डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्य अकादमीविजेता आबा गोविंदा महाजन

आबाने निवडलेली वाट अचूक होती, हे आता सिद्ध झाले आहे. कसा राहिला आबाचा साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास? तर, ही वाट निश्चितच सोपी नव्हती. आबाला कुठलाही शैक्षणिक, साहित्यिक वारसा नव्हता. घरची सगळी परिस्थिती अशा गोष्टींसाठी बिलकुलच अनुकूल नव्हती. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलसारख्या आडवळणाच्या गावी एका शेतमजूर कुटुंबात त्याचा जन्म झाला. घरची परिस्थिती दारिद्य्राने भारलेली होती. सोबतच वृद्ध आई-वडील व भावंडांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेली होती. आई लहानपणीच जग सोडून गेलेली. अशा परिस्थितीमुळेच आबाने शिक्षकी पेशा निवडलेला होता. त्या वेळी डी.एड. झाले की नोकरी लागायची. झालेही तसेच होते.

‘करि मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे...’ पूज्य साने गुरुजी यांचे हे वचन आहे. आपल्या ह्या वचनाचा प्रत्यय आणून देणाऱ्या अनेक गोष्टी साने गुरुजींनी लिहिल्या व मुलांचे प्रबोधन, मनोरंजन केले. गुरुजींच्या अनेक गोष्टी, कविता विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहेत. कित्येक विद्यार्थी आणि शिक्षक या दोहोंवरही साने गुरुजींच्या वाङ्‌मयाने कायमचे गारूड केलेले आहे. याला नव्या पिढीतील लेखक आणि शिक्षकही अपवाद नाहीत. यातीलच एक नाव आहे आबा गोविंदा महाजन.

आबा गोविंदा महाजन हे खानदेशातील प्रथितयश  प्रयोगशील बालसाहित्यिक व शिक्षक (आत्ताचे तहसीलदार, शिरपूर, जि.धुळे) यांना 2020 या वर्षासाठीचा अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यातील पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहासाठी हा पुरस्कार आहे. तो जाहीर होताच वाङ्‌मयक्षेत्रातून त्याचे प्रचंड स्वागत झाले.

आबांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो. आबा भरभरून बोलत होता. विनयतेने अभिनंदन स्वीकारत होता. फोनवरील बोलणे संपल्यानंतर आबाच्या एकूणच वाङ्‌मयीन कारकिर्दीचा आलेख माझ्या डोळ्यांसमोरून तरळू लागला... कोण आहेत आबा महाजन; त्यांचा साहित्यिक प्रवास कसा- व  कोठून सुरू झाला, याचा धांडोळा मनात सुरू झाला. तसा तर आबा माझा डी.एड.चा वर्गमित्र... आम्ही त्या वेळी चोपडा (जि.जळगाव) येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून डी.एड. करत होतो.

आबा मुळातच विलक्षण बुद्धीचा, संवेदनशील मनाचा व सालस स्वभावाचा मुलगा होता. आमच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रा.मो.साळवी यांची अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड नेहमी सुरू असायची. त्यातीलच हस्तलिखित भित्तिपत्रक ही कल्पना होती. या हस्तलिखित भित्तिपत्रकावर त्या वेळचे आमचे वर्गमित्र राजेंद्र उगले, रवींद्र साळी आदींच्या कविता झळकायच्या. त्यांचे कौतुक व अभिनंदन व्हायचे.

आबा आणि माझ्या मनात येथेच साहित्याचे पहिले बीज अंकुरले. शिक्षणशास्त्र विद्यालयातील याच प्रांगणात आमच्या मनावर साहित्याचा पहिला संस्कार झाला. मात्र तेव्हाचा प्रवास बराचसा बाळबोध होता. काय वाचायचं, कुठलं वाचायचं- या बाबतीत निश्चित अशी दिशा नव्हती; पण डी.एड.नंतर दोघांच्याही लिखाणाचा वेग वाढला आणि आम्ही आपापल्या साहित्यिक वाटाही निवडल्या. मी ग्रामीण साहित्याकडे वळलो, तर आबा बालसाहित्याकडे...

आबाने निवडलेली वाट अचूक होती, हे आता सिद्ध झाले आहे. कसा राहिला आबाचा साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास? तर, ही वाट निश्चितच सोपी नव्हती. आबाला कुठलाही शैक्षणिक, साहित्यिक वारसा नव्हता. घरची सगळी परिस्थिती अशा गोष्टींसाठी बिलकुलच अनुकूल नव्हती. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलसारख्या आडवळणाच्या गावी एका शेतमजूर कुटुंबात त्याचा जन्म झाला. घरची परिस्थिती दारिद्य्राने भारलेली होती. सोबतच वृद्ध आई-वडील व भावंडांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेली होती. आई लहानपणीच जग सोडून गेलेली. अशा परिस्थितीमुळेच आबाने शिक्षकी पेशा निवडलेला होता. त्या वेळी डी.एड. झाले की नोकरी लागायची. झालेही तसेच होते.

डी.एड. 1994 मध्ये संपले आणि आबाला शिक्षकाची नोकरी मिळाली. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये तो शिक्षक म्हणून रुजू झाला. शिक्षकाची नोकरी म्हटल्यावर आबाचे मुला-फुलांशी नाते कायम राहिले. चोपडा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून झालेली साहित्यसंस्कारांची पेरणी शिक्षक म्हणून कार्य करताना फळाला आली. ग्रामीण भागातीलच विद्यार्थ्यांच्या मनोविश्वाशी तादात्म्य पावण्याची संधी आबाला चालून आली व तो मुलांच्या भावविश्वात रमायला लागला. सोबतच भा.रा.भागवत, न.म.जोशी, मंगेश पाडगांवकर, कल्याणी इनामदार, शांता शेळके, विंदा करंदीकर, वि.वा. शिरवाडकर, वीणा गवाणकर आदी मान्यवरांच्या लेखनाच्या वाचनाचा सपाटा त्याने लावला.

अनेक नामवंत साहित्यिकांशी आबा पत्ररूपाने संवाद साधायचा. त्यांच्या आवडलेल्या साहित्याविषयी बोलायचा. स्वत: करत असलेल्या तोडक्या-मोडक्या काव्याविषयीही सांगायचा. अशा या पत्रसंवादातून, प्रत्यक्ष भेटीतून आबाचा मनःपिंड घडत गेला. सोबतच स्वतःची वेगळी वाट धुंडाळता आली. वाचनाने त्याच्या मनावर साहित्यिक संस्कार तर झालेच, शिवाय आपण कुठल्या दिशेने जायला हवे, हेही कळले. त्यातूनच वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण सुरू झाली. शब्दफुलांची ओंजळ भरून आबा साहित्यपंढरीच्या प्रवासाला निघाला.

सुरुवातीच्याच काळात आबाच्या कविता किशोर, गंमत जम्मत, टॉनिक, मुलांचे मासिक, निर्मळ रानवारा यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांतून, दिवाळी अंकांतून झळकू लागल्या. त्याच्या या लेखनप्रसिद्धीने व अनोख्या वाङ्‌मयीन शैलीने साहित्यविश्वाचे लक्ष वेधले. कोण हे नवे बालसाहित्यिक म्हणून वाचक चौकशी करू लागले. यानिमित्ताने  अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या. एव्हाना आबाने आपला लेखन वारू उधळून दिलेला होता.

डी.एड. संपल्यापासून ते नोकरीची सुरुवातीची काही वर्षे... पाचेक वर्षांचा कालखंड लोटलेला होता. एवढ्या कमी कालावधीत आबाने साहित्यक्षेत्रात बालसाहित्यिक म्हणून दबदबा निर्माण केला होता. आपल्या प्रकाशित झालेल्या बालकविता त्याने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे पाठवून दिलेल्या होत्या. त्याच्या ह्या पहिल्या संग्रहास साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान मंजूर झाले. आबाचा आनंद द्विगुणित झाला. आणखी दुग्धशर्करा योग म्हणजे पुण्याच्या ग म भ न या मान्यवर प्रकाशन संस्थेकडून तो संग्रह प्रकाशित झाला.

आबाचा बालकवितासंग्रह थाटात दाखल झाला होता. ‘गमतीच्या राज्यात’ असे त्याचे नाव होते आणि प्रकाशनवर्ष होते 2001... आबाचा हा पहिलाच संग्रह असला तरी पहिलेपणाच्या खुणा त्यात अजिबात नव्हत्या. सकस, दर्जेदार, नावीन्यपूर्ण, आशयघन शब्दकळा घेऊन आबा बालसाहित्यिक म्हणून दाखल झाला होता. प्रकाशक ल.म.कडू यांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता सुंदर, सुबक, देखणी निर्मिती केली होती. आशयघन शब्दकळा आणि सुबक छपाई यांचा संगम झाल्याने हा संग्रह देखणा झाला.

पहिल्याच कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोबतच खूप चर्चा झाली होती. आतापर्यंतची बालकविता पानाफुलांत रममाण होण्यात धन्यता मानत होती; मात्र आबाची शब्दकळा स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा घेऊन आली होती. ती प्रत्यक्ष मुलांना गमतीच्या अनोख्या राज्यात (विश्वात) घेऊन जाण्यात यशस्वी ठरली होती. आबा महाजन यांचा काव्यप्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. एकामागून एक कवितासंग्रह, कथासंग्रह, बालनाट्य, बालकादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

तो काळ भारावलेला आणि मंतरलेला होता. निकोप स्पर्धा होती. शिवाय लिहित्या हातांना हमखास बळ दिलं जायचं. त्या कौतुकाचा आणि स्वागतशील मार्गदर्शनाचा धनी आबा ठरला होता. नव्यानेच लिहू लागलेल्या या लेखकाचे स्वागत जसे महाराष्ट्रभर होत होते. तशीच त्यांची वाङ्‌मयीन दखल गावाकडेही घेतली जात होती. त्या वेळी आबाच्या गावी एरंडोल येथूनच औदुंबर साहित्य चळवळ राबविली जात होती. या चळवळीचे पाठीराखे श्रीपाल सबनीस होते. तर वा.ना.आंधळे, म.ना.आंधळे, विलास कांतिलाल मोरे, प्राचार्य यशवंत पाटील आदी मंडळींचा सहभाग होता.

औदुंबर साहित्य मंचच्या माध्यमातून एरंडोल येथे विविध कार्यक्रम व्हायचे व उपक्रम राबविले जायचे. या उपक्रमांचा, वाङ्‌मयीन कार्यक्रमांचा, व्यासपीठांचा मोलाचा वाटा आबा गोविंदा महाजन हा साहित्यिक घडविण्यात राहिला. आबाच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ एरंडोल येथील याच मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्याचबरोबर जळगाव येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखाही तेव्हा भरपूर कार्यक्रम घ्यायची. प्रा.नारायण शिरसाळे हे मसापचे जिल्हा प्रतिनिधी व शाखा अध्यक्ष होते.

नारायण शिरसाळे यांचा स्वभाव मृदू व सहकार्यशील होता. नवोदितांना त्यांचे मार्गदर्शन असायचे. त्यांचे स्वतःचे वीणा प्रकाशन होते. आबाच्या लेखनातील हरहुन्नरी पाहून शिरसाळे यांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांची ‘मौजमजा’ व ‘रिमझिम गाणी’ ही पुढील पुस्तके प्रकाशित केली. नारायण शिरसाळे हे जाणकार प्रकाशक होते, शिवाय धों.वे.जोगीगुरुजी हेही नावाजलेले बालसाहित्यिक जळगाव येथे होते. त्यांचेही मार्गदर्शन आबाला लाभले.

अशा प्रकारे आबा महाजन यांची साहित्यिक जडण-घडण होत राहिली. अनेक व्यासपीठांवरून त्यांना काव्यवाचनाची संधी मिळाली. विशेषतः मसाप जळगाव आणि आकाशवाणी जळगाव यांनी त्यांच्या सादरीकरणाला पुरेपूर वाव दिला. जळगाव आकाशवाणी केंद्राचे संचालक सुप्रसिद्ध कवी बालसाहित्यिक उत्तम कोळगावकर, कार्यक्रम अधिकारी प्रतिमा जगताप यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आबांनी सादर केले. ‘ऑपरेशन भोंदूबाबा’ हे बालनाट्य आकाशवाणीवरून प्रसारित झाले व खूप गाजले.

दरम्यान, आबाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवलेली होती. त्या माध्यमातून त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशाला रामराम ठोकला व प्रशासकीय सेवेत रुजू झाले. असे असले तरी आबाच्या व्यक्तिमत्त्वातून साने गुरुजींचा शिक्षक कधी वजा झाला नाही किंवा त्यांच्यातील बालसाहित्यिकही लोप पावला नाही. नोकरीत झालेला बदल असेल किंवा प्रशासकीय सेवेतील ताणतणाव, आबांनी आपल्या वाङ्‌मयसेवेवर कधीही परिणाम होऊ दिला नाही. उलट, अधिक जोमाने ते कामाला लागले व पुढील काळात त्यांची पुढील पुस्तके प्रकाशित झाली.

बिस्किटचा बंगला, लई मज्जा रे, चिऊचा मोबाईल, वाघोबाची गांधीगिरी, गमतीदार खेळांचा खजिना, हिप हिप हुर्रे. यात बहुतेक कवितासंग्रह होते. बालकाव्य, कुमार काव्य, शिशुगीत, विनोदी बालकविता... पूर्वसुरींची वाट पुसत-पुसतच आबा महाजन यांचा बालसाहित्यिक म्हणून प्रवास सुरू होता. दरम्यान, बालसाहित्यातील त्यांच्या मुशाफिरीला दशकभराचा कालखंड लोटला होता. सुरुवातीचे नवखेपण संपले होते. पोक्तपणाकडे, साहित्यिक भूमिकेकडे आबाचे लक्ष गेले. अनेक परिसंवाद, व्यासपीठांवरील वावर व प्रदीर्घ अनुभव-चिंतनातूनही प्रगल्भता आली होती.

मग आबा महाजन यांची दुसरी इनिंग सुरू झाली होती. स्वतंत्र वाङ्‌मयीन प्रवाह निर्माण करण्याकडे त्यांची पावलं पडू लागली होती. आधीचा काहीसा रंजनात्मक बाळबोध विचार सोडून त्यांचे साहित्य प्रगल्भतेकडे झेपावू लागले होते. फास्टर फेणेसारखा ‘ठोंब्या’ हा नायक त्यांनी रुजविला. ‘ठोंब्या’ नावाची कादंबरी, ‘टांगाटोली’ नावाचा कथासंग्रह, यावर कडी म्हणून की काय त्यांनी ‘मन्हा मामाना गावले जाऊ’ हा खानदेशी अहिराणी बोलीतील स्वतंत्र कवितासंग्रह निर्माण केला. ‘मन्हा गावले’ व ‘खानदेशी गाव’ या अत्यंत दर्जेदार नावीन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती केली. हीच काय ती आबा महाजान यांची सर्वोत्तम कमाई.

याअगोदर साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, बालकवी यांच्या साहित्यातून खानदेश डोकावत होता. पण संपूर्ण खानदेशी बोली, खानदेशी संस्कृती बालसाहित्यात आणण्याचे काम आबा महाजन यांनी हिरीरीने केले. बालसाहित्यातील बोलीचा हा वावर नावीन्यपूर्ण ठरला. यात अधिकची भर पडली ती 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाची. हा संग्रह तर अत्युच्च वाङ्‌मयीन मूल्यात्मकतेचा व प्रयोगशीलतेचा परमोच्च बिंदू ठरला. या संग्रहातील सर्वच कथा जिवंतानुभव देतात व स्वतंत्र रसरशीत कथन निर्माण करतात.

आबांच्या कथा, कविता अनेक मानसन्मान पुरस्कारांच्या धनी ठरल्या. विविध अभ्यासक्रमांत त्या सन्मानाने विराजमान झाल्या. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण परवा जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराने खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयोगशील बालसाहित्य परंपरेचा गौरव झाला. खरं तर हा त्यांना मोठं करणाऱ्या साहित्यपरंपरेचा व खानदेशी संस्कृतीचा गौरव आहे.

एका शेतमजूर कुटुंबातील सालदाराच्या मुलाच्या नावाचा डंका यानिमित्ताने भारतवर्षात गाजला. त्यांची ही वाटचाल इथेच न थांबता जागतिक स्तरावर जावो, या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आबा गोविंदा महाजन यांचे पुनःश्च अभिनंदन करतो!

‘आबाची गोष्ट’ हा वैशिष्ट्यपूर्ण  बालकुमार कथासंग्रह आहे. 2017 ला पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध झाला. या कथासंग्रहातील वैशिष्ट्यपूर्ण खानदेशी बोली व खानदेशी ग्रामसंस्कृतीचे अनोखे दर्शन लक्षवेधी ठरले. या संग्रहातील कथा नावीन्यपूर्ण आहेत. मुख्यत्वे शाळकरी मुलांच्या भावविश्वातल्या या कथा आहेत. संस्कार व बोधपर असे त्याचे स्वरूप आहे. प्रतिकूल अवस्थेत धडपडणारी, परिस्थितीशी दोन हात करणारी, प्रामाणिक, जिद्दी मुलांच्या या संघर्षकहाण्या आहेत. या कहाण्या आबा गोविंदा महाजन या नायकाच्याच आहेत. यातील गुरंढोरं आणि पुस्तक, आबाची गोष्ट, टोपननाव, बोकायकाला, शाळेतले दिवस ह्यासारख्या गोष्टींतून लेखकाचे आत्मचरित्र डोकावते. तर गारपीट, दोस्ती रामरहीमची यांसारख्या कथा प्रत्यक्ष अनुभवांवर बेतलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यामध्ये जिवंतपणा व तरल संवेदनशीलता दिसून येते. यातील सर्वच कथांना कथामूल्य आहे. खानदेशी बोलीतील संवाद व परिसरनिष्ठ निवेदन यामुळे या कथांना  एक प्रकारची चित्रात्मकता प्राप्त होते, जी बालवाचकांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

----

जरूर वाचा...

साधना प्रकाशनाकडून आलेले अशोक कौतिक कोळी यांचे स्वत:चे बालपण व त्या काळातील सभोवताल यांचे चित्रण करणारे पुस्तक : 
अशानं आसं व्हतं
पृष्ठे 150, किंमत : 150 रुपये

हे पुस्तक अ‍ॅमेझॉन वर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: मराठी बालसाहित्यिक मराठी साहित्य खानदेश साहित्य अकादमी आबा गोविंदा महाजन बालवाङ्मय बालसाहित्य साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके