डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अपू चित्रत्रयी’ या तीन आणि नंतरच्याही त्यांच्या अनुपम कलाकृतींनी केवळ कलात्मक दृष्टीच नव्हे, तर अवघं भवताल पाहण्याची नजर दिली... हे सगळं सांगून, लिहून कधी संपतच नाही... संपणारच नाही..

आयुष्यभर चित्रपट पाहत आलेला मी- जेव्हा माझ्यावर जास्त कुणाचा, कुठल्या चित्रपटाचा प्रभाव आहे याची तपासणी करतो; तेव्हा सत्यजित राय व त्यांचे चित्रपट सर्वप्रथम माझ्यासमोर स्पष्टपणे येतात. प्रस्थापित चौकट संपूर्णपणे नाकारून सत्यजित राय यांनी एक वेगळीच वाट आपलीशी केली. एक वेगळा प्रवाह भारतीय चित्रपटात आणला. तो प्रस्थापित केला. इतकेच नव्हे, तर चित्रपटविषयक एक सर्वसमावेशक नवा विचार दिला... माझ्यालेखी सत्यजित राय ही एक ‘शाळा’ आहे. ते एक प्रगल्भ पीठ आहे. चित्रपट म्हणजे काय, केवळ हेच नव्हे; तर इतर तमाम कला म्हणजे काय, चित्रपटाचं आणि त्यांचं नातं काय आणि या तमाम कलांना वेढून असलेला भवताल काय, हे समजून घ्यायला ‘या’ शाळेने शिकविले.

तसा मी भटक्या. एका गावात कधी वाढलोच नाही. त्यामुळे गावागावात मला नवनव्या शाळा, नवनवे मास्तर भेटत गेले. किती शाळा आणि किती मास्तर याची गणतीच नाही. तरीही सत्यजित राय यासह आणखी दोन प्रमुख शाळांचा मला उल्लेख आणि कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी... विजय तेंडुलकर आणि फ्रेंच न्यू वेव्हचे एक प्रमुख प्रणेते व मूळचे व्यासंगी, सर्जनशील समीक्षक फ्रान्स्वा त्रूफो!... आणि हो, खऱ्या अर्थाने चित्रपट समीक्षा जन्माला घालणारे, ती विकसित करणारे त्रूफोंचेही गुरू आंद्रे बांझा!... आणि सर्गेई मिखायलोविच आइझेन्श्टाइन!... आणि अकिरा कुरोसावा!... आणि इंगमार बर्गमन!... आणि थिओ एंजलोपोलस!.... आणि... आणि.... थांबताच येणार नाही, एवढी मोठी यादी...

तर, माझ्यावर सर्वांत प्रभाव टाकणारा चित्रपट आहे... ‘पाथेर पांचाली’! केवळ ‘पाथेर पांचाली’च नव्हे, तर ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ हे त्याचे पुढले दोन भाग... म्हणजेच एकूण.... अपू चित्रत्रयी... अपू ट्रिओलॉजी!

अपूचे म्हणजे या ‘अपू चित्रत्रयी’च्या कथानकाचे विश्व प्रथम उलगडून दाखविले ते बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांनी ‘पाथेर पांचाली’ आणि ‘अपराजितो’ या आपल्या दोन अभिजात कांदबऱ्यांत! अपूचा सारा जीवनप्रवास- जरी तो बंगालीत लिहिला गेला, बंगालच्या सामाजिक-सांस्कृतिक-भौगोलिक अवकाशातला असला, तरी- तो एका विशिष्ट प्रादेशिक प्रदेशात सीमित होणारा नव्हता. त्याचा परिघ मोठा होता. नेमका सांगायचा, तर वैश्विक होता. त्याच्या या वैश्विक संदर्भाशी त्याला प्रथम वाच्यार्थ्याने जोडले ते सत्यजित राय यांनी! त्यांनी या कादंबऱ्यांना चित्ररूप दिलं. एका विशिष्ट प्रादेशिक भाषेतला हा समृद्ध मानवतेचा ऐवज त्यांनी चित्रपटाच्या जागतिक भाषेत आणला आणि जगभराच्या... अक्षरश: जगभरच्या लोकांपर्यंत अपू पोचला.

‘आपण कधीही खेड्यात राहिलो-वाढलो नाही. अपूच्या वाट्याला आलेले भागधेय आपल्या वाट्याला आलेले नाही,’ असे जरी सत्यजित राय म्हणत असले आणि तपशिलाच्या संदर्भात ते मान्य जरी केले, तरी सत्यजित राय यांच्या एकूण संवेदशीलतेच्या संदर्भात तसे म्हणता येत नाही. अपूचे वैश्विकपण त्यांच्यापर्यंत नेमके पोहोचले आहे. अन्यथा, साहित्यात ज्या उंचीला बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या कलाकृती पोहोचल्या; तीच उंची चित्रपटकलेत सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’ या चित्रकृतींनी गाठली नसती.

सभोवतालाविषयी असलेलं नैसर्गिक कुतूहल, त्याविषयीची तरल संवेदनशीलता, त्यातून एका ओघात सहजतेने प्रगल्भ होत जाणारं व्यक्तिमत्त्व, विस्कटत-उसवत जाणाऱ्या जगण्यातून येणारी विजिगीषु सहज प्रवृत्ती आणि अंतिमत: आयुष्याचं प्रवाहीपण स्वीकारत एका समाधिस्थ अवस्थेला सहजत: येऊन पोहोचणं... हा अपूचा जीवनाशय सत्यजित राय  यांना नेमका उमगला आणि म्हणूनच ‘अपू त्रयी’ ही विलक्षण कलाकृती निर्माण झालेली आहे.

‘अपू चित्रत्रयी’ इतक्या थेटपणे भिडण्याचे कारण म्हणजे त्यात दिसलेले गावपातळीवरील वास्तव, तिथले लोक, त्यांचा दैनंदिन व्यवहार आणि हे सारे चितारण्यातला सच्चेपणा! शिवाय अपू आणि दुर्गा या मुलांच्या निरागस, कुतूहलजनक नजरेतून ते सारे दिसणे. मुळात बिभूतिभूषण यांची शैली चित्रदर्शी आहे, परंतु त्यांचे माध्यम साहित्य आहे. त्यातून चित्रपटमाध्यमाला अपेक्षित असलेली चित्रमयता साधणे हे आव्हान होते आणि याची नेमकी जाण राय यांना होती आणि म्हणूनच ते चित्रपटभाषेची पारदर्शकता अगदी पहिल्याच चित्रपटात उत्तमरीत्या साधू शकले.

उदाहरण म्हणून दुर्गाच्या मृत्यूनंतर हरिहर बऱ्याच काळाने घरी परततो, हा प्रसंग बघू या. कादंबरीत त्याचं कादंबरीच्या प्रकृतीनुसार काहीसं पसरट वर्णन आहे. मात्र तोच प्रसंग चित्रपटात पाहा. झाडाझुडपांतून हरिहर येताना दिसतो. घराजवळ येतो. वादळाने उद्‌ध्वस्त झालेल्या घराकडे पाहत राहतो. त्या वेळचे कॉम्पोझिशन - चित्रचौकट पाहा. तो चौकटीच्या बरोबर मधे- त्याच्यासमोर उघडाबोडका गोठा, पलीकडे तसंच उघडंबोडकं घर. हरिहर दुसऱ्या बाजूने पुन्हा चौकटीत येतो. या बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूने आत येतानाच त्याचा प्रत्यक्षात वेळच सिनेमॅटिक टाइम म्हणून वापरताना हरिहरच्या घराची दुर्दशा राय अधोरेखित करतात. हरिहरने पाहिलेले आपलं पडकं घर यासाठी कादंबरीत तपशीलवार वर्णन आहे. राय इथे ते एका चित्रचौकटीत - फ्रेममधे साधतात.

हरिहर ओसरीवर येतो. हातातलं सामान ठेवतो. अंगातील बंडी काढतो. धोतराच्या सोग्याने घाम पुसतो. तो हे सारं करत असताना समोरून दिसतो. म्हणजे कॅमेरा त्या ओसरीच्या दुसऱ्या कडेला आहे. तो दिसत असताना आत-बाहेर करीत पाटपाणी, टॉवेल, खडावा अशा वस्तू सर्वजया आणून ठेवते आणि ओसरीच्या पायऱ्या उतरू लागते. आता कॅमेऱ्याची जागा बदलते. कॅमेरा अंगणात येतो. पुरोभागी सर्वजया दिसते. पार्श्वभागी हरिहर. तो आणलेल्या एकेक वस्तू सर्वजयाला दाखवतो. लक्ष्मीचा फ्रेम केलेला फोटो... पोळपाट... आणि मग दुर्गासाठी आणलेली साडी. या तीनही गोष्टी प्रथम मिडशॉटनेच दिसतात.

मात्र हरिहर जशी साडी अधिक पुढे करतो, तेव्हा सर्वजयाच्या डाव्या हाताच्या कोपराला तिचा स्पर्श होतो. त्या वेळी फक्त साडी आणि सर्वजयाच्या हाताचा कोपरा आणि तो स्पर्शच तेवढा दिसतो. म्हणजे आता हा क्लोज अप होऊन जातो. हरिहर आल्यापासून सर्वजयाने रोखून ठेवलेला दु:खाचा बांध फुटण्यासाठीचा तो बिंदू असतो. मग साडी चेहऱ्यावर धरून सर्वजया आकांत करताना दिसते. ती ओसरीवर हरिहरच्या पुढ्यात कोसळते. त्याच वेळी अंगणात येऊन उभ्या राहिलेल्या अपूवर कॅमेरा चार्ज होतो. हे जे शॉट डिव्हिजन- म्हणजे दृश्यरचना- आहे, ती कादंबरीतला हाच आशय चित्रपटीय भाषेत अतिशय नेमकेपणाने, थेटपणाने आणि त्यातले अवघे नाट्य टिपत परिणामकारकपणे अधोरेखित करते.

एकीकडे चित्रपटीय भाषेचा अतिशय मितभाषी आविष्काराचा हा नमुना, तर दुसरीकडे दुर्गाच्या मृत्यूपूर्वी सुरू झालेल्या पावसाचं चित्रण थेट वाङ्‌मयीन चित्रशैलीत... तेही एखादा राग संथ लयीत सुरू व्हावा आणि त्याने एकातून एक स्वरांची आवर्तने निर्माण करीत विलंबित लयीत पुढला टप्पा गाठावा, अशा शैलीत...

अपू आणि दुर्गाचं बालसुलभ वागणं, वावरणं आणि त्याच्या आसपास कथेतल्या घटना घडणं यातली सहजता राय यांनी ‘पाथेर पांचाली’मधे अतिशय तरलपणे चितारली आहे. मूळ कथानक जेवढे तरल आहे, तीच तरलता त्यांनी आपल्या प्रगल्भ चित्रपटभाषेतून साधली आहे. त्यातली कलात्मकता अपूर्व अशीच म्हणावी लागेल.

आईच्या सांगण्यावरून दुर्गा अपूला उठवते. झोपलेल्या  व्यक्तीला हलवून उठवावं, याच पद्धतीने ती प्रथम त्याला उठवते. तो उठत नाही तेव्हा ती त्याची गंमत करावी, अशा पद्धतीने पुढला पवित्रा घेते. तिच्या चेहऱ्यावर त्या वेळी छानसं मिस्किल हसू आहे. ती हलकेच फाटक्या पांघरुणाचे एक छिद्र बोटे घालून रुंद करते आणि अपूचा डोळा दिसतो. ती तो उघडते आणि त्या डोळ्यात जणू सृष्टीतले अवघे चैतन्य अवतरते. रविशंकरांची सतार ते अधोरेखित करते. मग अपू उठून बसतो. लगेचच डिझॉल्व्हमधून तो घरासमोरच्या तळ्याच्या पायऱ्यांवर येऊन दात घासू लागतो. एका छोट्या दृश्यातून किती गोष्टी राय यांनी साधल्यात- त्या बहीण- भावातलं तरल नातं, जे या चित्रपटाचा गाभा आहे, फाटक्या पांघरुणातून घरची गरीब परिस्थिती आणि मग त्याच पांघरुणाचा कलात्मक वापर, अपूचा चित्रपटातला प्रवेश, त्याच्या सळसळत्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची नेमकी ओळख करून देणारं पार्श्वसंगीत आणि मग त्याला पुढच्या टप्प्यावर नेताना कथानक पुढे नेणे... कमालीची प्रभावी चित्रपटभाषा! अप्रतिम... केवळ अप्रतिम!

‘पाथेर पांचाली’मधे दुर्गाच्या मृत्यूच्या आधी आलेले भयानक वादळ एवढीच काय ती घणाघाती नाट्यमय घटना! अन्यथा, दरररोज घडणाऱ्या जगण्यातल्या साध्यासुध्या गोष्टी; परंतु या साध्यासुध्या गोष्टींत पट्टीच्या कलावंताला कलात्मक सौंदर्य दिसतं. तो ते अतिशय तरलतेने हेरतो आणि त्याच तरलतेने आपल्या माध्यमात, आपल्या भाषेत मांडतो. किती प्रसंग सांगावेत...?

‘अपू चित्रत्रयी’च्या तीनही कलाकृतींत सत्यजित राय यांची चित्रपटभाषेवरची प्रगल्भ जाण जागोजाग अशीच दिसून येते. त्यातील प्रत्येक प्रसंगाची दृश्यरचना आणि प्रासंगिक ध्वनी-परिणाम आणि पार्श्वसंगीताचा वापर हे विलक्षण आहे. आजवर असंख्य वेळा या तीन कलाकृती पाहिल्या आणि दर वेळी चित्रपटभाषेचा त्यातला आविष्कार बघून थक्क झालो

 मधल्या काळात चित्रपटात नवनवे तंत्रज्ञान येत गेले. चित्रपटाची भाषा बदलत गेली. काळाबरोबर ती गतिमान होत गेली. तिचे जगभरचे आविष्कार पाहत आलोय. परंतु वाऱ्याच्या हळुवार झुळकेने तळ्याच्या पृष्ठभागावर तरंग उमटावेत आणि ते डोळाभरून पाहत राहवेत, अशा या तीन कलाकृती आहेत. राय यांच्या पुढच्या साऱ्या चित्रपटांत त्यांच्या या प्रगल्भेचे हरखून टाकणारे दर्शन घडले आहे. परंतु आपल्या पहिल्याच चित्रपटात ती त्यांनी साधली कशी, याचा शोध घेऊ जाताच लक्षात येऊ लागतो तो त्यांच्या जडणघडणीचा काळ! तो विलक्षण प्रेरणादायी आहे.

पिढ्यान्‌ पिढ्या घरातून आलेला कलात्मक आणि वैचारिक वारसा, अपूच्या व्यक्तिमत्त्वाशी बरंचसं साम्य असलेलं भोवतालाविषयीचं कुतूहल असलेलं तरल संवेदनशील व्यक्तिमत्त्व, शांतिनिकेतनमधलं गुरुवर्यांच्या सान्निध्यातलं कलाशिक्षण, घोषबाबूंसारख्या शिक्षकाकडून लाभलेली कलादृष्टी, एकूणच भोवताल पाहण्याची- टिपण्याची- मुरवण्याची दृष्टी. तसेच  इतर कलांबरोबरच चित्रपट आणि पाश्चात्त्य संगीताची विशेष जाण. जगभरचे चित्रपट पाहता यावेत म्हणून फिल्म सोसायटीची केलेली स्थापना.  शनिवार-रविवारच्या सुट्टीत जागतिक चित्रपटातील मातब्बर दिग्दर्शक ज्यॉ रेन्वॉ यांच्या ‘द रिव्हर’च्या चित्रीकरणाला उपस्थित राहून फिल्ममेकिंगचे अनौपचारिक शिक्षण घेणे, हॉलिवुडमध्ये कुणी एखाद्या कादंबरीवरून चित्रपट करत असेल तर ती मिळवून त्यावर आपली पटकथा लिहिणे आणि नंतर कधी तरी तो चित्रपट पाहून त्याच्याबरोबर आपली पटकथा तपासून पाहणे.  अफाट वाचन-लेखन, दिग्दर्शक व्हायची अनावर ओढ, त्यासाठी केलेल्या खटपटी - लटपटी... केवढी ही शिदोरी... केवढा लाखमोलाचा ऐवज...

माझ्यातल्या- नव्हे अनेकांतल्या चित्रपटप्रेक्षकांना, अभ्यासकांना, समीक्षकांना, व्यावसायिकांना त्यांच्या या जडणघडणीनंच अमाप असं काही दिलं... ‘अपू चित्रत्रयी’ या तीन आणि नंतरच्याही त्यांच्या अनुपम कलाकृतींनी केवळ कलात्मक दृष्टीच नव्हे, तर अवघं भवताल पाहण्याची नजर दिली... हे सगळं सांगून, लिहून कधी संपतच नाही... संपणारच नाही... अवघी अतृप्तता तना-मनाशी कायमची व्यापून राहते...

Tags: बिभूतिभूषण बंदोपाध्याय पाथेर पांचाली सत्यजित राय अशोक राणे अपू चित्रत्रयी फिल्म सिनेमा film cinema Bibhutibhushan Bandopadhyay Pather Panchali Satyajit Roya Ashok Rane Apu Chitrtrayi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात