डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मुंगी म्हणजे क:पदार्थ जीव! मुंगी सोडून इतर सर्व प्राणिमात्रांना आपण कधी तरी अन्‌ थोडी काही तरी किंमत देतो. मुंगी मरणं हे कुणीही पाप मानत नाही, परंतु या मुंग्यांवरून कवींनी किती कल्पना रंगविल्या आहेत! मुक्ताबार्इंनी ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले  सूर्यासी’, तर नामदेवांनी ‘मुंगी व्याली, तिला शिंगी झाली’ अशी अशक्य कोटीची कल्पनाचित्रे दाखविली आहेत. नाटकात ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना?’ असं वाक्य असे. लहान मुलांना ‘मुंगीएवढा जीव’ असे म्हणत ‘मुंगी होऊन साखर खा’ असं सांगितलं जायचं. बा.सी. मर्ढेकर यांच्या प्रख्यात कवितेत ‘मी एक मुंगी, हा एक मुंगी’ असं माणसाला आलेलं रूप दाखवताना अखेरीस ‘या नच मुंग्या, हीच माणसे, असेच होते गांधीजीही...’ असं सांगत बदलाची आशा केली होती. या मुंग्या संपूर्ण जगाला सभ्यता व सुसंस्कृततेचे धडे देत आहेत.  

‘भविष्यासाठी शुक्रवार’  मुलांचा हा निर्धार ऐकून जर्मनी,  ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड या देशांमधील वैज्ञानिकांनी  ‘भविष्यासाठी वैज्ञानिक’  गट स्थापन केला. मुलांना पाठिंबा  देण्यासाठी त्यांनी काढलेल्या पत्रकावर 46,000 विद्वानांनी  सह्या केल्या होत्या. जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या  ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’,  एस्टिक्शन रिबेलियन ‘‘360.org‘ WWB ‘ग्रीन पीस’,  ‘ऑक्सफॅम’  ह्या  नामांकित संघटनांमुळे त्यांचे हजारो सभासद सोबतीला  आले होते.  एरवी जगातील सगळ्या कंपन्या ‘बिझिनेस ॲज  युज्वल’  असाच व्यवहार करीत असतात. ब्रिटन व  ऑस्ट्रेलियातील काही कंपन्यांनी ‘नॉट बिझिनेस ॲज  युज्वल’  असे आशयगर्भ नामकरण करून आघाडी स्थापन  केली. पर्यावरणसंकटाचे गांभीर्य लक्षात आलेल्या ह्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना संपात सामील होण्यास  प्रोत्साहन दिले.  जगात प्रदूषण करणाऱ्या कोळसा व तेल कंपन्यांचे  उत्पादन भरघोस व्हावे,  याकरता तंत्रज्ञान पुरविण्यासाठी  ‘मायक्रोसॉफ्ट,  गुगल’  ‘ॲमेझॉन’  ह्या कंपन्यांचे करार  झाले आहेत. यावरून ह्या कंपन्यांमधील कर्मचारी त्यांच्या  व्यवस्थापनाच्या विरोधात उभ्या राहिल्या. परिणामी,  ‘ॲमेझॉन’चे मुख्याधिकारी जेफ बेझोस ह्यांनी जागतिक  बंदच्या एक दिवस आधी ‘हवामान  रक्षणासाठी वचनबद्ध’ असल्याचे जाहीर केले. त्यांनी ‘वृक्षलागवड व संवर्धन  यासाठी 10 कोटी डॉलर’  देणगीची घोषणा केली. तरीही  ‘ॲमेझॉन’चे 1500 कर्मचारी,  ‘गुगल’  व ‘टि्‌वटर’चे  कर्मचारी मुलांच्या साथीसाठी बंदमध्ये सहभागी झाले होते.  काही कल्पक मुलांनी ‘नको ते ॲमेझॉन जळत आहे’ असा फलक रंगवून भावना व्यक्त केल्या होत्या.  जगातील 60 प्रसारमाध्यमांनी ह्या घटनांचे महत्त्व विशेषत्वाने दाखविण्याचा निर्णय घेतला.      

‘द गार्डियन’ने संपादकीयात ‘मानवजातीवरील संकटाचे वार्तांकन करताना  आम्ही आमच्या जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.  आम्ही पुढच्या पिढीसोबत आहोत,’  असे सांगून स्पष्ट  भूमिका घेण्याचे धैर्य दाखवले आहे. अजूनही दूरचित्रवाणी  वाहिन्या हवामानबदलाचे संकट प्राधान्याने दाखवत नाहीत.  
पर्यावरण विनाशाबाबत कुठे,  काय,  कसे,  कधी हे दाखवून  त्याचे परिणाम दाखविणाऱ्या बातम्या लिहिल्या वा  दाखवल्या जात नाहीत. पर्यावरणीय घटनांचे विश्लेषण केले जात नाही. हे घडवून आणण्यासाठी ‘द नेशन’,  ‘कोलंबिया  जरनॅलिझम रिव्ह्यू’  आणि ‘द गार्डियन’ यांनी माध्यमांचा  सहयोग केला आहे. यामध्ये सीबीएस न्यूज,  हफिंग्टन  पोस्ट,  व्होक्स,  द इंटरसेप्ट,  स्‌लेट,  द फिलाडेल्फिया  एनक्वायरर ही मुद्रण, नभोवाणी,  दूरचित्रवाणी व डिजिटल  माध्यमे सहभागी झाली आहेत. बालकांच्या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमातील अनेक संस्था पर्यावरणीय बातम्या,  लेख  आणि संपादकीयांतून अग्रक्रमाने मांडू लागतात व यांचे  प्रमाणही वाढवतात. बालकांना आलेले हे यश अपूर्व आहे. 
        
जगातील मुलांची,  तरुणांची पर्यावरणविषयक  जागरूकता व सक्रियता विलक्षण गतीने वाढत आहे. त्यांच्यासोबतीने मोठेही येत आहेत. पर्यावरण चळवळीला  मिळणाऱ्या देणग्यांमध्ये वाढ होत आहे. हरित पक्षांना  मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ होत आहे. हे पाहून,  सर्व  प्रकारच्या माध्यमांतील अग्रगण्य असलेल्या बी.बी.सी. , वॉशिंग्टन पोस्ट,  न्यूयॉर्क टाइम्स,  लॉस एंजलिस टाइम्स,  नॅशनल जिओग्राफिक,  नेचर ह्या संस्था म्हणू लागल्या,  ‘हा  आहे ग्रेटा थुनबर्ग इफेक्ट!’  ग्रेटा ही जगातील पर्यावरण चळवळीची राजदूत झाली त्या वेळी तिच्यावर टीकेचे हिंस्र हल्लेदेखील सुरू झाले.  उजव्या विचारांचे व धर्मांध म्हणू लागले : ‘डाव्या- उदारमतवादी विचारांच्या प्रसारासाठी अब्जावधी खर्चून  जनसंपर्क माध्यमांच्या मदतीने उभी केलेली ग्रेटा ही एक  कळसूत्री बाहुली आहे. आत्ममग्न व विषण्णतेच्या  विकाराची ग्रेटा ही हेकेखोर,  एकसुरी आवाजात बोलणारी  असून तिला गांभीर्याने घेणे हाच एक विनोद आहे.’  तसेच कडव्या डाव्यांकडून ग्रेटा ही हरित (ग्रीन) कंपन्यांची ब्रँड  असल्याची टीका चालू झाली. 
           
कॅनडा येथील पत्रकार व पर्यावरणकार्यकर्त्या कोरी मॉर्निंगस्टार यांनी ‘सहमतीसाठी- ग्रेटा : विनानफा उद्योग संकुलांचे राजकीय अर्थशास्त्र’ या  लेखातून कडाडून टीका केली. ‘बाजारपेठेला प्रत्येक गोष्टीत विक्रीमूल्य दिसते. विक्री सुलभ होते म्हणूनच  जाहिरातांमध्ये लहान मुलांचे महत्त्व वाढले आहे. ग्रेटा व तिच्या पाठीमागे येणाऱ्या मुलांमुळे अनेक पर्यावरणस्नेही  वस्तूंचा खप वाढला. हे लक्षात घेतले तर मागे वळून  पाहताना सामाजिक माध्यमांतून ग्रेटाची प्रतिमा कशी मोठी  करीत नेली,  हे लक्षात येते. ह्यातून काही मूलभूत बदल  होणार नाही,  त्यांनी केवळ बदलाचा आभास निर्माण  होईल.’ असे म्हटले आहे.  ह्या सर्व टीकेला जगातील  आघाडीच्या वृत्तपत्रे अग्रलेखातून वेळोवेळी उत्तर देत  असतात.  दि.24 सप्टेंबर 2019 रोजी जगातील बालकांच्या  वतीने 16 बालकांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली.  दि.20 नोव्हेंबर 1989 ला न्यूयॉर्कमधील परिषदेमध्ये  140 राष्ट्रांनी बालकांचे हक्क मंजूर केले होते.  त्यानुसार  जगातील प्रत्येक बालकास कुठल्याही प्रकारचा भेदभाव न   करता सामाजिक,  आर्थिक,  राजकीय,  सांस्कृतिक हक्क मिळाले पाहिजेत. यासंबंधी कुठल्याही बालकाची तक्रार  आल्यास तिचे निवारण करण्यासाठी तटस्थ तज्ज्ञांच्या विशेष समितीने संबंधित राष्ट्रामध्ये जाऊन चौकशी करावी,  असे नमूद करण्यात आले आहे.
        
30 वर्षांपूर्वी बहाल  करण्यात आलेल्या ह्या हक्कांची जाणीव 16 बालकांनी  करून दिली. 5 खंडांतील 12 राष्ट्रांतून हवामानबदलाचे  चटके सहन करणारी बालके संपूर्ण जगातील बालकांचे  प्रतिनिधित्व करीत होती. 8 ते 17 वर्षे वयोगटातील ह्या  पथकात भारताची रिधिमा पांडे,  अमेरिकेची अलेक्झांड्रिया व्हिलसेनॉर, मार्शल बेटाचा रॅन्टॉन ॲन्जैन ही बालके होती.  ग्रेटा ही कधीच व्यक्तिकेंद्रित वा आत्मगौरवपर भूमिका घेत नाही;  उलट ती सातत्याने इतर देशांत कार्यशील असणाऱ्या  मुलांना सोबत नेते व त्यांना श्रेयदेखील देते. ‘भविष्यासाठी  शुक्रवार हे जगातील बालकांचे आंदोलन असून देशोदेशींची  मुले यात पुढाकार घेत आहेत.’ याचा ती वारंवार उल्लेख  करते.
       
ग्रेटाने याची प्रचिती पुन्हा एकदा आणून दिली.  (जगातील बालकांच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाकडे  तक्रार दाखल करताना पहिली ग्रेटा,  तर पाचवी रिधिमा)  गंगा नदीला येणारे वांरवार पूर पाहून भयभीत झालेल्या  हरिव्दारमधील 11 वर्षांच्या रिधिमा पांडेने 2017 मध्येच  राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यात  ‘हवामानबदलाचे परिणाम रोखण्यासाठी भारत सरकार  पुरेशी पावले उचलत नाही. त्यांनी विज्ञानाच्या आधारे कृती  करावी,  असे आदेश द्यावेत’ असे म्हटले होते. राष्ट्रीय हरित  लवादाने तिची मागणी फेटाळून लावताना,  ‘पर्यावरणहानी  मूल्यांकन (एन्व्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) केल्यानंतरच योजना कार्यान्वित होत असते. याचिकेमध्ये ह्या प्रक्रियेला  आव्हान देण्यात आलेले नाही’  असे म्हटले. त्यानंतर  रिधिमाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. 
    
आता  तिला ‘भारताची ग्रेटा’  संबोधले जाते. ती म्हणाली,  ‘‘गंगा नदीला आम्ही माता म्हणत राहतो, परंतु तिला किती वाईट  वागवतो?  अजूनही ती अतिशय गलिच्छ आहे. कपडे धुणे,  शहरांची व कारखान्यांची घाण, प्लॅस्टिक,  मृतांची रक्षा सर्व काही गंगार्पण केले जाते. वर पर्वतांवर जंगलतोड  चालतच राहते. हवामानबदलाच्या काळात थोडा पाऊस  आला तरी पूर येतो. प्रचंड हानी होते. हे थांबवले पाहिजे. मला माझे,  आमच्या पिढीचे आणि पुढील पिढ्यांचे भविष्य  सुरक्षित करावयाचे आहे.’’  ब्राझीलमधील कॅटरिना लॉरेन्झो (वय 12)  म्हणाली,  ‘‘आमचं भविष्यच नाही,  तर वर्तमानदेखील धोक्यात आलं  आहे.’’       

समुद्राच्या पाणीपातळीतील वाढीमुळे प्रशांत  महासागरातील 44 चिमुकली बेटे बुडण्याचा धोका आहे.  पालाऊ नामक बेटावरील कॅरोलस मॅन्युअल म्हणाला,  ‘‘हवामानबदलामुळे सर्वाधिक असुरक्षितता आम्हीच सहन  करीत आहोत. समुद्र आमची एकेक घरे गिळंकृत करीत  आहे. श्रीमंत देशांना हेच आमचे सांगणे आहे.’’  अलास्काच्या बर्फाळ प्रदेशातील युपिआख ह्या आदिवासी  जमातीचा 17 वर्षांचा कार्ल स्मिथ वडिलधाऱ्यांकडून  शिकार व मासेमारी शिकला आहे. ‘आमची जीवनशैली  नाहीशी होत आहे.’  अशी धास्ती तो बोलून दाखवत होता.  इबे बेटाचा रॅन्टॉन ॲन्जैनच्या कथनातून,  ‘चक्रीवादळ व  पाणीपातळीतील वाढ ह्यामुळे आमचे बेट हैराण आहे.’  ही  भीती व्यक्त होती.     

2018 मध्ये कॅलिफोर्नियाच्या जंगलात  पेटलेल्या वणव्यामुळे पसरलेल्या धुराने 13 वर्षांच्या अलेक्झांड्रिया व्हिलसेनॉरला दम्याचा त्रास सुरू झाला.  जंगलातील अग्नीच्या रौद्ररूपाने ती चिंताग्रस्त झाली. तिची शारीरिक व मानसिक प्रकृती बिघडली. तिला महिनाभर  रुग्णालयात राहावे लागले. या काळात तिला ग्रेटाच्या  आंदोलनाविषयी माहिती मिळाली आणि तीदेखील सक्रिय  झाली. तिने ‘भविष्यासाठी शुक्रवार’  आंदोलन संपूर्ण  अमेरिकेत पसरवले. नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये  सलग 8 महिने पाऊस व पूर सहन केल्यानंतर तिथे डेंग्यू,  हिवताप यांनी थैमान घातले. त्यात प्रदूषित हवा व पाणी  यांची भर पडून अनेक रोग पसरले. याची थेट झळ डेबोरा  ॲडेग्बिले (वय वर्षे 12)  याला पोहोचली. दमा,  डेंग्यूच्या आजाराने त्याला अनेक वेळा रुग्णालयात राहावे लागले.          

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनने 2018 च्या मार्चमध्ये  अवर्षणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ‘शून्य दिवस’  (डे झीरो) अनुभवला आहे. या वर्षी तिथे पुराने धुमाकूळ  घातल्याने रहिवाशांवर गलिच्छ पाणी पिण्याची वेळ आली.  तिथून आलेला आयखा मेलिथाफा ‘आफ्रिकी हवामान  आघाडी’चा सदस्य असून 2030 पर्यंत दक्षिण आफ्रिकेने  कर्ब उत्सर्जनात 90 टक्क्यांनी कपात करावी यासाठी  कृतिशील झाला आहे. ट्युनिशियाच्या टाबार्कामध्ये  जंगलाचे वणवे एकाएकी वाढले. 2017 मध्ये 146 आगी  लागल्या. रॅल्सेन बेली (वय 17 वर्षे) हिचे घर कसेबसे  वाचले,  पण तिच्या शेजारची अनेक घरे आगीच्या  भक्ष्यस्थानी पडली. पाठोपाठ महापुराच्या कहरामध्ये  जनजीवन 12 दिवस ठप्प झाले. अर्जेंटिनाच्या हाएडोतून  आलेली शिआरा साच्चीने विश्वास बसणार नाही,  अशा  भयानक वेगाच्या वाऱ्यासह वादळांची साक्षीदार आहे.        

जर्मनीच्या हँबर्गमधील रायना अव्हॅनोव्हा हिने उष्णतेच्या  लाटेमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे झालेले हाल  पाहिले आहेत.  हवामानबदलाच्या सर्व तऱ्हांचे तडाखे सहन करणारी  पुढील पिढी संयुक्त राष्ट्रसंघाकडे त्यांची कैफियत घेऊन  गेली. त्यांनी कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण अधिक असणाऱ्या अर्जेंटिना,  ब्राझील,  फ्रान्स,  टर्की व जर्मनी ह्या राष्ट्रांच्या  विरोधात तक्रार दाखल केली. त्यात ‘या राष्ट्रांच्या वर्तनामुळे  बालकांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे,’  असे म्हटले आहे.  बालकांच्या पथकाने ‘‘अमेरिका,  चीन व सौदी अरब ह्या  देशांनी ‘बालकांचे हक्क’  मंजूर करणाऱ्या करारावर सही  केली नसल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार देता येत नाही’’  हे स्पष्ट केले.          

बालकांच्या पथकाचे नेतृत्व करणारी ग्रेटा  म्हणाली, ‘‘हवामानसंकट हे केवळ तापमानापुरतेच मर्यादित नाही. त्यामुळे अन्न व पाण्याचा तुटवडा भासतो,  रोगराई वाढते. आपल्या कल्पनांपेक्षाही भयंकर वास्तव  दिसत आहे. यापुढील विनाश टाळावयाचा असेल,  तर  आताच तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.’’  तात्पर्य- ‘तुम्ही आमच्या भविष्याची माती करीत  आहात.’ (यू आर शिटिंग ऑन अवर फ्युचर) असा फलक  20 सप्टेंबरच्या मोर्चात दिसत होता. जगातील बालकांच्या  मनातील हीच भावना हे सोळा प्रतिनिधी व्यक्त करीत होते.  मागील काही वर्षांपासून पर्यावरणसंकटांविषयीची जागरूकता वाढत आहे.         

सोफी,  ज्युलियाना व ग्रेटा ह्या निमित्तमात्र आहेत;  परंतु ह्या छोट्यांमुळे पर्यावरण व हवामानबदल हे विषय घराघरांपर्यंत पोचले. 1962 मध्ये  राशेल कार्सन यांच्यामुळे पर्यावरणजागृतीचा पाया रचला  गेला आणि ग्रेटाने त्यावर कळस चढवला आहे. तिने सोप्या  पण थेट शब्दांत,  ‘तुम्ही हवामानसंकट निर्माण करणारे व  आम्ही ते सहन करणारे’  अशी विभागणी केली. प्रदूषणकर्ते  आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरणमस्त व पर्यावरणत्रस्त ही  मांडणी केली. त्यामुळे पर्यावरण चळवळीच्या मागणीला  धार आली. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधातील  वातावरण तापत चालले आहे. संपूर्ण जगातील मुले ‘हे विेशाचे अंगण,  आम्हा दिले आहे आंदण’  ही ‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची कविकल्पना साक्षात  उतरवण्याची किमया करीत आहेत. (‘चाफा बोलेना’  ह्या अभिजात कवितेचे कवी ‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते)  यांच्या हयातीत त्यांचा एकही काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊ  शकला नाही.) ‘आमच्या विेशाच्या अंगणाला तुम्ही  बिघडवलेले आहे,  ते तत्काळ सुधारा’- हे ठणकावून  सांगणाऱ्या मुलांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढही  आनंददायी आहे.  

ग्रेटामुळे जनसामान्यांमध्ये परिवर्तन घडून येत आहे,  असे अनेक दिग्गजांना वाटत आहे. नॉर्वे सरकारने 2019  च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 16 वर्षांच्या ग्रेटा  थुनबर्ग हिचे नाव सुचविले आणि त्यालाही जगभरातून  प्रचंड समर्थन मिळत गेले. अनेक वृत्तपत्रांनी संभाव्य  मानकरी असा तिचा उल्लेख केला. या काळात ग्रेटाला  नोबेल मिळावे की मिळू नये,  यावर अनेक रकाने भरून चर्चा  झाली. ठरल्याप्रमाणे 11 ऑक्टोबर रोजी घोषणा झाली.  पारंपरिक शत्रुराष्ट्र एरिट्रियाशी युद्ध टाळून मैत्री करणारे इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना 2019  चा शांततेसाठीचा नोबेल सन्मान बहाल करण्यात आला.    

त्यानंतर ‘ग्रेटाला का डावलले?’  यावर खल सुरू झाला.  ह्या मतमतांतरांना बाजूला ठेवणेच योग्य आहे. नोबेलचा  गलबला चालू होण्याआधीच तिला पर्यायी नोबेल बहाल  करण्यात आले होते.  स्वीडन येथील दानशूर जॅकॉब व्हॉन युक्सकुल यांनी  जागतिक पातळीवर असामान्य कार्य करणाऱ्या ‘द राइट  लाइव्हलीहूड पुरस्कार’ 1980 मध्ये सुरू केले. त्यांचे  ‘आम्ही जागतिक समस्या सोडविण्यासाठी कार्यरत धीरोदात्त व्यक्तींना सन्मान आणि पाठबळ देतो’  हे ब्रीद आहे. ही संस्था दर वर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क,  शिक्षण,  आरोग्य,  पर्यावरण,  शोशत विकास आणि शांतता  प्रस्थापित करणाऱ्या 4 व्यक्तींची निवड करीत असते. ह्या  क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांचा ‘नोबेल’ समिती विचार करीत  नाही. म्हणून ‘द राइट लाइव्हलीहूड पुरस्कारांना ‘पर्यायी  नोबेल’ (अल्टरनेट नोबेल) असेही संबोधन प्राप्त झाले आहे. मानचिन्ह व 2 लाख युरो (सुमारे 1.56 कोटी रुपये)  असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
        
पर्यावरणस्नेही  बांधकामासाठी ख्यातनाम वास्तुशिल्पी हसन फादी यांना ‘द राइट लाइव्हलीहूड’ पुरस्कार 1980 मध्ये बहाल करण्यात आला होता. अहमदाबाद येथील गांधीवादी नेत्या इलाबेन  भट आणि महिलांचे सक्षमीकरण करणारी त्यांची संघटना  ‘सेवा’  ह्यांना हा सन्मान 1984 मध्ये देण्यात आला होता. 1991 मध्ये ‘विकास योजनांचे स्वरूप हेच निसर्ग व  माणूस यांचा विनाश करणारे आहे’  अशी मांडणी करीत  मोठ्या धरणांविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करणाऱ्या  ‘नर्मदा बचाव आंदोलनास’  गौरवण्यात आले होते. 2014  मध्ये पर्यावरण पत्रकार बिल मॅककबिन व त्यांची संघटना  350. org आणि अमेरिकतील अनेक गैरव्यवहार  चव्हाट्यावर आणणारे एडवर्ड स्नोडेन व पाकिस्तानमधील  महिला कार्यकर्त्या आस्माँ जहांगीर यांना हा पुरस्कार देण्यात  आला होता. यंदा मारोक्को व पश्चिम सहारा भागातील  आफ्रिकी महिलांच्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने  लढणाऱ्या अमिनातु अली हैदर,  ब्राझीलमध्ये ॲमेझॉनचे  अरण्य व आदिवासी यांच्यासाठी लढणारे डावी कोपेनाव्हा  यॅनोमामी,  चीनमधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या  गुओ जिॲन्मी आणि ग्रेटा थुनबर्ग यांना 2019 चे ‘राइट  लाइव्हलीहूड’  पुरस्कार जाहीर झाले. जगातील बालकांच्या कृतिशीलतेला आणखी एक जगन्मान्यता प्राप्त झाली.  ‘राइट लाइव्हलीहूड फाउंडेशन’ने ही घोषणा करताना ‘‘वैज्ञानिक वास्तव सांगत हवामानसंकटासाठी कृती  आवश्यक आहे,  या मागणीसाठी पाठबळ वाढविण्याचे आणि प्रेरणा देण्याचे कार्य करणाऱ्या ग्रेटाविषयी आदर  व्यक्त करीत आहे,’’ असे म्हटले आहे.    

मागील एक वर्षात स्वत:ची जीवनशैली आणि  सभोवताल या दोन्हींत बदल करण्यासाठी सज्ज होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ‘पैशासाठी  आयुष्य’ हेच ध्येय असणाऱ्या काळात पैसा सोडून निसर्ग वाचविण्यासाठी व्यक्ती व संस्था ह्या दोन्हींच्या संख्येत  झपाट्याने वाढ दिसू लागली आहे. वैयक्तिक पातळीवर  कर्ब पदचिन्ह कमी करणे व सभोवतालच्या संस्थांना  त्यासाठी भाग पाडणे,  ही महत्त्वाची कृती होताना सर्वत्र  दिसत आहे. युरोप,  अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या  सर्वेक्षणात ‘हवामानबदल’ व ‘पर्यावरणरक्षण’  या विषयांना  प्राधान्य देणाऱ्या मतदारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे  आढळले आहे.  जगातील मुलांमुळेच पर्यावरण कृतिवादाचे  (ॲक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे.     

जगावरील कार्बनच्या काळ्याकुट्ट ढगांना  मुलांच्या कृतिवादामुळे चंदेरी किनार आली आहे. हे वातावरण असेच टिकणे व आणखी पसरणे आवश्यक  आहे. हा प्रतिसाद पाहून येथून पुढे दर तीन महिन्यांनी हवामानासाठी जागतिक बंद साकारण्याची घोषणा मुलांनी  केली आहे. निदर्शकांच्या संख्येत किमान पटीपटीने वाढ  होत गेली आणि मुलांच्या समवेत तरुणही वाढत्या संख्येने  येत गेले,  तर जगावरील काळे ढग आणखी बाजूला सरकू  लागतील. परंतु त्यांचा लढा हा संपूर्ण जग व जागतिक  संस्था ताब्यात असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांशी असल्यामुळे  हे कार्य महाकठीण आहे. प्रदूषकांच्या विरोधात सुरू असलेल्या ऐतिहासिक लढ्यात प्रदूषकशाहीचा वरवंटा  वाढत गेल्यास सिव्हिलायझेशनच्या तसेच जीवसृष्टीच्या  अंताकडे ती वाटचाल असेल. हे अजिबात होऊ नये  याकरता छोटेच त्यांच्या वयापेक्षा मोठे होऊन जिवाच्या आकांताने लढत आहेत;  प्रश्न आहे तो मोठ्यांचा! त्यांनाही  ‘शहाणपण’ आले तर... 

सध्या चालू असलेल्या प्रयत्नांचे गतिवर्धन झाले तर... जगावरील काळी कभिन्न छाया दूर होणे शक्य आहे. मुंगी म्हणजे क:पदार्थ जीव! मुंगी सोडून इतर सर्व प्राणिमात्रांना आपण कधी तरी अन्‌ थोडी काही तरी किंमत  देतो. मुंगी मरणं हे कुणीही पाप मानत नाही,  परंतु या मुंग्यांवरून कवींनी किती कल्पना रंगविल्या आहेत!  मुक्ताबार्इंनी ‘मुंगी उडाली आकाशी,  तिने गिळिले  सूर्यासी’,  तर नामदेवांनी ‘मुंगी व्याली,  तिला शिंगी झाली’  अशी अशक्य कोटीची कल्पनाचित्रे दाखविली आहेत.  नाटकात ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना?’  असं वाक्य असे. लहान मुलांना ‘मुंगीएवढा जीव’  असे म्हणत  ‘मुंगी होऊन साखर खा’  असं सांगितलं जायचं. बा. सी. मर्ढेकर यांच्या प्रख्यात कवितेत ‘मी एक मुंगी,  हा एक मुंगी’  असं माणसाला आलेलं रूप दाखवताना अखेरीस ‘या नच  मुंग्या,  हीच माणसे,  असेच होते गांधीजीही...’  असं सांगत  बदलाची आशा केली होती. 
    
सध्या जगातील अनेक मुलांनी चालवलेल्या चळवळीमुळे आपण कविकल्पनांच्या जवळ  जात आहोत. या मुंग्या संपूर्ण जगाला सभ्यता व  सुसंस्कृततेचे धडे देत आहेत. कोट्यावधी मुंग्यांनी आकाशी  उडावे व सूर्यासी गिळावे,  त्यातून अत्यवस्थ पृथ्वीस  संजीवनी मिळावी आणि नवा उष:काल व्हावा,  अशीच सर्व जगाची अपेक्षा आहे.


(मागील वर्षी पर्यावरणाच्या क्षेत्रात जगभर चर्चेत राहिली ती स्वीडनची ग्रेटा ही 14 वर्षांची मुलगी आणि तिच्या प्रेरणेतून उभी राहिलेली जगभरातील मुला-मुलींची  आंदोलने या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेले ‘ग्रेटाची हाक’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाकडून आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 4 जानेवारी 2020 रोजी पुणे येथे ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या  हस्ते झाले. त्या पुस्तकातील हे एक प्रकरण.)

ग्रेटाची हाक  
अतुल देऊळगावकर
मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे 208, किंमत : 250 रुपये 

Tags: Katrina lorenzo Bhavishyasathi shukravar environmental greta thunbarg कामगार कॅटरिना लॉरेन्झो भविष्यासाठी शुक्रवार पर्यावरण ग्रेटा थुनबर्ग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर
atul.deulgaonkar@gmail.com

मराठी लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात