डिजिटल अर्काईव्ह

कृष्णात खोत यांची ओळख मागील दोन दशकांपासून थोड्याच पण वैशिष्ट्य पूर्ण कादंबऱ्या लिहिण्यासाठी आहे. ग्रामीण जीवनाचे व सर्वसामान्य माणसांचे जगणे त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आणि कथा यांचेही वेगळे कौतुक झालेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार वेळोवेळी मिळालेले आहेत. नुकताच त्यांच्या 'रिंगाण' या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने आजच्या पिढीतील आघाडीचे कथाकार (अलीकडेच त्यांची 'तसनस' ही कादंबरीही आली आहे) आसाराम लोमटे यांनी घेतलेला हा कृष्णात खोत यांच्या साहित्याचा वेध.

पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला केवळ पाचशे- सहाशे लोकसंख्येचे निकमवाडी हे गाव आहे. गावाच्या शिवारात जास्त प्रमाणात भातशेती. तसा कोल्हापूर हा भरपूर पर्जन्यमानाचा पाणीदार जिल्हा, पण निकमवाडी मात्र कमी पावसाचा शिवार. पाऊस पडला तरच शेती पिकते अन्यथा, दुष्काळ पाठ सोडत नाही. कृष्णात खोतचं हे गाव. शालेय शिक्षण जवळच्याच पन्हाळ्याला झालं आणि ते पूर्ण करून कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजला कृष्णातने बी. ए. ला प्रवेश घेतला. बी.ए.ला असताना नाटक लिहून ते बसवलं. त्यानंतर तीन नाटकं लिहिली. अर्थात, ती प्रसिद्ध झाली नाहीत, पण लिहिण्याच्या सुरुवातीच्या काळातली अभिव्यक्ती ही नाटकांच्या माध्यमातून झाली. पुढे कृष्णातनं कविताही लिहिल्या. त्याच्या कादंबरीलेखनातही अधूनमधून जी काव्यात्मकता डोकावते तिची सुरुवात ही अशी झालेली आहे. 1990-91 मध्ये बी.एड. झाल्यानंतर पुढे पोटापाण्याचा संघर्ष सुरू झाला. काही काळ क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या शिक्षणसंस्थेत वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम केलं. पुढे पन्हाळा सोसायटीच्या कळे येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम सुरू झालं. दुसऱ्या बाजूला शिक्षण मात्र सुरूच होतं. इतिहास, राज्यशात्र आणि मराठीतून एम.ए. केलं. त्यानंतर कळे इथेच ज्यूनिअर कॉलेजमध्ये काम करायला प्रारंभ झाला. या ठिकाणी अतिशय समृद्ध असं ग्रंथालय असल्याने झपाटून वाचन सुरू झालं. मोठे मोठे लेखक वाचले. त्यातूनच लिहिण्याची प्रेरणा निर्माण झाली. अशी सगळी कृष्णातची पार्श्वभूमी आहे.

'गावठाण' ही कृष्णातची पहिली कादंबरी. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात शेषराव मोहिते यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या मदतीने नवलेखन शिबिर घेतलं होतं. तिथं अनेक नवे लिहिणारे आलेले होते. कृष्णातची पहिली भेट त्याच शिबिरात झाली होती. तेव्हा नुकतीच त्याची मौजेच्या दिवाळी अंकात 'गावठाण' ही लघुकादंबरी प्रसिद्ध झाली होती. शिबिरातील अनेक वक्त्यांनी या कादंबरीचा उल्लेख आपल्या भाषणातून केला होता. आता जेव्हा 'गावठाण'च्या निर्मितिप्रक्रियेविषयी कृष्णातला विचारल्यानंतर त्यानं या लेखनामागची कहाणी सांगितली.

"सुरुवातीच्या काळात लिहिण्या-वाचण्याच्या उपक्रमात हजेरी लावणं, आसपासच्या साहित्य संमेलनांना जाणं, असं सगळं चाललेलं होतं. औदुंबर येथील साहित्य संमेलनाला गेलो होतो. तिथे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची भेट झाली. "मी काही लिहिलं आहे, ते तुम्हांला वाचायला द्यायचं आहे", असं मी त्यांना म्हणालो. मग त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला आणि एके दिवशी फोन करून 'कराडला या', असं सांगितलं. एका दिवशी सुट्टी पाहून मी रविवारी जेव्हा कराडला पोहोचलो तेव्हा श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मला घेण्यासाठी चक्क बसस्टॅन्डवर आलेले होते. मी लिहिलेली कादंबरीची वही त्यांच्याकडे सोपवली आणि विसरूनही गेलो. साधारण महिन्याभराने त्यांचा फोन आला की, 2001च्या दिवाळी अंकासाठी 'गावठाण' ही लघुकादंबरी स्वीकारली आहे. मौजेच्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाल्यानंतर जाणकारांचे फोन यायला लागले. अनेकांनी कादंबरी आवडली म्हणून सांगितलं. काही कार्यक्रमांमधून या नुकत्याच मौजेत छापून आलेल्या कादंबरीचा आवर्जून उल्लेख होऊ लागला. त्यानंतर ही कादंबरी 2005ला मौजेने प्रसिद्ध केली. बाळ ठाकूर यांचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनांसह ती अत्यंत देखण्या रूपात वाचकांसमोर आली."

"आनंदी ही या कादंबरीची नायिका आहे. तिच्यासारख्या कित्येक मुली कमी वयात लग्न होऊन ढोरकष्टांना जुंपल्या जातात. भयंकर दारिद्र्य वाट्याला आलेल्या, तरीही सतत दुःखाला सामोरे जाणाऱ्या आणि उपजत शहाणपण अंगी असलेल्या एका विवाहित मुलीचा जीवनसंघर्ष पुस्तकरूपात आल्यानंतर सगळीकडून चांगल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आनंदीचा संसार, तिचे माहेरचे, सासरचे लोक; एवढेच नाही तर तिथला निसर्ग अशा सगळ्या गोष्टी मी या कथानकात गुंफल्या. पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेला माझ्या गावाचा भोवताल... या भोवतालातच अशा अकाली संसाराला जुंपलेल्या अनेक मुली मला दिसत होत्या. त्यांतलीच आनंदी मी माझ्या शब्दांत उभी केली. ज्या परिसरात ती वाढते घडते तो सगळा परिसर जिवंत करण्याचा प्रयत्न केला. या कादंबरीने एक आत्मविश्वास दिला आणि लेखक म्हणून एक स्थान निश्चित केलं", हे कृष्णात आवर्जून सांगतो.

'गावठाण' ही म्हटलं तर एका छोट्या कुटुंबातली गोष्ट होती. पण पुढच्या कादंबरीत कृष्णातने राजकारण या एका सर्वस्पर्शी, सर्वसंचारी अशा विषयाला हात घातला. 'रौंदाळा' ही कृष्णातची दुसरी कादंबरी 2008ला पॉप्युलर प्रकाशनाकडून प्रसिद्ध झाली. गाव हाच या कादंबरीचा नायक आहे. 'खेड्याकडे चला म्हणणाऱ्या महामानवास' अशी या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे. या कादंबरीविषयी कृष्णात म्हणतो, "1990च्या दशकापर्यंत स्थितिशील असणाऱ्या गावांमध्ये बदलाने वेग घेतला. राजकारणाचे डावपेच माणसांचं जगणं उद्ध्वस्त करू लागले. एरवी आपापल्या कामातच गुंतलेल्या माणसांना जणू राजकारणाची चटक लागली. एखाद्या चुरगाळून फेकून दिलेल्या कागदासारखी गावांची अवस्था झाली. गावांचं पार बकालीकरण झालं. 'रौंदाळा'मध्ये मी अशाच गावाचं चित्र रेखाटलं आहे. साध्या ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या निवडणुकीत गावं किती ढवळून निघतात. शह-काटशहांचं राजकारण चालतं. माणसं उभी करण्याचं, त्यांना निवडून आणण्याचं, पाडण्याचं राजकारण पेट घेत राहतं. गावच्या गावं त्यात धुमसत राहतात. सतत आपल्या प्रतिस्पर्ध्याची जिरवण्यासाठीच जणू माणसे टपलेली आहेत असे वाटत राहते. गावावर आपली हुकमत कशी राहील याचाच सदैव विचार सर्व राजकारणग्रस्त लोक करत राहतात. 'रौंदाळा' ही कादंबरी याच सूत्राभोवती गुंफलेली आहे. कादंबरीच्या शेवटी 'गाव म्हणायचं का वणवा' असं वाक्य येतं, ते का तर ही कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येईल.

'धूळमाती' ही कादंबरी मौज प्रकाशन गृहाने 2014 या वर्षी प्रसिद्ध केली. 'गावठाण' सारखीच ही लघुकादंबरी म्हणता येईल. कधीकाळी जमिनीशी असलेले भावनिक नाते आणि मातीची ओढ कालांतराने बदलली. विशेषतः रस्त्यालगतच्या जमिनींना सोन्यासारखा भाव आला. जमिनीवरून होणारे संघर्ष, हेवेदावे खेड्यापाड्यांत वाढले. या कादंबरीतला 'नारगुंडीचा माळ' हे जमिनीच्या संघर्षाचे केंद्र आहे. स्वतः जमीन नसणारी माणसे मोठमोठ्या जमीनदारांच्या जमिनी कसतात. सावकार किंवा मोठे जमीनदार आपल्या जमिनी अशा कुळांकडे देतात. नारगुंडीचा माळही दाजी सावकाराने अशाच एका राबणाऱ्या कुटुंबाकडे सोपवलेला आहे. हा माळ दाजी सावकार विकायला काढतो. वाटेल ती किंमत मोजून तो विकत घ्यायचा असा विचार हा माळ कसणारे कुटुंब करते. ज्या मातीत आपण जीव ओतला आहे ती जमीन दुसऱ्या कुणी घेण्याची कल्पनाच सहन होणारी नसते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ही जमीन हातची जाऊ द्यायची नाही, या जिद्दीने कुटुंबातले सर्व जण कामाला लागतात. नातेवाइकांकडून पैसे आणायचे, जवळचे किडूकमिडूक विकायचे, पण ही जमीन हातची जाऊ द्यायची नाही असा विचार हे राबणारे कुटुंब करते. मात्र, यातही गावातले वैमनस्य डोके वर काढते. लोक आपापले हेवेदावे बाहेर काढतात.

सरळमार्गी माणसांच्या आयुष्यातही अनेक संकटे वाढवून ठेवलेली असतात. शेवटी अशा माणसांचाही तोल सुटतो. रान मिळवण्यासाठी चालू असलेला संघर्ष विफल होतो. गावातल्या शिरजोर प्रवृत्ती हातातोंडाशी आलेला घास काढून घेतात. ज्या रानात घाम ओतला असा 'नारगुंडीचा माळ' हातातून निसटण्याची पाळी येते तेव्हा संयमाचा कडेलोट होतो. अगदी शेवट म्हणून पाषाणाच्या नारगुंडीबाबासमोर दादाकडून नारळ, उदबत्ती आणि पाण्याचा तांब्या ठेवला जातो. "निम्मा जल्म झाला. तू पोसलंस तुझ्या या मातीवर. आता पुढल्या जल्मात तुझी नि माझी मातीसाठीच पडली तर गाठ नाहीतर कुठली आली?" असं दादा म्हणतात. एवढ्यात अण्णा चक्क एक दगड उचलून नारगुंडीबाबावर घालतो. त्या पाषाणाच्या देवावर आपला संताप व्यक्त करतो. नारगुंडीबाबाला काही होत नाही, पण घातलेल्या दगडाच्या मात्र ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. अण्णाच्या डोळ्यांत आग उतरलेली असते. छोट्या छोट्या वाक्यांमधून कृष्णात हा प्रसंग उभा करतो.

"मी मातीत पुरल्यागत उभा होतो. 
देव दाजीगत हिरवागार हसत होता. 
सूर्य माथ्यावर ऊन थापित होता. 
मी पुढे गेलो. दादांना उठवलं. त्यांचं डोळे डबडबलं.

अण्णाचं नि माझंही डोळं गळायला लागलं. 
दादांना दोघांनी धरलं. आम्ही घराकडं येऊ लागलो. नात्यातल्या माणसाची माती सावडून आल्यागत". 
इथं ही कादंबरी संपते.

'रौंदाळा'ला गाव हा नायक होता, तर 'झड- झिंबड'मध्ये पाऊस हाच नायक आहे. ही कादंबरी आकाराला कशी आली आणि लेखक म्हणून कृष्णातला या कादंबरीबद्दल काय वाटतं? असं विचारल्यानंतर तो जरा विस्ताराने सांगतो. त्यातून कादंबरीची पार्श्वभूमी लक्षात येते.

"साधारणपणे 2000 या वर्षी पत्नीच्या नोकरीनिमित्त पाटपन्हाळा या गावी मी राहण्यास गेलो. जन्मगाव निकमवाडी जरी कोरडवाहू असले तरी पाटपन्हाळा मात्र भरपूर पाण्याचा परिसर. दोन्ही बाजूंनी नद्या. एक जांभळी आणि दुसरी कासारी. या गावात जेव्हा राहायला आलो तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. शिवारात भरपूर ऊसमळे, वाहणाऱ्या नद्या आणि चहूबाजूंनी डवरून आलेला निसर्ग, साहजिकच हा सगळा परिसर पाहून मी आनंदून गेलो. इथूनच मी माझ्या कळे या नोकरीच्या गावी जात असे. त्या वेळी मी भाड्याच्या घरात राहत होतो. घरमालक कोल्हापूरला असायचे. 2005च्या पावसाळ्यात पाटपन्हाळ्याच्या पुलावर पाणी आलं. गावाचा अन्य ठिकाणांशी असलेला संपर्क तुटला. घरातही बेभान वारा आणि पाऊस शिरला. घराची एक भिंत पडलेली, पण तसल्या पावसातही ती टिकून राहिली. त्याच काळात मुलगा आजारी पडलेला. अशा वेळी रात्र-रात्र झोप लागायची नाही. औषध आणण्यासाठी सकाळी उठून वाट विचारत बाहेर पडलो. पाण्यातून भोगाव हे सात किलोमीटर अंतर असलेलं गाव गाठायला पाच तास लागले. परत यायला पाच तास... याच अनुभवावर मी 'पाऊस' या नावाची कथा लिहिली. जेव्हा पावसाळा संपला तेव्हा घरमालकांनी भिंत बांधली. पण त्या दिवसांचं सावट मनावर कायम होतं. त्या काळात रात्र-रात्र झोप लागायची नाही. भिंत पडल्याच्या या अनुभवावर मौजेच्या दिवाळी अंकात 2007 मध्ये 'झड' ही कथा लिहिली. पावसाळा असा प्रत्येक वेळी नवनवे अनुभव देत होता. 'झड-झिंबड'ची सुरुवात इथून झाली आहे.'

पावसाच्या अनुषंगाने सर्व संदर्भ आणि ऐवज गोळा करून प्रत्यक्ष कादंबरी लेखनापर्यंत झालेला प्रवासही मोठा वेधक आहे. कृष्णातच्या तोंडून तो ऐकताना या विषयासाठी त्याने घेतलेले परिश्रम लक्षात येतात. तो सांगतो की, “कादंबरीच्या अनुषंगाने पावसासंबंधीच्या सगळ्या नोंदी करत गेलो. माझं गाव कोरडवाहू आणि आईचं माहेर हे नदी असणारं गाव होतं. त्यामुळे आई जात्यावर ज्या ओव्या म्हणत असे त्या नोंदवून घेतल्या होत्या. शिवाय, आईने कधी तरी लहानपणी हस्त नक्षत्राची कहाणी सांगितली होती. ती परत तिच्या तोंडून ऐकली. या कहाणीची टिपणं टिपून घेतली. पावसाच्या प्रत्येक नक्षत्राला आपल्या गावाकडच्या माणसांनी काही विशेषणं दिलेली आहेत. नक्षत्रानुसार पडणाऱ्या पावसाचे वर्णन लोकांनी केलेलं आहे. हे सगळं मनात साठवत होतो. पूर, अतिवृष्टीच्या बातम्या, वर्तमानपत्रांतून आलेल्या नोंदी गोळा करत होतो. लोकांच्या बोलण्यातून येणारा पाऊस, असं सगळं ऐकत होतो. माझा अनुभव, ऐकिव माहिती, जाताना येताना पाहिलेलं पावसाचं रूप, त्या काळातल्या वर्तमानपत्रांच्या बातम्या आणि या सर्वांची संगतवार मांडणी करून संपूर्ण पावसाला कवेत घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे 'झड-झिंबड' होय." 

"पावसाचा लोकजीवनावर पडलेला ताण, त्याने केलेली वाताहत, पावसाचा तडाखा सोसलेली माणसे पावसाला शिव्या देत असत. पावसाला उद्देशून बोलत असत. संतांनी जसं विठ्ठलाशी भांडण केलं, विठ्ठलाशी जसा संतांचा दावा होता तसाच या सगळ्या माणसांचा पावसाशी दावा असल्याचं मी पाहत होतो. त्यातूनच खापऱ्याझोड्या, झाडपाड्या, गावबुडव्या, शिवारतुडव्या, उरबडव्या, घरपाड्या, शिवारकुजव्या असे पावसासंबंधीचे अनेक शब्द मला सुचायला लागले. पाऊस जणू हेच एक पात्र आहे अशा पद्धतीने या माणसांचा जीवनव्यवहार मी पाहत होतो. तेव्हाच पाऊस हीच या कादंबरीची मुख्य व्यक्तिरेखा आहे असं मला मनोमन वाटलं." कृष्णात जे सांगतो त्याचं प्रत्यंतर प्रत्यक्ष कादंबरी वाचताना येतं.

'झड-झिंबड' हे नाव कादंबरीला कसं दिलं गेलं हे विचारल्यानंतर कृष्णात सांगतो, "झड नावाची कथा मौज दिवाळी अंकात छापून आलेलीच होती. त्यामुळे तेच नाव कादंबरीला द्यावं का असा प्रश्न मनात होता. तशी कादंबरीला ठोस अशी कथा नव्हती. पाऊस हाच कादंबरीभर व्यापून राहिलेला आहे मग 'सावट' हे नाव निश्चित केलं होतं. पुन्हा 'झिंबड' हे नाव ठरवलं. पॉप्युलर प्रकाशनच्या संपादक अस्मिता मोहिते यांच्याकडे हे लेखन पाठवल्यानंतर त्यांनी मला लगेच पहिली प्रुफं पाठवली. त्यानंतर दोन मुखपृष्ठ माझ्याकडे पाठवून दिली. त्यातले एक कादंबरीसाठी निश्चित केले. कादंबरीच्या ब्लर्बसाठी अस्मिता मोहिते यांनी राजन गवस यांच्याकडे कादंबरीचे प्रूफ पाठवले होते. गवस सरांनी कादंबरी वाचून एके दिवशी फोन केला. त्यांना कादंबरी आवडली आणि फोनवरच त्यांनी ब्लर्बचा मजकूर सांगितला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा फोन आला. तोवर कादंबरीचे फायनल प्रूफ, मुखपृष्ठ ब्लर्बसह त्यांच्याकडे पाठवले होते. "एवढे नवे शब्द या कादंबरीत तू घडवले आहेस तर कादंबरीचे नावसुद्धा अशाच पद्धतीने एखादा नवा शब्द घडवून झाले तर चांगले होईल", असे गवस सर म्हणाले आणि त्यांनीच 'झड-झिंबड' असा एक नवाच शब्द सुचवला. हेच कादंबरीचे नाव कायम झाले. पाऊस नसला तरीही माणूस रडतो आणि अतोनात झाल्याच्या नंतरही तो माणसाला रडवतो. त्यामुळेच 'पाऊस भिजक्या डोळ्यांना' अशी या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे."

'रिंगाण' ही कृष्णातची २०१७ ला प्रसिद्ध झालेली कादंबरी. माणूस आणि निसर्ग हे सूत्र तर या कादंबरीला आहेच, पण या कादंबरीचे आणखी एक परिमाण थक्क करणारे आहे. पाळीव प्राण्याचा आदिमतेपर्यंतचा प्रवास रेखाटणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे. ही कादंबरी कशी सुचली ते कृष्णात सांगतो. 

"मी 1990 ला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वस्तिगृहाचा रेक्टर म्हणून सोनवडेला काम करत होतो. त्या वेळी वस्तिगृहात वेगवेगळ्या गावांतून आलेली धरणग्रस्तांची मुले त्यांच्या व्यथा सांगत असत. हे गाव धरणापासून दोन-तीन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी धरणग्रस्तांच्या मुलांची मोफत शिक्षणाची सोय अण्णांनी केली होती. यातल्या अनेक मुलांची गावे ही धरणात गेलेली होती. त्या गावांना मी बऱ्याचदा गेलो होतो. शनिवारी या मुलांचे पालक जवळच्या आठवडी बाजाराला आले की मुक्कामाला वस्तिगृहात येत. एवढ्या दूरवरून लेकरांच्या भेटीसाठी पायी चालत आल्यानंतर त्यांना एक दिवस मुक्कामच करावा लागत असे. त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी यायच्या. ते गावातल्या म्हाताऱ्या माणसांविषयी बोलत, नातेवाइकांचे हाल सांगत."

"माझ्याकडे बोडके नावाचा एक विद्यार्थी होता. जो वयाने माझ्यापेक्षाही मोठा होता. त्याने मला त्याच्या धनगरवाड्यावर एकदा नेलं. त्या वेळी मी तिथं अस्वलाने पायाचा लचका तोडलेला एक जण धोतराच्या फडक्याने पाय बांधून बसलेला पाहिला होता. कोणत्याही औषधोपचाराशिवाय तो जंगलातून फिरत होता. आपली दररोजची कामं करत होता. त्यानंच मला कोल्ह्याच्या व वाघाच्या अनेक रंजक कथा सांगितल्या. दरम्यान, 1993 ला ती नोकरी सोडून मी माझ्या गावाजवळच्या शाळेत आलो; पण त्या भागात मला सतत जावं वाटत असे. ज्या ज्या वेळी तिकडे जाईल त्या त्या वेळी मी धरणावर आणि जंगलात जात असे. चांदोली अभयारण्य घोषित झाल्यानंतर अनेक वाडे-पाडे उठवले गेले होते. त्या भागात पुन्हा कधी गेल्यानंतर या उठवलेल्या वाड्या-पाड्यांना मी भेटी देत असे. या ठिकाणी राहणारी माणसं आणि त्यांचं जगणं मी पाहिलं. प्रत्येक वर्षी किमान एकदातरी या उठलेल्या वाड्या-पाड्यांवर मी जात असे आणि त्यांची पडझडही जवळून पाहत असे. माझी पहिली 'गावठाण' ही कादंबरी 2005 ला आली. या कादंबरीची प्रुफं माझ्याकडे तपासायला आली होती. त्याच काळात 'रिंगाण'चा हा विषय डोक्यात आकार घ्यायला सुरुवात झाली होती."

'रिंगाण'चा नायक देवाप्पा हा आकाराला कसा आला, याबाबतही मोठी उत्सुकता होती. कृष्णात सांगतो, "एकदा असाच धरणाच्या वरच्या भागात फिरायला गेलो होतो. जुन्या जंगलातल्या वाटा नष्ट होत होत्या. जंगल खात्याने नव्या वाटा निर्माण केल्या होत्या. मूळ रहिवाशांना जर आपल्या आधीच्या गावात दर्शनासाठी जायचं असेल तर जंगल खात्याची परवानगी घ्यावी लागत होती. वरच्या भागात केवळ खुंदलापूरचा धनगरवाडा तेवढा शिल्लक होता, तोही आता उठवला जाणार आहे असं कानांवर येत होतं. तिथे एक म्हातारा मला भेटला. तो थकलेला होता. त्याचं कोणीच नातेवाईक आता जंगलात राहिलेलं नव्हतं. सगळं जंगल रिकामं झालं होतं. माणसं पांगलेली होती. माझं प्रुफ तपासायचं काम झालं की मी संध्याकाळी रोज फिरायला बाहेर पडत असे. कधीकधी धरणाच्या वर असलेल्या जंगलात जाई. माझ्या बरोबर असणारे मला या धरणाच्या अनेक गोष्टी सांगत. बुडालेल्या गावांच्या जंगलातून हद्दपार करण्यात आलेल्या माणसांच्या, जनावरांच्या कथा या वेळी कानावर पडत आणि त्यात दररोजच नव्याने भर पडत असे. त्या ठिकाणच्या म्हाताऱ्याला भेटायचं, गप्पा मारायच्या असं बऱ्याचदा घडत असे. त्या वेळी येता-जाता अनेकदा सोडलेल्या म्हशी दिसायच्या. सुरुवातीला त्यांच्याकडे माझं लक्ष नव्हतं. धरणाच्या खाली असणाऱ्या गावातल्या लोकांच्या या म्हशी असतील असा माझा समज होता; पण जरा बारकाईने बघितलं तर त्यांच्यात एक वेगळेपण जाणवत होतं. एकत्र कळप करून त्या राहायच्या. कुणी नवा माणूस आला तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायच्या. त्यांच्या अंगावरचे केस भरपूर वाढलेले होते आणि त्यांच्या जवळ जाण्याची भीती वाटत होती. या म्हशी माणसाकडे अशा का बघतायेत, त्यांना इतर प्राण्यांचे भय वाटत नसेल का असे अनेक प्रश्न घेऊन मी त्या म्हाताऱ्याला भेटलो. या म्हशी माणसाला पाहिलं की आता बिथरून जातात. एकटक पाहतात. माणसाची सावलीही पडू देत नाहीत आणि माणूसही त्यांच्या जवळ जाईल असं आता त्यांचं वागणं राहिलेलं नाही. पुनर्वसन झालं तेव्हा भाकड जनावरं माणसांनी इथेच सोडली आणि ती नव्या मुलखात राहायला गेली. ही भाकड जनावरं आता रानटी जनावरागत माणसांना आपल्याजवळ फिरकू देत नाहीत. त्या म्हाताऱ्याने हे सगळं सांगितलं आणि कादंबरीचं बीज माझ्या डोक्यात पडलं. पाळीव प्राण्याचा रानटी होण्यापर्यंतचा प्रवास मला दिसायला लागला आणि त्यावरच मी 'वसप' या नावाची कथा मौजेच्या दिवाळी अंकात लिहिली. 2008 मध्ये ही कथा छापून आली.

"एकदा एका धरणग्रस्तांच्या वसाहतीच्या शाळेत गेलो होतो. त्या ठिकाणी धरणाचा नकाशा भिंतीवर काढलेला होता आणि त्यात बुडालेल्या गावांचा उल्लेख होता. या शाळेत एक म्हातारा मुलांना पोहायला, झाडावर चढायला शिक्षकांची परवानगी घेऊन येत असे. तो जंगलातल्या आठवणीही सांगायचा. तो या अभयारण्यातला पुनर्वसित होता. त्याची गावाबद्दलची ओढ जराही कमी झालेली नव्हती. त्याचं मन या गावात रमत नव्हतं. त्याची तडफड मी जवळून पाहत होतो आणि हीच तडफड मी देवाप्पाला बहाल केली. अर्थात, कोणत्याही एकाच व्यक्तीवर ही व्यक्तिरेखा बेतलेली नाही. आधी भेटलेल्या खुंदलापूरच्या म्हाताऱ्यापासून ते या म्हाताऱ्यापर्यंत अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंश देवाप्पा उतरलेला आहे. देवाप्पाची जगण्याची लढाई, त्याने आपल्यात करून घेतलेला बदल, म्हशीसोबतचा त्याचा संघर्ष असे सूत्र मी गुंफुले. देवाप्पाच जगणं आणि म्हशींचं जगणं यांची सरमिसळ लेखनाच्या आशयद्रव्यात झाली."

"देवाप्पा आपली म्हैस आणायला निघालेला दिवस ते दुसऱ्या दिवसापर्यंत... असा दोन दिवसांचा कालावधी कादंबरीत येतो. मात्र, गतकाळाच्या अनेक गोष्टी यात फ्लॅशबॅक पद्धतीने येत राहतात. जवळपास दोन पिढ्यांचा कालपट कादंबरीत येतो. या सर्व गोष्टींच्या मी आधी नोंदी केल्या होत्या, टिपणं काढली होती. आठवडी बाजाराला आलेल्या आणि वस्तिगृहात एक दिवस मुक्काम करून राहिलेल्या अनेक माणसांचे बोलणं मला जसं आठवेल तसं मी नोंदवून ठेवलं. देवाप्पा घडवत असताना या सगळ्या गोष्टी कामी आल्या. आम्ही शाळेत जाताना वाटेला पन्हाळगडाची जी उंच तटबंदी होती त्यावर दगड मारून आमच्या ताकदीचा अंदाज येता जाता अजमावत असू. त्याच पद्धतीने देवाप्पा झाडावर दगड मारून आपली ताकद किती आहे हे पाहतो. म्हशीबरोबरच्या संघर्षात असताना तो लघवी करतो आणि या वयात आपली लघवी किती लांब जाते हे पाहतो, आम्ही गमतीने लहानपणी असं करायचो.'

कादंबरीदरम्यान देवाप्पा सगळं बोलत राहतो. ही त्याची सगळी स्वगतं त्याला ओळख न दाखवणाऱ्या म्हशीला उद्देशून आहेत. त्यात एक प्रकारची काव्यात्मकता आहे. तो चिडतो, हळहळतो तर कधी म्हशीला प्रेमाने चुचकारतो. या सगळ्या झटापटीला एक लय आहे. ती लय पकडण्याचा प्रयत्न कृष्णातने भाषेच्या द्वारे केला. त्यामुळे अनेक ठिकाणी कादंबरीत काव्यात्मक असा भाग येतो. अर्थात, या सर्व कादंबऱ्या लिहिण्याआधी कृष्णातने काही कविताही लिहिलेल्या आहेत. 'रिंगाण' कादंबरीत तर त्याच्यातला कवी अनेकदा दिसून येतो. म्हैस आणि आपल्यात पडलेलं अंतर दूर व्हावं यासाठी देवाप्पाची धडपड चाललेली आहे. शेवटच्या टप्यातली त्याची ही धडपड जिवावर बेतलेली आहे. प्राणांतिक आहे. पण किमान या झटापटीमुळे तरी आपण आपल्या मूळ भूमीचे दर्शन घेत आहोत याविषयीचं समाधान देवाप्पाच्या मनात आहे. जो प्रवास या कादंबरीतल्या म्हशींनी केला तोच प्रवास अन्य प्राणीही करतील. जे प्राणी पाळीव झाले आहेत त्यांना संधी मिळाल्यानंतर ते परत आपल्या मूळ प्रवृत्तीवर जातील आणि हे रिंगण पूर्ण करतील असं मत काही जाणकारांनी कृष्णातजवळ व्यक्त केलं आहे. आपल्या मूळ प्रवृत्तीत जाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष किंवा तो संघर्ष करण्याची ताकद प्राण्यांच्या शरीरात निसर्गाने शाबूत ठेवलेली असेलच, असा विचार कृष्णातच्याही मनात आला आणि कादंबरीला त्याने 'रिंगाण' असं नाव दिलं. 'रिंगाण' या शब्दाला आणखी एक संदर्भ आहे. एखाद्याशी जर निकराचा संघर्ष सुरू झाला असेल तर त्याला "तू माझ्या तावडीत गावशीलच ... न्हाय तुझं रिंगाण काढलं तर बघ". असं म्हणण्याची एक पद्धत आहे. ती एक प्रकारची परतफेडच असते. यात एक आव्हान आहे. समोरासमोर दिलेलं आव्हान, चढाईची भाषा असं या शब्दात आहे. म्हणून 'रिंगाण' या शब्दाला हा असा आणखी एक चढाईखोर संदर्भ आहे. आधीचं 'तुटल्या मुळाचा कोंब' हे जे नाव या कादंबरीला दिलेलं होतं ती आता या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे.

.... अशी ही सगळी कृष्णातच्या कादंबरी-पंचकाची गोष्ट आहे. 'नांगरल्याविन भुई' हे त्याचे व्यक्तिचित्रांचे आणखी एक पुस्तक आहे. 'रौंदाळा' या त्याच्या कादंबरीतून गावपातळीवरचे राजकारण आलेले असले तरी मुख्यत्वे निसर्ग आणि माणूस हाच त्याच्या कादंबरीलेखनाचा गाभा आहे. 'झड-झिंबड' आणि 'रिंगाण' या दोन्ही कादंबऱ्यांमधून ही बाब प्रकर्षाने दिसून येते. 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी माया पंडित यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. शब्द पब्लिकेशननेच तो प्रसिद्ध केला आहे. कृष्णातचे लेखन आता भाषेच्या मर्यादा ओलांडून आणखी विस्तारत जाईल. 'गावठाण 'पासून सुरू झालेला हा प्रवास 'रिंगाण'च्या रूपाने एका निर्णायक वळणावर आलेला आहे. आणखीही नवीन वळणे गाठण्यासाठी, खूप काही लिहिण्यासाठी कृष्णातला भरभरून सदिच्छा!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आसाराम लोमटे ( 30 लेख )
aasaramlomte@gmail.com

पत्रकार व लेखक.  आसाराम लोमटे यांचे आलोक (कथासंग्रह), इडा पिडा टळो (कथासंग्रह),धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (2016) मिळाला आहे. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी