डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीवादाने पारंपरिक विचारांना व धर्माला आव्हान दिले आहे, विज्ञानाला नाही!

‘विज्ञान’ म्हणजे काय हे न समजता ऊठसूट विज्ञानाला दोष देत राहणे हा अनभ्यस्त लोकांचा भाबडेपणा आहे, ती एक स्वयंघोषित विचारवंत जनांची फॅशन झाली आहे. असा दोष देणाऱ्या अनेकांना मी विचारले आहे- ‘विज्ञान म्हणजे काय हो?’ 99 टक्के व्यक्तींना सांगता येत नाही. त्यांच्या मते यंत्रे- फॅक्टऱ्या, मोटारी, बोटी, रेलगाड्या, विमाने, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, बिनतारी संदेश प्रक्षेपण, संगणक, औषधे, शल्यकर्मे, शस्त्रास्त्रे, प्लॅस्टिक, म्हणजे ‘विज्ञान!’ सहस्रबुद्धे यांनाही ती चुकीची व्याख्या अभिप्रेत आहे. चुकीच्या गृहीतकातून निघालेले प्रतिवाद चुकीचे असणारच!

अविनाश कोल्हे यांनी 9 ऑक्टोबर 2010 च्या साधना अंकात परिचय सादर केलेल्या ‘गांधीज्‌ चॅलेंज टु मॉडर्न सायन्स’ या सुनील सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकातील विचारांविषयी लिहीत आहे. व्यापक समाजाचा वैचारिक गोंधळ पुस्तक व परिचयात दिलेल्या माहितीत दिसतो. गांधीवाद ही अनेकांना व अनेक देशांना स्फूर्ती देणारी विचारधारा आहे व विसाव्या शतकाला विशिष्ट रूप देणाऱ्या व्यक्तींत आइन्स्टाइन व गांधीजी प्रमुख होते हे जगातील अनेकांनी अनेकदा म्हटले आहे, ते पुन्हा पुन्हा प्रतिपादन करणे सुयोग्य असले तरी अत्यावश्यक नाही.

गोंधळाचा प्रश्न यापुढे आहे. जनसामान्यांनाच काय, पुष्कळ विचारवंतांना (व तथाकथित विचारवंतांना) सुद्धा ‘विज्ञान’ म्हणजे काय याचे आकलन झालेले नसते. ज्याप्रमाणे गुडघ्यापर्यंतचे धोतर नेसणे, आत्मशुद्धीकरिता उपवास करणे, बकरीचे दूध पिणे, उन्हाळ्यात डोक्यावर मातीच्या घड्या ठेवणे, या वैयक्तिक गोष्टींहून गांधीवाद उदात्त आहे, त्याप्रमाणे यंत्रे-फॅक्टऱ्या, मोटारी, बोटी, रेलगाड्या, विमाने, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, बिनतारी संदेश प्रक्षेपण, संगणक, औषधेशल्य कर्मे, शस्त्रास्त्रे, प्लॅस्टिक, या विज्ञानाने दिलेल्या गोष्टींहून ‘विज्ञान’ व त्याचे तत्त्वज्ञान उदात्त आहे. या संबंधात अनेक उदाहरणे देता येतील, परंतु लेखकाने घेतलेले उदाहरण देतो. (‘लेखक’ म्हणजे सहस्रबुद्धे, कोल्हे नाहीत.) हिटलरने अणुबाँब प्रथम बनविला तर जगाचा संहार संभवेल तेव्हा त्याच्या आधी आपण बनवावा व त्याची भीती घालून भयानक महायुद्ध लवकर संपवावे या योजनेने अमेरिका, इंग्लंडने तो बनविला. तो बनविणे जर्मनीला शक्यच होत नव्हते हे युद्धसमाप्तीनंतर समजले.

‘बनविणे’ एक गोष्ट, ‘वापरणे’ वेगळी गोष्ट. प्रत्यक्ष वापरावा की नाही हा निर्णय विज्ञान-वैज्ञानिकांच्या अधिकारात नव्हता. तो राजकीय निर्णय ट्रूमन-चर्चिल व त्यांची शासने या स्तरावरचा होता. 16 जुलै 1945 या दिवशी अमेरिकेतील न्यू मेक्सिको या संस्थानात बाँबची यशस्वी चाचणी झाली तेव्हा ट्रूमन, चर्चिल, स्टॅलिन जर्मनीतील पॉट्‌सडॅम शहरी युरोपच्या भविष्याविषयी विचारविनिमय करीत होते; युरोपातील युद्ध दोनच महिन्यांपूर्वी थांबले होते. ओपेनहाइमर, कॉक्‌रॉफ्ट, फर्मी व इतर प्रमुख सहकारी आणि अणुबाँब बनविणाऱ्या वैज्ञानिकांनी प्रत्यक्ष वापराला विरोध केला होता, परंतु त्यांना विचारतो कोण!

उलट या व इतर कारणांमुळे, अणुबाँब प्रकल्पाचा वैज्ञानिक निदेशक ओपेनहाइमर या तो सोविएत हेर आहे या संशयावरून प्रचंड त्रास दिला गेला; दीड दशकाने राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींच्या काळी त्याची क्षमा मागण्यात आली व त्याला अमेरिकेचा सर्वोच्च फर्मी पुरस्कार प्रदान केला गेला.

अणुबाँबमुळे जपानमध्ये झालेल्या संहाराला विज्ञान उत्तरदायी नव्हते व तो यापुढे वापरला गेला तर होणाऱ्या संभाव्य संहारालासुद्धा नाही. असे निर्णय राजनैतिक व शासकीय पातळीवर घेतले जातात. एकूण मानवी जगाची मानसिकता, घडी व आंतरराष्ट्रीय राजनीती उत्तरदायी होती, आहे व भविष्यात असणार. बंदुका, तोफांचे मूलतत्त्व, न्यूटनचा क्रिया-प्रतिक्रिया हा तिसरा नियम होय, म्हणून न्यूटनला उत्तरदायी समजायचे काय? शिवाय त्याआधी गदा-धनुष्यबाण, भाला, बरची, तलवार ही शस्त्रे होती व त्यामुळे हानी होत असेच की. ओसामा बिन लादेन, इतर आतंकवादी, माओवादी, नक्षलवादी, इत्यादी आधुनिक शस्त्रास्त्रे वापरतात याचा अन्वयार्थ (Interpretation) असा नाही की, त्यामुळे होणाऱ्या हानीला आधुनिक विज्ञान उत्तरदायी आहे. हिंसक जमावावर साधा गोळीबार केला गेला तर ज्या कारखान्यात शस्त्रे बनविली गेली त्याचा व त्यातील वैज्ञानिकांचा  संबंध नसतो!

निरनिराळ्या काळी वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकट होणारी मानवाची कलही, विजिगीषु व हिंसात्मक मानसिकता, शस्त्रास्त्रामुळे होत असलेल्या मानवी संहाराला उत्तरदायी आहे, विज्ञान नाही. विज्ञान नव्हेत तेव्हा अलेक्झांडर, चेंगीझखान, इत्यादी आक्रमकांनी केलेल्या हिंसेला कोण उत्तरदायी होते?

महाराज, बाबा, बापू, देवी, मां ही बिरुदे लावून घेतलेल्या व्यक्ती व त्यांचे अनुयायी व भक्त हे हिंदू लोक घोर तांत्रिक क्रिया, भानामती, अंगात येणे, मिरची-लिंबू ओवाळणे, जादू, सर्व करतात; म्हणून काय उपनिषदांनी ते सांगितले आहे असे थोडेच म्हणायचे! त्याप्रमाणेच भोगवाद, चंगळवाद हे संबंधित समाजयंत्रणेुळे म्हणजे शासन, प्रशासन, औद्योगिकी, अर्थव्यवस्था व मानवी समाजाची प्राथमिक मानसिकता यामुळे निघाले आहेत, ते काही विज्ञानाने दिले नाहीत.

भोगवाद, चंगळवाद, यादवी यांमुळे रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. शस्त्रांसाठी व चैनीसाठी रोमनांनी प्रौद्योगिक ‘टेक्नॉलॉजी’ वाढविली परंतु आधुनिक विज्ञानाचा विवेकी प्रपितामह जे ग्रीक विज्ञान त्याचे तत्त्वज्ञान अंशत:ही रोमनांनी घेतले नव्हते. रोमन साम्राज्यात यादवीला आरंभ झाल्यानंतर परागंदा सीझर कॉन्स्टान्टिनस याने सर्वमान्य गणना 313 या वर्षी मिलानहून, आपल्या वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली. त्यानंतर धर्माच्या प्रभावाने युरोपातून एक सहस्र वर्षे विज्ञान लयालाच गेले.

हाच इतिहास आहे इस्लामच्या उदया-प्रसारानंतर अरबी विज्ञानाच्या लयाचा. या दोन्ही प्रदेशांत (म्हणजे रोमन साम्राज्य व अरब प्रदेश यांत) त्या त्या काळी उच्चतम चंगळवाद होता. (त्यातूनच अरेबियन नाइट्‌स निघाले!) तेव्हा धर्मामुळे भोगवाद व चंगळवाद निर्माण होतात असे म्हणायला पाहिजे! तथापि तेही चूक आहे. (धर्मामुळे विवेकबुद्धी नष्ट होऊन श्रद्धात्मक दुराग्रह उत्पन्न होतो हा वेगळा मुद्दा आहे. येथे संदर्भ आहे केवळ भोगवाद व चंगळवाद यांचा.) धर्म असो वा नसो, विज्ञान असो वा नसो, भोगवाद व चंगळवाद मानवाच्या मानसिकतेमधून आले आहेत. काही व्यक्ती विरागी असतील परंतु बहुसंख्य मानवी व्यक्तींची मानसिकता स्वभावत: सुखी जीवनशैलीकडे झुकते. हे अनिष्ट असेसुद्धा म्हणायला नको. हव्यास व अतिरेक नसावा, मग तो अस्मितेचा, स्वार्थाचा, स्वसुखाचा, व्यक्तिप्रेमाचा, कुटुंबप्रेमाचा, टोळीप्रेमाचा, जातिप्रेमाचा, धर्मप्रेमाचा, राष्ट्रप्रेमाचा, व्यसनाचा, ऐषआरामाचा, उत्तम अन्नपेयांचा, वेशभूषेचा, अलंकारांचा, कसलाही, ही साधी कल्पना आहे. त्यात धर्माला/विज्ञानाला ओढायला नको.

लेखक सहस्रबुद्धे म्हणतात, ‘‘आधुनिक विज्ञान वाढत गेले, तशी युद्धे वाढत गेली.’’ हे म्हणणे भाबडे आहे व इतिहासाला धरून नाही. मध्ययुगीन तत्त्ववेत्ता ब्लेझ पास्कलने म्हटले, ‘‘धर्माच्या नावाखाली लोक जितकी युद्धे व क्रूरता करतात तितकी दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी (म्हणजे भूखंड, संपदा, स्त्रिया, गुलाम जिंकण्यासाठी) करीत नाहीत’’ मुळामध्ये म्हणजे धर्म नसताना लढाया बहुतांशी स्थानिक अनुषंगीय असत. तथापि मॅसिडोनिअन-यहुदी/झरथुष्ट्री/ भारतीय, रोन-यहुदी, झरथुष्ट्री-तुर्की/अरबी, यहुदी-ख्रिस्ती, ख्रिस्ती-इस्लामी, यहुदी-इस्लामी, हिंदु-इस्लामी, शैव-वैष्णव, अशी युद्धे निरनिराळे धर्म निर्माण झाल्यावर व वेगवेगळ्या धार्मिक समाजांचा अन्योन्यसंपर्क वाढल्यावर पुष्कळ वाढली. विज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रणालींच्या लोकांनी कधी आपापसात युद्धे लढली नाहीत, अथवा विज्ञानाने कधी सांगितले नाही की असे करा, तसे करा. ते धर्म सांगतो! विज्ञान मानवाला एकच सांगते, ‘जीवनातील प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विचारासाठी, प्रत्येक निर्णयासाठी, मानवी संस्कृतीच्या सर्वांगीण विकासासाठी, विवेकाचा मार्ग धरा.’

सहस्रबुद्धे यांच्या विचार-मांडणीत सर्वत्र अशीच तर्कदुष्टता व इतिहासाचा विपर्यास आहे. लेखकाने दिलेले ‘गांधीज चॅलेंज टु मॉडर्न सायन्स’ यापेक्षा परिचयकाराने दिलेले ‘आधुनिकतेला गांधीवादाने दिलेले आव्हान’ हे शीर्षक अधिक समर्पक आहे, कारण ‘आधुनिकता’ या शब्दात अनेक गोष्टी अनुस्यूत आहेत. लेखकाचे एक वाक्य पहा, ‘विज्ञान, वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात गांधीवादाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते.’ गांधीवादाकडे दुर्लक्ष होत आहे, विशेषत: भारतात, हे सत्य आहे. परंतु त्याचे कारण विज्ञान किंवा त्याचा संदर्भ हे आहे असे म्हणणे चूक आहे. गांधीवादाकडे दुर्लक्ष करतात ते गांधीजींचा राजकीय वारसा पुढे चालवत आहोत हा व्यर्थ दावा करणारे राजनैतिक व सामाजिक नेते व त्यांचे अनुयायी, व काही परिवर्तनवादी ‘विचारवंत’ मंडळी, ज्यांना ‘विज्ञान’ म्हणजे काय हे बहुधा माहीतही नसते. समाजाची ‘यंत्र वापरणारे व न वापरणारे’ अशी विभागणी पूर्वीपासून झाली हा विचारसुद्धा भाबडा आहे. नांगर, मोट, रहाट, तरफ, मळसूत्र (स्क्रू), विळा-कोयता-फावडे, तेलाचा घाणा, हातमाग, बैल वा घोडागाडी या व अशा प्रकारांच्या अगनीय वस्तूही साधने-यंत्रेच होत. आणि समाजातील सर्व लोक त्या वापरत असत. आता तसेच आहे; आमच्या कामाच्या महिलेने व परिटाने आमच्या आधी रंगीत टेलिव्हिजन व सेलफोन घेतले! ‘‘शिवणकामाचे यंत्र हा मानवाचा सर्वांत महत्त्वाचा शोध आहे’ हे स्पष्टपणे लिहिणाऱ्या गांधीजींनी ‘यंत्र’ या संकल्पनेला सरसकट विरोध केला हे म्हणणे चूक आहे. त्या यंत्रामागे विज्ञान आहे हे जाणण्याइतके गांधीजी प्रगल्भ होते.

लेखकाचे आणखी एक प्रतिपादन पहा, ‘आता विज्ञानालासुद्धा आव्हाने मिळायला लागली आहेत’ हे म्हणणाऱ्यांनी विज्ञानाचा इतिहास अभ्यासला पाहिजे. विज्ञानाला आव्हाने मिळत आहेत ती अगदी विज्ञान निर्माण झाल्यापासून. प्रथमत: निरनिराळ्या धर्ममार्तंडाकडून, आता स्वयंघोषित ‘गांधीवादी’ व इतर ‘वादीं’कडून. त्या मनोवृत्तीची व आव्हानांना चपखल उत्तर देण्याची सवय विज्ञानाला लागून शतके झाली. खरे तर असे म्हणायला पाहिजे की गांधीवादाने धर्माला आव्हान दिले आहे. कारण निरनिराळ्या प्रत्यक्ष धर्मांमुळे युद्धे वाढली. गेली काही शतके, दशके कलहांची व्याप्ती व प्रखरता प्रचंड प्रमाणात वाढली आहे ती धर्मवेडामुळे, विज्ञान ‘वेडा’मुळे नाही. या संदर्भात आणखी एक विचार निदर्शनाला आणायला पाहिजे. ईश्वर मनोमन मानणारे गांधी म्हणत, ‘‘मी हिंदू आहे, जैन आहे, ज्यू आहे, पारशी आहे, ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे.’ प्रामाणिक सर्वधर्मसमभाव तो गांधीजींचा! त्यांची ही भावना, धार्मिक असलेली कोणीही व्यक्ती स्वीकारत नाही ही खरी शोकांतिका आहे, कारण धर्म मानणाऱ्या प्रत्येकाला निजी धर्म प्रिय!  

तेव्हा गांधीवादाने धर्माला आव्हान दिले हेच खरे! सत्य, अहिंसा, शांती ही गांधीवादाची सूत्रे. (कदाचित एक बौद्ध धर्म सोडून) कोणत्याही धर्माला अबाधित शांती मान्य नाही. ‘तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय:’ हे भारतीय सनातन धर्माच्या भगवद्‌गीतेत आहे; कुरुक्षेत्रावरील भारतीय महायुद्ध ‘धर्मयुद्ध’ आहे हे मानवानेच ठरविले. धर्मावर घाला पडला की ख्रिश्चन धर्म म्हणतो ‘ad jus bellum‘ (म्हणजे towards just war) कुर’अनात अशा अर्थाची वाक्ये आहेत.

आमच्यावर पाश्चात्त्यांचे राज्य, विज्ञान (म्हणजे ‘मूलभूत विज्ञानअभियांत्रिकी-प्रौद्योगिकी’ ही शृंखला) पाश्चात्यांनी निर्माण केले व आम्हांला दिले, पाश्चात्त्यांच्या राज्यामुळे आमचा ऱ्हास झाला, इत्यादी, तेव्हा पाश्चात्त्य व त्यांनी केलेले/दिलेले सर्व त्याज्य असे सहस्रबुद्धे म्हणतात. ते असेही म्हणतात की विज्ञान व नैतिकता यांचा संबंध नाही, व एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये चर्चा होऊन असे ठरले की विज्ञान फायदेशीर आहे. ‘विज्ञान फायदेशीर आहे’ म्हणजे काय? हे सर्व कोठून शोधून काढले? गेले अर्धशतक मी विज्ञानाचा व त्याच्या तीन सहस्रकांच्या इतिहासाचा अभ्यासक आहे. असली चर्चा झाली असे मला कोठेही सापडले नाही! उलट अठराव्या-एकोणिसाव्या शतकात इमॅन्युअल कांट या जर्मन तत्त्ववेत्त्याने सृष्टी, वास्तवता, अनुभव, प्रायोगिक अवलोकन, ज्ञानविज्ञान, वास्तवतेची मानवाच्या मनातील जन्मजात प्रतिमा, जन्मोत्तर वास्तवतेचा मानवाला होणारा बोध, याचे अतिशय स्पष्ट विवेचन केले. परंतु त्यातून सहस्रबुद्धे म्हणतात ते अर्थशून्य काही निघाल्याचा इतिहास नाही.

विज्ञानात एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेला जैविक उत्क्रांतिवाद व विसाव्या शतकात निर्माण झालेले सापेक्षतावाद व ऊर्जापुंजवाद यांच्यामुळे कांटचे निष्कर्ष आता बदलायला पाहिजेत हे वेगळे. त्या निष्कर्षांचा व कलह-युद्ध-संहार-भोगवाद-चंगळवाद यांचा संबंध नाही. स्वत:च्या विज्ञानद्वेषाला व विचारांना साहाय्य व्हावे यासाठी सर्वत्र सहस्रबुद्धे यांनी गांधीजींच्या प्रतिपादनांचा विपर्यास केला आहे. गांधीवादानुसार काय मानायचे हे गांधीजी स्वत: सांगत नाहीत, सहस्रबुद्‌ध्यांचा अन्वयार्थ इतरांनी ‘गांधीवाद’ मानायचा असे चित्र निर्माण झाले आहे! हीच ती तर्कदुष्टता.

‘विज्ञान’ म्हणजे काय हे न समजता ऊठसूट विज्ञानाला दोष देत राहणे हा अनभ्यस्त लोकांचा भाबडेपणा आहे, ती एक स्वयंघोषित विचारवंत जनांची फॅशन (फॅडच म्हणा ना!) झाली आहे. असा दोष देणाऱ्या अनेकांना मी विचारले आहे ‘विज्ञान म्हणजे काय हो?’ 99 टक्के व्यक्तींना सांगता येत नाही. त्यांच्या मते (प्रारंभी म्हटल्याप्रमाणे) यंत्रे-फॅक्टऱ्या, मोटारी, बोटी, रेलगाड्या, विमाने, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, बिनतारी संदेश प्रक्षेपण, संगणक, औषधे, शल्यकर्मे, शस्त्रास्त्रे, प्लॅस्टिक, म्हणजे ‘विज्ञान!’ सहस्रबुद्धे यांनाही ती चुकीची व्याख्या अभिप्रेत आहे. चुकीच्या गृहीतकातून निघालेले प्रतिवाद चुकीचे असणारच! अर्थात्‌ ‘विज्ञान म्हणजे काय?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे. ते सुयोग्य परंतु सूत्रमय पुढील परिच्छेदात देत आहे.

निसर्गाची, सृष्टीची, विश्वाची व त्यांच्या व्यवहाराची नियमावली उकलणे व त्या ज्ञानाचा उपयोग मानवाचे जीवन सर्व दृष्टींनी समृद्ध करणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. ‘समृद्ध’ म्हणजे ‘चैनी’ नाही! चैन करायची की नाही, तिचा अतिरेक होऊ द्यायचा की नाही हे मानवाने ठरवायचे. विज्ञान मानवाला विवेक शिकविते, तो उपाय योजायचा की धर्मश्रद्धेत बुडून जायचे हे मानवाने ठरवायचे. विज्ञानाची विशिष्ट पद्धत आहे. अवलोकन, प्रायोगिकता, कार्यकारणभाव तपासणे, सिद्धांत बांधले तरी ते सुयोग्य आहेत की नाही हे प्रस्थापित करायला अविरत प्रयोग करीत राहणे, सिद्धांतप्रणाली विवेकावर उभारणे, अशी क्रिया व विचारांची मालिका आहे. एकदा प्रस्थापित केलेले सिद्धांत बदलायचे नाहीत ही श्रद्धा विज्ञानाला मान्य नाही. विश्वासंबंधी मानवाचे ज्ञान जसे वाढत जाईल तसतशा आपल्या प्रणाली विवेकाने सुधारत राहायचे. गांधीजींप्रमाणेच विज्ञान आपल्या चुका मान्य करते व स्वत:मध्ये सुधारणा करीत राहते. सबंध मानवसंस्कृती विज्ञानाचे विवेकी तत्त्वज्ञान स्वीकारेल तर गांधीवादात अनुस्यूत असलेली सत्य, अहिंसा, शांती जगभरात नांदतील. पुस्तकात एक सूर सारखा असतो की गांधीवाद हे अखेरचे जीवनतत्त्वज्ञान आहे, त्यापुढे जायचेच नाही. ‘‘आमचे तत्त्वज्ञान अंतिम आहे’’ हे प्रत्येक धर्म म्हणत राहिलेला आहे व तेच तर मानवजातीचे दुर्भाग्य आहे. कालौघात विश्वातील सर्व निर्जीव व सजीव अस्तित्वे बदलत असतात हे भान ठेवायला पाहिजे. कोणताही ‘वाद’ भोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित परिस्थितीसह बदलायला पाहिजे. ‘परिस्थिती’मध्ये सजीवता-पर्यावरण हा सुसंवाद, मानवाचे मन, त्याची प्रज्ञा, त्याची विवेकबुद्धी, त्याची जीवनशैली, सर्व काही येते. ज्ञान-विज्ञान जसजसे पुढे जाईल तसतसा मानवाचा विवेकसुद्धा पुढे जायला पाहिजे. अनिष्ट हे की धर्म ही संकल्पना विवेकाला सातत्याने मागे खेचते. सत्य, न्याय, अहिंसा, शांती हे सूत्र केवळ गांधीवादाचे नसून विज्ञानाचेसुद्धा आहे, कारण विज्ञान विवेकावर आधारले आहे, विज्ञान-विवेक ही ‘सिंबायॉटिक’ जोडी आहे. काही लोकांना याची जाणीव नसते. हा दोष विज्ञानाचा नसून त्या लोकांचा आहे.

आजच्या परिस्थितीत गांधीजींनी ‘गांधीवाद’ कसा बदलला असता हा प्रश्न अप्रस्तुत आहे. आज ते नाहीत; परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आपण विवेकी जन तर आहोतच ना! ‘बदल’ व्हावा तो अधिक प्रगल्भतेकडे. ‘सत्य, न्याय, अहिंसा, शांती’ हे सूत्र महत्त्वाचे. साधने, उपकरणे, यंत्रे अशा गोष्टी मानव कशा उपयोजितो हे महत्त्वाचे. ती अस्तित्वे केवळ आहेत हे महत्त्वाचे नाही; ती वापरताना मानव विवेक उपयोजितो की नाही हे महत्त्वाचे. अशा प्रकारे गांधीवादाने विज्ञानाला नाही, पारंपरिक विचारांना व धर्मालाच आव्हान दिले.

गांधीवाद्यांना आग्रहाने सांगायला पाहिजे, गांधीवादाचा ‘धर्म’ बनवू नका!

Tags: अरविन्द पारसनीस विज्ञान सुनील सहस्त्रबुद्धे गांधीवाद गांधीज्‌ चॅलेंज टु मॉडर्न सायन्स arvind parsnis sunil sahstrabudhhe gndhi's challenge to modern science discovery science gandhiwad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके