नायकाला सांगतो, अरे, मी तो विजय. दाढी मिशी लावून उभा असतो रस्त्यावर तो. क्षणभर प्रेक्षक म्हणून आपणही दचकतो. उपजीविकेसाठी बच्चन होणाऱ्या या विजयची मूळ ओळख महत्त्वाचीच नसते का? माणूस म्हणून तो कोण आहे, काय आहे याच्याशी कुणालाच देणंघेणं नसतं का? आपल्या अनेकांच्या आयुष्याची ही शोकांतिका असते का? पण गोष्ट या विजयची नाही. आपल्या नायकाला शेवटी दया येऊन सुरक्षा रक्षक घरात घेतात आणि चक्क साक्षात अमिताभ बच्चन त्याच्या बरणीतल्या आवळ्याचा अर्धा घास खातात. खुश झालेला नायक घरी निघतो. आणि ट्रेनमध्ये आपण कसे अमिताभ बच्चनना भेटलो हे सांगत असतानाच वरच्या बर्थवर ठेवलेली बरणी खाली पडते, तिचा चक्काचूर होतो आणि उरलेल्या अर्ध्या आवळ्यावरून कुणीतरी पाय देऊन जातं. गोष्ट इथे संपत नाही. वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी नायक लोणच्याची बरणी घेतो, त्यातलं लोणचं काढून टाकतो, ती धुतो, दुकानातून आवळ्याचा मुरब्बा घेतो, अर्धा आवळा खातो आणि घरी येतो. 

आजारी वडिलांना आवळा देतो तेव्हा ते म्हणतात, ‘बेटा, मी मुंबईला गेलो तेव्हा युसूफसाबकडून काही मी मधाच्या बाटलीत बोट बुडवून घेऊ शकलो नाही. मीच मग त्या मधात बोट बुडवून चाटलं आणि वडिलांना खोटंच सांगितलं. तुला एक गोष्ट सांगतो. लोणच्याच्या बरणीत कधी मुरंबा ठेवू नकोस. वास येतोच. मग, बरणी कधी फुटली? बच्चनसाहेबांना भेटायच्या आधी की नंतर?’ सिनेमा संपतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक बारीकसं स्मित असतं. आणि ते निघून जायच्या आधी पडद्यावर गाणं सुरू होतं - अपना बॉम्बे टॉकीज है ये. यात आजचे आघाडीचे सगळे स्टार्स सामील झालेले दिसतात. हे गाणं वाईट आहे पण ‘बॉम्बे टॉकीज’ने दिलेला अनुभव उतका छान वाटतो की त्या गाण्यातल्या स्टार्सकडे आपण कौतुकाने पाहात काही काळ थिएटरमध्ये घालवतो. 

होय, ‘बॉम्बे टॉकीज’चा अनुभव मला तरी खूप छान वाटला. हिंदी चित्रपटसृष्टी वयात येण्याची सुरुवात गेल्या काही वर्षांमध्ये झाली होती. नवनवीन दिग्दर्शक, नवनवीन प्रयोग, नवनवीन कथा अगदी व्यावसायिक सिनेमांमध्येही दिसून येत होत्या. रॉकस्टार किंवा त्या आधी वेक अप सिद्‌ किंवा उडान, कहानी अशा कितीतरी सिनेमांची उदाहरणं देता येतील. मात्र ‘बॉम्बे टॉकीज’चं वैशिष्ट्य हे की भारतीय चित्रपटसृष्टीला ट्रिब्यूट देताना या चारही दिग्दर्शकांनी कोणताही स्टँड घेतलेला नाही, कोणताही आविर्भाव आणलेला नाही. आपल्याला जे वाटलं ते आपल्या कुवतीनुसार, पूर्ण प्रामाणिकपणे मांडलं. यात ना काही संदेश होता ना खऱ्याखोट्याचा झगडा. सुष्ट विरुद्ध दुष्ट अशी लढाई नव्हती की गोडगोड प्रेमकथा नव्हती. अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांच्या गोष्टी होत्या. मुख्य प्रवाहातल्या, व्यावसायिक सिनेमात काही काळापूर्वीपर्यंत अभावानेच आढळणाऱ्या. चार दिग्दर्शक जर त्यांच्या सिनेमानंतर अशी सकारात्मक भावना मनात निर्माण करणार असतील तर प्रेक्षक म्हणून भारतीय सिनेमाच्या या शंभराव्या वर्षात आपल्याला आणखी काय हवं?

Tags: अनुराग कश्यप झोया अख्तर दिबाकर बॅनर्जी करण जोहर हिंदी सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षं सिनेमा बॉम्बे टॉकीज मीना कर्णिक अपना बॉम्बे टॉकीज है ये नवा सिनेमा meena karnik anurag kashyap zoya akhtar dibakar Banerjee Karan Johar hindi cinema bhartiya chitrpatshrustila shambhar varsh cinema bombay talkies apna bombay talkies hai ye Nava cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात