डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनातील भाषण

15 ऑगस्ट 1922 ते 15 मे 2004 असे 82 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला आणि एकूणच डाव्या पुरोगामी चळवळीला पाच-सहा दशके ऊर्जा पुरवली आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या चालू आहे. त्यानिमित्ताने बुलढाणा येथे 23 एप्रिल 2022 रोजी ‘महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे होते. त्यांच्या लिखित भाषणातील उत्तरार्ध येथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक
 

आंबेडकरी जलशांचे प्रेरणास्थान हे सत्यशोधकी जलसे आहेत. परंतु ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीद्वारे कष्टकऱ्यांचा, शोषितांचा आवाज बुलंद केला. लोकनाट्य सादर करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ऊर्जा भरली त्याची प्रेरणादेखील आंबेडकरी जलसे आहे. म्हणजे सत्यशोधकी जलसे-आंबेडकरी जलसे आणि पुढे शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, गव्हाणकर यांच्या लालबावटा कलापथकामार्फत महाराष्ट्रात पेरलेला झंझावात यात एक सूत्र आणि सांस्कृतिक नाते दिसते. (यासंदर्भात मी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवडक वाङ्‌मय’ या संपादित पुस्तकाच्या प्रस्तावनेत सविस्तरपणे लिहिले आहे.)

साधारणत: 1930 ते 1945 असा हा जलशाचा कालखंड आहे. अनेक कलावंतांनी हे कार्य अत्यंत निष्ठेने केले. त्यामध्ये भीमराव कर्डक, पांडुरंग गोविंद पवार, दिनकर भिमाजी भोसले, रामचंद्र हनमंत अंडागळे, शिवराम सावळाराम गडकरी, रामचंद्र नामदेव सोनावणे, केरूजी घेगडे, अर्जुन भालेराव, केशव सुका आहेर, पतीत पावन दास, अमृतबुवा बावस्कर, कवी शेखर, कवी धोंडिराम निकम, कोंडदेव श्रीराम खोलवडीकर अशा अनेकांचा समावेश आहे.

या जलशांचा काळ ओसरल्यानंतर आंबेडकरी विचारांचा आणि चळवळीचा प्रसार करण्यासाठी गायक कलावंतांचा कालखंड आला. स्वत: वामनदादा या विषयी लिहितात, 1956 साली धर्मांतर झाले. आम्ही बौद्ध झालो. नवा विचार, नवा आदर्श घऊन सन्मानाने, ताठ मानेने जगू लागलो. नवशिक्षितांची एक पिढी तयार झाली. या दरम्यान जलसा मंडळे अस्त होऊ लागली. जलसा नंतरची दुसरी पिढी बैठ्या गायन पाटर्यांची. राजानंद गडपायले, श्रीधर ओव्हळे, सदानंद वांद्रे, धरमदास मोहिते, नागपूरचे नागोराव, दिनबंधू, दलितानंद, लक्ष्मण केदार आणि वामन कर्डक हे बैठ्या गायनातील पहिल्या पिढीचे कवी.

या कवींचे वैशिष्ट्य असे की, दिनबंधू आणि श्रीधर ओव्हळ हे कवी सोडल्यास बाकीचे सगळे कवी आपल्या रचना स्वत: सादर करीत. स्वत: गीतलेखन करून ती स्वत: सादर करणाऱ्या कवी गायकांची एक वैभवशाली परंपरा आंबेडकरी चळवळीत आहे. या वैभवशाली आणि संपन्न परंपरेत अनेक कवी-गायक आहेत. त्यामध्ये किसन खरात, हरेंद्र जाधव, शंकर कांबळे, भिमदास हिंदळेकर, विठ्ठल उमप, उत्तम मुळे, नवनीत खरे, भिकू भंडारे, भगवंत चोपडे, साहेबराव कोकाटे, राजस जाधव, प्रतापसिंग बोदडे, विष्णु डांगे, प्रभाकर पोखरीकर, राम मोरे, रंगराज लांजेवार, प्रकाश पाटणकर, विष्णु शिंदे ह्या कवी गायकांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय या बैठ्या- गायन पाटर्यांमध्ये आणि मैफल गाजविणाऱ्यांमध्ये श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे आणि गोविंद म्हशीलकर यांचा खास आणि प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अशा या आंबेडकरी विचारांचे, स्वरांचे झंझावात म्हणजे वामनदादा कर्डक. तुफानातील दिवा सातत्याने प्रकाशित राहील, त्याचे नाव महाकवी वामनदादा कर्डक होय. त्यांच्या नावाने भरविल्या गेलेल्या ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला दिले आहे, हा मी माझा बहुमान समजतो. आणि या संमेलनाची उभारणी करणाऱ्या संयोजकांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.

वामनदादा सारख्या महाकवीचा, लोककवीचा, शाहिराचा, प्रतिभेच्या उत्तुंग झेप घेणाऱ्या ह्या ज्येष्ठ कलावंतांचा मला सहवास लाभला हे माझ्या आयुष्यातील तेजस्वी क्षण होत. नाशिक मध्ये गेल्यानंतर त्यांची हमखास भेट घ्यायचो. अनेकदा भेट होत नसायची, कारण सतत ते पायाला चाके लावून फिरत असायचे. पण मुंबईत चेंबूरला लालडोंगर भागात आल्यावर त्यांचा दीर्घ-सहवास मिळायचा. चर्चा-गप्पा व्हायच्या. जेष्ठ गायक कवी लक्ष्मणदादा केदार, प्रतापसिंग बोदडे सारखे प्रतिभावंत कवी, गायक आणि अनेक तरूण कवी-गायक, कार्यकर्ते असत. ते दिवस चळवळीचे होते. वामनदादा आणि मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्ये जवळ जवळ तीन चार वर्षे एकत्र काम केले आहे.

वामनदादांच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणीवेचे भान किती प्रखर आहे याचे मला एकदा प्रत्यंतर आले. कांताराम सोनावणे यांच्या आग्रहावरून साहित्य संस्कृती मंडळाची एक बैठक मुंलुंडला त्यांच्या घरी ठेवण्यात आली होती. मंडळाचे अध्यक्ष रा. रं. बोराडे, अरूण साधू, दया पवार, डॉ. निर्मलकुमार फडकुले, वामनदादा, मी असे सदस्य उपस्थित होते. त्यावेळी मी माझ्या ‘पॉयझन्ड ब्रेड’ या इंग्रजी संपादित पुस्तकाचे काम करीत होतो. मिटींग संपल्यानंतर मी आणि वामनदादा मुलुंड स्टेशनवर आलो. या पुस्तकात वामनदादाची कविता मला समाविष्ट करायची होती. कोणती कविता द्यावी ह्याविषयी मी गोंधळलेला होतो. कारण वामनदादांच्या अनेक रचना ह्या प्रचंड ताकदीच्या आणि आशयाच्या होत्या. मी वामनदादांना माझी खंत सांगितली. ते म्हणाले, बसा आणि त्या प्लॅटफार्मवर आम्ही बाकड्यावर बसलो. ते म्हणाले, तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे साहित्य इंग्रजीत आणता तर बाबासाहेबांच्या चळवळीचे घोषवाक्य काय होते? मी म्हणालो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मग अशी कविता घ्या. मी म्हणालो, कोणती? वामनदादा मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीचा मूळ गाभा म्हणजे शिक्षण, ‘माझ्या पेंद्याला शाळेत घाला’ ही कविता घ्या आणि मी हो म्हटलं. पुढे ते म्हणाले, तुम्ही ती कविता शोधाल तेव्हा शोधा, आता पेन घ्या आणि ती कविता वामनदादा मला सांगत होतो, मी लिहित होतो. मुलुंड स्टेशनच्या प्लॅटफार्मनंबर दोनच्या बाकड्यावर बसून एक महाकवी मला ती कविता ऐकवत होता. आणि वामनदादांनी केलेल्या कवितेची निवड किती सार्थ होती हे तो ग्रंथ प्रकाशित झाल्यावर मला अभिप्रायातून दिसते. हा प्रसंग मी मुद्दाम सांगतो. वामनदादा सरळसोट जगले. प्रतिष्ठेची, अहंकाराची, झूल त्यांनी पांघरली नाही. वामनदादांच्या ह्या साध्या सरळ जगण्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल.

वामनदादा म्हणजे आंबेडकरी गीत काव्याचा महानायक आणि महाकवी होय. पाच हजारांहून अधिक गीते त्यांनी लिहिली. हिंदीतून रचना केल्या. वामनदादांच्या गीताविषयी अनेकांनी लिहिले आहे. त्याविषयी अधिक सखोलतेने लिहिण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.

वामनदादांच्या गीतांनी आंबेडकरी चळवळीतल्या पिढ्यांना ऊर्जा दिली. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आंबेडकरी जाणीवा वामनदादांच्या गीतांनी प्रखर केल्या. एका अर्थाने वामनदादा हे आंबेडकरी चळवळीच्या सांस्कृतिक आणि प्रबोधन चळवळीतील ऊर्जाकेंद्र (पॉवर हाऊस) होते असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही. त्यांच्या गीतातील ऊर्जा ही आजही मिळते आहे आणि भावी पिढ्यांना मिळत राहील यात शंका नाही. मी जेंव्हा वामनदादांच्या गीतरचनेचे सामर्थ्य नेमके कशात आहे याचा धांडोळा घेतो तेंव्हा ह्या प्रतिभासंपन्न आणि विचारांची उत्तुंग झेप असलेल्या कवीचे सामर्थ्य कशात आहे तर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गाढ, अगाध, प्रेम, निष्ठा, जिव्हाळा आणि बांधीलकी होय.

वामनदादांच्या गीतातून संवेदनशीलता आणि बांधिलकीचा प्रत्यय येतोच पण त्या गीतांमधून आविष्कृत होणारे भावविश्व, विचारविश्व हे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी केल्या, जे लढे दिले, संघर्ष केला, ज्या ऐतिहासिक घटना घडल्या त्या सर्वांचे पडसाद त्यांच्या ह्या गीतांच्या विशाल महासागराच्या पोटात दडलेले आहे. अगदी बाबासाहेबांच्या जन्मापासून ते माणगाव परिषद, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे-करार, धर्मांतराची घोषणा, येवल्याची परिषद, रिपब्लिकन पक्ष आणि त्यातील गटबाजी, विचारांचे आक्रमण, ग्रामीण कष्टक़री स्त्रियांचे भावविश्व, सुशिक्षित दलितांची बेजबाबदार मनोवृत्ती, बौद्ध तत्वज्ञान, आर्थिक सामाजिक विषमतेविषयी चिड, निसर्गाची मानवी भाववृत्तीशी सुरक्षित सांगड, पुढाऱ्याच्या दांभिकतेवर ओढलेले आसूड असे अनेक विषय आहेत.

हा प्रचंड महाकाय अवकाश आपल्या प्रतिभासंपन्न गीतातून कवेत घेणारा हा महाकवी मानवमुक्तीचा लढ्यातील ठेवा होय. वामनदादांनी माणूस हा केंद्रबिंदू मानला होता. वामनदादांच्या गीतांच्या मुळाशी सखोल अशी वैचारिक जाणीव होती. वामनदादा ‘माझ्या जीवनाचं गाणं’ ह्या आत्मचरित्रात म्हणतात, ‘‘मी चातुवर्ण्याची चौकट मोडली तसाच मी काव्यशास्त्राच्या चौकटीतून मुक्त आहे. तरी गाणं म्हटलं की यमक आलंच. संपूर्णपणे यमकाचं बंधन तोडता येणार नाही. मी संगीत शास्त्राचे नियम देखील तोडले आहेत. तरी आमच्या गाण्याला देखील एक शास्त्र आहे. बुद्ध, फुले, आंबेडकर जमेल तसे गायनातून सांगतो एवढेच माझे काम. तर मानवी जीवनाच्या कप्प्याकप्यात शिरून मी लिहित आलोय. मी माणसाचंच गाणं गात आलोय. आणि माणसांनी ते मान्य केलंय एवढं मात्र खरं की मी प्रेमाच्या परवडीची गाणी गात नाही आणि माझं गाणं फारसं बोचरंसुद्धा नसंत. मी वाङ्‌मयीन मूल्यांची मुळीच पर्वा केलेली नाही. एक तळमळ म्हणून माझी गाणी प्रकाशित करीत आलोय.’’

वामनदादा हा माणसाचं गीत गाणारा महाकवी. त्यांच्या एकूण समग्र गीतांचा आढावा एका भाषणात घेणं अशक्यप्राय आहे. कारण त्यांची समग्रशील रचना ही आशयसंपन्न आणि बहुआयामी आहे. गेयता हे त्यांच्या गीतरचनेचे वैशिष्ट्य आहे. पण गीत गेय करण्यासाठी आशयाशी वा विचारांशी तडजोड करणारी नाही. साधारणत: मराठी साहित्यातील रचना ही अव्वल ठरते ह्याचे कारण हे की, बहुसंख्य मराठी गेय कविता ही निसर्ग आणि मानव यांच्यातील भाववृत्तीचा आविष्कार आहे. वामनदादांच्या गीतातून निसर्ग-मानव आविष्क्रांत होतोच पण त्याही पलिकडे त्यांच्या गीतातून जो सामाजिक आशय व्यक्त होतो. त्या गीतातील ठासून भरलेल्या परिवर्तन ऊर्जेतून लयबद्धता, गेयता कमी होत नाही. म्हणून मराठी पारंपरिक गेय कवितांपेक्षा वामनदादांची गेयता ही अव्वल ठरते. या दृष्टीने देखील अभ्यासकांनी वामनदादांच्या गीत रचनेतील ह्या पैलूंवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे असे मला वाटते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या गझला तसेच हिन्दी गीत रचनांवरदेखील अभ्यासपूर्ण लिखाण होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

वामनदादांच्या गीत रचनेच्या विविध पैलूंचा आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे बाबासाहेबांबद्दल आणि त्यांच्या चळवळीवर असलेली त्यांची अपार आणि प्रखर निष्ठा होय. बाबासाहेबांवर लिहितांना वामनदादांची प्रतिभा आणि कल्पकता एका उंचीवर जातांना दिसते. एक अद्भुत विलोभनीय सृष्टी ते आपल्यापुढे उभे करतात.

बाबासाहेबांच्या जन्माविषयी ते लिहितात

चकित जाहले वरती अंबर
नजर तयाची खिळली भूवर
म्हणे कुणाचे आज स्वयंवर
पडला मांडव अवघा भूवर
नभांगणाहून नटले भूवन
पुनवेचेही गेले मी पण
चंद्र लाजला लपू लागला
असा सोहळा भूमीवर आजला

किंवा भीमजयंतीविषयी लिहिताना वामनदादा म्हणतात.

पहाट झाली प्रभा म्हणाली
भीम जयंती आली
चांदाची चांदणी येऊन खाली
वारा भीमाला घाली

बाबासाहेबांवरील ह्याच अपार निष्ठेतून वामनदादांनी बाबासाहेबांना अनेक रूपात रेखाटले आहे. बाबासाहेब कधी लेकराची माता होतात, कधी काळाशी झुंज घेणारा योद्धा होतात, कधी ज्ञानदाता होतात, तर कधी दीनदुबळ्यांच्या अंत:करणावर उमटलेला अमीट ठसा होतात.

बाबासाहेबांनी इथल्या सामाजिक-धार्मिक व्यवस्थेच्या वरवंट्याखाली चिरडल्या जाणाऱ्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या वर्गासाठी लढा दिला असला तरी त्यांचा मूलत: लढा मानवमुक्तीचा होता आणि लढा तितक्याच नेटाने, निडरपणे, निर्भयपणे पुढे चालविणे हे वामनदादांच्या कवितेचे सूत्र आहे. म्हणून ते म्हणतात

भीमवाणी पडली माझ्या कानी
तीच वाणी ठरली माझी गाणी
आम्ही तुझे संतान भीमा
आम्ही तुझे संतान
तुझा वारसा पुढे न्यावया करू जीवाचे दान
हा वारसा पुढे का न्यावयाचा आहे कारण, वामनदादा म्हणतात
जखडबंद पायातील साखळदंड
तटातट तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे
भीमा तुझ्या जन्मामुळे

बाबासाहेबांनी इथल्या विषमतेविरूद्ध, शोषणाविरूद्ध जी झुंज दिली, जो संघर्ष केला. त्या गौरवशाली संघर्षाचे चित्रण वामनदादांनी अनेक गीतांतून केले आहे. याच संघर्षातून गुलामगिरीतून मोकळे झालेले गुलाम आज माणूस म्हणून समाजात ताठ मानेने जगत आहेत. परंतु सनातनी, प्रतिगामी, उच्चवर्णीय मानसिकतेला हे सहन होत नाही. सातत्याने प्रतिक्रांतीचे प्रयत्न होत आहेत. ही प्रतिक्रांती रोखण्यासाठी, तिच्याविरूद्ध लढण्यासाठी आपल्या गीतातून स्फूर्ती देतात. म्हणून म्हणतात..

तुफानातील दिवे आम्ही
तुफानातील दिवे
तुफान वारा, पाऊसधारा
मुळी न आम्हा शिवे
हल्ल्यावरती होते हल्ले
अभंग आमुचे बालेकिल्ले
तसाच ताठर माथा आमुचा
जरा न खाली लेवे

वामनदादांची प्रतिभा, काव्यशक्ती, गीतरचना ही केवळ भूतकाळात रममाण होणारी नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या समाजव्यवस्थेमध्ये जी उतरंड  उद्धवस्त करायची होती, समता मूल्याधिष्ठित समाजाची उभारणी करण्यासाठी सामाजिक पुनर्रचना करायची होती. बाबासाहेबांच्या ह्या नवसमाज निर्मितीचा आविष्कार वामनदादांच्या पुढील गीतातून होतो.

पहा पहा रे जग हे सारे
पाऊल टाकी रोज पुढे
जुने पुराने जुल्मी वाडे
कुजलेली कुजकी झाडे
उन्मळती हे कोसळती हे
सारे मातीआड दडे
नवी पालवी पुन्हा फुटावी
सृष्टी सारी पुन्हा नटावी

आपले प्रेरणास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असंख्य लिहिले गेले. वामनदादा आणि नामदेव ढसाळ या दोघांच्या कविता लक्षणीय आहेत. आज या निमित्ताने वामनदादांना भीम कसा दिसत होता ते पाहू.

कापराची काया चांदण्याची छाया
माऊलीची माया होता माझा भीमराया
सात ठिगळाच्या बंडीचा,
भीम माझा खिसा होता
वादळी वाऱ्यामधी तोफेच्या माऱ्यामधी
पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमधी
नको म्हणू काही भीम आहे सर्व ठायी
आहे त्याची किर्ती, किर्तीला मृत्यू नाही

वरील गीताच्या ओळीचे नीट अवलोकन केल्यास एक स्पष्टपणे जाणवते की वामनदादांची गीते निव्वळ विभूतीपूजक नाहीत. तर त्या महापुरूषाच्या विचारांबद्दल त्यांची वैचारिक परंपरा जपणारी आहे आणि ते खरेही आहे. बाबासाहेब त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील आपल्यासोबत आहे असे जाणवते. मग ते आपल्याला त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या पानापानातून भेटतात, भारतीय संविधानात दिसतात, सामाजिक हक्काच्या, न्यायाच्या लढाईत ते दिसतात.

वामनदादांनी बुद्ध, फुले, कबीर यांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानांचा गीताद्वारे आविष्कार केला आहे. तसेच आर्थिक विषमतेवर देखील हल्ला केलेला आहे.

सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो

हे गीत आज परिवर्तनवादी, समतावादी चळवळीचे गीत झाले आहे. कुसुमाग्रजांचे ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ किंवा साने गुरूजीचे, ‘आता उठवू सारे रान’ हे गीत जसे चळवळीत अजरामर झाले आहे तेच स्थान चळवळीत वामनदादांच्या या गीताला आहे. या गीताच्या संदर्भात माझी एक आठवण आहे. ती या प्रसंगी सांगणे उचित वाटते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने देण्यात येणारी गौरववृत्ती वामनदादांना प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात आयोजित केला होता. कविवर्य कुसुमाग्रज मुख्य पाहुणे होते. अनेक दिग्गज साहित्यिक उपस्थित होते. वामनदादांना काही गीते पेश करण्याचा आग्रह झाला. साजवाज काहीच नव्हता. दादांनी आपल्या पहाडी आवाजात दोन-तीन गीते सादर केली. ‘सांगा आम्हाला बिर्ला-बाटा’ हे गीत सुद्धा सादर केले. सगळे सभागृह प्रभावीत झाले. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार अरूण साधू हे देखील होते. ते तर इतके प्रभावित झाले की त्यांनी दोन-चार दिवसांतच वामनदादांवर लेख लिहून स्पेनचा क्रांतीकारक कवी (मला नाव आठवत नाही) यांच्याशी वामनदादांची तुलना केली.

वामनदादांची राहणी सरळ साधी होती. कुठलाही बडेजाव नव्हता. भीमगीते हा त्यांचा श्वास होता. पण ते बोलण्यात स्पष्ट होते. कधी कधी तर न रूचणाऱ्या गोष्टींबद्दल ते फटकळपणे बोलत. पण त्यांचे मन निर्मळ होते. आणि म्हणूनच समाजातील चळवळीतील न रूचणाऱ्या गोष्टीबद्दल ते स्पष्ट लिहित. विशेषत: समाजातील सुशिक्षित उच्च-मध्यमवर्ग ज्यांनी समाजापासून नाळ तोडलेली आहे किंवा जे पुढारी समाजाच्या ताकदीवर मोठे झाले आहेत पण समाजाकडे, चळवळीकडे दुर्लक्ष करीत आहे, अशा लोकांची परखडपणे हजेरी वामनदादांनी आपल्या गीतातून घेतली आहे. आंबेडकरी विचारांबद्दल त्यांना तडजोड अमान्य होती. अशा समाजापासून दुरावत चाललेल्या लोकांना वामनदादा प्रश्न विचारतात.

भीम गेल्यापाठी काय काय केलं?
काय काय लावलं पणाला?
काय काय लावलं पणाला?
विचार आपुल्या मनाला?

समाजामध्ये जी कर्तृत्वहिनता वाढत चाललेली होती त्याबद्दल वामनदादांना खंत होती. ती खंत ते स्पष्टपणे बोलून दाखवितात. ते म्हणतात

कालचे रिकामे आताचे निकामे
जगतात आई तुझ्याच नामे
इथे वामन खरे तेच गाई
तुझीच कमाई आहे ग भिमाई
कुणाचेच इथे काही कष्ट नाही

ही खंत त्यांना उद्वेगाच्या पातळीवर नेते. स्वत:लाच दोष देऊ लागते. आपणच म्हणजे समाजाने, चळवळीने आपल्यातला भीम उणा केला आहे असे सांगते आणि म्हणून ते म्हणतात

मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा
दोष देऊ कुणा सांगा दोष देऊ कुणा

या देशात, इथल्या समाजव्यवस्थेने शूद्रांना जशी अमानवी वागणूक दिली त्याचप्रमाणे इथल्या स्त्रीवर्गाला देखील दुय्यम दर्जाचे स्थान देण्यात आले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्री वर्गाचे दास्य विदारक आहे.

वामनदादांनी निसर्गाच्या सान्निध्यात कष्ट करणाऱ्या स्त्रीयांच्या वेदनेचा शोध घेतला आहे. ‘चल ग हिरणी तुरूतुरू’ हे त्यांचे गाणे प्रसिद्धच आहे. पण ‘नदीच्या वाट चूनचून काटं’ ही कविता कुणाच्याही संवेदनशील मनाला टोचत राहते. या कवितेच्या काही ओळी उदधृत करतो. वानमदादा म्हणतात.

नदीच्या वाटं चूनचून काटं
चुनचुन करती पायी
पोर चालत राही
सांजच्या पारी, गवताचा भारा
ओझ्यात राही, वाकून जाई
तशीच ओझी वाही

वामनदादांची गीते बहुआयामी-बहुप्रसव आहेत. पण त्यातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गीते ही प्रसरणशील आणि प्रस्फुटीत आहे. म्हणजे थोड्या आणि मोजक्या शब्दांत ते ज्या गीताच्या ओळी लिहितात त्यातून आशयाची अनेक कंपणे ध्वनीत होतात. वामनदादांच्या गीताचे हे सामर्थ्य स्थळ आहेच, पण सौंदर्यस्थळदेखील आहे. मोजक्या शब्दांचा ते आशयाचा अवकाश साकारतात. त्यांच्या गीतातून ठायी ठायी हा प्रत्यय येतो. अशा किती तरी ओळी आहेत, त्या आपले भावविश्व हादरवून सोडतात, अस्वस्थ करतात. त्यातील काही ओळी देत आहे.

उद्धरली कोटी कुळे। भीमा तुझ्या जन्मामुळे
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते.
दोष देऊ कुणा, माझ्यातल्या भीम मीच केला उणा

वामनदादाबद्दल आणि त्यांच्या गीताबद्दल खूप बोलता येईल. या निमित्ताने त्यांच्या गीताच्या काही पैलूला अधोरेखित केले आहे.

शेवटी वानमदादा हा माणसाचे गीत गाणारा कवी होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेमध्ये ‘एक माणूस-एक मूल्य’ हे जे जीवनमूल्य आणि धारणा दिली आहे त्यासाठी त्यांनी आपली प्रतिभा, कला समर्पित केली. माणसावरील अन्यायाविरूद्ध मग ते जाती, धर्म-पंथ वा लिंगाच्या आधारे असो, वामनदादांनी आपली लेखणी चालविली. त्यांनी तडजोड केली नाही. एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक न्यायाचा अथक संघर्ष केला त्या संघर्षातील त्यातील वैचारिक- सांस्कृतिक क्षेत्रातील ते महानायक हेाते. त्यांची कविता आजही समकालीन वाटते. युग सुसंगत वाटते. कारण माणूस हा ताठ मानेने जगला पाहिजे, सन्मानाने जगला पाहिजे, स्वाभिमानाने जगला पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा जागर वामनदादांनी आपल्या गीतांतून-जगण्यातून केला आहे. आज वामनदादांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्रपणे, अभिमानाने अभिवादन करताना वाटते. आजचे जे वास्तव आहे ते पाहून वामनदादांनी पुन्हा लिहिले असते.

वाट फुलेंची सोडून
आंबेडकरांना सोडून
तुला चालताच इयाचं नाय
मनूचं अंगड टोपडं
तुला घालताच इयाचं न्हाय

किंवा..

कोण राखील आता भीमाचा मळा
वाळूनी चालला उभा हा जोंधळा

वामनदादा एका भूमिकेत जगले. संघर्षात जगले. आपण आजचे आंबेडकरी विचारांचे लेखक-कवी-कलावंत आजच्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवात कसे जगणार आहोत? वामनदादांची गीते हा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा अमोल ठेवा आणि दस्तऐवज आहे. वामनदादावर चळवळीतील अनेक नामवंत लेखक-समीक्षकांनी लिखाण केले. सुरूवातीच्या काळात वामनदादांच्या गीतांची छोटी-छोटी पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचे आणि ऐतिहासिक काम माधवराव गायकवाड आणि प्रा.डॉ.सागर जाधव यांनी वामनदादांच्या गीतांचे जे पाच खंड प्रकाशित केले आहे ते होय. वामनदादांनी स्वत: म्हटले आहे, ‘माधवराव नसते तर माझी कविता जनतेसमोर आली नसती.’ या दोघांच्या कष्टाला, कर्तृत्वाला आणि त्यांच्यातील सामाजिक जाणिवेला वामनदादांच्या शताब्दीनिमित्ताने भरविण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या वतीने सलाम करतो. वामनदादांच्या समग्र गीतांचे खंड प्रसिद्ध व्हावेत ही महाराष्ट्रातील तमाम लेखक कलावंतांची इच्छा आहे आणि त्यासाठी माझ्यासारखे चळवळीतील लेखक-कलावंत नक्कीच सक्रीय होतील असा माझा विश्वास आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके