डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पंतप्रधानांच्या एका इंटरव्ह्यूविषयी....

मोडकबाईंच्या बालिश डोळ्यात चक्क विजयाचे हसू फुटले. अय्या! आमचीच शाळा! त्यांच्या डोळ्यांपुढे चित्र उभे राहिले, उध्दट सून, बेफिकीर चिरंजीव. बिचारे, पण प्रेमळ सासरेबुवा!

‘इथे पगार लिहायचा असतो! नीट फॉर्म भरलेला नाही तुम्ही.’ शाईचे पेन छडीसारखे उंचावीत पोरसवदा मोडकबाई नाक उड़वून म्हणाली, ‘पगार किती मिळतो आजोबा तुम्हाला?' आता एकशिंगी गेंड्यासारखे हिंस्र. आफ्रिकन मुत्सद्दी असोत, की पेट्रो डॉलरचा माज निथळणारे अमिरातीचे सरकारी तज्ज्ञ; स्पोर्ट्सपणाचा आव आणणारे क्रूर अस्वली रशियन एक्स्पर्ट येवोत की बकाबका गिळू गिळू करणारे, गुळगुळीत दिसणारे खुनशी अमेरिकन धूर्त. आपल्याच पार्टीतले बेरकी बारामतीकर असोत की फळाच्या पिकल्या फोडीसारख्या काचेचा चष्मा लावलेले अभ्यासू- कोणीही येऊन आडवेतिडवे प्रश्न विचारू लागला, तरी त्याला आडवा करून, कधी गोंजारल्यासारखे करून, कधी विनोदाची झालर लावून, कधी त्याचेच दात त्याच्याच घशात घालीत तर कधी अचूक अभ्यासाने त्याला खिळवून ठेवीत- त्यांचे प्रश्न उडवून लावण्यात अगर स्पष्ट उत्तरे देण्यात पंतप्रधान तरबेज होते. मोडकबाईंच्या या प्रश्नाने मात्र त्यांची गाळण उडाली.

पण बाईंच्या शेजारच्या सीनिअर बाईंनीच त्यांना टोकले. एखाद्या पोरीसारखी जीभ बाहेर काढीत मोडकबाई म्हणाल्या, 'म्हणजे, रिटायर असणार नाही तुम्ही. पेन्शन काय असतं आजोबा तुम्हांला? मासिक प्राप्ती किती लिहू?"

दोन दोन इडल्या गालांत धरल्यासारखे पंतप्रधानांनी यावर गाल फुगविले. ओठांतल्या ओठात फुर्र केले. ते बोलले काहीच नाहीत. हसरी नजर त्यांनी पलीकडल्या खुर्चीतल्या टाय बांधलेल्या पुरुषाकडे लावली. त्यांना उत्तर द्यायचे नव्हते. पुरुषाला डायरेक्ट पगार विचारायचा नसतो. सीनिअर बाईंनी पुढचा प्रश्न केला, ‘असे कसे चालेल? अं? उत्तर द्यायला नको? बऽरं. नोकरीला कुठे होता तुम्ही? 'म्हणजे, सरकारी कामात होतो.’ पंतप्रधानांनी गडवडीने नेहमीप्रमाणे मोघम उत्तर दिले, 'म्हणजे, आहे.’

‘तेच, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये?' ठसक्याने मोडकबाई म्हणाल्या, ‘म्हणजे होय, ‘मान हलवीत पंतप्रधान उत्तरले... ‘जबाबदारी असते. फार,  त्रास होतो.’ आपले पी. एम. चे ऑफिस पंतप्रधानांच्या डोळ्यासमोर उभे राहिले.

‘अहो, तुम्ही खाते सांगत कसे नाही?' मोडकबाई शेजारच्या बाईंना अर्धवट उद्देशून म्हणाल्या, ‘काय करावे वाई या माणसाला- एका प्रश्नाचे धड उत्तर देईल तर शपथ, ‘त्या शेजारच्या बाईंनीच समजूतदारपणे विचारले, ‘आजोबा, असे चालणार नाही! नातवाला अ‍ॅडमिशन हवी ना तुमच्या? त्याची बॅकग्राऊंड इथे लिहायला नको? बरं मुलाचे वडील- म्हणजे तुमचे चिरंजीव-कुठं असतात? मुलाची आई?"

आता आपल्या खासदार चिरंजीवांचे नाव त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जगजाहीर आहे आणि प्रत्येकाच्या तोंडी शिवीसारखे आहे, हे या बाईच्या गावीही नसावे, याचाच पंतप्रधानांना विस्मय वाटला. वर्तमानपत्रांतल्या असल्या गोष्टींकडे अभ्यासाच्या क्षेत्रातल्या या लोकांचे लक्ष जात नसावे अशा अंदाजाने त्यांना थोडेसे हायसेही वाटून गेले. ते हसले. त्यांनी हात आपल्याच अंगावर अक्षता टाकल्यासारखे उडवले. ‘तुम्हीच सांभाळता वाटतं नातवाला. ‘बाई समजूतदारपणे म्हणाल्या. ‘मुलाची आई कुठे असते? नोकरीला वगैरे?' आई कुठली? ममी. आपल्या दिव्य सुनेची पी .एम् ना आठवण झाली आणि रागच आला. असल्या अल्ट्रामॉडर्न डॉटर-इन् लॉज्चा त्यांना संतापच होता तिची भडक लिपस्टिक अन् वाह्यात कपडे, ते दाखवीत नसत, पण त्यांना हे मुळीच पसंत नव्हते. ह्या पोरगेल्या मोडकबाई नकळत त्यांच्या मनासमोर उभ्या राहिल्या आणि तिने कपाळावर फिरविलेला पावडरचा जाड हात, तिची कुंकवाची टिकली पाहून हसू आले.

तेलीगुडू खेड्यातल्या आपल्या ठसठशीत कन्येची आठवण आली. बारीकशी आठी मोडकबाईंच्या कपाळावर पडली. ‘आमचीच शाळा का आवडली आजोबा तुम्हांला?' त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. तिच्या कानातले डूल हेलकावले. ‘तुम्ही- म्हणजे तुमची टीचर्सची टीम - चांगलं शिकवता, असं सगळे म्हणत होते!' हुरूप येऊन पंतप्रधान चटदिशी म्हणाले, ‘म्हणजे पोरांबद्दल तुम्हांला...'

‘समजा आम्ही अ‍ॅडमिशन नाकारली, तर? इथे म्हातारा खवळला. पी. एम. हट्टी होते. हे-हे चालणार नाही. मला नाही म्हणतात म्हणजे काय? मूठ टेबलावर आपटीत त्यांनी उपरणे सारखे केले. नाकपुड्या फेंदारल्या. 'का म्हणून? माझ्या नातवाला तुम्ही घेणार नाहीत? ते विचारू लागले. ‘नाही, समजा...' मोडकबाईंना त्यांच्या रागाने हसू फुटले. लडिवाळपणे त्यांनी शेजारल्या सीनिअर बाईकडे नजर टाकली. बघा, आता आला की नाही म्हातारा वठणीवर! मी काय ऐकते यांना थोडीच? त्यांनी अधिकारपूर्वक दटावले, ‘आम्ही नाही दिली अ‍ॅडमिशन तर तुम्ही काय कराल?' यावर लोक देणग्या देऊ, अमूक करू, दुसरीकडे जाऊ, काय तुमच्या शाळेला सोने लागले आहे, असे सुचवीत. बेरकी पी. एम उठला. काठी उंचावीत म्हणाला, 'उपास करीन तुमच्या दारात, उपास! माहिती आहे? दुसऱ्या शाळेत घालणारच नाही पोराला. घरी ठेवीन. नको शिकू दे बाबाला! सोडणार नाही.

मोडकबाईंच्या बालिश डोळ्यात चक्क विजयाचे हसू फुटले. अय्या! आमचीच शाळा! त्यांच्या डोळ्यांपुढे चित्र उभे राहिले, उध्दट सून, बेफिकीर चिरंजीव. बिचारे, पण प्रेमळ सासरेबुवा!

खुर्ची सारून बुवाजी उठले आणि शाळेचे सोसायटीचे चेअरमन सुटाबुटातले त्याच क्षणी आत आले. बाई आणि सिलेक्शन कमिटी गडबडीने उभे राहू लागले. आजोबांना अत्यंत अदबीने हात देत चेअरमन लाजेने अगदी भुईसपाट झाले होते. बुवाजी गालात हसले, त्यांना बाहेर सोडीत चेअरमननी बाईवरच जाताजाता डोळे वटारले. ‘हे कोण समजलात मोडकबाई, पी. एम. आहेत हे- नरसिंह रावसाहेब, फोटो तरी बघा. टीव्ही-वीव्ही बधताय की नाही? दिवसरात्र त्यांचेच तर नगारे वाजवताहेत सगळे. रोजचा पेपर समोर आपटून ते घाईने बाहेर गेले.

Tags: पंतप्रधान कार्यालय पंतप्रधान Prime Minister PMO PM Arun Shri Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके