डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नव्या स्वरूपात ‘केसरी’ निघू लागला व इथपर्यंत तो वाढत आला यात अलीकडील ‘केसरी’च्या विश्वस्तांची, चालकांची, संपादकांची व जयवंतराव टिळकांची कामगिरी फार मोठी आहे. त्यांनी जुन्या वारशाची भिंत अनुल्लंघ्य होऊ दिली नाही. ‘केसरी’ अद्ययावत यंत्रसामग्री, आधुनिक व्यवस्थापन, जाहिरात आणि संपादन विभाग या वैभवासह गेल्या काही वर्षांपासून आपल्या देखत वाढतो आहे.

‘केसरी’ला 1981 च्या 4 जानेवारीला 100 वर्षे पूर्ण झाली.

हा प्रदीर्घ कालावधी तर महत्त्वाचा आहेच, परंतु या अवधीत ‘केसरी’त केलेली वाटचाल व मराठी जीवनावर त्याने उमटवलेला ठसा अधिक महत्त्वाचा आहे. साप्ताहिक, अर्ध-साप्ताहिक इथपासून वाढत वाढत ‘केसरी’चे दैनिकात रूपांतर झाले. या प्रत्येक अवस्थेत ‘केसरी’ आपले वैशिष्ट्य टिकवून राहिला. आज एका अद्ययावत आणि परिपूर्ण मराठी दैनिकाच्या स्वरूपात ‘केसरी’ आपल्याला दिसतो आहे. 

‘केसरी’ची आताची अगर काही वर्षांपूर्वी दैनिकांत रूपांतरित झाल्यानंतरची वैचारिक दिशा अनेकांच्या दृष्टीने विवाद्य राहिली, हा भाग जर सोडला, तर ‘केसरी’चा विकास आणि त्याची वाटचाल निश्चितच अभिनंदनीय आहे. ‘केसरी’ला लोकमान्यांची पुण्याई व महत्तता लाभली हे जसे त्याचे शक्तिस्थान आहे, त्याचप्रमाणे थोरामोठ्यांचा अशा प्रकारचा वारसा ही विस्ताराच्या आड येणारी मर्यादाही ठरू शकते. अशी उदाहरणे पुष्कळ आहेत. 

नव्या स्वरूपात ‘केसरी’ निघू लागला व इथपर्यंत तो वाढत आला यात अलीकडील ‘केसरी’च्या विश्वस्तांची, चालकांची, संपादकांची व जयवंतराव टिळकांची कामगिरी फार मोठी आहे. त्यांनी जुन्या वारशाची भिंत अनुल्लंघ्य होऊ दिली नाही. ‘केसरी’ अद्ययावत यंत्रसामग्री, आधुनिक व्यवस्थापन, जाहिरात आणि संपादन विभाग या वैभवासह गेल्या काही वर्षांपासून आपल्या देखत वाढतो आहे. ‘केसरी’चे हे यश उल्लेखनीय नाही असे कोण म्हणेल? ‘केसरी’कडून महाराष्ट्रीय माणसाच्या काही अपेक्षा राहात आल्या आहेत. लोकमान्यांनी, त्याच वेळी आगरकरांनी व नंतरच्या काही पूर्वसूरींनी अगदी थेट ग. वि. केतकरांपर्यंत ‘केसरी’ हे ध्येयसिद्धीचे एक लढाऊ हत्यार, लोकमत व्यक्त करण्याचे प्रभावी साधन, लोकमत बनविण्याचे व लोकशिक्षण करण्याचे समर्थ माध्यम राहात आले. ‘केसरी’ हा नेताच राहात आला. तात्यासाहेब केळकर, ज. स. करंदीकर आणि ग. वि केतकर यांच्या काळात, किंबहुना टिळकांच्या नंतर ‘केसरी’चे नेतृत्व गौणत्वाला गेले. तथापि वैचारिक अशा अनेक क्षेत्रांत ‘केसरी’ आपले नेतृत्व टिकवून राहिला. 

पुढे जयंतराव टिळकांनी ‘केसरी'कडे लक्ष देण्यास सुरुवात केली, तेव्हा परत एकदा महाराष्ट्राचे व्यापक नेतृत्व करण्याची कामगिरी ‘केसरी’वर येऊन पडली आणि त्याने ती चांगली पार पाडली. संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती या आंदोलनांत ‘केसरी’ महाराष्ट्राचे मुखपत्र व नेता म्हणूनच पुढे आला. ‘केसरी’चा पसारा याच काळात वाढला. अद्ययावत दैनिक म्हणून त्याचा विस्तार होऊ लागला आणि दुर्दैवाने याच काळात ‘केसरी’ला सत्ताकारणाची बाधा जडली. ज्या जयंतराव टिळकांनी ‘केसरी’चे मर्यादित नेतृत्व व्यापक बनविले, त्यांनीच सत्ताकारणाच्या नादी लागून स्वतंत्र बाण्याचे निर्भिड दैनिक म्हणून ‘केसरी’ला वाढू न देता सत्तेच्या कोंडवाड्यात नेऊन बांधले. 

सार्वजनिक कर्तव्य आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा यांच्यात संघर्ष निर्माण होऊन व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला प्राधान्य मिळते तेव्हा सार्वजनिक जीवनाची मूल्ये गौण ठरतात. व्यक्तिहितालाच अग्रस्थान मिळते. ‘केसरी' आज ज्या राजकीय राहोटीत वावरतो आहे, तो स्वाभाविक विचार परिवर्तनाचा भाग असता तर विशेष वाटले नसते. परंतु ‘केसरी’ची आताची भूमिका वैचारिक विकासप्रक्रियेतून अथवा चिंतनातून निर्माण झालेली नाही. वाहत्या वाऱ्याला पाठ देण्याचे हे कौशल्य राजकीयदृष्ट्या कदाचित यशस्वीही होईल. परंतु ‘केसरी’ने आजवर जो ध्येयवाद जोपासला, जो लढाऊ बाणा विकसित केला आणि जननिष्ठेचा शतायुषी आदर्श निर्माण केला त्याला गौणत्व येईल. नव्हे आलेच आहे. आणि तरीही ‘केसरी’चे शतायुषी अस्तित्व अजून दीर्घकाळ मराठी वृत्तसृष्टीला प्रेरणादायक म्हणून हवेच आहे. ‘केसरी’ला आमच्या शुभेच्छा! 

Tags: मराठी साहित्य पत्रकारिता जयंतराव टिळक वृत्तपत्र केसरी Marathi literature journalism Jayantrao Tilak daily kesri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके