डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नवे संशोधक-समीक्षक अण्णा भाऊंना न्याय देतील...

त्यांनी लढणाऱ्या लोकांच्या कथा लिहिल्या. 1958 मध्ये लिहिलेल्या ‘माकडीचा माळ’मधून भटक्या-विमुक्ताचे जीवन पहिल्यांदाच चित्रित केले. त्याच वेळेस मराठीत ‘चक्र’, ‘माहिमची खाडी’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. मात्र अण्णा भाऊंवर फार मोठा अन्याय झाला आहे. मराठी कादंबरीच्या इतिहासाने त्यांना उपेक्षित ठेवले. इतरांचे जाऊ देत, परंतु कुसुमावती देशपांडे ह्या डाव्या विचारांच्या प्रभावाखाली वाढल्या; पण त्यांनीही ‘मराठी कादंबरी- पहिले शतक’ या इतिहासात अण्णा भाऊंची दखल घेतली नाही. वैजयंता, चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ ह्या त्यांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या आहेत.

 

प्रश्न - अण्णा भाऊ साठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. आपण अण्णा भाऊंच्या जडण-घडणीच्या आणि उमेदीच्या काळाचे साक्षीदार आहात. त्यामुळे मी असे विचारतो की, अण्णा भाऊ साठे यांचा राजकीय जीवनात, चळवळीत प्रवेश कसा झाला? त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?

- माझे आजोबा कॉम्रेड शंकर नारायण पगारे हे आईचे सख्ये मामा त्या काळात कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते. ज्या लेबर कॅम्पात अण्णा भाऊ वाढले, तिथे कम्युनिस्ट पक्षाचे स्टडी सर्कल होते. कॉ. के. एम. साळवी, कॉ. शंकर नारायण पगारे, कॉ.आर. बी. मोरे, कॉ. विश्राम गांगुर्डे, कॉ. तुकाराम सरतापे ही काही त्यांतली प्रमुख नावे आहेत.  या वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ आणि ‘कम्युनिस्ट’ असे दोनच राजकीय पक्ष प्रामुख्याने होते. त्या वेळी बाबासाहेबांचा संपूर्ण समाजावर प्रचंड प्रभाव असताना महार समाजातील अनेक कार्यकर्ते कम्युनिस्ट चळवळीत होतेे. कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते.

लेबर कॅम्पमधील इराण्याचे हॉटेल ‘लेबर रेस्टॉरंट’ म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. ह्या परिसराच्या बाजूलाच ‘एस्ट्रेला बॅटरीज’ नावाची कंपनी होती. तिच्या बाजूला झोपडपट्टीत अण्णा भाऊ राहत होते. त्या वेळेस झोपडपट्टीतील डासांवर अण्णा  भाऊंनी पोवाडा लिहिला आणि त्या हॉटेलसमोर बसलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना ऐकवला. सारे कार्यकर्ते तो पोवाडा ऐकून प्रभावित झाले. त्यांनी अण्णा भाऊंचे शब्दसामर्थ्य हेरले. कम्युनिस्टांचे कसे आहे एक टॅलेंट सापडले की, त्याला ते वृद्धिगंत करण्याचा प्रयत्न करतात. कॉम्रेड शंकर नारायण पगारे यांनीच अण्णा भाऊंना पार्टीमध्ये आणण्याचे काम केले आणि पार्टीला लोककलेच्या माध्यमातून मिळालेली साथ याचे खरे श्रेय कॉ. पगारे यांचेच आहे. त्यांना आंबेडकरी जलशाच्या सामर्थ्याचे भान होते. ते पार्टीचे ‘कार्ड होल्डर’ होते. कम्युनिस्ट चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल, तर आपणदेखील हातात ढोलकी-तुणतुणे घेतले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. लेबर कॅम्पात आंबेडकरी जलसे व्हायचे. मनोरंजनातून प्रबोधन हे आंबेडकरी जलशांचे उद्दिष्ट होते. त्यातून आंबेडकरी चळवळीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जात. आर. एच. अडांगळे, भीमराव कर्डक, दादासाहेब पगारे, केरूजी धेगडे, दीनानाथ भोसले या मंडळींचे जलसे मी पाहिलेले आहेत.

मी लाल बावट्याच्या चाळीत राहायचो. कॉ. पगारे यांनी अण्णा भाऊंना लिहिते करण्यासाठी, कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून भाडेकरू संघाच्या एका खोलीत सोय केली. (परळच्या दळवी बिल्डिंगमध्ये अण्णा भाऊंच्या कलापथकाचा कार्यक्रम झाला. तेथे कॉ.गंगाधर अधिकारी, कॉ.पी.सी.जोशी. कॉ.बी.टी.रणदिवे उपस्थित होते.) ती खोली ‘लाल बावट्याची खोली’ म्हणून प्रसिद्ध होती. तिथेच ‘प्रथम मायभूच्या चरणा’ हा गण अण्णा भाऊंनी लिहिला. एका लोककथेच्या आधारे- जी कथा बापू साठे यांनी अण्णा भाऊंना सांगितली होती, त्याआधारे- ‘अकलेची गोष्ट’ हा वग लिहिला. हा वग ऐकून कॉ. बी. टी. रणदिवे फारच प्रभावित झाले. अण्णा भाऊंचे सामर्थ्य पार्टीला जाणवले. अण्णा भाऊंना लिहिते ठेवण्याचे कार्य पार्टीने केले. त्याला कॉ. पगारे कारणीभूत ठरले.

प्रश्न - 1937-1945 या कालखंडाचा विचार केला, तर या काळात भारतीय पातळीवर मार्क्सवादी प्रभावातून लेखकांची एक फळी उभी राहिलेली दिसते. त्यांच्याशी अण्णा भाऊंचे काही नाते होते का?

- मी ज्या लाल बावट्याच्या चाळीत राहायचो, तिथे शंकर शैलेंद्र, बलराज साहनी, सरदार जाफरी, ए. के. हंगल अशा दिग्गज लोकांचे मुशायरे, सभा व्हायच्या. अण्णा भाऊंना ढोलकी-तुणतुण्याचा वारसा होता. ते काही पुस्तकं वाचून मार्क्सवादी झाले नाहीत. मार्क्सवाद आणि पंडित नेहरू यांच्या विचारप्रभावातून साहित्यात डाव्या विचाराची एक पिढी उदयाला आली. प्रगतिशील लेखक संघ निर्माण झाला.

सन 1944 मध्ये टिटवाळा येथे झालेल्या शेतकरी परिषदेत ‘लाल बावटा कलापथका’ची स्थापना झाली. सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे आणि कलापथक यांचे एक सांस्कृतिक नाते आहे. अमर शेख, अण्णा भाऊ आणि गव्हाणकर हे तीन शाहीर लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून एकत्र आले. त्या काळात मोरारजी देसार्इंनी तमाशावर बंदी घातली होती. त्या वेळी अण्णा भाऊंनी सादरीकरणाचा नवा फॉर्म शोधला. त्यांनी जाहीर केले, ‘तमाशावर बंदी आहे. आपण आज नवे काही सादर  करणार आहोत. आपण लोकनाट्य सादर करीत आहोत.’ अशा प्रकारे लोकनाट्य हा प्रकार उदयाला आला. त्यात शेतकरी आला, कामगार आला. अशा प्रकारे अण्णा भाऊंनी महाराष्ट्राला लोकनाट्याची देणगी दिली. अण्णा भाऊंचा संबंध इप्टाशी (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) आला. त्यात बलराज साहनी, कैफी आझमी, इस्मत चुगताई अशी महान मंडळी होती. इप्टाच्या माध्यमातून अण्णा भाऊंच्या ‘इनामदार’ या नाटकाचा प्रयोग 1958 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यात मुख्य भूमिका ए. के. हंगल यांनी केली.

प्रश्न - अण्णा भाऊंचा लेखनप्रपंच आणि त्यांच्या जीवनाची वाटचाल याबाबत काय सांगाल?

- अण्णा भाऊंची पहिली कथा ‘माझी दिवाळी’. मशाल या साप्ताहिकात 1949 मध्ये ती प्रसिद्ध झाली. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पोवाडे लिहिले. स्टालिनग्राडचा, पंजाबचा पोवाडा यात जातीय दंग्याचे वास्तव रेखाटले आहे. हिंदुत्ववादी कसे वर्तन करायचे, याचा उल्लेख यात आहे. इतरांना हिंदुत्ववादी कसे कमी लेखायचे, याचे वर्णन आहे. बंगालची हाक, अमळनेरचे हुतात्मे असे अनेक पोवाडे लिहिले. मुंबईवर अनेकांनी लिहिले; मात्र अण्णा भाऊंनी जी मुंबईची लावणी लिहिली, ते मुंबईचे खरे वर्णन आहे. मुंबईच्या लावणीवर त्या काळी बंदी आणली होती. लेबर कॅम्पात मी अण्णा भाऊंची अनेक वगनाट्ये पाहिली आहेत. सगळ्या चाली मला पाठ आहेत. माझी मैना, मुंबईची लावणी, जग बदल घालुनी घाव- अशा किती तरी. लोक काहीही चुकीचं सांगतात, तेव्हा कसे तरीच वाटते. ‘माझी मैना’चं रोमँटिक चित्र रंगवतात. वास्तविक बेळगाव, कारवार महाराष्ट्रात येऊ शकले नाही, याबद्दलची खंत त्यातून व्यक्त केली आहे. त्यांच्या गीतरचनाही फार सुंदर होत्या. ‘पानापानांत नाचे हा वारा । जिंदगी निघाली भरभरा’ यासारख्या. शिवाजीमहाराजांवरील पोवाड्यात काय वर्णन आहे शिवाजीमहाराजांचं!

त्यांनी लढणाऱ्या लोकांच्या कथा लिहिल्या. 1958 मध्ये लिहिलेल्या ‘माकडीचा माळ’मधून भटक्या-विमुक्ताचे जीवन पहिल्यांदाच चित्रित केले. त्याच वेळेस मराठीत ‘चक्र’, ‘माहिमची खाडी’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. मात्र अण्णा भाऊंवर फार मोठा अन्याय झाला आहे. मराठी कादंबरीच्या इतिहासाने त्यांना उपेक्षित ठेवले. इतरांचे जाऊ देत, परंतु कुसुमावती देशपांडे ह्या डाव्या विचारांच्या प्रभावाखाली वाढल्या; पण त्यांनीही ‘मराठी कादंबरी- पहिले शतक’ या इतिहासात अण्णा भाऊंची दखल घेतली नाही. वैजयंता, चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ ह्या त्यांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या आहेत.

अण्णा भाऊ हे त्यांचे अनुभवविश्व, परिसर, भाषा यांच्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. अजिबात तडजोड केली नाही. ते महाराष्ट्राची परंपरा वगैरे मानायचे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी परंपरेच्या चौकटीतील आदर्श स्वीकारले, जे आज आपण नाकारतो; त्या काळात त्यांनी ते स्वीकारले होते. त्यांची भाषा वारणेच्या परिसराची अस्सल गावरान मराठी होती. त्या परिसराशी अण्णा भाऊंनी इमान राखलं. त्यांनी आपल्या कथेतून जगप्रसिद्ध लेबर कॅम्प उभा केला. दलित साहित्याचं बीजारोपण केलं. नंतर त्याला गती देण्याचं काम बाबूराव बागुल, म. ना. वानखेडे, म. भि. चिटणीस या सर्वांनी केले. या प्रोसेसमध्ये मी होतो.

प्रश्न - त्या काळात 16 डिसेंबर 1956 ला दलित साहित्य संमेलनाच्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ते संमेलन संपन्न झाले का?

- हे संमेलन 1958 मध्ये संपन्न झाले. दलित लेखकांचे हे पहिले संमेलन होय. याचे श्रेय भाऊसाहेब अडसूळ, दिनेश लखमापूरकर यांना दिले पाहिजे. त्यांच्यासोबत अप्पासाहेब रणपिसे, चोखा कांबळे, शरद महातेकर, तळवटकर ही सर्व मंडळी होती. त्या काळात ‘प्रबुद्ध भारता’तून लोक लिहीत होते. पण ते फडके-खांडेकरी वळणांनी लिहीत होते. दि.2 मार्च 1958 रोजी या संमेलनाचे उद्‌घाटन आचार्य अत्रे करणार होते. परंतु ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाहीत, म्हणून वेळेवर अण्णा भाऊंना विनंती करण्यात आली. मोरबाग रोड, दादर येथे झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन अण्णा भाऊ साठे यांनी केले. याच उद्‌घाटकीय भाषणात ‘‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’’ असे उद्‌गार त्यांनी काढले होते. हे भाषण प्रबुद्ध भारत विशेषांकात प्रसिद्ध झाले होते. त्या वेळेस दा.ता. रूपवते संपादक होते. मला सांगायला अभिमान वाटतो की, ते भाषण मी शोधून काढले आणि ‘दलित साहित्य - एक अभ्यास’ या ग्रंथात समाविष्ट केले. नाही तर ते भाषण प्रबुद्ध भारतातच राहिले असते.

प्रश्न - अण्णा भाऊंची राजकीय भूमिका आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याबाबत तुम्ही काय सांगाल?

- कम्युनिस्ट पार्टीत राजकीय भूमिका घेणे, ठरवणे हे पॉलिट ब्युरोचे काम असते. अण्णा भाऊ कलावंत होते. कलावंत म्हणून त्यांची भूमिका व्यापक होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता. सर्वांनी एकत्र येण्याबद्दल बाबासाहेबांनी सांगितले होते. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, दादासाहेब गायकवाड, कॉ.डांगे, एस.एम.जोशी ही सर्व मंडळी होती. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्याचा फायदा झाला. दलितांचा पहिला महापौर झाला- पी.टी. बोराळे, 15 आमदार निवडून आले. विरोधी पक्षनेतेपद मिळाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे विविध पैलू समोर आले. अण्णा भाऊंचे एक विकसित, प्रगल्भ, तेजाने तळपणारे आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व साकार झाले.

प्रश्न - आचार्य अत्रे- नवयुग- अण्णा भाऊ साठे हे समीकरण कसे होते?

- केवळ अण्णा भाऊच नव्हे, तर नारायण सुर्वे, बाबूराव बागुल यांनाही प्रसिद्धी देण्यात ‘नवयुग’चं मोठं योगदान आहे. कमिटेड लोकांना ‘नवयुग’ने प्रकाशात आणले. यात शिरिष पै यांचे मोठे योगदान आहे. अमर शेख आणि आचार्य अत्रे यांचे फार घनिष्ठ नाते होते. अमर शेखांवर अत्रे फार प्रेम करायचे. आचार्य अत्रे हे अण्णा भाऊंच्या मुलाच्या लग्नाला साताऱ्याला गेले होते. कॉम्रेड डांगेही अण्णा भाऊंवर फार प्रेम करायचे. उषातार्इंनी (डांगे यांची पत्नी) तर रशियाला अण्णा भाऊंना पाठविण्याविषयी हट्टच धरला होता. ‘अण्णाला पाठवा’ असे त्या म्हणायच्या. डांगेंनी अण्णा भाऊंना स्वत:चा कोट दिला होता, रशियाला जाताना! आचार्य अत्रे कलावंतांवर फार प्रेम करायचे. जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा अण्णा भाऊंनी लिहिल्या आहेत, असे अत्र्यांनी नमूद केले आहे.

प्रश्न - अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रचारकी आहे  आणि प्रचारमूल्य असलेले साहित्य हीणकस असते, असे म्हटले जाते. तुमचे काय मत आहे?

- प्रचारमूल्य असलेले साहित्य हीणकस असते, हे मत प्रस्थापित व्यवस्थेने आणि साहित्याच्या तथाकथित मिरासदारांनी आपल्या माथी मारले आहे. मार्क्सवादी धारणेमुळे आणि ज्या समाजव्यवस्थेत अण्णा भाऊ घडले- वाढले होतेे, त्यामुळे कलावंत म्हणून त्यांची एक जीवननिष्ठा तयार झाली होती. याच जीवननिष्ठेतून आणि दृष्टिकोनातून त्यांची साहित्यनिर्मिती झाली आहे. जीवनानुभूतीच्या अपरिहार्यतेतून त्यांनी कथा लिहिली. वर्गीय प्रबोधनासाठी पोवाडे, लावणी, गाणी आणि लोकनाट्यातून मैदानात सादरीकरण करणारे अण्णा भाऊ आणि कथा-कादंबरी लिहिणारे अण्णा भाऊ यांच्यात आपणाला एक ठळक भेदरेषा काढता येते. अण्णा भाऊंच्या गीतातील, पोवाड्यातील शब्दकळा काव्यात्मक नाही काय? प्रत्येक माध्यमाची अंगभूत अशी ताकद असते. लावण्या, पोवाडे, गाण्यांचा उद्देश मनोरंजनाद्वारे प्रबोधन करणे, हा होता. अण्णा भाऊ हे मार्क्सवादी बांधिलकी स्वीकारलेले कलावंत होते. त्यामुळे त्या मूल्यांचा प्रभाव सादरीकरणात जाणवणे उघड आहे.

समता आणि न्याय ही मूल्ये अण्णा भाऊंच्या जीवननिष्ठेचा भाग होती. ती त्यांच्या कथा-कादंबरीत साकारलेली आहेत. त्यातून परिवर्तनवादी संवेदनशीलता आणि जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो.

प्रश्न - ‘जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव’ असे अण्णा भाऊंनी म्हटले आहे. धनवंतांनी गिळले आणि धर्मांधांनी छळले, असे बाबासाहेब सांगून गेल्याचे अण्णा भाऊ म्हणतात. त्यांना कम्युनिस्ट विचारसणीच्या मर्यादा लक्षात आल्या होत्या, म्हणून ते आंबेडकरांचा स्वीकार करतात काय?

‘जग बदल घालुनी घाव’ हे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात लिहिलेले गीत आहे. आंबेडकरवाद-मार्क्सवाद म्हणजे शोषणाविरुद्धचा आवाज- मग तो धार्मिक असो, सामाजिक असो. संयुक्त महाराष्ट्र समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षदेखील सामील झाला होता. त्या काळात रिपब्लिकन पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सहकार्य वाढले होते. दलित-श्रमिक ऐक्याचे दर्शन त्या काळात घडत होते. काही समीक्षक, लेखक ‘फकिरा’ कादंबरीच्या अर्पणपत्रिकेच्या अनुषंगाने असा निष्कर्ष काढतात की, अण्णा भाऊ हे शेवटच्या काळात मार्क्सवादी व कम्युनिस्ट तत्त्वज्ञान सोडून आंबेडकरवादाकडे वळले. वास्तविक अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे विचार, त्यांचे लढे, तत्त्वज्ञान याबद्दल अपार आदरभाव होता आणि तो त्यांनी व्यक्त केला आहे. अण्णा भाऊंनी धर्माची चिकित्सा केली नसेल; पण ते असहायतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढले. बाबासाहेब मानवमुक्तीच्या लढ्याचे नेते होते, हे भान अण्णा भाऊ विसरले नाहीत.

प्रश्न - अण्णा भाऊंनी मार्क्सवादी जीवननिष्ठा स्वीकारूनदेखील ‘कामगार’ नायकस्थानी आहे, अशी एकही कलाकृती निर्माण केली नाही. कामगाराच्या सामर्थ्याबद्दल पोवाडे, गाणी, वगनाट्य लिहिणारे अण्णा भाऊ कामगारांना कथेचा नायक म्हणून का चित्रित करीत नाहीत?

- ‘कामगार’ या संकल्पनेचे भान अण्णा भाऊंच्या कथेला होते. बरबाद्या कंजारी या कथेतील- ज्या ठिकाणी भटक्या समाजातील मंडळींची पालं उभारली जात होती. त्यासंबंधीचे वर्णन करताना अण्णा भाऊ लिहितात- ‘जे काही निकामी झाले होते, ज्याची मुळीच गरज उरली नव्हती- अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या जात होत्या. तिथं राहणाऱ्या कोणत्याही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळाला नव्हता. सर्व निर्जीव त्यांना आवडत होते किंवा लोक निर्जीव होते.’ एकूण, त्यांच्या कथेचा जो परिसर आहे आणि त्या परिसरातील जे अनुभवविश्व आहे- वास्तव आहे, त्या परिघात कामगार ही संकल्पना नव्हती. परंतु बारकाईने पाहिले, तर आपल्या असे लक्षात येईल की- ज्या कथांना शहरी पार्श्वभूमी आहे, त्यात कामगार सापडतो. मुकुल मुलाणीची मुलं कामगार असतात, पण त्यांची नोकरी सुटते. ‘स्मशानातील सोनं’मधील भीमा हा खाण कामगार असतो. ‘रेड झुंज’मध्ये गोठ्यात काम करणारे कामगार दिसतात.

प्रश्न - अण्णा भाऊ साठे सम्रग वाङ्‌मय प्रसिद्ध करण्याची गरज का निर्माण झाली? त्यामागील तुमची भूमिका काय होती?

- अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्‌मय प्रसिद्ध करण्यामागे विशिष्ट हेतू होता. प्रत्येक समाजाला हीरो लागतो. अण्णा भाऊ साठे म्हणजे मातंग समाजाचा लेखक- असे अण्णा भाऊंना जातिबद्ध, मर्यादित करण्यात आले होते. एखाद्या महाकलावंताला जातीत अडकवले जाते. अण्णा भाऊंची जाणीव फार व्यापक होती. सबंध मराठीला मोठे अनुभवविश्व, विचारविश्व देणारा लेखक लोकांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आणि अगत्याचे होते. मी साहित्य संस्कृती मंडळात होतो. त्यामुळे अण्णा भाऊंचे निवडक साहित्य प्रकाशित करता आले. अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, तमाशे, लावण्या दुर्मिळ होत गेल्या होत्या. नव्या पिढीला अण्णा भाऊ साठे हे महान लेखक होऊन गेले, एवढेच माहीत होते. परंतु या एकत्रित लिखाणातून नव्या पिढीला त्यांचे साहित्य उपलब्ध होणार, या हेतूने ते प्रसिद्ध केले. दुसरे म्हणजे, अण्णा भाऊंना जो न्याय त्या काळी साहित्य-समीक्षकांनी दिला नाही, तो न्याय नवे संशोधक-समीक्षक देतील या अपेक्षेने हे साहित्य प्रकाशित करण्यात आले. त्यातून अण्णा भाऊंचे वाङ्‌मयीन कर्तृत्व आणि व्यक्तित्व समोर आले.

प्रश्न - पहिल्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तुम्ही भूषविले आहे. नंतरच्या काळात अण्णा भाऊंचेही विभाजन झालेले दिसते. काँग्रेसने वेगळ्या प्रकारे प्रोजेक्ट केले, मातंगांनी वेगळ्या प्रकारे, दलितांनी वेगळ्या प्रकारे. या सर्व प्रकारांकडे तुम्ही कसे पाहता?

- कॉम्रेड अण्णा पानसरे यांनी हे पहिले संमेलन घेतले होते. माझे अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर ते म्हणाले, आपणाला हे पुढे न्यायचे आहे. अण्णा भाऊंना व्यापक करायचे आहे. जातीत बंदिस्त करणे योग्य नाही. कारण ते अतिशय व्यापक होते.

ज्या वेळेस ‘फकिरा’ खूप गाजली, या कादंबरीने ‘राणोजी मांग’ हा गरिबांना एक हीरो दिला. मातंगांना आपला एक हीरो मिळाला. जातीचा हीरो मानणे यात काही गैर नाही. जातिवादी लोक दलितांमधील अंतर्विरोधाचा फायदा घेतात, तसा तो मातंगांना वेगळे करण्यासाठी घेतला गेला. जातिवादी-धर्मांध असा प्रयत्न करतात, तो आपण हाणून पाडला पाहिजे. मातंग युवक, नव्या पिढीने हे अंतर्विरोध कसे मिटतील, हे पाहिले पाहिजे. हिंदू दलित, बौद्ध दलित हा प्रकार थांबवला पाहिजे. आंबेडकरी चळवळीतील एकारलेपणा, कडवेपणा सोडला पाहिजे.  हिंदुत्ववादी लोक महार, मांगांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करतात. हा अंतर्विरोध संपवला पाहिजे.

प्रश्न -  मुक्ता साळवे, लहुजी वस्ताद यांना पुढे आणून वेगळे गट निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत, सुरू आहेत. उजव्या विचारांच्या लोकांनी त्या माध्यमातून मोठा ग्रुप तयार केला आहे. लहुजी वस्ताद हे फुले आणि टिळक यांचेही गुरू होते, अशीही अलीकडे मांडणी केली जात आहे. यातील वास्तव काय? काय म्हणाल याबाबत?

- धर्म-जातीच्या नावावर शोषक शक्ती डोके वर काढत आहेत. अण्णा भाऊ साठे आयुष्यभर ज्या मूल्यांसाठी झगडले, ती मूल्ये धोक्यात आली आहेत. त्यामुळे अण्णा भाऊंची चळवळ, साहित्य, विचार, शोषणाविरुद्धचा विचार पुढे घेऊन जाण्याची आज गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे, ‘तुमची चळवळ जोरात वाढते, तेव्हा प्रतिक्रांती सुरू होत असते.’ त्यामुळे आपसातील असणारे कंगोरे बाजूला ठेवून, भेदरेषा बाजूला ठेवून लढाई लढली पाहिजे. समतेच्या लढाईत माणूस हा केंद्रबिंदू आहे. समतेसाठी परिवर्तनाची लढाई- यात बुद्ध, चार्वाक, फुले, आंबेडकर, शाहूमहाराज हे सर्वच येतात. माणसाचे मोठेपण, माणसाचे मानवीपण जपणे हीच आजची लढाई आहे. जाती-धर्माच्या नावाने दुय्यम नागरिकत्व अशी खेळी खेळली जात आहे. त्या विरुद्ध समतेसाठी लढाई, परिवर्तनवादी लढा हेच आजचे उद्दिष्ट असले पाहिजे.

प्रश्न - अण्णा भाऊंच्या निधनानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. पार्टीने त्यांची दखलच घेतली नाही, असेही म्हटले गेले. नेमके वास्तव काय आहे?

- जसे ‘माझी मैना’ ही लावणी नाही, छक्कड आहे. सीमाप्रश्न, बेळगाव-कारवारसाठी लिहिली गेली. लोकांनी तिला एकदम रोमँटिक करून टाकले. इतर अनेक कपोलकल्पित कथा पेरल्या. ‘अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांची भेट झाली होती’ असे बाबूराव गुरव यांनी लिहिले आहे. ही भेट 1949 मध्ये झाल्याचे म्हटले आहे. अण्णा भाऊंचा मृतदेह घाटकोपर येथील चिरागनगरच्या झोपडीत पाच-सहा दिवस सडत होता, असेही म्हटले गेले. हे सर्व खोटे आहे.

अण्णा भाऊंना पार्टीने घडवले आहे. चळवळ संपल्यानंतर कलावंतही संपत जातात. अण्णा भाऊंचे 1964-65 नंतरचे व्यक्तिगत आयुष्य जर आपण पाहिले, तर ते चिरागनगरातून गोरेगावात राहायला आले आहेत. बाबूराव भारतकरांनी त्यांना घर दिले. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्येच अण्णा भाऊंचे निधन झाले. आमची मीटिंग सुरू होती. नारायण सुर्वे, वा. वि. भट, दया पवार, वामन होवाळ, नेरूरकर आदी- अशी आमची मीटिंग सुरू असतानाच अण्णा भाऊंच्या निधनाची वार्ता आम्हाला समजली. अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेत जे लोक सहभागी झाले होते, त्यात मी एक होतो.

अण्णा भाऊंवर पार्टी फार प्रेम करायची. पार्टीने त्यांची दखल घेतली होती. या अनुषंगाने एक किस्सा सांगतो. अण्णा भाऊंच्या सत्काराचा एक कार्यक्रम होता. बलराज साहनी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अण्णा भाऊंना थोडे बरे वाटत नव्हते. तेव्हा बलराज साहनी स्वत: अण्णा भाऊंना घेऊन गेले. ड्रायव्हरला बाजूला बसवलं आणि बलराज साहनी स्वत: ड्रायव्हिंग करत, गाडी चालवत गेले आणि घाटकोपरला चिरागनगरच्या घरी अण्णा भाऊंना पोहोचवले. बलराज साहनींसारखा एवढा मोठा माणूस अण्णा भाऊंना अशी ट्रीटमेंट देतो, एवढा सन्मान अण्णा भाऊंना मिळाला होता.

मी लहानपणापासून मोठमोठ्या लोकांच्या आजूबाजूला वावरलो आहे. चळवळीचं आमचं घर. डांगे हे आमचे गाववाले. कॉ.पी.बी. रांगणेकर हे जवळच माटुंग्याला राहायचे. ते भाडेकरू संघाच्या खोलीवर वारंवार येऊन अण्णा भाऊंनी किती लिहिले, काय लिहिले याची चौकशी करायचे. त्या ठिकाणी पोस्टर्सच्या ढिगाऱ्यावर बसून किंवा झोपून मेणबत्तीच्या प्रकाशात लिहीत किंवा वाचत बसलेल्या अण्णा भाऊंना पाहणारे अनेक जण आहेत. अण्णा भाऊंना पार्टीने घडवले आणि तेवढंच त्यांच्यावर प्रेमही केले, हे निर्विवाद सत्य आहे.

प्रश्न - अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीच्या निमित्ताने तुम्ही काही संकल्प केला आहे का?

- मी अण्णा भाऊंना 1962 मध्ये भेटलो होतो. ‘फकिरा’ चित्रपटासाठी त्यांना मुलं पाहिजे होती. त्यासाठी ते लेबर कॅम्पात आले होते. लेबर कॅम्पशी असलेले नाते त्यांनी कधी तोडले नाही. ते कायम ठेवले. त्यांची जन्मशताब्दी यासोबतच ‘दलित पँथर’ पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. मी पँथर चळवळीचा साक्षीदार आहे. मात्र स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी सांगोवांगीवरून पँथरचा खोटा इतिहास लिहिला गेला आहे. पँथरचे खरे हीरो नामदेव ढसाळ आणि राजा ढाले हेच होते. त्यांना बाजूला सारून, आपणच पँथरचे हीरो होतो, असे भासवून खोटा इतिहास लिहिला गेला आहे. तोच आज तरुण पिढीसमोर आहे. त्यामुळे पँथरचा खरा इतिहास लिहावा, असा पँथरच्या कार्यकर्त्यांनी, अनेक लोकांनी माझ्याकडे आग्रह धरला; म्हणून मी पँथरचे समग्र सत्य सांगणारा ग्रंथ साकारणार आहे. अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त हा माझा संकल्प आहे.

(मुलाखत व शब्दांकन : डॉ. महेंद्र भवरे)

(कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुढाकार घेऊनसुरू केलेल्या पहिल्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘निवडक अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे निमंत्रक, असे सन्मान अर्जुन डांगळे यांच्या वाट्याला आले आहेत.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात