डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

देबजीत सारंगी : अन्नपरंपरेसाठी आयुष्य वेचणारा

कविता सांगत होती की, लिव्हिंग फार्मचं सर्वांत मोठं यश म्हणजे त्यांनी ओडिशा व छत्तीसगढ़ राज्य शासनाला अनेक प्रकल्पांत प्रभावित केलं आहे. देबजीत व त्याची पत्नी ज्योती यांनी स्वत: हातानं आदिवासी अन्न शिजवून दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खावू घातलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ओडिशा शासनाने ‘ओडिशा मिलेट मिशन’ (ओडिशा भरड धान्य योजना) लागू केली. त्या दोघांनी ग्रीन कॉलेज सुरू करायचा घाट घातला होता. सध्या चालू असलेल्या सर्व शाळा-कॉलेजेसना देबजीत जर्मनीने ‘ज्यू लोकांकरता बांधलेला राजकीय गुन्हेगारांचा कोंडवाडा’ (कॉन्सन्ट्रेशन कँप) म्हणतो, त्याऐवजी स्थानिक समस्यांकरता सुरू केलेलं ग्रीन कॉलेज आदिवासी मुलांना प्रगतिपथावर नेईल. उद्यमी मुलांना तो या कार्याकरता प्रवृत्त करत असे.

सकाळ-दुपार-सायंकाळ ओडिशाच्या आदिवासी भागात फिरून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़च्या 2,200 आदिवासींबरोबर संवाद साधणारा देबजीत मे महिन्यात 54 व्या वर्षी स्वर्गवासी झाला. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलेफोर्नियामध्ये त्यांनी जगातील अन्न विशेषज्ञांंना पहिलाच प्रश्न विचारला होता, ‘‘अन्न म्हणजे काय?’’ वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून वेगवेगळी उत्तरं ऐकल्यानंतर त्याने पृच्छा केली.

‘‘अन्न तुमच्या जीवनाचं सर्वांत मोठं कारण असूनही तुम्ही घास घ्यायच्या आधी विचारता की, हे कुठून आलंय? कोणी पैदा केलंय? कुठल्या मातीतलं आहे? विषयुक्त आहे की विषमुक्त आहे? आपल्या भारतात अन्नउत्सव साजरा केला जातो. अन्न पिकल्यावर त्याची पूजा केली जाते, त्याला सण म्हणून त्याची ढोल-ताश्याने यात्रा काढली जाते. देवाचा आम्हांला मिळालेला फार मोठा प्रसाद मानतात आमचे आदिवासी लोक. अन्न पिकवणे, शिजवणे व सर्व लहानमोठ्या लोकांबरोबर वाटून खाणे ही आमची भारताची श्रेष्ठ परंपरा आहे. अन्न आम्ही कधी विकत नाही. आमच्यांतच वाटून त्याच्या मोबदल्यात जीवनावश्यक सर्व वस्तू आम्ही गावातूनच मिळवतो. आज काय हाल झाले आहेत अन्नाचे? मानसेंटोसारख्या मूठभर धनदांडग्यांनी त्याचा मोठा व्यापार मांडून सर्व जग आपल्या ताब्यात घेतले आहे. शंभर, पाचशे, हजार हेक्टर्सवर यंत्राच्या साहायाने तुम्ही अन्न पिकवून ते विकता, त्यावर नफा मिळवता? आपल्याकडे हजारो, लाखो लहानलहान शेतकरी आपल्या शेतात तेच अन्न पिकवतात.’’ (अलायन्स फॉर सस्टेनेबल ॲंड होलिस्टिक ॲग्रिकल्चरची) कविता कुरूंगटी सांगत होती, देबजीत बोलत नव्हता. त्याचं तीस वर्षाचं कार्य बोलत होतं ओडिशामध्ये. त्याचं फार मोठं शिक्षण झालेलं नव्हतं, त्याने बरीच पुस्तकं वाचून हातावेगळी केली होती. आदिवासींचे, स्त्रियांचे अधिकार, आरोग्य आणि पौष्टिक अन्न, जैविक शेती, वनशेती, योग, आयुर्वेद- अशी कोणती शाखा होती, जिचा त्याने अभ्यास करून शोध नव्हता घेतला? कोलकात्याच्या समाजशास्त्री अर्धेन्दु चॅटर्जीला आपला गुरू मानून त्याने जैविक शेतीचे आरंभीचे धडे घेतले, नंतर स्वत:ची संस्था उभी केली- ‘लिव्हिंग फार्म्स.’ त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण तो डगमगला नाही, शांत, संयमी राहून त्याने मार्ग काढला.

त्याला साथ मिळाली डॉ. देबल देबची. भली मोठी नोकरी सोडून रॉकेलच्या दिव्यात, झोपडीत राहणाऱ्या व आदिवासींच्या स्थानिक तांदळाच्या प्रजाती संरक्षित करणारा देबल देब जणू त्याचा भाऊच! दोघांनी मिळून आदिवासींचे वनअधिकार, अन्न सुरक्षा, देशी बियाण्यांंची जमवाजमव यांचे शिक्षण, आरोग्य सर्व काही केले. तेही विकासाच्या नावाखाली, बाहेरून आक्रमण करणाऱ्या, तुमचं सर्वस्व ओढून घेणाऱ्या शासकीय प्रकल्पाविरुद्ध आदिवासींची एकजूट करत. कल्पना करा- पैशाची अजिबात ओढ नसणारा आमचा आदिवासी समाज, व प्रत्येक गोष्ट पैशावर तोलणारे आमचे मोठमोठे प्रकल्प- ज्या अन्नाकरता शेतकरी काबाडकष्ट करून आपले सर्वस्व पणाला लावून ते पिकवतो, ते तुम्ही राजकीय सत्ता कायम राखायला एक-दोन रुपये किलोच्या दरात विकताय? देबजीतचं लिव्हिंग फार्म शेतकऱ्यांना आपल्या परसात स्वत:करता अन्न-भाजीपाला पिकवा, जंगलाची नासधूस करू नका, ज्या फिरत्या शेतीवर (झूम कल्टिव्हेशन)ला आपल्या आधुनिक शेतीतज्ज्ञांनी नाकारलं आहे, ते अन्न स्थानिक लोकांसाठी किती पौष्टिक आहे, हे सर्वांना पटवून देत होता.

देबजीतचं सर्वांत महत्त्वाचं कार्य म्हणजे विस्मरणात गेलेल्या अनेक महत्त्वाच्या जंगली धानांना परत प्रकाशात आणणं. दिल्लीत भरलेल्या किसान स्वराज्य संमेलनामध्ये त्याने आदिवासी समूहाकडून शिजवलेलं अन्न प्रदर्शनात येणाऱ्यांना चाखायला दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे दिल्लीचे अन्नतज्ज्ञ देविंदर शर्मा म्हणाले की, अशाच एका संमेलनात ओडिशाहून आलेल्या आदिवासी महिला लक्ष्मी मिडिक्काने मला 1582 व्यंजनांचं महत्त्व सांगितलं, तेव्हा मला प्रथमच जाणवलं की स्वत:च्या देशाबद्दल मी किती अनभिज्ञ आहे. या 1582 व्यंजनामध्ये मासे, झिंगूर, पक्षीही होते. आणि 112 असे खाद्यान्न होते, ज्यांची शेतीच केली जात नाही. यात ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड येथील आदिवासी महिलांनी या खाद्यान्नांच्या पौष्टिकतेबद्दल महत्त्व सांगितलं.

‘‘आम्हांला तुमची अन्नसुरक्षा प्रणाली नकोय,’’ कटलीपाडार गावची मिनाती हुईका खडसावून सांगत होती. ‘‘तुम्ही आमच्या गावात राशनची दुकानं मांडून आमचं अन्न हिसकावत आहात. किती परिश्रम घेतले आमच्या पूर्वजांनी ते जपायला? आम्हांला विकास शिकवू नका. शेकडो वर्षे आम्ही आमचे पहाड़, जंगल, नद्या सांभाळून आहोत.’’ तिने मला सियाली शेंग दाखवली. फार मोठ्या आकाराची, तिला वाळवून उकळून ते खातात. तिच्या डहाळ्या, दोऱ्या बनवायच्या कामी येतात. पानांची ताटं बनवतात. कुसुम कोळीची पानं जनावरांना चारा म्हणून खाऊ घालतात. फळं खातात व खोड स्वयंपाकाकरता वापरतात. बियांपासून तेल निघतं, ते डासांना पळवायला व चामडीच्या रोगांवर कामी येतं.

हे सर्व देबजीत करत होता. ‘‘तुला हे सर्व स्वप्नरंजित नाही वाटत?’’ देविंदरने देबजीतला विचारलं. ‘‘इथंच तर आमचं चुकलं. हा समुदाय निसर्गाच्या कुशीत आहे. आम्हांला त्यांच्यापासून बरंच शिकण्यासारखं आहे. आम्ही संपून जाऊ पण ते जगतील.’’ देबजीत म्हणाला आणि मी गप्प बसलो.

कविता सांगत होती की, लिव्हिंग फार्मचं सर्वांत मोठं यश म्हणजे त्यांनी ओडिशा व छत्तीसगढ़ राज्य शासनाला अनेक प्रकल्पांत प्रभावित केलं आहे. देबजीत व त्याची पत्नी ज्योती यांनी स्वत: हातानं आदिवासी अन्न शिजवून दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खावू घातलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ओडिशा शासनाने ‘ओडिशा मिलेट मिशन’ (ओडिशा भरड धान्य योजना) लागू केली. त्या दोघांनी ग्रीन कॉलेज सुरू करायचा घाट घातला होता. सध्या चालू असलेल्या सर्व शाळा-कॉलेजेसना देबजीत जर्मनीने ‘ज्यू लोकांकरता बांधलेला राजकीय गुन्हेगारांचा कोंडवाडा’ (कॉन्सन्ट्रेशन कँप) म्हणतो, त्याऐवजी स्थानिक समस्यांकरता सुरू केलेलं ग्रीन कॉलेज आदिवासी मुलांना प्रगतिपथावर नेईल. उद्यमी मुलांना तो या कार्याकरता प्रवृत्त करत असे.

कविता म्हणते, ‘‘देबजीत फार संयमी, शांत स्वभावाचा होता. सर्वांचं ऐकून घेणारा, कमी पगारावर काम करायचा व ट्रस्टच्या कामात ढवढाढवळ करत नसे. त्याने भारताच्या कित्येक संशोधक-लेखक व पत्रकार यांना आपल्या कार्याच्या माहितीसाठी जोडलं होतं. मी ‘आशा’साठी कधी अनुदान मागायची तर ताबडतोब द्यायचा. तो व ज्योती खुशी (मुलगी) अल्प मिळकतीत घर चालवायचे व आपल्या पगारातूनच संस्थेला परत करायचे.

‘‘मुनीगुडा- जिथं देबजीत कार्य करायचा, तिथं जर तुम्ही मुक्काम केला तर पहाटे साडेपाच वाजता देबजीत कुठली गाणी गुणगुणत दिसायचा.’’ कविता म्हणते, ‘‘रात्री अडीच वाजता मला ट्रेन पकडायची असेल, तर देबजीत बरोबर असायचा. घरी मी नीट पोचले की नाही विचारपूस करायचा, स्त्रियांच्या सुरक्षिततेची केवढी काळजी. त्याची पत्नी ज्योती आधी त्याची कार्यकर्ता होती. मग त्यांनी लग्न केलं. त्याचे कित्येक लेख ती ओडिशामध्येे भाषांतर करून देई. देबजीतने आमच्या कार्यात बार्टर सिस्टम (वस्तूंचा मोबदला) सुरू केली होती (भविष्याची चाहूल?) आणि ती फक्त पौष्टिक खाद्यांना लोकप्रिय करण्यासाठी. देबजीत विदेशी बहुराष्ट्रीय कंपऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादलेल्या जी. एम. पीक (बी. टी. सारखं) पद्धतीविरुद्ध होता.’’

जाण्यासारखं वय नव्हतं देबजीतचं, पण तो काम करत करत गेला. आपण त्या कामालाच पुढे वाढवू या.

Tags: ओडिशा भरड धान्य योजना स्मृतीलेख युनिव्हर्सिटी ऑफ कॅलेफोर्निया कार्यकर्ता देबजीत सारंगी देबजीत weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके