डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

निरोप घेताना त्यांनी माझ्या खिशात दहा हजार रुपये टाकले. मी नाकारू लागलो तेव्हा त्यांनी सांगितले, ‘हे पैसे अतिशय इमानदारीचे आहेत. चांगल्या माणसाच्या कामी येतील. पैशाचं सार्थक होईल. पैशापेक्षा लेखक, कवी, कलावंत महत्त्वाचे असतात. तुम्ही जगले पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत मला मागा, पण लेखन सोडू नका.’ जयसिंगपूरची शेती आणि कारखाना व परिसर पाहायला या, असे निमंत्रण त्यांनी त्याचवेळी दिले.

सन 2009 चा संस्कृती साहित्य सन्मान ‘बिराड’ आणि ‘इळन्‌माळ’ या पुस्तकांच्या लेखनासाठी मला मिळाला. (हा पुरस्कार संस्कृती फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जातो. याअगोदर हा सन्मान मराठीत निखिल वागळे आणि राजन गवस यांना मिळालेला आहे.) त्यावेळी तेव्हाचे ‘साधना’चे युवा संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘साधना’ची कव्हरस्टोरी केली, त्यात माझ्या संघर्षमय आयुष्याची कहाणी सांगितली होती.

‘साधना’चा तो अंक सा. रे. पाटील यांच्या हातात पडला. त्यांनी तो लेख वाचला. त्याची एक नाट्यमय गोष्ट त्यांनीच सांगितली आहे. सा.रे.पाटील दिल्लीला जाण्यासाठी पुण्याच्या विमानतळावर जरा उशिरा पोहोचले आणि काही मिनिटे आधीच ते विमान निघून गेले होते. त्यावेळी आप्पासाहेब एकटेच होते आणि नंतरचे विमान चार तासांनंतर मिळणार होते. तेव्हा त्यांना स्वत:चाच राग आला, मन:स्थिती अस्थिर झाली, थोड्या वेळाने त्यांनी बॅगेतून ‘साधना’चा अंक काढला आणि त्यातला अशोक पवारचा लेख वाचला, तेव्हा ते मनाशीच म्हणाले, ‘‘किती मी वेडा... माझे विमान चुकले तर मी इतका अस्वस्थ झालोय. या अशोक पवारची जिंदगी होरपळून निघाली, तरी तो उमेदीने जगतोय.’’ नंतर त्यांनी बिराड वाचले. तेव्हा ‘‘अशोक पवार नावाचा माणूस काय भयावह जिंदगी जगला आहे. ही त्याची दुसरी जिंदगी आहे. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, पण अशोकचा हा दुसरा जन्म आहे. मला अशोकला भेटायचे आहे, त्याला बघायचे आहे’’ असे त्यांनी विनोदला सांगितले.

त्यानंतर सन 2010 च्या सुरुवातीला मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी माझी तिसरी कादंबरी ‘दरकोस दर मुक्काम’ प्रकाशित केली. त्याचबरोबर बिराड आत्मकथनाची सहावी आवृत्ती काढली. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पुण्यातील पत्रकार भवनात झाला. दुसऱ्या दिवशी विनोद शिरसाठ यांचा फोन आला, ‘‘अशोकराव तुम्ही आज पुण्यात आहात, आणि आप्पासाहेबसुद्धा पुण्यात आहेत. तर तुम्ही रिकामे झाल्यावर आपण आप्पासाहेबांना भेटायला ‘चंदन’ हॉटेलमध्ये जाऊ.’’ मी होकार दिला.

नंतर मी व अरविंद पाटकर त्या हॉटेलवर गेलो. बघतो तर काय 89 वर्षांचे आमदार सा.रे.पाटील हातात भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन माझ्या स्वागतासाठी उभे. मी क्षणभर भान हरपून गेलो. सा.रे.पाटील यांनी पुष्पगुच्छ माझ्या हातात दिला आणि सांगितलं, ‘अशोकराव तुमच्यासारख्या माणसाचं जीवन वाचलं की, कामाला नवा हुरूप येतो.’ आम्ही शांतचित्ताने टेबलावर बसलो. अनेक विषयांवर गप्पा झाल्या. माझे इतके सत्कार झाले, पण एखादा राजकीय नेता मला भेटण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन आतुर झालेला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला.

निरोप घेताना त्यांनी माझ्या खिशात दहा हजार रुपये टाकले. मी नाकारू लागलो तेव्हा त्यांनी सांगितले, ‘हे पैसे अतिशय इमानदारीचे आहेत. चांगल्या माणसाच्या कामी येतील. पैशाचं सार्थक होईल. पैशापेक्षा लेखक, कवी, कलावंत महत्त्वाचे असतात. तुम्ही जगले पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत मला मागा, पण लेखन सोडू नका.’ जयसिंगपूरची शेती आणि कारखाना व परिसर पाहायला या, असे निमंत्रण त्यांनी त्याचवेळी दिले.

त्यानंतर चंद्रपूरला गेल्यावर मी त्यांना पत्र पाठवले. त्यात असे लिहिले होते की, ‘त्या दिवशी मी तुमच्याकडून पैसे घेत नव्हतो. पण इथे आल्यावर किराणा दुकानदाराचे उधारीचे बिल मला चुकवता आले.’ ते वाचून आप्पासाहेब फार अस्वस्थ झाल्याचे विनोदने मला नंतर सांगितले.

महिना उलटल्यावर एक दिवस फोनवर बोलताना सा.रे.पाटील यांनी त्यांच्याकडे येण्याचा आग्रह धरला. मग चंद्रपूरहून पुण्याला गेलो. तेथून कारने मी, विनोद आणि अरविंद पाटकर निघालो. पाच वाजता शिरोळला पोहोचलो. तेथे सा.रे.पाटील आमची वाट पहात होते. विद्यमान आमदार, कारखान्याचा अध्यक्ष आमची अतुरतेने वाट बघतोय... राजकारणात असूनही सा.रे.पाटील एवढे समजदार, सोज्वळ कसे राहिले, याचे आश्चर्य वाटले. पण नंतर त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्यावर कळलं की, त्यांचा पिंड मुळात राजकारण्याचा नाही, तो समाजकारणाचा आहे. एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे आणि सेवादल व साधना परिवार यांच्या वैचारिक मुशीतून ते घडले  होते. मोठ्या माणसांचा सहवास लाभला आणि आयुष्य समृद्ध होत गेलं, असं त्यांनीच सांगितलं.

दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत चालत चालत एका सुंदर इमारतीत घुसलो. त्या इमारतीचे नाव होते ‘श्रीवर्धन’. एस.एम.जोशी यांच्या नावातला ‘श्री’ आणि अच्युतराव पटवर्धनमधला ‘वर्धन’ मिळून श्रीवर्धन झाल्याचं त्यांनी सांगितलं. कारखान्याचे नाव आहे ‘दत्त सहकारी साखर कारखाना’. भव्यदिव्य कारखाना बघताना मन भरून आले. (हा सहकारी साखर कारखाना बघण्यासाठी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते. राहुल गांधी कारखाना पाहण्यासाठी आले. कारखान्यावर तीन तास थांबले. आप्पासाहेबांचा त्याही वयात कामे करण्याचा आवाका पाहून, राहुल गांधी म्हणाले, ‘काय तरुण तरुण करून बसलायत, खरे तरुण तर सा. रे. पाटील आहेत.’)

नंतर आम्ही गणपतराव पाटील यांची शेती बघायला गेलो. 104 एकरची शेती, गणपतराव पाटलांनी खरबाड जमिनीवर नंदनवन उभे केले आहे. त्यांच्या शेतीतली फुलं परदेशात विक्रीसाठी जातात. त्यांची आधुनिक पद्धतीची शेती बघत असताना गणपतरावांनी सांगितले... ‘ती खुर्ची एस.एम.जोशींची आहे.... ती खुर्ची ना.ग.गोरे यांची आहे. आता त्या खुर्च्यावर कोणी बसत नाही. वर्षातून एकदा ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकरसुद्धा येथे येतात.’ मन भरून आले. महान व्यक्तींच्या पावन स्मृतींनी पावन झालेली ती जागा होती.

मग जांभळी गावच्या शाळेत गेलो. तिथे आमचा सत्कार करण्यात आला, भाषणे झाली. शेती, शाळा, सर्व पाहून ‘श्रीवर्धन’ला परत आलो. तेथे राजा शिरगुप्पे आमची वाट पहात होते. संध्याकाळी आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. (तेव्हाही आप्पासाहेबांनी माझ्या खिशात 20 हजार रुपये टाकले) बऱ्याच रात्री कोल्हापूरला आलो. तेथे आमचे लेखकमित्र लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी होते. त्यांच्याकडे मुक्कामी राहिलो. सकाळी निघालो आपापल्या मार्गाने. त्या दोन दिवसांतील आप्पासाहेबांच्या सहवासातील क्षण प्रवासात असताना पुन:पुन्हा आठवत होते. ...आयुष्याच्या पंचविशीपर्यंत पालावर राहिलेला अशोक पवार, दोन-चार पुस्तके लिहिल्यानंतर एका बाजूला पुरस्कार मिळत होते आणि दुसऱ्या बाजूला दोन वेळच्या जेवणाची पंचाईत होती. त्या काळात आप्पासाहेब माझा असा सन्मान करीत होते...

2013 मध्ये माझी ‘तसव्या’ नावाची कादंबरी अरविंद पाटकर यांच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली. त्या कादंबरीबद्दल अरुण साधू म्हणतात, ‘या कादंबरीतून अशोक पवार यांनी जागतिक किर्तीची नायिका उभी केली आहे.’ ती कादबंरी मी सा.रे. पाटील आणि मोहन धारिया या दोन समाजउद्धारकांना समर्पित केली आहे. सामाजिक जाणिवा असणारे, साहित्याचा प्रचंड अभ्यास असणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे म्हणाले, ‘‘अशोक, या कादंबरीची अर्पणपत्रिका मला खूप आवडली.’’

Tags: सा. रे. पाटील अशोक पवार आप्पासाहेब मला भेटले गणपतराव पाटील विनोद शिरसाठ राजा शिरगुप्पे अरविंद पाटकर लेखक Ganapatrao Pati Raja Shirguppe Vinod Shirsath Arwind Patkar Author Sa. Re. Patil Ashok Pawar Aappasaheb Mala Bhetale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक पवार

कवी, कादंबरीकार 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके