डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या सदरात विषय प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संदर्भातले असतील. सदराचं नाव ‘कुंपणांपलीकडे’आहे. म्हणजे सर्व प्रकारची कुंपणं ओलांडून जाणं त्यात अभिप्रेत आहे.यात जाती, धर्म, देश आणि व्यक्तींच्या मनात असलेली अहंकारी कुंपणं या साऱ्यांचा समावेश असेल. मुख्य म्हणजे भांडवलाऐवजी मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून नव्या जागतिकीकरणाची जी धडपड आता सुरू आहे त्याची दिशा या साऱ्यांतून सूचीत व्हावी असा प्रयत्न असेल.विज्ञान, राजकारण, कला, तंत्रज्ञान यापैकी कोणते विषय इथे वर्ज्य नसतील. स्थानिक महत्त्वाचे प्रश्नही कधी यात येऊ शकतात.

समाजाचा कार्यक्रम सामाजिक शक्तींनी ठरवावा की बाजाराने, हा आजच्या घडीला सर्वांत मोठा वादाचा विषय आहे.जागतिकीकरणाबद्दल आज आणि गेली काही वर्षे बरीच चर्चा चालू आहे. विशेषत: त्यात अंतर्भूत असलेल्या खुल्या बाजाराच्या संकल्पनेबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण आजच्या जागतिकीकरणाचा कार्यक्रम मुक्त बाजाराच्या अनुषंगाने चालू आहे आणि ही कल्पना उचलून धरणाऱ्या शक्ती याबद्दल आग्रही आहेत. मुक्त बाजार ही कल्पना भांडवलशाहीच्या चौकटीतली असून ती एक बंदिस्त विचारप्रणाली आहे आणि त्याच्याविरुद्ध असणाऱ्यांविषयी तिच्या पुरस्कर्त्यांनी अत्यंत कर्मठभूमिका घेऊन अनेकदा हिंसक कृत्यं करण्यापर्यंत मजल गाठली आहे. (उदा. १९७३ साली चिलीत लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेलं सरकार उलथून टाकलं गेलं. आयंदे सरकारने ज्या उद्योगांचं राष्ट्रीयीकरण केलं होतं ते पुन्हा खाजगी हातात सोपवण्यात आले.

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठ मुक्त बाजाराचे प्रणेते अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन होते. त्यांच्या शिष्यांनी हे सारं घडवण्यात पुढाकार घेतला होता. नंतर फ्रीडमननी याबद्दल चिलीचा हुकूमशहा ऑगस्टो पिनोशे याची पाठ थोपटली होती.) माणसावर लक्ष देण्याऐवजी प्रगत देशांत साचलेल्या भांडवलाला सारे दरवाजे खुले करणं आणि सारे अडथळे मोडून काढणं हे लक्ष्य समोर होतं. सार्वजनिक वा सामायिक क्षेत्रात असणाऱ्या विविध संसाधनांवर, शासनांवर वा संस्थांवर हल्ला चढवून ते ताब्यात घेणं हा यातला महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतात आजही हा कार्यक्रम जोरात राबवला जातआहे. यात शिक्षण, आरोग्य यांसह विविध सेवांचा समावेश आहेआणि आपण सारे याची मोठी किंमत मोजतो आहोत. सार्वजनिक क्षेत्रातल्या सेवा मोडीत काढून त्या भंगाराच्या किंमतीत उद्योजकांना विकणं यालाच आपण ‘सुधारणा’म्हणू लागलो आहोत. भाषेतला हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे.

सेझसारखे कार्यक्रम अत्यंत वेगाने घेतले जात आहेत आणि गोरगरिबांची बाजू घेणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या रसातळाशी जाण्याच्या स्पर्धेत आक्रमकपणे भाग घेत आहे.वंचितांच्यासाठी लढे देण्याऐवजी ‘कोणतीही किंमत मोजून प्रगती’ चा मार्ग चोखाळला जात आहे. यासाठी टाटाच काय तर इंडोनेशियातल्या सलीम समूहाचीही मनधरणी केली जात आहे.सलीम समूहाची इंडोनेशियातल्या एकेकाळच्या सुहार्तो राजवटीशीअसलेली मैत्री जगजाहीर आहे. (सुहार्तो राजवटीत सहा लाख कम्युनिस्टांची कत्तल झाली होती.) 

आपले समुद्रकिनारे, मोकळ्या फिरण्याच्या जागा, मैदानं ही सारी हळूहळू खाजगी क्षेत्रात गेली आहेत/जात आहेत. मुंबईतल्या नगरसेवकांनी संगनमत करून मोकळी मैदानं खाजगी क्लबना ‘चालवायला देण्याचा’घाट नुकताच उघडकीला आला आहे.इतकंच काय तर, पोलीस चौक्यांवरही खाजगी कंपन्यांच्या ‘सौजन्या’चे फलक लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना या संस्थांनी आपापले कार्यक्रम मुक्त बाजाराच्या अनुषंगानेच आखले असून सार्वजनिक क्षेत्रांचं खाजगीकरण करणं हा त्यांच्या कार्यातला महत्त्वाचा भाग आहे. (बेस्ट उपक्रम किंवा पश्चिम रेल्वे यांसारख्या उत्कृष्ट सार्वजनिक सेवा मुंबईत उपलब्धअसूनही मुंबईची नवी मेट्रो सेवा (जी अधिक किफायतशीर असणार आहे) खाजगी-सार्वजनिक सहकार्याच्या तत्त्वावर चालणार आहे. याचा नेमका अर्थ जाणकार समजून असतात.) 

खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वा जागतिक बँक यांमध्ये त्यांच्या मतप्रणालीच्या विविध विवाद्य मुद्यांवर, तिच्यातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा टीका केली आहे.

१९९० मध्ये भारतामध्ये या कल्पनाप्रणालीचे पुरस्कर्ते अधिक प्रभावशाली झाले. या कालखंडात मुक्त बाजारप्रणालीचे अनेक खंदे समर्थक सत्तेवर होते. डॉ.मनमोहनसिंग, चिदंबरम आणि माँटेकसिंग अहलुवालिया यांची नावं या संदर्भात प्रामुख्याने घ्यावी लागतील. तसंच शरद पवार यांचाही उल्लेख करावा लागेल. यापैकी मनमोहनसिंग वगळता इतर तिघे, या ना त्या प्रकारे एन्रॅान प्रकरणात त्या कंपनीची बाजू घेत होते, हा योगायोग नव्हे. अमेरिकेत सिएटलला १९९९ साली जागतिक व्यापार संघटनेच्यासमोर निदर्शनं झाली, त्यामुळे या विचारसरणीच्या विरुद्ध असलेला असंतोष प्रथमच जगासमोर आला.

लॅटिन अमेरिकेतल्या देशांनी १९९८ नंतर या विचारसरणीला प्रखरपणे विरोध केलेला दिसतो. व्हेनेझुएला, बोलिव्हिया, इक्वाडोर, निकाराग्वा, या देशात डावी सरकार सत्तेत असून, त्यांनी अमेरिकेविरुद्ध व्यापक आघाडी उघडली आहे. तसंच ब्राझील, चिली, अर्जेंटिना या देशांत जर काही अंशी डावेपणा असला तरी तो बराचसा दुर्बळ आहे.तरीपण या व्यापक आघाडीला काही प्रमाणात पाठिंबा आहे. मुख्य म्हणजे हे सारे प्रयत्न लोकशाही निवडणुकीच्या वा सार्वमताच्या मार्गाने होत असून त्या त्या देशातल्या लोकांचा एकूणच राजकीय प्रक्रियेमध्ये लक्षणीय सहभाग आहे. तसंच या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये हिंसाचार क्वचितच घडलेला आहे. मुख्य म्हणजे यातल्या नेत्यांनी हिंसाचाराला उत्तेजन दिल्याचं दिसत नाही. तरीपण राजकीय लढे सुरूच आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या साम्यवादाच्या मॉडेलपेक्षा हे वेगळं आहे. क्यूबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्याबरोबर लॅटिन अमेरिकेतल्या नव्या डाव्या नेत्यांचे संबंध मित्रत्वाचे असले तरीक्यूबाचे राजकीय प्रतिरूप यापैकी कोणी स्वीकारलेलं दिसत नाही.तरीपण क्यूबाने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत केलेलं काम अनेक देशांनी मॉडेल म्हणून स्वीकारलं आहे किंवा क्यूबाची मदत आपल्या देशातल्या सेवा विकसित करण्यासाठी घेतली आहे.

बाजाराधिष्ठित विचार करणाऱ्यांचा लक्ष सतत भांडवलदार केंद्रित झालेलं आपल्याला दिसतं. यात तळच्या माणसाकडे दुर्लक्ष होताना दिसून येतं. त्याऐवजी भांडवलदारांना सोईस्कर धोरणं आखण्यावर त्यांचाभर असतो. करांमध्ये सवलती, भांडवल आणि बाजारावरील  निर्बंध उठवणं, कामगारांना आणि त्यांच्यासंबंधी कायद्यांना खिळखिळे वा निष्प्रभ करणं हे अशा विचारांचे आणि ते मानणाऱ्या राजवटींचे गुणविशेष नेहमी दिसून येतात. याउलट, लॅटिन अमेरिकेतल्या नव्या डाव्या नेत्यांनी तळातल्या माणसाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. स्वस्त वा मोफत शिक्षण, स्वस्त वा मोफत आरोग्यसुविधा, स्त्रियांना प्राधान्य, प्रागतिक विचार, लोकशाही मूल्यांची जपणूक, विचारस्वातंत्र्य, दारिद्य उच्चाटणावर भर, कॉर्पोरेटऐवजी सहकारी पद्धतीला प्राधान्य हे सारे या विचारांत आणि कृतींत कमीजास्त प्रमाणात केंद्रस्थानी आहेत.

समाजाच्या विचारांमध्ये बाजाराला मध्यवर्ती स्थान असलं पाहिजे आणि त्याला अनुसरून बाकी सामाजिक राजकीय संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत अशा स्वरूपाचा विचार मुक्त बाजारपेठवाले मानतात; तर समाजाच्या विचारांनुसार बाजाराने चाललं पाहिजे असा आग्रह याला विरोध करणारे मानतात.आजच्या घडीला जगात सर्वात वादाचा हाच मुद्दा आहे.

युरोपप्रमाणे लॅटिन अमेरिकेतल्या देशांमध्ये काही प्रमाणात एकत्रीकरणाची प्रक्रिया वेग धरत आहे. या देशांनी एकत्र येऊ दक्षिणेच्या देशांची एक बँक निर्माण करण्याचं ठरवलं आहे. १० डिसेंबरला ब्यूनोस आयर्सला व्हेनेझुएला, बोलिव्हिया, इक्वाडोर, अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे या सहा देशांनी ह्या बँक स्थापनेच्या करारावर सह्या केल्या. या बँकेचं स्वरूप वेगळे असून त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वा जागतिक बँक यांप्रमाणे आपली धोरणं कोणी सदस्य देशांवर लादणार नाही असं तिच्या पुरस्कर्त्यांचं म्हणणं आहे. यूरोप्रमाणे स्वतंत्र चलन निर्माण करणं आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचं एकत्रीकरण घडवून आणणं यासाठी ही बँक हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. तसंच या देशांच्या राजवटी, तिथल्या जनतेचे लढे, संस्कृती या साऱ्यांना, अनुसरून स्वतंत्रपणे माध्यमं विकसित करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जुलै २००५ पासून व्हेनेझुएला, क्यूबा, अर्जेटिना, उरूग्वे या देशांनी मिळून ‘टेलेसूर’नावाची नवी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू केली आहे.

अर्जेंटिनाचे भूतपूर्व अध्यक्ष नेस्टर कर्चनर यांनी व्हेनेझुएला कडून आर्थिक साहाय्य घेऊन नाणे निधीचे कर्ज वेळेआधीच भागवलं आहे. यामुळे सगळेच प्रश्न सुटले आहेत असं नव्हे, पण एकंदरीत, अमेरिकेच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे या देशांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं म्हणता येईल. अमेरिकेचे म्हणणं आता तिथे सहजासहजी कोणी ऐकून घेत नाही. इक्वाडोरमधला मान्ता नावाच्या ठिकाणी एक विमानतळअमेरिकेच्या लष्कराने दहा वर्षांच्या कराराने वापरासाठी घेतला होता. त्याची मुदत २००९ साली संपते आहे. मात्र त्यानंतर हा तळ अमेरिकेला पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. कारण आम्हाला (अमेरिकेतल्या) फ्लोरिडात हवाई तळ वापरायला मिळाला तरच आम्ही अमेरिकेला आमचा तळ वापरायला देऊ, असं इक्वाडोरचे डावे अध्यक्षराफेल कोरिया यांनी अमेरिकेला सुनावलं आहे. इक्वाडोरसारख्या एका छोट्या देशाने अमेरिकेला असं सुनवावं यातून वातावरणात झालेला बदल लक्षात येतो. या हवाई तळावर आता अमेरिकेऐवजी चीनचा ताबा असणार आहे.

मुक्त बाजारावर आधारित जागतिकीकरण, त्याचं स्वरूप, त्याचा प्रसार करणाऱ्या संस्था, अमेरिकेच्या अर्थकारणाचा त्यातील सहभाग, या साऱ्यात गृहीत असलेलं लष्करीकरण या स्वरूपाच्या जागतिकीकरणाला होणारा विरोध हे विषय या सदरात प्रामुख्याने येतील. कारण यातली प्रत्येक गोष्ट आपल्यावर परिणाम करते आहे. खेडेगावातल्या शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं कोणत्या दरात मिळतील, त्याचा माल बाजारात खपेल की नाही; त्याला आपली कर्ज भागवता येतील की नाही; कामगारांना युनियन स्थापन करता येतील की नाही हे सारं बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार ठरत आहे. पूर्वीप्रमाणे आता कामाचे ठराविक तास राहिले नाहीत.तुमच्या मुलांना आता नोकरीत दहा-बारा तास काम करायला सांगितलं जात आहे. हे पाहून पुन्हा एकदा आपण एकोणीसाव्या शतकातल्या नव-औद्योगिकीकरणाच्या गुलामगिरीसदृश काळाकडे वाटचाल करीत आहोत की काय असं वाटू लागतं. याउलट व्हेनेझुएलामध्ये २ डिसेंबरला जे सार्वमत घेतलं गेलं त्यात दिवसाच्या कामाचे तास कमी (सहा) करण्याचा एक प्रस्ताव होता.वेगळ्या कारणाने या प्रस्तावांची एकत्र बांधलेली मोळी जनतेने फेटाळली. पण मुक्त बाजारवाल्यांचे विचार आणि नवे प्रागतिक विचार यांतला फरक लक्षात येण्यासाठी या सार्वमतात असलेले जे विषय आहेत त्याबद्दल अधिक विस्ताराने मांडण्याची आवश्यकता आहे. त्यातून परिवर्तनाची दिशा अधिक स्पष्ट होईल. या सार्वमताबद्दल लवकरच लिहिण्याचा विचार आहे.

चित्र गुंतागुंतीचं आहे. रशिया, चीन, भारत, ब्राझील यांसारखे देश अधिक आक्रमक होत आहेत. आपल्या देशातले उद्योजक तर आता अधिक जोरदारपणे पुढारलेल्या देशातल्या कंपन्या विकत घेत आहेत. (कुणीतरी याचा उल्लेख ‘वेस्ट इंडिया कंपनी’असा केला आहे). आपण भारतीयांनी यामुळे हरखून जाण्याचं काय कारण आहे? शेवटी या साऱ्याचा सामान्य माणसाला काय लाभ होतो आहे; आणि हे करत असताना कोणाच्या तोंडचा घास घेऊनतर हे सारं होत नाही असे प्रश्न विचारावे लागतील. मात्र रुपयाची किंमत वाढत गेली तर अनेक समीकरणं उलटीपालटी होऊ शकतात. सोबतीला जागतिक तापवानवाढीचं संकट वेगाने समोर येत आहे.

जाता जातामाध्यमांबद्दलही थोडं काहीम्हणणं आवश्यक आहे.जाहिरातशरण कॉर्पोरेटमाध्यमांकडून खुल्या लोकशाही पद्धतीची चर्चा वगैरेंची अपेक्षा ठेवणं म्हणजे अतीच होईल. आश्रयदात्या जाहिरातदारांचा मूड सांभाळून जमेल तेवढं आणि पचेल तेवढं सागणं इतकंच त्या चौकटीत शक्य आहे. यात व्यवस्थेच्या गंभीर प्रश्नांवर चर्चेपेक्षा सेक्स, हिंसाचार, खाजगी आणि सार्वजनिक भानगडींचं चर्वितचरण हे प्रश्न अग्रस्थानी आहेत. यासाठी स्वतंत्र बुद्धीऐवजी मॅनेजमेंटची कौशल्यं अधिक उपयोगी पडू शकतात. यात काम करणारी मंडळी जनतेपेक्षा त्या त्या कंपनीच्या भागभांडवलदारांना उत्तरं द्यायला बांधील आहेत. वाचक आणि प्रेक्षक ही त्यांची ‘गिऱ्हाईकं’असणार आहेत.

हे असं चित्र असताना दुसरीकडे इंटरनेटवर अनेक दर्जेदार वेबसाईटस जागतिक पातळीवर उपलब्ध आहेत. त्या उत्कृष्ट माहिती पुरवू शकतात. आम्ही कोणत्याच कॉर्पोरेट देणग्या स्वीकारत नाही असं त्या अभिमानाने सांगत आपलं म्हणणं ठासून मांडत असतात. मात्र त्यांची धाव कॉर्पोरेट माध्यमांच्या मानाने तोकडी पडते. इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याने तीही एक मर्यादाच आहे. तरीपण माध्यमांचा विचार करता ती एक मोठी आशा आहे.

या सदरात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संदर्भातले विषय असतील.सदराचं नाव ‘कुंपणांपलीकडे’आहे. म्हणजे सर्व प्रकारची कुंपणं ओलांडून जाणं त्यात अभिप्रेत आहे. यात जाती, धर्म, देश आणि व्यक्तींच्या मनात असलेली अहंकारी कुंपणं या साऱ्यांचा समावेश असेल. मुख्य म्हणजे भांडवलाऐवजी मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून नव्या जागतिकीकरणाची जी धडपड आता सुरू आहे, त्याची दिशा या साऱ्यांतून सूचीत व्हावी असा प्रयत्न असेल. विज्ञान, राजकारण, कला. तंत्रज्ञान यांपैकी कोणतेच विषय इथे वर्ज्य नसतील. स्थानिक महत्त्वाचे प्रश्नही कधी यात येऊ शकतात.

Tags: आंतरराष्ट्रीय राजकारण मिल्टन फ्रीडमन सदर अर्थकारण अशोक राजवाडे जागतिकीकरण economics ashok rajwade globalization कुंपणापलीकडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके