डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कोकणी कथेला नवे परिमाण देणारी कथा: तरंगां

सैलांच्या कथांत कुठेही भडकपणा नाही किंवा अतिटोकाची काल्पनिकताही नाही. आशय-अभिव्यक्तीच्या थाटातील सोपेपणा हा त्यांच्या कथांचा ठळक स्वभाव आहे. मूलतः स्वभावाचे काही घटक सगळीकडे सारखेच असतात. काही ठिकाणी फक्त ते कमी-अधिक प्रमाणात दृग्गोचर होतात. किंबहुना परिस्थितिसापेक्ष असतात. अशा स्वभावाचे मार्मिक चित्रण सैलांनी केलेले दिसते.

महाबळेश्वर दत्ता सैल हे कोकणीतले तसे शैलीदार लेखक. त्यांचे 'तरंगां' आणि इतर कथासंग्रह प्रभावी कथांनी समृद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी मराठीत तीन नाटकेही लिहिलेली आहेत. यातना घर, जळो नशीब माझे इत्यादी. गोव्याच्या समृद्ध निसर्गाच्या परिसरात त्यांची कथा फुललेली आहे. बहरलेली आहे. विशेषतः करमाल घाटातील निसर्ग व तेथील लोकजीवनाचे ताणेबाणे आणि तेथील माणसांच्या व्यथा-वेदना व मानसिकता महाबळेश्वर सैलांनी अतिशय हळुवारपणे रेखाटले आहे.

महाबळेश्वर सैल यांचा जन्म 14 एप्रिल 1945 साली माजाळी, गोवा येथे झाला. माजाळी हे गोव्याच्या दक्षिणेला असलेले कारवार तालुक्यातले गाव. करमाल घाटापलीकडच्या तमाम जीवनाशी त्यांची बांधिलकी त्यांच्या कथांतून व्यक्त होते. सैलांचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. सतरा वर्षांचे असतानाच ते भारतीय फौजेत भरती झाले. फौजेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. नोव्हेंबर 1963 ते नोव्हेंबर 1964 ह्या तेरा महिन्यांच्या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने इस्त्रायल आणि इजिप्त यांच्या लढाईत शांतिसैनिक म्हणून पॅलेस्टाईनमध्ये वावरले. तसेच 1965 च्या भारत-पाकिस्तान यांच्यामधील लढाईत, पंजाब हुसेनीवाला सेक्टरातील युद्धात त्यांनी भाग घेतला. ही फौजेतील कामगिरी पार पाडल्यानंतर त्यांनी गोवा हीच आपली कर्मभूमी मानली आणि तेव्हापासून ते अखंडपणे लिहीत आहेत.

पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या वर्चस्वानंतरही कोकणी भाषेचे संस्कार, संस्कृती, संचित व अस्तित्व मूळ धरून आहे, हे विशेष. महाराष्ट्राचे आणि गोव्यातील मराठी माणसांचे व मानसिकतेचे परस्परांशी अनुबंध आदिम व चिरंतन असे आहेत हे सकृद्दर्शनीच प्रत्ययास येते. कोकणी भाषेचे मराठीशी अतिशय जवळचे नाते आहे. किंबहुना ह्या भाषा एकमेकींच्या भगिनी-भाषा आहेत. सैल हे ह्या दोन्ही भाषांचे जाणकार आहेत आणि दोन्ही भाषांमधला दुवाही आहेत. त्यांना कोकणी बरोबरच मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाविषयी प्रेम, आदर व आप्त भावनाही आहे. त्यांच्या कथांमधील निर्मिती महाराष्ट्रातील वातावरणाशी अतिशय मिळती-जुळती आहे; नव्हे ती समरूप-एकरूप अशी आहे. त्यामुळे त्यांच्या कथानकातील पात्रांचे चित्रण मराठी वाचकांनाही सहजपणे समजते व भावतेही. त्यांच्या कथा-व्यथा, आशय-विषय आपलेच वाटतात. किंबहुना ते अस्सल मराठी भाषेतील वाटतात. त्यांच्या कथांतील विषय माणुसकीच्या संवेदनेने आशयघन होऊन ओथंबल्यामुळे सैलांच्या कथांना कुठल्याही चौकटीत बद्ध करता येत नाही. नव्हे तर अशा कथांचा स्थायीभावच जीवनवादी जाणीव हा असतो.

पु.ल. देशपांडेंनी महाबळेश्वर सैलांच्या कथांविषयी अतिशय सार्थ अन् अर्थपूर्ण शब्दांत लिहिले आहे, "तुमच्या कथा बघायला घेतल्या आणि दर कथेत एवढा गुंतत गेलो की, पूर्ण कथा केव्हा वाचून संपल्या कळलेच नाही. तुमच्या कथा मला अतिशय आवडल्या, एवढ्या वर्षांनी इतक्या सुंदर आणि काळजाला भिडणाऱ्या कथा वाचल्याचे समाधान मिळाले."

गोवा म्हटले की आपल्या दृष्टीसमोर श्रीमंतांचे श्रीमंती चैनीचे जीवन समोर येते. परंतु सैलांच्या कथांमुळे आपल्याला 'नाही रे' वर्गाचे उपक्षित जिणे जगणार्‍यांचे वास्तव जीवन कळते. ज्यांचे जीवन कधी आपल्यासमोर आलेच नाही किंबहुना यापूर्वी ते वर्णिले गेले नाही असे खूप मोठे जीवन, त्या जीवनाचे धागे-दोरे, चांगले-वाईट, सुष्ट-दुष्ट, सुख-दुःखाचे अनेक कंगोरे सैल आपल्याला उलगडून दाखवितात. ते ग्रामीण भागातील बहुसंख्य समष्टीची जीवन-जाणीव कथांतून चित्रित करतात. परिणामतः आपल्यासमोर अव्यक्त, अस्पर्श जीवनाचे यथार्थ दर्शन सैलांच्या कथांमुळे प्रकट होते. त्यांचे नायक, नायिका, उपनायक व एकूण कथानकच ग्रामीण जगतातून साकार होते. जसे 'कमळफूल', 'मेर', 'तरंगां' या कथांमधून होणारे जीवनदर्शन. ग्रामीण जीवनाची आशयाभिव्यक्ती हेच त्यांच्या कथांचे मर्मस्थान व मूलस्त्रोत आहे, हे त्यांच्या कथांचे मोठेपणही आहे. ग्रामीण जीवन-जिण्याचे, संचित-संस्कारांचे वास्तव चित्रण हे तर त्यांच्या कथांचे बलस्थान आहे. यातून त्यांची सामाजिक बांधिलकी व तळमळही प्रकट होते. या त्यांच्या अशा प्रकारच्या जीवन-जाणिवांच्या आशयाभिव्यक्तीमुळे ते जीवनवादी लेखक ठरतात. ग्रामीण जीवनाच्या मानसिकतेचे विविध तळ व पदर शोधणाऱ्या आशयघन कथानकांमुळे ह्या कथा वाचकांच्या मनाला भिडतात, भावतात. गोव्यातील निसर्गाचे वर्णन यापूर्वीच्या साहित्यातून बरेच आलेले आहे. परंतु तेथील तळागाळातील माणसांच्या स्वभावांचे अनेक पदर मांडणारे साहित्य तेवढ्या समर्थपणे आलेले नव्हते. सैलांच्या कथांनी ही कोकणी साहित्यातील मोठी पोकळी भरून काढलेली आहे. सैलांचे असे साहित्य मराठीमध्ये अनुवादित होणे जरुरीचे आहे. त्यामुळे मराठी वाचकाला गोव्यातील उपेक्षित-अप्रकट जीवनाची यथार्थ जाणीव होईल.

सैलांच्या 'तरंगां' या कथासंग्रहातील कथांमध्ये त्यांच्या सैनिकी संवेदनशीलतेच्या कृति-उक्तीचेही प्रतिबिंब पडताना दिसते. प्रत्यक्ष जीवनात वावरताना त्यांच्या अंतर्मनातील संवेदनशील कथाकार सतत जागृत असलेला दिसतो. तो भूकंपमापक-सिस्मोग्राफसारखा समाजातील जित्याजागत्या माणसांचे जिणे, त्यांची जीवन जाणीव-नेणीव, सुख-दुःख, भलेबुरेपणा अचूक टिपतो. कुठलाही संवेदनशील साहित्यिक सिस्मोग्राफ यंत्रासारखाच असला पाहिजे तरच तो सभोवतीच्या समाजातील घडामोडी, गुंतागुंत, संघर्ष व ताणे-बाणे अत्यंत अचूक टिपू शकतो. कारण 'साहित्य हे सामाजिक प्रक्रियेचे अविभाज्य अंग आहे.' त्यांच्या सैनिकी प्रकृतीचा कथाकार मानसिकतेशी सुरेख मिलाफ झालेला आहे. कोकणी साहित्यातील बा.भ.बोरकरांच्या पिढीनंतर महाबळेश्वर सैल व पांडुरंग नाईक यांच्या लिखाणातून कोकणी जीवनाचे कमालीचे वास्तव चित्रण, तेथील वैशिष्ट्यपूर्णतेसहित झालेले आपल्याला दिसेल.

सैलांच्या कथांत कुठेही भडकपणा नाही किंवा अतिटोकाची काल्पनिकताही नाही. आशय-अभिव्यक्तीच्या थाटातील सोपेपणा हा त्यांच्या कथांचा ठळक स्वभाव आहे. मूलतः स्वभावाचे काही घटक सगळीकडे सारखेच असतात. काही ठिकाणी फक्त ते कमी-अधिक प्रमाणात दृग्गोचर होतात. किंबहुना परिस्थितिसापेक्ष असतात. अशा स्वभावाचे मार्मिक चित्रण सैलांनी केलेले दिसते.

स्वातंत्र्य ही तशी माणसांची व एकूण प्राणिमात्रांची मूलभूत भावना: सैनिकांचा संपूर्ण संघर्ष हा स्वातंत्र्य टिकविण्यासाठी असतो, गुलामीविरोधीच असतो. कथाकार सैल हे तर सैनिक होते. त्यांच्या कथांमधून अशा स्वभावाचे, कथानकाचे प्रकटीकरण होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे ते मानवमुक्तीच्या कथा ('अनी चेडवान् कायदो हातात घेतलो') ते सहज लिहून जातातत.

सैलांच्या कथांतून तीन रंगांचे प्रतिबिंब उमटते. ते म्हणजे एक निसर्ग, दुसरी सामाजिकता व तिसरी म्हणजे माणसांच्या अंतरंगातील भावना-वेदना. त्यांत जसा गोव्याच्या सुष्टीचा हिरवा रंग ओतप्रोत भरलेला आहे! (नवे, वीतराग, पाषाणभुयार, काळखा किरण). सैलांची कथा सचित्र करण्याची शैली काही औरच आहे. "लक्षुमणाच्यान वयनीले उतळताप, दणदणे पळोवं नजां जालले. चेहरो तांबडोगुंज जाल्लो आनी परतो परतो घाम निशेतलो. भरितल्लो जड देह घेवन एक चांट मारचे त्राण तिका नाशिल्ले. लक्षुमणाक तिचे कडेन तोंड वयर करून पळोवायचो धीर जायनशिल्लो. तो येळेच पयस पयस रावतालो."

'कथाकार सैलांची भाषा ही सर्वसामान्यांची भाषा आहे. साधी, सरळ, सोपी अशी ही भाषा कुठेही अवघड होत नाही. सर्वसामान्यांचे दुःख त्यांच्याच बोलीभाषेत मांडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कथा अस्सल झाल्या आहेत. कथांतून ते बारीक-सारीक तपशीलही मांडतात त्यामुळे त्यांच्या कथा अधिक जिवंत वाटू लागतात.

'ज्या वादाक केन्ना तोंड फुटचेंच न्हाय अशें दिसताले त्याकाच तुळशीनं खोटं मारून बुडकुलो फोडचो तशे फोडिल्ले.' (वीतराग)

'शानू मनाच्या देठांतल्यान दुखावलो' (पाषाणभुयार).

'रातभर भुकेचो सुरो खड्डून पोटांत फिरतालो' (मेर); 'आई भायर पडली आणि परिस्थितीची भुतां भोवताली कवंडाळे धरूक लागली', 'एखाद्या झाडाची खांद्यानखांदी तोडून उडोवची तशे म्हंजे चाचविलले जीवीत. सैलांच्या कथांची नायेच मनोवेधक असून अर्थवाही अशी आहेत आणि ग्रामीण मातीशी आपलेपणाचे नाते-गोते सूचित करणाऱ्या त्यांच्या कथा आहेत. जसे कमळफूल, इप्रीत, काळखा किरणां, पाषाणभुयार, तरंगां, मेरे, आडगांव वगैरे. सैलांची कथा समाजातील व्यंगावरही बोट ठेवते. समाजातील विरोधाभासाचेही चित्रण करते. 'आनी जो तो शिकून आफिसांनी चाकरी सोदता. शेतां कोणी करची, आमी म्हाताऱ्यांनी?' 'तळमळ' कथेतील हे उद्गार आजच्या भारतीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करतात किंवा 'वस्तू आपली असली तरी पळोवणारांचे डोळे हेरांचे असतात', हे वाक्य. अनुभूती व आविष्काराचा सुंदर मिलाफ म्हणजे सैलांच्या कथा होय.

सैलांचे शब्द परिस्थितीचा अचूक वेध घेतात अन् आपल्यासमोर सजग चित्र उभे करतात. यातच त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य दिसून येते म्हणूनच सैलांची कथा कोकणी साहित्याला व एकूणच भारतीय कथेला नवे परिमाण व नवे आयाम देणारी कथा ठरेल.

Tags: कमळफूल पांडुरंग नाईक बा.भ.बोरकर पु.ल.देशपांडे गोवा कोकणी कथा महाबळेश्वर दत्ता सैल Kamalphool Pandurang Naik B.B.Borkar P.L. Deshpande Goa Kokani Katha Mahabaleshwar Datta Sail weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके