डिजिटल अर्काईव्ह

रावदूदांच्या सगळ्यांत धाकट्या मुलाची- रतनसिंहांची मुलगी मीरा. ती दोन वर्षांची होती तेव्हा तिची आई गेली आणि पाच वर्षांची होती तेव्हा वडील युद्धात धारातीर्थी पडले. मीरा आजोबा-आजीच्या छायेत वाढली. पंडित गजधर शर्मासारख्या विद्वानाजवळ तिनं इतिहास-पुराणांचा अभ्यास केला. ती बुद्धीनं तल्लख होती आणि संगीतांची तिला सुरेख जाण होती. चारभुजानाथ हे रावदूदांचं परम दैवत. वैष्णव संप्रदायी साधू घरी नेहमी येत असत. मीरा त्या भक्तिपूर्ण वातावरणात मोठी झाली. कदाचित असंही असेल की मोठ्या राजकुटुंबात, आजा-आजी प्रेमळ असले तरी अनेकदा संवेदनाशील मूल जसं अधिक माणसांत एकाकी वाढतं, तशी मीरा वाढली असेल.

अजमेरवरून जैसलमेरला जाताना वाटेत जेवायला थांबलो तो गाव होता मेडता. मेडता है मीरेचं माहेर. तिच्या माहेरचं दैवत असलेल्या दूदावत राठोडांचं चार भुजानाथाचं मंदिर पहावं म्हणून आवर्जून तिकडे गेलो. देऊळ आरसे लावलेलं. उत्तम नक्षीकामाचं. गर्दी पुष्कळ. भाविकांच्या वर्दळीचा चार भुजानाथाला फारसा त्रास होत नसावा. आधीच देव म्हणजे भक्तवत्सल. त्यात पुन्हा राठोडांच्या घरी नित्य साधुसंतांचा राबता. मीरा या परिसरात मोठी झाली. मनात आलं की मीरेसारखी संतकवयित्री मराठी संतांच्या परंपरेत कोणी नाही. तिच्या भक्तीच्या आर्ततेची आणि व्याकुळतेची थोडीशी झलक कान्होपात्रेत मिळत असली आणि तिच्या साहसी शब्दांची सावली तिच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या पूर्वीच्या जनीवर पडत असली तरी प्रेममग्नता आणि दिव्य उन्माद यांच्या बाबतीत मीरा अगदी निराळी आहे. शिवाय आपल्याकडच्या संत स्त्रियांमधली मुक्ता समाजाकडून बहिष्कृत, जनी कष्टकरी वर्गातली आणि कान्होपात्रा गणिका. बहिणा आणि वेणा या दोघी तथाकथित उच्च कुळातल्या असल्या तरी बाई म्हणून त्यांची प्रतिष्ठा इतर बायकांसारखीच.मीरा वेगळ्या प्रकारचे चरित्र असलेली. मेडतिया राठोडांच्या राजवंशातला तिचा जन्म. जोधपूरच्या राजाराव जोधाचा मुलगा रावददा. त्यानं प्राचीन मेडता नगरी समृद्ध करून तिला आपल्या राजधानीचं नगर बनवलं; वैभवशाली आणि प्रतिष्ठित केलं. 

रावदूदांच्या सगळ्यांत धाकट्या मुलाची- रतनसिंहांची मुलगी मीरा. ती दोन वर्षांची होती तेव्हा तिची आई गेली आणि पाच वर्षांची होती तेव्हा वडील युद्धात धारातीर्थी पडले. मीरा आजोबा-आजीच्या छायेत वाढली. पंडित गजधर शर्मासारख्या विद्वानाजवळ तिनं इतिहास-पुराणांचा अभ्यास केला. ती बुद्धीनं तल्लख होती आणि संगीतांची तिला सुरेख जाण होती. चारभुजानाथ हे रावदूदांचं परम दैवत. वैष्णव संप्रदायी साधू घरी नेहमी येत असत. मीरा त्या भक्तिपूर्ण वातावरणात मोठी झाली. कदाचित असंही असेल की मोठ्या राजकुटुंबात, आजा-आजी प्रेमळ असले तरी अनेकदा संवेदनाशील मूल जसं अधिक माणसांत एकाकी वाढतं, तशी मीरा वाढली असेल.

तिचे सगळे मनोभाव समवयस्क मुलींच्या रीतीनं बहरण्याऐवजी चारभुजानाथाच्या भोवती घमघमत राहिले असतील. त्या काळात, त्या परिस्थितीत मीरेनं स्वीकारलेलं गिरीधर गोपालाचं पत्नीपद आज आपल्या काळाच्या मेरेवर उभं राहून आपण पुष्कळ स्वाभाविक नजरेनं वधू शकतो. आपल्याला आश्चर्य वाटतं ते त्या जगावेगळ्या पत्नीपदाच्या गाढ स्वीकाराचं नव्हे; तर त्यासाठी तिनं केलेल्या जननिंदेच्या धीट स्वीकाराचं. शिवाय घराबाहेरची निंदा किंवा विरोध स्वीकारताना घरातली माणसं पाठीशी असण्याचं अनेकदा माणसाला बळ तरी असतं. मिरेबाबत तेही शक्य नव्हतं. काळाचे अडसर तिच्या सासरच्या दरवाजाला होतेच; पण माहेरच्या दरवाजालाही होते. त्यामुळे माहेरी झालेल्या संस्कारांना पूर्ण विसरून सासरी तिनं नवी भूमिका स्वीकारावी अशी तिच्याकडून अपेक्षा होती. तशी अपेक्षा केली जाणारी मीरा काही एकटी बाई नव्हती. 

बहुतेक बायकांचं शतकांपासून चालत आलेलं ते प्राक्तन वर्तमानकाळातही तसंच आहे. तडजोड, स्वीकार आणि सहनशीलता यांचा सगळाच्या सगळाच वाटा बाईला घेणं भाग पडलं. एवढ्यावरच तिच्या बाबतीतल्या व्यवस्थेच्या अन्यायाचं स्वरूपवर्णन खरं तर पूर्ण होत नाही. त्या अन्याय्य वाटणीचे तिच्यासाठी यमनियम बनले आणि त्यांच्या पालनाची जोडणी थेट तिच्या चारित्र्याशी केली गेली. मीरेनं कुलदेव आणि कुलाचार यांना तर नाकारलंच, पण मुख्य म्हणजे आपल्या पतीला पती म्हणून नाकारलं, तिला विवाह नाकारणं शक्य झालं नाही; पण तिनं आपल्या विवाहपूर्व आयुष्याला, त्या आयुष्यानं हाती दिलेल्या जीवनध्येयाला, जन्मसफलतेच्या तिला गवसलेल्या अर्थाला दूर सारणं नाकारलं. तिला एक वाट मिळाली होती. इतर बायकांसारखी तिनं ती वाट सासरच्या घरापाशी मिटवून टाकली नाही.

त्यासाठी तिला मोठ्या विरोधाला मात्र तोंड द्यावं लागलं. तिची सासू आणि नवरा हे दोघंही कदाचित थोडे उदार, थोडे समंजस असतील किंवा कदाचित राजवधूचं अयोग्य वर्तन प्रजेच्या टोकाच्या निंदेचा विषय होऊ नये म्हणून त्यांनी मीरेला वेगळा महाल दिला असेल, पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर मात्र मीरेची जीवनरीत हा कुळाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आणि मीरेचा प्राण घेण्याचेही प्रयत्न झाले. असे प्रयत्न आपल्याकडे वेणाबाईच्या बाबतीत झाले. तीही विधवाच होती. विधवेनं परमेश्वरचिंतन करण्याच्या रूढ मार्गापेक्षा वेगळ्या मार्गावर चालली होती. तिलाही विष देऊन जीवे मारावं असं तिच्या आप्तस्वकीयांना वाटत होतं, पण ती जगली. मीराही जगली. दोघींनी जननिंदा उघड स्वीकारली आणि आपल्या पावलांखालची वाट चालत आपल्या अस्तित्वाची सार्थता आपल्या मतानं ठरवली. अशा बायकांचं इतिहास काय करतो आणि समाजमन काय करते, याचं चित्र आज आपल्यापुढे स्पष्ट आहे. इतिहासानं मीरेला जवळजवळ देवत्व दिलं आणि सर्वसामान्य माणसांनी तिच्या निष्ठेला, धिटाईला, निर्धाराला दैवी मुलामा देऊन तिला 'अनन्यसाधारण' बनवलं. 

सर्वसामान्य बायकांनी तिची पदं गावीतः तिचे गुण आठवावेत; आळवावेत, पण स्वतःच्या आयुष्याचा मात्र तसा विचार चुकूनसुद्धा करू नये. मेडत्याच्या चारभुजानाथ मंदिरात आम्ही गेलो तेव्हा तिथे देवासमोर दहा-बारा प्रौढ बायका भजन करीत बसल्या होत्या. आम्ही त्या बायकांच्या भजनात सामील झालो.
छम छमाछम बाजे रे
बाजे रे
मनमंदिरमें बीन
मीरा नाचे रे

असं काहीतरी गाणं म्हणत त्यातली एक वृद्धा उठून नाचलीसुद्धा. पण मंदिराबाहेर पडताना मनात आलं की मीरेचं चरित्रगीत गाणाऱ्या या वृद्धेला मीरा माहीत आहे ती फक्त एक अलौकिक भक्त म्हणून.
पग घुंगख बांध मीरा नाची रे
लोग कहे मीरा भयी बावरी
सासु कहे कुलवासी रे
विष का प्याला राणाजी भेज्यो पीकर
मीरा हांसी रे

असं म्हणणाऱ्या मीरेचं हसू किती दिव्य होतं हे हिला माहीत आहे, पण लौकिक आयुष्यात या हसण्यासाठी मीरेनं किती किंमत मोजली, याचा विचार कुणी लौकिक पातळीवर नाही करत. तिच्या 'अलौकिक भक्ती चाच तो चमत्कार' असतो. या बायकाच कशाला, संस्कृतीच्या प्रवाहात गरगरणारे विद्रोहाचे भोवरे आपण सगळेच टाळून जाणारे; आणि त्या भोवऱ्यात शिरून धैर्यानं पार होणाऱ्याला देवपण बहाल करणारे. ही शोकांतिका जितकी विद्रोहाची तितकीच आपलीही. आम्ही मेडता सोडून निघालो, तेव्हा मनात हाच विचार घोळत होता. आमचा ड्रायव्हर जोधपूरचा होता. माझ्या मैत्रिणीचा नवरा त्याला गंमतीनं म्हणाला, 'जोधपूरला तू आम्हांला झकास घरगुती जेवण जेवू घालणार का? माझ्याच घरी चला-गरिबाची खिचड़ी कढी खा.' तो सहज म्हणाला आणि आम्हांला बरं वाटलं. अरे, पण एवढी माणसं एकदम जेवायला नेलीस घरी तर बायको रागावेल तुझी! मी म्हटले. तेव्हा तो चटकन उत्तरला, "वो क्यूं गुस्सा करेगी? वो आप जैसी थोडीही है? और फिर मैं उसे लाया हूं. वो थोडे मुझे लायी है? मैं जो कहूँ, करेगी. भूमी मीरेची असो की जनी-बहिणा वेणेची, असं उत्तर पुरेसं सार्वत्रिक आणि बोलकं आहे, असं नाही वाटत?

Tags: पंडित गजधर शर्मा मराठी कथा अजमेर अरुणा ढेरे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा ढेरे,  पुणे ( 37 लेख )

कवयित्री, लेखिका 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी