डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आज  कोरोनाकाळात कर्ब-उत्सर्जन कमी झाल्यामुळे दिल्लीसारख्याच ठिकाणी नाही, तर जगभर शुद्ध हवा मिळत आहे. जालंधरहून दीडशे किलोमीटर अंतरावरची हिमशिखरं जी पूर्वी कधीच दिसत नव्हती, ती आता दिसायला लागली आहेत. बाकी पक्षी किती वगैरे तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यांना आता आनंद झालेला आहे. पण कोरोना येण्याआधीच्या काळात जगातल्या 30 गलिच्छ शहरांमध्ये भारतातील 22 आहेत. ह्या शहरांतील हवा आपल्याला गुदमरवून टाकणारी आहे, जिथे लहान मुले नीट जगू शकत नाहीत. जानेवारी महिन्यामध्ये वातावरण या संस्थेने मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कृत्रिम फुप्फुस लावले होते. ते तीन आठवड्यांत पूर्णपणे काळवंडून गेले होते. (1999 मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणयोद्धे अनिल अग्रवाल यांनी नैनितालच्या हवेतलं फुप्फुस कसं लालबुंद आहे आणि त्या काळातील दिल्लीच्या हवतलं फुप्फुस कसं काळं कुळकुळीत आहे, हे  दाखवून दिलं होतं.

नमस्कार! आज वसुंधरादिवस. एप्रिल 2020- या निमित्ताने कोरोनाच्या काळात आपण आपापल्या घरात बसून एकमेकांशी संवाद साधत आहोत.

आजचा दिवस महत्त्वाचा का आहे? पन्नास वर्षांपासून म्हणजे गेले अर्धशतक हा वसुंधरा दिवस पाळला जातो, साजरा केला जातो. याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? आणि इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे? या काही गोष्टींबद्दल आपण आज इथे संवाद साधणार आहोत.

मुळामध्ये 22 एप्रिल 1970 रोजी वीस लाख लोक अमेरिकेमध्ये वसुंधरा दिवसासाठी जमा झाले, ते का? म्हणजे इतकी ऐतिहासिक गरज लोकांना का वाटली? तर, याचं मूळ एकोणीसशेसाठ ते सत्तरच्या दशकामध्ये आहे. हे दशक जगाला कलाटणी देणारं, अनेक अर्थांनी सर्वव्यापी असं दशक होतं. या दशकामध्ये स्त्रियांच्या हक्काची चळवळ अतिशय जोर धरत होती. समान नागरी कायद्याच्या (सिव्हिल राईट्‌स) कृष्णवर्णीयांच्या हक्काची चळवळ जोर धरत होती. मार्टिन ल्युथर किंग हे लाखो लोकांचा मोर्चा काढू शकत होते. लाखो लोकांसमोर त्यांची ऐतिहासिक भाषणे देत होते. त्याच वेळेला अमेरिकेत युद्धाला आणि अणुबाँबला कंटाळलेले शांततावादी लोक म्हणत होते की, आम्हाला शांतता हवी आहे. त्यामध्ये स्त्रिया व तरुण मुले मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत होती. आणखी अतिशय नवलाची घटना घडत होती. एकीकडे अमेरिका 1955 पासून 1975 पर्यंत गरीब नि:शस्त्र व्हिएतनामवर बॉम्बचे हल्ले करत होती, त्या वेळेला वॉटरगेट प्रकरण निघत होतं आणि सैनिकांच्या बंदुकांमध्ये महिला फुलं ठेवून‘ आम्हाला युद्ध नको, शांतता हवी’ हा संदेश पोचवत होत्या. आज माझ्या फेसबुक टाइमलाईनवर यातील काही कृष्णधवल छायाचित्रे टाकली आहेत. त्या काळाचा काहीसा अंदाज देणारी ती झलक आहे. या सर्व घटनांना तरुणांच्या बंडाची किंवा आंदोलनाची किनार आहे. ज्याला पुढे पर्यायी संस्कृती  क्रांती (काऊंटर कल्चर रेवोल्युशन) असं संबोधन प्राप्त झालं. ती संस्कृतीच्या लोकशाहीकरणासाठीची घुसळण  होती. त्याआधीच्या काळात संस्कृती ही धनिक, उच्चभ्रू व अभिजन यांच्यापुरतीच होती, ती रस्त्यावरच्या लोकांसाठी खुली झाली. याच काळामध्ये आपल्याकडे लिटिल मॅगझिनची चळवळ सुरू झाली, मोठमोठे चित्रकार रस्त्यावर उतरून चित्र काढू लागले, भींतींवर चित्र काढायला लागले. त्या काळात प.बंगालमध्ये बादल सरकार यांनी पथनाट्य चळवळ सुरू केली होती. आपल्याकडे दलित पँथर, युक्रांद या चळवळी जागतिक पातळीवरच्या युवकांच्या चळवळीच्या अभिव्यक्तीचा भाग होता. बीटल्स या काळातच आलं, ते कशामुळे? तर ऑपेरामध्ये जे उच्चभ्रू- धनिकांसाठी संगीताचे जलसे होतात-तसे आम्ही रस्त्यावर उतरून गिटार-बोंगो-कोंगो घेऊन स्वतंत्रतेची आमच्या आविष्काराची गाणी म्हणू, आम्ही दाढी वाढवू, आम्ही फाटके कपडे... जीन्स घालू- हे सगळं त्या दशकात सुरू झालं, म्हणून याला प्रतिसंस्कृती म्हटलं जातं. ते केवळ एक नकारात्मक बंड नव्हत; काय नको आणि काय हवं, कशाचा धिक्कार व कशाचा स्वीकार, हे त्यांना स्पष्ट होतं. तेव्हा वास्तुकलेपासून ते काव्यापर्यंत प्रत्येक जुन्या गोष्टीला आव्हान देऊन नवं काही तरी घडत होतं. आणि हे सगळे प्रवाह एकत्र आले ते पर्यावरणाच्या निमित्ताने...

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे गॅलॉर्ड नेल्सन यांनी हा सार्वत्रिक असंतोष पर्यावरणीय कारणासाठी एकत्रित आणला. त्यांच्यासोबत डेनिस हा 26 वर्षांचा तरुण आला. त्याचे वडील कागद कारखान्यात काम करत होते आणि ते सांगत होते की, ‘आमच्या कारखान्यातून निघणारं कागदाचं पाणी हे नदीचं प्रदूषण करत आहे आणि त्याच्याविरोधात आपण काही तरी केलं पाहिजे.’ त्याचा साक्षीदार डेनिस याच्यावर परिणाम होत होता. याच काळात कॅलिफोर्नियात सांता बार्बराला एक खूप मोठी तेलगळती झाली आणि मासे मेले. तेव्हा सगळे हादरून गेले. पर्यावरणासाठी आपण काही तरी केलं पाहिजे, ही भावना तीव्र झाली.

पर्यावरणाची पहिल्यांदा जाणीव झाली कधी? सन 1962 मध्ये. राशेल कार्सनबार्इंच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने जगाची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली, म्हणून त्याला ऐतिहासिक-अभिजात म्हटलं जातं. ते पुस्तक म्हणजे पर्यावरण चळवळीची गीता, बायबल किंवा कुराण आहे. 1962 पूर्वी पर्यावरण, प्रदूषण या संज्ञा अस्तित्वात नव्हत्याच. सायलेंट स्प्रिंग म्हणजे मूक वसंत! दोन महायुद्धांमध्ये रोग नष्ट करण्यासाठी डीडीटीची भुकटी वापरली जात होती. त्यामुळे तिचा जनक पॉल म्युलर या रसायनशास्त्रज्ञाला नोबेल मिळालं होतं. रोगनियंत्रणासाठी ही डीडीटीची पावडर अत्यंत प्रभावी काम करत होती आणि हीच डीडीटी भुकटी कीटकनाशक म्हणून वापरायला लागले, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पिकावर त्याची फवारणी व्हायला लागली. तेव्हा ती पिकं खाऊन पक्षी पटापटा मरून पडायला लागले. हे कार्सनबाई 1960 मध्ये पाहत होत्या. त्यांना कर्करोग झाला होता, असं असूनदेखील त्या झटत होत्या. सगळीकडे जाऊन निरीक्षण करत होत्या की, हे नेमकं काय घडत आहे,  वसंत ऋतू तर आलेला आहे? फुलं फुललेली आहेत, तरी पक्ष्यांचे आवाज का येत नाही? पक्ष्यांना कंठच फुटत नाही! किती क्रूर काळ असेल तो, म्हणून त्या म्हणाल्या, ‘हा मूक वसंत आहे.’ या पुस्तकानंतर जगाच्या  असं लक्षात आलं की, आपण प्रदूषणासाठी काही केलं पाहिजे. मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या, सुट्‌ट्यांचा काळ होता- म्हणून 22 एप्रिल ही तारीख निवडली गेली. या गोष्टीला आणखी एक बाजू आहे. 22 एप्रिल ही तारीख ब्लादिमीर लेनिन यांची जयंतीसुद्धा आहे.

विस्मरणात गेलेले लेनिन यांची आज 150 वी जयंती आहे. 1970 मध्ये ती शताब्दी होती.  1917 ला सोव्हिएत क्रांती झाली आणि 1924 मध्ये लेनिन वारले. या वर्षात लेनिन यांनी केलेलं काम पूर्णपणे वेगळं होतं. क्रांती झाल्यानंतर लेनिन यांनी निसर्गाशी करार जाहीर केला होता. त्यांनी निक्षून सांगितलं, ‘‘आमचा विकास हा निसर्गाला साथ घेऊन जाणारा आहे. निसर्गाची क्रूरपणे हत्या करून आम्ही विकास करणार नाही.’’ खंडप्राय सोव्हिएत युनियनमधील सर्व आदिवासी या धोरणामुळे आनंदून गेले होते. लेनिन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘‘जंगलाचं आणि आदिवासींचं आम्ही रक्षण करणार आहोत. कुठल्या भागात किती वृक्षतोड करायची, किती प्राणी मारायचे, हे आदिवासी ठरवतील.’’ यानंतर जंगलसंवर्धनाचे जितके कायदे झाले, त्या सगळ्यांनी लेनिन यांना त्याचं श्रेय अजिबात  न देता केवळ वापर केलेला आहे. एकंदरीत या सगळ्या कारणांमुळे विल्सन आणि हेज यांना वाटत होतं की, आपण 22 एप्रिल हा दिवस निवडावा आणि त्याप्रमाणे 22 एप्रिल 1970 रोजी जवळजवळ 20 लाख अमेरिकेत जमले. या सर्व घटनांचा परिणाम म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरवलेली पहिली जागतिक पर्यावरण परिषद! भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या त्यात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा ‘जंगल नष्ट करणे हा धोका आहे; नुकत्याच मुक्त झालेल्या भारतासारख्या वसाहती जंगल नष्ट करून जगाचं पर्यावरण बिघडवत आहेत’, हा धोशा अमेरिकीने लावला, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘गरिबी ही सर्वांत मोठी प्रदूषक आहे.’’ पुढे या प्रतिपादनाचा वापर अनेक गरीब देशांनी अनेक वेळा केला आहे.

वसुंधरादिन आणि जागतिक पर्यावरण परिषदेनंतरच अनेक कायदे अस्तित्वात येऊ लागले. दि. 5 जून 1974 पासून जागतिक पर्यावरणदिन साजरा होऊ लागला. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या शीत युद्धामुळे 1972 ते 1992 या काळात जागतिक पर्यावरण परिषद होऊ शकली नाही. दुसरीकडे लेनिन गेल्यानंतर स्टालिन सत्तेवर आले. तेव्हापासून जगाच्या विकासाची रीत एकसारखीच झाली. भांडवलशाही देश किंवा नावाने साम्यवादी असू देत, सगळ्यांनी निसर्गाचा विनाश, निसर्गाचं प्रदूषण करूनच आपला विकास केलेला आहे.

दुसरी जागतिक पर्यावरण परिषद 1992 मध्ये झाली. त्यानंतर जागतिक जलदिन, जागतिक जैवविविधता दिन आणि जागतिक स्थानिक दिन म्हणजे आदिवासीदिन हे दिवस साजरे होऊ लागले. या काळामध्ये पर्यावरण -संवर्धनाचे कायदे तयार झाले व त्यात सुधारणा होत गेल्या. आज आपण 2020 मध्ये पन्नासावा वसुंधरा दिवस साजरा करताना या कोरोनाकाळात पर्यावरण विषयाची बरीच जागृती दिसत आहे. भारताकडे बघितले तर 2000 पूर्वी वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण हे सगळं काहीअंशी हळूहळू कमी होताना दिसत आहे कारखाने वाहनांच्या गुणवत्तेमेध्ये खूप सुधारणा झाली आहे व होत आहे. याचं श्रेय जागतिक वसुंधरादिनाला नक्कीच देता येईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाकडे पाहू.

गेल्या वर्षी ॲमेझॉन, ऑस्ट्रेलिया, सैबेरिया आणि इंडोनेशिया फक्त एवढ्या देशांतील जवळपास दोन कोटी हेक्टरवरील जंगलांना आगी लागल्या. जीवसृष्टीचा अभ्यास करणारी ‘वर्ल्ड वाइड लाइफ फंड’ संस्था सांगत आहे, ‘1970 पासून आजतागायत जवळजवळ 60 टक्के सरपटणारे प्राणी, मासे आणि सस्तन प्राणी संपूर्णतः नष्ट झालेले आहेत. दररोज जवळपास 5.5 प्रजाती नष्ट होत आहेत, म्हणजे एका वर्षाला 2000! हे सांगताना ती शाळेतील मुलगी ग्रेटा गहिवरत होती.’

जागतिक आरोग्य संघटनेने 600 पानांचा हवामानबदल आणि आरोग्य अहवाल 1992 मध्ये  प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘माणसं जंगलावर आक्रमण करत आहेत. जंगलं आकुंचन पावत जातात तसे जंगलांतील प्राणी शहराकडे येत आहेत. जंगली प्राण्यांसोबत अनेक जीवाणू व विषाणूदेखील त्यांना कुठलाही त्रास न देता राहत असतात. मात्र ते विषाणू माणसाला त्रासदायक ठरतात.’ मागील 30 वर्षांतील सर्व मोठे आजार व साथी ह्या जंगलातून आलेल्या विषाणूंमुळे आल्या आहेत. माकडापासून आलेल्या विषाणूमुळे एड्‌स पसरला. त्यानंतरचे इबोला, सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू आणि आत्ताचा कोरोनासुद्धा- ही सगळे जंगलातून आलेल्या विषाणूची देणगी आहे.

कोरोना आणि हवामानबदल यांचाही जवळचा संबंध आहे. हवामानबदलासाठी जबाबदार आहे कर्बनउत्सर्जन! कार्बन संहितेची सुसह्य पातळी 350 पीपीएम (पाटर्‌स पर मिलियन) आहे. कोरोनापूर्व काळात ती 420 पर्यंत गेली होती. हे आपण थांबवलं नाही, तर असह्य तापमानवाढीमुळे आपली वाटचाल सहाव्या समूळ उच्चाटनाकडे (एक्सटिंक्शन) आहे. ह्या आधी सुमारे  20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर दुसरा ग्रह आदळून किंवा उल्कापात होऊन इथली जवळपास 80 टक्के जैवविविधता नष्ट झाली होती. त्या काळात डायनॉसोर नष्ट झाले होते. आता आपली वाटचाल त्याच दिशेने चालली आहे, असं शास्त्रज्ञ पुराव्यानिशी सांगत आहेत. कर्ब-उत्सर्जनातून झालेली तापमानवाढ हे त्याचं मुख्य कारण आहे. 1 अंश सेल्सियस तापमानवाढ झाल्याचे हाल आपण भोगत आहोत. 2 अंशांनी तापमान -वाढ झाली तर... आणि 6 अंश सेल्सिअसने जगाचे तापमान वाढलं तर... जगाचा विनाश कसा होईल, हे वैज्ञानिक आपल्याला सांगत होते आणि सांगत आहेत. हे लक्षात घेता, गेल्या वर्षी त्या ग्रेटा थुनबर्गच्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ आंदोलनासाठी जगातील 1.5 टक्के मुलं रस्त्यावर एकत्र आली होती. ती तळमळीने सांगत होती, ‘‘आपल्या जगाला आग लागली आहे, राहण्यासाठी दुसरा ग्रह उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपली पृथ्वी- आपला ग्रह वाचवण्यासाठी आपण कर्ब उत्सर्जन अर्थव्यवस्थेकडून कर्बरहित हरित अर्थव्यवस्थेकडे जाणे आवश्यक आहे.’ ’त्यांचे कोणीही ऐकत नव्हतं. ग्रेटाला तर प्रचंड ट्रोल केलं गेलं. तिला न लेखून तिची अवहेलना केली गेली.

आणि आत्ता...

कोरोनाकाळात सगळेच पर्यावरणाबद्दल बोलत आहेत. दिल्लीत कधी नव्हे ते स्वच्छ आकाश दिसायला लागलं आहे. असं निळं स्वच्छ आकाश दिल्लीला कधी बघताच येत नव्हतं. हवेच्या गुणवत्ता निर्देशंकानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) 0 ते 50 निर्देशांकांची हवा ही आरोग्यास उत्तम असते. 51 ते 100 निर्देशकांच्या हवेत शारीरिक दृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनाच त्रास होऊ शकतो. 101 ते 151 निर्देशांकात आजार येऊ शकतात. 151 ते 200 निर्देशांकात श्वसनाच्या आजाराची साथ पसरते. 201 ते 300 निर्देशांकांची हवा असल्यास शारीरिक दृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनी घराबाहेरसुद्धा पडू नये, असं सांगितलं जातं. आणि 301 ते 500 निर्देशांकांची हवा असेल तर संचारबंदी करायला लागते आणि दिल्ली या वर्षी डिसेंबरमध्ये 900 ते 1000 निर्देशांक पार करून गेली होती.  मुंबईमधील हवासुद्धा 300 च्या पुढे जात होती. प्रदूषित हवेमध्ये 2.5 मायकॉन आकाराचे सूक्ष्म घनकण असतात. (आपला केस साधारणपणे 50 मायक्रॉनचा असतो.) ते सूक्ष्म कण वातानुकूलन यंत्रणेतूनसुद्धा आपल्या  नाकातून फुप्फुसापर्यंत जाऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. या प्रदूषित हवेमुळे भारतात 12 लाख बळी जातात. आता प्रदूषित हवा जास्त आहे, तिथे कोरोनाचे बळी जास्त आहेत, असे अमेरिका व इंग्लंडमधील अनेक संशोधन-संस्थांचे निष्कर्ष आहेत.

आज  कोरोनाकाळात कर्ब-उत्सर्जन कमी झाल्यामुळे दिल्लीसारख्याच ठिकाणी नाही, तर जगभर शुद्ध हवा मिळत आहे. जालंधरहून दीडशे किलोमीटर अंतरावरची हिमशिखरं जी पूर्वी कधीच दिसत नव्हती, ती आता दिसायला लागली आहेत. बाकी पक्षी किती वगैरे तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यांना आता आनंद झालेला आहे. पण कोरोना येण्याआधीच्या काळात जगातल्या 30 गलिच्छ शहरांमध्ये भारतातील 22 आहेत. ह्या शहरांतील हवा आपल्याला गुदमरवून टाकणारी आहे, जिथे लहान मुले नीट जगू शकत नाहीत. जानेवारी महिन्यामध्ये वातावरण या संस्थेने मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कृत्रिम फुप्फुस लावले होते. ते तीन आठवड्यांत पूर्णपणे काळवंडून गेले होते. (1999 मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणयोद्धे अनिल अग्रवाल यांनी नैनितालच्या हवेतलं फुप्फुस कसं लालबुंद आहे आणि त्या काळातील दिल्लीच्या हवतलं फुप्फुस कसं काळं कुळकुळीत आहे, हे  दाखवून दिलं होतं. त्या वेळेचे पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी यांच्यासमोर या प्रदूषणाचे सादरीकरण केलं होतं. अटलजींनी अतिशय मोठ्या मनाने  5000 लहान मुलांच्या मोर्चाचं निवेदन स्वीकारलं होतं. त्यानंतर डिझेलवर चालणारी वाहने नैसर्गिक वायूवर केली होती.) आता सर्वांना अतिशय शुद्ध हवा व स्वच्छ नद्यांचा आनंद होत आहे. पण प्रश्न असा आहे की, इथून पुढे म्हणजे कोरोनोत्तर कालखंडात काय? तर, याची दोन उत्तरे आहेत- कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला आग्रही असलं पाहिजे. स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीतसुद्धा. म्हणजे सरकारच्या बाबतीत कोरोनानंतरचं जग आधीसारखं अजिबात असणार नाही. इसवी सनपूर्व आणि इसवी सननंतर, तसं आता कोरानापूर्व आणि कोरोनात्तर अशी मांडणी होईल. कोरोनोत्तर जगात अतिशय भीषण अशा आर्थिक मंदीला आपल्याला सामोरं जावं लागेल. खऱ्या अर्थाने क्रांतीसमान अशी प्रचंड उलथापालथ होणार आहे. मानवी जीवनात तीन क्रांत्या झाल्या आहेत. भटके जीवन स्थिर झालं ती शेती किंवा कृषिक्रांती, खेड्यातून शहराकडे आलो ती औद्योगिक क्रांती आणि नंतर ज्ञानाची महती सांगणारी माहिती क्रांती! पण आता कोरोनानं आपल्याला सर्व बाबतींत नव्याने विचार करायची वेळ आणली आहे.

आपली अर्थव्यवस्था टिकणारी नाही. ती शाश्वत नाही, अतिशय कचकडीची आहे, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. अमेरिका हातघाईला आलेली आहे. अमेरिकेतील सुमारे 7.5 कोटी लोकांनी त्यांची बेरोजगारी जाहीर केलेली आहे. काल अमेरिकेत जेवण घेण्यासाठी गाड्यांची 15 किलोमीटर लांबीची रांग लागली होती. ‘आज सहा दिवसांनी आम्हाला ताजंतवानं जेवण मिळालेलं आहे’- असं ते सांगत होते. ही अमेरिकेची स्थिती... तर आपलं काय होईल?

यंदाचा पर्यावरणामधील नोबेल अशी ख्याती असलेला ‘टायलर पुरस्कार’ पवन सुखदेवजी यांना मिळाला आहे. स्विझर्लंडस्थित सुखदेव यांचं संशोधनच निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र यावर आहे. आजपर्यंत सर्व पक्षांनी, सरकारांनी, विचारसरणींनी ‘विकास की पर्यावरण?’ ठरवताना निसर्गाची टवाळी व उपेक्षाच केली आहे, ते आता चालणार नाही. सुखदेव म्हणतात, ‘‘आरेमधील चारशे झाडे तोडली, त्यात विशेष काय? -हा प्रश्नच घातकी आहे, हा विचार अतिशय तात्पुरतं व तेवढ्यापुरता बघणारा आहे. अशी आपली जीवनशैली झाली आहे.’’ झाडं, जंगलं ही कितीही छोटी असू देत, त्याची स्वतःची एक पर्यावरणीय यंत्रणा असते. त्या झाडावर पक्ष्यांची घरटी, तिथले कीटक या सगळ्यांनी ही यंत्रणा तयार होते. ती आपल्यासाठी काम करत असते. जंगलामुळे ऑक्सिजन मिळतो, कर्ब वायू शोषला जातो. उष्णता शोषून लाटेचा प्रभाव (जंगलामुळे तुमचं तापमान तीन ते पाच अंशांनी कमी होऊ शकतं.  याची खात्री करून घ्यायची, तर तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठाच्या आवारात जा आणि बाहेर या; तुम्हाला तापमनातील फरक जाणवून येईल.) कमी होतो. पाणी मुरवून पुराचा धोका कमी होतो. शिवाय निसर्गसान्निध्य आनंद देतो. या सर्वांची किंमत काढता येते.

यंदा आपलं कुणाचं लक्ष गेलं नाही, पण या वर्षी अतिशय मोठी टोळधाड एकूण अठरा देशांमध्ये म्हणजे इराणपासून इथिओपियापर्यंत आली होती. या वर्षी चक्रीवादळांची संख्या वाढल्यामुळे वाळवंटी भागात नको तेवढं गवत उगवलं. ते गवत खायला तिथे पशू-पक्षी नव्हते, त्यामुळे तिथे टोळ वाढले आणि एका वेळेला जवळजवळ 20 अब्ज टोळ, 24 तासांतून 150 किलोमीटर प्रवास करून रस्त्यात येणारं सर्व उभं पिकं पूर्णपणे फस्त करत जात होते. पाकिस्तानपर्यंत ते येऊन गेले आहेत. आपल्या राजस्थानच्या काही भागात ते डोकावून गेले आहेत. असे धोके यापुढे वारंवार येणार आहेत. पर्यावरणामुळे येणाऱ्या रोगांचा, साथींचा, महामारींचा अभ्यास करणारे पर्यावरणीय रोगशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘कोरोना हे हिमनगाचं टोक आहे.’’  आता करायचं काय? संयुक्त राष्ट्रसंघाने सांगून ठेवलेलं आहे, ‘आपत्तीची जोखीम टाळण्यासाठी एक लाख खर्च केले, तर तुमचे आपत्तीच्या काळातील वीस लाख वाचत असतात.’

पर्यावरणाची ही दुरवस्था झाली, कारण आपण सगळ्यांनी त्याकडे डोळेझाक केली. माझा काय संबंध, म्हणून सोडून दिलं आहे. आता खरंच जर आपलं पुढच्या पिढीवर प्रेम असेल, तुमची मुले नीट जगावीत असं वाटत असेल, त्यांना शुद्ध हवा; पाणी मिळावं असं वाटत असेल, तर आपल्याला काय करणे भाग आहे, ते बघा-

0 आपली कार्यालये लांब नकोत. मुंबईत नरिमन पॉइंटला कार्यालय कशाला हवं? देशाच्या, राज्याच्या, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाची गरज काय? ही संकल्पना आता बदलायला हवी. घरातून काम करता येतं, हे आता सिद्ध झालंय. सगळ्या कंपन्यांनी तो बदल स्वीकारलाय. कार्यालयावरचा खर्च कमी करावा लागणार आहे.

0 प्रवासावरचा व वाहतुकीवरचा खर्च व प्रदूषण कमी करावा लागणार आहे.

कोरोनाच्या कुलूपबंदीमुळे जगात 2.2 अब्ज टन कर्ब उत्सर्जन कमी झालं आहे. गेल्या वर्षी 140 कोटी लोकांनी पर्यटन केलं होतं. त्यावर जगात नऊ ट्रिलियन डॉलर्स खर्ची पडले होते. अतिपर्यटनानंसुद्धा स्थानिक भागावर ताण पडतो, याचा आपण विचार करत नाही. सिमला असो व महाबळेश्वर तिथल्या रहिवशांना पाणी मिळणे कठीण होत आहे. ही उंचावरची ठिकाणे आहेत. त्यांना पाणी देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते.

आता याचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागणार आहे. विकास करताना पर्यावरणाला सोबत घेऊन कसं जाता येईल, याचा विचार करावा लागणार आहे.

मोहनदास करमचंद गांधी यांना निसर्गाचे अध्वर्यू म्हणतात. आज जगात सगळीकडे कार्बन पदचिन्हे व  पर्यावरणीय पदचिन्हे कमी करण्यावर भर दिला जात आहे. सर्वांत जास्त कार्बन पदचिन्हे वाहतुकीमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियातला गहू, मोझांबिकची तूर, अफगाणिस्तानचा कांदा आपल्याकडे येतो. गांधीजी म्हणायचे, ‘तुमच्या गरजा पंचक्रोशीतून भागवा.’ आता हे जगाचे ब्रीदवाक्य होत आहे.

हा प्रश्न जागतिक असला, तरी त्याला उत्तर स्थानिकच असते. स्थानिक मजबुतीकरण महत्त्वाचे. आपण जागतिक -जागतिक म्हणत स्थानिकतेला खूप दुबळं करून टाकलेलं आहे. आता आपल्याला आपल्या भागातच शक्य तेवढी पिके, भाज्या व फळे पिकवावी लागतील.

‘देवाला बळी वाघाचा -सिंहाचा चालत नाही, त्याला बकरीच लागते’, असं एक संस्कृत सुभाषित आहे. कारण ती  दुबळी आहे. प्रत्येक आपत्तीमध्ये दुबळ्यांचाच जीव जातो. तेव्हा आपल्याला स्थानिकाला दुबळे करून चालणार नाही, हा या कोरोनाचा संदेश आहे. स्थानिक पर्यावरण जर आपल्याला मजबूत करता आलं तर, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत केलीच पाहिजे. आपल्याकडे प्रचंड वैभव आहे. संसर्गरहित स्थानिक बुद्धिमत्ता भरपूर आहे, जिला कधीही चालना मिळत नाही. बहुविधता प्रचंड आहे, जिचा उपयोग आपण करून घेत नाही. आपण आदिवासींना किंमत देत नाही. आपल्या देशात 11 कोटी आदिवासी आहेत. लाकूड, बांबू, लोखंड, कागद व मातीमधील आदिवासींची कारागिरी अद्वितीय आहे. या कलेचा आपण आदर केला नाही. परदेशातील अनेक शास्त्रज्ञ अनेक ज्ञानशाखांचा संगम करून निसर्ग-सान्निध्यातील कलांचा अभ्यास करीत आहेत. समाजशास्त्र, जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, वास्तुकला यांचा संगम साधून विकासाचं नवं प्रतिमान तयार करीत आहेत. हरित इमरती, हरित शहरं यातून साकार होत आहेत. हे आपल्याकडेसुद्धा करणे आवश्यक आहे. हा विचार आपण कोरोनाच्या काळात करायला पाहिजे.

सातशे वर्षांपूर्वी नामदेवांनी ‘क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे।’ असा प्रश्न विचारला होता. आपण जर खरंच असा विचार केला तर- आपल्याला बदलता येईल, बदल घडवता येईल, बदलांचा आग्रह धरता येईल. मग आपली पुढची पिढी कदाचित म्हणेल, आमची मागची पिढी अगदीच मूर्ख नव्हती. धन्यवाद.

(दि. 22 एप्रिल -वसुंधरा दिनानिमित्त फेसबुकलाईव्हवरून केलेले भाषण)

Tags: भाषण फेसबुक लईव्ह वसुंधरा दिन अतुल देऊळगावकर thet sabhagruhatun facebook live fifity years of world earth day atul deulgaonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके