डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

...एका फाटक्या बिछान्यावर ती विधवा पडली आहे. तिचे अंग गार पडले आहे आणि डोळ्यांतले दिवे विझून गेले आहेत- अरे देवा...पलीकडे तिची दोन मुले. त्यांच्या अंगावर तिचा झगा आहे, अर्धवट. जणू आपले मरण ओळखून, निदान पोरांना तरी थोडीशी ऊब मिळावी, म्हणून तिनेच अखेरच्या क्षणी तो त्यांच्या अंगावर टाकलेला-

-‘अरे देवा! तोच आला की?’ गारठून गेलेल्या जेनीच्या डोक्यात वीज चमकल्यासारखी भीती लकाकून गेली आणि तिचा आणखी थरकाप उडाला. दाराचे फळकूट किंचित हलले आणि जेनीची नजर पहिल्याने गेली ती समोरच्या फाटक्या पडद्यावर. नंतर धपापत्या हृदयाने तिने दाराकडे चटकन् दृष्टी टाकली. पण नाही. तिचा नवरा आला नव्हता. कोणीच आले नव्हते. वादळी वार्‍याच्या झोताने दार थोडेसे हलले, इतकेच. जेनीने सुटकेचा श्वास सोडला आणि तिला स्वतःची थोडी शरमही वाटली. माझा पती दर्यावरुन आलेला नाही म्हणून मला आनंद होतो आहे! 

तिने किंचित शरमेने केबिनभर नजर फिरविली. अफाट दर्यावर तुफान सुरु झाले आहे. इंझावाताच्या फटकार्‍यांनी समिंदराच्या लाटा उंच उठत आहेत- भयंकर जलचरांनी झेपा घ्याव्यात तशा. या वादळात केबिन तेवढी कोरडी उभी आहे. अगदी, अगदी छोटी. पण आहे. जेनीला या विचारासरशी थोडे उबदार वाटले. केबिनच्या बाहेर भीषण जाळ आहे. वादळ आहे. आत- समोर खुंटीवर टांगलेला माझा रेनकोटही पाण्याने निधळतोच आहे. तिने आपले पाय- ओले गच्च पाय स्टुलाच्या जवळ ओढून घेतले. केबिनमध्येही गळून काही ठिकाणी पाणी झालेच आहे. छप्पर नीटनेटके करून करणार तरी किती? तरीसुद्धा फायरप्लेसमध्ये काही लाकडाचे फाटे सरसरत आहेत. त्यांचा तांबडा उजेड काळ्या छपरावर नाचतो आहे? खुंट्यावरून मासेमारीची जाळी लोंबकळत आहेत, त्यांच्यावरून फिरतो आहे. तरी कालच मी ती दोन जाळी रफू केली. जेनीला थोडी आणखी उभारी आली. कैक वर्षे हा संसार मी नीटनेटका करू पाहते आहे...

समोर दोन मोडक्या बाकड्यांवर बिछाना अंथरला आहे- त्या फाटक्याशा पडद्याआड. कुडकुडणार्‍या जेनीची दृष्टी तेथे खिळून राहिली.

मिणमिणत्या दिव्याच्या अंधुक उजेडात पक्ष्यांच्या पिलांसारखी पाच मुले तेथे एकमेकांना बिलगून झोपी गेली आहेत. वादळाची, डोलणार्‍या केबिनची त्यांना जाणीव नाही. अंगावर टाकलेल्या पांघरुणात गुरफटून ती अर्भके गाढ झोपली आहेत- पण फक्त ती पाचजणेच तेथे नाहीत. आणखीही- एकदम मोठा प्रकाशझोत पडावा, तसे जेनीला त्या विचाराने या गारठ्यात ऊबदार वाटले. आयुष्याचा सारा पट या अर्ध-प्रकाशात डोळ्यांसमोर उभा राहिला. मी तरी काय करणार? नवरा समुद्रावर जन्मलेला, कोळी म्हणूनच वाढलेला. मासेमारीच्या उद्योगातच हयात चाललेली. झुंज देण्यात जन्म चाललेला. झुंज वार्‍यावादळाशी. समुद्राशी. आयुष्याशी. जन्माला पुजलेल्या दारिद्र्याशी. तो कायमचा दर्यावर गेलेला आणि ती घरी. या केबिनमध्ये. शिवत, टिपत, रांधत, जाळी दुरुस्त करीत, पोरांना जोपासत राहिलेली. आणि ती मुले झोपी गेली की ती गुडघे टेकी. पतीची आठवण सारखी असे. सारे या वेळेपुरते शांत झाले की ती फणा काढून मनापुढे उभी राही. कसा असेल तो, दर्यावर त्या अफाट लाटांच्या तांडवामध्ये? इथे आमच्या पायाखाली धरती तरी आहे. काही एक आधार आहे. तिथे त्याचे कसे होत असेल? मासेमारीसाठी समुद्रात एक ठिकोळ्याएवढी तर नक्की जागा. तीही अंदाजाने ठरवलेली. तिथे मासे सापडत. इतर ठिकाणी जवळजवळ नाहीच. कधी सापडत, येशूच्या स्निग्ध कृपादृष्टीने. त्या दिशी जेवण भेटे.

अनेक दिवशी तो तसाच परत येई. जाळी घेऊन. निथळत्या पाण्याचा माग मागे ठेवीत. जाळी भिंतीवर, खुंट्यांवर लावून टाकायचा. तिच्या उत्सुक नजरेला नजर दिल्यासारखी करून चटकन् दृष्टी खाली वळवायचा आणि- (पण त्याचे बोलणे तिला आधीच समजलेले असे) बेफिकीर दिलगिरीच्या सुरात म्हणायचा, 'जेनी! माझं जेवण झाले आज दर्यावरच, तू खाऊन घे कालचं काही, उरलं सुरलं. अं?'

मग ती बळेच त्याला काही खाऊ घाली. उरलेले काही आपल्या पोटात भरी. त्याने काहीच खाल्लेले नव्हते, हे तिच्या केव्हाच ध्यानी आलेले असे. अर्धपोटी, कडक मद्याचे घुटके घेऊन ती वेळ ते पुढे ढकलीत.

काल तो तसा समुद्रावर निघून गेला आणि हवा बदलल्याचे तिच्या थोड्याच वेळात लक्षात आले. समुद्रावर दुरून वार्‍याचे झोत येऊ लागले आणि त्याची गाज उग्र होत गेली. मग आले पावसाचे तुषार. मग धारा आणि लवकरच धारांचा वादळी, झाकोळून टाकणारा पडदा. वादळ, चारी दिशा त्या आवाजाने भरून गेल्या, कोंदाटून आल्या.

विमनस्कपणेच काम आटोपल्यासारखे करून तिने पोरांना अंथरुणावर निजवून टाकले आणि ती कानोसा घेत राहिली. तिच्या मनात दूर गेलेल्या त्याच्या होडग्याचाच तेवढा विचार हिंदकळत राहिला. फायरप्लेसमध्ये धूरच धूर व्हावा, तसे तिचे मस्तक काळजीच्या काजीने भरून गेले. काय करावे कळेना, तेव्हा तिने गुडघे टेकले. विटून गेलेला स्कर्ट सावरला आणि आवेगाने प्रार्थना सुरू केली, ‘दयाघना…’

क्रूसावर लटकलेली ती नितांत, बेफिकीर निरंजनाची प्रेममय करुणामूर्ती डोळ्यांसमोर आली, तेव्हा तिचा स्वर कापरा बनला.

अखेर ती उठली. तिचे लक्ष कशातच लागत नव्हते! हळूच केबिनचे दार ढकलून तिने बाहेर नजर टाकली, तेव्हा अंधार दाटून आल्याने काहीच दिसत नसल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती आणखीनच अस्वस्थ बनली. शेवटी तिने समुद्रावर जाऊन काही वेध घेण्याचे ठरविले आणि बाहेर पडली. रेनकोट, टोपीवर मारा करणाऱ्या धारांची पर्वा न करता- 

पण नाही. तिचे पाऊल अडखळले. शेजारच्या केबिनकडे तिची नजर गेली. अरे देवा! त्या केबिनची तिला आठवणच झाली नव्हती-

तिथला घरधनी नुकताच समुद्रावर हरवून गेला होता. त्याची विधवा आता एकटीच होती. दुखण्याने ग्रासलेली. पदरात दोन पोरे. आपल्याच पोरांच्या वयाची. जेनी त्वरेने तिकडे गेली आणि तिने केबिनचे दार ठोठावले-

ते सताड उघडले गेले. उघडेच तर होते. तिला धक्काच बसला. काय बाई तरी. आतून लावायचे नाही?

रेनकोट तसाच ठेवून जेनीने हाका मारल्या. आतून काहीच उत्तर आले नाही, तेव्हा उत्सुकतेने, निथळत्या गालांनी ती आत डोकावली-

...एका फाटक्या बिछान्यावर ती विधवा पडली आहे. तिचे अंग गार पडले आहे आणि डोळ्यांतले दिवे विझून गेले आहेत- अरे देवा.

,..पलीकडे तिची दोन मुले. त्यांच्या अंगावर तिचा झगा आहे, अर्धवट. जणू आपले मरण ओळखून, निदान पोरांना तरी थोडीशी ऊब मिळावी, म्हणून तिनेच अखेरच्या क्षणी तो त्यांच्या अंगावर टाकलेला-

जेनीचा गळा भरून आला. देवा आता मी काय करू? ती तर आता संपलीच. तिची मुले? मी नेऊ? पण पुढचे मरण वादळासारखे तिच्या डोक्यात भरून घोंघावू लागले. आधीच पाच मुले. ही आणखी दोन अर्भके कशी सांभाळावी?

-तो काय म्हणेल? मला नक्कीच मार पडणार आहे. पण तशीच, त्यांना टाकून जाऊ तरी कशी? 

-दिङ्मूढ अवस्थेत आपण तेथे होतो, किती वेळ, आलो केव्हा परत, आपल्या केबिनमध्ये पडून राहिलो किती वेळ- तिच्या ध्यानात आले नाही.

...आपल्या बेंचवरच्या अर्भकांवर नजर लावून ती भयचकित मनाने पडून राहिली, तेव्हा सारे आयुष्य तिच्या दृष्टीपुढून सरकून गेले.

-भीती मनात लकलकत राहिली. तो परत येईल, तेव्हा काय म्हणेल?

-दार फड्दिशी फटकारले गेले आणि तो निथळत्या अंगाने आत आला. विजयी स्वराने ओरडला, 'हियर। डियर, आमची नेव्ही आली!’

क्षणभर तरी ती सारे काही विसरली आणि त्याच्याकडे धावली. होय- माझा माणूस- माझा जिवलग परत आला आहे! दुसऱ्या कोणाला कळावे या गोष्टीचे सुख?

काही क्षणांतच तो म्हणाला, 'पण आज मिळाले काहीच नाही! वादळ एवढे झाले, पण- जाळे रिकामे. नाही देवाच्या मनात दिसत!’

रिकामी जाळी त्याने भिंतीला टांगली, तेव्हा तिच्या मनात पुन्हा भीती जागी झाली. त्या शेजारणीचा मृत चेहरा डोळ्यांसमोर उभा राहिला आणि तिचे डोळे आपल्या पायाकडे वळले-

‘डिअर- ती शेजारची विधवा मृत झाली आहे!' तिने अडखळत, थांबत, त्याच्या मनाचा अंदाज घेत त्याला सारे सांगायला सुरुवात केली आणि तिच्या अंदाजाप्रमाणेच घडले. तो एकदम दूर झाला. त्याचा आवाज कठोर बनला आणि चेहरा लालसर झाला. कर्कश आवाजात तो ओरडला, ‘कर्म आपले! आणि केलेस काय तू? आधीच खायला मिळायची मारामार. ती पोरे आणून आणखी करणार काय? देवाने तरी असे कसे संकटांत टाकावे? छट्! आपण आता करावे तरी काय? आपण काही नाही करू शकणार...’

मूठ वळवून तो तिच्याकडे पाहत राहिला आणि मग क्षणभरानेच त्याचा चेहरा बदलला. सौम्य होत गेला. त्याची नजर दुसरीकडे वळली. आवाज पुन्हा उंचावून तो बोलला, 'तू तरी अशी आहेस- आणायची नाहीस ती पोरे? त्यांनी जावे कोठे? -राबावे लागले तरी... काढू आपण उपास. तुला तरी कळायला हवे होते. चल, मीच आणतो ती अर्भके-' आणि त्याने आपली निथळत असलेली टोपी पुन्हा डोक्यावर चढवली.

त्याच्या उंच, कणखर आणि रागावलेल्या आकृतीकडे तिने एकदाच कौतुकाने, भीतीने भरलेला कटाक्ष टाकला. त्वरेने समोर बिछान्याकडे गेली आणि पडदा उचलून मिणमिणत्या उजेडात म्हणाली, 

‘पहा तरी!’

(व्हिक्टर ह्युगोच्या कथेवरून)

Tags: मासेमारी फायरप्लेस जलचर समुद्र Fishing Fireplace Aquatics Ocean weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके