डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सेनेगलची राजधानी डकार येथे संयुक्त राष्ट्रसंघाने 2004 मध्ये आयोजित केलेल्या पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’त सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी गोरे बेटाला भेट देण्याची संधी मिळाली होती. सध्या चालू असलेली ‘ब्लॅक मॅटर्स’ चळवळ व त्यानंतर जगभर उसळलेले उद्रेक पाहताना रंगभेदाचे आदिबंध आठवत होते.

हताशेसाठी सवड नाही. आत्मदयेला स्थान नाही. नि:स्तब्धतेची गरज नाही आणि भयासाठी जागा नाही. आम्ही बोलत जाऊ, आम्ही लिहीत जाऊ. संस्कृतीच्या (सिव्हिलायझेशन) जखमा अशाच भरत जात असतात. 

- श्रेष्ठ साहित्यिक टोनी मॉरिसन 

सन 2020 च्या जुलै महिन्यात अमेरिकेतील गोऱ्या पोलिसाने जॉर्ज फ्लाईड या हातकड्या घातलेल्या कृष्णवर्णीय तरुणाला खाली पाडून मानेवर गुडघ्याने दाबत जीवे मारले आणि जगभर ‘ब्लॅक मॅटर्स’ ही चळवळ सुरू झाली. अमेरिकेत तर कोरोनाचा कहर असूनही देशभर लाखो तरुण रस्त्यांवर उतरून संताप व्यक्त करू लागले. पाहता-पाहता हे लोण युरोप-आफ्रिकेतही पोहोचलं. तेव्हा अमेरिकेपासून 8300 किलोमीटर अंतरावरील गोरे बेटावरील जनतेने तेथील प्रख्यात ‘युरोप चौका’चं नामकरण ‘स्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठा चौक’ असं केलं. त्यानंतर ‘गोरे’ बेटाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांची विनंतीपत्रं वाढतच गेली आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते पुन्हा खुलं केलं गेलं. हे वाचून गोरे बेट पुन्हा एकदा मानगुटीवर येऊन बसलं. 

अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आफ्रिका खंडाच्या पश्चिमेस रिपब्लिक ऑफ सेनेगल नावाचा छोटा देश वसला आहे. वुलुफ या स्थानिक भाषेत सेनेगल म्हणजे आमची नाव! सुमारे 1.60 कोटी लोकसंख्येच्या सेनेगलची राजधानी आहे डकार. डकारपासून दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे बोटीने 15 मिनिटांतच निळ्याशार अथांग महासागरातील कमालीचं चिमुकलं गोरे बेट लागतं. ‘गन्स ऑफ नॅव्हेरॉन’ या प्रसिद्ध चित्रपटातील विशाल काळा पाषाण इथेच पहुडला आहे. त्या प्रचंड तोफा इथेच पाण्यात नांदत आहेत. या बेटावर लाल व पिवळ्या रंगांची टुमदार घरे आहेत. सेनेगली संस्कृतीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या बाओबाब वृक्षाची इथं दाटी आहे. त्या फळांचा रस तब्येतीला उत्तम असतो. डोकेदुखी, पोटदुखीसाठी मुळ्यांपासून पानांपर्यंत सर्वांचा उपयोग केला जातो. अशा या रमणीय बेटावर मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट काळाची छाया आहे.

भूगोलाने युरोप, अमेरिका व आफ्रिका यांचा त्रिकोण साधलेल्या सेनेगलवर पंधराव्या शतकापासूनच परकीयांचा मोकाट अत्याचार सुरू झाला. आधी पोर्तुगीज, मग डच, नंतर ब्रिटिश आणि फ्रेंचांनी सेनेगलवर राज्य केलं. त्यामुळे गोरे बेट हे गुलामांच्या व्यापाराचं प्रमुख केंद्र होऊन गेलं. 

माणुसकीची कोणतीही बाब ज्यांच्या वाट्याला येत नाही, जनावरांएवढीही किंमत दिली जात नाही- असा मनुष्य म्हणजे गुलाम! एकदा का त्याला फुटकळ किमतीला विकत घेतलं की, कितीही वेळ- कसंही राबवून घेता येतं, अशी व्यक्ती म्हणजे गुलाम! कोणतंही काम नाकारण्याचा हक्क नसणारे पुरुष-स्त्री-बालक मुकाटपणे श्रम करत. नकार देणाऱ्यांना चिलट मारल्यासारखं मारून टाकणारा उन्मत्तपणा मालकांच्या अंगी होताच.

युरोप-अमेरिका हे अस्सल बांडगुळी! तिकडे वैज्ञानिक व कलावंतांमुळे प्रबोधनाचं पर्व आलं. मात्र त्यांच्याकडील संपत्तीची निर्मिती ही काही ‘स्व’-तंत्राने झाली नाही. आफ्रिकी मजुरांच्या अचाट व फुकट श्रमांतूनच त्यांची कापसाची लागवड झाली. तसंच ऊस व चहाचे मळे फुलत गेले. विंदांनी म्हटलेली या कष्टकऱ्यांची ‘स्वेदगंगा’च गोऱ्यांच्या शेतांचं सिंचन करीत होती. पुढे शेतीतल्या कच्च्या मालातून कापड, साखर हा पक्का माल करणारे कारखाने आले. त्यालाही कामाचे तास नसणारे वेठबिगार हे आफ्रिकीच होते. शेतीक्रांती असो वा औद्योगिक क्रांती; तिची पायाभरणी ही कृष्णवर्णीयांच्या पिळवणुकीतून झाली आहे. अंकित केलेल्या देशांतील शेतकऱ्यांना नगण्य वा अत्यल्प भाव देऊन गोरे बेटावर देशोधडीला लावलं. आफ्रिकेतील दणकट कृष्णवर्णीयांच्या बेसुमार श्रमांतून ब्रिटन-फ्रान्स, पोर्तुगाल व अमेरिका यांच्या संपत्तीच्या निर्मितीचा वेग वाढत गेला. तीनशे वर्षांच्या या क्रूर पर्वाची साक्ष म्हणजे गोरे बेट! युरोप व अमेरिकेला हे फुकट श्रम उपलब्ध झाले नसते तर... औद्योगिक क्रांतीमधील वर्चस्व त्यांच्याकडे गेलं असतं? जगभर विस्थापित झालेले कृष्णवर्णीय त्यांच्या देशातच राहिले असते, तर इतिहासाला कशी कलाटणी मिळाली असती? या जर-तरला इतिहासात कवडीएवढीही किंमत नसते... तरीही. 

गोरे बेटावरील वास्तूच्या भल्या मोठ्या लाकडी दरवाजावर ‘गुलामांचा निवास’ (हाऊस ऑफ स्लेव्हज) असा फ्रेंच भाषेतील फलक आहे. या नरकपुरीत खालच्या खोल्यांमध्ये गुलामांना ठेवलं जायचं. वरच्या मजल्यावरील खोल्यांत युरोपीय खरेदीदार राहायचे. 5 फूट रुंद, 10 फूट लांब व केवळ 7 फूट उंच खबदाडात 10 पुरुषांना कोंबायचे. कोंदट वातावरणात दाटीवाटीनं एकमेकांना ढकलत राहायचं. मोकळी हवा नाही, मोकळी हालचाल नाही. गुलामांच्या अंगावर केवळ लंगोट असे. केवळ विधी उरकण्यापुरतं बाहेर सोडण्याचा दंडक होता. पुरुषांचं सतत वजन केलं जायचं. 60 किलो वजनापेक्षा जास्त भरलं, तर किंमत चांगली येत असे. पुरुषाच्या दणकटपणानुसार व्यापारी मोबदला द्यायचे. अंगणात विक्रीयोग्य गुलामांना उभं केलं जात असे. वरच्या मजल्यावरून व्यापारी खाली एकेकाला न्याहाळत असत. व्यापाऱ्यांकडून गुलाम विक्रेत्याला साधारणपणे पुरुषांच्या मोबदल्यात बंदूक मिळायची. ती बंदूक हे विक्रेते दिमाखाने मिरवायचे. 

महिलांच्या अंगावरही केवळ लज्जारक्षणापुरतं वस्त्र असे. त्याचं मूल्य हे त्यांच्या वक्षस्थळांच्या आकारानुसार ठरवलं जायचं. सहसा स्त्रियांचं विनिमयमूल्य हे वाहनाच्या रूपातून होत असे. बालकांची किंमत चुकविण्यासाठी विविध आकारांचे आरसे दिले जात. 60 किलोपेक्षा कमी वजनांच्या पुरुषांना ‘डुकरासारखे’ (ही त्यांचीच ‘प्रतिमा’) सुजण्यासाठी खाद्यपुरवठा केला जायचा. वजन वाढवलेल्या पुरुषांना व पसंत पडलेल्या महिलांना समुद्रात उभ्या असलेल्या बोटीपर्यंत एका छोट्याशा दारातून सोडलं जात असे. पुन्हा कधीही मायदेशी न परतण्याची ती वाट होती. ते प्रवेशद्वार परतीचा मार्ग बंद करणारं होतं. हा किनारा सुटला की, त्यांच्या पुढील हाल-अपेष्टा चालू व्हायच्या. अंतहीन यातनांतून सुटकेचा प्रयत्न करणाऱ्यांचा अंत घडवायला पिस्तुल व बंदुका सज्ज असत. या दारानं कोट्यवधी जीवांच्या स्वातंत्र्याचा अंत पाहिला आहे. श्रेष्ठ कवी नामदेव ढसाळ यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ अशीच भावना त्या दारात उभं असणाऱ्यांची असणार. 

आज्ञा मोडण्याचा गुन्हा केलेल्या गुलामास 3 फुटी दारातून 5 फूट उंच, 5 फूट रुंद व 7 फूट लांब बोळकांडात खितपत पडून राहण्याची शिक्षा असे. बालकांच्या खोल्यांत 100 जणांना डांबले जायचे. खरेदीदारांना पसंत पडलेल्या स्त्रियांचा वरच्या खोल्यांत उपभोग घेतला जात असे. त्यांच्या किंकाळ्या व आक्रंदन इतर गुलामांना ऐकू जाऊ नये, यासाठी विविध गायक-वादकांना बसवून मोठमोठ्या आवाजात गाणी गायली वा वाजवली जायची. (संगीताचा असाही उपयोग घेण्याची कल्पना) गोरे बेटावर व्यापारी व युरोपियनांच्या निर्घृणतेचे किती बळी असतील? गर्भवती मुलींची सुटका होत असे. त्यांच्या मुलांना फ्रेंच नागरिकत्व मिळायचं. नावासकट सगळ्या युरोपियन खुणा घेऊन ही पुढची पिढी तयार झाली. मूल रंगानं गोरं झालं, तर त्या मुलीला अधिक सवलती मिळत. 

आजही त्या काळातील अमानुषतेचे अवशेष साखळदंड, मानेच्या साखळ्या तिथे पाहायला मिळतात. या बेटावर 1536 ते 1848 तब्बल 312 वर्षे आसन्नमरण काळी छाया होती. किमान 2.5 कोटी गुलामांची विक्री झाली. सुमारे 60 लाख कृष्णवर्णीयांचा मृत्यू या काळकोठडीत झाला आहे. हिटलर, स्टालिन, पॉल पॉट यांच्यापेक्षा कैक पटीनं अधिक क्रूरतेची साक्षीदार ही छळछावणी आहे. 

स्वतंत्र सेनेगलचे पहिले अध्यक्ष व प्रख्यात कवी लेपल्ड सेंघोट, लेखिका मरियम बा यांनी गोरे बेटावर वास्तव्य केलं. त्यानंतर अनेक लेखक-कवी व कलावंत इथं वास्तव्य करीत आहेत. कित्येक साहित्यिक व कलावंत इथे दीर्घ काळ राहून जातात. 

‘युनेस्को’ने (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) गोरे बेटाला 1978 मध्ये ‘जागतिक वारसा’ घोषित केल्यामुळे तिथल्या सर्व वास्तूंना काटेकोरपणे जतन करण्यात येत आहे. दर वर्षी लाखो कृष्णवर्णीय अमेरिकेतून गोरे बेटाला येऊन जातात. आपल्या मुळांचा शोध घेताना त्यातील एक अटळ दुवा म्हणजे हे बेट, असं त्यांना वाटत असणार. हजारो लोक इथली माती कपाळाला लावून हुंदके देतात आणि विषण्ण होऊन जातात. 

मानवी इतिहासातील कृष्णपत्रिका पाहण्यासाठी 1991 मध्ये नेल्सन मंडेला यांनी इथं भेट दिली होती. त्या छोट्या बोळकांडात ते अर्धा तास बसून राहिले आणि म्हणाले, ‘‘माझ्या 29 वर्षांच्या कारावासापेक्षा भीषण अनुभव होता.’’ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे 2013 च्या जून महिन्यात सहकुटुंब गोरे बेटावर येऊन गेले. ‘‘इथे अगणित वेदना व आक्रोश ऐकू येेतात व दिसतात. कोणीही नि:शब्द होईल.’’ एवढ्या मोजक्या शब्दांत ओबामा यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

गोरे बेट सोडत असताना खिन्नता कमालीची दाटून आली होती. एरवी शेकडो वर्षांचा इतिहास कथन करणाऱ्या पुरातन व प्राचीन वास्तूंचा अनुभव हा बहुपेडी असतो, मात्र बळजबरी व दांडगाईचं भीषण प्रतीक असणारी ‘गुलामांची छळकोठडी’ अंगावर येत होती. 

अनेक विद्वानांनी आफ्रिकेच्या शोषणाचे कित्येक पैलू समोर आणले आहेत. नोबेलविजेते अर्थवेत्ते गन्नार मिर्दाल यांनी ‘एशियन ड्रामा - एनक्वायरी इन टू पॉव्हर्टी ऑफ नेशन्स’ या त्रिखंडीय ग्रंथातून वसाहतवादाचे अर्थकारण 1968 मध्ये मांडलं. आफ्रिकेतून 1536 ते 1848 तब्बल 312 वर्षे गुलामांची विक्री होत असे. ‘वसाहती केलेल्या देशांमधील संपत्ती आणि कृष्णवर्णीयांचे श्रम या पायावर युरोप व अमेरिकेने औद्योगिक क्रांती केली. आशियाई व आफ्रिकी देशांच्या दारिद्र्याचे हेच कारण आहे,’ हे त्यांनी दाखवून दिलं होतं.

एडवर्ड सैद यांनी ‘श्वेतवर्णीयांनी साहित्यामधून आशियाई व आफ्रिकी देश हे रानटी, असंस्कृत, आळशी व नालायक असल्याचे दाखले देण्याचा प्रघात घातला. आपण गुलाम असणे हेच योग्य, असे ठसवण्याकरिता कृष्णवर्णीयांमध्ये जबरदस्त न्यूनगंड व अपराधगंड निर्माण करणे आवश्यक होते. हे कार्य श्वेतवर्णीय साहित्यामधील प्रतिमांनी केले.’ हे सिद्ध करणारा ‘ओरिएंटॅलिझम’चा सिद्धांत त्यांनी 1974 मध्ये मांडला. या विचारांचा साहित्यिक उद्रेक म्हणजे जगभरच्या वाचकांना कायम खेचून घेणारी अलेक्स हॅली यांची अभिजात कादंबरी ‘द रूट्‌स!’ मुळांचा शोध घेण्यासाठी 1976 मध्ये आलेली ही कादंबरी अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांच्या यातनांचा मागोवा घेत आफ्रिकेपर्यंत जाते. त्यात श्वेतवर्णीयांनी केलेले क्रूर अत्याचार आणि त्यांनी लादलेल्या अनैतिहासिक व अनैतिक प्रतिमांमुळे कृष्णवर्णीयांच्या खच्चीकरणाचा समाचार हॅले यांनी घेतला आहे. त्याच वेळी त्यांनी आफ्रिकन संस्कृतीचा समृद्ध इतिहास सांगत अस्सल प्रतिमाही सादर केल्या आहेत. 

मग अचानक इसाप आठवला. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मानवजातीला नीतिकथांचा अमूल्य नजराणा देणारा इसाप (बुद्धाचा समकालीन) हा ग्रीसमधील गुलामच होता. दिसायाला कुरूप, परंतु अद्वितीय बुद्धीच्या इसापला पाहूनच त्याला विकत घेण्याचं धैर्य कोणीही करत नसे. झांथस नावाच्या तत्त्वज्ञाने इसापाची तीक्ष्ण बुद्धी व हजरजबाबीपणा तत्काळ जोखला आणि त्याला विकत घेतलं. इसापाचे अनेक सल्ले झांथस ऐकत गेला व त्याला त्याचा उपयोग झाला. पुढे क्रिसस राजाच्या दरबारातही इसाप दाखल झाला. दरम्यानच्या काळात इसापने स्वत:ची उपयोगिता सिद्ध केली होती आणि त्या बळावर त्याने अनेक गुलामांची सुटकादेखील केली होती. परंतु इसापाच्या वाट्याला असे किंचित उदार लोक आले नसते तर... 

या वाड्याबाहेरच्या प्रांगणात एका मोठ्या ढोलसदृश वाद्यावर उभ्या असलेल्या अर्धनग्न गुलाम दांपत्याचा पुतळा आहे. त्यांचे साखळदंड तोडून त्याचे हात वर गेले आहेत. ती त्याला बिलगून उभी आहे. हे दांपत्य स्तब्धपणे स्वातंत्र्य अनुभवत आहे. कष्टानं रापून गेलेले हे दोघेही बिनचेहऱ्याचे आहेत. पायाखाली असणारं वाद्य आता ताल देऊ शकेल, जीवनाला लय येऊन त्यातून संगीत निर्माण होईल, अशी अपूर्व आशा निर्माण करणारं हे प्रतीक आहे. 

बोटीने गोरेबेट सोडलं. अटलांटिक महासागराची निळाई, समुद्री पक्ष्यांच्या भराऱ्या, बोटीवरील स्थानिक तरुणांचं आफ्रिकन नाच-गाणं या वर्तमानावर उदास कोठडी सतत येऊन बसत होती. मधेच जालियनवाला बागेतील विहीर समोर येऊन जाई; तर कधी टोनी मॉरिसन, मरियम मकेबी यांच्या साहित्यामधील प्रतीकांचे संदर्भ नव्यानं लागत होते. 

प्रवेश करताना द्वारपालाला मी भारतीय असल्याचं समजल्यावर तो आनंदून म्हणाला, ‘‘गांधींच्या देशातील सज्जनाचे स्वागत आहे. गांधींमुळे मंडेलांना प्रेरणा मिळाली. असं आपलं घनिष्ठ नातं आहे.’’ त्या वेळी संपूर्ण तारुण्य, तुरुंगातील यातना, तुच्छता, नालस्ती सहन करूनही विशाल मनाने गोऱ्यांना क्षमा करणाऱ्या नेल्सन मंडेलांचं विराट दर्शन होऊन गेलं. ते सहजपणे म्हणत, ‘सूडाचा प्रवास चालू न राहता शांतपणे एकत्र जगू या.’

आता पुन्हा गोरे बेटाला भेट देण्यासाठी जगातून लोक येतील. जगातील प्रत्येक नागरिकानं एकदा तरी अंधारयुगातील हे स्मारक पाहणं आवश्यक आहे. निदान या बेटाचा वृत्तपट सर्व विद्यार्थ्यांना दाखविला, तर त्या स्मारकातून आत्मपरीक्षणाची शक्यता निर्माण होईल. तिसरं सहस्रक सुरू होताना दुसऱ्या सहस्रकाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला होता. सर्व चाचण्यांत अल्बर्ट आइन्स्टाईन, महात्मा गांधी व नेल्सन मंडेला हे अढळपणे होते- त्याचा बोध झाला. 

आता कायद्यानं माणसांची विक्री होत नाही, पण गुलामांशी अमानवी वागणाऱ्या वृत्तीशी थेट नातं सांगणाऱ्या कृती वारंवार दिसत आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदूच अधिक जागृत असणारे मोकाट मनुष्यप्राणी गुडघा मानेवर ठेवून मारून टाकतात. कुठे सामूहिक बलात्कार करून जीभ छाटतात. अशा महाभागांना गुलामांच्या जागी स्वत:ला ठेवण्याची कल्पना कधीच शिवणार नाही. उत्क्रांती उलट्या दिशेनं रानटी अवस्थेकडे नेणाऱ्यांसाठी आभासी वास्तवातून असं काही करता आलं तर... बीभत्सपणा जगातून नाहीसा करण्यासाठी हा जागतिक ठेवा सातत्यानं व कल्पकतेनं उपयोगात यावा, एवढीच आशा! 

 

Tags: बराक ओबामा नेल्सन मंडेला गुलामगिरी गोरे बेट अतुल देऊळगावकर गुलाम black lives matters black lives goree island gulamgiri gulam slavery house of slaves weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर
atul.deulgaonkar@gmail.com

मराठी लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात