डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1918 ते 21 अशी तीन वर्षे भारतात व जगभरात ‘स्पॅनिश फ्लू’ची साथ आली होती. त्या साथीत सर्वाधिक जीवितहानी भारताची झाली होती. किती लोक मृत्युमुखी पडले याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. पण ते आकडे सव्वा कोटी ते दोन कोटी यादरम्यान असतात. त्यावेळी भारताची लोकसंख्या  25 कोटी होती. म्हणजे त्या साथीत किमान 5 टक्के माणसे मृत्युमुखी पडली. परिणामी 1921 च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती, ती 1911 पेक्षा काही लाखांनी कमी भरली. असा प्रकार गेल्या शतकात एकदाच झाला आहे. तर त्या साथीचे वर्णन साने गुरुजींनी त्यांच्या ‘श्यामचा जीवनविकास’ या 1938 मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील एका प्रकरणात केले आहे. ते प्रकरण येथे पुनर्भेटीला आणले आहे. शंभर वर्षांत काय बदलले व काय नाही याचा विचार वाचकांनी करावा यासाठी... - संपादक
 

मित्रांनो, ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशात दृढ झाल्यापासून आपले फायदे काय झाले, ते मला तरी सांगता येत नाहीत; परंतु सहस्रावधी तोटे झाले, ते पर्वताप्रमाणे डोळ्यांसमोर उभे राहतात. आपण नि:शस्त्र केले गेलो. आपले पौरुष मारले गेले. आपला आत्मा खच्ची करण्यात आला. आपण लुळे व बुळे झालो. सदासर्वदा सरकारच्या तोंडाकडे पाहणारे आपण झालो. आपली कर्तृत्वशक्ती गेली. आपले धैर्य गेले. पोलीस हा आपला राजा झाला. पोलीस पाहून वाघाशीही झुंज घेणारे भिऊ लागले. पोलीस हा परमेश्वर. तो मागेल ते द्यावे, तो म्हणेल तिथे यावे. आपण गाईहून गाय झालो. गायही पिळून-पिळून शेवटच्या थेंबापर्यंत दूध काढणाऱ्याला लाथ मारते, परंतु आपणात रामच उरला नाही. बस म्हटले की बसावे, ऊठ म्हटले की उठावे- अशी जनतेची स्थिती झाली. ब्रिटिशांच्या सत्तेने माणसांची मेंढरे केली. काँग्रेस मायमाऊलीने अवतार घेतला. तिने पुन्हा माणुसकी दिली. ब्रिटिश सत्तेमुळे माणसांची माणुसकी गेली. उद्योगधंदे सारे बुडाले, बुडविण्यात आले. जिथे सोन्याचा धूर निघे, तिथे रडण्याचा सूर घरोघर निघू लागला. कोट्यवधी लोक बेकार झाले. अर्धपोटी लाखो राहू लागले. बेकारी वाढली, त्याबरोबरच दुष्काळही वाढले. पूर्वी शंभर वर्षांत एखादा दुष्काळ पडे तर आता दरसालच जणू दुष्काळ. दुष्काळात टिकाव धरणे कठीण होऊ लागले. लोकांत त्राणच उरले नाही. जरा पावसाने डोळे वटारले की, जनतेचे डोळे पांढरे होतात. महिनाभर पाऊस न पडला, तर लगेच आई-बाप चार-चार आण्यांस पोटचे गोळे मिशनरी लोकांना विकू लागतात. बेकारी, दुष्काळ, त्यांचेबरोबरच नवी-नवी व्यसने व नवे-नवे रोगही आले. जुगार रूढ झाले. दारू गावोगाव झाली. प्लेग, कॉलरा, इन्फ्लुएन्झा आले. भांडणे वाढली. आमच्यामध्ये भेद पाडण्यात आले. नोकरीशिवाय दुसरा उद्योगधंदा नसल्यामुळे हे भेद आणखीच वाढले. हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य या सर्वांच्या मुळाशी पोटापाण्याचा प्रश्न आहे. ‘तुला नोकरी की मला? तुझ्या लोकांना किती प्रमाणात, माझ्या लोकांना किती प्रमाणात?’ ह्याच गोष्टीला महत्त्व आले. कर्तृत्वाला वावच कोठे उरला नाही. असा हा राष्ट्राचा अंतर्बाह्य नाश या दिडशे वर्षांत झाला.

मला हे सारे आज का आठवते आहे? कारण आज मी तुम्हाला 1918 मधील मानमोडीच्या रोगाची अंगावर शहारे आणणारी हकिगत सांगणार आहे. युरोपात 1914 ते 1918 काळात महायुद्ध चालले होते. हिंदुस्थानचे दहा लाखांवर लोक त्या लढाईत लढत होते. दरिद्री हिंदी राष्ट्राकडून कोट्यवधी रुपये घेण्यात आले परंतु या दुर्दैवी राष्ट्राला त्याचा मोबदला काय मिळाला? युरोप खंडातील चिमुकल्या बेल्जियम देशाच्या संरक्षणासाठी, त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदी राष्ट्र लढले. हिंदी राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले का? आम्हाला जालियनवाला बागेतील गोळीबार मिळाले. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही मरावे, आमची बेडी मात्र कायम राहावी! अरेरे! त्या मागील महायुद्धात आमचे शूर शिपाई मेले, म्हणून लहान-लहान दगड सरकारने मेलेल्या हिंदी शिपायांच्या स्मारकासाठी उभारले; परंतु आम्हाला भाकरी मात्र दिली नाही. राष्ट्र भाकरी मागू लागताच पोटात गोळ्या गेल्या. जालियनवाला बागेतील गोळीबार ही एक देणगी आपणास मिळाली आणि दुसरी देणगी मानमोडीच्या साथीची! जे लोक परदेशातून परत आले- जे शिपाई परत आले, त्यांनी हा नवा रोग आपल्याबरोबर आणला. पूर्वी 1897 मध्ये प्लेग परदेशातून आला. पुन्हा 20 वर्षांनी एक नवा रोग आला. त्याला इन्फ्लुएंझा म्हणत. परंतु प्रतिभाशाली हिंदी जनतेने त्या रोगाला मानमोडी हे यथार्थ नाव दिले. अगडबंब संस्कृत प्रतिशब्द बनविणाऱ्या पंडितांना असे सुटसुटीत अर्थपूर्ण नाव देता आले नसते.

तो 1918 मधील नोव्हेंबर महिना असेल. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तर ‘मानमोडी’ या नव्या रोगाने हिंदुस्थानभर कहर माजविला. या रोगाने जेव्हा पहिला हल्ला चढविला तेव्हा लोक गळून जात, परंतु मरत नसत. त्या पहिल्या हल्ल्यात मी व राम सापडलो होतो. चार-पाच दिवस ताप यावयाचा, परंतु ताप निघाल्यावर चालवत नसे. जणू चार महिने ताप येत होता, इतकी अशक्तता त्या तापाने येत असे.

परंतु या पहिल्या हल्ल्यानंतर जो दुसरा हल्ला आला, तो अतिभयंकर होता. त्यातून मनुष्य वाचतच नसे. हिंदुस्थानभर हलकल्लोळ माजला. पुण्यास आमच्या घरी रामचा मोठा भाऊ अनंता या दुसऱ्या हल्ल्यात सापडला. त्याची सेवा-शुश्रूषा आम्ही केली. मोठ्या शर्थीने तो वाचला. पुण्याला रस्त्या-रस्त्यात प्रेतयात्राच दिसत. दोनशे-अडीचशे रोजचा मरणाचा आकडा प्रसिद्ध होऊ लागला. आमच्या कॉलेजच्या इमारतीत मोफत रुग्णालय उघडण्यात आले. कॉलेज बंद झाले. सेवेसाठी स्वयंसेवक नोंदवण्यात येऊ लागले. रामने स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविले. मला मुंबईस भावाने एकदम बोलावले, म्हणून मी मुंबईस निघून गेलो.

मुंबईस रोज सातशेच्या वर लोक मरत होते. ‘‘म्युनिसिपालिटी खरा आकडा लावीतच नसेल, हजारांवर मरत असतील!’’ असे जनता म्हणे. मृत माणसे न्यावयास चार माणसे मिळत नसत. कोणी कोणी आपल्या मृत माणसास पाठंगुळीस घेऊन स्मशानात जात. कोठे कोठे प्रेत काठीला बांधून दोघे-जण लोंबकळवीत नेत. खेड्यापाड्यांतून तर पुष्कळांनी प्रेतांना आपल्या घराशेजारीच अग्नी दिले. कोण येणार अन्‌ कोण उचलणार?

शहरांतून दुकाने उघडी असत, परंतु खेडेगावांतून दुकाने बंद झाली. सुंठ-साखर मिळायची नाही, औषध मिळावयाचे नाही. खेड्यांतून पत्र वगैरे मिळेना. टपालवाले आजारी पडले. सारा व्यवहारच जणू थांबला. जीवनच जणू थांबले. मृत्यूचे राज्य सर्वत्र होते. सर्वांची मान मुरगळली जात होती.

त्या तीन-चार महिन्यांतील सर्व कथा गोळा केल्या, तर कारुण्यसागर उचंबळेल. काही काही कुटुंबांतून सर्वच्या सर्व माणसे मरण पावली. सारी अंथरुणावर पडलेली. अन्नपाणी देण्यास कोणी नाही. आई-बाप, मुले-बाळे, बहिणी-भाऊ, पती-पत्नी सारी मरणशय्येवर. तो तिच्याकडे बघतो, ती त्याच्याकडे बघते. आई बाळाकडे बघते, बाळ आईकडे बघतो. आपल्या मुलाचे मरणकाळी मिटणारे डोळे माता बघते, परंतु तिला उठवत नाही. मुलाचे मरण पाहून तिला वात होतो. भयाण देखावे! दगडास पाझर फोडणारे प्रसंग!

एका गावी एक कुटुंब होते. त्या कुटुंबातील कर्ता मनुष्य आजारी पडला. त्याची आवडती मुलगी त्याच वेळेस आजारी पडली. ती दुसऱ्या खोलीत होती. बाप सारखे विचारी- बेबीचे कसे आहे? त्याला सांगण्यात येई की, बरे आहे. घरात आणखीही मुलेबाळे होती. पित्याच्या हृदयाला धक्का बसू नये, तो कर्ता मनुष्य दगावू नये म्हणून सारे जपत होते. समोर मरण होते. त्या मरणाचे वेळेसही आर्थिक प्रश्न डोकावत होते. ती आवडती मुलगी वातात होती, परंतु ते पित्याला सांगण्यात आले नाही. एक मरो, परंतु दहांचा पोशिंदा जगो, असे सर्वांस वाटत होते.

परंतु ती लाडकी मुलगी शेवटी मेली. ‘बाबऽ बाबाऽ’ करीत ती मेली. पलीकडच्या जरा लांबच्या खोलीत पिता तिची आठवण करीत होता. आपली मुलगी मरणाकडे गेली, हे त्याला माहीत नव्हते. मुलीचे मरण त्याला कळवण्यात आले नाही. इतर चिमण्या मुलाबाळांसाठी बाबा जगावे, म्हणून ती दु:खदायी वार्ता त्याच्या कानांवर घालण्यात आली नाही. आवडत्या मुलीचे मरण कळू नये म्हणून तिचा मृतदेह मुकाट्याने नेण्यात आला. मातेने शोकसागर गिळून ठेवला. तिने हुंदके आवरले. आपल्या लहानग्यास जवळ घेऊन, ‘‘रडू नका... त्यांना बरे वाटू दे.’’ असे ती सांगती झाली. परंतु पिताही वाचला नाही. मुलीचे नाव घेत तोही देवाघरी गेला. मग सारी म्हणू लागली की, मुलीची खरी हकिगत सांगितली असती तर! असे त्या मानमोडीत प्रसंग होते.

एके गावी याहूनही भीषण प्रसंग. एक भाऊ बहिणीच्या घरी सर्व जण आजारी म्हणून तिला मदत करण्यासाठी गेला. बहिणीच्या घरी सारे आजारी. दार उघडायलाही कोणी नाही. दाराला आतून कडी होती. फळ्या उखडून काढण्यात आल्या. भाऊ आत शिरतो तो सारी अंथरुणात... समोरच बहिणीचा चार वर्षांचा मुलगा अंथरुणात गतप्राण होऊन पडलेला होता! कोण होते पाणी द्यायला? कोण होते मांडीवर घ्यायला? सारेच तापात व वातात. ते दृश्य पाहून भाऊ दुःखाने गोठूनच गेला. तो तिथे नुसता उभा राहिला. ना डोळ्यात पाणी येई, ना काही. पलीकडे बहीण, पलीकडे तिचा पती. ते दोघे वातात बडबडत होते. काय करणार तो भाऊ? प्रिय भाच्याचे ते अंथरुणावर समोर प्रेत! त्याची आधी व्यवस्था त्याला करावी लागली, मग जिवंतांच्या जवळ त्याला जाता आले.

मानमोडीच्या दुसऱ्या हल्ल्यात लाखो स्त्रिया मेल्या- विशेषत: गरोदर स्त्रिया मरावयाच्या. माझ्या प्रिय वैनीची आई त्यातच मरण पावली. वैनीची आई व माझी आई मैत्रिणी होत्या. वैनीचे मन हळवे होते. नुकतेच लग्न झालेले. आई गेली म्हणजे एक प्रकारे माहेर गेलेच म्हणायचे. ‘माय ते माहेर’ अशी म्हणच आहे.

मी मुंबईत दादाकडे होतो. आमच्या प्रकृती बऱ्या होत्या, परंतु कोकणात आमच्या घरी व आमच्या आजोळी सारी आजारी होती. माझी अक्का माहेरी बाळंतपणासाठी म्हणून गेली होती. माझ्या वडिलांना चिंता वाटत होती. शेवटी तेच तापाने अंथरुणावर पडले. नंतर ती आमची दुर्वांची आजी- तीही आजारी पडली. तिकडे आजोळी आजोबा आजारी पडले. बाळंतपणासाठी म्हणून अक्का आली होती, परंतु तीच सर्वांची शुश्रूषा करू लागली. धाकटा भाऊ पुरुषोत्तम थोडी मदत करी.

आजोबा व दुर्वांची आजी यांना घमेले-घमेलेभर कफ पडे. कशी वाचतील, असे मनात येई. गावात सर्वत्र आजारीच आजारी. आमच्या घरासमोर पोस्टमास्तर होते. त्यांच्याकडे त्यांची आई आजारी. शेजारी आप्तेष्ट होते, ते आजारी. समाचाराला कोण येणार? विसावा कोण देणार? घरोघर मरण नाचत होते.

त्या वेळची एक आठवण सांगतात. आमच्या शेजारी एक गृहस्थ होते. त्यांच्या घरीही अंथरुणे होतीच. त्यांचा मुलगा वातात होता. तो वातात म्हणे, ‘‘ते पाहा चार-जण आपल्या अंगणातून येत आहेत. मला न्यायला येत आहेत. अरे...! परंतु ते माघारे गेले. आपल्या कवाडीतून परत गेले. समोर पोस्टमास्तरांच्या घरी गेले ते!’’ आणि काय आश्चर्य! पोस्टमास्तरांची आई त्याच वेळी तिकडे मरण पावली आणि या गृहस्थांचा मुलगा पुढे बरा झाला!

खरोखरच कोणी परलोकीचे आत्मे बोलवायला येतात की काय? आपणास नेण्यासाठी येतात की काय? माझा धाकटा भाऊ सदानंद मेला, तेव्हा तो असेच म्हणाला आणि या मानमोडीच्या साथीतील हा एक अनुभव. कोणी कोणी शास्त्रज्ञ म्हणतात की, परलोक आहे म्हणून. केवळ हसण्यावारी नेण्यासारख्या या गोष्टी नाहीत. संशोधन करण्यासारख्या या गोष्टी आहेत. या दंतकथाही नाहीत, अनुभवाच्या या गोष्टी आहेत.

आमच्या घरी दुर्वांच्या आजीची प्रकृती अधिकच बिघडली. तिने सर्व निरवानिरव केली. तिने आपले चांदीचे फुलपात्र, हातातील सल्लेजोडी व अंगठी, तिचे कोणाकडे पैसे थोडे घेणे होते ते निरनिराळ्यास दिले. ती अक्कास म्हणाली, ‘‘चंद्रे, तू आलीस सेवा-शुश्रूषा करायला. तुला हे फुलपात्र घे. तुझीही आई नाही. जपून राहा.’’ आजी शेवटची बोलणी करीत होती, परंतु तिकडे वडील आजारी होते. त्यांना ती वार्ता नव्हती. त्यांच्या अंगात ताप फणफणत होता. आजीचा शेवटचा क्षण आला. तिने राम म्हटला. आजी म्हातारी झाली होती. ती आमची सख्खी आजी नव्हती, तरी तिचा आम्हा भावंडांवर लोभ होता. धाकटा भाऊ पुरुषोत्तम व अक्का रडू लागली. मरणाच्या आधी आजीच्या अंगाला घामाची जणू उपळ फुटली. अंगाला जणू शेकडो पाझर फुटले. प्राण जणू त्या घामातून निघून जात होते! शेवटी अक्काने तापाने फणफणलेल्या वडिलास सांगितले की, दुर्वांची आजी गेली!

तो काय आश्चर्य! वडील एकदम उठले. त्यांचा ताप एकदम गेला. जणू नवी शक्ती आली. आजीची क्रिया केली पाहिजे; घरात दुसरे कोण, असे जणू त्यांच्या मनात आले. मन म्हणजे अजब चीज आहे. मनाचे खेळ आश्चर्यकारक आहेत. संकल्पशक्ती हीच खरी शक्ती आहे. एका क्षणात ताप कुठे गेला? ज्यांना उठवत नव्हते, त्यांच्यात स्मशानात जाण्याची ताकद कशी आली? कोठून आली?

दुर्वांच्या आजीला नेण्याची तयारी झाली. घरातून आता प्रेत बाहेर काढायचे, परंतु एक निराळाच प्रसंग उभा राहिला. आमचे बरेचसे दूरचे एक चुलते होते. त्यांचा इतर स्वभाव चांगला होता. ते निर्भय होते. त्यांची शरीरप्रकृती दणकट होती. धिप्पाड होते दिसायला. करारी होता त्यांचा स्वभाव. गावात एकदा एक वात्रट तमाशा आला होता. खूप गर्दी होती. परंतु, हे आमचे चुलते हातात सोटा घेऊन एकटे उभे राहिले. ते म्हणाले, ‘‘तमाशा बंद करता की नाही?’’ शेवटी तमाशा बंद झाला. परंतु असे गुण होते, त्यात एक दर्गुण होता, तो म्हणजे भाऊबंदकी. आपल्या देशाला कौरव-पांडवांच्या वेळेपासून हा शाप आहे. आजही आपण परकीयांचे पाय धरू, परंतु भावास मातीत मिळवू. हिंदू-मुसलमान एकमेकांना पाण्यात पाहू, परंतु उभयजण ब्रिटिशांशी गोंडा घोळू. आमचे ते लांबचे चुलते एकदम दारात येऊन बसले. ते म्हणाले, ‘‘प्रेत बाहेर काढू देणार नाही. या घरावर, या परसावर आता माझा हक्क आहे. तुम्ही हे घर सोडून आधी बाहेर पडा, मग प्रेत बाहेर पडेल; तोपर्यंत नाही!’’

आता काय करायचे? माझे वडील अशक्त. ते चुलते धिप्पाड तर माझे वडील काटकुळे. त्यातून तापातून उठलेले. त्यांनी व इतरांनी परोपरीने विनविले; परंतु ते ऐकेनात, प्रेताला हात लावू देत ना. वडील रडकुंडीला आले. आता का मारामारी करायची? मृत्यूशी मारामारी चालली होती, ती करता येत होती. परंतु भावाशी मारामारी करणे मृत्यूशी झगडण्यापेक्षाही कठीण.

शेवटी गावचे फौजदार का कोणी पोलीस अधिकारी आले. त्यांनी धमकी दिली, तेव्हा ते चुलते दूर झाले. भावाच्या प्रार्थना आपण ऐकणार नाही... भावांचे प्रणाम, भावांच्या डोळ्यांतील अश्रू यांनी आमची मने द्रवणार नाहीत; परंतु सरकारचा सोटा दिसला की, आम्ही दबतो. आम्ही सोट्याला भितो. आम्ही सत्याला, सदसद्‌विवेक  बुद्धीला, ईश्वराला, अश्रूला, प्रार्थनेला, प्रेमाला हृदयात स्थान ठेवले नाही. आमचा देव एक. तो देव म्हणजे सत्ता. सोट्याची सत्ता. या सत्तेपुढे आम्ही नमतो, या सत्तेला मान देतो. या सत्तेपुढे प्रेम पाघळते, या सत्तेची स्तोत्रे गातो. मानवाचा केवढा हा अधःपात!

दुर्वांची आजी गेली. तिच्या किती तरी आठवणी मला येतात. ती माझ्या पायांना लहानपणी गाईचे दूध चोळी. माझे डोळे दुखरे होते, म्हणून ती काळजी घेई. कधी कोठे वडी वगैरे मिळाली, तर मला आणून देई. मी परगावी शिकण्यासाठी निघालो की- आवळ्याच्या वड्या, कोकमतेलाचा तुकडा ती नेहमी द्यायची. तिला किती गाणी येत, किती गोष्टी येत! गेली- मानमोडीला ती बळी पडली. माझ्या वडिलांना घरात तिचा आधार होता. आई तर मागेच देवाघरी गेली होती. वहिनी मुंबईस भावाकडे असणार. दुर्वांची आजी घरी स्वयंपाक करी. परंतु, आता कोण? आता वडिलांच्या हाती कायमची चूल आली.

आजोळी आजोबाही अत्यवस्थ होते. आजी व अक्का यांनी खूप शुश्रूषा केली. यश आले. ते बरे झाले. वडीलही बरे झाले. आमचा घरचा एकच बळी गेला. परंतु या मानमोडीच्या साथीला हिंदुस्थानात पाऊण कोटी लोक बळी पडले. पाऊण कोटी लोक मेले, मग आजारी किती पडले असतील? तीन-चार कोटी लोक तरी आजारी पडले असतील. म्हणजे देशातील आठवा हिस्सा प्रजा या रोगाने पछाडली गेली! याचा अर्थ काय?

याचा अर्थ एकच- ही हिंदी जनतेची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. ज्याप्रमाणे जरा दुष्काळ येताच उपासमार समोर उभी राहते, मुले विकण्याची वेळ येते; त्याप्रमाणे जरा एखादी साथ येताच लाखो माणसे भराभरा बळी पडतात. त्या रोगापुढे शरीर टिकू शकत नाही. लोकांची शरीरे दुबळी व नि:सत्त्व झालेली. एकदा एक गृहस्थ मजजवळ म्हणाले, ‘‘पूर्वीप्रमाणे धष्टपुष्ट माणसे आता दिसत नाहीत.’’ कोठून दिसतील? शेतसारे पूर्वीपेक्षा तिपटीने वाढले, परंतु शेतात खंडीचे तीन खंडी पिकण्याऐवजी दहा मणच पिकू लागले. कराचे बोजे वाढले. उद्योगधंदे नाहीत. लोकसंख्या वाढली. जमीन तितकीच. तीही नापीक होऊ लागली. खते भरपूर नाहीत. गुरेढोरे कमी. कारण गवतावरही कर बसले. अशा सर्व आपत्तीमुळे सर्वत्र उपासमार. खरोखर हजारोंना पोटभर खायला मिळत नाही.

मानमोडीची साथ आली, पाऊण कोटी लोक मेले; परंतु सरकारने काय केले? चौकशी केली का? इतके लोक का मेले? ठायी-ठायी दवाखाने होते का? लोक का इतके दुबळे झाले? केली का चौकशी? लाखो लोकांना दवा ना पाणी. घरांना आतून कड्या लावून आत लोक मरत होते. दार ठोठावून कोणी डॉक्टर, कोणी सेवा करणारा स्वयंसेवक येत नव्हता; परंतु मरण मात्र दारे बंद असली तरी आत येत होते आणि या दरिद्री जनतेला देवाघरी घेऊन जात होते.

हिंदी माणसे मेली काय, जगली काय- त्याची परकी सरकारला काय पर्वा? आम्ही काळे आदमी. आम्ही का जगायला लायक आहोत? मुंबईला मागील महायुद्धाचे वेळेस कुलाब्याला एक वॉर हॉस्पिटल होते. गोऱ्या शिपायांसाठी होते. त्या हॉस्पिटलमध्ये एकदा एका खाटेवर एक ढेकूण सापडला. एक ढेकूण गोऱ्या शिपायाचे रक्त खाईल म्हणून, लगेच म्हणे एक कमिशन नेमले गेले. ढेकूण कसा आला याची म्हणतात चौकशी झाली. परंतु पाऊण कोटी लोक मानमोडीस बळी पडतात; आमची कोण करील चौकशी?

माझे एक मित्र इंग्लंडमध्ये जाऊन आले होते. ते सांगत- इंग्लंडमध्ये एखाद्याच्या पायात बूट नसेल तर सरकारी खर्चाने त्याला बूट देण्यात येतो. तिकडील प्रजेची किती काळजी घेण्यात येते, परंतु हिंदुस्थानात कोट्यवधी मेले तरी कोणाला काळजी?

आमच्याकडील प्रखर उन्हाळ्यात किती जणांच्या पायांत नाही, हे पाहावयास कधी गेले का सरकारी शिपाई? आमच्या पायांत आहे की नाही, पोटात अन्न आहे की नाही, अंगावर कपडा आहे की नाही, डोक्यात ज्ञान आहे की नाही- कोण करणार याची चौकशी? इंग्लंडमध्ये दर महिन्यास बेकारांची गणती होते. बेकारांना काम तरी दिले जाते, नाही तर सरकारी तिजोरीतून त्यांच्या कुटुंबास पुरेसा भत्ता दिला जातो. आमच्याकडील बेकारांची होते का कधी शिरोगणती? आमच्याकडे अगणित बेकार आहेत.

व्हाइसरॉयसाहेबांनी क्षयरोग निवारणार्थ फंड काढला. चांगली आहे ही गोष्ट. परंतु एखादा क्षयरोगाचा दवाखाना किती लोकांस पुरणार? गावोगावी क्षयरोगी आहेत. मी कोकणात एका खेड्यात गेलो होतो. तेथील माझा मित्र म्हणाला, ‘‘या लहानशा गावात पन्नास-पाऊणशे क्षयी लोक आहेत.’’ मी म्हटले, ‘‘याचे काय कारण?’’ तो म्हणाला, ‘‘कोकणातील शेतकरी श्रम करतात, त्या मानाने पोटभर खावयास मिळत नाही. म्हणून हा क्षयरोग आहे.’’ ते माझ्या मित्राचे शब्द ऐकून मला लहानपणाची आमच्या घरची गोष्ट आठवली.

आमच्या घरी गोपाळ म्हणून एक गडी कधी कधी कामाला यायचा. त्याच्या बायकोचे नाव बया. गोपाळ खूप सशक्त होता. त्याचा आहार चांगला होता. तीन निठव्यांचा म्हणजे दीड शेराचा भात तो एका वेळेस जेवे. मी एकदा त्याला म्हटले, ‘‘गोपाळ, तू किती जेवतोस!’’ त्या वेळेस गोपाळ म्हणाला, ‘‘श्याम, अरे तुमच्याकडे कामाला येतो, त्या वेळेस हो मी पोटभर जेवतो. आम्ही घरी इतके रोज कोठून जेवणार? आम्हाला कसे परवडणार? आम्ही घरी अर्धपोटी असतो हो.’’

गोपाळचे ते शब्द मी विसरणार नाही. अर्धपोटी राहणाऱ्यांची पुढील पिढी आणखीच नि:सत्त्व होणार. गावोगाव मग क्षयरोग नाही पसरणार, तरच आश्चर्य!

हिंदुस्थानचा क्षयरोग खरोखर जायला हवा असेल, तर व्हाइसरॉयसाहेब ब्रिटिशांना सांगतील, ‘‘हिदुस्थानचे रक्तशोषण बंद करा. या महान देशाला स्वातंत्र्य द्या.’’

आणि स्वातंत्र्य पाहिजे ते मूठभर भांडवलवाल्यांचे नव्हे, खरे गोरगरिबांचे स्वातंत्र्य हवे. असे स्वातंत्र्य येईल तेव्हाच रोग हटतील, पोटभर खायला मिळेल. ज्ञान येईल, आनंद येईल. असे गरिबांचे स्वातंत्र्य आणण्यासाठी एक काँग्रेस धडपडत आहे; बाकी इतर संस्थांचे गरिबांकडे लक्षही नाही. इतर संस्था वरिष्ठ वर्गांच्या, वरिष्ठ जातींच्या. कोट्यवधी शेतकरी, लाखो कामकरी यांच्याकडे काँग्रेसचे लक्ष आहे, अधिकाधिक जात आहे. इतर संस्था धर्माच्या नावाने ओरडत आहेत, परंतु खरा धर्म सर्वांना सुखी करणे हा आहे.

ब्रह्माच्या अनेक व्याख्या आहेत. परंतु पहिली व्याख्या जी शिकविली पाहिजे, ती म्हणजे- ‘अन्न ब्रह्म.’ परंतु हा ओदनरूपी परमेष्ठी, हे अन्नब्रह्म सर्वांना नेऊन भेटवू- असे कोणाला वाटते आहे? कोट्यवधी लोकांच्या पोटात घास नाही, म्हणून कोणाला पोटदुखी लागली आहे? धर्माच्या वरवरच्या गप्पा काय कामाच्या?

भगवान बुद्धांनी एकदा शिष्यांना सांगितले, ‘‘जा आता दशदिशांत आणि प्रेमाचा उपदेश करा.’’ शिष्य निघाले. काही शिष्यांना जवळच एका झाडाखाली एक मनुष्य आढळला. ते शिष्य त्याच्याजवळ गेले व म्हणाले, ‘‘म्हण, अक्रोधाने क्रोध जिंकावा, जगाला प्रेम द्यावे. म्हण-’’ तो म्हणेना. शिष्य म्हणाले, ‘‘याला उचलून भगवान बुद्धांकडे नेऊ या.’’ त्यांनी त्याला उचलून बुद्धांकडे आणले. ते म्हणाले, ‘‘भगवन्‌, हा नास्तिक दिसतो. याला सूत्रे शिकवतो, तर म्हणत नाही.’’ कारुण्यसिंधू बुद्धदेवांनी त्या माणसाकडे पाहिले. ते शिष्यांना म्हणाले, ‘‘घरात काही फळे असली, तर याला आणून द्या. काही तरी याला आधी खायला द्या.’’ शिष्यांना आश्चर्य वाटले. धर्मसूत्रे शिकविण्याऐवजी आधी हे खायला कसे देतात? परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. नंतर बुद्धदेव त्या माणसाला म्हणाले, ‘‘मित्रा, आता जरा झोप. विश्रांती घे.’’ तो मनुष्य झोपला.

‘‘भगवन्‌, तुम्ही त्याला धर्म शिकविण्याऐवजी खायला दिलेत, झोपायला सांगितलेत- हे कसे?’’ शिष्यांनी विचारले.

बुद्धदेव म्हणाले, ‘‘या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे, तरच त्याला समजेल. उपाशीपोटी तो काय म्हणेल? काय ऐकेल? ज्याला-त्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी बोलले पाहिजे. उपाशी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा. लोक पोटभर जेवू देत, नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू.’’

हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांस भाकर आधी देऊ या. त्यांना पोटभर खाऊ दे, पोटभर लेऊ दे. अन्नब्रह्म आधी द्या- मग विज्ञानब्रह्म, मग आनंदब्रह्म. परंतु आधी कोठला धर्म? कोठली संस्कृती? ते सारे ‘आधी कळस मग पाया रे’ असे होईल. कोट्यवधी उपाशी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडावावयास जो उभा राहील, तो खरा धार्मिक. तो खरा हिंदूधर्माचा, तो खरा मुस्लिम धर्माचा... तो खरा देवाचा उपासक, जगन्मातेचा लाडका!

1918 च्या मानमोडीच्या साथीत डॉक्टरांनी अपार पैसा मिळविला. जे भिकारी होते, त्यांनी मोटारी घेतल्या. ‘‘तो मला पंचवीस रुपये देत आहे, तुम्ही तीस देत असाल तर तुमच्याकडे येतो-’’ असे काही डॉक्टर खुशाल सांगत. ज्या समाजात अशी समाजरचना आहे, ती मोडून नवी समाजरचना निर्मिली पाहिजे. जो खरा डॉक्टर असेल, तो आज क्रांती करायला उभा राहील. तो म्हणेल, ‘‘खरे औषध म्हणजे पोटभर अन्न, बेताचे श्रम, राहायला हवेशीर घर, जरुरीइतका कपडा.’’ परंतु या गोष्टी किती जणांस आज या देशात मिळतात?

आजारात सर्वत्र मोफत औषध मिळेल, गरिबातील गरिबासही इन्जेक्शन घेता येईल, शास्त्रीय उपचार त्याला मिळतील- अशी समाजव्यवस्था कधी होईल? ज्या वेळेस ‘हा श्रीमंत व हा गरीब’ हा भेदच जगातून जाईल तेव्हा. मानवतेचा खरा धर्म येईल तेव्हा. तोपर्यंत मानमोडी येणार आणि कोट्यवधी लोकांची मान मोडणार, देवाच्या लेकरांचा भयानक संहार होणार! माझी मायमाऊली काँग्रेस तरी दिवसेंदिवस अधिकाधिक मानव्याची खरी उपासक होवो, दरिद्र नारायणाकडे जावो- हीच माझी आशा, हीच माझी प्रार्थना! हिंदुस्थानात खरे स्वातंत्र्य येवो!

Tags: पांडुरंग सदाशिव साने मराठी साहित्य श्यामचा जीवनविकास गौतम बुद्ध स्पॅनिश फ्लू साने गुरुजी autobiographical sane guruji on pandemic sane guruji sane guruji novels infuenza aticles on corona articles on pandemic corona virus pandemic weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Hira- 13 Jun 2021

  Kaal Ani aaj, aksharshha tantotant. Kiti sopyaa shabbat samjaavlaa shaashvat maanavtaadharma!

  save

 1. Pankaj muttepawar- 14 Jun 2021

  साने गुरुजींचे शब्द नेहमी ह्रदयाला भिडतात. किती यथार्थ वर्णन केले आहे!

  save

 1. pratap poman- 14 Jun 2021

  काळ बदलला तरी परिस्थिती तिच आहे.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके